श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ मानिनी… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(आशाने काकाच्या घरचा दरवाजा खटखटवला, काकीने दरवाजा उघडला, काकीला तिला यावेळी आशा परिस्थितीत पाहून आश्यर्य वाटले.) – इथून पुढे.

काकी –अग, या वेळी.. आणि तूझ्या डोकयातून रक्त येतेय.. आणि जय का रडतोय?

तोपर्यत काका पण बाहेर आले, त्यानी आशाची परिस्थिती पाहिली. त्यांच्या लक्षात आले, घरी मारझोड झाली आहे.

काका –अग तिला आत तर येउदे.

आशा आणि यश आत आले. काकीने तिला पाणी दिले.

काकी –काय झाले ग? मारलं का तुला?

आशा – होय काकी, जावेने काठीने मारले आणि यांनी घरातून बाहेर फेकून दिले. काका, आजची रात्र मला आसरा द्या. उद्या मी विजूआतेकडे जाणार. आजची रात्र मला आसरा द्या.

काका –अग, रहा ना. आसरा कसला? आमची मुलगीच तू.

काकीने दोघांना आत घेतले. चटकन गॅस वर भात ठेवला, दही होतच. दहिभात दोघांना वाढला. कपडे बदलायला दिले.

आशा –काकी, उद्या सकाळच्या गाडीने मी रत्नागिरीला जाते. विजू आतेने मला सांगून ठेवलय, घरात काही त्रास झालं तर आपल्याकडे यायचं. काकी, मला फक्त पन्नास रुपये द्या,S.T तिकिटासाठी.

काकी –काही काळजी करू नकोस. मी इथे राहा पण म्हंटल असत, पण याच गावात राहिलीस तर तूझ्या घरच्यांना कळणार आणि मग मला शिव्या खायला लागणार.

आशा –बरोबर आहें काकी, आणि मला स्वतःच्या पायावर उभ राहायला हवं आणि जयचं पण पुढील आयुष्य आहें, यासाठी रत्नागिरी सारखं शहर हवंच.

त्या रात्री ती आणि जय काकीकडे राहिली, सकाळी लवकर उठून काकांनी दिलेले पाचशे रुपये घेऊन तिने रत्नागिरीला जाणारी बस पकडली.

आशा जयला सोबत घेऊन सकाळच्या गाडीने रत्नागिरीत पोहोचली आणि चालत चालत मधल्या आळीतील विजुआतेच्या घरी आली, विजुआतेचे यजमान जे डॉक्टर होते, ते स्कूटरवर किक मारून दवाखान्यात जाण्यासाठी तयार होते, त्यानी तिला मुलासोबत येताना पाहिले. त्यानी बायकोला हाक मारून सांगितले

” विजू, अग आशा येते आहें जयला घेऊन ‘.

विजआते गडबडीने बाहेर आली. आशा ला पाहून तिला आनंद झाला पण एवढे सकाळीच आलेली पाहून काळजी पण वाटली.

“अग आशु, सकाळीच, ये ये…

विजूआतेला पहाताच आशाच्या गळ्यात कोंडून ठेवलेला हुंदका बाहेर पडला आणि आतेच्या गळ्यात पडली.

“अग अग आशु, काय झालं, तू आत ये पाहू.

तिने तिच्या नवऱ्याला दवाखान्यात जायला सांगितले. आशु आणि जयला घेऊन ती आत आली. प्रथम तिने जयला दूध बिस्किटे दिली आणि आशूला चहा पोहे.

मग आशुने आतेला सर्व हकीकत सांगितली, डोकयावरची खोक दाखवली. आते तिची खोक पाहून हळहळली. आते म्हणाली

“आशु, तू आता आंघोळ कर, जयला आंघोळ घाल, आराम कर. दुपारी हे आले की मग ठरवू काय करायचे ते ‘.

दुपारी डॉक्टर घरी आले, मग सर्वांची जेवणे झाली. आतेने डॉक्टरना आशुची सर्व हकीकत सांगितली. डॉक्टरनी पण आशूला लहानपणा पासून पाहिलेले, तिचे लाड केलेले. तिची अशी अवस्था पाहून त्यांना वाईट वाटले. त्यानी आशूला विचारले.

“आशू, तुला परत त्या घरात जायचे आहें काय? असेल, तर पोलिसांकडे तक्रार करून तुला मानाने घरात प्रवेश मी मिळवून देतो आणि घरातल्या सर्व मंडळींना सक्त सूचना देऊन ‘.

“नाही काका, मला त्या घरात जायचे नाही, नवऱ्याशी संबंध ठेवायचे नाहीत, मला माझ्या पायावर उभे राहायचे आहें, त्यासाठी धंदा, नोकरीं करून जयला मोठं करायचे आहें ‘

“ठीक आहें, तू कष्ट करायची तयारी ठेव, आम्ही तूझ्या पाठीशी आहोत.’

जुलै महिना सुरु होता, डॉक्टरकाकांनी रत्नागिरीच्या फार्मसी कॉलेज मधून D.farm चा फॉर्म आणला आणि आशुचे फार्मसी कॉलेज सुरु झालं. जय आता शेजारच्या बालवाडीत जाऊ लागला होता. विजूआतेचा एकच मुलगा सुनील पुण्यात मेडिकला होता, त्यामुळे रत्नागिरीत आते आणि डॉक्टरकाका दोघेच असायचे. त्यामुळे त्याना पण आशू आणि जय मूळे जाग होती.

आशूकॉलेज मध्ये जाऊ लागली, कॉलेज मधील मूल तिच्यामागून कॉमेंट्स मारत होती, पण कुणाकडेही लक्ष न देता आशूने चिकाटीने फार्मसी कोर्स पुरा केला. काकांचे लक्ष होतेच.

काकांचे मित्र परांजपे डॉक्टर यांचा मुलगा प्रथमेश स्त्री रोग तज्ज्ञ झाला होता आणि रत्नागिरीत हॉस्पिटल काढणार होता. त्याच्या हॉस्पिटलचें काम सुरु होते, त्या हॉस्पिटल मध्ये मेडिकल स्टोअर ची जागा ठेवली होती. डॉक्टरकाकांनी परंजपेना सांगून ती जागा आशू साठी पक्की केली.

दिवाळीत हॉस्पिटलचें उदघाटन झाले आणि त्याच दिवशी डॉक्टरकाका आणि विजआते च्या हस्ते “जय मेडिकल ‘चें उदघाट्न झाले. डॉक्टरकाकांनी स्वतः जामीन राहून आशूला बँक कर्ज मिळवून दिले.

पहिल्या दिवसापासून परांजपे हॉस्पिटलमध्ये गर्दी होऊ लागली आणि त्यामुळे जय मेडिकल मध्ये पण गर्दी होऊ लागली.

हॉस्पिटलच्या आवारात असल्याने तेथल्या नर्सेस आणि इतर स्टाफ तिचा मित्र बनला. त्यामुळे दिवस कसा संपायचा हे तिला कळत नसे. रोज येणारे पेशन्ट औषधं खरेदी करता करता तिला आपल्या घरच्या गोष्टी सांगायचे. औषधं सप्लाय करणारे डिस्ट्रिब्युटर, त्यांचे सेल्समन, मेडिकल रिप्रेझेन्टॅटिव…..

मेडिकल रेप. ची तिला आठवण झाली आणि आशू खुर्चीतून उठली आणि तिच्या बेडरूमला जोडून असलेल्या गॅलरीत आली. तिला शिरीष ची प्रकर्षाने आठवण झाली, कुठे असेल शिरीष? शिरीष गोखले?

मेडिकल सुरु केल्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. आते काकांचा पाठींबा होताच पण परांजपेडॉक्टर मंडळीचा पण होता. तिची संसारातील फारपट त्याना समजली होती. मग डॉ परांजपे यांचे लग्न झाले आणि डॉ समिधा त्या हॉस्पिटल मध्ये आली. समिधा आशुची मैत्रिणच झाली.रिकामा वेळ असेल तेंव्हा समिधा तिच्या मेडिकल मध्ये येउंन बसायची.

आतेकडे येऊन पाच वर्षे झाली होती, या काळात तिच्या सासरच्या मंडळींनी तिची चौकशी पण केली नव्हती.कर्ज फिटले होते, त्यासुमारास रत्नागिरीत प्लॅट सिस्टिम सुरु झाली होती. तिने पण समुद्रा जवळ मोठा प्लॅट बुक केला आणि एका वर्षात ती जय सह तिकडे राहू लागली.

आशुच्या डोळ्यसमोर तो काळ आला. आपण त्या वेळी पस्तीशीच्या होतो. आर्थिक सुबत्तेमुळे आणि सतत चांगल्या लोका मध्ये असल्याने आपण फारच देखण्या दिसत होतो. अचानक शिरीष भेटला.

शिरीष -शिरीष हा एका मोठया औषधं कंपनीचा प्रतिनिधी (M. R), डॉ ना भेटायला रोज किमान सहा सात तरी M.R. यायचे. डॉक्टरना भेटून झाले की ते आपल्या मेडिकल मध्ये येऊन नवीन औषधाची माहिती सांगायचे,ऑर्डर्स घयायचे. शिरीष पण त्यातलाच. तो कोल्हापूर मधून यायचा. दर महिन्याच्या बारा किंवा तेरा तारिखला तो रत्नागिरीत असायचा. त्याच्या व्यक्तिमत्वत काही तरी जादू होती, तो डॉ कॉल ला आला की हॉस्पिटल मधील नर्सेस पण उत्तेजित व्हायच्या, त्यांच्यात नेत्र पल्लवी सुरु व्हायची, डॉ कॉल नंतर तो आपल्या मेडिकल मध्ये यायचा. आत येता येता

“मॅडम, चहा मागवा ‘अस ओरडत यायचा. मी पण पुष्पाला चहा आणायला पाठवायची, तेव्हड्यात माझ्या खुर्ची समोर टेबल घेऊन तो माझ्या डोळ्यात बघत बोलायचा.

“मॅडम, या ड्रेस मध्ये छानदिसताय, आज तुमचा नवरा खूष असणार..’

मी काही बोलण्याचा प्रयत्न करणार तोच तो ऑर्डर बुक काढायचा आणि पेन उघडून ऑर्डर्स साठी वाट पाहायचा. इतरांना कंजुषीने ऑर्डर्स देणारी मी शिरीषला मात्र मोट्ठी ऑर्डर्स दयायचे. मग चहा घेऊन तो निघायचा. निघताना म्हणायचं ” मॅडम,आता पुढील बारा तारीख ‘.

पुढची बारा तारीख कुठली मी दुसऱ्यादिवशी पासून त्याची वाट पहायचे. रोज कॅलेंडर कडे पहात उसासे सोडायचे. मग दहा तारीख.. मग अकरा… मग बारा.. आणि ती मस्त कपड्यात अकराच्या सुमारास यायचा.. माझं मन म्हणायचे, याच लग्न झाले असणार.. याची बायको यांच्यासारखीच सुंदर असेल… किती नशीबवान ती… मग माझी परिस्थिती मला जाणवायची आणि मी उसासे सोडायची.

डिसेंबर महिना आला, मी बारा तारीखची वाट पहात होते, बारा तारिखला छाती धडधडत होती.. शिरीष अकरा वाजता येईल..

पण दुपारचे दोन वाजले तरी तो आला नाही.. दुसऱ्या दिवशी नाही… तिसऱ्या दिवशी नाही. माझ्याकडे to पर्यत लँड लाईन आला होता पण शिरीषचा नंबर कुठे माहित होता?

पंचवीस तारीख पर्यत वाट पाहून शेवटी कोल्हापूर मधून आलेल्या दुसऱ्या कंपनीच्या M. R. कडे मी त्याची चौकशी केली.

–क्रमशः भाग दुसरा

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments