मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆  काजळी मनावरची.. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? कवितेचा उत्सव ?

☆  काजळी मनावरची…. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

उदासीनतेची काजळी,

 अलगद धरते मनावर !

सारे कसे धुरकट धूसर,

 दिसू लागे अंत:पटलावर!

 

एक काजळी दाट थर,

 साठत जातो मना वरी !

विचारांची जळमटं ,

 लोंबकळत रहाती त्यावरी!

 

प्रेमजलाने स्वच्छ धुवावे,

 वाटे परी माझ्या मनाला !

निर्लेप पणाच्या वस्त्राने ,

 पुसू या हलकेच त्याला !

 

अलगद निघून जाईल,

 ते काजळीचे पटल !

स्वच्छ मनातच होईल,

 नव विचारांची उकल !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

वारजे, पुणे (महाराष्ट्र)

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ स्वामी विवेकानंद ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे

सुश्री उषा जनार्दन ढगे

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ? स्वामी विवेकानंद  ? ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे ☆ 

१२-०१-२०२२

पश्चिम बंगालभूमीचा रहिवासी

शिष्य रामकृष्ण परमहंसांचा

नरेंद्र दत्त हा तेजस्वी तत्वज्ञानी

महान सन्यासी भारतवर्षाचा..

ओढ लागली आत्मिक अनुभूतीची

‘आहे का देव ?’ प्रश्न यासी ग्रासिला

आरंभ झाला आध्यात्मिक साधनेला

गुरुंकडूनी मग अद्भूत साक्षात्कार जाहला..

परिचय करूनी दिधला स्वामीने

पाश्च्यात जगतास हिंदु धर्माचा

शिकविला पाठ अध्यात्मतत्वांचा

योग आणि भारतीय वेदांताचा..

बांधूनी डोईवरती केसरीया फेटा

तनी भगवेच वस्र केले परिधान

वदनी भाव सात्विक नजरेत विश्वास

वक्तव्यातूनी वाढविला हिंदूविचारांचा सन्मान..

प्रसारार्थ धर्मपरिषद भरली शिकागोत

प्रतिनिधी स्वामी विवेकानंद राहिले उपस्थित

“अमेरीकेतील माझ्या बंधू-भगिनींनो” म्हणता

टाळ्यांच्या कडकडाटात झाले स्वामींचे स्वागत..

साहित्यप्रेमी संगीत-कलेची आस

फिरला विश्वात हा महातत्वज्ञानी

संदेश पसरविण्यासी नच थांबला

धर्मप्रसारक श्रेष्ठ बुध्दीमान सनातनी..!

चित्र साभार – सुश्री उषा जनार्दन ढगे 

© सुश्री उषा जनार्दन ढगे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विठ्ठल रुक्मिणी संवाद…. ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे

सौ. स्वाती रामचंद्र कोरे

? कवितेचा उत्सव ?

☆ विठ्ठल रुक्मिणी संवाद…. ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे ☆

(काव्य प्रकार – अभंग वाणी)

विठ्ठल उदास | एकादशी दिनी

विचारे रुक्मिणी |का हो नाथा? ||१||

 

मुख झाले म्लान | उदास ही वाणी

काय आले मनी | सांगावे जी ||२||

 

बोले विठुराया | कसे सांगू तुला

जीव आसुसला | भक्तांसाठी ||३||

 

आली महामारी | शांत झाली वारी

माझा वारकरी |घरी राहे ||४||

 

चंद्रभागा तिरी | नाद मृदंगाचा

भास हा मनाचा | सतावतो ||५||

 

ऐकुनिया बोल | रुक्मिणी वदली

 चिंता ही कसली | नका करू ||६||

 

महामारी वेळी | वेश पालटून

रूप बदलून | लढलात ||७||

 

आरोग्य ,शिक्षण | साऱ्याच क्षेत्रात

तुम्हीच होतात | सर्वां ज्ञात ||८||

 

माझा विठुराया |पाठी उभा राहे

काळजी तो वाहे | विश्वास हा  ||९||

 

भरवसा ठेवा | वेळ ही जाईल

पंढरी सजेल |  पुनः पुन्हा ||१०||

 

रुक्मिणीचे बोल| मनास पटले

विठ्ठल हसले | गालातच ||११||

 

©  सौ. स्वाती रामचंद्र कोरे

भिवघाट.तालुका, खानापूर,जिल्हा सांगली

मो.9096818972

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रंजना जी यांचे साहित्य # 88 – स्वार्थ ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 88 – स्वार्थ ☆

आज मानवी मनाला स्वार्थ वळंबा लागला।

कसा नात्या नात्यातील तिढा वाढत चालला।।धृ।।

 

एका उदरी जन्मूनी धास घासातला खाई।

ठेच एकास लागता दुजा  घायाळकी होई।

हक्कासाठी दावा आज कोर्टात चालला ।।१।।

 

मित्र-मैत्रिणी समान दुजे नाते ना जगती ।

वासुदेव सुदाम्याची जणूयेतसे प्रचिती

विष कानाने हो पिता वार पाठीवरी केला ।।२।।

 

माय पित्याने हो यांचे कोड कौतुक पुरविले।

सारे विसरूनी जाती बालपणाचे चोचले।

बाप वृद्धाश्रमी जाई बाळ मोहात गुंतला ।।३।।

 

फळ सत्तेचे चाखले मोल पैशाला हो आले ।

कसे सद्गुणी हे बाळआज मद्य धुंद झाले ।

हाती सत्ता पैसा येता जीव विधाता बनला।।४।।

 

सोडी सोडी रे तू मना चार दिवसाची ही धुंदी ।

येशील भूईवर जेव्हा हुके जगण्याची संधी।

तोडी मोहपाश सारे जागवूनी विवेकाला।।५।।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मूढ मानवा ☆ श्री रवींद्र सोनावणी

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ मूढ मानवा ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆ 

सुख स्वप्नांच्या, सागरात या, शोधू नको रे मोती

मूढ मानवा, हाती येईल, रेती.. केवळ रेती ||धृ.||

 

तृषार्त होतो आपण जेव्हा, व्याकुळ थेंबासाठी

आभासाचे मृगजळ बांधी, दैव आपुल्या गाठी

तू आशेच्या मागे, तुझीया कर्म धावते पुढती ||१||

 

शिखरावरती सौख्यसूर्य तू, नित्य पाहिले नवे

परिश्रमाने जवळी जाता, ते ठरले काजवे

निःश्वासांच्या मैफिलीत मग, श्वास जोगीया गाती ||२||

 

लाटेवरती लाट त्यावरी, घरकुल अपुले वसले

दुर्दैवाच्या खडकावरती, दीप आशेचे विझले

जा अश्रूंच्या तळ्यांत काळ्या, मालव जीवन ज्योती ||३||

 

नको रंगवू स्वप्न सुगंधी, तू अभिलाषांचे

गंधाभवती असती विळखे, काळ्या सर्पांचे

माध्यानीला ग्रासून जातील, दाट तमाच्या राती ||४||

 

कोण, कुणाचा? फसवी असते, सारी माया जगती

रक्त पिपासू अखेर ठरती, ती रक्ताची नाती

ममतेचे मग रिते शिंपले, कशांस घेतो हाती? ||५||

 

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ # 112 – अंगणी तुळस ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

? साप्ताहिक स्तम्भ # 112 – विजय साहित्य ?

☆ अंगणी तुळस  कविराज विजय यशवंत सातपुते ☆

अंगणी तुळस  । सौभाग्याचा वास

प्राणवायू खास   । वृंदावनी  ।।१ ।।

 

डोलते तुळस  । गंधाळते मन ।

आरोग्याचे  धन  ।  प्रासादिक ।।२ ।।

 

तुळशीची पाने । काढा गुणकारी ।

नैवैद्य स्विकारी  ।  नारायण  ।।३ ।।

 

तुळशीचे काष्ठ ।  वैष्णवांची ठेव  ।

नसे चिंता भेव  ।  सानथोरा  ।।४ ।।

 

 तुलस पुजन । नित्य कुलाचार  ।

असे शास्त्राधार  ।  संवर्धनी  ।।५ ।।

 

अंगणी तुळस  ।  माहेरचा भास  ।

सासरचा त्रास  ।  वाऱ्यावरी  ।।६ ।।

 

तेवतसे दीप ।  परीमळे धूप  ।

चैतन्य स्वरूप  । मातामयी  ।।७ ।।

 

© कविराज विजय यशवंत सातपुते 

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  9371319798.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आढावा ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ आढावा ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

 (वृत्त:लवंगलता)

(मात्रा:८+८+८+४)

सारे घोडे बारा टक्के,सुभाषिताच्या पुरते….

कुणी रेसचे,कुणी रथाचे, कोणी टांग्यापुरते !

 

प्रत्येकाचे मुठभर येथे,अभाळ अपुल्यापुरते

तेज दूरच्या नक्षत्राचे, फिक्कट पायापुरते !..

 

घोडचुकांना ‘अनुभव’ ऐसे,द्यावे गोंडस नाव

नवीन सागर नवी तुफाने, पुन्हा भरकटे नाव !

 

कळपामधला मृगजळबाधित ,मृग एखादा कोणी

तृषार्त अंती उरि फुटण्याची, सांगे शोककहाणी !

 

स्मरणऋतूंच्या ओलस हळव्या,उरास भिडती लहरी

उत्तररात्री गजबजते ती , अवशेषांची नगरी !……….

 

दहा दिशांचे शाहिर गाती, दिग्विजयाची गाणी

झुंजारांच्या शोकांताची, सांगे कोण कहाणी ?

 

दूत युगांचा क्षण भाग्याचा ,अवचित येई दारा

अनाहुताला वर्ज्य उंबरा, विन्मुख क्षण माघारा!

 

कधी दुजांच्या बंडाचाही, झेंडा हाती घ्यावा

हतभाग्यांस्तव यावा कंठी, आभाळाचा धावा !

 

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 98 – आई माझी मी आईचा…. ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

? साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #98  ?

☆ आई माझी मी आईचा…. 

(वृत्त- समुदितमदना वृत्त  = ८ ८ ८ ३)

कधी वाटते लिहीन कविता आईवरती खरी

शब्द धावुनी येतील सारे काळजातल्या घरी

सुख दुःखाचे तुझे कवडसे शोधत राहू किती

कसे वर्णू मी आई तुजला आठवणींच्या सरी

 

आई माझी सुरेल गाणे ऐकत जातो कधी

राग लोभ ते जीवन सरगम सुखदुःखाच्या मधी

कोरा कागद लेक तुझा हा टिपून ‌घेतो तुला

आई माझी मी आईचा हा सौख्याचा निधी

 

आई माझी वसंत उत्सव चैत्र पालवी मनीं

झेलत राही झळा उन्हाच्या हासत जाते क्षणी

क्षण मायेचा बोल तिचा मी शब्द फुलांचा तुरा

घडवत जाते आई मजला यशमार्गाचा धनी

 

आई आहे अखंड कविता माया ममता जशी

शब्द सरीता वाहत जाते ओढ नदीला तशी

ओली होते पुन्हा पापणी वाहत येतो झरा

सुंदर कविता आईसाठी लिहू कळेना कशी

 

© सुजित कदम

संपर्क – 117,विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्रभात फेरी ☆ सौ.मंजुषा आफळे

सौ.मंजुषा आफळे

? कवितेचा उत्सव ?

☆ नाद ☆ सौ. मंजुषा आफळे ☆

दृष्टीआड जरी तान्हा

आई घालते हो साद

जोजवते, जोपासते

कुशीतला ब्रह्मनाद

 

ओल्या मातीत हुंकार

भारत मातेचा श्वास

हळुवार उमलतो

नादखुळा घेत ध्यास

 

मन गाभाऱ्यात नाद

सप्तसुर प्रसवती

मोरपीस कर्तुत्वाचे

मोहक रंगसंगती

 

नादमधुर जिव्हाळा

प्राणात ये संजीवन

प्रेमात गुंफता नाती

बहरेल  हो स्पंदन

 

अंतर्नाद पवित्र जो

मुक्त स्वच्छंद हसावा

प्रभूचीच आस ऐसी

संसार सुखाचा व्हावा.

 

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

५/१/२०२२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 119 ☆ उर्मिला ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

? साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 119 ?

☆ उर्मिला ☆

राजकन्या ती ही होती

जनकराजाचीच दुहिता

जाणली कोणी कधी ना

तिच्या जगण्याची संहिता

 

तारुण्यात एकाकी ती

शय्येवर तळमळ साही

पतीविना जीवन अधुरे

कोमेजे नवयौवन ही

 

सौमित्राची अर्धांगी

पूर्णत्वा ना गेली कधी

जाणिले तिच्या मना कुणी ?

ना मिळाली सौख्यसंधी

 

सौभाग्याचे दान मिळे

पण ब्रह्मचारिणीच असे

 राजवैभव भोवताली

मनी तिच्या वनवास वसे

 

उपेक्षित ती सदैव ठरे

 वैदेही , मैथिली नसे

तिज न उपाधी जनकाची

इथे तिथे उपरीच असे

 

युगेयुगे इथे जन्मल्या

मरून गेल्या कितीजणी

अशा उर्मिला मौन व्रती

त्यांच्या दुःखा ना गणती

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print