मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 219 ☆ पुस्तक माझा सखा… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ उदेला भाग्यरवी… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ उदेला भाग्यरवी… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

नयनमनोहर रूप साजिरे गाभारी प्रकटले

आनंदाश्रू गालावरती सहजची ओघळले ||

*

सुहास्य मुद्रा कमल लोचनी वत्सल मोहक भाव

हास्य तयाचे वेधुन घेते मनामनाचा ठाव

सगुण शुभंकर रघुरायाचे बालरूप भावले

नयनमनोहर रूप साजिरे गाभारी प्रकटले ||१||

*

रत्नजडित हा मुकुट वाढवी मुखकमळाचे तेज

कानी कुंडल जणू फाकती नवरत्नांचे  ओज

असीम सुंदर लावण्याने रोमांचित जाहले

नयनमनोहर रूप साजिरे गाभारी प्रकटले ||२||

*

दिव्य भूषणे भूषविताती रामचंद्र देखणा

रूप पाहुनी भान हरपते नाम मुखाने म्हणा

पूर्व पुण्य  मम थोर म्हणुनिया दर्शन सुख लाभले

नयनमनोहर रूप साजिरे गाभारी प्रकटले ||३||

*

कोदंडराम रक्षणास घे रामबाण हा करी

आश्वासक ही वत्सल दृष्टी कृपावर्षाव करी

शुभचिन्हांनी मूर्तीभवती प्रभावलय फाकले

नयनमनोहर रूप साजिरे गाभारी प्रकटले ||४||

*

अयोध्यापुरी प्राप्त जाहली गतवैभवास आज

अवघी सृष्टी धारण करते आनंदाचे साज

नगरीमधुनी पौरजनांचे हास्य मधुर गुंजले

नयनमनोहर रूप साजिरे गाभारी प्रकटले ||५||

*

शतकांच्या या प्रतीक्षेतुनी उदेला भाग्यरवी

चराचराच्या आशा फुलल्या वाट गवसली  नवी

कालचक्र हे नवीन फिरले परिवर्तन जाहले

नयनमनोहर रूप साजिरे गाभारी प्रकटले ||६||

*

नयनमनोहर रूप साजिरे गाभारी प्रकटले

आनंदाश्रू गालावरती सहजची ओघळले ||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय सातवा — ज्ञानविज्ञानयोग — (श्लोक २१ ते ३०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय सातवा — ज्ञानविज्ञानयोग — (श्लोक २१ ते ३०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक…

यो यो यां यां तनुं भक्त: श्रद्धयार्चितुमिच्छति ।

तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम् ।।२१।।

*

मनी कामना जोपासुनी पूजितो ज्या देवतेला

त्या देवतेप्रति स्थिर करितो मी त्या भक्ताला ॥२१॥

*

स तया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते ।

लभते च तत: कामान्मयैव विहितान्हि तान् ।।२२।।

*

श्रद्धा बाळगुनी मनात भक्त पूजितो त्या देवतेला

प्राप्त होती माढ्याकडुनी वांच्छित भोग त्या भक्ताला ॥२२॥

*

अन्तवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसाम् ।

देवान्देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि ।।२३।।

*

अल्पमती त्या नरास लाभे फल परि ते नाशवंत

अर्चना करित ते देवतेची ज्या तयास ती होई प्राप्त 

भक्तांनी मम कसेही पुजिले श्रद्धा मनि ठेवुनी

मोक्ष तयांना प्राप्त होतसे मम चरणी येउनी ॥२३॥

*

अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मामबुद्धय: ।

परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम् ।।२४।।

*

मूढ न जाणत अविनाशी माझे परम स्वरूप 

गात्रमनाच्या अतीत मजला मानत व्यक्तिस्वरूप॥२४॥

*

नाहं प्रकाश: सर्वस्य योगमायासमावृत: ।

मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम् ।।२५।।

*

आवृत मी योगमायेने सकलांसाठी अप्रकाशित

अज्ञानी ना जाणत म्हणती मज जननमरण बद्ध ॥२५॥

*

वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन ।

भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन ।।२६।।

*

भूतवर्तमानभविष्यातील सकल भूता मी जाणतो

श्रद्धाभक्तिविरहित कोणीही ना मजला जाणतो ॥२६॥

*

इच्छाद्वेषसमुत्थेन द्वन्द्वमोहेन भारत ।

सर्वभूतानि संमोहं सर्गे यान्ति परंतप ॥२७॥

*

जन्म अर्जुना द्वेषापोटी वासनेच्या कारणे

अज्ञ राहती सकल जीव सुखदुःखादी मोहाने ॥२७॥

*

येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणाम् ।

ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रता: ।।२८।।

*

निष्काम कर्मयोग्याचे होत पापविमोचन

द्वेषासक्ती द्वंद्वमुक्त ते माझेच करित पूजन ॥२८॥

*

जरामरणमोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ।

ते ब्रह्म तद्विदु: कृत्स्नमध्यात्मं कर्म चाखिलम् ।।२९।।

*

जरामरण मुक्तीकरिता येत मला शरण

ब्रह्माध्यात्म्याचे कर्माचे पूर्ण तया ज्ञान ॥२९॥ 

*

साधिभूताधिदैवं मां साधियज्ञं च ये विदु: ।

प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतस: ।।३०।।

*

अधिभूताचा अधिदैवाचा अधियज्ञाचा आत्मरूप मी

प्रयाणकाळी मला जाणती युक्तचित्त तयास प्राप्त मी ॥३०॥

*

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानविज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्याय: ॥७॥

 

ॐ श्रीमद्भगवद्गीताउपनिषद तथा ब्रह्मविद्या योगशास्त्र विषयक श्रीकृष्णार्जुन संवादरूपी आत्मसंयमयोग  नामे निशिकान्त भावानुवादित सप्तमोऽध्याय  संपूर्ण ॥७॥

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ किती देखणी असतात ना नाती ! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ किती देखणी असतात ना नाती ! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

‘लक्ष द्या जरा चिरंजिवाकडे

शिंगं फुटलीयेत त्यांना,’

अशा टोमण्याकडे दुर्लक्ष करणारी

आई

आणि

आपल्या बछड्यानं पहिल्यांदाच ‘आत्या’ म्हटलेलं

ताईला फोनवर ऐकवणारा

भाई

 

गळ्यात हात टाकून

‘मावशी, मी मदत करू तुला?’ विचारणारी

ढमी

आणि

‘मुलीला मांडवात घेऊन या’ चा पुकारा झाल्यावर

डोळे भरून येणारी

मामी

 

कसे लोभस असतात ना?

 

मला मामीच्याच हातचे लाडू आवडतात

असं आईदेखत सांगणारी बिनधास्त

सखू

आणि

माहेरवाशिणीच्या गालावरून हात फिरवत

भरल्या आवाजात ‘येत जा गं घरी’ म्हणणारी

काकू

 

सगळी गुपितं विश्वासानं शेयर करणारी

मैत्रीण

आणि

‘बाकी काही तक्रार नाही हो

पण फार कमी जेवते तुमची मुलगी ‘

असं फोनवर सांगणारी

विहीण

 

किती प्रेमळ असतात ना?

 

वटपौर्णिमेला न चुकता शहाळं आणणारा

नवरा

आणि

‘आमटी फक्कड झालीय गं!

माझ्या आईची आठवण करून दिलीस,’ म्हणणारा

सासरा

 

ऑफिसातून परतल्यावर ‘बस घटकाभर’ म्हणत

वाफाळता चहा पाजणारी

शेजारीण

आणि

चेहरा पाहून नवरोजींचा मूड ओळखणारी

सोबतीण

 

कसे गोड वाटतात ना?

 

मुलांत मूल होऊन क्रिकेट खेळणारे

बाबा

आणि

सुनेच्या सकाळच्या गडबडीच्या वेळी

नातीला फिरवून आणणारे

आबा

 

‘काय मग फेसबुक?’ विचारून चिडवणारा

पण चांगल्या पोस्टला लाईक देणारा

मेहुणा

आणि

घरच्यासारखे राहून

सुखदुःखात सोबत करणारा

पाहुणा

 

इकडे तिकडे पळत हैराण करणाऱ्या नातवाला

गरमागरम वरण भात मायेने भरवणारी

आजी

आणि

मंत्रोच्चार करत करत सुरेख रांगोळी रेखाटणारे

गुरूजी

 

किती स्मार्ट दिसतात ना?

पांढराशुभ्र युनिफाॅर्म घालून

हाॅस्पिटलमध्ये धावपळ करणारी

सिस्टर

आणि आश्वासक हसत

आपल्या पेशंटचा शब्द न शब्द ऐकणारा

डाॅक्टर

 

ऑफिसात उशिरापर्यंत काम करताना

अचानक घड्याळाकडे लक्ष जाताच,

‘इसे कल निपटाते है, its too late! you want vehicle?’ विचारणारा बॉस…

 

आणि

किती सुखाचा, आनंदाचा असतो ना या सगळ्यांबरोबर होणारा आपला प्रवास…!!!

        

मित्रांनो हसत  जगा व नाती जपा आयुष्य खूप सुंदर आहे.

 

कवी :अज्ञात

प्रस्तुती : सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ 🥭 आ म्र  पु रा ण ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

☆ 🥭 आ म्र     पु रा ण ! 🥭 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

होता आगमन वसंताचे 

कानी येई कोकीळ गान,

सुवास दरवळे आसमंती

मंद मंद मोहराचा छान !

*

दिसता हिरवीगार कैरी

करे रसना पहा बंड,

चव चाखता आंबट गोड

आत्मा होतसे थंड !

*

पालट होण्या चवीचा

अढीत पडावे लागे तिला,

रंग रूप बदलता तिचे

गोडवा आला समजून चाला !

*

होई गणना मग तिची

सर्व फळांच्या राजात,

चव लाभे सर्वांना स्वर्गीय  

आंबा पडता मुखात !

आंबा पडता मुखात !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “चढ आणि उतार…” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ ☆

सौ विजया कैलास हिरेमठ

? कवितेचा उत्सव ?

☆ “चढ आणि  उतार…” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ 

सगळेच दिवस

कसे असतील एकसारखे

येतच राहणार

चढ उतार अडथळे….

 

अडथळे येतात

मार्ग बदलायला लावतात

वेगळे वळण देऊन

हिंमतीने जगायला शिकवतात….

 

चढ आणि उतार

जीवनाचा आधार

संयम बाळगावा

हाच त्यांचा प्रचार….

 

अडथळे म्हणजे

फक्त संकट नव्हे

कदाचित इथूनच

सुरू होते जगणे नवे……

 

चढताना थकलो तरीही

पोहचण्याचा हुरूप असतो

उतारावर मात्र घाबरून जातो

इथे गतीला नियंत्रित करावच लागतं…

 

संकटे येतात निघून जातात

खूप काही शिकवतात

कोण आपलं कोण परकं

आपलं ही आपलेपण इथे कळतं…

 

सुप्त गुण काही

आपले आपल्याला भेटतात

संकटे डिवचतात म्हणून

मार्ग नवे सापडतात ….

 

सरळ एकमार्गी आयुष्य

वाटत असतं बरं

संकटांशिवाय कळतं नाही

आपल्यातील बळ खरं….

💞शब्दकळी विजया💞

©  सौ विजया कैलास हिरेमठ

पत्ता – संवादिनी ,सांगली

मोबा. – 95117 62351

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “माझे माझेचे गाठोडे…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ माझे माझेचे गाठोडे… – कवी :अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

माझे   माझेचे   गाठोडे    

 तुझ्या  चरणाशी  वाहिले

 तुझे    तुझे    म्हणताना 

 किती मोकळी  मी  झाले

*

 माझे   माझे  गणगोत

चिंता    सर्वांची   वाहिली

तुझे   तुझे    म्हणताना

 गुंतागुंत   ती   सुटली  

*

 माझा   माझा  रे   संसार

 करिता   आयुष्य हे  गेले

 तुझे     तुझे     म्हणताना

 मुक्त    मनोमनी    झाले.

*

  माझी  माझी    मुलेबाळे

  मोह    सुटता      सुटेना

  तुझे     तुझे      म्हणताना

  चिंता    काहीच    वाटेना

*

  माझे   माझे   हे    वैभव

  हाच    ध्यास    जीवनात

  तुझे    तुझे      म्हणताना

  मन     झाले   हे  निवांत 

*

  माझे   माझे   हे   चातुर्य

  करी    सदा   रे    विवाद

  तुझे    तुझे      म्हणताना

  ऐकू    येई      अंतर्नाद   

*

  माझे   माझे    म्हणताना

  मोह   माया  ताप   जाळी

  तुझे    तुझे      म्हणताना

  लागे   ब्रह्मानंदी     टाळी

*

  माझे   माझे    मीपण

  तुझ्या    चरणी    वाहिले

   तुझे  तुझे    म्हणताना

   तुझ्यातच     विलोपले 

कवी :अज्ञात

संग्राहक  : श्री कमलाकर नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ एक हरीण… – चित्र एक काव्ये दोन ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?️?  चित्रकाव्य  ?️?

? एक हरीण… – चित्र एक काव्ये दोन ?  सुश्री वर्षा बालगोपाल 

( १ ) 

एका रानात होता हरीण कळप सुरेख

होते लंगडे बिचारे पिल्लू तयात एक

*

सारे पळूनी जाती दिसता समोर शिकारी 

लपवुनी स्वतःला ते शोधते कपारी 

वाचे हरेक वेळी हा दैव योग एक 

होते लंगडे बिचारे पिल्लू तयात एक

*

सदा भेदरे राही , पळता येईल का नाही 

मदतीची वेळ येता , जो तो हो पळ काढी 

टर उडवून त्याची खोड्या काढती कैक 

होते लंगडे बिचारे पिल्लू तयात एक

*

एके दिनी परंतु नवल मोठेच घडले 

अरुणाच्या हस्त स्पर्षे लंगडेपण निमाले 

पाण्यात पाहताना प्रतिबिंब आपले नेक 

त्याचेच त्या कळले, तो सुवर्णमृग एक

*

पिलाची चिंता वाढली अरुणास ते म्हणाले

मज “मारीच” समजून मारतील लोक इथले

नको ही सुवर्णकाया असुदे पाय बारीक

होते लंगडे बिचारे पिल्लू तयात एक

कवयित्री : वर्षा बालगोपाल 

( २ ) 

जीव धरूनी मुठीत बिचारे धावत होते हरीण

हरीनं पण कृपा केली ठरवून याला मी तारीन

तारी न जो कोणी त्याला शासन ही करीन

करी न जो आदेश पालन तो दंड पात्र ठरवीन||

*

सलमान मागे लागला आणि आठवला नारायण

नारायण दिसता गगनी हरीण पाही स्तब्ध होऊन

होऊ न आता चिंतीत सोपवू सारे मित्रावर

मित्रा वर देतो अभयाचा हत्यारोप सलमानवर ||

*

कवच लाभले वाटे हस्त पाहुनी डोईवर

डोई वर करुनी दान घेतले शिंग अंजलीभर

भर सकाळी साक्षी याचे झाले मोठे तरुवर

तरु वरही कृपादृष्टी दिनेशाची प्रतिबिंब दावी सरोवर ।।

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 227 ☆ तीर्थक्षेत्र ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 227 ?

☆ तीर्थक्षेत्र ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

दूरच्या प्रदेशात…

रणरणत्या उन्हात,

लोक निघाले होते ईश्वराच्या दर्शनास!

उंच डोंगरावर वसलेला—

तो श्रीमंत देव व्यंकटेश बालाजी !

जायचं ठरवलं होतं मी ही,

कधीतरी,

आणि “बुलावा” ही आला ,

आपल्या ईश्वर निष्ठा ,

किती प्रबळ,

त्याच देतात बळ,

त्या अलौकिक ईश्वराला,

क्षणभर पाहण्यासाठी,

तासनतास रांगेत तिष्ठत!

कुठली ओढ असते,

त्या कृष्णवर्णी मूर्तीची –‐

 

कुणीतरी विचारतं,

“आंटी पानी चाहिए?”

आणि जाणवतं,

कंठशोष झाल्याचं!

हवं असताना पाणी देणारा,

तोच असावा , माणसामाणसातील!

दर्शनाच्या रांगेतली धक्काबुक्की,

कळत नसलेल्या भाषेतली,

बाचाबाची!

ही सारी शर्यत पार करत,

क्षणभरच दिसतो,

लखलखीत तेजोमय,

तो ईश्वर!

आणि खरोखरच वाटते,

भरून पावल्या सारखे !

कृतार्थ…..

कानात गुंजतय अजूनही….

गोविंदा….. गोविंदा..

व्यंकट रमणा गोविंदा !

या देवभूमीतच, समजतात माणसं,

चांगली वाईट,

म्हणूनच ही तीर्थक्षेत्रं,

बनवतात अधिकाधिक प्रगल्भ !

कोणीच येत नाही रिकामा,

प्रत्येकाची झोळी भरलेलीच,

ज्याच्या त्याच्या कर्मानुसार,

गोविंदा गोविंदा !

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ निसटलेली वाळू… ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी ☆

सौ.अश्विनी कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

निसटलेली वाळू… ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी

दिवसभर तापलेल्या वाळूला

संध्याकाळी आवेशात येणाऱ्या,

समुद्राच्या सहस्त्र लाटांच्या बाहुत,

सामावून जायचं असत….

 

तो येतो,

घेतो तिला आपल्या बळकट बाहुंनी,

घट्ट  कवेत…कितीतरी वेळ

शांत करतो तिला…

दोघेही निःशब्द असतात

 

त्याचे डोळे लागतात,

परतीच्या वाटेकडे…

त्याला पार पाडायची असतात,

अनेक कर्तव्य…

तेव्हा तिला वाटत,

आपल्याला अस एकट सोडून,

त्याने जाऊ नये…

मग त्या अथांगाच्या नकळत,

त्याला आपल्या कायेवर घेऊन,

ती जाऊ लागते,

खोल खोल त्याच्यासोबत…

त्याला बघत बघत…

 

पण आपल्या पायाखालून,

कधी निसटून जाते वाळू,

कळतच नाही…

© सौ अश्विनी कुलकर्णी

मानसतज्ञ, सांगली  (महाराष्ट्र)

मो – 9421225491 Email – [email protected] 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print