मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बाबांची आठवण… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? मनमंजुषेतून ?

बाबांची आठवण… ☆ श्री मकरंद पिंपुटकर

मी सातवी आठवीत असतानाची गोष्ट. आम्ही गुजरातमध्ये उंबरगावला राहायचो तेव्हा, तालुक्याचं ठिकाण असलेलं छोटंसं गाव. बाबा तिथल्या एका को ऑपरेटिव्ह बँकेत होते. 

संध्याकाळी घरी आले की तडक ते परसदारातल्या त्यांच्या छोट्याश्या बागेत जायचे. गुलाबाभोवतीचं तण काढ, तुळशीला पाणी दे, अबोलीभोवतीची माती उकर, कडीपत्त्याकडे लक्ष दे – काही ना काहीतरी खुडबुड करायचे ते. 

सुट्टीचा दिवस असला किंवा शनिवारी अर्धा दिवस असला की मग घरात काहीतरी काम काढून बसायचे ते. 

एखाद्या खुर्चीचा डुगडुगता पाय दुरुस्त कर, आरामखुर्चीचं कापड शिवून घे, कंदिलाच्या काचा स्वच्छ कर, झोपाळ्याला varnish लाव, पितळ्याचे कडी कोयंडे ब्रासो लावून घासून पुसून चकचकीत कर – काही ना काही उद्योग चालू असायचे त्यांचे. 

किंवा काहीच नाही तर त्यांनीच बनवलेल्या लाकडी बाकावर बसून सूर्यास्त बघत बसायचे ते, कधी एकटे – कधी आई निवांत असली तर तिच्याबरोबर. 

बाबा घरी यायचे, त्यासुमारास मी खेळून परत आलेलो असायचो. शनिवारी रविवारी घरात कुठेतरी पसरलेला असायचो – चांदोबा, चंपक, किशोर काहीतरी वाचत बसलेलो असायचो. 

ते मला हटकून बोलवायचे. बागेत मदत करायला बोलवायचे, किंवा ते डुगडुगतं स्टूल धरायला बोलवायचे, किंवा काहीच नाही तर बाकावर बसले की सूर्यास्त बघायला शेजारच्या जागी बसायला बोलवायचे. 

मला ते कंटाळवाणं वाटायचं, मी शक्यतो काही ना काही बहाणा काढून टाळायचो, तेही फार आग्रह धरायचे नाहीत.

आज या गोष्टीला तीस चाळीस वर्षे होऊन गेली. आज बाबा नाहीत. ते गावही कधीच सुटलं.

आज मी चिंचवडला एका फ्लॅटमध्ये राहतो, गॅलरीत थोड्याफार कुंड्या आहेत, दुसऱ्या गॅलरीतून संध्याकाळी सूर्यास्त दिसतो. आता कुंड्यांशी खुडबुड मी करतो, गॅलरीतून सूर्यास्त मी बघतो.

पण आता माझी लेक शिक्षणासाठी मुंबईला गेली आहे. 

आज जाणवतं आहे.  आपल्याबरोबर वेळ घालवण्यासाठी, बाबांनी काय किंवा मी काय, मुलांना जास्त ठामपणे सांगायला हवं होतं – आग्रह धरायला हवा होता. वरवर जरी त्यांनी नाराजी दाखवली, तरी तुमच्या वागण्या – बोलण्याला ते बघत असतात, त्याने प्रभावित होत असतात, ते आत्मसात करत असतात. 

तुमचा ठसा त्यांच्यावर उमटत असतो.

आणि माझ्या मुलीला आणि तिच्या वयाच्या मुलांना मी म्हणेन, आईबाबा जेव्हा केव्हा तुम्हाला असं बोलावतील, तेव्हा त्यांना प्रतिसाद देत जा, आज नाही म्हणालात तर, माझ्यासारखा, उद्या हा आठवणींचा खजिना तुम्हीही गमावून बसाल.

(आधारित)

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी मतदार — भाग – ९ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ मी मतदार — भाग – ९ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

मी गोंधळलेला.

एका बाबतीत माझा खूप गोंधळ उडतो.

असं बघा, समजा एक उमेदवार आहे. आपल्या मतदारसंघात उभा आहे. त्याने आपल्या मतदारसंघासाठी खूप कामे केली आहेत. त्याचप्रमाणे त्याने आपली वैयक्तिक कामे सुद्धा केली आहेत. आपले आणि त्याचे संबंध खूप चांगले आहेत. अशावेळी आपण त्यालाच मत देणार ना ?

पण वस्तुस्थिती जर अशी असेल, की आपल्याला माहित आहे, पूर्वी तो नगरसेवक होता, मागील टर्म मध्ये आमदारही होता. त्याचा प्रवास आपण आपल्या गल्लीतून कफल्लक पासून कोट्याधीश होण्यापर्यंत आपल्या डोळ्यांनी पाहिला आहे. त्यांने पैसा कशा मार्गाने कमावला आहे हे कित्येक वर्ष आपल्या डोळ्यासमोर आहे. तो आपल्या मतदारसंघात चांगला असला तरी इतर ठिकाणी दादागिरी, गुंडगिरी, भ्रष्टाचार सगळ्या गोष्टी करतो आहे. मग मी त्याला मत द्यावं का ? जर तो माझ्या मतदारसंघाचे भलं करत असेल आणि मला वैयक्तिकही उपयोगाला पडत असेल, माझ्या सगळ्या अडचणीतून कायम मार्ग काढत असेल, तर मी त्याला का मत देऊ नये ?

पण जर मी त्याला मत दिलं तर पाचशे रुपये आणि दारूची बाटली घेऊन मत देणाऱ्या भणंग मतदाराच्या पेक्षा मी किती वेगळा आहे ?

मी पूर्णपणे गोंधळलेला

आणि कन्फ्यूज्ड (?)

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆– २००१ सालची एक आनंददायी आठवण — ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ – २००१ सालची एक आनंददायी आठवण – ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर. ☆

दि. २७ मार्च …. महान तबला वादक आदरणीय श्री. पंढरीनाथ नागेशकर यांची जयंती ! 

त्यानिमित्त त्यांची सुखद आठवण तुम्हां सर्वांबरोबर शेअर करावीशी वाटते…

माटुंग्याच्या कर्नाटक संघ हॉलमध्ये मी, सुनील आणि आदित्य – एका तबला वादकाच्या कार्यक्रमास निमंत्रणावरून ऐकावयास गेलो. तत्पूर्वी घरी एका कार्यक्रमाची रिहर्सल चालल्यामुळे, कार्यक्रमाला पोहोचण्यास आम्हाला उशीर झाला. आम्ही गेल्यावेळी कार्यक्रम जवळजवळ संपतच आला होता. उशिरा पोहोचल्याबद्दल मला जरा अपराधीच वाटत होतं. त्यामुळे आम्ही शेवटच्या खुर्च्यांवर जरी बसलो, तरी बरेच ओळखीचे चेहरे आम्हाला पाहत होते, येऊन भेटत होते. कार्यक्रम संपल्यावर, त्या तबलजींचे  आभार मानून, तसंच त्यांचे गुरू पंडित सुरेशजी तळवलकर यांना भेटून, आम्ही तिथंच थोडा वेळ गप्पा मारत उभे होतो. तिथं सभागृहाच्या मध्यभागी एक तपस्वी (साधारण ऐंशी-एक वर्षांचे), अनेक शिष्यगणांना आशीर्वाद देत होते. मी सर्वांच्या मधेच जाऊन लुडबुड करणं, मला शिष्टसंमत वाटेना. मी त्या तबलजींना विचारलं, “ते वयस्कर सद्गृहस्थ कोण?” ते उत्तरले, “वे तो हमारे गुरुजी पंडित तळवलकर जी के गुरू हैं – तबला नवाझ पंडित पंढरीनाथ नागेशकर जी!” एकदा मनात आलं, जाऊन त्यांना नमस्कार करावा. पण आपणहून सर्वांच्या पुढं पुढं करणं, हा माझा स्वभाव नसल्याने, मला तिथली काही मंडळी जरी ओळखत असली, तरी मी एका कोपर्‍यात सुनील व आदित्यसवे शांतपणे उभी होते. इतक्यात पंडित नागेशकरजी, नेमके मी उभी असलेल्या कोपर्‍यात त्यांची चप्पल असल्याने, तिथेच आले. त्यांना प्रत्यक्ष समोर  पाहून मात्र ते मला ओळखोत वा न ओळखो, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी त्यांना वाकून नमस्कार केला व म्हटले, “नमस्कार, मी पद्मजा फेणाणी जोगळेकर.” एवढ्यात त्यांनी मला आश्चर्याचा सुखद धक्काच दिला. ते म्हणाले, “अरे, मी ओळखतो की तुम्हाला. तुम्ही तर केवढ्या मोठ्या कलाकार! तुमचं फार चांगलं आणि मोठं नाव होतंय, हे पाहून मला खूप आनंद होतो. तुम्ही गोव्याला आमच्या घरी येऊन माझ्यासमोर, माझ्या मुलाबरोबर – विभवबरोबर तबल्यावर, शांतादुर्गेच्या कवळे मठाच्या मंदिरात क्लासिकल कॉन्फरन्सची रिहर्सल केलीत.” नंतर काही काळ ते आमच्या कोंकणीतून सुनीलची व आदित्यची चौकशी करत होते. आतापावेतो मी केवळ लाजेने चूर-चूर झाले होते. बापरे, मी त्या तपस्व्याला चेहऱ्याने ओळखू शकले नाही परंतु त्यांनी तर २० वर्षांपूर्वीचे सर्व कथन केले!

एवढ्यात त्यांनी आणखीन एक बॉम्ब टाकला. त्यांचे शिष्यगण त्यांना जेवायला बोलावण्यास आले व म्हणाले, “गुरुजी, लवकर चला, नाहीतर जेवायला मिळणार नाही..!” परंतु गुरुजी कसचे मिश्कील! त्यांनी म्हटले, “जेवण नाही मिळाले तरी चालेल, कारण आता पद्मजा भेटली, पुरे झाले!” यावर आम्ही सगळे दिलखुलासपणे हसलो…. 

या वयातही त्यांची अफाट स्मरणशक्ती, त्यादिवशी सकाळी १० ते रात्री १० पर्यंत शिष्यांचे प्रेमाने ऐकून घेत, खाली मांडी घालून बसण्याची सहनशक्ती, मिश्कीलपणा, बुद्धिचातुर्य व कमालीचा प्रांजळपणा पाहून मी, माझी बोटे केवळ तोंडात घालायची बाकी होते!! ही मंडळी माझ्यासारख्या लहानांना किती जबरदस्त प्रोत्साहन देतात हे खरेच शिकण्यासारखे होते. 

कार्यक्रम जरी फारसा ऐकायला मिळाला नाही तरी एका अत्यंत गुणी, महान साधू पुरुषाची भेट झाली आणि या दिग्गज कलाकाराकडून प्रेमपूर्वक आशीर्वाद तसंच प्रचंड ऊर्जा मिळाल्याच्या अवर्णनीय आनंदात होते मी!

© पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी मतदार — भाग – ८ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ मी मतदार — भाग – ८ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

मी गोंधळलेला.

मत कुणाला द्यायचं याबाबतीत माझा गोंधळ होतो आहे. मला आगामी निवडणुकांच्या आत हे ठरवायचं आहे. पण कसं ठरवायचं ? इतक्या वर्षात पाहतो आहे बऱ्याच वेगवेगळ्या पक्षांची सरकारे येऊन गेली. पण कुठल्याही सरकारमुळे फार मोठा फरक किंवा बदल झाला असे दिसत नाही. हा थोड्याफार किरकोळ गोष्टी अधिक आणि उणे दोन्ही बाजूने होतात. सत्ताधारी पक्षाच्या बाजूने असणारे, सरकार किती चांगले आहे हे सांगत असतात. विरोधी पक्षाची मंडळी हे सरकार किती वाईट आहे हे सांगत असतात. सरकार बदललं की माणसं इकडची तिकडे होतात परंतु सत्ताधारी पक्ष जे बोलायचं तेच बोलतात विरोधी पक्ष जे बोलायचं तेच बोलतात. काहीच फरक नाही. कुठलंही बजेट आलं की हे बजेट कसं चांगलं आहे हे सत्ताधारी पक्ष सांगतात. हे बजेट कसं वाईट आहे हे विरोधी पक्ष सांगतात. विरोधी पक्षातील सत्तेत गेले आणि सत्तेतले पक्ष विरोधात आले तरी विरोधी पक्ष म्हणून जे मत त्यांनी व्यक्त केलेलं असतं तेच त्यांच्या विरोधी लोक बोलतात. अधिवेशनाच्या आधी चहापानावर बहिष्कार घालणं हे तर विरोधी पक्षांचे कामच. सतत तीच बातमी. कशासाठी ते चहापान ठेवतात ? आणि माध्यमे तरी या बातम्या जशाच्या तशा का सादर करतात? या सगळ्या गोष्टी पाहिल्या की सत्ताधारी पक्ष कुचकामाचा आणि विरोधी पक्ष मात्र ग्रेट आणि विरोधी पक्ष जेव्हा सत्ताधारी बनतो त्यावेळी तो कुचकामाचा ठरतो. शेवटी वेगवेगळे पुढारी वेगवेगळे नॅरेटिव्ह सेट करण्यासाठीच प्रयत्न करत असतात. एकूण विचार केला तर कुठल्याही राजकीय व्यक्तीला सामान्य माणसाच्या प्रॉब्लेम्स मध्ये फार मोठा इंटरेस्ट नसतो. त्यांना इंटरेस्ट फक्त स्वतःबद्दल प्रसिद्धी मिळवणे आणि एक विशिष्ट दिशेने समाजमनावर प्रभाव टाकण्याचा म्हणजेच नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करणे. एवढेच गरजेचं असतं असं वाटतं. भ्रष्टाचार तसाच चालू असतो. गुन्हेगारी तशीच चालू असते. आत्महत्या तशाच चालू असतात. बलात्कार तसेच चालू असतात. सरकारचं नुकसान तशाच पद्धतीने चालू असतं. दरडी कोसळत असतात. पुरामध्ये हानी होत असते. पुन्हा पुन्हा सगळ्या आपत्ती तशाच पद्धतीने येत असतात जात असतात. कॉपी करून परीक्षा पास होणे हे तसेच वर्षानुवर्षे चालू असते. कोणत्याही सरकारी कार्यालयात कोणतेही काम सहजासहजी न होणे हे तसेच चालू आहे. सरकारी काम आणि चार महिने थांब कधी कधी चार वर्षे थांब. परंतु असेच चालू आहे. न्यायव्यवस्था या नावाची जी व्यवस्था आहे त्याचा न्यायाशी फारसा संबंध आहे असे दिसत नाही. न्याय या नावाखाली जो निकाल मिळतो तो सुद्धा योग्य वेळी कधीच मिळत नाही. सच्चरित्र लोकांचा अपमान करणे. विरोधी पक्ष्यांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न करणे. या सगळ्या गोष्टी कुणाकडूनच चुकलेल्या नाहीत. शेवटी कधी कधी असे वाटते की कुणालाही मत दिले तरी आपल्या परिस्थितीत काय फरक पडणार आहे ? जाऊदे कुणी का निवडून येईना. मत द्यावे का मग? का न द्यावे?

मी पूर्णपणे गोंधळलेला

आणि कन्फ्यूज्ड (?)

