श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ?

☆ उकडीचा मोदक… ☆ श्री सुहास सोहोनी ☆

तुम्हाला उत्तम प्रतीचा उकडीचा मोदक बनवायचा असेल तर तुमच्या आयुष्यातला मोठा काळ हा रत्नागिरी, गुहागर, केळशी अशा कुठल्या तरी ठिकाणी जावा लागतो. कारण हाताच्या चवीइतकाच मातीचा सुगंधही इथे महत्वाचा आहे. तसंच, हा पूर्णतः ‘तालमीचा राग’ आहे. यूट्यूब वर बघून हा येऊ शकत नाही. आई, आज्जी, आत्या अशा कुणाकडून तरी त्याची रीतसर तालीम घ्यावी लागते.

आपल्याकडे बाजारात उकडीचा मोदक बनवायचे ‘साचे’ मिळतात. ही ‘चीटिंग’ आहे. हे म्हणजे ऑटोट्युनर वापरून सुरेल होण्यासारखं झालं. जातिवंत खवैयाला असा ‘ साचेबद्ध ’पणा रुचत नाही.

मोदक हा व्हीआयपी पाहुणा आहे. त्याचं स्वागत टेबल-खुर्चीवर बसून नाही, तर पाटावर मांडा ठोकून करायचं असतं. सोबत आमटी-भात, बटाट्याची भाजी, चटणी वगैरे माननीय पाहिजेतच. मोदक स्वतः सुद्धा येताना कधी एकटा येत नाही, तर ‘निवग्री’ नावाच्या आपल्या धाकट्या बहिणीला घेऊन येतो. निखळ मधुर रसाच्या मोदकाबरोबर निवग्रीची ही चमचमीत जोड हवीच.

तर असा दिमाखात आलेला मोदकराज तुमच्या पानात पडतो, त्यावर साजूक तुपाची धार पडते, आणि त्याचा पहिला घास जेव्हा तुम्ही घेता, त्या वेळी होणाऱ्या भावनेलाच आपल्या संतसज्जनांनी ‘ब्रह्मानंदी टाळी लागणे’ असं म्हणलेलं आहे. यानंतर असते ती केवळ तृप्तीची भावना. खाल्लेले मोदक मोजणं म्हणजे रियाजाचे ‘घंटे’ मोजण्यासारखं आहे. त्याला फारसं महत्व नाही. ‘समाधान’ हेच खरं इप्सित.

बरं, भरपूर मोदक केवळ खाऊन झाले म्हणजे झालं, असं नाही. त्यानंतर संपूर्ण दुपार झोपण्यासाठी राखीव ठेवावी लागते. मुळात, मला ‘सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं ?’ असं कुणी विचारलं तर मी तत्क्षणी सांगीन, ‘दुपारची झोप’!

‘रात्रीची झोप’ हे धर्मकर्तव्य आहे, तर ‘दुपारची झोप’ हा रम्य सोहळा. डोअरबेल बंद, फोन सायलेंटवर, पूर्ण अंधार, डोक्यावर पंखा अशा स्थितीत जाड पांघरुणात शिरून तो साजरा करायचा असतो. आणि हा सोहळा जर मोदकाच्या आगमनाने सुफळ झाला तर अजून काय हवं ? सुमारे ३ तास निद्रादेवीच्या सान्निध्यात घालावल्यावर जड डोळ्यांनी चहाचा पहिला घोट घेतल्यावरच मोदकाची इतिकर्तव्यता पूर्ण होते.

अशा या उकडीच्या मोदकाचा आपण आस्वाद घेऊया. 

सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !

लेखक : अज्ञात 

लेखक : सुहास सोहोनी

मो ९४०३०९८११०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
3 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments