मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘आनंदनिधान’ – श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘आनंदनिधान’ – श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆ 

पुस्तक  – आनंदनिधान

लेखक – श्री.विश्वास देशपांडे. 

प्रकाशक : सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशन. 

पृष्ठ संख्या – १६०

किंमत – २००/

पुस्तकाचे मुखपृष्ठच इतके आकर्षक रंगसंगती व मन प्रसन्न करणारे आहे.निळ्या आकाशात सूर्यमुखी फुले. जणू असे वाटते, पुस्तकरुपी आनंदाकडे आकर्षित होणारे वाचक आहेत. एकूण ३३ लेखांच्या माध्यमातून आनंदाचा वर्षाव केला आहे.

पुस्तक उघडल्यावर प्रथम दिसतात मनोगताचे दोन शब्द…

ते वाचताच जाणवते आतील लेख आपल्याला आनंदा बरोबर खूप काही  देणार आहेत.आणि पुढील लेखांची उत्सुकता अजूनच वाढते.

श्री विश्वास विष्णु देशपांडे

पहिलाच लेख आनंदनिधान …. आपल्या आयुष्यातील आनंदाची ठिकाणे की जी जवळ असतात पण वेळेवर आठवत नाहीत. हे सांगताना सुरुवातीची वाक्येच मनाची पकड घेतात. एखादी खरोखरची सुंदर गोष्ट असते ती कायम स्वरूपी आनंद देणारी असते. त्या गोष्टीजवळ कधीही गेले तरी ती आनंदच देते.

असाच आनंद देणारी काही ठिकाणे पुढील काही लेखातून भेटायला येतात. त्यात  आनंद व ज्ञान मिळणारी पुस्तके,ग्रंथ,निसर्ग,गाणी,चांगले वक्ते त्यांचे कार्य यांचे महत्व वाचायला मिळते. 

काही लेख वैचारिक मंथनातून उतरलेले व आपल्याला विचार करायला लावणारे आहेत हे जाणवते. जसे धन्यवाद हो धन्यवाद यात धन्यवादाचे महत्व आपल्याला विचार करायला लावते. परतफेड मध्ये अपेक्षा ठेवल्यावर काय होते हे सांगितले आहे. पण शेवट एकदम उत्तम व सर्वांनी अंमलात आणावे असे सोपे तत्व सांगून होतो. मी प्रतिज्ञा करतो की…  असे म्हणताना प्रतिज्ञा व तिचे महत्व खरेच आपल्या गळी उतरते. साखळी मानव्याची कल्पक शिक्षक चांगली क्रांती कशी घडवू शकतो याचा पाठच घालून दिला आहे. भिंत बांधताना मनाच्या भिंती दिसतात. तर इकडची स्वारी संबोधन व नाती काळानुसार कशी बदलतात या कडे लक्ष वेधतात.

खाणाऱ्याने खात जावे म्हणता म्हणता खाणे व गाणे यांची छान संगती चाखायला मिळते.व शेवटच्या ओळी अगदी लक्षात राहतात…

“बनवणाऱ्याने बनवत जावे

खाणाऱ्याने खात जावे

खाता खाता एक दिवस

बनवणाऱ्याचे हात घ्यावे.”

जुने जाऊ द्या मरणा लागुनी म्हणत ध्यानाचे फार उत्तम तत्व विषद केले आहे. मुखवटे वास्तवाचे भान देतात. तर काही खुसखुशीत लेख खूपच हसू फुलवतात. असं आहे अशा माणसांच्या हसू आणणाऱ्या क्वचित इतरांना नकोशा वाटणाऱ्या सवयी सुहास्य तुझे मनास मोही म्हणत हसण्याचे फायदे सांगत दिल है छोटासा व  राम का गुणगान करिए पण म्हणतात. आणि  छोट्या विश्वासच्या शाळेची सफर घडवून आणतात. त्यातच लक्षात येते वाचन लेखनाचे बीज कोठे व कसे रोवले गेले. हा प्रवास कृतज्ञता मधून याची देही याची डोळा अनुभवलेला अपघात दाखवतो  आणि  बुद्ध लेण्यातून बुद्ध दर्शनही घडवतो. आपण सर्व जण अजिंठ्याची लेणी बघतो. बरेचदा शाळेच्या सहली बरोबर! पण हा लेख वाचून जर लेणी बघितली तर खऱ्या अर्थाने लेणी समजतात. जशी सुरुवात आनंद निधान ने होते तसेच शेवट म्हणणे योग्य नाही. पण या पुस्तकातील शेवटचा लेख आनंदाची गुढी उभारून नवीन पुस्तकाची सुरुवात करून देतो आणि वाचकांना आनंदी आनंद देऊन जातो.

एकंदरीत सर्वार्थाने भिन्न भावना व विचार एकत्र एकाच पुस्तकात अनुभवू शकतो.यात सर्व लेखात आपल्याला दिसते ती कोणत्याही वयोगटाला समजणारी सहज सुलभ भाषा, सर्वत्र  सकारात्मकता.  त्यातून हलक्या कानपिचक्याही मिळतात. आणि आपल्याला लिखाणासाठी नवीन विषय मिळतात.

लेखात योग्य ठिकाणी गाणी,श्लोक,काव्य याचाही समर्पक वापर दिसतो.

एकंदर आनंद ते आनंद असा आपला छान आनंदी प्रवास वेगवेगळ्या भावना अनुभवून होतो. आणि  आनंदनिधानाशी आपली गाठ लेखक घालून देतात.

अशा आनंदी अनुभवासाठी खूप खूप धन्यवाद व पुढील पुस्तकाची प्रतीक्षा.

(पुस्तकासाठी पुढील नंबरवर संपर्क साधावा… श्री.विश्वास देशपांडे….. ९३७३७११७१८ ) 

पुस्तक परीक्षण – सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ☆ “मुक्तायन (कविता व रसग्रहण)” – कवी : डॉ. निशिकांत श्रोत्री – लेखिका : सौ. ज्योत्स्ना तानवडे ☆ परिचय – सुश्री सौ राधिका भांडारकर ☆ ☆

सौ राधिका भांडारकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “मुक्तायन (कविता व रसग्रहण)” – कवी : डॉ. निशिकांत श्रोत्री – लेखिका : सौ. ज्योत्स्ना तानवडे ☆ परिचय – सुश्री सौ राधिका भांडारकर ☆ 

पुस्तक : मुक्तायन (कविता व रसग्रहण)

कवी : डॉ. निशिकांत श्रोत्री

लेखिका : सौ. ज्योत्स्ना तानवडे

प्रकाशक : शॉपीझेन

प्रकाशन तारीख : ०४/०४/२०२४

किंमत : रु १८४. 

पृष्ठे : १२५

एक आगळे वेगळे पुस्तक नुकतेच वाचनात आले. पुस्तकाचे शीर्षक आहे मुक्तायन या पुस्तकाद्वारे कविता आणि कवितांचे केलेले रसग्रहण वाचकांना वाचायला मिळते. मुक्तायन या पुस्तकात सुप्रसिद्ध कवी डॉ. निशिकांत श्रोत्री यांच्या १५ कविता आहेत आणि या पंधराही कवितांचं, सिद्धहस्त कवयित्री ज्योत्स्ना तानवडे यांनी उत्कृष्ट पद्धतीने रसग्रहण केलेले आहे. हा एक दुग्ध शर्करा योगच आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण डॉ. निशिकांत श्रोत्री यांचे काव्य आणि काव्याचा रसास्वाद घेणाऱ्या जाणकार रसिक ज्योत्स्नाताई तानवडे.

डॉ. निशिकांत श्रोत्री

पुस्तक अतिशय वाचनीय आहे. मुळात रसग्रहण हा एक व्याकरणप्रणित असा साहित्याचा अत्यंत महत्त्वाचा प्रकार आहे. तसेच कवी आणि वाचक या मधला एक दुवा आहे. रसग्रहणामुळे काव्याचे अंतरंग उलगडले जाते. शब्दा शब्दांचे अर्थ, त्यातले काव्यात्मक पदर आणि सौंदर्य स्थळे यांची उकल केली जाते त्यामुळे अर्थातच काव्य वाचताना वाचकाला एक दिशा मिळते. जे कळले नाही असे वाटते त्यापाशी तो अगदी सहजपणे जाऊन पोहोचतो. एखाद्या बंद पेटीतला अलंकार उघडून दाखवावा आणि तो पाहताच नेत्रांचे पारणे फिटावे तसेच रसग्रहणाने काव्याच्या बाबतीत जाणवते आणि मुक्तायन वाचताना नेमका हाच अनुभव येतो.

सौ. ज्योत्स्नाताई तानवडे

यातल्या १५ही  कविता मुक्तछंदातल्या आहेत आणि विशेष म्हणजे त्या अप्रकाशित आहेत. यात वेगवेगळ्या विषयांवर अतिशय मार्मिकपणे भाष्य केलेले आहे. ते कधी हळुवार असेल, कधी थेट, सडेतोड असेल, कधी उद्विग्नतेत केलेले असेल, उपहासात्मक असेल, राग, दुःख ,चीड, विद्रोहातून केलेले असेल पण प्रत्येक वेळी वाचकाच्या मनाला भिडणारेच आहे. आणि या सर्व रसमयतेची  नस ज्योत्स्नाताईंनी रसग्रहण करताना अचूक पकडली आहे. त्यामुळे कधी कधी वाचकाला प्रत्यक्षाहूनी प्रतिमा उत्कट असाही अनुभव येतो.

या संग्रहातील पहिलीच कविता…. ‘ मला माफ करशील का?’

यात कवीचं अत्यंत संवेदनशील आणि प्रामाणिक मन दिसतं

सुखदुःखाच्या सारीपटावर आणि यशापयाशाच्या हिंदोळ्यावर 

आयुष्याच्या प्रत्येक सोप्या अवघड वळणावर 

सदैव मला साथ देणाऱ्या प्रिय कविते 

पुन्हा माझे बोट धरशील का ?

कवीचं शल्यग्रस्त, गहिवरलेलं मन शब्दांतून जाणवतं आणि ज्योत्स्नाताईंच्या  रसग्रहण शैलीतून कवीच्या  मनातला संवाद वाचकाला जणूं ऐकू येतो. 

कवींच्या या ओळीवर त्या म्हणतात,” कवितेचे मन खूप मोठे आहे त्यामुळेच ती आपल्या हाकेला साद देईल याची कवीला खात्री आहे.”

मुक्तायन मधल्या प्रत्येक कवितेच्या गाभ्यापर्यंत वाचकाला पोहोचवण्याचे अत्यंत कौशल्याचे काम ज्योत्स्नाताईंनी त्यांच्या प्रवाही रसग्रहणातून सक्षमपणे  केलेले आहे. 

अब्रु ही कविता मनाला घोर चटका लावून जाते.

यात जगाला डिपार्टमेंटल स्टोअरची उपमा दिली आहे आणि यात एक अत्याचारीत  स्त्री केविलवाणे पणाने आक्रोश करत आहे. ती शेवटच्या चरणात विचारते,

“तुमच्या या स्टोर मध्ये अब्रू  विकत मिळेल का?

पाषाणालाही पाझर फुटावा असाच हा प्रश्न आणि या कवितेतलं जबरदस्त रूपक ज्योत्स्नाताईंंनी  अतिशय सुंदरपणे उलगडून दाखवले आहे.

अडगळीची खोली ही एक अशीच रूपकात्मक कविता.

सैरभैर झालेल्या मनाची अवस्था वर्णन करणारी.

आयुष्यभर साठवलेल्या मायेच्या वासनांच्या आणि दुस्वासाच्या 

षड्रिपूंच्या बंधनात कसं शोधू मी कसं शोधू

सांगेल का कोणी मला?

हा काव्यातला प्रश्न जीवनातला एक सखोल आणि गंभीर अर्थ घेऊनच अवतरतो.

अडगळीची खोली आणि मन यातले रुपकात्मक साद्धर्म्य रसग्रहणातून सुरेख मांडले आहे,

वात्सल्याने माखलेलं आईचं मन आणि तिने आपल्या बाळासाठी गायलेली अंगाई

एक तरल हळुवार अनुभव देते.

कलंदर या काव्यातल्या  स्वतःच्या मस्तीत जगणाऱ्या व्यक्तीला आयुष्याच्या शेवटी सत्य जाणवते आणि तो म्हणतो,

तोंडात ना श्रीखंड ना बासुंदी ना भेळ नुसताच चमचा चघळतोय सोन्याचा ..

या काव्यातला भोगवाद आणि सौख्य यातला विरोधाभास ज्योत्स्नाताईंनी त्यांच्या काव्यसग्रहणातून नेमकेपणाने  मांडला आहे.

अजून मी आहे, 

संधी प्रकाश 

फिनिक्स 

नजर 

गुंता 

कृतघ्न 

टाकीचे घाव 

मन कसं सुखावून गेलं अशा एकाहून एक वेगवेगळ्या वळणांच्या, भावनांच्या, विषयांच्या अप्रतिम काव्यरचना! अगदी राजकपूरसारख्या अभिनेत्यावरही केलेलं सुरेख काव्य मुक्तायन मध्ये वाचायला मिळतं.

संसाराच्या रंगपटावर ही शेवटची कविता.

ही कविता वाचताना मला, जग ही एक रंगभूमी असे म्हणणाऱ्या शेक्सपियरचीच आठवण झाली. या कवितेतले अध्यात्मिक तत्व, भाव कवीने अगदी सहजपणे आणि परिणामकारक शब्दातून जाणवून दिला आहे.

कशास आलो काय कराया

देहामध्ये विसरून जाई

संवादाची ओळख नाही 

किती काळचा नवा प्रवेश 

संसाराच्या रंगपटावर

घेऊन येई नाना वेश 

या संपूर्ण काव्यातलं मर्म ज्योत्स्नाताईंनी अत्यंत समर्थपणे  उलगडलेलं आहे. काव्य आणि रसग्रहण दोन्ही अप्रतिम. तोलामोलाच.

मुक्तायन या रसग्रहणात्मक काव्यसंग्रहाचे वाचन करताना एक लक्षात येते की यातून फक्त काव्याचा आनंद मिळतो असे नाही तर काव्याच्या आत्म्यापर्यंत वाचक खेचला जातो. प्रत्येक काव्यातली रूपके, अलंकार, प्रास विषय, विचार!काव्यकारणे याचाही एक शास्त्रशुद्ध अभ्यास केला जातो,  नुसतच वाचलं, काही काळ रेंगाळलं आणि विरून गेलं असं न होता रसग्रहणामुळे काव्य, मनात एक पक्की आकृती बांधून ठेवतं. ज्यातून ज्ञानार्जनाचा आनंद मिळतो आणि तो दीर्घकाळ राहतो.

असे रसग्रहणात्मक काव्यसंग्रह अधिकाधिक प्रमाणात प्रसिद्ध व्हावेत.ज्यायोगे काव्यप्रेमींचा शास्त्रशुद्ध काव्याभास होऊ शकतो. या कारणासाठी मी मुक्तायनचे प्रकाशक शॉपीझेन यांचे मन:पूर्वक अभिनंदन करते. आभारही मानते.

डॉ. निशिकांत श्रोत्री आणि सौ ज्योत्स्ना तानवडे यांनी संयुक्तरित्या केलेल्या या महान, स्तुत्य उपक्रमाला माझा मनापासून मानाचा मुजरा !

मुक्तायन वाचल्यानंतर वाचक नक्कीच त्यांच्या ऋणातच राहतील.

या पुस्तकाचे मुखपृष्ठ ही खूप बोलके आहे. आकड्यांची सरस्वती, वर्णमालेतील विखुरलेली अक्षरे आणि प्राजक्त फुलांचा सडा…. सरस्वती ही विद्येची देवता. तिच्या आशीर्वादाने गुंफता आलेली ही अनमोल सुगंधी शब्द फुले !  सारेच कसे छान आणि छानच…

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७ मो. ९४२१५२३६६९ [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ पुस्तक “मेंदूतला माणूस” – लेखक : डॉ. आनंद जोशी / सुबोध जावडेकर ☆ परिचय – श्री ओंकार कुंभार ☆

☆ पुस्तक “मेंदूतला माणूस” – लेखक : डॉ. आनंद जोशी / सुबोध जावडेकर ☆ परिचय – श्री ओंकार कुंभार ☆ 

लेखक : डॉ. आनंद जोशी / सुबोध जावडेकर

प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे. 

पृष्ठे : 232

किंमत : रु. 300/-

लेखकद्वयांपैकी एक डॉक्टर तर एक आय.आय.टी. इंजिनिअर. दोघांचेही लिखाण पूर्वी विविध माध्यमांतून छापून आलेले आहे. 

शिर्षकापासूनच वेगळेपणा असणारे हे पुस्तक कमल शेडगे यांनी केलेल्या मुखपृष्ठ रचनेमुळे नक्कीच मन वेधून घेणारे आहे. एकूण 29 प्रकरणांमधून माणसाच्या मेंदूचा आणि मेंदूतल्या माणसाचा वेध घेण्याचा छान प्रयत्न लेखकद्वयांनी केला आहे. 

लेखकद्वयांनी अनेक पुस्तकांतील संदर्भ, उदाहरणे दिली आहेत. त्यामुळे त्यांचे वाचन चौफेर असल्याचे आपल्याला पुस्तक वाचत असताना वेळोवेळी लक्षात आल्यावाचून राहत नाही. विषय जरी किचकट असला तरी विविध उदाहरणांच्या माध्यमातून तो सहज आणि सोपा केला आहे. मेंदूची रचना, मेंदूचे कार्य, मेंदूची उत्क्रांती, मेंदूत स्रवणारी रसायने, त्यांचा वर्तनाशी असणारा संबंध, पिढीजात आपल्यासोबत आलेल्या जीन्सचा परिणाम,  यांविषयी विविध प्रकारच्या जगभरात झालेल्या प्रयोगांविषयी, अभ्यासाविषयी खूप छान इंटरेस्टिंग माहिती या पुस्तकात आपणाला वाचायला मिळते. पुस्तक वाचून पूर्ण झाल्यावर एक सुंदर अर्थपूर्ण पुस्तक वाचल्याचे समाधान नक्कीच मिळते.

हे पुस्तक वाचल्यानंतर लेखकद्वयांनी पुस्तकात म्हंटल्याप्रमाणे मेंदूच्या अभ्यासातून आपल्याला एक अंतर्दृष्टी मिळेल…..  दुसऱ्यातला माणूस पहायची दृष्टी. -आणि आपल्यातला माणूसही !

धन्यवाद!

परिचय –  श्री ओंकार कुंभार

श्रीशैल्य पार्क, हरिपूर सांगली.

मो.नं. 9921108879

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ टेक ऑफ (कथा संग्रह) – लेखक : श्री सुरेश पंडित ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ टेक ऑफ (कथा संग्रह) – लेखक : श्री सुरेश पंडित ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

पुस्तक : टेक ऑफ (कथा संग्रह)

लेखक : श्री सुरेश पंडित

पाने : १२६

प्रकाशक : कोमल प्रकाशन, नालासोपारा, पालघर

मूल्य : २१० रुपये.

श्री सुरेश पंडित

नमस्कार वाचकांनो,

मान्यवर साहित्यिक श्री सुरेश पंडित यांनी लिहिलेला ‘टेक ऑफ’ हा कथासंग्रह नुकताच वाचला. पहिल्याच (‘टेक ऑफ’ याच नावाच्या) कथेत इतकी दंग झाले की एकाच बैठकीत संपूर्ण सप्त कथारंगात रंगून गेले. या पुस्तकात विविध कथाबीजांनी सजलेल्या सात कथा आहेत. कुठे आधुनिक पार्श्वभूमी तर कुठे गावाकडील वातावरण. मात्र एक गोष्ट सर्व कथांमध्ये आढळते, ती म्हणजे मानवी मनाच्या भावभावनांचे झुलते हिंदोळे. लेखकाची साधी सोपी सरळ भाषा लगेच आपल्या मनाचा वेध घेते. घरगुती वातावरणातील अस्सल रिअल लाईफ संवाद असो की टेक्नॉलॉजीच्या अनुषंगाने तसे टेक्निकल संवाद असो, लेखकाची सुलभ अर्थवाही शब्दसंपत्ती मोहून टाकते. म्हणूनच या सर्व कथांमधील लेखकाने रेखाटलेली विविध पात्रे आपल्या घराच्या अवती भवती वावरणारी असावीत असा भास होतो. मग ती गरीब, अशिक्षित, ग्रामीण अथवा जुन्या संस्कारात वाढलेली असोत की उच्चभ्रू परिवारातील सुशिक्षित, आधुनिक अथवा शहरी भागातील असोत, त्यांचे अचूक व्यक्तिचित्रण ठसठशीतपणे वाचकांच्या मनावर आपला प्रभाव उमटवते. या संपूर्ण कथासंग्रहात मला भावलेली ही सर्वोत्तम गोष्ट आहे. शब्दबंबाळ आणि संख्याबळाने विपुल अशा पात्रांचे भावनिक जंजाळ देखील या कथांमध्ये नाही. मोजक्याच पात्रांची निवड, त्यांची सामान्यतः प्रचलित नांवे, कुठे तर आई-मुलगा तर कुठे प्रियकर- प्रेमिका तर कुठे मुलगी आणि आईवडील अथवा सासूसासरे तर कुठे पती-पत्नी या आपल्या परिचित नात्यांचीच गुंफण घालून त्यांत सुगम संवाद आणि उत्कंठावर्धक ओघवती कथा असे सर्वच कथांचे सुंदर रूप या पुस्तकात मला आढळले.

त्यांच्या या सात कथांचा थोडक्यात आढावा घेते. पहिलीच कथा ‘टेक ऑफ’ या अनवट शीर्षकाची! पुस्तकाचे मनोहर रंगांनी सजलेले चित्तवेधक मुखपृष्ठ याच कथेला पोषक असे आहे. एखाद्या सुंदर चित्रपटाची कथा जशी उमलत जाते, तद्वतच नायक नायिकेच्या प्रेमाचे विमान अनेकानेक कौटुंबिक आणि सामाजिक अडथळ्यांची मालिका पार करून ‘टेक ऑफ’ करीत त्यांच्या वैवाहिक जीवनाच्या अनंत आकाशात झेप घेते. दुसरी कथा आहे ‘रंगबावरी’. या संपूर्ण कथेत लेखकाने शुभ्र धवल आणि इतर कॉन्ट्रास्ट रंगांशी मानवी भ्रामक प्रतिष्ठा आणि अवास्तव कल्पनेचा मेळ साधत जणू सुंदर कॅनवासच रंगवला आहे. या रंगांच्या खेळात देखील एक अनुकरणीय सामाजिक संदेश आहे. त्यानेच कथेचा उत्कंठावर्धक शेवट होतो. ‘आई’ ह्या तिसऱ्या कथेत आई अन मुलाचे रेशमी नाते विणण्यात आले आहे. आईच्या अथक प्रयत्नांनंतरही तिच्यातील आणि मुलातील भावनिक दरी रुंदावतच जाते. या कथेतील पात्रे समाजातच कुठेतरी आपल्या जवळपास वावरत आहेत इतकी जिवंतपणे लेखकाने साकारली आहेत. या सर्वांगसुंदर कथेत मातेच्या वात्सल्यपूर्ण भावनांचा कल्लोळ वाचकांच्या अनुभवास येईल हे नक्की. ‘दैव जाणिले कुणी’ या चौथ्या कथेविषयी इतकेच सांगेन की, वळणावळणावर धक्का तंत्र वापरून वाचकांना कसे खिळवून ठेवावे हे लेखकाला अतिशय चांगले जमते. शेवटपर्यंत उत्सुकता ताणून धरत एखाद्या थ्रिलर चित्रपटाला शोभेल असा या कथेचा अंत आहे. आपण ती मुळापासूनच वाचा ना!

‘सापळा’ ही बुवाबाजी विरुद्ध संघर्षाची कथा उद्बोधक समाजप्रबोधन करणारी अशीच आहे. ही कथा अतिशय प्रासंगिक आहे. ‘पेराल तसे उगवेल’ ही देखील संदेशवाहक कथा आहे. दुसऱ्यासाठी खणलेला खड्डा आपल्यालाच त्यात कसा ओढून घेतो हे सांगणारी ही कथा मनाला सुन्न करते. समाजातील खलप्रवृत्तीचे प्रतिबिंब या कथेत आहे. खेदाची बाब अशी की, हे कथाबीज ते आपल्याला अजिबात अपरिचित नाही. लेखकाची कमाल यातच आहे की, या प्रवृत्तीचे रेखाटन करतांना त्यांनी अतिशयोक्ती केलेली नाही. आजच्या समाजाच्या दुष्ट प्रवृत्तीच्या अंगाचे हे दाहक चित्रण आहे. प्रथितयश लेखकाच्या ‘अभिमानगीताची’ सुरावट ऐकू येते या पुस्तकातील शेवटच्या ‘पराभूत’ या कथेत! आपण जणू ‘अगणित कथा प्रसवणारी अन वांझपणाचा कुठलाच शाप नसलेली सदा हरित बहुप्रसवा वसुंधरा’ आहोत, या वांझोट्या कल्पनेची भरारी कधी तरी थांबते! लेखकाच्या ‘पेनातील शाई’ कधी तरी वाळते, हे निखळ सत्य या कथेत मांडलेले आहे. कधी तरी प्रत्येक साहित्यिकाला हा अनुभव येतो हे नक्की!

आता लेखकाविषयी थोडेसे. मला वडील बंधू सदृश असलेले आदरणीय सुरेश पंडित वयाची पंच्याहत्तरी पार केलेले पालघरचे भूमिपुत्र! त्यांच्या ग्रंथ संपदेतील दोन कथासंग्रह (अद्वैत आणि निर्णय) तसेच अगतिक नावाचा कवितासंग्रह प्रकाशित झालेले आहे. नुकतेच कोकण मराठी साहित्यपरिषदेच्या पालघर शाखेद्वारे आयोजित पालघर जिल्ह्यातील केळवे येथे साहित्यसंमेलन संपन्न झाले. त्यात सुरेशजींचा हा ‘टेक ऑफ’ नावाचा कथासंग्रह प्रकाशित झाला. या पुस्तकाला प्रथितयश साहित्यिक, चाळीसगावच्या आ. बं. हायस्कूलचे माजी प्राचार्य आणि रेडिओ विश्वासवर प्रक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांचे सादरकर्ते श्री विश्वास देशपांडे यांची विस्तृत, सखोल आणि सुरेख प्रस्तावना लाभलेली आहे. या पुस्तकाच्या मलपृष्ठावरील मजकूर अस्मादिकांनी आपल्या अल्प बुद्धीनुसार लिहिला आहे. ही अमूल्य संधी दिल्याबद्दल मी सुरेशजींचे मनःपूर्वक आभार मानते.

कथालेखन आणि कविता लेखन या दोन्ही प्रांतात त्यांची मुशाफिरी सहजतेने दिसून येते. सुरेशजी कविमनाचे असल्यामुळे पात्रांचे भावविभ्रम ते कुशलतेने आणि नजाकतीने सादर करतात असे मला वाटते. या सोबतच त्यांचे अनेक नियतकालिकांसाठी (यात दिवाळी अंक आलेच)  कथा आणि कविता लेखन सुरूच असते. सध्या ते त्यांच्या आगामी कथा संग्रहाचे लेखन करण्यात व्यस्त असल्याचे कळते.

सुरेशजींच्या दीर्घ साहित्यिक व्यासंगाचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यात  उमटलेले दिसते. त्यांचा हा नवा कोरा कथासंग्रह त्याच्या ‘टेक ऑफ’ या शीर्षकाला अनुसरून वाचकांच्या मनांत हळुवारपणे आणि साफल्यपूर्वक ‘स्मूद लँडिंग’ करेल यात मला कुठलीच शंका नाही. त्यांचे रसिकांशी आधीच ‘अद्वैत’ असे नाते आहे, या ‘टेक ऑफ’ चे सप्त कथांचे सप्तसूर रसिकांच्या हृदयाचा हमखास ठाव घेतील. या निर्मल मनाच्या निर्मोही शारदापुत्राला पुढील साहित्यसेवेसाठी अनेक शुभेच्छा !

(पुस्तकाच्या प्रतीसाठी कृपया लेखक श्री सुरेश पंडित यांच्याशी ९९६९३७३००१ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.)

कथासंग्रहाचे लेखक : श्री. सुरेश पंडित

परिचय : डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “अंतराळवेध” – लेखक : श्री राजीव पुजारी  ☆ परिचय – सौ. सुनीता पुजारी ☆

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “अंतराळवेध” – लेखक : श्री राजीव पुजारी  ☆ परिचय – सौ. सुनीता पुजारी ☆

लेखक – राजीव गजानन पुजारी

प्रकाशक – क्राऊन पब्लिशिंग, अहमदाबाद

पृष्ठ संख्या – २८८

किंमत – ₹ ३५०/-

मागील आठ दिवसांत श्री राजीव पुजारी लिखित ‘अंतराळवेध’ हे पुस्तक वाचले. खरोखर हे पुस्तक म्हणजे अंतराळ क्षेत्रात रस असणाऱ्यांसाठी मोलाचा खजिनाच आहे. पहिल्यांदा लक्ष वेधून घेते ते मुखपृष्ठ. पुस्तकाच्या नावाला साजेसेच हे मुखपृष्ठ आहे. मुखपृष्ठावर भारताला ललामभूत ठरलेला विक्रम लँडर व प्रज्ञान रोव्हर चांद्रपृष्ठाच्या पार्श्वभूमीवर ठसठशीतपणे उठून दिसतात. वरच्या उजव्या कोपऱ्यात अमेरिकेचा पर्सिव्हिरन्स रोव्हर मंगळभूमीवर कार्यरत दिसतो. वरच्या उजव्या कोपऱ्यात भारताचा मानदंड असणाऱ्या इस्रोचा लोगो दिसतो व दोहोंच्या मध्ये भारतीय अंतराळ क्षेत्राचे जनक डॉ विक्रम साराभाई यांचे छायाचित्र दिसते. पर्सिव्हिरन्सच्या खाली चांद्रयान -३ च्या चंद्रावतरणाचा क्षण अचूक दाखविला असून त्या खाली इस्रोचा प्रक्षेपक अवकाशात झेपवतांना दिसतो. मुखपृष्ठ पाहूनच वाचकांना पुस्तक खरीदण्याचा मोह होतो. मालपृष्ठावर पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती दिली आहे.

पुस्तक एकूण चार विभागात आहे. पहिल्या विभागात नासाची मार्स २०२० मोहीम दहा भागांत विशद करून सांगितली आहे. पहिल्या भागात पर्सिव्हिरन्स रोव्हर विषयी जाणून घेण्याचे सात मुद्दे विस्ताराने सांगितले आहेत. दुसऱ्या भागात प्रथमच दुसऱ्या ग्रहावर स्वायत्त उड्डाण भरणाऱ्या इंजेन्यूटी हेलिकॉप्टर विषयी जाणून घेण्याच्या सहा गोष्टी सांगितल्या आहेत. तिसऱ्या भागात मार्स २०२० मोहिमेविषयी तांत्रिक माहिती सांगितली आहे. चौथ्या भागात मंगळ ग्रहाविषयी व मार्स २०२० यानाच्या प्रक्षेपणाविषयी माहिती दिली आहे. पाचव्या भागात यानाचा मंगळाच्या वातावरणात प्रवेश, अवरोहण व प्रत्यक्ष मंगळावतरण याविषयीची माहिती आहे. सहाव्या भागात यान मंगळावर उतरल्यावर त्याला कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागल्या याविषयीची माहिती आहे. सातव्या भागात रोव्हर व खडकाचे नमुने सठविण्याच्या प्रणालीविषयीची माहिती आहे. आठव्या भागात मंगळाकडे जातानाच्या मार्गक्रमणाचे टप्पे, त्या टप्प्यांवर असणारी वैज्ञानिक उपकरणे व मोहिमेचा उद्देश विशद केला आहे. नवव्या भागात रोव्हरला ऊर्जा पुरविणाऱ्या MMRTG विषयी माहिती आहे तसेच उड्डाणापासून ते अवतरणापर्यंत यान व पृथ्वी यांदरम्यान दूरसंभाषण कसकसे होत होते या विषयीची माहिती आहे. दहाव्या भागात यानावर असणारी प्रायोगिक उपकरणे म्हणजे MOXIE व इंजेन्यूटी हेलिकॉप्टर विषयी माहिती दिली आहे तसेच नमुने गोळा करण्याची प्रणाली व एकंदरीतच यानाच्या जुळणीच्यावेळी घेतलेल्या कम्मालीच्या स्वच्छतेसंबंधी अचंबित करणारी माहिती दिली आहे.

पुस्तकाच्या दुसऱ्या विभागात नासा व इस्रोच्या विविध मोहिमांची माहिती दिली आहे. यात LCRD, IXPE, DART, LUCY, जेम्स वेब अंतरीक्ष दुर्बीण, आर्टिमिस योजना व मंगळ नमुने परत योजना या नासाच्या मोहिमा तसेच SSLV-D1, SSLV-D2, चंद्रयान ३, आदित्य एल 1 या इस्रोच्या मोहिमांविषयी साद्दंत माहिती दिली आहे. तसेच गुरूत्वीय लहरींच्या वैश्विक पार्श्वभूमीच्या शोधाविषयी विस्तृत माहिती आहे. हे वाचून लेखकाच्या अंतराळाविषयीच्या सखोल अभ्यासाची अनुभूती येते.

पुस्तकाच्या तिसऱ्या विभागात दोन अंतराळविज्ञान कथा आहेत. पहिली कथा आहे ‘आर्यनची नौका’. हि कथा मानव भविष्यात मंगळावर करू पाहणाऱ्या वसाहतीसंबंधी आहे. सध्या मंगळ जरी शुष्क दिसत असला तरी एकेकाळी तो सुजलाम् सुफलाम् होता. कालांतराने त्याचे चुंबकीय क्षेत्र व वातावरण नाहीसे झाले. याच्या परिणामस्वरूप तो शुष्क झाला. या कथेत इस्रोने मंगळाचे चुंबकीय क्षेत्र व वातावरण कसे पुनरुज्जीवीत केले, ऑक्सिजनची पातळी कशी वाढवली, ध्रुवांजवळील व घळींमधील गोठलेले पाणी द्रवरूपात आणून मंगळ सुजलाम् सुफलाम् कसा केला व पृथ्वीवरील निवडक माणसांनी इथे वसाहत कशी वसवली याचे वैज्ञानिक शक्यतांच्या अगदी निकट जाणारे कल्पचित्र रंगवले आहे.

दुसरी कथा आहे ‘ भेदिले शून्यमंडळा ‘. या कथेत लेखकाच्या स्वप्नात यंत्रमानव मंगळावर जातात. तेथे उत्खनन केल्यावर त्यांना मंगळावर एके काळी वैज्ञानिक दृष्ट्या अत्यंत पुढारलेली जमात होती असे निदर्शनास येते. उत्खननात त्यांना कांही विज्ञान विषयक पुस्तके मिळतात. त्यातील एक पुस्तक कृष्णविवरांसंबंधी असते. त्यात कृष्णविवरात प्रवेश कसा करायचा याचे विवरण असते. तदनुसार लेखक कृष्णविवरात प्रवेश करून धवल विवरातून बाहेर येऊन समांतर विश्वात जातो व पृथ्वीवर भारताने हरलेली मॅच तिथे भारत जिंकल्याचे त्याच्या निदर्शनास येते. दोन्ही कथा वाचतांना लेखकाचा अभ्यास व त्याची कल्पनाशक्ती यांचा कसा उत्कृष्ट मिलाफ झाला आहे याची प्रचिती येते.

चौथ्या भागात भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो, त्याची विविध केंद्रे, तेथे चालणारे संशोधन याची माहिती दिली आहे. तसेच ज्या शास्त्रज्ञांनी इस्रो वाढविण्यासाठी योगदान दिले आहे त्यांची चरित्रे थोडक्यात दिली आहेत.

पुस्तक पेपरबॅक स्वरूपात असून फॉन्ट मोठा असल्याने डोळ्यांना त्रास होत नाही. एकूणच हे  ‘अ मस्ट रीड’ पुस्तक आहे.

परिचय : सौ. सुनीता पुजारी, सांगली 

सांगली (महाराष्ट्र)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “काळजाचा नितळ तळ” – काव्यसंग्रह – कवी : श्री भीमराव धुळूबुळू ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “काळजाचा नितळ तळ” – काव्यसंग्रह – कवी : श्री भीमराव धुळूबुळू ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

पुस्तक     : काळजाचा नितळ तळ – काव्यसंग्रह

कवी         : श्री. भीमराव धुळूबुळू

प्रकाशक   : प्रतिभा पब्लिकेशन, इस्लामपूर 

पृष्ठे           : १३२

मूल्य         : रु. २४०|~

काळजाच्या तळातून आलेली नितळ कविता

काळजाला भिडणा-या कवितांचा एक संग्रह नुकताच हातात आला. वाचला. विषयांची आणि भावनांची विविधता असणारा हा संग्रह  म्हणजे ‘  काळजाचा नितळ तळ’. मिरजेचे कवी श्री.

भीमराव  धुळूबुळू यांचा हा कविता संग्रह. सामाजिक आशयाबरोबरच  आत्मचिंतन करण्-या आणि कवितेकडे स्वतःच्या दृष्टीने पाहणा-या कविता या संग्रहात वाचायला मिळाल्या. कवीने कवितेविषयी, कवी विषयी आणि एकंदरीतच काव्य  प्रकाराविषयीलिहिलेल्या कवितांनी लक्ष वेधून  घेतले. कारण त्यातून   कवीची काव्याविषयीची आस्था दिसून येते. म्हणूनच अशा कवितांविषयी थोडसं  लिहितो आहे.

(संबंधित कवितेचे शिर्षक कंसात दिले आहे.)

शब्दांच्या  जंजाळात  हरवलेली कविता आणि कवींचे फुटलेले पेव बघून कवी अस्वस्थ  होत आहे. अर्थहीन  जड शब्दांच्या ओझ्याखाली कविता दडपून  गेली आहे. खरतर खरी कविता सापडतच  नाही अशी अवस्था आहे. वीज तोलून धरावी तर आकाशानेच ! संजीवक पण दाहक अशी कविता पेलायची म्हणजे जळून जाऊन राख व्हायची मनाची तयारी हवी. सशक्त  कविता जन्माला घालणारा असा कवी आज आतल्या आत गाडला गेला आहे. पण हे गाडलेपण उद्या प्रतिभेच्या नव्या रोपाला जन्म  देईल असा विश्वास  कवी व्यक्त  करत आहे. बाजारातल्या झगमगाटाला  भुलून जाण्यापेक्षा  आपले मूळ न सोडता भविष्याचा विचार  करून  कवीने चिरकालीन काव्य लिहावे अशी कवीची अपेक्षा आहे. (मूळ).

कविता करणे किंवा कविता होणे खूप सोपे असते असा समज करून घेऊन  गांभीर्याने विचार न करता केवळ प्रसिद्धीसाठी कविता लिहिणारे  कवी खूप आहेत. शब्दांच्या पसा-यातून शब्द  वेचू घ्यावेत आणि एकापुढे एक मांडत जावे  की झाली कविता. खरंच, कविता इतकी सोपी असते का ? अभ्यास, मनन, चिंतन नसताना सुचलेले काव्य हे दर्जाहिनच असणार. केवळ टाळ्या मिळवणे एवढाच त्याचा उद्देश असतो. अशा खुशमस्क-यांनी केलेली स्तुती कवितेला अधिकच दर्जाहीन बनवते. हीच खंत कवीने या कवितेत व्यक्त केली आहे. उथळपणाच्या तवंगामुळे  अभिजातपणाची खोली अदृश्य होत चालली आहे. शब्दांचा सांगाडा म्हणजे सशक्त  कविता नव्हे असे मत कवी ठामपणे  मांडत आहे. (फोल पसारा ).

ज्ञानेश्वर, तुकाराम  यांची परंपरा सांगणारे आपण, काय लिहीतो ?अर्थ समजून न घेता केलेली पारायणे आणि पेलत नसलेल्या कवितेला हात घालणे, दोन्ही हास्यास्पद  !  दात काढलेल्या सापाचे खेळ करुन गारुडी फसवतो आणि शब्दांची पिलावळ प्रसवून कवी निस्तेज प्रतिभेचे दर्शन  घडवण्याचा प्रयत्न  करत असतो. कवीला चीड आहे ती या दांभिकतेची. (इंद्रायणी आतून).

तथाकथित  साहित्य  प्रेमाचे आणि वाड्मय निष्ठेचे वाभाडे काढणारी ‘ खरा कवी ‘ ही कविता म्हणजे उपरोधिक ‘शालजोडी’ चा उत्तम नमुना आहे. शब्दांचा बाजार मांडून निष्ठेचा लिलाव  करणा-या साहित्यिक दलालांचा बुरखा फाडणारी ही कविता कवीच्या दर्जेदार साहित्यविषयक तळमळीची साक्षच देते. एकीकडे आपल्यातल्या  अपुरेपणाची जाणीव आणि दुसरीकडे सुमार साहित्याची  दुकानदारी यातले नेमके अंतर टिपणारी ही कविता ख-या कवीच्या व्यथा मांडणारी आहे असे म्हणावे लागेल. (खरा कवी)

कवी स्वतःच होतो घोडा आणि एका नव्या दुनियेत  फेरफटका मारून येतो. पण अपेक्षित माणूस न सापडल्याने त्याच्या मार्गातही  परिवर्तन  होते आणि कवीचे धारदार  शब्द  गुलामगिरीचे दोर कापून टाकतात. मेंढरांच जीणं संपतं आणि मानवतेच्या मंदिरात कवीचा सन्मान  होतो. हा सन्मान परिवर्तनाशिवाय शक्य नाही याची जाणीव कवी येथे करून देत आहे. हा सन्मान  एकट्या कवीचा नाही तर परिवर्तनाच्या वाटेने जाणा-या प्रत्येकाचा सन्मान होणार आहे असा विश्वास  कवीला वाटतो. (कवीचा घोडा )

शोषितांची  दुःखे मांडणारी कविता आता वहीच्या पानात रेंगाळून चालणार नाही तर तिने जाब विचारण्याची वेळ आली आहे. दहशतीच्या टापा कालही वाजत होत्या. कदाचित  उद्याही वाचतील. पण आयुष्याच्या मशाली पेटवून त्यांना शह देण्याची वेळ  आता आली आहे. हा संघर्षच देईल अशा कवितेला जन्म, जी फक्त  संमेलने गाजवण्यासाठी नसेल तर असेल हिशेब मागण्यासाठी आणि पांथस्थाला मार्गावर आणण्यासाठी. आजची पिचलेली कविता उद्या सौदामिनीच्या तेजाने तळपावी एवढीच कवीची इच्छा ! (कवितांच्या वहीत )

भले बुरे अनुभव  झेलत  झेलत पुढे जात असताना कटू अनुभवच जास्त  आले. गद्दारांचीच संख्या जास्त होती. सगळं आयुष्यच  उद्ध्वस्त व्हाव असे अनेक प्रसंग आले. पण या सगळ्या संकटात साथ दिली ती शब्दांनीच. शब्दांनी सावरलं. शब्दांनी अश्रू पुसले. या शब्दांचे सामर्थ्यच एवढे मोठे की शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या खांद्यावर  डोक ठेवून त्यांच्याच साक्षीनं  समाधिस्थ  व्हावं.

माणसांच्या आलेल्या अनुभवपेक्षा कवीला शब्दांचा आलेला अनुभव  अधिक खात्रीलायक वाटतो. विश्वासघात, बेईमानी करणारी माणसे भेटतील पण शब्दांनी कधीच बेईमानी केली नाही. शब्दांवर दाखवलेला पूर्ण  विश्वास  कवीला जगण्याचे बळ देतो. म्हणून  तर शब्दांची झोळी काखेत  अडकवून शब्दांविषयी कृतज्ञता व्यक्त  करत कवी शेवटपर्यंत  शब्दांची साथ सोडायला तयार  नाही. (कवितेच्या बागेत समाधीस्थ)

‘शब्द’ या कवितेत  कवीने शब्दांची महती गाईली आहे. शब्द काय नाही ? शब्दात  शक्ती आहे, युक्ती आहे. म्हणूनच  ते जग जिंकू शकतात आणि अशक्य ते ही करून दाखवू शकतात. शब्द  हे  धन आहेत आणि तितकेच महत्वाचे म्हणजे ते मनही आहेत. म्हणजेच स्वतःच्या मनाला आपण जितकं महत्त्व  देतो तितकं  महत्त्व  शब्दांनाही दिलं जावं. मन सांभाळाव तितकेच शब्दही सांभाळावेत. म्हणून शब्द  बोलताना भान असावे. दिला शब्द  मोडू नये आणि शब्दाला शब्द वाढवून भांडत  बसू  नये. आपली चूक मान्य  करताना शब्द  कमी पडू देऊ नयेत. शब्दात अहंपणा म्हणजे ‘ मी ‘ नसावा. उलट शब्दातून दुस-याविषयीची काळजी, आपुलकी व्यक्त  व्हावी. भडकवणारे शब्दही वापरु नयेत आणि शब्दांनी लाळघोटेपणाही  करू नये. ही सर्व  पथ्ये पाळून जे शब्द  वापरतात आणि दिलेला शब्द  पाळतात असे लोकच आपल्या स्मरणात राहतात.

या संपूर्ण  कवितेत कवीने ‘ शब्द  ‘ या शब्दालाच महत्त्व  दिले आहे. कारण साहित्य  निर्मिती ही शब्दाशिवाय होणे अशक्य  आणि चांगले साहित्य  निर्माण  व्हायचे असेल तर चांगली भाषा, चांगले शब्द  हवेतच. केवळ साहित्यच नव्हे तर रोजच्या जगण्यातही शब्दांची किंमत, ताकद ओळखून त्यांचा वापर केला पाहिजे. शब्द  इतिहास  घडवू शकतात आणि भूगोल  बदलू शकतात. रक्तहीन  क्रांती आणि चिरकाल शांती देण्याचे सामर्थ्य  शब्दांत आहे हे विसरुन चालणार नाही असेच कवीला म्हणायचे असावे. (शब्द)

सर्वत्र अंधार दाटलेला. चेह-यावर मुखवटे ओढलेल्या माणसांनी आपण वेढलो गेलोय. स्वार्थाच्या गर्दीत  औपचारिकतेने टिकवलेली नाती. जबाबदारीची चौकट मोडणेही शक्य  नाही. अशा परिस्थितीत  विश्वास  ठेवावा अस कोणीच दिसत नाही. मग कशाच्या आधारानं, कशाच्या जीवावर ही सारी धडपड चालू आहे ? आणि मग लक्षात  येत हे बळ देणारी, विश्वासानं  साथ देणारी एकच आहे… ती म्हणजे कविता. नसती कविता तर ? कुणाशी बोललो असतो व्यथा, वेदना ? कुठे जपून ठेवले असते सुखदुःखाचे क्षण ? आज आपण जे काही आहोत ते कवितेच्या जीवावरच. कविता हीच आपली ओळख आहे. कवितेच्या तेलामुळच  प्राणाचा दिवा तग धरुन आहे याची कबुलीच कवी देतोय. (कविते तुझ्यामुळे)

या सर्व  कविता वाचल्यावर  एक गोष्ट  लक्षात  येते की कविता हा गंभीर  साहित्य प्रकार आहे याची जाणीव  कवी करुन देत आहे. चार दाणे फेकावेत, ते कसेही उगवून यावेत, कदाचित अल्पजीवी ठरावेत, अशी कविता नसावी. तर जमिनीची योग्यप्रकारे मशागत करून मग दाणे पेरले जावेत, उगवणा-या दाण्यांचीही काळजी घेतली जावी आणि सकस दाणे देणारं पीक यावं अशी कविता असावी असेच कवीला वाटते. कवितेने भावना व्यक्त  कराव्यात, मार्गही दाखवावा आणि आधारही द्यावा. म्हणून  तर, सुखाची लहर असो वा दुःखाच्या लाटा येवोत, कवी कवितेच्या झाडाला सोडायला तयार नाही. उलट शब्दांची पाखरं आणखीनच जमा होतात आणि कवी लिहून  जातो….

     “अवघडलेल्या फांदीवरती 

     शब्दपाखरे ही फडफडती 

     पोटामधला अर्थ  घेऊनी

     ओठांवरती  येती गाणी “

त्या गाण्यांचा अर्थ  शोधण्याचा हा एक छोटासा प्रयत्न  !

पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “एक भाकर तीन चुली“ – देवा झिंझाड ☆ परिचय – डाॅ.स्वाती पाटील ☆

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ “एक भाकर तीन चुली“ – देवा झिंझाड ☆ परिचय – डाॅ.स्वाती पाटील ☆ 

पुस्तक – एक भाकर तीन चुली 

लेखक – देवा झिंझाड

प्रकाशन – न्यु इरा पब्लिशिंग हाउस 

पृष्ठसंख्या – ४२४ 

किंमत – रु. ४२६/-

…अगदीच दोन दिवसापूर्वी वाचून पूर्ण केलेली,देवा झिंजाड लिखित कादंबरी ‘एक भाकर तीन चुली. 

‘दोन दिवस झालेले आहेत वाचून, तरीसुद्धा डोक्यातून कादंबरीचा विषय जात नाही. अशा पद्धतीने अतिशय हृदयाला, मनाला भिडलेली, हृदयस्पर्शी कादंबरी म्हणून याचं वर्णन करता येईल .श्री देवा झिंजाड यांनी अतिशय संवेदनशीलतेने  स्त्री मनाचा वेध घेऊन लिहलेली, प्रत्येक शब्द काळजातून आलेला,अशी ही भावस्पर्शी कादंबरी वाचताना एकही पान असं रहात नाही की जे वाचूनआपले डोळे होत नाहीत. म्हटलं तर हा साठ वर्षाचा कालखंड जो कुठलीही कल्पनाशक्ती न वापरता ,कोणतीही फँटसी, अवास्तवता न चितारता ,आपल्यापुढे सजीव उभा केलेला आहे .आपण कादंबरी वाचत नाही तर आपण एखादा सिनेमा किंवा एखादी वेब सिरीज पाहतो की काय अशा पद्धतीने ते सर्व चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. स्त्री कुठल्याही जातीतली, धर्मातली असू दे, कुठल्याही वर्गातली असू दे , तिच्या नशिबी रूढी ,परंपरा ,यांचा काच आणि फास लागलेला आहे. कोणतीही प्रथा असू दे, त्याचा शेवटचा बळी ही स्त्री च ठरलेली आहे . यामध्ये भावकी,  गरिबी, व्यसन, पुरुषसत्ताक पद्धती या सगळ्यांचं  वर्णन या कादंबरीत ठळक पद्धतीने केलेलं आहे आणि या सर्वाचा परिणाम हा सर्वात शेवटी स्त्रियांवरच झालेला आहे हे सुद्धा सत्य अधोरेखित केलेलं आहे.अर्थात हा सर्व सत्य भाग आहे आणि हे  सर्व भोगलेल्या,जगलेल्या स्त्री ची ही कहाणी आहे . या स्त्रीबरोबर  दहा ते पंधरा वर्ष हा कोंडमारा, घुसमट ,ही समाज व्यवस्था सहन केलेला तिचा मुलगा आहे. या मुलाने तिच्या पूर्व आयुष्याचा धांडोळा घेऊन ही कादंबरी लिहिली आहे जी पूर्णपणे वास्तवदर्शी आणि सत्य आहे .कादंबरीची नायिका ही जी ‘पारू ‘ आहे ती आपल्याला आपल्या आई मध्ये, मावशीमध्ये ,आजी मध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये आलेल्या गाव खेड्यामधल्या कुठल्या न कुठल्या स्त्रीमध्ये काही अंशी पाहायला मिळतेच. यामधला एकही प्रसंग असा नाही की जो वास्तवाशी कोणाच्याही मिळत जुळत नाही .टोकाची अवहेलना ,टोकाचा त्रास, अत्यंत घुसमट,  आणि  पारंपरिक समाज व्यवस्थेची बळी ठरलेली ही पारू आपल्याला काय शिकवते? ती शिकवते, कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी संघर्षा करीत जगावं कसं? तिच्या संघर्षा पुढे आपल्यासारख्या अनेक स्त्रियांची दुःख अक्षरशः कणभर आहेत. इतकं दुःख तिच्या नशिबी आलेल आहे आणि ज्यामध्ये तिची काहीही चूक नाही .पुरुषसत्ताक मनुवादी समाज व्यवस्थेने घेतलेला हा स्त्रीचा बळी आहे .कादंबरीचं कथानक मी इथे सांगणार नाही, कारण कादंबरी मुळातच वाचली पाहिजे आणि ही कादंबरी नाहीच ही सत्यकथा आहे. फक्त एकच सांगते, की या कादंबरीने मला काय दिलं? या कादंबरी ने मला संघर्ष करायला शिकवतानाच

आजूबाजूच्या, तळागाळातल्या, सर्व स्तरातल्या, सर्व स्त्रियांकडे संवेदनशीलतेने पाहायला शिकवलं . प्रत्येक आयुष्यात आलेल्या स्त्रीने किती भोगल असेल ,किती सोसलं असेल याची किमान जाण तरी ठेवावी .आज मी शहरात राहते, अनेकजणी निमशहरात राहतात ,परंतु माझ्या पुष्कळ भगिनी या गावखेड्यामध्ये आहेत,  पारू सारखं दुःख अनेकींच्या वाट्याला आलं असेल आणि याचा दोष कोणाला द्यायचा मनुवादी  समाज रचनेला की  स्त्रियांच स्त्रियांना त्रास देतात हे   वाक्य खरं करणार्या  स्त्री जातीला,की पुरुषसत्ताक,अहंकारी बुरसटलेल्या विचारसरणीला आणि समाज व्यवस्थेला .अगदी प्रत्येकाने विचार करावा अशी कथा आहे. या कादंबरीने आजच्या शहरीकरणामध्ये,सुद्धा बेस्ट सेलर हा किताब मिळवलेला आहे .तीन महिन्यांमध्ये चौथी आवृत्ती संपत आलेली आहे आणि आत्तापर्यंत 26 पुरस्कार या कादंबरीला मिळालेले आहेत. एफबी वर इन्स्टा वर वेगवेगळ्या संमेलनामध्ये कादंबरीचा उदो उदो होत आहे .खूप लोक  बोलत आहेत ,वाचत आहेत आणि चर्चा करत आहेत. हेच या कादंबरीचे यश आहे. ‘देवा झिंजाड ‘या मनाने स्त्रीवादी असलेल्या लेखकाने अतिशय समर्थपणे हे सर्व आपल्यापर्यंत पोहोचवल आहे, काळजापासून पोचवलेल आहे. काळजातले शब्द आहेत, कुठल्याही अलंकारिक शब्दांचा उपयोग करण्याची गरजच पडलेली नाही. किंवा कुठल्याही कल्पनाशक्तीची भरारी मारण्याची गरज पडली नाही.  जे जगलं, जे भोगलं ते सरळ सांगितलेल आहे पण ते इतकं काळजाला भिडतं , आणि असं असू शकतं का ?आणि हे अस का असाव ? असा प्रश्न पडतो.आणि  हे  उलथून टाकल पाहिजे ,अशा निश्चयाने आपल्या मुठी आवळल्या जातात हे या कादंबरीचं  यश आहे. मराठी पुस्तकाला एवढी मागणी वाढते की तीन महिन्यांमध्ये चौथी आवृत्ती संपत येते हे या कादंबरीचे यश आहे . मराठी साहित्य विश्वामध्ये एका स्त्री मन समजून घेणाऱ्या,संवेदनशील लेखकाची भर पडली हे या कादंबरीचे यश आहे.

पुस्तक परिचय – डॉ.स्वाती पाटील

सांगली

मो.  9503628150

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ मांडवावरची वेल – लेखिका – डॉ. ज्योती गोडबोले ☆ परिचय – सौ. प्रभा हर्षे ☆

सौ. प्रभा हर्षे

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ 

☆ मांडवावरची वेल – लेखिका – डॉ. ज्योती गोडबोले ☆ परिचय – सौ. प्रभा हर्षे ☆ 

पुस्तक : मांडवावरची वेल

लेखिका : डॉ. ज्योती गोडबोले

प्रकाशक : अमित प्रकाशन, पुणे.

पृष्ठसंख्या : १९०

किंमत :    रू ३७०

डॉ. ज्योती गोडबोले

कविता, कथा कादंबरी आदी वाडंःमय प्रकार आपण नेहमी वाचत असतो. आणि  त्यात लघुकथा आवडीने वाचल्या जातात. लघुकथेचा विषय  छोटासा पण लक्ष वेधून घेणारा असल्याने मनात रेंगाळत रहातो.  डॉ.ज्योती गोडबोले यांचा ‘मांडवावरची वेल’ हा असाच एक लघुकथा संग्रह आहेत. 

डॉ. ज्योती या व्यवसायाने डॉक्टर असल्याने लोकांशी संपर्क तर रोजचाच. त्यातही वैविध्य फार ! वय, जात आणि स्त्री पुरुष फरक ज्याचा परिणाम माणसाच्या वागणुकीत दिसत असतो.  त्याचे वेगळेपण टिपणे आणि ते कथारुपाने वाचकांपर्यंत पोचवणे यात डॉ ज्योती अगदी यशस्वी झाल्या आहेत. 

डॉक्टरांकडे येणारा पेशंट हा त्याची व्याधी तर घेऊन येतोच पण खूपदा मनाची दुखणी खुपणी ही त्यांना सागतो, त्यांच्याकडून काही दिलासा मिळतोय का याची वाट बघतो. ‘ देव तारी त्याला ‘ या कथेतील रोजंदारीवर काम करणाऱ्या बाईचे जेमतेम १ किलो वजनाचे बाळ कसं वाचलं आणि पोलिस इन्स्पेक्टर झालं  ही कथा,  किंवा ‘ वठलेला मोहर ‘ ही अरूणाची कथा, या कथा वाचकांनाही आपल्यासमोर घडताहेत असे  वाटावे इतके जिवंत चित्रण लेखिकेने केले आहे.

इतक्या वेगवेगळ्या विषयांवर कथा त्यांनी लिहिल्या आहेत कि त्यांच्याबरोबर आपणही जग फिरुन येतो.
परदेशात स्थायीक झालेली भारतीय मुलगी व तिचा अमेरिकेन नवरा यांची ‘ मायबाप ‘ ही  कथा आपल्याला एका वेगळ्या संस्कृतीत वाढलेल्या व्यक्तीला आपले संस्कार कसे लोभसवाणे वाटतात हे सांगते, तर ‘ रॉबर्ट आमचा शेजारी ‘ ह्या कथेत त्या एका  जिद्दी निग्रो डॉक्टरची मनापासून तारीफ करतात .  अशाच प्रकारची ‘ गराजसेल ‘ किंवा ‘ डाउनसायझिंग ‘ ह्या कथाही परदेशातील परिस्थितीचे वेगळे विषय मांडतात.

या दोन्हीपेक्षा वेगळे आहे ते त्यांचे समृद्ध भावविश्व ! माणसाच्या मनाचे कंगोरे कोपरे त्यांना सहज दिसतात आणि आपल्या प्रवाही भाषेत ते त्या मांडतातही … इतक्या सुबकपणे की अशा कथांना अगदी सहजपणे दाद दिली जाते. 

‘ झोपाळ्यावर ‘ ही कथा अशीच सुंदर आहे. झोपाळ्याच्या सुरेल व सुरेख आठवणी  त्यांनी सांगितल्या आहेत . तशीच एक छान गोष्ट म्हणजे ‘ ओंकारची शेळी ! ‘ खेड्यात रहाणारा ओंकार शेळीसाठी हट्ट करतो, आईच्या सगळ्या अटी पाळून अगदी प्रेमाने शेळीची काळजी घेतो. ती शेळीच त्याच्या शिक्षणाचा आधार बनते. 

अजून एक प्रेरणादायी कथा मांडवावरची वेल ही शीर्षक कथा…. एक नाजुक साजूक वेल, पण जर तिला मांडवाचा घट्ट आधार मिळाला तर ती कशी बहरते, फुलते-फळते हे समजण्यासाठी पुस्तकच वाचायला पाहिजे. 

या कथा संग्रहात एकूण पस्तीस कथा आहेत. सर्व कथांची मांडणी नेटकी असून कथेची गोडी वाढवणारे आहे.

अशा रितीने, अगदी हलक्या फुलक्या पण वाचता वाचता सहज शिक्षण देणाऱ्या या संग्रहातल्या कथा वाचताना वाचकाच्या मनात एक विचार शलाका नक्कीच जागृत करणाऱ्या आहेत.  हा कथासंग्रह  सादर करून डॉ. ज्योती  यांनी आपले अनुभव उत्तम प्रकारे शेअर केले आहेत. त्यांचे हे अनुभव तुम्हीही वाचावेत अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे.

परिचय : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “रसाळ गोष्टी”… लेखक : विश्वनाथ – अनुवाद  : जुई जेऊरकर  ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “रसाळ गोष्टी”… लेखक : विश्वनाथ – अनुवाद  : जुई जेऊरकर  ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

पुस्तकाचे नाव : रसाळ गोष्टी ( बाल-कथा संग्रह)

लेखक : विश्वनाथ 

अनुवाद  : जुई जेऊरकर 

९८५०६२२८८६

प्रकाशक  : अक्षरशिल्प प्रकाशन 

पाने  : ३४

मूल्य  : रु. १२५\~

जुई जेऊरकर. इयत्ता पाचवी…..

काय करायचं असतं या वयात ? शाळेचा अभ्यास, एखादा क्लास, खेळणे, बागडणे आणि टी. व्ही. किंवा मोबाईल पाहणे. बरोबर ना ? पण काहीं मुलांचं असं नसतं. ती मुलं थोड्या वेगळ्या वाटेनं जाणारी असतात. हीच वाट कायम धरली तर ती त्यांना खूप दूर घेऊन जाते आणि ध्येयाचे शिखरही काबीज करते. जुई ही अशी वेगळ्या वाटेने जाणारी. पाचवीची परीक्षा झाली. वाचनाची आवड असल्यामुळे ‘ रसीली कहानियाॅ ‘ हा ‘ विश्वनाथ ‘ यांचा कथासंग्रह वाचायला घेतला. एक कथा वाचून झाल्यावर मराठीत अनुवाद करावासा वाटला व तो केला. (हा वारसा तिला वडिलांकडूनच मिळाला आहे. तिचे वडील श्री. बळवंत जेऊरकर हे साहित्य अकादमी सन्मानित हिंदी साहित्याचे अनुवादकार आहेत )वडिलांकडून शाबासकी व प्रोत्साहन मिळाले. मग काय, सर्वच कथांचा अनुवाद केला. पुस्तक काढायचे पण ठरले. पण आधी कृष्णेचा पूर आणि मग कोरोनाचे संकट यामुळे सगळेच व्यवहार ठप्प झाले. नंतर मात्र पुन्हा नव्या उमेदीने मागे लागून काही महिन्यांपूर्वीच या अनुवादित कथांचा संग्रह प्रकाशित झाला आणि आपल्या हाती आला.. ‘ रसाळ गोष्टी ‘. कथासंग्रह.

या कथासंग्रहात एकूण अकरा कथा आहेत. सर्व कथा या बाल व कुमार गटातील मुलामुलींनी वाचाव्यात अशा आहेत. यात संस्कारही आहेत आणि मनोरंजनही आहे. विषयांची विविधताही आहे. यात खरेपणाचे फळ काय मिळते हे सांगणारी कथा आहे आणि विद्येचे महत्व पटवून देणारी कथाही आहे. मातृभक्ती आणि देशभक्ती, साधेपणा आणि श्रमप्रतिष्ठा, भूतदया, धर्मप्रेम, श्रद्धा, मित्रप्रेम अशा विविध विषयांबरोबरच कंजूषपणातून घडणारा विनोद सांगणारी कथाही आहे. अत्यंत साध्या शब्दांचा वापर केल्यामुळे कुठेही अनुवादातील कृत्रिमपणा जाणवत नाही. मुलांना आवडतील अशा कथा मुलांच्या हाती देऊन प्रस्तावनेत ज्येष्ठ साहित्यिक श्री. दयासागर बन्ने यांनी म्हटल्याप्रमाणे जुईने लावलेली शब्दवेल आणखीनच बहरत जाईल यात शंकाच नाही. सुप्रसिद्ध कवी दासू वैद्य यांनीही तिची पाठ थोपटली आहे.

आकर्षक मुखपृष्ठ, सौम्य रंगसंगती, बोलकी चित्रे, मऊ मुलायम कागद अशा सर्व अलंकारांनी सजलेला हा बाल कथा संग्रह अनुवादित बाल साहित्यातील लक्षणीय टप्पा ठरेल हे नक्कीच. शिवाय फ्लीपकार्ट, ॲमेझाॅन वर पुस्तक उपलब्ध करून जुईने ऑनलाईन जगातही प्रवेश केला आहे.

येणारी सुट्टी ‘एंजॉय’ करण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना ‘गिफ्ट’ म्हणून आवर्जून द्यावे असे हे पुस्तक आहे.

जुईच्या या पहिल्या प्रयत्नानंतर तिच्या पुढच्या वाटचालीसाठी तिला हार्दिक शुभेच्छा !

पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “वैष्णव” – लेखक : वि. वा. शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’ ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “वैष्णव” – लेखक : वि. वा. शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’ ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

वि.वा.शिरवाडकर यांनी लिहीलेली ही एक लहान कादंबरी…’वैष्णव’.कादंबरीचे लेखन केलंय १९४६ साली. कादंबरीत वर्णीलेला काळ आहे १९४२ चा.

एका छोट्या गावात शिक्षकाची नोकरी करणारा तरुण. बायको आणि मुलासोबत रहात असतो. तुटपुंजे वेतन..ओढग्रस्तीची अवस्था… पापभिरू.. सतत मान खाली घालून चालणारा..आणि कणाहिन देखील. घरात भिंतीवर दोन तसबिरी.. एक दत्ताची आणि दुसरी गांधीजींची.गांधींचे नाव फक्त ऐकलेले.शाळेत वरीष्ठांकडुन झालेला अन्याय.. अपमान सहन होत नाही.. आणि सरकारी नोकरीवर तो लाथ मारतो. एकामागून एक आपत्ती येत रहातात.

नोकरीच्या शोधात तो मुंबईत येतो. त्यावेळी मुंबईत इंग्रजांविरुद्ध सुरू असलेले आंदोलने निर्णायक टप्प्यात आलेले असते.९ऑगस्ट ला गवालिया टँक मैदानावर सुरू असलेल्या सभेला तो जातो. गांधीजींचे भाषण ऐकतो, आणि त्याच्यात आमुलाग्र बदल होतो. 

दुसऱ्या दिवशीच तो तरुण गावाकडे परततो.आणि त्याच्या नैत्रुत्वाखाली गावात सरकार विरुद्ध आंदोलन छेडले जाते. त्यात तो काही अंशी यशस्वी होतो देखील. पण बलाढ्य ब्रिटिश सत्तेपुढे अखेर ते आंदोलन दडपले जाते.

एका पापभिरू.. कणाहिन व्यक्ती गांधींजींच्या भाषणाने प्रेरित होऊन कशी लढा देते.. त्याच्यात कसे कसे बदल होत गेले हे शिरवाडकरांनी खुपच सुंदर शब्दात उभे केले आहे. त्याच्या लढ्याला यश मिळाले की नाही हे महत्त्वाचे नाही तर गांधीजींच्या विचाराने प्रेरणा घेऊन अगदी गाव पातळीवर असलेले सामान्य जन सुध्दा ब्रिटीशांविरुध्द निर्भयपणे कसे उभे राहिले हे च या कादंबरीत वर्णीलेले आहे.

९ ऑगस्ट च्या आंदोलनाच्या वेळी शिरवाडकर मुंबईत होते.. त्या ऐतिहासिक सभेला देखील उपस्थित होते. त्यामुळे त्या दिवसाचे त्यांनी जे वर्णन केले आहे त्यात एक जिवंतपणा आहे.

म. गांधींचे मोठेपण वि.वा.शिरवाडकरांच्या शब्दात वाचायचे असेल तर ‘वैष्णव’ अवश्य वाचा.

लेखक : वि.वा. शिरवाडकर 

परिचय : श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print