मराठी साहित्य – विविधा ☆ केल्याने होत आहे रे… ☆ श्री सतीश मोघे ☆

श्री सतीश मोघे

? विविधा ?

केल्याने होत आहे रे… ☆ श्री सतीश मोघे

श्वास, घास आणि ध्यास या तीन गोष्टी ज्याच्या त्यालाच कराव्या लागतात. हाती कितीही पैसा असला तरी या गोष्टी घेण्यासाठी नोकर ठेवता येत नाहीत. या गोष्टी ज्याच्या त्याला सहजपणे करता येतील अशी मनुष्यदेहाची रचना विधात्यानेच केली असून त्यासाठी आवश्यक साधने व ऊर्जास्त्रोत या देहाच्याच ठायी देऊन ठेवले आहेत.

छानसा देह, त्यात विविध इंद्रिये आणि त्या प्रत्येक इंद्रियाच्या ठायी एक विशेष शक्ती, असे वरदान विधात्याने मनुष्याला दिले आहे. डोळयांना पाहण्याची, हातांना काम करण्याची, पायाला चालण्याची, कानाला ऐकण्याची अशा रितीने सर्वच अवयवांना विशेष शक्तीचे वरदान देऊन विधात्याने मुनष्य देहाची निर्मिती केली आहे. हे शक्तीचे वरदान देतांनाच या शक्तीचा वापर केला नाही तर ती शक्ती कमी कमी होत जाऊन लयाला जाईल, असा कठोर न्यायही जोडीला ठेवलेला आहे. हा कठोर न्याय अनुभवास यावयाची सुरुवात झाली की लागलीच सावध होऊन, ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे’, या मंत्राची अंमलबजावणी, पुढील शक्तीक्षय थांबविण्यासाठी आवश्यक आहे. ‘काही वर्षापूर्वी मी विहिरीच्या कठडयावर उभा राहून पाणी विहिरीतून काढत होतो, हातात दोन बादल्या घेऊन अर्धा किलोमीटरवरुन पाणी भरत होतो. आता मात्र बाथरुममधली पाण्याने भरलेली बादली इकडून तिकडे करतांनाही कठीण जाते. पूर्वी मी तीन किलोमीटर पायी चालत शाळेत जात होतो. आता पाच मिनिटे चाललो तरी दम लागतो’,   ही आणि असेच साधर्म्य असलेली वाक्ये आपण आपल्या बाबतीत म्हणत असतो वा दुसऱ्यांकडून त्यांचा अनुभव म्हणून ऐकत असतो. इंद्रियांच्या शक्तींचा वापर न केल्याने त्यांची शक्ती कमी होण्याचा कठोर न्याय यात झालेला असतो. हा कठोर न्याय होणे टाळायचे असल्यास, कष्ट करणे आणि त्यासाठी इंद्रियांना कृतीत व्यग्र ठेवणे आवश्यक आहे.

इंद्रियांना शक्ती देतांना तिचा वापर करणे अनिवार्य होईल, अशी परिस्थीती खरे तर विधात्याने निर्माण करून ठेवलेलीच आहे. माणसाला भूक दिली. भूकेसाठी अन्न मिळविणे आवश्यक आहे. त्यासाठी उदनिर्वाहाचे साधन आले. त्यासाठी पायपीट आली, काम करणे आले. ‘उदरभरणाची व्यथा, बसली सर्वांच्या माथा’, असे प्रत्येकाचे करून,प्रत्येकाला  कृती करणे अनिवार्य करून ठेवले आहे. जोडीला चांगली वस्त्रं, चांगाला निवारा, चांगले शिक्षण यांचा ध्यास लावल्याने यासाठी अधिक अर्थार्जन व अधिक अर्थाजनासाठी अधिक कष्ट या कर्मचक्रात विधात्याने माणसाला सहजपणे गुंतवून ठेवले आहे. प्राण्यांना, वृक्षांना जसे ऋतुचक्राशी जुळवून घ्यावे लागते, तसेच माणसालाही या कर्मचक्राशी जुळवून घेणे भाग आहे. हे प्रत्येकाने ओळखून कर्म करत राहिले पाहिजे.

मूठभर गर्भश्रीमंत व्यक्ती सोडल्या तर प्रत्येकाच्याच आयुष्यात आधी कष्टाच्या वेदना व भविष्यात सुख असाच प्रवास होतो. गर्भश्रीमंत कुटुंबातील सदस्यांनाही आहे ते टिकविण्यासाठी कष्ट घ्यावेच लागतात. ‘खूप आहे’ म्हणून, काही न करता आळसाचे सुख घेणाऱ्या व्यक्तींचा भविष्यकाळ वेदनादायी असतो. अनेक श्रीमंत व्यक्ती यथायोग्य कष्ट न घेतल्याने देशोधडीला लागल्याचेही आपण पहातो. हे देशोधडीला लागणे आर्थिक दृष्टीने असते तसेच ते शरीरस्वास्थ्याच्या दृष्टीनेही असते.

शरीरस्वास्थ्याच्या दृष्टीने देशोधडीला लागणे हे बऱ्याचदा आर्थिकदृष्ट्या सुबत्ता आल्याने होते. बुद्धीच्या वापरातून समृद्धी निर्माण करायची आणि आपणच निर्माण केलेल्या या समृद्धीच्या कोशात गुदमरून जायचे, असेच घडताना हल्ली दिसते. भौतिक सुखे पायाशी लोळण घेत असली तरी त्यांचा उपभोग घेण्यासाठी देह, इंद्रिय धडधाकड हवीत. देहइंद्रिये आर्थिक सुबत्तेने नाही तर शरीरश्रमानेच धडधाकट, बलवान राहतात. गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकाला   शरीरसौष्ठव टिकविण्याठी शरीरश्रम आवश्यक आहेत.

वीरशैव तत्वज्ञानाचे प्रणेते महात्मा बसवेश्वर यांनी यासाठीच शरीरश्रमाचा गौरव करणारा मंत्र मानवजातीला दिला. ‘कायक वे कैलास’. ‘कायक’ म्हणजे कायेने (देहाने) केलेले काम. हाच ईश्वर. प्रत्येकानेच जमेल तेव्हढे शारीरिक श्रम हे केलेच पाहिजेत. यामुळे इंद्रियांची शक्ती अबाधित राहते आणि त्या शारीरिक श्रमात स्वत: त्यातील काठिण्य, कष्ट अनुभवल्याने, कष्ट करणाऱ्या इतर माणसांचेही मूल्य आपल्याला जाणवते. नकळत त्यांच्याविषयीचा आपला आदर वाढतो. स्वयंपाक, धुणे-भांडी करणाऱ्या मावशी आल्या नाहीत की आपण ते काम जेव्हा करतो, तेव्हा त्यांच्या कष्टाचे मोल जाणवते. यासाठी ..’आधी केलेच पाहिजे’.

जीविकेसाठी आणि शरीरस्वास्थ्यासाठी कष्ट अनिवार्य आहे, ही बाब प्रत्येकालाच ज्ञात असते. तरीही बरेच जण या दोन्ही गोष्टींसाठी कष्ट घेणे किंवा त्यापैकी एका गोष्टीसाठी कष्ट घेणे टाळत असल्याचे दिसून येते. यामागील कारणांचा शोध घेतला तर कंटाळा, आळस, थकवा ही कारणे आढळतात. यात ‘कंटाळा येणे’ हा सहज स्वभावधर्म आहे. पण ‘कंटाळा करणे’ हा इच्छाशक्तीचा आलेख खाली आल्याने आळसाकडे झुकणारा नकारात्मक प्रवास आहे. एकच एक काम करायला लागणे, इच्छा नसताना एखादे काम करावे लागणे, गुंतागुंतीची, आकडेमोडीची कामे करावी लागणे यामुळे कंटाळा येऊ शकतो. ढगाळ वातावरण, वीज गेलेली असणे व त्यामुळे होणारा असह्य उकाडा यामुळेही कंटाळा येऊ शकतो. कंटाळा हा प्रकृती

स्वभावधर्मावर अवलंबून असतो. तो प्रत्येकालाच येतो. माणसांचा येतो, जागेचा येतो, नोकरीचा येतो, पावसाचा येतो. अशा अनेक गोष्टींचा कंटाळा येतो. प्रकृती स्वभावाने असा कंटाळा आला, तरी सर्वसाधारण विवेकी माणूस परिस्थितीचा अंदाज घेऊन ‘कंटाळा करायचा’आणि स्वस्थ बसायचे की कंटाळ्यावर मात करून ती गोष्ट पुर्तीस न्यायची, याचा निर्णय घेत असतो.

नेमून दिलेले काम कालमर्यादेत करावयाचे काम असेल आणि ते वेळेत केले नाही तर आर्थिक दंड वा नुकसान होणार असेल तर माणूस कंटाळ्यावर मात करतो. आपला प्रकृती स्वभाव बाजूला ठेवतो आणि काम तडीस नेतो. पण विवेकाची जागा आळसाच्या तात्कालिक सुखाने घेतली तर मात्र तो कंटाळा येताच ‘कंटाळा करतो’. ‘आळसे काम नासते’, असे होऊन कामात आणि त्याच्या सुखात विघ्ने येतात. अशी माणसे खरे तर व्यवसाय, नोकरी वा कुटुंब यात अडसर आणि बोजाच. व्यक्ती म्हणून त्या चांगल्या असतील व कृतिशून्यते मागच्या त्यांच्या मानसिक स्थितीशी संबंधित कारणे समर्थनीय असतील, तर बऱ्याचदा तिथे अन्य सदस्य त्यांचा भार स्वतः उचलून, त्यांची कामे करताना दिसतात. कामे तडीस जातात. पण यात कोणालाच मनापासून आनंद नसतो. एकाला निष्क्रियतेच्या जाणिवेने नैराश्य. तर दुसऱ्याला जादा भाराच्या वेदना. हे टाळण्यासाठी ‘कंटाळा आला’ तरी ‘कंटाळा करून’ चालणार नाही, अशी कर्तव्याची जाणीव स्वतःला करून देऊन नियोजित कामे करत राहिली पाहिजे.

शारीरिक श्रमात ‘थकवा’, ही देखील महत्त्वाची गोष्ट आहे. आर्थिक ऐपत आणि शारीरिक कुवत यांची जाणीव प्रत्येकालाच असते. त्यापलीकडे जाऊन काही करण्यापूर्वी विचार करायला हवा. देह कष्टविण्यासाठीच आहे, उपजीविकेसाठी अर्थार्जन आवश्यक व अर्थार्जनासाठी काम करत राहणे आवश्यक, हे जरी खरे असले तरी आवश्यक गोष्टी कोणत्या व किती? अर्थार्जन किती आवश्यक ? व त्यासाठी देहाला कुवती बाहेर पळवायचे का? कुवतीबाहेर ओझे उचलायला लावायचे का? याचाही विचार करायला हवा. व्याप हा, आवश्यक तेवढाच व त्याच मर्यादेत हवा. व्याप आहे म्हणून तो सारण्यासाठी कृतिशीलता आहे. कृतिशीलतेचा रियाझ हा कर्तृत्वाला गती देत असला तरी तो आपल्याला झेपणाऱ्या सुरात हवा, झेपेल एवढाच हवा. ‘आळस’ हा जसा शत्रू तसेच ‘अतिश्रम’ हाही शत्रूच. रात्र विश्रांतीसाठी, शरीर स्वास्थ्यासाठी असते. आपण रात्रीचा दिवस करतो, तेव्हा नकळत शरीर स्वास्थ्य गहाण टाकून रात्री कडून वेळ उसना घेत असतो. ही उसनवारी टाळली पाहिजे. अंगावर वस्त्र असतात इतपतच व्याप हवा. वस्त्रावर पुन्हा दुसरे वस्त्र चढवणे, म्हणजे व्याप नको तेवढा वाढवणे. क्षमतेबाहेर हा व्याप वाढला की अस्वस्थ वाटायला, गुदमरायला सुरुवात झालीच म्हणून समजा.

स्वभावधर्मानुसार कंटाळा, आळस आला तरी अर्थार्जनाची निकड म्हणून नियोजित काम करणे आवश्यक असेल तर आळस झटकून ते काम करण्यासाठी… अर्थार्जनाची निकड तेवढीशी नसली तरी शारीरिक स्वास्थ्यासाठी आवश्यक त्या किमान कृती करण्यासाठी ‘ केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे’, याची जाणीव जागे करणारे  अलार्मचे घड्याळ नेहमी उशाशी हवे.

त्याचवेळी अवाजवी स्वप्ने आणि त्यासाठी क्षमतेबाहेरचे कष्ट होत असतील, तर ते थांबवून योग्य दिशा दाखवणारे संयमाचे होकायंत्रही नेहमी जवळ हवे. हे दोन्ही सोबत असले की ‘केल्याने होत आहे रे..’ याची, सारखी आठवण करून द्यावी लागत नाही. कृतिशीलतेचा रियाझ योग्य पद्धतीने होतो आणि जीवन गाणे अधिकाधिक रंगत जाते.

© श्री सतीश मोघे

मो – +91 9167558555

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दृष्टी… ☆ सुश्री नीता कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ दृष्टी… ☆ सुश्री नीता कुलकर्णी

जोशी काकांबरोबर दोन दिवसांची ट्रिप सुरू झाली. दीड तास झाल्यानंतर काकांनी मध्येच गाडी थांबवायला सांगितली.

 

काका म्हणाले शेतातल्या पायवाटेने चालावं लागेल .चला …तुम्हाला जरा वेगळी गंमत दाखवतो…

तुम्ही कधी पाहिली नसेल….

 

थोडं पुढे गेलो लांबूनच काहीतरी दिसायला लागलं….

काय आहे ते ओळखायला येईना…

जवळ जाऊन बघितलं तर तिथे डोंगरी आवळ्यांची असंख्य झाडं तिथे होती.

झाडावर आवळ्यांचे अक्षरशः घोसच्या घोस लगडलेले होते.

त्यांचा मंद मधुर वास आसमंतात पसरला होता…

वाऱ्याबरोबर दरवळत होता…     बघताना खूप मजा वाटत होती…

दृष्टी सुख घेत कितीतरी वेळ आम्ही उभे होतो….

ते टपोरे आवळे ती झाडं अजूनही स्मरणात आहेत….

 

काकांनी हे एक निराळच आम्हाला दाखवलं.

काका म्हणाले रात्री पण एक गंमत दाखवणार आहे……

 

दिवसभर आम्ही काही काही पाहत होतो….

आपण एका साध्या खेड्यात रात्री राहणार आहोत त्यांनी आधीच सांगितलं होतं.

साधस चवदार जेवण झालं आता रूमवर जायचं झोपायचं असं वाटलं….

तर काका म्हणाले चला आता

 

इतक्या रात्री त्या खेड्यात काय बघायचं?….

निघालो…

गाडी पुढे गेली अजूनच अंधार…

काजवे…या दिवसात नाही दिसत

भूतं वगैरे नाहीत ना…

आदिवासींचा नाच…..

कोणालाच अंदाज येई ना….

 

नाही म्हटलं तरी  मनात भीती दाटून आली…..

एका जुनाट देवळाच्या पायरीवर आम्ही बसलो…

आता इथे काय पाहायचं….

 

काका म्हणाले

आकाश . …..

आकाशात काय?

 

आम्ही वर बघायला लागलो

आकाश असंख्य चांदण्यांनी भरलेले होते…

त्या गडद अंधारात चांदण्या स्पष्ट दिसत होत्या चंद्र आणि शुक्राची चांदणी गोड दिसत होती…

सप्तर्षी दिसले खूप वर्षानंतर…..

 

निसर्गाचं एक अलौकिक असं रूप आम्हाला दिसत होतं….

आकाशात इतक्या चांदण्या असतात…..

 

अंधारात डोळे जरा सरावले आणि आमच्या आसपास पसरलेले   चांदणे आम्ही पाहिले….

त्यात चांदण्या खाली आपण बसलेलो आहोत हे आम्ही अनुभवले

सगळे निशब्द झालो होतो….

निरव शांतता ……

 

मी घरी गॅलरीत ऊभी  होते आणि हे आज आठवले…..

काय कुठे आणि कसं बघायचं हे सांगणारे जोशी काका आठवले…..

 

विचार करता करता लक्षात आलं की जरा बाहेर बघितलं तर हे सुखाचं चांदणं दिसेल….

पण आम्ही ते बघतच नाही…

लांब लांब जाऊन काय काय पाहायच्या नादात हा हाताशी असलेला आभाळभर आनंद बघायचा राहूनच जातो का काय…..

 

एक सांगू….

बघा ना कधीतरी तुम्ही पण…

तुमचं तुमचं आभाळ

आताशा मी बघत असते

चांदण्यांबरोबर अजूनही काही काही दिसते….

 

कल्पनेच्या पलीकडलं…

अदभुत अस….

दरवेळेस काहीतरी मला वेगळंच दिसतं….

 

कधीतरी वर गेलेले ही दिसतात बोलता येत त्यांच्याशी…..

मनातल्या मनात….

आपलं सुखदुःख…

आयुष्याच्या वळणावर असे जोशीकाकांसारखे भेटले त्यांच्या अनुभवानी ज्ञानानी त्यांनी आमचं आयुष्य अधिक समृद्ध केलं आणि जगणं अधिक सुंदर झालं…..

© सुश्री नीता कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ उकडीचा मोदक… ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ?

☆ उकडीचा मोदक… ☆ श्री सुहास सोहोनी ☆

तुम्हाला उत्तम प्रतीचा उकडीचा मोदक बनवायचा असेल तर तुमच्या आयुष्यातला मोठा काळ हा रत्नागिरी, गुहागर, केळशी अशा कुठल्या तरी ठिकाणी जावा लागतो. कारण हाताच्या चवीइतकाच मातीचा सुगंधही इथे महत्वाचा आहे. तसंच, हा पूर्णतः ‘तालमीचा राग’ आहे. यूट्यूब वर बघून हा येऊ शकत नाही. आई, आज्जी, आत्या अशा कुणाकडून तरी त्याची रीतसर तालीम घ्यावी लागते.

आपल्याकडे बाजारात उकडीचा मोदक बनवायचे ‘साचे’ मिळतात. ही ‘चीटिंग’ आहे. हे म्हणजे ऑटोट्युनर वापरून सुरेल होण्यासारखं झालं. जातिवंत खवैयाला असा ‘ साचेबद्ध ’पणा रुचत नाही.

मोदक हा व्हीआयपी पाहुणा आहे. त्याचं स्वागत टेबल-खुर्चीवर बसून नाही, तर पाटावर मांडा ठोकून करायचं असतं. सोबत आमटी-भात, बटाट्याची भाजी, चटणी वगैरे माननीय पाहिजेतच. मोदक स्वतः सुद्धा येताना कधी एकटा येत नाही, तर ‘निवग्री’ नावाच्या आपल्या धाकट्या बहिणीला घेऊन येतो. निखळ मधुर रसाच्या मोदकाबरोबर निवग्रीची ही चमचमीत जोड हवीच.

तर असा दिमाखात आलेला मोदकराज तुमच्या पानात पडतो, त्यावर साजूक तुपाची धार पडते, आणि त्याचा पहिला घास जेव्हा तुम्ही घेता, त्या वेळी होणाऱ्या भावनेलाच आपल्या संतसज्जनांनी ‘ब्रह्मानंदी टाळी लागणे’ असं म्हणलेलं आहे. यानंतर असते ती केवळ तृप्तीची भावना. खाल्लेले मोदक मोजणं म्हणजे रियाजाचे ‘घंटे’ मोजण्यासारखं आहे. त्याला फारसं महत्व नाही. ‘समाधान’ हेच खरं इप्सित.

बरं, भरपूर मोदक केवळ खाऊन झाले म्हणजे झालं, असं नाही. त्यानंतर संपूर्ण दुपार झोपण्यासाठी राखीव ठेवावी लागते. मुळात, मला ‘सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं ?’ असं कुणी विचारलं तर मी तत्क्षणी सांगीन, ‘दुपारची झोप’!

‘रात्रीची झोप’ हे धर्मकर्तव्य आहे, तर ‘दुपारची झोप’ हा रम्य सोहळा. डोअरबेल बंद, फोन सायलेंटवर, पूर्ण अंधार, डोक्यावर पंखा अशा स्थितीत जाड पांघरुणात शिरून तो साजरा करायचा असतो. आणि हा सोहळा जर मोदकाच्या आगमनाने सुफळ झाला तर अजून काय हवं ? सुमारे ३ तास निद्रादेवीच्या सान्निध्यात घालावल्यावर जड डोळ्यांनी चहाचा पहिला घोट घेतल्यावरच मोदकाची इतिकर्तव्यता पूर्ण होते.

अशा या उकडीच्या मोदकाचा आपण आस्वाद घेऊया. 

सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !

लेखक : अज्ञात 

लेखक : सुहास सोहोनी

मो ९४०३०९८११०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “अलिप्तता…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “मास्तरच्या लेखणीतून …” – लेखक : एक अज्ञात मास्तर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर  ☆

‘वाचताना वेचलेले’ अलिप्तता

प्रस्तुती :सौ. उज्ज्वला केळकर

अलिप्त होणं.. Disconnect with Something/Somebody..

धक्का बसला ना.. पण खरं आहे.. पटणार नाही काहींना.. आयुष्यात वेळ आली की Detach होणंच  योग्य..

असं म्हणतात की वयाच्या “साठी” नंतर ही प्रक्रिया सुरु करावी.. “अलिप्त” होणं म्हणजे Separation नाही की Aloof नाही.. फक्त कुठलीही गोष्ट “मनाला लावून” न घेणं.. ज्या गोष्टी जशा आहेत तशाच स्वीकारणं.. आणि खोटी आशा न बाळगणं..

नेहमी एक लक्षात ठेवावं.. माणसाचा मूळ “स्वभाव” कधीच बदलत नाही.. स्वभावाला औषध नाही हे खरं आहे.. त्याचा मोठया मनाने स्वीकार करावा.. तो बदलण्याचा प्रयत्न पण करू नये..

Detach..

मुलगा/मुलगी परदेशी आहेत… हो.. त्यांची सारखी भेट होणार नाही.. प्रत्यक्ष होणं शक्य नाही हे सतत मनाला सांगणं.. अलिप्त…!!

आपली स्थावर जंगम.. Property.. खूप कष्टाने उभी केलेली.. मान्य.. पण आता उपभोग घेण्याची अंगात शक्ती नाही.. आसक्ती नाही.. त्यावर शांतपणे विचार करून निर्णय घेणे.. Disconnect…!!

आपल्या घरामध्ये अशा खूप वस्तू असतात.. कधी Marketingच्या “सापळ्यात” फसल्यामुळे तर कधी गरज नसतानाही पत्नीच्या व मुलांच्या आग्रहामुळे घेतलेल्या… अशा कित्येक वस्तू ज्या आपण वापरत नाही पण जपून मात्र ठेवतो.. May be “Emotional Attachment”… भांडी, कपडे, असंख्य Dinner sets, काचेचे वेगवेगळे Glasses, Mugs, अगणित वाट्या, पेले, पर्सेस इत्यादी इत्यादी..

आठवून पहा.. लग्नानंतर छोट्या घरात संसार झालाच ना.. आता घर मोठ्ठं आहे.. घरात खूप अत्याधुनिक साधनं आहेत.. पण माणसं इन मिन दोनच… काय करायचं… अशा वेळी Detach होणंच महत्वाचं…_

हे झालं “निर्जिव वस्तूं” बद्दल.. आता “सजीव माणसं” चेक करू या…

काही वर्षांपूर्वी इतर कोणाच्याही आयुष्यात आपण “डोकावणं” हे सहज स्वाभाविक होतं.. कारण व्यक्ती वेगळ्या होत्या.. त्यांचे “स्वभाव आणि व्यवहार” सगळं अगदी स्वच्छ मोकळ्या आकाशासारखं होतं… पण आज परिस्थिती बदलली आहे, मित्रांनो.. विचार एकमेकांत share होत नाहीत.. कोणी सल्ला मागत नाहीत.. काही न पटणाऱ्या गोष्टी विचारता येत नाहीत किंवा सांगू शकत नाहीत… Detach…!!

“रिक्त” होण्यात सुख आहे, मित्रांनो.. दुःखाला Delete करता यायला हवं.. खूप कठीण आहे, मान्य.. पण मग पुढे नाही जाऊ शकत…

अशा वेळी कृष्णाचं चिंतन करावं… त्याने कधीही मागे वळून बघितलं नाही…. कधी वाटलं नसेल का कृष्णाला की देवकीला घट्ट मिठी मारावी आणि चार क्षण तिच्या कुशीत घालवावे… कधी गोकुळात जाऊन गोपिकांच्या मनसोक्त घागरी फोडाव्यात.. बासरीच्या मंद आवाजात सगळं विसरून जावं… मान्य आहे, कृष्ण “परम परमेश्वर” होता… आपण कृष्ण होऊ शकत नाही.. अशक्यच… पण आयुष्यात जर कधी “अलिप्त” व्हायचं असेल तर कृष्ण आठवा… तो स्फूर्ती देईल…

मुलं लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात रमतात… काय गैर आहे.. काहीच नाही.. ते जर त्यांचे “कर्तव्य” पार पाडीत असतील, तर तक्रारीला जागा नसावी.. पण “माझं ऐकावं” हा हट्ट बरा नाही… निर्णय घेण्याची प्रत्येकाची “क्षमता” वेगळी असते.. मान्य.. पण जबरदस्ती नको… लागू द्या त्यांना एखादी “ठेच”… शिकतील मुलं आपोआप…!!

लहानपणी आई म्हणायची.. तुला कळणार नाही आत्ता. पण एकदा बाप झालास की कळेल… इतक्या साध्या भाषेत एवढं मोठं “तत्वज्ञान” फक्त आईच सांगू शकते… अलिप्त होण्यात सुख आहे… पाऊस पडल्यानंतर नीरभ्र आकाशासारखं मन स्वच्छ होईल… वाईट भावना, वाईट विचार कोलमडून जातील आणि स्वछंद आनंदाचा अनुभव प्राप्त होईल… मनात प्रेम, सहानुभूती नक्कीच राहील.. पण “गुंतणं” रहाणार नाही…!!

जिथे व्यक्ती “गुंतते” तिथे राग, लोभ हे येणारच… हे “मळभ” दूर झालं की सर्व कसं छान, स्वच्छ आणि निर्मळ…!!

बघू या प्रयत्न करून… जमलं तर ठीक… नुकसान तर काहीच नाही…!!

लेखक : अज्ञात 

संग्राहिका – सौ उज्ज्वला केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गौराई… ☆ प्रस्तुती – सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

?  विविधा ?

☆ गौराई… ☆ प्रस्तुती – सौ. अर्चना सुरेश देशपांडे☆

माहेरवाशीण म्हणून बर्याच ठिकाणी पुजली जाणारी गौर, काही घरात गणपतीची आई म्हणून आपल्या बाळाचं कौतुक, ,गणपतीचं कौतुक डोळे भरून पाहण्यासाठी तर कधी जगन्माता “श्रेष्ठा- कनिष्ठा”अशा बहिणींच्या रूपात आगमन करते .

महाराष्ट्र तसेच कर्नाटकात गणपतीच्या आगमनानंतर गौरीपूजनाची परंपरा आहे.

 प्रदेशानुसार पूजा पद्धतीत फरक असला तरी देव लोकात वास करणाऱ्या या लेकी बद्दलचे प्रेम ,आपुलकी सगळीकडे सारखीच असते.

“लेक”बनून आलेल्या या माऊलीचे यथाशक्ती पूजन करणे हाच भाव असतो. महाराष्ट्रात गौरीपूजनाची विविध रूपे पहावयास मिळतात. प्रदेशानुसार गौरीपूजनाची पद्धत वेगवेगळी असते.

कोकणस्थ व कऱ्हाडे ब्राह्मण खड्यांची गौर पुजतात. सकाळी स्नान करून शुचिर्भूत होऊन नदीकाठी जाऊन तिथले पाच खडे किंवा सात खडे ताम्हणात कोऱ्या वस्त्रावर ठेवून आणतात .कापसाचे वस्त्र घालून, त्यांना दूध साखरेचा नैवेद्य दाखवून घरी आणतात .गौरी माहेरवाशिण म्हणून येत असल्याने हा मान माहेरवाशीण मुलींचा किंवा कुमारीकेचा असतो.

कोकणस्थामध्ये गौर घेऊन येणारी स्त्री तोंडात पाण्याची चूळ ठेवते (त्या मागचे कारण की गौरी घरी येताना माहेरवाशीणीने सासरची गाऱ्हाणी सांगणे , मनस्वास्थ्य बिघडविणारे विचार तिच्या मनात येऊ नयेत) नदीवरून आणलेल्या या गौरीला उंबऱ्या बाहेर पायावर दूध पाणी घालून ,ओवाळून ,रांगोळीने काढलेल्या पावलावरून गौर घरात आणतात .तिला सर्व खोलीत फिरवून घरची स्त्री” इथे काय आहे “असा प्रश्न विचारते .ती गौर आणणारी मुलगी” उदंड “आहे असे मनातल्या मनात तीन वेळा उच्चारते. त्यानंतर तिला गणपती जवळ बसविले जाते .नंतर माहेरवाशीण तोंडातील पाणी टाकून बोलू शकते. आगमना दिवशी गौरीला खिरीचा नैवेद्य दाखवला जातो .दुसऱ्या दिवशी “घावन घाटल्याचा “नैवेद्य असतो तर कराडे ब्राह्मण लोक पुरणावरणाचा नैवेद्य दाखवतात. तिसऱ्या दिवशी ओल्या नारळाच्या करंज्या केल्या जातात. तिन्ही दिवस गौरीची खण नारळाने आणि तांदुळाने ओटी भरतात .निरोपादिवशी दही पोह्याचा नैवेद्य दाखवून अक्षता टाकून तिला स्थानावरून हलवले जाते. तिची कृपादृष्टी सगळीकडे राहू दे म्हणून तिला सर्व घरातून फिरवून आणले जाते.

देशस्थांच्या घरी उभ्या च्या गौरी बसवतात .त्यांना “महालक्ष्मी “असे म्हटले जाते. गौरींचे मुखवटे पितळेचे ,चांदीचे किंवा प्लास्टर ऑफ पॅरिस असतात. घरातल्या सवाष्णी दोन सुपामध्ये धान्याच्या राशीवर महालक्ष्मीचे मुखवटे ठेवून घरात आणतात .त्यापैकी “जेष्ठा गौरीला” तुळशी वृंदावना पर्यंत मिरवत नेले जाते .तिथे तिला” कनिष्ठा गौर “भेटते. दोघी नाही हळदी कुंकू लावून वाजत गाजत उंबऱ्यापर्यंत आणतात. उंबऱ्यावरील माप ओलांडून महालक्ष्मी घरात प्रवेश करते. घरभर काढलेल्या पावलावरून गौरीला फिरविले जाते .लक्ष्मी कोणत्या पावलांनी आली यावर “सोन्याच्या ,चांदीच्या , रुपयाच्यापावलांनी, धनधान्याच्या समृद्धीच्या पावलांनी” असे म्हणून तिला घरभर फिरवून गणेश मूर्ती शेजारी तिची स्थापना करतात नंतर घरातील स्त्री गौरी आणणाऱ्या सवाष्णीला कुंकू लावून साखर देते, लक्ष्मी तयार केलेल्या साच्यामध्ये गहू ज्वारी असे धान्य भरून त्यात पैसे ठेवतात व त्यावर मुखवटे ठेवतात .त्यांना साड्या नेसून दागदागिने घालून सजविले जाते .आलेल्या दिवशी गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य असतो.

दुसऱ्या दिवशी पत्रे फुले वाहून पूजा करून तिची प्रतिष्ठापना करतात. दुपारी पुरणपोळी ,16 भाज्या, चटणी ,कोशिंबीर असा नैवेद्य दाखवून सवाष्ण वाढली जाते .तिसऱ्या दिवशी दहीभात, मुरडीचे कानवले नैवेद्य दाखवून संध्याकाळी अक्षता टाकून विसर्जन केले जाते.

कोल्हापूर भागात तांब्यावरची गौर असते .पूर्वी मातीच्या सुगडाचा वापर केला जाई. परंतु हल्ली तांब्याचा तांब्या रंगवून त्यावर एका बाजूला गौरीचा चेहरा ,दाग दागिने ,हात काढले जातात .तर मागील बाजूस गो पद्म ,चंद्र, सूर्य ,शंख ,गदा चुडा इत्यादी शुभचिन्हे काढली जातात.

कोकणात वेंगुर्ले परिसरात सारस्वतांच्या घरी गणपतीची आई म्हणून गौरी पूजली जात असल्यामुळे गणपती आगमनाच्या आधी एक दिवस गौर येते महादेवासह. सुपात तांदूळ घेऊन त्यात पाच झाडांच्या फांद्या ठेवतात आणि त्या भोवती महादेव पार्वतीचे चित्र असलेला कागद गुंडाळतात .गणपतीच्या आधी आई-वडिलांची पूजा होते. हळदीच्या पानातल्या पातोळ्या आणि पाच प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो .आगमनानंतर आणि विसर्जना आधीही काकडी, नारळ, तांदूळ घेऊन गौरीची ओटी भरली जाते .या गौरीचे विसर्जन तिसऱ्या दिवशी झाडाखाली केले जाते.

सी.के.पी लोकाकडे तेरडा व खड्यांच्या गौरी पूजल्या जातात . माहेरवाशीण ही गौर घरात आणते .तेरडा व सात खडे सुपात घेऊन आणलेल्या माहेरवाशीच्या पायावर दूध पाणी घालून तिला ओवाळून घरात घेतले जाते .कुंकवाचे पाणी केलेल्या परातीत पावलं बुडवून घरात काढलेल्या रांगोळीच्या पावलावरून लाल ठसे उमटवत माहेरवाशीण चालते ,प्रत्येक खोली तिला औक्षण करून विचारले जाते ,”गौरी कुठे आलीस “ती उत्तर ते दिवाणखान्यात मग दिवाणखान्यात काय दिसले ?गौर घेतलेली माहेरवाशीण यजमानांच्या वैभवाचे, प्रगतीचे वर्णन करते नंतर सर्व खोलीत गौर फिरवल्यानंतर गणपतीच्या शेजारी तिला बसवतात मग मुखवटा लावून साडीचोळी नेसून शृंगारण्यात येते .सौभाग्यवाणासह गौरीची खणा नारळाने ओटी भरतात. या दिवशी खीर भाजी भाकरीचा नैवेद्य दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा व तिसऱ्या दिवशी खीर व मुरड घातलेले कान्होले नैवेद्य असतो.  पुन्हा मुरडून आमच्या घरातील असं मागणी करतात.

अशा रीतीने प्रत्येकाच्या घरी गौरीचे पूजन होत असते.

वाचनात आलेली माहिती

संग्राहिका –  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गुंतता जीव हा — ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी ☆

सुश्री शांभवी मंगेश जोशी

??

गुंतता जीव हा — ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी

आज सकाळी ड्राय बाल्कनीचं दारं उघडून पाहिलं तर केराची बादली चक्क कलंडलेली!  जरा सावधपणे हळूच पुढे जाऊन पाहिलं . मांजरही  नाही अन् चारापैकी एकही पिल्लू कुठेच दिसले नाही .

मी हुश्य केलं.

मागच्या  मंगळवारी सकाळी उठल्यावर केराच्या बादलीत मांजराने पिल्लं घातलेली दिसली. 

..  ई….. शी…… करून मी एकदम ओरडलेच ! घाबरलेच होते मी. आता काय करणार ? बाल्कनीत जायची पंचाईत ! खरंच सांगते मांजर हा प्राणी मला अजिबात आवडत नाही .तिची पिल्लंही ! उगाच सारखी पायात पायात येतात. पण आता करणार काय? बादली  बाहेर  ठेवून दिली की झालं ! पण छे ! कुत्री त्यांचा घास घेतील लगेचच !

एखाद्या जीवाचं  जगणं नाकारण्याचा आपल्याला काय अधिकार ? छे….! पण मग ? करायंचं काय ? तूर्तास तरी ते दारं बंद करून ठेवणे, एवढंच हातात होतं .पण मनाचे दारं काही बंद ठेवता येईना. या काळात मांजर फार हिंस्त्र होते म्हणे ! दुपारी कामवाली आली. म्हटलं,” आता भांडी कुठं घासणार? “ती बिनधास्त.  “ इथच” म्हणून  तिने न घाबरता  दणादणा भांडी घासली. ते पाहून मला जरा आत्मविश्वास आला.

मी जरावेळाने हळूच  भीत भीत बादलीत डोकावून पाहिलं. मांजरीनेही क्षीणपणे डोळे उघडून माझ्याकडे पाहिलं. तिच्या अंगात अजिबात त्राण नव्हतं .तरीही चार पिल्लांची ती आई होती . त्याची काळजी तिच्यासाठी होती. दुसऱ्या दिवशी उठल्या उठल्या पाहिलं . तर तीही माझ्याचकडे पहात होती. डोळयात डोळे घालून… डोळ्यात पिल्लांची काळजी होती. दयायाचना होती, क्षमायाचना होती. पिलांची काळजी होती..माझंही मन द्रवलं .ठीक आहे राहील चार आठ दिवस. 

मीच घाबरलेली आहे, हे तिच्या लक्षात आलं असावं. तशाही  अवस्थेत  .! त्यामुळे माझ्यापासून काही भीती नाही, हे तिला कळलं असावं. ती निवांत झाली. डोळे मिटून पडून राहिली . श्रांत क्लांत ! मी मग ते दार  लावून माझी कामं करत राहिले. पण डोक्यात तिचेच विचार ! लांबून लांबून तिला पहात राहिले… ती काय करतेय? पिल्लं काय करताहेत ?

मग अनेकांनी सांगितलं, ती जाते म्हणे तिची पिल्लं घेऊन .पण कधी ?

हं … राहिल चार आठ दिवस. मी माझ्या कामात अडकले. तिलाही माझ्या मनातले भाव कळले असावेत. ती निवांत झाली. रोज पिलांना ठेवून बाहेर  जाऊन येऊ लागली. माझ्या भरोशावर? पण एकीकडे मी  अस्वस्थ होऊ लागले. कधी हलणार ही ? मला दारं उघडतां येईनात. आज उठल्या उठल्या पाहिलं तर कोणी दिसेनात . मला एकदम  सुनं सुनं वाटू लागलं. कुठे गेली असेल पिलांना घेऊन? नीट नेलं असेल ना? सुरक्षित जागा मिळाली असेल का? मग मी आजूबाजूच्यानाही विचारत राहिले. मांजराला पाहिलं का? पिल्ल दिसली का?… काय कारण होत मला एवढी चिंता करण्याचं ? जे अजिबात आवडत नव्हतं  त्यांचं पालकत्व घेण्याचं ? पण माझ्याही नकळत ते होत राहीलं. चार पाच दिवस तरी तो विचार काही डोक्यातून जाईना. मला अगदीच रितं रितं वाटत राहिलं. मलाच गंमत वाटली माझ्या मनाची… 

कसा जीव गुंततो ना ??

© सौ. शांभवी मंगेश जोशी

संपर्क – सुमन फेज 4, धर्माधिकारी मळा, एस्सार पेट्रोल पंपामागे, सावेडी, अहमदनगर 414003

फोन नं. 9673268040, [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ शहीद कॅप्टन तुषार महाजन रेल्वे स्टेशन ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

शहीद कॅप्टन तुषार महाजन रेल्वे स्टेशन ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

उधमपूर रेल्वे स्टेशन.. कश्मिर !

येथूनच तरणाबांड तुषार पुण्याला निघाला असताना त्याचे आई-बाबा, भाऊ त्याला निरोप द्यायला आले होते काहीच वर्षांपूर्वी! त्यांच्या विरोधाला न जुमानता पोरगं नॅशनल डिफेन्स अकॅडमी मध्ये सैन्य अधिकारी व्हायला निघालं होतं. बालहट्टापुढे काही चालतं का आईबापाचं? आणि आज त्याच स्टेशनवर ते त्याला घ्यायला आलेले आहेत… अखेरचे! तो आलाय… तिरंग्यात स्वत:ला गुंडाळून घेऊन… त्याचं स्वप्न साकार करून ! 

उधमपूर मध्ये शिक्षणतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्राचार्य देव राज यांचा हा धाकटा मुलगा. जन्म २० एप्रिल, १९८९ चा. थोरला मुलगा इंजिनिअर व्हायचं म्हणत होता. पण तुषार मात्र अगदी लहानपणापासून म्हणायचा… मला लष्करात जायचंय आणि अतिरेक्यांना ठार मारायचंय…. शाळेतल्या निबंधातही तुषार हेच लिहायचा ! त्याने कश्मिरातील अतिरेकी कारवाया आपल्या डोळ्यांनी पाहिल्या होत्या. देशाच्या दुश्मनांना आपण यमसदनी पाठवावे, असे त्याला मनातून सतत वाटे. 

भगवंताला अनन्य भावाने शरण येणाऱ्या भक्ताचे एक वैशिष्ट्य सांगताना माऊली ज्ञानोबारायांनी म्हणून ठेवलं आहे…” तैसा मी वाचूनि कांही, आणिक गोमटेंचि नाहीं। मजचि नाम पाहीं, जिणेया ठेविलें “

॥ ३३६ ॥ – याला माझ्यावाचून अन्य काहीच गोमटे, चांगले वाटत नाही. याने त्याच्या आयुष्याला माझेच नाव दिलेले असते. मी म्हणजेच तो ! इथे देव म्हणजे देश आणि भक्त म्हणजे तुषार महाजन. आपल्या संपूर्ण जीवनाला तुषारने जणू देशाचेच नाव दिले होते.

अत्यंत परिश्रमपूर्वक शिक्षण पूर्ण करून तुषार २००६ मध्ये एन. डी. ए. मध्ये दाखल झाले. नंतर पुढील उच्च लष्करी शिक्षणासाठी त्यांनी २००९ मध्ये इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये प्रवेश मिळवला आणि तुषार महाजन लष्करी अधिकारी झाले… अतिरेक्यांना ठार मारण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचे त्यांचे मनसुबे आता प्रत्यक्षात उतरणार होते —- त्यांना लगेचच त्यांच्या आवडीचं काम मिळालं. जम्मू-कश्मिरमध्ये अतिरेकी विरोधी अभियानात ते नेमाने सहभागी होऊ लागले. 

२० फेब्रुवारी, २०१६. पंपोर येथून सी.आर.पी.एफ. चे जवान अशीच एक अतिरेकी विरोधी मोहिम फत्ते करून तळावर परतत होते. इतक्यात त्यांच्या वाहनांवर अतिरेक्यांनी तुफान हल्ला चढवला. अकरा जवान गंभीर जखमी झाले! आपल्या सैन्याने अतिरेक्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलेच. पण ते चार अतिरेकी भर गर्दीतल्या एका बहुमजली इमारतीत आश्रयाला गेले. तिथे कित्येक लोक होते, त्यांच्या जीवाला मोठा धोका होता.—- जवानांनी त्या इमारतीला वेढा दिला. आतून अतिरेक्यांकडून अत्याधुनिक शस्त्रांनी तुफान गोळीबार होत होता. आपल्या जवानांनी जीव धोक्यात घालून इमारतीतून शंभरेक लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळवले. पण तोपर्यंत अतिरेक्यांच्या गोळीबारात स्पेशल फोर्सचे कॅप्टन पवन कुमार साहेब हुतात्मा झाले…. फार मोठी हानी होती ही.. अर्थात चार पैकी एक अतिरेकीही टिपला होता पवन कुमार साहेबांनी मरता मरता.

दिवस पुढे सरकत होता. आतून गोळीबार कमी होण्याची चिन्हे नव्हती. स्पेशल फोर्सची तुकडी पाठवून इमारतीवर रात्री हल्ला करण्याची योजना आखण्यात आली. ह्या हल्ल्यात सर्वांत पुढे असणार होते…. स्पेशल फोर्स कमांडो बनलेले कॅप्टन तुषार महाजन. 

रात्र पडली… त्यांचे कमांडो पथक गोळ्या अंगावर झेलत इमारतीत घुसले… त्यांच्यापुढे अतिरेक्यांना टिकाव धरता येईना… ते सर्व अतिरेकी इमारतीच्या आणखी आतील भागाकडे पळून गेले. तुषार साहेब त्यांच्या मागावर राहिले… त्यांनी अगदी समोरासमोर जाऊन त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला….. ती इमारत आगीने वेढली गेली… अतिरेक्यांनी आयईडीचे स्फोट घडवून आणले. आणि या भयावह लढाईत महाजन साहेबांनी स्वत:च्या छातीवर चार गोळ्या झेलल्या… जीवघेण्या जखमा करीत गोळ्या शरीरात घुसल्या…. अतिरेकी यमसदनी पोहोचले होते… पण कॅप्टन तुषार महाजन साहेब अमरत्वाची वाट चालू लागले होते… वैद्यकीय उपचार सुरू असताना कॅप्टन साहेब हे जग सोडून गेले ! त्यांच्या सोबत असलेले लान्स नायक ओम प्रकाश हे सुद्धा हुतात्मा झाले — भारतीय लष्कराने नंतर निकराचा हल्ला चढवत उरलेले तिन्ही अतिरेकी ठार मारले !.. पण आपण आपले तीन वाघ गमावले होते !

मुलाची शवपेटी पाहताच कॅप्टन तुषार साहेबांच्या वडिलांनी– प्राचार्य देव राय यांनी सॅल्यूटसाठी हात उभारला… लेकाला मानवंदना म्हणून. पोराने आपले स्वप्न खरे करून दाखवले होते. 

आधीच्या सव्वीस जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडनंतर त्यांनी आपल्या फेसबुकवर स्टेटस ठेवलं होतं आणि म्हटलं होतं… “ सो जायेंगे कल लिपटकर तिरंगे के साथ ! “ 

गोकुळ अष्टमी ! आठ सप्टेंबर दोन हजार तेवीस– या दिवशी उधमपूर रेल्वे स्टेशनचं नाव बदलून शहीद कॅप्टन तुषार महाजन रेल्वे स्टेशन असं करण्याचा निर्णय जाहीर झाला आहे ! शहीदांच्या स्मृती अशाच जागत्या ठेवायला पाहिजेत…! 

हुतात्मा कॅप्टन तुषार महाजन साहेब… अमर रहें ! जय हिंद ! 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “निवांत जगणं..” – लेखक : श्री विजय चौधरी ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “निवांत जगणं..” – लेखक : श्री विजय चौधरी ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर

सिकंदर भारत जिंकण्यासाठी आला असता एका निर्भेळ क्षणी एका खेडूत मुलीने त्यास सहजच प्रश्न विचारला, “भारत जिंकल्यावर तुम्ही काय करणार?” तो म्हणाला,”पुढचे देश जिंकीन आणि मजल दरमजल असं जिंकून मी जगज्जेता होईन.” “मग काय करणार?” हा प्रश्न पुन्हा त्या मुलीने विचारला. यावर तो म्हणाला,”मग काय?निवांतपणे जगेन.” यावर ती मुलगी खुदकन हसत म्हणाली, “मग आतापासूनच का निवांत जगत नाही?”

यातून सिकंदरला काय कळलं माहीत नाही;पण खरंच ही कहाणी बरंच काही सांगून जाते. आपणही असेच जगण्यातला निवांतपणा घालवून धावपळ करतोय, ती पुढे कधीतरी निवांत जगू, या भाबड्या आशेवर.

बऱ्याचदा इतरांना मागे टाकण्याच्या नादात आपल्याला आपलं वळण कधी येऊन गेलं, याचं भानही रहात नाही.

कितीही वेगाने पळालो तरी आपल्यापुढे कोणीतरी असणारच, कोणाजवळ काहीतरी वेगळे असणारच, कोणालातरी जास्त संधी मिळणारच, कोणाचंतरी वलय आपल्यापेक्षा अधिक  असणारच, कोणीतरी आपल्याहून सुंदर असणारच हे आपण विसरतो. तेव्हा, लक्ष आपल्या स्वाभाविक ध्येयावर आणि  जगण्यावर केंद्रित करावं, आपली गती आपल्या० प्रकृतीला साजेशी ठेवत आनंदाने जगत जावं; अन्यथा मित्र, नातेवाईक, सहकारी यांच्यापेक्षा आपण पुढे आहोत, हे सिद्ध करण्याच्या नादात आपण आयुष्याला वेगळ्या दिशेला नेऊन ठेवतो.म्हणून केवळ एकटं पुढे रहाण्यापेक्षा सवंगड्यांसोबत थोडं मागे राहिलेलं उत्तम नाही का? अन्यथा बऱ्याचदा यामुळे विनाकारण असुरक्षिततेची भावना वाढते, करायच्या राहून गेलेल्या गोष्टी आयुष्यात वैफल्य निर्माण करतात.

यासाठी पहिल्यांदा गरज आणि चैन यात फरक करणं, नितांत गरजेचं आहे. इतर धावतायेत म्हणून आपणही धावणं ठीक नाही. जगणं हे राईसप्लेटसारखं असावं, त्यात कसं साऱ्या पदार्थांना आपापल्या मर्यादेत स्थान असतं आणि  त्यामुळेच ते रुचकर ठरतं. जर चटणीची जागा भाजीला दिली, तर ताटाचं संतुलन बिघडतं आणि  जेवणाचा गोंधळ उडतो. जगण्याचंही काहीसं असंच आहे. ते सर्वसमावेशक, चौफेर असेल, तर ते सुखकर ठरतं. एखाद्या मोठ्या यशाच्या प्रतिक्षेत रोजच्या जगण्यातील छोटे छोटे आनंदाचे क्षण निसटून जाऊ देऊ नका.ते क्षण तेव्हाचे तेव्हाच जगून घ्या, लुटून घ्या.

आपल्या आवडीच्या व आनंद देणाऱ्या गोष्टींसाठी आयुष्य पडलेय, हे पालुपद आयुष्यच कुरतडून टाकते. त्यामुळे ते क्षण वेचा.

तारुण्यात शक्ती असते, वेळ असतो, पण पैसा नसतो. पुढे शक्ती असते, पैसा असतो; पण वेळ नसतो आणि उतारवयात वेळही असतो, पैसाही असतो पण शक्ती उरत नाही.यातील सुवर्णमध्य गाठून समरसून जगावं.

स्टीव्ह जॉब्स म्हणतात, हरवलेल्या वस्तु गवसतील; पण वेळ नाही. आजारी पडून शस्त्रक्रियेच्या टेबलावर पोचल्यानंतर “निरोगी कसं जगावं” हे पुस्तक वाचुन काय उपयोग ?

एक शायर म्हणतो……

उम्र-ए-दराज

माँगकर लाये थे चार दिन,

दो आरजु में कट गये,

दो इंतजार में

लेखक : श्री विजय चौधरी

प्रस्तुती : सौ.शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आनंदाच गणित… ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

आनंदाचं गणित ☆ श्री अरविंद लिमये ☆

प्रत्येक भाषेत प्रत्येक शब्दाला पर्यायी शब्द उपलब्ध असतातच.ते समानार्थी तरी असतात किंवा त्या शब्दाच्या अर्थछटेशी जवळीक दाखवणारे तरी. मात्र क्वचित कधी वरवर एकाच अर्थाचे वाटणाऱ्या दोन शब्दांमधे ठळकपणे विरोधी सूर उमटत असल्याचे प्रत्ययास येते. ‘अधिक’ आणि ‘अति ‘ हे मराठी भाषेतले असे दोन शब्द! यातील ‘अधिक’ या शब्दात सकारात्मकता ओतप्रत भरलेली तर ‘अति’ हा शब्द थेट नकारात्मकतेकडे झुकणारा!

‘अधिक’म्हणजे जास्त, जादा. हे झाले त्याचे सर्वसाधारण अर्थ. पण त्याच्या वरकड, वरचढ या अर्थांतून वेगळीच छटा दृश्यरूप होते. अतिरिक्त, फार हे दोन्ही अर्थ अपेक्षा आणि वास्तव यातील संख्यात्मक किंवा गुणात्मक प्राबल्य ध्वनित करतात. गैरवाजवी, सव्याज, बहुसंख्य या अर्थांचा रोख वर उल्लेखित अर्थांपेक्षा सर्वस्वी वेगळ्या बाबींकडे जाणवतो.

‘अधिक’ या शब्दाच्या संयोगाने तयार झालेल्या इतर अनेक शब्दांचे अर्थ,रंग,रुप आणि आवाका विचारात घेतला तर एखाद्या शब्दाची व्याप्ती किती थक्क करणारी असू शकते याची प्रचिती नक्कीच येईल.उदाहरणार्थ अर्धेअधिक,निम्मेअधिक, सर्वाधिक, अधिकउणा, अधिकरण,  अधिकाधिक, अधिकार,अधिकाराग्रहण यासारखे ‘अधिक’ शब्दाचे बोट धरून आपली स्वतंत्र वाटचाल करणारे कितीतरी शब्द! ‘अधिक’ या शब्दाला अपेक्षित असणारे ‘अधिक्य’ या शब्दांनाही अभिप्रेत आहेच आणि हे अधिक्य हाच या सर्व शब्दांचा ठळक असा गुणविशेष आहे!

‘अधिक’ आणि ‘उणे’ या परस्परविरुद्ध अर्थ असणाऱ्या दोन भिन्न शब्दांची न् आपली पहिली भेट आणि ओळख होते ती एकत्रितपणेच आणि तीही अगदी आपल्या बालवयात.याला निमित्त असतं प्रथमच नव्याने परिचय होणाऱ्या गणित या विषयाचं! तेव्हापासूनच ‘अधिक ‘ आणि ‘उणे’ हे शब्द एरवीही कधी कानावर पडले तरी नजरेसमोर येतात ती गणिताला अभिप्रेत असणारी त्यांची विशिष्ट अशी चिन्हांकित रुपेच.

या दोन्ही शब्दांना अपेक्षित असणारी बेरीज आणि वजाबाकी आयुष्यातही समजून घेतली तर जगणं अधिकच अर्थपूर्ण होईल.जगणं खरंतर सर्वांनाच आनंदी असावं असंच वाटतं खरं,पण त्या आनंदाचं गणित मात्र सांख्यिकी गणितासारखं किचकट होऊन बसतं बऱ्याचदा.योग्यवेळी हितकारक गोष्टींची बेरीज आणि अहितकारक गोष्टींची वजाबाकी करता आली तर किचकट वाटणारं आनंदाचं गणित नकळत सहज सोडवता येईल.ते कसं सोडवायचं हे सांगायला वेळोवेळी आपल्याला सहाय्यभूत होतात त्या अनेक अर्थपूर्ण शब्दांच्या सहाय्याने आकाराला आलेले सार्थ वाक्प्रचार न् म्हणीच!

अगदी ‘अधिक’ या शब्दाच्या संदर्भापुरता विचार केला तरी अशा कितीतरी म्हणी चटकन् आठवतात.’अधिकस्य अधिकं फलं’ असा संदेश देत सत्कर्मांना प्रवृत्त करतानाच त्या ‘अति सर्वत्र वर्जयेत’ अशा उपदेशाबराबरच ‘अति तेथे माती’ असा सावधानतेचा इशाराही देतात.त्या सगळ्याच जगण्याची दिशा दाखवणाऱ्या म्हणींना अभिप्रेत असणारं जगणं समजून घेतलं तरच आयुष्यातलं आनंदाचं गणित किचकट न वाटता सहजपणे सुटणं अधिकच सुलभ होईल एवढं खरं!!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “आरती चैतन्य विनायकाची…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ “आरती चैतन्य विनायकाची…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

अवयवदानाचा प्रणेता गणपती बाप्पा याला मी ‘चैतन्य विनायक‘ म्हणतो.

ज्यांच्या आयुष्यातील चैतन्य हरवून गेलं आहे,  अशांचे जीवन पुन्हा चैतन्यदायी करण्याची किमया अवयवदानामध्ये आहे. जगातील प्रत्यक्ष असेल-नसेल पण किमान कल्पनेतील, पहिल्या अवयव प्रत्यारोपणाचे उदाहरण म्हणून आपण या देवाकडे पाहतो आणि पाहूया. म्हणूनच या चैतन्य विनायकाची मी रचलेली आरती या गणेशोत्सवात आपण सर्वांच्या तोंडी यावी यादृष्टीने प्रयत्न करूया.  ज्यांना शक्य आहे त्यांनी याला योग्य ती चाल देऊन चालीवर म्हणावी आणि त्याची ऑडिओ व्हिडिओ क्लिप आपल्या ग्रुप वर टाकावी अथवा मला पाठवावी.  या अवयवदानाच्या चळवळीला एक नवं अधिष्ठान प्राप्त करून देऊ या आणि या गणेशोत्सवात मोठा जनजागर घडवूया.

🕉️ श्री चैतन्य  विनायकाची आरती 🕉️

गणपती बाप्पा मोरया,

चला आरती गाऊया

तो सर्वांचा भाग्यविधाता,

तो विद्येचा स्वामी दाता,

त्या चरणांवर सुखे नांदता,

लीन तिथे हो होऊया

गणपती बाप्पा मोरया,

चला आरती गाऊया

अवयव रोपित प्रथम देवता

अवयवदाना स्फूर्ती मिळता

अवयवदाते बनुया आता

जीवन दान करूया

गणपती बाप्पा मोरया,

चला आरती गाऊया

बुध्दी शक्ती त्याची महत्ता,

चरणी त्याच्या सर्व सुबत्ता,

चरण दर्शने मना शांतता,

तृप्त दर्शने होऊया

गणपती बाप्पा मोरया,

चला आरती गाऊया

वाद्य वाजवू तया स्वागता

आनंदे नाचू गुण गाता

टाळ्या वाजवू टाळ वाजता

सारे मिळूनी पूजुया

गणपती बाप्पा मोरया,

चला आरती गाऊया

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print