श्री अरविंद लिमये

? विविधा ?

आनंदाचं गणित ☆ श्री अरविंद लिमये ☆

प्रत्येक भाषेत प्रत्येक शब्दाला पर्यायी शब्द उपलब्ध असतातच.ते समानार्थी तरी असतात किंवा त्या शब्दाच्या अर्थछटेशी जवळीक दाखवणारे तरी. मात्र क्वचित कधी वरवर एकाच अर्थाचे वाटणाऱ्या दोन शब्दांमधे ठळकपणे विरोधी सूर उमटत असल्याचे प्रत्ययास येते. ‘अधिक’ आणि ‘अति ‘ हे मराठी भाषेतले असे दोन शब्द! यातील ‘अधिक’ या शब्दात सकारात्मकता ओतप्रत भरलेली तर ‘अति’ हा शब्द थेट नकारात्मकतेकडे झुकणारा!

‘अधिक’म्हणजे जास्त, जादा. हे झाले त्याचे सर्वसाधारण अर्थ. पण त्याच्या वरकड, वरचढ या अर्थांतून वेगळीच छटा दृश्यरूप होते. अतिरिक्त, फार हे दोन्ही अर्थ अपेक्षा आणि वास्तव यातील संख्यात्मक किंवा गुणात्मक प्राबल्य ध्वनित करतात. गैरवाजवी, सव्याज, बहुसंख्य या अर्थांचा रोख वर उल्लेखित अर्थांपेक्षा सर्वस्वी वेगळ्या बाबींकडे जाणवतो.

‘अधिक’ या शब्दाच्या संयोगाने तयार झालेल्या इतर अनेक शब्दांचे अर्थ,रंग,रुप आणि आवाका विचारात घेतला तर एखाद्या शब्दाची व्याप्ती किती थक्क करणारी असू शकते याची प्रचिती नक्कीच येईल.उदाहरणार्थ अर्धेअधिक,निम्मेअधिक, सर्वाधिक, अधिकउणा, अधिकरण,  अधिकाधिक, अधिकार,अधिकाराग्रहण यासारखे ‘अधिक’ शब्दाचे बोट धरून आपली स्वतंत्र वाटचाल करणारे कितीतरी शब्द! ‘अधिक’ या शब्दाला अपेक्षित असणारे ‘अधिक्य’ या शब्दांनाही अभिप्रेत आहेच आणि हे अधिक्य हाच या सर्व शब्दांचा ठळक असा गुणविशेष आहे!

‘अधिक’ आणि ‘उणे’ या परस्परविरुद्ध अर्थ असणाऱ्या दोन भिन्न शब्दांची न् आपली पहिली भेट आणि ओळख होते ती एकत्रितपणेच आणि तीही अगदी आपल्या बालवयात.याला निमित्त असतं प्रथमच नव्याने परिचय होणाऱ्या गणित या विषयाचं! तेव्हापासूनच ‘अधिक ‘ आणि ‘उणे’ हे शब्द एरवीही कधी कानावर पडले तरी नजरेसमोर येतात ती गणिताला अभिप्रेत असणारी त्यांची विशिष्ट अशी चिन्हांकित रुपेच.

या दोन्ही शब्दांना अपेक्षित असणारी बेरीज आणि वजाबाकी आयुष्यातही समजून घेतली तर जगणं अधिकच अर्थपूर्ण होईल.जगणं खरंतर सर्वांनाच आनंदी असावं असंच वाटतं खरं,पण त्या आनंदाचं गणित मात्र सांख्यिकी गणितासारखं किचकट होऊन बसतं बऱ्याचदा.योग्यवेळी हितकारक गोष्टींची बेरीज आणि अहितकारक गोष्टींची वजाबाकी करता आली तर किचकट वाटणारं आनंदाचं गणित नकळत सहज सोडवता येईल.ते कसं सोडवायचं हे सांगायला वेळोवेळी आपल्याला सहाय्यभूत होतात त्या अनेक अर्थपूर्ण शब्दांच्या सहाय्याने आकाराला आलेले सार्थ वाक्प्रचार न् म्हणीच!

अगदी ‘अधिक’ या शब्दाच्या संदर्भापुरता विचार केला तरी अशा कितीतरी म्हणी चटकन् आठवतात.’अधिकस्य अधिकं फलं’ असा संदेश देत सत्कर्मांना प्रवृत्त करतानाच त्या ‘अति सर्वत्र वर्जयेत’ अशा उपदेशाबराबरच ‘अति तेथे माती’ असा सावधानतेचा इशाराही देतात.त्या सगळ्याच जगण्याची दिशा दाखवणाऱ्या म्हणींना अभिप्रेत असणारं जगणं समजून घेतलं तरच आयुष्यातलं आनंदाचं गणित किचकट न वाटता सहजपणे सुटणं अधिकच सुलभ होईल एवढं खरं!!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments