मराठी साहित्य – विविधा ☆ रंगबावरा वसंत… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆
सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर
विविधा
☆ रंगबावरा वसंत… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆
आज सकाळी नेहमीसारखी फिरायला बाहेर पडले.नेहमीचा रस्ता,पण चालता चालता एकदम थांबले.माझं लक्ष बाजूच्या झाडाकडं गेलं. तर एरवी उदास वाटणाऱ्या या झाडाचा आजचा रुबाब बघितला.
हिरवट, पिवळ्या कळ्या फुलांची झुंबरे त्यावर लटकत होती. ही किमया कधी झाली असा प्रश्र्न पडला, तर शेजारचा गुलमोहर तसाच,कात टाकल्यासारखा. लाललाल लहानशा पाकळ्या आणि मध्ये शुभ्र मोती असे गुच्छ दिसू लागलेले. मला वाटलं लाजून लालेलाल झाला कि काय?
मग चटकन लक्षात आलं कि या तर ऋतुराजाच्या आगमनाच्या खुणा.
शहरी वातावरणात राहणारे आपण निसर्गाच्या या सौंदर्याच्या जादूला नक्कीच भुलतो. शिशिरातील पानगळीने,तलखीने सृष्टीचे निस्तेज उदालसेपण आता संपणार.कारण ही सृष्टी वासंतिक लावण्य लेऊन आता नववधू सारखी सजते.वसंत राजाच्या स्वागतात दंग होते.कोकिळ आलापांवर आलाप घेत असतो.लाल चुटुक पालवी साऱ्या वृक्षवेलींवर डुलत असते.उन्हात चमकताना जणू फुलांचे लाललाल मणी झळकत असल्यासारखे वाटते.चाफ्याच्या झाडांमधून शुभ्रधवल सौंदर्य उमलत असते.आजून जरा वेळ असतो, पण कळ्यांचे गुच्छ तर हळुहळू दिसायला लागतात.फुलझाडांची तर गंधवेडी स्पर्धाच सुरु असते.केशरी देठांची प्राजक्त फुले,जाई,जुई चमेली,मोगरा, मदनबाण,नेवाळी, सोनचाफा अगदी अहमहमिकेने गंधाची उधळण करत असतात.
या सुगंधी सौंदर्याला रंगांच्या सुरेख छटांनी बहार येते.फार कशाला घाणेरीची झुडपं.लाललाल आणि पिवळ्या,केशरी व...