सौ राधिका भांडारकर

☆ “अक्षय तृतीया…” ☆ सौ राधिका भांडारकर 

अक्षय तृतीयेचा सण दरवर्षी वैशाख शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो.  यावर्षी अक्षय तृतीया १० मे ला साजरी होत आहे.  हा सण गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेशसह संपूर्ण उत्तर भारतात साजरा केला जातो.

अक्षय याचा अर्थ ज्याचा क्षय होत नाही ते.  या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही असा संकेत आहे.  या दिवशी आपण दान केले तर विपुल प्रमाणात ज्या वस्तूंचे दान केले त्या पुन्हा आपल्याजवळ प्राप्त होतात अशी भावना आहे.

अक्षय तृतीया सणाच्या संदर्भात अनेक पौराणिक कथा आहेत.  भारतीय संस्कृतीचा इतिहास आणि काही पौराणिक कथानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेक महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत.

याच दिवशी भगवान गणेशांना वेदमहर्षी व्यासांनी महाभारताचे काव्य सांगण्यास सुरुवात केली होती. 

अक्षय तृतीया म्हणजे भगवान विष्णूचा सहावा अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान परशुराम यांचा जन्मदिवस आहे.

अक्षय तृतीयेच्या दिवशी नरनारायण आणि हयग्रीव यांचाही जन्म झाला होता.

अक्षय तृतीयेला सत्ययुग संपून त्रेता युगाचा प्रारंभ झाला असं म्हणतात.

हा दिवस म्हणजे  माता अन्नपूर्णेचा जन्मदिवस आहे.  त्यामुळे या दिवशी अन्नपूर्णेची आराधना केल्यास आयुष्यभर घरात सुखसमृद्धी नांदते.

याच  दिवशी  श्रीकृष्णाने मित्र सुदाम्याचे दारिद्र्य संपवले.

वनवासी असलेल्या पांडवांसाठी श्रीकृष्णाने द्रौपदीला अक्षयपात्र भेट दिले होते ज्याचा उल्लेख ‘द्रौपदीची थाळी’ असा केला जातो ज्यामुळे वनवासातही पांडवांना कधीही उपासमार घडली नाही.

अक्षय तृतीयेलाच पृथ्वीवर गंगा अवतरली होती.

भगवान कुबेराने श्री लक्ष्मी मातेची आराधना केली ज्यामुळे कुबेराला देवांचा खजिनदार म्हणून नेमण्यात आले.

जैन बांधव हा दिवस भगवान आदिनाथ यांच्या स्मरणार्थ साजरा करतात.

जगन्नाथ पुरी येथे याच दिवसापासून रथयात्रेला सुरुवात होते असा हा साडेतीन मुहूर्तांपैकी असलेला एक मंगल पवित्र दिन!

अक्षय तृतीयेचा हा सण खानदेशात मात्र अगदी दिवाळी सारखाच साजरा केला जातो.  तिकडे या सणास आखाजी असे म्हणतात.

आखाजी हा जसा सासुरवाशिणींचा सण तसेच तो पितरांचाही सण मानला जातो. खरं म्हणजे हा शेतकरी बांधवांचा सण. मातीशी अतूट नातं सांगणारा सण. या दिवशी शेतमजुरांना सुट्टी असते.  सालगडी (सालदार) यांची नवी कामेही ठरविली जातात.  खानदेशातील आगळीवेगळी अक्षय तृतीया परंपरा आजही तितक्याच, भक्तीभावाने,  उत्साहाने पाळली जाते.  या सणाला अक्षय घट म्हणजे पाण्याची घागर भरली जाते.

वसंत ऋतू संपून ग्रीष्माची चाहूल लागते. घागर हे त्याचं प्रतीक आहे.  या घागरीवर छोटे मातीचे भांडे ठेवले जाते त्यावर खरबूज,  सांजोऱ्या,  आंबे ठेवले जातात. यातील छोटे भांडे हे पितरांसाठी असते.  आधी ह्या पितरांना पाण्याचा घट दिला जातो त्यानंतरच नवीन माठ आणून घरात वापरला जातो.

पाटावर धान्य पसरून सभोवती रांगोळी घालून त्यावर या घटाची पूजा केली जाते.  या पूजेला ‘घागर भरणे’ असेही म्हटले जाते.  पितरांचे श्राद्ध किंवा तर्पणविधी या दिवशी केला जातो.  घरातल्या उंबरठ्याचे औक्षण करून आपल्या पूर्वजांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केले जाते.  एकेका पूर्वजांची नावे घेऊन त्यांना आमंत्रण दिले जाते व चुलीवर पितरांना घास अर्पण केला जातो.  या दिवशी घरोघरी पुरणपोळी, आमरस, कटाची आमटी,(रश्शी) कुरडया, पापड,  भजी असा साग्रसंगीत नैवेद्य दाखवला जातो.

अक्षय तृतीया— आखाजी हा श्रमण संस्कृती दर्शविणारा  कृषी उत्सव आहे.याच दिवसापासून शेती  कामाला सुरुवात होते.  हलोत्सव, वप्पमंगल अशी वेगवेगळी नावे या सणाला आहेत.

आखाजी म्हणजे माहेराचा  विसाव्याचा आरामाचा सण. सासरी कामाच्या घबाडग्यातून मुक्त होऊन माहेरी लाडकोड, कौतुक करवून घेण्याचा सण.

घरोघरी उंच झाडाला झुले बांधले जातात. खानदेशात सासुरवाशिण लेकीला गौराई म्हणतात आणि जावयाला शंकर.

“ वैशाखाच उन्हं

 खडक तापून लाल झाले वं माय”

 

“झुयझुय पानी व्हाय तठे कसाना बाजार वं

 माय माले बांगड्या ली ठेवजो ली ठेवजो

बंधूंना हातमा दी ठेवजो दी ठेवजो

बन्धु  मना सोन्याना सोन्याना

पलंग पाडू मोत्याना मोत्याना”

 

“ गडगड रथ चाले रामाचा

नि बहुत लावण्याचा

सोला साखल्या रथाला

नि बावन खिडक्या त्याला”..

अशी गोड बोली भाषेतील अहिराणी गाणी सख्या झुल्यावर झुलताना आनंदाने गातात, अक्षय तृतीयेच्या निमित्ताने जपलेली ही लोकपरंपरा अतिशय लोभस आहे.

ऋतुचक्र फिरत असते.  एका मागून एक ऋतू बदलतो. वसंत सरतो ग्रीष्म येतो. आपले सारेच भारतीय सण नव्या ऋतुच्या स्वागतासाठी पारंपरिक आणि शास्त्रयुक्त पद्धतीने साजरे केले जातात. त्यातलाच हा अक्षय तृतीयेचा सण.  पाण्याची घागर भरून उन्हाळ्याचे स्वागत करणारा सुंदर सण!!

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments