सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

बरं… भाग – २ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(कदाचित नानी आसपास असल्यामुळे भांडण वाजत नसावं.  पण जेव्हा जगाबरोबर नानी निद्रावस्थेत गेली तेव्हा तिला दारापलीकडून जोरजोरात उच्चारलेले शब्द ऐकू आले.) – इथून पुढे –  

” हे बघ राघव! तू तुझ्या मतांवर इतका ठाम असशील ना तर माझे काही म्हणॉणे नाही.  तू तुझा स्वतंत्र, मी माझी. मला तुझी ही अरेरावी मुळीच चालणार नाही. लक्षात ठेव या घरातल्या प्रत्येक गोष्टींवर माझा शंभर टक्के अधिकार आहे. मला माझी मतं आहेत आणि मी तुझ्यावर एक कपर्दीकही अवलंबून नाही.रिमाचा सांभाळ करायलाही मी तुझ्यापेक्षा जास्त समर्थ आहे.”

नानी आतल्या आत प्रचंड हादरली होती. आर्थिक स्वातंत्र्यांमधून मिळालेली ही आवाजाची धार तिला जाणवत होती. पण मग नानीने असा आवाज कधीच का नाही वापरला?

अशा पार्श्वभूमीवर तिला तिची आणि नानांची ही भांडणे आठवत. जेव्हां ती खोदून खोदून आठवायची तेव्हा तिच्या मनात आलं सारं काही सोडून जाण्याचा विचार तिच्याही मनात नव्हता का कधी आला? पण राघव साठी ती मिटूनच राहिली.  मनातलं ओठावरही आलं नाही. एक घाव दोन तुकडे हा विचार तर फारच दूर राहिला. 

राघवचं आणि सुनेचं  नक्की काय बिनसलं होतं याचा खोलवर जाऊन मागोवा घेण्याचा नानी प्रयत्न सुद्धा करत नाही.  कोण चूक? कोण बरोबर ?कसं ठरवायचं आणि का ठरवायचं? मुलगा म्हणून राघवच बरोबर असही तिला वाटत नाही आणि सुनेने थोडं पडतं घ्यावं असंही वाटत नाही.  पण यांचं नातं मात्र तुटू नये असं नक्कीच वाटतं. रिमाच्या भविष्याचं काय असंही वाटतं. 

नानी गप्प बसली तरी नानीला दुःख होतं.  कळून चुकतं इथेच सारं बदललंय. नाती कचकड्याची होत आहेत. संसाराच्या व्याख्या बदलत आहेत.  जो तो आत्मकेंद्रित झालाय.  ही आपली संस्कृती आहे का? हे लोण पलीकडचं आहे. 

पण तरीही नानीच्या मनात गोंधळ असतो. नाते टिकवणे म्हणजे नक्की काय?  रडत खडत निभावणं याला नातं टिकवणं म्हणायचं का? की” मेरी झाँसी नही दूंगी” या प्रकारातला आवेश दाखवून दणादण कापाकापी करायची?

राघवच्यात  नानांचे काही गुण असणारच. तसं पाहिलं तर नानीचं अवंतीशी— सुनेशी— नातं चांगलं आहे. मोकळेपणाचे आहे.  ती तिच्या ऑफिसमधल्या घटना सांगते.  तिच्या मैत्रिणींबद्दलही  बोलते. ऑफिसातल्या सहकाऱ्यांच्या नात्यांबद्दल बोलते आणि बिनदिक्कतपणे राघवच्याही तक्रारी करते.कधी कधी संगणक,मोबाईल बाबतीत नानीची शिकवणीही घेते.   नानी तिचं हरवलेलं रूप अवंतीत  पाहते आणि त्यावेळी नानीला एक स्त्री म्हणून सुनेची कणव येते आणि खूप बदललंय असं वाटत असतानाच नानीला वाटतं छे! सारं काही तसंच आहे अजून.  समाज बदलतो, पण तो फक्त वरवर. त्याचा वेश बदलतो, खाद्य बदलते, जगण्याची तंत्रं बदलतात, पद्धत बदलते, वागणं बदलतं, प्रगतीच्या भुलभुलय्यात सारेच भरकटतात.  पण या ऑर्बिट च्या फेऱ्यात सापडलेलं मन काही बदललेलं नाही. माणसातल्या माणूसपणातली प्रगती काही माणसाला या तंत्रज्ञानाने अजूनही साधता आलेली नाहीच. 

रिमाचं आणि नानीचही एक सुंदर नातं आहे.  आजी आणि नातीचं नातं! पण या नात्यातही खूप बदललेले कंगोरे आहेत. रिमाच्या हुशारीने, दिसण्याने, चातुर्याने नानीचा उर एकीकडे मायेने भरून जातो तर कधी तिच्यातला फटकळपणा, ताडताडपणा,भाषा, बदललेला पेहराव बघताना नानी मनातल्या मनात धास्तावते.  तिसऱ्या नव्या पिढीचं प्रातिनिधिक स्वरूप तसं नानीच्या पचनी नाही अजून पडलेलं. 

एक दिवस नानी  रिमाला चुचकारत म्हणाली होती,” रिमा बेटा! अंधार पडायच्या आत घरी येत  जा ग! काळजी वाटते आणि हे बघ तू छानच दिसतेस पण इतका उघडेपणा कशाला हवा? झाकण्यातही अधिक सौंदर्य असतं.”

तेव्हां ती म्हणाली होती,

“आज्जी आजकालची फॅशन आहे ही! नाहीतर काकूबाईचं लेबल लागेल मला. आणि तुझी “सातच्या आत घरात” ही व्याख्या बदल बरं.  खूप मोठी स्वप्नं आहेत माझी आणि ती पुरी करण्यासाठी मला या वेळा कशा सांभाळता येतील? आज्जी यु आर द बेस्ट आज्जी इन द वर्ल्ड.  मी माझ्या मित्रांना, मैत्रिणींना नेहमी सांगते माझ्या आजीचे विचार खूप मॉड आहेत.  सो प्लीज नाऊ डोन्ट बी आउट डेटेड हं!”

“आउटडेटेड” नक्की काय असतं याचा कधीकधी नानी विचार करते, पेपरात वाचलेल्या, टीव्हीवर पाहिलेल्या, आजूबाजूला चर्चेत असणाऱ्या अनेक अत्याचाराच्या, बलात्काराच्या, आत्महत्येच्या, नैराश्याच्या, एकतर्फी हिंसक प्रेमाच्या, अपहरणाच्या,जिहादच्या, खुनाच्या बातम्या नानीला नक्कीच अस्वस्थ करतात.  कळीचं फुल बनत असलेल्या रिमाला बघताना उर धडकतोच. सोशल मीडियाचा वाढलेला राक्षस समाजाचा गळा दाबत आहे असंही नानीला वाटतं. या राक्षसाने चुकून आपल्या घराचं दार कधी ठोकलं तर?  नानी घाबरते. विलक्षण थरकाप होतो तिचा.  पण त्याचवेळी तिला हेही जाणवतं आपल्या आवाकाच्या बाहेर आहे हे सगळं आता. मग तिला धीर मिळतो तो घरातल्या देव्हाऱ्याचा.  निदान तो तरी आहे अजून, तिला माहित आहे, ना नमस्कार करायला कुणाला वेळ ना दिवा लावायला सवड. कधीतरी आठवण आल्यासारखे हात जोडायचे.  पण नानी मात्र त्या देवांशीच बोलते.  दिवा उजळवून त्यांची आरती करते. त्याच्याशी तिचा मूक ,अश्वासक संवाद घडतो.सुखाय,रक्षणाय.सर्वांच्याच.

अनेक चर्चा घडतात.  घटनांचं मंथन होतं. मतांची देवाण-घेवाण होते आणि शेवटी एकच निष्कर्ष असतो “कालाय तस्मै नमः”

सकाळी फिरताना नानीला डी बिल्डिंग मधले सरदेसाई ठराविक वेळेला भेटायचे. गेल्या कित्येक दिवसात ते दिसले नाहीत. बऱ्याच दिवसांनी नानीला त्यांची अनुपस्थिती जाणवली.  नानींना त्यांच्याविषयी एवढेच माहीत होतं की त्यांचं स्वतःचं वाकडेवाडीत घर होतं. एकटेच राहत होते.  पत्नीचे निधन काही वर्षांपूर्वी झालेले  होते.  पण एक दिवस उंबरठ्यावर पाय अडखळून ते पडले आणि मग त्यांच्या जीवनाचं तंत्रच बदललं. शेवटी मुलीने त्यांना तिच्या घरी आणले.  तेव्हापासून सरदेसाई या कॉम्प्लेक्सचे सदस्य होते.  पण काही दिवसापूर्वीच कळलं की आता ते कामशेतला वृद्धाश्रमात असतात. त्यावरूनही पोडियमवर चर्चा झाली.कारणमीमांसा झाली,बदलत्या कुटुंब संस्थेवर ओरखडे उमटले, आजकाल म्हाताऱ्या माणसांची जबाबदारी कोण घेतोय? वृद्धाश्रम प्रथेची आणि संस्कृतीचा ऱ्हास यावर या निमित्ताने खूप बोललं गेलं.  पण याही वेळी नानीने चर्चेत भाग घ्यायचं मात्र टाळलं. “काळाची गरज” या बॉक्समध्ये ती बरंच काही जमवून ठेवते.

– क्रमशः भाग दुसरा 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments