मराठी साहित्य – जीवनरंग ☆ का गं तुझे डोळे ओले? – भाग – 1 ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ❤️

का गं तुझे डोळे ओले– भाग – 1 ☆ श्री अरविंद लिमये

कमलाबाई अजूनही आल्या नव्हत्या. सकाळचे आठ वाजून गेले होते. त्यांची यायची वेळ टळून गेली होती. वाट बघून इतक्या उशिरा स्वयंपाकाला सुरुवात करायची म्हणजे आज निमाची खूप धावपळ होणार होती. गेल्या तीन-चार महिन्यांपासून कमलाबाई स्वयंपाकाला येत होत्या. स्वयंपाक चवीचा आणि काम नीटनेटकं करायच्या. अघळपघळ गप्पा नव्हत्या, कुठे सांडलवंड  नव्हती. तळणीतलं उरलेलं चार चमचे तेलसुद्धा त्या निगुतीने झाकून ठेवून दुसऱ्या दिवशी आमटी भाजीला वापरायच्या. आजपर्यंत कधी एक दिवस त्या आल्या नाहीत असं झालेलंच नव्हतं. आणि आज असं अचानक ..आधी न सांगता, कांही निरोप न देता…? निमाला अचानक आपला आधार तुटल्यासारखंच वाटलं. तरीही चटपटीतपणे तिने कुकरची तयारी केली. तेवढ्यात दारावरची बेल वाजली.’कमलाबाईच असणार.. नक्कीच..’ ती सावरली. त्यांच्या न येण्यामुळे नकळत मनात साठू लागलेली अस्वस्थता क्षणात विरून गेली. ती दार उघडायला धावली. दारात कमलाबाई नव्हत्याच. एक मुलगा होता. अनोळखी.

” कमलाबाई आज स्वयंपाकाला येणार नाहीत”

” कां..?”

” घरी भांडणं झालीयत.” त्यानं निर्विकारपणे सांगितलं. आणि पुढं काही विचारणार तोपर्यंत तो निघूनही गेला. कमलाबाई आणि भांडण या दोन गोष्टी कल्पनेतसुद्धा एकत्र येणं निमाच्या दृष्टीने अशक्यच होतं.   

पण.. मग हा.. असा निरोप? तिनं दार लावून घेतलं. आत येऊन कुकर गॅसवर चढवला. आता कणिक भिजवायला घेण्याशिवाय गत्यंतर  नव्हतं. सकाळच्या वेळीसुद्धा एरवी मिळणारा थोडाफार निवांतपणा कमलाबाईंनी असा हिरावून घेतला होता!

निमाचा नवरा बाथरूममधे नेहमीप्रमाणे मजेत गाणी गुणगुणत यथासांग आंघोळ करत होता!

” आंघोळ आवरून जरा लवकर या बरं बाहेर “

त्याचा गाण्याचा आवाज मधेच तुटला. अंगावर पाणी ओतल्याचा आवाज मधेच थबकला. बादलीत सोडलेला नळ क्षणभर बंद झाल्याचं तिला बाहेरूनसुद्धा जाणवलं.

” काय गं?” तो खेकसला.

“कांही नाही.जरा लवकर आवराss” कपाळाला आठ्या घालून ती पुन्हा कामाला लागली. नवऱ्याचा राग आपल्याला नेमका कशाबद्दल आलाय याचा क्षणभर तिलाच उलगडा होईना.आता बाथरूममधून बाहेर येऊन त्यानं काही विचारलं तर..?

तो आलाच. 

“काय गंs? का ओरडत होतीस?”

आपल्याला आता हुंदकाच फुटणार असं वाटताच निमा महत्प्रयासानं छानसं हसली.

“ओरडत कुठं होते? तुम्हाला आत ऐकू यावं म्हणून मोठ्यानं बोलले “

“तेच ते. पण कां?”

” आज कमलाबाई येणार नाहीयेत.”

” बरं मग?” मी काय करू?” त्याचा तिरसट ति-हाईत प्रश्न! ऐकलं आणि ती त्रासिकपणे त्याच्याकडे पहात राहिली.   

“चिडतेयस कशाला ? येतील अजून.”

” येतायत कुठल्या? एक मुलगा येऊन निरोप सांगून गेलाय”

” फक्त आजच?की उद्यासुद्धा?”

त्याही मन:स्थितीत निमाला नवऱ्याच्या धोरणीपणाचं थोडं कौतुकच वाटलं. किती साधा पण नेमका प्रश्न! तो आपल्याला का नव्हता सुचला?…

” उद्याचं उद्या बघू. तुम्ही आता असं करा, पटकन् कपडे करून या आणि आपल्या तिघांचे डबे घासून घ्या “

“आणि मग?नंतर पोळ्या घेऊ करायला?” त्यानं उपरोधानं विचारलं.

” पोळ्या मी करतेय हो. तुम्ही तिघांची पानांची तयारी करून ठेवा आणि बाहेर जरा केदारकडे बघा.या गडबडीत आज त्याच्याजवळ बसून त्याचा अभ्यास घ्यायला मला जमणार नाहीये आणि तो आपापलं कांही करणार नाहीय” 

कपाळाला आठ्या घालून नवरा कपडे बदलायला निघून गेला….!

आपल्या नवऱ्याकडून गडबडीच्या वेळी एखादं हलकसं काम किंवा केदारकडून त्याचा अभ्यास न चिडता करून घ्यायची अशी आणीबाणीची वेळ काही आज प्रथमच आलेली नव्हती. पण आज तिचा तिने मनातून थोडा धसकाच घेतला होता. आता यावेळी नेमकं परीक्षा बघायला आल्यासारखे कुणी पाहुणे येऊन टपकू नयेत असं निमाला मनापासून वाटत असतानाच दारावरची बेल वाजली.

“बघा हो कोण आहे?” ती आतूनच ओरडली.

” निमाss..” त्याची त्रासिक हांक.

बारीक गॅसवर तवा तापत ठेवून निमा बाहेर आली. आता या गडबडीत कुणाचं स्वागत करायला लागतंय याचा तिला अंदाज बांधता येईना. बाहेर येऊन तिने पाहिलं तर दार आतून तसंच बंद होतं. सिगरेटचे झुरके घेत नवरा पेपर घेऊन आरामात सोफ्यावर बसून होता.

“काय हो?”

“कुठं काय? अगं बघ ना कोण आलंय?”

” एवढ्यासाठी मला आतून बोलावलंत? अहो जागचे न उठता हात लांब करून बसल्या जागेवरून सुद्धा दार उघडू शकला असतात की हो. मुकाट्याने दार उघडा न्  बघा कोण आहे ते.” ती तणतणत आत वळणार तेवढ्यात बेल पुन्हा वाजली. चडफडत तिने वळून दार उघडलं. दारात कमलाबाई उभ्या होत्या! नेहमीसारख्याच हसतमुख,प्रसन्न!

“आज उशीर झाला हो थोडा..” चप्पल काढता काढताच बोलत त्या गडबडीने आत आल्या आणि पदर खोचून तशाच स्वयंपाकघराकडे निघाल्या. थोडसं आश्चर्य आणि थोडासा अनपेक्षित आनंद यामुळे निमा क्षणभर खिळून उभीच राहिली.

पेपरमधून डोकं वर काढून नवऱ्याने क्षणभर निमाकडे रोखून पाहिलं. ते पहाणं असं, जसंकाही ‘कमलाबाई येणार नाहीयत’ असं खोटंच सांगून त्याला कामाला जुंपायचा हिचाच काहीतरी डाव होता. तिने हळूच नवऱ्याकडं पाहिलं.नजरानजर होताच कपाळाला आठ्या घालून त्याची पेपरची पारायणं पुन्हा सुरू झाली होती. अभ्यासाचं दप्तर तसंच पसरून केदार कॉमिक्स वाचत अंथरुणावर लोळत होता. अजून अंथरूणं गोळा व्हायचीत हे तिला प्रथमच जाणवलं आणि कमलाबाई अनपेक्षितपणे आल्याचा मनाला स्पर्शू पहाणारा आनंद तिथेच विरून गेला..!आज कमलाबाई आल्याच नसत्या तर..?

— क्रमश: भाग पहिला

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “तिलांजली…” – लेखिका : सुश्री शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

🌸 जीवनरंग 🌸

☆ “तिलांजली…” – लेखिका : सुश्री शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

‘साडेबाराची गाडी आत्ताच गेली. आता दुपारी तीन वाजता लागेल पुढची गाडी नाशिकची. त्याचं तिकीट हवंय का तुम्हाला?’. दादरला एशियाड तिकीट खिडकीमागचा माणूस निर्विकारपणे मला म्हणाला. मी चरफडतच रांग सोडली. दिवस मे महिन्याचे. त्यात टळटळीत दुपार. मुंबईच्या दमट हवेत घामाच्या नुसत्या धारा लागलेल्या. पाठीला अडकवलेल्या अजस्त्र रकसेकचं ओझं मिनिटागणिक वाढत होतं. त्यात संध्याकाळपर्यंत माझं नाशिकला पोचणंही गरजेचं होतं. ज्या साहस शिबिरासाठी मी नाशिकला निघाले होते, ते शिबीर दुसऱ्या दिवशी सकाळपासून सुरु होणार होतं त्यामुळे जमेल तितकं जुनं नाशिक मला त्यापूर्वी बघून घ्यायचं होतं.

आता तीनपर्यंतची वेळ कुठे आणि कशी काढावी ह्या विचारात असतानाच, रांगेत माझ्या मागे असलेल्या माणसाने उपाय सुचवला, ‘घाई आहे तर शेअर टेक्सीने का जात नाहीस मुली? स्टेशनच्या अलीकडे असतात उभ्या गाड्या नाशिकच्या’. त्या माणसाचे आभार मानून मी पाठीवरची पिशवी सावरत स्टेशनकडे जायला वळले, तोच एका बाईंना माझ्या पिशवीचा ओझरता धक्का बसला, मी ‘सॉरी सॉरी’ म्हणत ओशाळून सेक खाली घेतली. त्या बाई ओढून-ताणून हसल्या. ‘रेहने दो, कोई बात नही’, म्हणाल्या. वयस्कर होत्या. साधारण साठीच्या उंबऱ्यात असाव्या. एकदम हाडकुळा, उन्हाने रापलेला चेहेरा, त्यावर ताणून बसवलेली कातडी, खोल गेलेले डोळे, सुंभासारखे चरभरीत केस कसेतरी करकचून आवळून घातलेला इवला अंबाडा, कशीतरी गुंडाळलेली स्वस्त सिंथेटीक साडी, तिसऱ्याच रंगाचं, उन्हात विटलेलं, कडा उसवलेलं पोलकं आणि पायात साध्या रबरी चपला असा त्यांचा अवतार होता. खांद्याला फक्त एक साधी कापडी पिशवी लटकवलेली आणि हातात लाल कपड्यात बांधलेलं एक बोचकं.

‘मुझे नासिक जाना है, टेक्सी कहां मिलेगी बेटा’? त्यांनी विचारलं.

‘मेरे साथ चलिये, मै भी वही जा रही हुं’, मी म्हटलं आणि आम्ही दोघी स्टेशनच्या दिशेने चालायला लागलो. ‘ मै मिसेज पांडे’, त्या म्हणाल्या. उच्चार थेट उत्तरप्रदेशी. मीही माझं नाव सांगितलं. त्यांच्याबरोबर सामान काहीच नव्हतं. ‘क्या आप नासिक में रेहती है’? निव्वळ काहीतरी विचारायचं म्हणून मी विचारलं.

 ‘नही बेटा, रेहती तो बंबई में हुं, नासिक काम के लिये जा रही हुं’. थंड, भावशून्य स्वरात त्या म्हणाल्या.

‘आप अकेले जा रही है नासिक’? परत एकवार मी काहीतरी बोलायचं म्हणून विचारलं.

‘अकेले कहां? मेरे पती है ना मेरे साथ’, खिन्न, काहीसं विचित्र हसत त्या उद्गारल्या.

‘मतलब?’ काही न कळून मी विचारलं.

‘ये है मेरे पती’ हातातलं आलवणात बांधलेलं बोचकं दाखवत त्या म्हणाल्या. ‘कुछ दिन पेहले आफ़ हो गये. उन्ही की अस्थियां गंगाजी में बहाने जा रही हुं नासिक’.

मी जेमतेम एकवीस-बावीस वर्षांची होते तेव्हा. त्या काय बोलत होत्या हे कळायला मला वेळच लागला अमळ, पण जेव्हा समजलं तेव्हा माझ्या अंगावर सर्रकन काटाच आला एकदम. जरासं थांबून मी त्यांच्याकडे परत एकदा नीट बघून घेतलं. त्यांच्या त्या श्रांत, ओढलेल्या चेहेऱ्यामागची काटेरी वेदना आत्ता कुठे मला जाणवत होती. मांजा तुटलेल्या पतंगासारख्या भासल्या मला पांडेबाई त्या क्षणी, एकाकी, अधांतरी, सगळ्या आयुष्याचं अस्तरच फाटून गेल्यासारख्या जखमी.

‘आपके साथ और कोई नही आया’? न रहावून मी बोलून गेले.

‘कौन आयेगा बेटा? बच्चे तो भगवान ने दिये नही, और सगे संबंधी सब गांव में है’. विमनस्कपणे त्या बोलल्या.

मला काय सुचलं कुणास ठाऊक पण मी त्यांना म्हणाले, ‘अगर आप चाहे तो मै आपके साथ चल सकती हुं’.

‘चलेगी बेटा, बहुत अच्छा लगेगा मुझे और इन्हे भी’. हातातल्या त्या गाठोड्याकडे अंगुलीनिर्देश करत पांडेबाई म्हणाल्या.

एव्हाना आम्ही गाडीतळापाशी पोचलो होतो. पहिल्या गाडीत बसलो. चालक सरदारजी होते. नासिकचे अनुभवी असावेत कारण त्या बाईंच्या हातातलं बोचकं बघून त्यांनी खेदाने मान हलवली. आम्ही गाडीत बसलो. दोघे उतारू आधीच बसले होते. गाडी सुरु झाली. पांडेबाई आपल्याच विचारात हरवल्या होत्या. माझं लक्ष राहून राहून त्यांच्या हातातल्या गाठोड्याकडे जात होतं.

आम्ही नासिकला पोचलो तेव्हा जवळजवळ पाच वाजत आले होते. रिक्षा करून आम्ही दोघी रामकुंडावर गेलो. नाशिक क्षेत्राचं गांव. आम्ही कुंडाजवळच्या पायऱ्या उतरताच तिथल्या सराईत नजरांनी आमचा अंदाज घेतला आणि लगेच दहा-एक गुरुजींनी आम्हाला घेरावच घातला. ‘बोला, काय काय करायचंय’? गुरुजींनी विचारलं. आम्ही दोघीही पार कावऱ्याबावऱ्या झालो होतो. पांडेबाई त्यांच्या डोंगराएव्हढ्या दुःखाने सैरभैर झालेल्या आणि मी ह्या बाबतीतला कुठलाच पूर्वानुभव नसल्यामुळे बावरलेली. तरी त्यातल्या त्यात जरा शांत दिसणाऱ्या, वयस्कर गुरुजींशी आम्ही बोलणं सुरु केलं.

‘गुरुजी, बाराव्याचे विधी करायचेत’, मी म्हणाले.

‘करूया ना. साडेचारशे रुपये पडतील. सगळं सामान माझं. वर दान-दक्षिणा काय करायची असेल ते तुम्ही आपखुशीने समजून द्या’, गुरुजी म्हणाले.

मी पांडेबाईंकडे बघितलं. त्यांनी संमतीदर्शक मान डोलावली.

‘चला तर मग’, गुरुजींनी तुरुतुरु चालत आम्हाला घाटाच्या एका कोपऱ्यात नेलं आणि खांद्याची पडशी उघडून सगळं सामान मांडायला सुरवात केली. सभोवताली अनेक माणसं थोड्या-फार फरकाने तेच विधी करत होती. सगळीकडून मंत्रोच्चारांचे आवाज येत होते. संध्याकाळच्या सोनेरी ऊनात गोदावरीचं पाणी हलकेच चमचमत होतं. मागून देवळांचे उंच कळस डोकावत होते. फार सुंदर संध्याकाळ होती, तरी सगळीकडे एक भयाण सुतकीपणा भरून राहिलेला होता. इतर तीर्थक्षेत्रात असते तशी आनंदी, उत्साही गडबड रामकुंडावर नव्हती. मृत्यू जणू अजून चोरपावलाने तेथे वावरत होता.

गुरुजींनी लगोलग दोन पाट मांडले. फुलं, दर्भाच्या अंगठ्या, तांब्या, काळे तीळ, पिंड वगैरे सामान पडशीतून काढून व्यवस्थित रचून ठेवलं आणि नको तो प्रश्न विचारलाच,

‘बरोबर कुणी पुरुष माणूस नाहीये का? विधी कोण करणार’?

‘मै करूंगी. इनका अग्नीसंस्कार भी मैने किया था और ये संस्कार भी मै करूंगी’, ठाम स्वरात एकेक शब्द तोलून मापून उच्चारत पांडेबाई म्हणाल्या. गुरुजींनी एकवार डोळे रोखून आमच्याकडे बघितलं आणि म्हणाले, ‘ठीक आहे, या बसा’.

पांडेबाईनी गुरुजींनी सांगितलेल्या जागेवर अस्थिकलश ठेवला आणि त्या पाटावर बसल्या. मी त्यांच्या शेजारी उभी राहून सर्व बघत होते. मंत्रोच्चार सुरु झाले. गुरुजींनी सांगितलेले उपचार पांडेबाई मनोभावे करत होत्या. शेवटी अस्थिकलश उघडायची वेळ आली. ‘अपनी बेटी को बुलाईये, अस्थिकलश उसके हाथोंसे खुलवाना होगा’, माझ्याकडे दृष्टीक्षेप करत गुरुजी म्हणाले. मी चमकून त्यांच्याकडे पाहिलं. ‘अहो, मी त्यांची मुलगी नाहीये’, असं म्हणणार तेव्हढ्यात माझं लक्ष पांडेबाईंच्या चेहेऱ्याकडे गेलं. त्या माझ्याचकडे बघत होत्या. स्थिर नजरेने. त्या दृष्टीत कुठेही विनवणीचा वा दीनवाणेपणाचा भाग नव्हता, होता तो फक्त आपलेपणाचा अधिकार.

भारल्यासारखी मी पुढे झाले आणि त्या लाल कापडाची गाठ सोडली. उन्हाने तापलेल्या त्या तांब्याचा तप्त स्पर्श त्या कपड्यातूनही माझ्या कापऱ्या बोटांना जाणवत होता. हरवल्यागत मी गुरुजींच्या सुचनांचं पालन करत होते. माझ्या ओंजळीत मुठभर काळे तीळ देऊन गुरुजी म्हणाले, ‘आता गेलेल्या आत्म्याला तिलांजली द्या’, गंभीर आवाजात त्यांचे मंत्रोच्चार सुरु झाले, माझ्या बोटांमधून ओलसर काळे तीळ अस्थिकलशावर पडत होते. शेजारी पांडेबाई हात जोडून उभ्या होत्या. त्यांच्या मिटल्या डोळ्यातून घळघळ पाणी वहात होते.

गुरुजींचे मंत्र संपले. अस्थिकलश उचलून ते म्हणाले, ‘चला’, आणि कुंडाच्या दिशेने चालू लागले. त्यांच्या मागोमाग आम्ही दोघी निघालो. चिंचोळ्या, दगडी फरसबंद वाटेवरून आम्ही दोघी चालत होतो. सतत हिंदकळणाऱ्या लाटांमुळे वाट पार निसरडी झाली होती. पाय घसरेल म्हणून मी जपून पावले टाकत होते आणि माझ्या हाताचा आधार घेऊन पांडेबाई सावकाश चालत येत होत्या. स्वतःच्या पोटच्या मुलीच्या आधाराने चालावं इतक्या निःशंकपणे.

आम्ही कुंडापाशी आलो. गुरुजींनी कलश पांडेबाईंच्या हातात दिला. ‘अब आप मां-बेटी मिलकर इस कलश को गंगा में रिक्त किजीये’, गुरुजी बोलले आणि दोन पावले मागे सरकून उभे राहिले. आम्ही दोघींनी मिळून कलश हातात घेतला. माझ्या मऊ, मध्यमवर्गीय हातांना पांडेबाईंच्या आयुष्यभर काबाडकष्ट केलेल्या हातांचा राठ, खरबरीत स्पर्श जाणवत होता. एखाद्या जाड्याभरड्या गोधडीच्या स्पर्शासारखा होता त्यांचा स्पर्श, रखरखीत, तरीही उबदार. आम्ही दोघींनी पाण्याच्या काठावर जाऊन अस्थिकलश हळूच तिरका केला. अस्थी पाण्यात पडू लागल्या. राखेचे मऊ, पांढुरके कण क्षणभर वाऱ्यावर गिरकी घेऊन कुंडाच्या पाण्यावर किंचित रेंगाळले आणि दिसेनासे झाले. मी कधीही न पाहिलेल्या एका व्यक्तीची शेवटची शारीर खूण निसर्गात विलीन होत होती. माझ्याही नकळत मी हात जोडले आणि ज्या अनाम, अनोळखी माणसासाठी मी लेकीचं कर्तव्य पार पाडलं होतं त्याला सद्गती लाभो अशी मनापासून प्रार्थना केली.

गुरुजींना दक्षिणा देऊन आणि त्यांचा निरोप घेऊन आम्ही गोदातीरावरून निघालो. आता सूर्य मावळला होता, पण आकाश अजूनही लाल-केशरी रंगात माखलं होतं. काळोख एखाद्या मखमली शालीसारखा हळूहळू उलगडत होता. मी पांडेबाईना रिक्षापर्यंत सोडायला गेले. त्यांना लगेचच मुंबईला परत जायचं होतं. रिक्षात त्यांना बसवून दिल्यावर माझा हात हातात घेऊन त्या बोलल्या, आधीच्याच ठाम, आश्वस्त स्वरात, ‘तुम संतान रही होंगी उनकी किसी जनम में इसीलिये आज ये काम हुआ तुमसे’. माझ्या केसांवर एक मायेचा हात ओढून त्या सावरून बसल्या. रिक्षा सुरु झाली. रिक्षा दिसेनाशी होईपर्यंत मी त्या दिशेने बघत होते. माझ्या हातांना मघाशी जाणवलेला अस्थींचा, काळ्या तिळांचा थंडगार स्पर्श अजून विझला नव्हता.

लेखिका :  सुश्री शेफाली वैद्य

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆सुंदर माझं घर – भाग-2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ सुंदर माझं घर – भाग-2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(होईल ग सगळं मस्त सोनाली.हुशार माणसाला काहीही अवघड नाही.आपण आधी वरच्या खोल्यांपासून करत येऊ सगळं नीट.’) – इथून पुढे — 

त्या शनिवारी सोनालीला सुट्टीच होती.

उमाने तिला दोन्ही बेडरूम्स कशा नीट आवरायच्या तेदाखवले.दर आठवड्याला दोन्ही बेडरूमच्या बेडशीट्स बदलल्या गेल्या पाहिजे हे सांगितलं.मुलांना वर बोलावलं आणि उमा म्हणाली,रोहन राही,तुमच्या रूम मध्ये अशी टॉईज पसरायची नाहीत.

आपलं खेळून झालं की छान आवरून त्या मोठ्या बास्केटमध्ये ठेवायची.ही बघा ममाने कित्ती सुंदर बास्केट आणलीय तुमच्यासाठी काल.’रोहन राही नी सगळा खेळ बास्केट मध्ये नीट ठेवला.शहाणी ग माझी बाळं ती!म्हणून उमाने दोघांना कवटाळले. शाबास.उमा म्हणाली,ही बघा मी तुम्हाला पिगी बँक   आणलीय पुण्याहून.तुम्ही नीट रूम आवरली आणि उठल्यावर पांघरूण नीट घडी करून ठेवलं की मग वीक एंडला ममा  तुम्हाला  बक्षीस म्हणूंन डॉलर्स देणार आहे.ते या पिगी  बँकेत टाकायचे हं. मग खूप साठले ना की तुमच्या आवडीची पुस्तकं घ्यायची हं.’मुलं खूषच झाली.

उमाने त्या पिगी मध्ये पहिले दोन दोन डॉलर्स टाकले.किती खूष झाली मुलं. सोनाली हे कौतुकाने बघत होती’.आई, हे मला कसं ग सुचलं नाही?किती छान दिसायला लागल्या ग सगळ्या रूम्स. सोनाली,यात अवघड काहीही नाही ग.वेळच्या वेळी कामं नीट केली नाहीत की ती साठत राहतात आणि मग कंटाळा येतो.आता तू दर शनिवारी रूम्स पटकन आवरून ठेवशील.चल खाली.उद्या रविवारी वॉशिंग मशीन लावायचं ठरवून टाक. म्हणजे कपडे साठणार नाहीत.तुला खूप काम पडतं मान्य आहे मला.पण इथे सोयीही खूप आहेत ना. दोघी खालच्या मजल्यावर आल्या.आज इतकं पुरे.उद्या बाकीचे आवरूया.’सुनील उमाकडे कौतुकाने बघत होता.’उमा वावा,किती हळुवारपणे सोनालीला तिच्या चुका दाखवून दिल्यास ग.मुळात ती आळशी नाहीये पण सवयच नाही ना शिस्तीची.आता बघ ती मस्त ठेवेल स्वतःचे घर’. दुसऱ्या दिवशी उमाने सोनालीला  किचन आवरायला मदत केली.दोन तासांच्या मेहनती नंतर किचन एकदम लखलखू लागलं.मग सोनालीने आईच्या मार्गदर्शनाखाली साधी खिचडी कढी केली,तीही किती आवडीने खाल्ली मुलांनी.आजी मला पांढरी आमटी घाल असं राही म्हणाली तेव्हा हसूच लोटलं सगळ्यांना. सोन्या, ती कढी आहे बरं का.आता ममा नेहमी करेल हं तुमच्यासाठी! सोनाली रात्री आईजवळ बसली आणि म्हणाली,आई,किती साध्या सोप्या गोष्टी असतात ग.पण मी कधी लक्षच दिलं नाही.थँक्स आई,या एका महिन्यात तू मला खूप काही शिकवलंस.’सोनाली,तू खूप सरळ आणि भाबडी पण आहेस बाळा.अग परवा आपण तुझ्याच सोसायटीतल्या कुमुदकडे गेलो नव्हतो का?तिच्या सासूबाई सांगत होत्या, आमच्याकडे महिन्यातून दोनदा मेक्सिकन मेड येते सगळं क्लीन करायला.ती  व्हॅक्यूम करते, फर्निचर पुसते, बेडशीट्स बदलते.तू का नाही बोलवत तशी मेड?म्हणजे बाकीचं काम हलकं नाही का होणार तुझं?इतका पैसा मिळवता दोघेही, तर करा की खर्च स्वतःच्या स्वास्थ्यासाठी.’सोनालीने पुढच्या आठवड्यातच डायना म्हणून मेड ला बोलावलं.तिने दर आठवड्याला यायचं कबूल केलं.सोनालीला फार आनंद झाला.हे मला कसं ग सुचलं नाही आई?

या मैत्रिणी तरी बघ,लबाड!कोणीही मला बोलल्या नाहीत की  आमच्याकडे मेड येते.डायना सांगत होती  मी या या घरी दर पंधरा दिवसांनी जाते.सगळ्या माझ्याच तर मैत्रिणी आहेत.दुष्ट कुठल्या.’उमा हसली म्हणाली ते जाऊ दे.तू तिला आणखी थोडा पगार दे आणि बाकीचीही कामे करशील का विचार.करेल की ती.कपड्याच्या घड्या करायच्या, लॉन्ड्री लावायची. हेही उमाचे गणित बरोबर ठरले.डायना हो म्हणाली आणि सोनालीचे बरेच काम कमी झाले. सोनालीचं घर आता खरोखर मस्त दिसायला लागलं. सहा महिन्यांनी एकदा राजीव येऊन गेला.अरे वा.एकदम चकाचक घर? मस्त सोनाली.’सोनाली म्हणाली ही माझ्या आईची जादू आहे.

राजीव,योजकस्तत्र दुर्लभ:बघ. मला नीट ऑर्गनायझेशन जमत नव्हतं ते आईने आखून दिलं बघ.आता आपल्याकडे डायना पण येते दर आठवड्याला मला मदत करायला.उमा म्हणाली राजीव ,तुम्हीही मदत केली पाहिजे घरात बरं का.केवढी मोठी मोठी घरं तुमची.मग सगळ्यांनी नको का हातभार लावायला? तुम्हीही सगळ्यांनी आपले कपडे दर रविवारीच इस्त्री करून ठेवलेत की आठवडाभर बघावे लागणार नाही.  राजीवला हे अगदी पटलेच. त्या आठवडाभर   सोनालीने मस्त स्वयंपाक केला आणि दुसऱ्या दिवशी पुरेल अशा भाज्याही करून ठेवल्या.पुढच्या महिन्यात मुलं डे केअर ला जाणार होती.त्यांचे टिफिनही तिने  आठवडाभर आधी प्लॅन केल्याप्रमाणे तयारी करून ठेवले. उमाला आपल्या कर्तबगार लेकीचा अतिशय अभिमान वाटला. हुशार तर ती होतीच पण तिला फक्त नीट दिशा देण्याचं काम उमाने केलं. सुनील दोन महिन्याने निघून गेला.उमा आणखी दोन महिने राहिली.आता सोनाली तरबेज झाली सुंदर माझं घर ठेवण्यात.उमा जायच्या आदल्या आठवड्यात सोनालीने तिच्या मैत्रिणींना चहाला बोलावलं. सम्पूर्ण घराचा कायापालट बघून त्या थक्कच झाल्या .दडपे पोहे, बटाटेवडे,चटणी आणि गुलाबजाम हा मेनू बघून तर त्या आश्चर्यचकित झाल्या.’हे सगळं माझ्या सोनालीने केलंय हं. मी यातलं काहीही केलं नाहीये. बघा बर छान झालंय का!उमा म्हणाली.फक्त गुलाबजाम मात्र पटेलकडचे हं !उमा हसून म्हणाली. सगळ्यांनी ताव मारला   आणि त्यातली खुशी म्हणाली’काकी मला पण असा चार्ट करून द्या ना हो प्लीज ! मीही वाईट ठेवते घर अगदी.सोनालीचं मस्त घर बघून मला हेवाच वाटू लागलाय हो तिचा.माझी सासू खूप बोलली मला.म्हणाली शी!किती पसारा हा खुशी!काही वळण लावलं नाही का तुझ्या आईनं. पण दोन मुलं आणि नोकरी सांभाळून नाही हो जमत मला.काकी,मलाही करा ना मदत प्लीज!’सगळ्या हसायला लागल्या. उमा म्हणाली खुशी,आता सोनाली कडूनच घे धडे .मी चालले ग इंडिया ला पुढच्या आठवड्यात.सगळ्या मैत्रिणी गेल्यावर सोनालीने आईला मिठी मारली.आई,किती ग गुणी आणि हुशार आहेस ग तू.याच सगळ्या भवान्या  मला नावे ठेवायच्या. सोनाली आळशी आहे,काही येत नाही तिला.घर म्हणजे नेहमी पसरलेले! सोनालीचं घर म्हणजे अस्ताव्यस्त. माझी चेष्टा करायच्या पण कधी मार्ग नाही कोणी सुचवला की सांगितलं नाही की मेड येते आमच्याकडे.कशी असतात ना आई माणसं?मीच मूर्ख जाते धावून धावून यांच्याच मदतीला! आज बघ. गप्प बसल्या.शिवाय तू मला कित्ती वर्षांनी हातात ब्रश दिलास आणि ही पेंटिंग्ज करायला लावलीस ग!मी विसरूनच गेले  होते माझं  ड्रॉईंग उत्तम आहे ते.कित्ती शोभा आली सगळ्याखोल्याना माझी स्वतः केलेली सुंदर पेंटिंग्ज लावली म्हणून.’सोनालीच्या डोळ्यात पाणी आलं.उमाने तिचे डोळे पुसले.अग वेडे,तू मुळात खूप हुशार आणि  सिन्सीअर तर आहेसच.म्हणून तर तू हे केलंस.आणि मुख्य म्हणजे स्वतःकडे कमीपणा घेऊन शिकलीस, चुका मान्य केल्यास. हा गुण मोठाच आहे तुझा.अशीच मस्त रहा सुखात!’

उमा भारतात परत आली.

मराठी मंडळाच्या सुंदर माझं घर मधलं पहिलं बक्षिस यंदा सोनाली ला मिळालं आणि उत्कृष्ट पेंटिंग्ज काढल्याबद्दल ट्रॉफी पण. अभिमानाने ते व्हिडिओ वर आईला दाखवताना शेजारी  उभ्याअसलेल्या  राजीवच्याही डोळ्यात आपल्या हुशार बायकोबद्दलचा अभिमान चमकत होता. सासूबाई,ही ट्रॉफी खरं तर तुमचीच आहे बरं का!हसून राजीव म्हणाला आणि सोनालीने हसत त्याला दुजोरा दिला.

– समाप्त – 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆सुंदर माझं घर – भाग-1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ सुंदर माझं घर – भाग-1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

बाल्कनीत  बसून निवांत आल्याचा चहा घेताना उमाला शशीचा फोन आला.’काय करते आहेस ग आज? छान नाटक लागलंय बघ.बरेच दिवस आपल्याला बघायचं होतं ना?काढू का तिकिटे?’शशी विचारत होती.’होहो. काढ काढ. जाऊया आपण बघ .’उमा म्हणाली. तेवढ्यात कामाची बाई आली. बाई आज काय करायचा स्वयंपाक? बाई,आज पावभाजी करूया.आम्ही नाटकाला जाणार आहोत चार वाजता.मग शशीताई इकडेच येतील.पावभाजी खूप आवडते तिला.तुमची मस्त होते पावभाजी. आणि साहेबांना पण आवडते.’’बाई बरं म्हणाल्या आणि कामाला लागल्या. काम सांगून उमा हॉल मध्ये येऊनबसली. सगळं काम आवरून बाई निघून गेल्या.उमाला सकाळीच सोनाली चा फोन येऊन गेला.आई, बरी आहेस ना काय चाललंय ?  सोनालीचा फोन म्हणजे उमाला तासाची निश्चिती.तिला भरभरून सांगण्यासारखं खूप खूप असायचं आणि फक्त वीक एन्डलाच तिला वेळ असायचा. खूप खूप मन भरून गप्पा मारून झाल्यावर उमाने  सगळं आवरलं आणि मार्केट मध्ये चक्कर टाकावी म्हणून साडी बदलून तयार झाली. छान मनासारखी खरेदी करून उमा घरी आली.शेजारच्या प्रतिभा काकू सहज म्हणाल्या’उमा,ये ग घरात.टेक जरा.मस्त कॉफी पिऊया .वाटच बघत होते तुझी.’ सुनील आला नाही वाटतं घरी?अहो तो गेलाय चार दिवस ट्रेकला मित्रांबरोबर.माझं एकटीचंच राज्य आता घरी!उमा हसून म्हणाली.

काकू,ही तुमची भाजी,ही बिस्किट्स आणि हा माझ्याकडून तुम्हाला चिवडा. मी केलेला आवडतो ना तुम्हाला?कालच केला बघा.’प्रतिभाकाकू खूष झाल्या.वावा मस्तच ग.थँक्स हं.नेहमी माझं सगळं सामान  अगदी न चुकता मला बाहेर जाताना विचारून  आणतेस बाई!हल्ली कोण करतंय एवढं कोणासाठी?’कॉफीचा मग हातात ठेवत काकू म्हणाल्या. झालं की ग वर्षं तुला अमेरिकेहून परत येऊन ना?आता कधी पुन्हा जाणार लेकीला नातवाला भेटायला?’उमा म्हणाली,बघूया. अजून काही ठरवलं नाही हो मी.’उमा घरी परतली. काकूंचा सहजच विचारलेला प्रश्न तिच्याभोवती फेर धरून नाचू लागला.पुन्हा कधी जाणार तू?उमाच्या मनात उत्तर होतं जाईनच की पुढच्या वर्षी आता..  माझ्या लाडक्या मुलीला नातवंडांना आणि जावयाला भेटायला. उमाचं मन खूप  मागे गेलं. तेव्हाचे दिवस आठवले तिला.सुनील उमा आणि सोनालीचं ते सुंदर जग. उमा तेव्हा बँकेत नोकरी करत होती आणि सुनीलचा छोटासा कारखाना होता. छान चालला होता तो.उमाच्या बँकेतल्या नोकरीचा भक्कम आधार होता सुनीलला.सोनाली सी ए झाली आणि तिने राजीव  गद्रेशी लग्न ठरवलं.चांगलाच मुलगा होता तो.फक्त अमेरिकेला कायम रहाणारा होता. एकुलती एक मुलगी कायमची परदेशी जाणार म्हणून उमा सुनीलला वाईट वाटलं पण सोनालीला त्याचं काहीच नव्हतं.आईबाबा,मला तिकडे छान जॉब मिळेल आणि तुम्हीही तिकडे येऊ शकालच की.जग किती जवळ आलंय ग.असं म्हणत सोनाली लग्न करून निघून गेलीसुद्धा.या घरात उरले फक्त उमा आणि सुनील.  एकदोनदा सुनील उमा सोनालीकडे जाऊन आलेआणि मग मात्र सुनील म्हणाला’,उमा तू एकटीच जात जा.मला फार कंटाळा येतो तिकडे.दिवसभर नुसतं बसायचं आणि ते म्हणतील तेव्हा हिंडून यायचं.मला बोअर होतं. मी मुळीच येणार नाही .तू खुशाल जा.मी इकडे मस्त राहीन.माझं मित्रमंडळ, जिम सगळं सोडून मी येणारनाही.नाईलाजाने उमा या ना त्या कारणाने सोनालीकडे एकटी जात राहिली.दोनदा सोनालीच्या  बाळंतपणासाठी तर ती सहा सहा महिने राहिली. सुनील मजेत एकटा रहायचा.

त्यानेही आता कारखान्याचे व्याप कमी करत आणले होते.  अचानक सोनालीचा फोन आला. राजीवला एक वर्षासाठी मलेशियाला जावे लागणार होते. आईबाबा,तुम्ही दोघे याल का इकडे?मी तर तिकडे जाऊ शकत नाही आणि मुलांना बघायला आणि नोकरी दोन्ही मला जमणार नाही  बाबा,याल का?’सुनीलने सांगितले हे बघ सोनाली,मी तर असा वर्षभर कारखाना बंद ठेवू शकणार नाही.मी फार तर दोन महिने येईन.तुझ्या आईला विचार ती काय म्हणते ते.’ उमा विचारात पडली.वर्षभर तिकडे राहायचं म्हणजे कठीणच होतं. इकडे सुनील एकटा आणि तिकडे ती एकटी.पण सोनालीची अडचण लक्षात घेऊन उमा म्हणाली,’हे बघ सोनाली,मी सहा महिने येईन.मग सासूबाईंना बोलावून घे किंवा मग चांगल्या क्रेश मध्ये ठेवूया मुलांना.मी आले की मग बघूया.’ठरल्या वेळी सुनील उमा सोनालीच्या घरी पोचले. दोन्ही नातवंडं उमा आणि आजोबांना चिकटली. राजीव दुसऱ्याच दिवशी मलेशियाला निघून गेला.

सोनाली सकाळी सातला घर सोडे, ती संध्याकाळी 5 ला घरी येई.मुलं अजून लहान होती.त्यामुळे  शाळेत पोचवायची तरी  जबाबदारी नव्हती.

सोनाली एकुलती एक असल्याने लाडावलेली, कामाची सवय नसलेली आणि हुशार हुशार म्हणून उमानेच तिला घरात काहीच करू दिले नव्हते.

कौतुकाने उमा म्हणायची,सोनाली हुशारआहे.पन्नास नोकर ठेवेल कामाला. उमाच्या सासूबाई आणि आई सुद्धा म्हणायच्या,उमा चूक करते आहेस तू.मुलीच्या जातीला सगळं यायला हवं ग बाई.शिकव तिला सगळं नीट. घर आवरायचं,नीट नेटकं ठेवायचं, स्वयंपाक सुद्धा आला पाहिजे.तू नाही का सगळं करत बँकेत असूनही?’उमाने ते कधी मनावर घेतलेच नाही.आणि ध्यानीमनी नसताना सोनाली परदेशी गेली.जिथे नोकर मिळणं अशक्य. सोनालीचं घर बघून उमा सुनील चकित झाले.एवढं सुंदर घर पण कुठेही काहीही ठेवलेलं!   स्वयंपाकघरात पसारा.मुलांचे कपडे नीट घड्या न करता कोंबलेले! उमा गप्प बसून हे बघत होती.तिने सगळं घर हळूहळू ताब्यात घेतलं. सोनालीला सांगितलं,मी तुझ्यासाठी असं असं टाइम टेबल केलंय. तुला या प्रमाणे नीट फॉलो केलंस तर काहीही जड जाणार नाही.उमाने सोनालीच्या किचन मध्ये आठवड्याचा मेनू आणि घरातली कामे याचा फळाच लावला.  सोनाली म्हणाली बाई ग!असली शिस्त जमणार का मला? ‘उमा म्हणाली जमवावी लागेल सोनाली. तुझ्याच सारख्या इतर मुलीही नोकरी करतातच.कालच आपण जयाकडे गेलो होतो ना?तीही नोकरी करते.किती सुंदर ठेवलंय घर तिनं. तुलाही जमेल हे. मुलांनाही छोटी छोटी कामं करायला शिकवलीस की तीही शिकतील हे सगळं.’तू आता शनिवार रविवार रोज एक सोपा पदार्थ माझ्याकडून शिक.अग काहीही अवघड नाही तुझ्यासारख्या हुशार मुलीला.’

सोनालीला हे पटलं.परवाच राजीव ओरडत होता,  तू  लॉन्ड्री लावली नाहीस म्हणून माझा एकही शर्ट नीट नाहीये.इस्त्री करणं तर बाजूलाच राहिलं.’सोनालीला वाईट वाटलं. आई बरोबर आहे तुझं. मीच कधी लक्ष दिलं नाही आणि मग कामाचे ढीग साठत  गेले की मग मला आणखीच गोंधळायला होतं. मग ते वाढतच जातं.मी तू सांगतेस तर तसं करायला लागते  ’उमा हसली.

होईल ग सगळं मस्त सोनाली.हुशार माणसाला काहीही अवघड नाही.आपण आधी वरच्या खोल्यांपासून करत येऊ सगळं नीट.’

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पडीक… भाग – 2 — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

? जीवनरंग ?

☆ पडीक… भाग – 2 — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

(वाईट वाटलं ज्याच्यासोबत आयुष्य गेलं, त्याला एवढीही खंत कधी वाटू नये … विठ्ठल मात्र माझ्या जवळ तसाच आहे.. जपलेला छोटी रखुमाई पण आहे.. त्याची ट्रंकेत बसलेली..) – इथून पुढे 

*आजी परत शुन्यात गेली. त्या जागेची हि जादू होती का,..? असं मला वाटलं,.. मग मी रोजच आजीला तिथे नेत होते आजी उलगडत गेली,.. फार छोट्या अपेक्षा घेऊन ह्या बायकांनी संसार केलेले असतात रे… आणि मग त्याचे सल असे उतारवयात येत असतील मनात,.. आजीला माहेरवरून आलेला तन्मनी आजोबांच्या एका उद्योगात विकावा लागला म्हणे,.. तुला डाळिंबी पैठणी घेऊ असं नुसतंच म्हणत राहिले अशी तक्रारही होती आजीची,.. बऱ्याच गमती सांगितल्या… पण एक मात्र आजी खरं बोलली,.. “जोडी विरुद्ध होती आमची ते नास्तिक… तर मी देवभोळी ,.. त्यांचा कष्टावर विश्वास होता, पण काही उद्योग करायला गेले तर मी नामस्मरण सोडत नव्हते,.. विरुद्ध असलो, तरी संसाराला पुरक होतो म्हणुन इथपर्यंत आलो,.. आज हे वैभव पाहायला मिळालं,.. म्हणत आजी गोड हसली,… मला म्हणाली, “तुला दाखवते माझे विठ्ठल रुखमाई,… आजीने ट्रँक उघडली,.. त्यात आजीचा त्याकाळी दुसरी पास दाखला दिसला त्यावर जन्मतारीख दिसली,..*

*आजीचा एक्यांशीवा वाढदिवस… मग ठरवून टाकलं सगळी हौस करू,.. सगळ्यांशी बोलले,.. सगळे खुशीत तयार झाले,.. बाबा तर म्हणाले, “माझ्या बाबाने नाही दिलेलं गिफ्ट मीच देतो तिला… म्हणून तर तू सकाळी मागे जाऊन बघ.. मस्त छोटसं देऊळ बांधलं आहे,.. आजीला वाढदिवसाला हे मोठं सरप्राईज आहे,.. सध्या तिची खिडकी मीच बांधकाम करण्यापूर्वी बंद केली… म्हंटलं, पलीकडे नवीन इमारत होते त्याची धुळ येईल खोलीत,.. रोज म्हणतात खिडकी कधी उघडायची,.. मला तर फार छान वाटतंय आजीला आनंद देताना,..*

*सर्वेशने परत तिला जवळ घेतलं,.. मला पण अशीच बायको हवी होती माझ्या आजीपासून माणसं जपणारी,.. मी हरतालिका नव्हतो करत, पण आजी जवळची ती रुखमाई मला वाटायचीच कौतुकास्पद खांद्याला खांदा लावून उभी असलेली. मग मी ही प्रार्थना करायचो, विठ्ठलाची भक्त सांभाळणारी त्याची रखु तशी आपल्याला मिळावी आपली माणसं सांभाळणारी आणि मग तुझ्या प्रार्थना रिटर्न्सचा फॉर्म्युला चालला की ग मस्त म्हणुन तर तू आलीस जगण्यात म्हणत त्याने तिला कुशीत ओढलं तशी लाजत ती म्हणाली,..”चल मला आणखी खुप काम आहेत,..”ती पळाली.*

*सकाळपासुन जरा जास्तच गडबड जाणवली तसं आजी म्हणाली , “रेवा अग आज काही कार्यक्रम आहे का?फुलांचे सुवास येत आहेत,.. बारिक सनई वाजतीये ग,.. रेवा म्हणाली, ” हो आहे कार्यक्रम आणि त्यासाठी मी तुम्हांला माझ्या हाताने आवरून देणार,..” म्हणत डाळिंबी पैठणी तिने समोर धरली,.. आजी हरखलीच… अगदी तिला हवी तशी ती पैठणी नऊवारी,.. रेवाने सगळं छान आवरून दिलं,.. रेवाची सासु मदतीला आली,.. तन्मनी घातल्यावर तर आजी सारखी त्याला हातात घेऊन निरखत होती,.. आजी कशालाच नाही नको म्हणत नव्हती,.. आजीला हॉलमध्ये आणलं,.. सगळ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणत फुलं उधळली आजीच्या डोक्यावर,.. रेवाचे सासरे म्हणाले, “आई नात सुनेने केलेला थाट आवडला का,..?”आजी अगदी भरभरून म्हणाली, “हो खुप आवडला,..”*

*सर्वेश म्हणाला, “आजी अग खर गिफ्ट तर बघ अजुन ..” म्हणत सगळे मागच्या पडीक घराकडे निघाले,… आजी हसत म्हणाली, “अग रेवा आपली चहा पिण्याची जागा सगळयांना सांगितली का? तिथेच सगळ्यांनी चहा घ्यायचा का आज,..?कशाला चाललो आपण पडीक घराकडे,..?”*

*तेवढ्यात समोरच दृश्य बघून आजी स्तब्ध झाली,.. डोळे झरझर वाहायला लागले,.. पडीक जागा हरवली होती तिथे उभं होतं टुमदार देऊळ आणि त्यात आजीचे विठू रुखमाई,.. बाजुला चकचकीत पितळी समई तिच्या ज्योतीचा प्रकाश काळ्याभोर विठूवर प्रसन्नता आणणारा अगदी तसाच जसा आता आजीच्या चेहऱ्यावर,… रेवा म्हणाली, “आजी हे तुमच्या आवडीचे मोगऱ्याचे दाट हार,.. घाला त्यांना वाढदिवस झाला खरा साजरा,.. आजी आनंदाने इतकी रडत होती, कि मध्येच सगळं धूसर होत होतं,…*

*सावळा विठू तिच्याकडे पाहून हसतोय असा तिला भास झाला,.. तिने थरथरत हार घातले,.. सर्वेशला आठवली आपल्या लग्ना आधीची पडीकआजी आणि आजची आजी अगदी ह्या विठ्ठलासारखी प्रसन्न झालेली,.. मोगऱ्याने दरवळण सुरू केलं होतं,.. जसं पडीक जागेने आणि पडीक माणसानं,.. रेवा सर्वेश जवळ येऊन म्हणाली, “नक्कीच आजी विठूला ह्या देवळाची प्रार्थना नेहमी करत असेल, म्हणून तर युनिव्हर्सने तिची प्रार्थना पूर्ण केली ,..”*

*सर्वेश म्हणाला,” मी ही प्रार्थना केली आहे तुला या क्षणी मिठी मारण्याची,..”*

*रेवा एकदम हसली. त्याला एक धक्का देत पळाली, सर्वेश तिला बघतच राहिला मनात म्हणाला,.. “तू अशीच उत्साही राहा… अगदी पडीक जागाही चैतन्यमयी करणारी,….” त्याला या विचारा क्षणी जाणवलं… विठ्ठला जवळची रुखमाई त्याला बघून हसत होती,…. मोगऱ्याची दरवळ आता जास्तच जाणवत होती…*

… *मित्रांनो, विचार करा, आपल्या घरी, आपली आजी, आई, अर्धांगिनी, आजोबा, वडील, यांची कोणती छोटी अपेक्षा आपल्याकडून नकळत राहिली आहे का? विचार करा, कृती करून त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य मिरवू यात, त्यांचे क्षण सुखकर करूया.*

– समाप्त – 

लेखक : अज्ञात 

संग्राहक : श्री मेघ:श्याम सोनावणे.  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पडीक… भाग – 1 — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

? जीवनरंग ?

☆ पडीक… भाग – 1 — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

” हे बघ हारवाल्याची ऑर्डर सुद्धा फायनल झाली आहे,… आजीला मोगऱ्याची फुलं खुप आवडतात ना, मग त्याचाच सुंदर हार ठरवला आहे,.. आणि डाळिंबी रंगाची फिकट गुलाबी पैठणी ती देखील आज फायनल झाली,.. एक तन्मणी आज येईल ते कुरिअर,… आजी एकदम खुश आहेत रे,.. मला फार समाधान वाटतं त्यांना बघून,.. ” असं म्हणत रेवाने डोळ्यांच्या कडांमध्ये आलेलं पाणी अलगद टिपलं,.. तसा सर्वेशने तिचा हात हातात घेतला,..”खरंतर तुझ्यामुळे हे सगळं छान होतंय तू उभं केलंस आजीला नाहीतर आम्ही हरलो होतो ग,.. म्हणून तर चिडचिड करून आई, काकु, वहिनी सगळ्यांनी बोलणं सोडून दिलं होतं तिच्याशी सांभाळून घेत होते तिला, सगळे पण उभं करू शकत नव्हते,… पडीक भिंतीसारखी झाली होती ग ती घरात,.. अस्तित्व तर होतं पण ढासळलेलं,.. मनोरुग्ण म्हणून त्याही भरपूर गोळ्या झाल्या पण काही गुण नाही,.. खरंतर जिच्या अंगा खांद्यावर खेळलो, त्या आजीला असं बघून जीव कासावीस व्हायचा ग… आपल्या लग्नानंतर तुला हे सगळं सांगायचं होतं पण तुझ्या हातावरची मेंदी नाही गेली आणि मला ऑफिसचा कॉल आल्याने लंडनला जावं लागलं,.. मला सतत वाटायचं तुला म्हणावं,.. तू बघ आजीशी बोलून पण परत वाटलं नवीन आहेस या घरात.. थोडं रुळली कि सांगु… पण रेवा चार महिन्यात तू तर सगळं बदललंस.. तू आलीस आयुष्यात माझ्या आणि खुप काही दिलं आहेस,..थँक्स हा शब्द अपुरा आहे त्यासाठी,..”*

तशी शुन्यात हरवत रेवा म्हणाली, “मला ना लहानपणापासून आजी हे घरातलं पात्र खुप आवडायचं,.. पण माझं दुर्दैव दोन्हीकडे आजी नाही,.. वाड्यातल्या मैत्रिणीची आजी जीव लावायची, पण ते सुरकुतलेले हात, तो मायेचा स्पर्श तो मात्र हवासा वाटायचा,.. मला ना सर्वेश अगदी असं भरलं घर मिळावं म्हणून मी हरतालिकेच्या महादेवाला कायम प्रार्थना करायचे,.. खुप शिक्षण पदव्या असल्या, तरी ह्या निसर्गनिर्मितीच्या मास्टरवर माझा विश्वास आहे,.. आपली प्रार्थना हि ह्या वातावरणात पोहचून कधीतरी आपल्याला त्याचे रिटर्न्स देते हे सुद्धा मी खूपदा अनुभवलं आहे,.. तुझ्या घरातला प्रवेश हा माझ्या आयुष्यातलं फार सुंदर वळण होतं,.. प्रायव्हसीच्या नावाखाली,.. एकट्यानेच जगण्याचे आनंद लुटायचे,.. जीव लावणारी माणसं अंतरावर ठेवायची,.. तोंड देखला पाहुणचार करत पुन्हा नंतर साधा चौकशीचा फोन देखिल करायचा नाही, हे असलं तुटक वागणं मला नकोच होतं मला हवी होती माणसं,…. भरभरून प्रेम करणारी,.. चिडणारी, रागवणारी परत समजावून जवळ घेणारी,.. खळखळून हसणारी,.. बरणीतल्या लोणच्याच्या फोडीसारखी एकमेकांच्या प्रेमाने खारवून जाऊन एकत्रच आयुष्यात मुरण्याचा आनंद घेणारी,.. ती सगळी सापडली तुझ्या घरात फक्त आजी मात्र खटकली,..

अशी का झाली असेल? प्रत्येकाकडून जाणून घेतलं,.. मग कळलं आजोबांनी ह्या प्लॉटवर बांधलेलं हे अपार्टमेंट,.. कारण कळलं पण ह्यावर आजीशीच बोलायचं असं ठरवलं,.. एक दोन दिवस बळजबरी आजीच्याच खोलीत झोपले,.. आजी गप्प, सुन्न नेहमी सारखी,… सासुबाई म्हणाल्या, “अग नको नादी लागुस त्यांच्या नाही बोलणार त्या काय मनात घेऊन अश्या झाल्या कुणास ठाऊक,..?” पण मी नाद सोडला नाही,…. आजीसारखी एकटक बघते तिकडे मी बघायला लागले आजीच्या त्या खिडकीतून तर मला दिसलं ते मागचं जुनं घर जिथे आयुष्य गेलं त्यांचं,.. मग मला लक्षात आला त्यांच्या मनाचा सल,…. मग मीच मागे गेले आपल्या कामवाल्या मावशींना घेऊन,.. त्यांच्याकडून दारासमोर वाढलेलं गवत काढलं,.. ओटा स्वच्छ केला आणि आजीला बळजबरी तिथे घेऊन गेले,…. चहाचे कपही नेले. आधी आजी गप्पच होत्या, मग मीच बडबड करत सुटले,.. त्या पडक्या घराच्या खिडकीतुन डोकावत म्हंटल,.. इथे देवघर होतं का? शेंद्री कोनाडा दिसतोय,.. तसं त्या बोलायला लागल्या,.. हो तिथे माझ्या विठुची मूर्ती होती काळीभोर,.. घराचे वाटे झाले,.. हि खोली आपल्या वाट्याला आली तेंव्हाच ह्यांना म्हंटले होते,.. मला इथे छोटंसं विठुचं मंदिर करू द्या,.. पण फार नास्तिक होते,.. मला म्हणाले , “तुझा विठूच देऊन टाक कोणाला तरी,..”

मला फार वाईट वाटलं ग.. कष्टात दिवस काढून ह्यांच्या संसाराला हातभार लावला आणि माझी मेलीची मागणी ती काय फक्त एवढी,.. कारण घराचे बाकी सगळे डिझाईन बिल्डर आणि पुढची पिढी त्यांना सोपं जाईल तसं करणार मला त्याच काही वाटत नव्हतं ग,.. पण माझ्या विठूवर का एवढा राग,..? खरंतर सगळ्यांनी समजावलं लेक, सून सगळे म्हणाले, बांधु छोटसं देऊळ… पण नाहीच ऐकलं,.. ही जागा जी कधीकाळी शेण सडा करून मी प्रसन्न करायचे,.. जिथं मिणमिणता दिवा मनाला प्रकाशित करायचा, तिथं हळूहळू सगळं पडीक झालं ग,.. अंधार पसरला. हे गेले पण जाईपर्यंत एकदा सुद्धा म्हंटले नाही कि, मी तुझी ही इच्छा पूर्ण केली नाही,.. वाईट वाटलं ज्याच्यासोबत आयुष्य गेलं, त्याला एवढीही खंत कधी वाटू नये … विठ्ठल मात्र माझ्या जवळ तसाच आहे.. जपलेला छोटी रखुमाई पण आहे.. त्याची ट्रंकेत बसलेली,..*

— क्रमशः भाग पहिला 

लेखक : अज्ञात 

संग्राहक : श्री मेघ:श्याम सोनावणे.  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अनुभव… ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

अनुभव…☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

‘साडेसात वाजले, चला उठायला हवं ‘, असं म्हणत चित्रा बेडरूममधून बाहेर आली. काल रात्री कथा लिहून पूर्ण करता करता दोन वाजून गेले होते. लिहून लगेच ती वाॅटसप ग्रुप्सवर पाठवली आणि त्यानंतर काही वेळाने तिला झोप लागली. तिनं तोंड धुवून, चहा घेतला आणि मोबाईलचं नेटवर्क ऑन केलं,तसं धाडधाड प्रतिक्रिया यायलाच लागल्या तिच्या कथेबद्दल! तिलाही उत्सुकता होतीच, लोकांना आपली कथा कशी वाटली ते जाणून घेण्याची. नेहमीप्रमाणे बरेचसे छान छानचे इमोजी होतेच. पण कथा लक्षपूर्वक वाचून सविस्तर अभिप्राय देणारे चोखंदळ वाचकही होतेच की! चित्राला त्यातच जास्त इंटरेस्ट असायचा.

असेच एक वाचक होते श्री. रमाकांत लिंगायत. त्यांचा अभिप्राय वाचताना चित्राच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य पसरलं.

‘नेहमीप्रमाणेच छान कथा. अगदी वास्तवदर्शी आणि वेगळ्या विषयावर भाष्य करणारी. कसं सुचतं तुम्हां लेखकांना काही कळत नाही बुवा! ग्रेट ! मैत्रिणी अशीच लिहित रहा. बाकी बोलूच प्रत्यक्ष भेटीत.’ 

मागच्या चार – पाच महिन्यांपासून त्यांचे सविस्तर अभिप्राय येत होते. त्याला वाॅटसपवर प्रतिसाद देता देता एकमेकांविषयी माहितीची देवाणघेवाणही झाली होती.

रमाकांत, साधारण ६५ च्या आसपासचं वय. मुंबईतल्या एका प्रख्यात इंजिनिअरिंग काॅलेजचे प्राचार्य म्हणून निवृत्त झालेले.शिवाय काही वर्षे नोकरीनिमित्त परदेशातही राहून आलेले.

पत्नी गृहिणी आणि दोन मुलं असा त्यांचा परिवार. दोन्ही मुलं विवाहित आणि नोकरीच्या गावी म्हणजे एक बेंगलोरला आणि दुसरा हैदराबादला, अशी स्थायिक झाली होती. संधिवातामुळे बायको आजारी, फारशी घराबाहेर पडत नव्हती. रमाकांत मात्र फिट अँड फाईन ! रोज अंबरनाथहून ठाण्याच्या स्पोर्ट्स क्लबमध्ये टेबल टेनिस खेळायला जायचे, सकाळी साडेपाचच्या लोकलने. अंबरनाथला त्यांनी बंगला बांधला होता.

‘मैत्रीण, आज वेळ आहे का तुला? सकाळी दहा-साडेदहा पर्यंत येऊ शकतो तुला भेटायला. बऱ्याच दिवसांपासून आपण भेटायचं ठरवतोय, पण काही ना काही कारणाने जमलंच नाही.’

चित्रानं घड्याळाकडे नजर टाकली, साडेआठ वाजून गेले होते. साडेदहा पर्यंत तिचं सहज आवरण्यासारखं होतं. शिक्षण क्षेत्रातल्या व्यक्तींबद्दल तिला विशेष आस्था होती. शालेय जीवनात ती एक हुशार विद्यार्थिनी होती. तिच्या अनेक शिक्षकांशी ती आजही संपर्क ठेवून होती. त्यांच्याबद्दल कायम आदराची भावनाच तिच्या मनात होती. एवढी मोठी, प्राचार्यपद भूषवलेली व्यक्ती आपल्या लिखाणाची दखल घेते, वेळ काढून आपल्याला भेटायला येतेय, आपल्याशी मैत्री करू इच्छिते, याचं तिला अप्रूप वाटत होतं. चला आज चांगली चर्चा आणि वैचारिक देवाणघेवाण होईल, असा विचार तिच्या मनात आला. ‘हो हो, या तुम्ही! मी तुम्हाला माझा पत्ता पाठवते हं! असं म्हणत तिने त्यांना पत्ता पाठवला देखील. कल्याणच्या खडकपाडा भागात होता तिचा फ्लॅट.

चित्रा सध्या एकटीच घरी होती. मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता. तो चेन्नईला हाॅस्टेलला राहात होता. तीन वर्षांपूर्वीच एका अपघातात तिचा नवरा गेला होता. सासूबाई अधून-मधून असायच्या तिच्याकडे, पण जास्त काळ त्या नागपूरलाच असायच्या मोठ्या दिरांकडे! चित्रा एका नामांकित कंपनीत अधिकारी पदावर होती. पण मुलगा बारावीला असताना, पाच वर्षांपूर्वीच तिनं स्वेच्छा निवृत्ती घेतली होती.त्याचं खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावं, म्हणजे रात्रंदिवस अभ्यासात गर्क असला तरी त्याची आबाळ होऊ नये, हा मुख्य उद्देश होता. निवृत्त होताना तिला भरपूर पैसा मिळणार होताच. एवढी वर्षे धावपळ करण्यात गेली, आता जरा दोघांनी सगळीकडे फिरायचं, मजा करायची असंही त्या नवरा-बायकोंनी ठरवलं होतं. पण विनयच्या अपघाती निधनामुळे ते सर्वच बेत निष्फळ ठरले होते.

आल्या प्रसंगाला धीराने तोंड देऊन , चित्रा आनंदाने जगण्याचा प्रयत्न करत होती. तिचा स्वभाव मनमिळाऊ, त्यामुळे नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींचा गोतावळाही भरपूर होता. माणसं जमा करण्याची आवडही होती. लेखनाचा छंद असल्याने, अनेक लेखक-वाचकांशीही ती फोनच्या, वाॅटसपच्या माध्यमातून जोडली गेली होती.

आयत्या वेळी आता पाहुण्यांसाठी कांदेपोहेच करावे असं तिनं ठरवलं. शिवाय घरात फळंही होतीच. स्वतःची अंघोळ वगैरे आवरून, तिनं पोह्यांची तयारी करून ठेवली. वेळेवर फोडणीला घातले की झालं. १०-४० झाले तरी रमाकांत आले नाहीत, म्हणून तिनं फोन केला. तिला वाटलं यांना घर शोधायला वेळ लागला की काय!’ ट्रॅफिकमधे अडकलो होतो. पोचतोय पाच मिनिटात!’ त्यांनी सांगितलं तसं तिनं पोहे फोडणीला घातले. तोवर बेल वाजलीच.

‘ग्लॅड टू मीटर यू डिअर’, असं म्हणून त्यांनी मिठी मारण्यासाठी हात पसरले. चित्रानं नमस्कार करून, त्यांना सोफ्यावर बसायला खुणावलं आणि ती पाणी आणायला कीचनमध्ये गेली. पाणी पिऊन होईस्तोवर पोहे झाले होतेच. ती प्लेटमध्ये पोहे घेऊन आली आणि त्यांना देऊन, आपली प्लेट घेऊन समोरच्या खुर्चीत बसली. बोलता बोलता पोहे कधी संपले, कळलंच नाही. रमाकांत परदेशातल्या गमती-जमती सांगत होते. चहा, फळं ते नाही म्हणाले, दूध चालेल. चित्रा कपभर दूध घेऊन आली. तशी ते म्हणाले, बेडरूम कुठेय तुझी?

चित्रा गोंधळली, ‘काय?तुम्हाला बरं वाटत नाहीये का? काय होतंय? ‘

‘नाही, नाही, आपण बेडवर पडूनच जरा गप्पा मारल्या असत्या. तुला संकोच वाटत असेल स्पष्ट बोलायला, म्हणून मीच सुचवलं.’

क्षणभर चित्राला कळेचना, त्यांना काय म्हणायचे आहे.

तेच पुढे म्हणाले, ‘ अग, एवढं घरी बोलावलंस ते त्यासाठीच ना!कालच्या तुझ्या कथेतली नायिका असंच वागते ना? मी एकदम फिट आहे हं! आता बघ दोघांची परिस्थिती अशी आहे. माझी बायको सदाआजारी आणि तुझा नवराच राहिला नाही. मग मित्र हवाच ना यासाठी! एकमेकांची सोय बघायला! ‘ असं म्हणत ते सोफ्यावरून उठले.

त्यांच्या म्हणण्याचा उद्देश आता तिच्या नीट ध्यानात आला. तिला विलक्षण संताप आला. पण ती घरात एकटी होती. हा प्रसंग संयमानेच हाताळायला हवा होता. आवाज केला तर शेजारी-पाजारी मदतीला आले असते, पण नंतर तिचीच अक्कल काढली असती त्यांनी. एकटी असताना परपुरूषाला घरी बोलवायचं कशाला? तिनं असा काही प्रकार होईल याची कधी कल्पनादेखील केली नव्हती.

तिने मनात दहा अंक मोजले. त्यांना सोफ्यावर बसण्याची खूण केली. ‘तुमचा काही तरी गैरसमज झाला आहे.एकतर लेखक जे लिहितो, त्याचा त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंध असेलच असं नाही ना! समाजात, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे पडसाद, एक माणूस म्हणून त्याच्या मनावर उमटणारच. त्याला कल्पकतेची जोड देऊन, कथेच्या रूपात तो व्यक्त करतो इतकंच! मला अशा प्रकारची मैत्री अजिबात अपेक्षित नाही. मी माझ्या नवऱ्यासोबत खूप छान संपन्न जीवन जगले. त्या आठवणी माझ्यासाठी पुरेशा आहेत. एक चांगला मित्र मिळेल या भावनेनं मी तुमच्याकडे बघत होते. पण तुम्ही मित्र या व्याख्येलाच धुळीस मिळवलंत. तुम्ही एक प्राचार्य म्हणून, ज्येष्ठ व्यक्ती म्हणून, माझ्या मनात जी आदराची भावना होती, तिला धक्का पोचवलात. स्त्री-पुरूषातही निखळ मैत्री असू शकते, पण तुम्ही हा विचारच केला नाही. फार संकुचित विचार आहेत तुमचे. मला गृहीत धरण्यात तुम्ही खूप मोठी चूक केलीत. ‘

‘ हे बोलायला ठीक आहे ग! पण तुलाही मनातून वाटत असेलच ना? मी तेच बोलून दाखवलं. ‘

‘ तुम्ही प्लीज जा आता. मला तुमच्याशी बोलण्याची अजिबात इच्छा नाही ‘,चित्रा म्हणाली. तिच्या मनाचा थरकाप उडाला होता. पण प्रयत्नपूर्वक तिनं चेहऱ्यावर ते दिसू दिलं नाही.

ते अजून सोफ्यावरून उठले नव्हते. आता या माणसाला कसं घराबाहेर काढायचं, असा विचार मनात करत असतानाच चित्राच्या फोनची बेल वाजली.

‘मुग्धा, अभिनंदन! तू तुझी स्वतःची कराटेची संस्था काढतेयस. आणि त्याच्या शुभारंभासाठी तुला तुझ्या गुरूची, म्हणजे माझी आठवण झाली हे ऐकून खूपच छान वाटलं. मी नक्की येणार तुला शुभेच्छा द्यायला.’ असं म्हणून चित्राने फोन ठेवला.

रमाकांत सोफ्यावरून उठून पायात बूट घालत होते.

तिकडे मुग्धा ही काय बोलतेय हे न कळल्याने अवाक् झाली होती.ती काही बोलण्याआधीच चित्राने बोलायला सुरुवात केली होती आणि आता फोनही ठेवून दिला होता.

तासाभराने चित्राने फोन करून तिला सगळं सांगितलं, तेव्हा तिला काय बोलावं हेच सुचेना. एकीकडे चित्रावर काय संकट ओढवलं होतं या जाणिवेनं तिला घाम फुटला होता तर दुसरीकडे तिच्या मैत्रिणीच्या खंबीरपणाचं,समयसूचकतेचं, प्रसंगावधानाचं कौतुक कोणत्या शब्दांत करावं हे मुग्धाला कळत नव्हतं.

चित्रानं मात्र समाजमाध्यमावरील अनोळखी व्यक्तीला आपली व्यक्तिगत माहिती न देण्याचा दृढ निश्चय केला होता. आजचा अनुभव ती कधीच विसरणार नव्हती.

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तीन लघुकथा – (१) कर्तव्यदक्ष पोलिसांना सलाम… (२) लेकीची माया (३) प्रेम द्यावं आणि प्रेम घ्यावं… ☆ सौ राधिका माजगावकर पंडित ☆

सौ राधिका माजगावकर पंडित

? जीवनरंग ?

तीन लघुकथा (१) कर्तव्यदक्ष पोलिसांना सलाम… (२) लेकीची माया (३) प्रेम द्यावं आणि प्रेम घ्यावं… ☆ सौ राधिका माजगावकर पंडित

(१) कर्तव्यदक्ष पोलिसांना सलाम..

फिरायला जातांना तिची पावलं नकळत सुनसान रस्त्या कडे वळली. बापरे ! इथे तर वर्दळच नाहीय्ये. घाबरून ती मागे वळली तर , दोन माणसं तिच्या मागून येत होती. तिला घाम फुटला. घाबरून ती किंचाळणार  होती,  इतक्यातं ती व्यक्ती म्हणाली, ” घाबरू नका,आम्ही  गुप्त पोलीस आहोत. केव्हापासून तुमच्या मागून चाललो आहोत .

“अहो पण का? मी–मी –काहीच गुन्हा केला नाही.”

” ताई तुम्ही नाही काही गुन्हा केलात , पण एक गुन्हेगार तुमच्या मागावर असून तुमच्या गळयातल्या   मंगळसूत्राकडे त्याचं लक्ष आहे .तुमच्या संरक्षणासाठी आम्ही तुमच्या मागे केव्हापासूनच चालत आहोत .तिचा हात गळ्याकडे गेला.खोटं मंगळसूत्र तिने चाचपलं. खुलासा करण्यासाठी ती काही बोलणार होती,पण ती थबकली.पोलिसांच्या दक्षतेच, स्रिदाक्षिण्याचं  तिला फार कौतुक वाटलं. ती म्हणाली, “तुमच्या कर्तव्य तत्परतेच आणि स्रि दाक्षिण्याचं  कौतुक करावं  तेवढं  थोडचं आहे. खूप आभारी आहे मी तुमची. असं म्हणून पुढचं काही न बोलता खोटं मंगळसूत्र तिने पदराड लपवलं . “धन्यवाद “असं म्हणून ती पुढे झाली.

(२) लेकीची माया 

दमून भागून कामावरून घरी आली होती ती.अजून मजूरी मिळाली नव्हती. घरात शिरतांना फाटक्या फ्रॉकच्या घेरात कसला तरी पुडा लपवतांना चिंगी दिसली तिला. इथं पैन पै वाचवतेय मी. आणि ही बया चोरून खाऊचे पुडे आणून खातीय.डोकं फिरलं तिचं.तिने दणकन लेकीच्या पाठीत धपाटा मारला .घाबरून पोरगी स्वयंपाक घरात पळाली. तिरिमिरीत माय  भिंतीला टेकून बसली. स्वतःची, साऱ्या जगाची, आपल्या परिस्थितीची चीड आली  होती तिला. डोळे भरून आले.तिच्या समोर चिंगी उभी होती.”,म्हणत होती, “रडू नकोस ना गं माय.भूक लागलीआहे ना तुला? सकाळपासून उपाशी आहेस. घरात काहीच नव्हतं. म्हणून टपरी वरून चहा आणि बिस्किट पुडा आणलाय तुझ्या साठी.माझ् ऐकून तर घे मगासारखं मारू नकोस ना मला! आई पैसे चोरले नाहीत मी.बाबांनी खाउला दिलेल्या पैशातून तुझ्यासाठी पुडा आणायला गेले होते. एका हातात मघाशी लपवलेला बिस्किटाचा पुडा,आणि दुसऱ्या हातांत कपबशी घेऊन लेक विनवत होती. घे ना !खरच हे चोरीचे पैसे नाहीत  माय. आवेगाने तिने चिंगीला मिठीत घेतलं  आईच्या माराने कळवळून आलेले डोळ्यातले अश्रू चिंगीच्या चिमुकल्या गालावर सुकले होते. तिला भडभडून आलं.उगीच मी लेकरावर परिस्थितीचा राग काढला. एका हाताने चिंगी आईला बिस्कीट भरवत होती.आणि फ्रॉकनें आईचे डोळे पुसत होती. आता लेक झाली होती माय. आणि माय झाली होती लेक. खरंच लेक असावी तर अशी. मित्र-मैत्रिणींनो  आपल्या लेकीवर भरभरून माया करा.खूप खूप भरभरून प्रेम द्या मुलांना ..  धन्यवाद 

(३) प्रेम द्यावं आणि प्रेम घ्यावं…

मुलाचे लग्न कालच झालं.आणि आज ऋतुशांती पण झाली.  सगळीकडे निजानीज झाली होती. इतक्यात खोकल्याचा आवाज  आला.

‘अगोबाई हे काय? हा तर रूम मधून येणारा नव्या सुनबाईंच्या खोकल्याचा आवाज!. येणारी खोकल्याची ढासं थांबतचं नाही  .

घड्याळाचे कांटे पुढे सरकत होते कोरडा खोकला   कसा तो थांबतच नाहीय्ये  बाई!    काय करावं?”!.नवी नवरी बिचारी, कालच आलीय आपल्या घरात. कुणाला आणि कसं सांगणार बापडी, सगळंच नवखं.    स्वतःशी  पुटपुटत, असा विचार करत असतानाच सावित्रीबाईना एकदम आयडिया   सुचली.लगबगीने त्या स्वयंपाकघरात शिरल्या.लवंग काढून त्यांनी, ती भाजून कुटून बारीक केली. मधात कालवली. दरवाज्यावर टकटक करून,अर्धवट उघडलेल्या दरवाज्यातून त्यांनी ती वाटी  अलगद आत सरकवली.आणि म्हणाल्या” सूनबाई हे चाटण चाटून घे हो ! खोकल्याची ढासं थांबेल. वाटी घेतांना नवपरिणीत नवरीच्या डोळ्यातून कृतज्ञता ओसंडून वाहत होती .जरा वेळाने ढासं कमी होऊन खोकल्याचा आवाज बंद  झाला .आणि खोलीतून शांत झोपेच्या,घोरण्याचा आवाजही आला. सावित्रीबाई गालांतल्या गालात हसून मनांत म्हणाल्या’ प्रेम आधी द्याव लागतं.मग ते दुपटीने आपल्याला परत मिळतं .  माझ्या आईचा  सासूबाईंचा  वसा आपण  पुढे  चालवायलाच  हवा नाही कां? सकाळी  लवकर उठून, न्हाहून, फ्रेश होऊन, उठल्यावर सूनबाई सासूबाईंच्या पाया पडताना हसून म्हणाली, “आजपासून मी तुमची सून नाही.तर मुलगी झालें, लेकीच्या मायेने विचारते, मी …. ए आई म्हणू का तुम्हाला?” असं म्हणून ती लाघवी पोर अलगदपणे   सासूबाईंच्या कुशीत शिरली .

लेक नव्हती नां सावित्रीबाईंना ! जन्म दिला नसला म्हणून काय झालं?  सूनही  लेक होऊ शकते नाही कां?

दोन्ही बाजूनी  सकारात्मक विचारांनी , समजूतदारपणे,  प्रेमाची देवाण-घेवाण झाल्यावर सासु सुनेच विळा आणि  भोपळा अशा नावाने बदनाम झालेलं नातं  दुध साखरेसारखे एकरूप  पण होऊ शकत   हो नां?     आणि मग साध्या गोष्टीतून उगवलेलं त्यांचे हे प्रेम चिरंतन कालपर्यंत टिकलं  त्यामुळेच त्या घराचं नंदनवन झालं आणि  मग घरचे पुरुषही निर्धास्त झाले.  कौटुंबिक कथा असली तरी प्रत्येक घराघरांतली ही कहाणी सुफळ संपूर्ण होवो.  ही सदिच्छा .  

© सौ राधिका माजगावकर पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “मालू…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “धाकटा…” ☆ श्री मंगेश मधुकर 

बा-बापूजींच्या लग्नाचा पंचेचाळीसावा वाढदिवस दिमाखात साजरा झाला.रात्री झोपण्याच्या तयारीत असताना बापूजी म्हणाले “खुश”

“बहोत.”

“एकदम भारी वाटतय.काय पाहिजे ते माग,आज मूड एकदम हरिश्चंद्र स्टाईल आहे“

“सगळं काही मिळालं फक्त एकच..”बांच्या बोलण्याचा रोख समजून बापूजींचा चेहरा उतरला. 

“कशाला तो विषय काढलास.आज नको.”

“उलट आजच्या इतका दुसरा चांगला दिवस नाही.”

“तो एक डाग सोडला तर सगळं काही व्यवस्थित आहे.”

“असं नका बोलू.तुम्ही असं वागता म्हणून मग बाकीचे सुद्धा त्याच्याशी नीट वागत नाहीत.”

“त्याची तीच लायकी आहे.थोरल्या दोघांनी बघ माझं ऐकून पिढीजात धंद्यात लक्ष घातलं,जम बसवला,योग्य वेळी लग्न केलं अन संसारात रमले.सगळं व्यवस्थित झालं आणि हा अजूनही चाचपडतोय.” 

“उगीच बोलायला लावू नका.तुम्ही हॉस्पिटलमध्ये होता तेव्हा थोरल्यांना दुकानाची जास्त काळजी होती.लोक लाजेस्तव दिवसातून दोनदा भेटून जायचे.दिवसरात्र तुमच्यासोबत फक्त धाकटाच होता.बाकीचे पाहुण्यांसारखे. तेव्हाच थोरल्यांचा स्वार्थीपणा लक्षात आला.हॉस्पिटलचं बिल तिघांनी मिळून भरलं पण नंतर त्या दोघांनी तुमच्याकडून पैसे मागून घेतले.धाकट्यानं मात्र विषयसुद्धा काढला नाही.”

“बापासाठी थोडफार केलं तर बिघडलं कुठं?

“थोरल्यांना पैसे देताना हेच का सांगितलं नाही.”

“ते जाऊ दे.झालं ते झालं”

“का?,ते दोघे आवडते आणि धाकटा नावडता म्हणून ..”

“काहीही समज.”

“उद्या गरजेला तर फक्त धाकटाच आधार देईल हे कायम लक्षात असू द्या.” 

“पोरांकडे पैशासाठी हात पसरावे लागणार नाहीत एवढी सोय केलेली आहे”

“प्रत्येक ठिकाणी पैसा कामाला येत नाही.माणसाची गरज पडतेच”

“आज धाकट्याचा फारच पुळका आलाय.”

“पुळका नाही काळजी वाटते.बिचारा एकटाय”

“स्वतःच्या कर्मामुळे.बापाचं ऐकलं नाही की अशीच गत होणार.”

“बिनलग्नाचा राहिला याला तो एकटा नाही तर तुम्ही पण  जबाबदार आहात”

“हे नेहमीचचं बोलतेस”

“तेच खरंय”

“काय करू म्हणजे तुझं समाधान होईल”बापूजी चिडले. 

“तुमच्यातला वाद संपवा.”

“त्यानं माफी मागितली तर मी तयार आहे..”

“पहिल्यापासून सगळ्या पोरांना तुम्ही धाकात ठेवलं. स्वतःच्या मनाप्रमाणं वागायला लावलं पण धाकटा लहानपणापासून वेगळा.बंडखोरपणा स्वभावातच होता.बापजाद्याच्या धंद्यात लक्ष न घालता नवीन मार्ग निवडला आणि यशस्वी झाला हेच तुम्हांला आवडलं नाही.ईगो दुखवला.याचाच फार मोठा राग मनात आहे.”

“तोंडाला येईल ते बोलू नकोस.मी त्याचा दुश्मन नाहीये.भल्यासाठी बोलत होतो.तिघंही मला सारखेच”.

“धाकट्याशी जसं वागता त्यावरून अजिबात वाटत नाही”

“तुला फक्त माझ्याच चुका दिसतात.पाच वर्षात माझ्याशी एक शब्दही बोललेला नाही.”

“बापासारखा त्याचा ईगोसुद्धा मोठाच…कितीही त्रास झाला तरी माघार नाही.”

“एकतरी गोष्ट त्यानं माझ्या मनासारखी केलीय का?”

“तुमचा मान राखण्यासाठी काय केलं हे जगाला माहितेय.”

“उपकार नाही केले.त्यानं निवडलेली मुलगी आपल्या तोलामोलाची नव्हती.ड्रायव्हरची मुलगी सून म्हणून..कसं दिसलं असतं.घराण्याची इज्जत …..” 

“तरुण पोरगा बिनलग्नाचा राहिला तेव्हा गेलीच ना.थोडं नमतं घेतलं असतं तर ..”

“मला अजूनही वाटतं जे झालं ते चांगलं झालं.”

“त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं.मनात आणलं असतं तर पळून जाऊन लग्न करणं अवघड नव्हतं परंतु केवळ तुमची परवानगी नव्हती म्हणून लग्न केलं नाही.”

“त्यानंतर एकापेक्षा एक चांगल्या मुलींची स्थळ आणली पण..यानं सगळ्यांना नकार दिला.”

“तुम्हा बाप-लेकाचा एकेमकांवर जीव आहे पण पण सारख्या स्वभावामुळे ईगो आडवा येतोय.” 

“काय जीव बिव नाही.मुद्दाम बिनलग्नाचं राहून माझ्यावर सूड उगवतोय.आपल्या लग्नाच्या वाढदिवसालाच तो जन्मला तिथूच पणवती लागली”बापूजींच्या बोलण्यावर बा प्रचंड संतापल्या.तोंडाला येईल ते बोलायला लागल्या. बापूजीसुद्धा गप्प नव्हते.दोघांत कडाक्याचं भांडणं झालं.ब्लड प्रेशर वाढल्यानं बा कोसळल्या. आय सी यू त भरती करावं लागलं.बापूजी एकदम गप्प झाले पण डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं.एक क्षण बांच्या समोरून हलले नाहीत.

—-

“बा,तुझं बरोबर होतं.शेवटी धाकट्यानंच आधार दिला.मी त्याला माफ केलं.माघार घेतो पण तू रुसू नकोस.लगेच धाकट्याला बोलवं.त्याच्याशी मी  बोलतो.आता आमच्यात काही वाद नाही.सगळं तुझ्या मनासारखं होईल.धीर सोडू नकोस.धाकटा कुठायं.त्याला म्हणावं लवकर ये.बा वाट बघातीये.तिला त्रास होतोय.माफी मागतो पण ये.मी हरलो तू जिंकलास.”खिडकीतून पाहत हातवारे करत बोलणाऱ्या बापूजींना पाहून रूममध्ये आलेल्या नर्सनं विचारलं  

“काय झालं.बाबा कोणाशी बोलताहेत ”.

“माझ्या आईशी”

“त्या कुठंयेत ”

“आठ दिवसांपूर्वीच ती गेली.तो धक्का सहन न झाल्यानं बापूजी बिथरले.आपल्यामुळेच हे घडलं या ठाम समजुतीनं प्रचंड अस्वस्थ आहेत.काळचं भान सुटलंय.सतत आईशी बोलत असतात. हातवारे,येरझारा आणि असंबद्ध बोलणं चालूयं.मध्येच चिडतात,एकदम रडायला लागतात म्हणून इथं आणलं.आता सकाळपासून सारखं धाकट्या मुलाला भेटण्यासाठी जीव कासावीस झालाय.त्याला बोलाव म्हणून हजारवेळा मला सांगून झालंय”

“मग त्यांना बोलवा ना.”नर्स 

“मीच तो धाकटा.”

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

३           जीवनरंग —

             “ मालू .. “         

              लेखक : मंगेश मधुकर 

 “मालू

सकाळचे नऊच वाजलेले तरी ऊन्हाचे चटके बसत होते.जो तो ऑफिसची वेळ गाठायच्या गडबडीत.समोरच्या बसस्टॉपवर नेहमीसारखी गर्दी.रुटीनप्रमाणे मी वेळेवर दुकान उघडल्यावर एकेक कामगार आले.साफसफाई झाल्यावर पूजा करून काउंटरवर बसलो आणि सहज नजर बसस्टॉपवर गेली तिथली गर्दी कमी झालेली मात्र येणाऱ्या-जाणाऱ्यांना काहीतरी दाखवत विचारणाऱ्या आजोबांनी लक्ष वेधलं.बराच वेळ ते बसस्टॉपवरच होते. नक्की काय प्रकार जाणून घेण्यासाठी कामगाराला पाठवलं.काहीवेळानं परत येऊन तो म्हणाला“ते बाबा कोणाला तरी शोधतायेत”

“म्हणजे”

“एका बाईचा फोटो दाखवून हिला पहिली का?हरवली आहे.असं सारखं सारखं बोलत आहेत”

“बरं.जा तू तुझं काम कर”नंतर दुकानात गर्दी झाल्यानं कामात हरवलो.निवांत झाल्यावर पाहिलं तर आजोबा अजूनही तिथंच.आश्चर्य आणि थोडं विचित्रसुद्धा वाटलं. 

“मी आलोच.जरा काउंटरकडे लक्ष दया”कामगारांना सांगून बसस्टॉपजवळ आलो.आजोबांची नजर शून्यात. 

“आजोबा,नमस्कार”त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही.एकदोनदा हाक मारल्यावर आजोबा भानावर आले आणि मला पाहून चाळीशीतल्या बाईंचा जुनाट फोटो पुढे करत म्हणाले “हिला पाहिलंत.हरवलीय.”

“या कोण?

“मालू”

“कोण मालू”

“माझी बायको”

“कुठे हरवली”

“माहिती नाही”

“म्हणजे”

“शेवटचं इथंच कुठंतरी भेटली होती.”

“मग”

“नंतर कुठे गेली तेच माहिती नाही”

“मोबाईल नंबर”

“आहे की”म्हणत आजोबांनी हात स्वतःच्या छातीला हात लावला तर गळ्यात फक्त दोरी परंतु मोबाईल नव्हता.बावरलेले आजोबा इकडे तिकडे शोधायला लागले. 

“आधी मालू हरवली आता मोबाईल.काही खरं नाही.”आजोबा प्रचंड सैरभैर झाले.

“माझ्याकडे फोन आहे.तुम्ही नंबर सांगा.”

“नंबर सांगता येणार नाही.आठवत नाही”आजोबा.

“जरा आठवून बघा.घरातल्या दुसऱ्या कोणाचा नंबर सांगा.”दोन्ही हाताचे अंगठे हलवत ‘नाही’ अशी खूण त्यांनी केली.माझ्या आग्रहामुळे नंबर आठवण्याचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही.उलट ते चिडून म्हणाले “मोबाईल जाऊ दे.आधी मालूला शोधू” 

“कुठं राहता”

“इथं जवळच”

“पत्ता सांगता”

“कशाला”

“बराच वेळ तुम्ही इथंच बसलाय.घरी जा.माझं दुकान समोरच आहे.तुमच्या ‘मालू’ सापडल्या की कळवतो.हा माझा नंबर” मी दिलेला कागद पायजम्याच्या खिशात ठेवून आजोबा नुसतेच बसून राहिले.त्याचं वागणं नॉर्मल नव्हतं.वेगळीच शंका आली.“घरात भाडंण झालं का”

“नाही.कोणाशी भांडणार,मालू नाहीये”

“त्या कधी हरवल्या”

“बरेच दिवस झाले.”

“बाप रे,पोलिसांकडे तक्रार केली का?”

“सगळं केलं पण काही उपयोग नाही” माझ्याशी बोलतानासुद्धा त्याचं लोकांना फोटो दाखवणं सुरूच होतं.कंटाळून मी दुकानात परत आलो.दुपारी जेवणाच्या वेळी अचानक आजोबांची आठवण आली.ते अजूनही बसस्टॉपवरच होते.मला राहवलं नाही पुन्हा त्यांच्याकडे गेलो.परत एकदा आजोबांनी फोटो पुढे केला. “आजोबा,घरातल्या कोणाचा नंबर आहे का”आजोबांनी खिसे तपासले आणि एक कागदाचा तुकडा काढून दिला.कागदावरच्या नंबरवर ताबडतोब फोन करून आजोबांना घेऊन दुकानात गेलो.डब्यातली पोळी-भाजी दिली.भुकेल्या आजोबांनी चटकन संपवली आणि पुन्हा शून्यात नजर लावून बसले.

अर्ध्या तासानं दुकानासमोर रिक्षातून अंदाजे तिशीतली मुलगी उतरली.ती बरीचशी आजोबांकडच्या फोटोतल्या बाईसारखी दिसत होती.दुकानात येऊन त्या मुलीनं आजोबांना घट्ट मिठी मारली.आजोबांनी तिच्यासमोर फोटो पुढे केला.तेव्हा तिचा बांध फुटला.

“मालू सापडली.घरी चला तुमची वाट बघतेय”मुलीनं सांगितल्यावर आजोबा प्रचंड खूष झाले.ताडकन उभं राहत म्हणाले “लवकर चला आणि हे कोण?”माझ्याकडे बोट करत त्यांनी विचारलं तेव्हा धक्काच बसला.

“मॅडम हा काय प्रकार आहे” 

“माफ करा.तुम्हांला जो त्रास झाला त्याबद्दल सॉरी!!आणि थॅंकयू सो मच तुमच्यामुळे माझे वडील हे सुखरूप आहेत.नाहीतर..” डोळ्यातलं पाणी पुसत तिनं माझ्यासमोर हात जोडले. 

“अहो,सकाळपासून ते इथंच आहेत.फोटो घेऊन ‘मालू’ला शोधतायेत” 

“आणि आम्ही यांना शोधतोय”

“म्हणजे”

“मालती म्हणजे मालू म्हणजे माझी आई,तिला जाऊन वर्ष झालं.”

“अरे बाप रे,मग हे”

“आई गेल्यापासून फार बेचैन आहेत.सारखी तिची आठवण काढतात.त्यांची तब्येत बरी नाही.सहसा एकटं सोडत नाही पण आज आईचं वर्षश्रद्धाची गडबड सुरू होती.म्हणून हा घोळ झाला.”

“तुमच्या आईविषयी बाबांना माहितीयं?.”

“होय पण अन नाहीपण.”

“समजलं नाही.”

“त्यांच्या बुद्धीनं मान्य केलयं पण मन अजूनही …….आणि त्यात त्यांना विस्मरणाचा आजार आहे.आई गेल्यानंतर विसारण्याचं प्रमाण वाढलंय म्हणून आमचे नंबर लिहीलेला कागद त्यांच्या प्रत्येक खिशात ठेवतो.त्याचाच उपयोग झाला. अगदी देवासारखे भेटलात.”खूप भरून आल्यानं बोलता येईना परत तिनं हात जोडले.

“ते माझ्या वडीलांसारखे आहेत आणि थोडी माणुसकी तर प्रत्येकात असतेच” 

“देव आमची परीक्षा घेतोय. जेव्हा आपलं माणूस ओळख विसरतं तेव्हा फार जिव्हारी लागतं.आत्तासुद्धा त्यांनी मला ओळखलेलं नाही.फक्त मालूचा उल्लेख केला म्हणून सोबत येतायेत.तुम्ही केलेल्या मदतीबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद!!” मुलगी बोलत असताना आजोबा मात्र निर्विकारपणे बसले होते.काहीवेळानं वडिलांना घेऊन ती निघून गेली.

जगण्यातलं एक वेगळंच भयाण वास्तव बघून मला मात्र गलबलून आलं.

लेखक : मंगेश मधुकर     

            98228 50034

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘भान…’ – भाग – 3 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

?जीवनरंग ?

 ☆ ‘भान…’ – भाग – 3 ☆ श्री आनंदहरी 

३          जीवनरंग —

            “ भान .. “.  – भाग तिसरा          

             लेखक : आनंदहरी 

भान ….  

( क्रमशः भाग तिसरा ) 

 

(तिच्या मनात त्याच्याबद्दलच्या विचारांचा, आठवणींचा हिंदोळा झुलत राहायचा, कधी कधी तिच्याही नकळत…) – इथून पुढे 

दीपकने दोन्ही कुटुंबांचा पिकनिक आणि सहभोजनाचा कार्यक्रम ठरवला. स्वप्नील ,त्याची बायको स्वप्ना आणि मुलगी तेजाला घेऊन आला. स्वप्नाला पाहून का कुणास ठाऊक पण तिला कसंसंच झाले. स्वप्ना तशी छान होती ,मोकळेपणाने बोलणारी, सहभागी होणारी..तिच्याशी एखाद्या मैत्रिणीप्रमाणे वागली. ती ही तशीच वागली .पण स्वप्नीलचं स्वप्नाशी असणारे वागणे तिला रुचले नाही. तसा तो तिच्याशी आवश्यकतेपेक्षा  थोडेसे जास्तच अंतर राखून वागतोय असे तिला जाणवले आणि ती मनोमन नाराज झाली होती. ती नाराजी फक्त त्यालाच जाणवेल अशी व्यक्त ही केली होती पण त्याने तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले होते. मग तीही आस्ते आस्ते पण मनाविरुद्ध दीपककडे सरकली. तशा गप्पा छान झाल्या.पिकनिक ही मस्त झाली.. सोनू आणि तेजाची तर चांगलीच गट्टी जमली होती. त्या दोघांनी खूपच धमाल केली. फक्त ती मनातून अस्वस्थ झाली होती, कुठंतरी अंतर्यामी दुखावली होती. इत्तर कुणाच्याही ध्यानी-मनी आलं नसलं तरी स्वप्नीलला ते चांगलंच जाणवले होते 

घरी आले तेव्हा सारेच दमले होते, सोनू तर काही न खाताच लगेच झोपून गेला. दीपक हॉल मध्ये  टीव्ही वर बातम्या पाहत बसला होता. ती अस्वस्थ मनाने सोनूजवळ पहुडली होती. तिला खरेतर स्वप्नील काहीसा जास्तच त्रयस्थपणाने वागल्याने त्याचा राग आला होता. ती मनोमन दुखावली गेली होती. मोबाईलचा मेसेज टोन वाजला. स्वप्नीलचा मेसेज होता. तसाच डिलीट करावा असे तिला वाटत होते पण तिने तो वाचला.

‘सॉरी, तू समजूतदार आहेस, सारे समजून घेशील हा विश्वास आहे. एकच सांगतो, तू भेटल्यापासून मला दुसऱ्या कुणाचंच आकर्षण वाटत नाही… अगदी कुणाचंच . मिस यू..‘

तिने मेसेज वाचून डिलीट केला. तिच्या मनात आले ,दीपकच्या मनात काही येऊ नये म्हणून कदाचित आपणही असेच वागलो असतो, कदाचित नकळत वागतही असू आणि त्या विचाराबरोबर तिच्या मनातली अस्वस्थता, त्यांच्याबद्दलचा राग ही डिलीट झाला. तिने त्याला तसाच रिप्लाय दिला आणि ती उठून हॉलमध्ये दीपकजवळ येऊन त्याला बिलगून बसली.

ऑफिसात रोज भेट व्हायचीच,  बोलणे ही व्हायचं पण शब्दांचे, नजरेचे अर्थ बदलले होते. ‘अहो जाहो’ करणारा तो ‘अगं तूगं ‘ कधी करू लागला ते तिच्याही ध्यानात आले नसलं तरी  तिला ते मनापासून आवडू लागले होते. सहज भासवलेल्या स्पर्शात ओढ, हवेहवेसेपण पाझरू लागले होते. दिवस जात होते तसे भेटीची ओढ वाढत होती. घरी परतल्यावर, सुट्टीदिवशी कॉल, मेसेज तर होत होतेच पण ‘गुडनाईट’ शिवाय झोप लागत नव्हती आणि ‘गुडमॉर्निंग’ शिवाय जाग येत नव्हती. 

एकीकडे त्याचा स्पर्श हवाहवासा वाटत असताना दीपकचा स्पर्श नकोसा वाटू लागला होता. ती ते दर्शवत नव्हती तरी दीपकला ते जाणवू लागले होते. त्याने ते एकदा बोलूनही दाखवले होते पण काहीतरी सबब तिने सांगितल्यावर त्याने ती सबब काहीही न बोलता मान्य केली होती,स्वीकारलीही होती. सुरवातीच्या काळात तिच्या मनात येणारी अपराधीपणाची भावना, विचार आताशा येईनासे झाले होते.. उलट ती स्वप्नील मध्ये जास्तच गुरफटत चालली होती आणि तिला त्याची जाणीवही होईनाशी झाली होती. आपण नेमके कोणत्या दिशेने वाटचाल करतोय हा विचार ही तिच्या मनाला स्पर्शत नव्हता..आणि ‘का ?’ हा प्रश्नही तिला पडत नव्हता. जणू तिच्या मनावर त्याचं गारुड होते.. त्या गारुडाने तिचे भान हरपले होते.. विचारशक्ती कुंठित झाली होती. योग्य अयोग्य याचा विचार ही मनात येत नव्हता .

दीपक दोन दिवसांकरीता ऑफिसच्या कामानिमित्त परगावी गेला तेव्हा कधी नव्हे ते तिला मोकळे मोकळे वाटले. यापूर्वी असे कधी झाले नव्हते. कधी दीपक एखादा दिवस जरी येणार नसला तरी तिला कसेतरी वाटायचं..झोप यायची नाही. त्याकाळापूरती मनात आणि घरातही एक पोकळी जाणवायची. एकटं एकटं वाटायचं . ती त्याच्या येण्याची खूप आतुरतेने वाट पहायची. तो आला की खूप रिलॅक्स व्हायची. यावेळी मात्र तिला तसे काहीच वाटले नव्हते . 

तिने दीपक परगावी गेल्याचं बोलता बोलता स्वप्नीलला सांगितले होते. ते त्याला सहज सांगितले की मुद्दामहून हे तिला स्वतःला सुध्दा कदाचित सांगता आले नसते पण स्वप्नीलला ते सूचक वाटले आणि तो संध्याकाळी तेजाला घेऊन तिच्या घरी आला होता. तेजा आणि सोनूची जोडी उड्या मारतच खेळायला अंगणात पळाली. ती चहा ठेवायला किचन मध्ये जाताच मागून स्वप्नील आत गेला .. आणि असोशीने खसकन् तिला जवळ ओढले. ती त्या क्षणाची वाटच पाहत असल्यासारखी मिठीत विसावली पण पुढच्याच क्षणी भानावर आली.. ‘ मुले पटकन आत येतील..’ म्हणत पटकन बाजूला झाली. स्वप्नील काहीतरी म्हणत होता. तिला सांगत, समजावत होता पण ती त्याक्षणी ठाम राहिली.

“ रागावलात ? सॉरी.. .पण इथे शेजारच्या कुणीही घरच्यासारखं पटकन आत येतात.. भीती वाटते.. सोनू तर खेळताखेळता मध्येच पळत पळत आत येतो. “

स्वप्नील ‘ नाही ‘ असे म्हणाला असला तरी नाराज झालाय हे तिला जाणवले होते. तिने ‘सॉरी ‘ म्हणून, त्याचा हात स्वतःहून हातात घट्ट धरत त्याला खुलवायचा प्रयत्न केला.

थोडा वेळ थांबून जाता जाता त्याने विचारले, 

“ ठीक आहे. तिकडे तरी येशील ना? “

ती ‘ हो ‘ म्हणाली होती आणि आलीही होती. बाईक उभी करून कपडे सरळ करता करता तिला हे सारे आठवले तशी ती विचारात पडली..

‘ हे काय आहे? प्रेम की आकर्षण, शारीरिक ओढ? आपण तर दीपकवर प्रेम केले..त्याच्या सहवासात खूपच सुखी होतो. ओढ होती, असोशी होती.. मग अलीकडे आपल्याला हे झालंय तरी काय ? आपण एवढ्या कशा बदललो, एवढया कशा वाहवलो? काही दिवसातच आपण स्वप्नीलकडे आकर्षिलो गेलो आणि आपल्याला इतकी वर्षे आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या, ज्याच्यासाठी आपणच सर्वस्व आहोत त्या दीपकचाही आपल्याला विसर पडला.. ..त्याच्या प्रेमाशी आपण प्रतारणा करतोय हे ही आपल्या मनातही आलं नाही कधी…इतकंच नव्हे तर त्याचा सहवास, स्पर्शही नकोसा वाटू लागलाय… इतक्या कशा बदललो आपण?  इतक्या कशाला भाळलो आपण.. आपल्या स्तुतीला, गोड बोलण्याला..? आणि या साऱ्यात दीपकला मनातनं वजाच करून टाकल्यासारखे दूर ठेवले.. इतक्या कशा मोहात आंधळ्या झालो आपण .. आणि का? का? का?.. आणि स्वप्नीलचं, आपले  नाते तरी काय? या नात्याचं भविष्य तरी काय ? ‘

तिच्या मनात विचारांचं वादळ उठले.. शेवटी मोहमयी मन आणि तिचे अंतर्मन यांत  द्वंद्व सुरु झाले आणि त्या एका क्षणात आपण काय करतोय याचं तिला भान आले.

….आणि स्वप्नीलच्या बंगल्याचं गेट उघडण्यासाठी पुढे सरसावलेला तिचा हात थबकला.

— समाप्त —

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली – मो  ८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print