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सखी रंगावली… ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी ☆

सौ.अश्विनी कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ सखी रंगावली… ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी ☆

दोन बोटांच्या चिमटीत अलवारपणे रांगोळी घ्यायची आणि मुक्तपणे जमिनीच्या अंगांगावर, फक्त तिच्यासाठी विविध रंग ढंगाचे, सुरेख, सुबक,कोरीव अमाप अलंकार आपण स्वतः घडवायचे,तिच्या सौदर्यासाठी आपल्या आत्म्याचा आविष्कार करायचा आणि तिला मनभावन करायचं! अहाहा! यातील अत्युच्य आनंद काय वर्णावा…

रांगोळी…अस नुसतं म्हटलं तरी अनेक आकार, आकृत्या, रंग, रेषा,ठिपके सगळं डोळ्यासमोर येऊ लागतं. 

मी कुठेही गेले तरी माझं लक्ष प्रथम दर्शनी रांगोळीकडे जात, त्यात काय नावीन्य आहे, त्यातील कलात्मकता, कल्पकता, सर्जनशीलता माझं लक्ष आपोआपच वेधून घेते. 

खर तर प्राचीन काळापासून घराच्या भिंतींवर, दारात विविध आकार, आकृत्या, सांकेतिक चिन्ह रेखाटून लिंपन केलं जात असे, पण तेव्हा  त्याला रांगोळी  म्हणत नसत. अशी चिन्ह ,आकृत्या शुभसुचक असल्याचं प्राचीन काळी मानत असत.

आपल्या संस्कृतीतही रोज देवघरात, दारात  रांगोळी काढली जाते. रांगोळी  नकारात्मक शक्तीला घरात प्रवेश करू देत नाही अशी समजूत आहे.

रांगोळीची शुभचिन्ह, स्वस्तिक, कमळ, गोपद्म, शंख, देवीची पावलं, ठिपक्यांच्या विविध रांगोळ्या सर्वांच्याच परिचयाच्या आहेत.विविध सण, समारंभ,  कार्यक्रम, उदघाटन, रांगोळी,स्पर्धा, उत्सव अशा अनेक प्रसंगी मोठं मोठ्या आकर्षक रांगोळ्या लक्षवेधी ठरत आहेत.

कुणी फुलापानांची, कुणी धान्याची रांगोळी काढत. कुणी पायघड्यांची तर कुणी पाण्यावर, तेलावरही रांगोळी काढतात.  दक्षिणेकडे तांदुळाच्या पीठाने रांगोळी काढतात. कुणी थ्रीडी रांगोळी काढतात तर कुणी पोर्ट्रेट रांगोळी काढतं.  कुणी देवदेवतांची  थोर व्यक्तीची रांगोळी काढतात. रांगोळीकार, कलाकार, रसिक त्या त्या ठराविक प्रसंगी अशा आपल्या कला, हौस  रांगोळीच्या माध्यमातून सादर करतात आणि प्रसंगाला शोभा आणतात. 

रांगोळी हाती आली की मला काय काढू नी काय नको असं होऊ लागतं. वेगळं काही काढावं अस वाटू लागतं!

अगदी नव्या वर्षारंभी, गुढीपाडव्याची उंच ऐटीत उभी असलेली गुढी, तिला नेसवलेलं हिरवं ,लाल काठाच रेशमी वस्त्र, झेंडूच्या फुलांचा हार आणि साखरेची केशरी माळ,वरचा उपडा केलेला कलश…जसच्या तस माझ्या रांगोळीत अवतरत! चैत्रगौरीची आरास करून झोपाळ्यातील गौरीसमोर तेहतीस प्रतिकांची रांगोळी म्हणजेच चैत्रागण काढताना त्या रेषा नाजूक, सुबक  रेखीव हुबेहूब दिसावीत असा प्रयत्न असतो. आता तर असे मोठं मोठ्या रांगोळ्यांचे तयार छाप ही मिळतात. पण मला ते छाप मारणं म्हणजे आळशीपणा,कामचलावूपणा केल्यासारखं वाटत. 

माझ्या रांगोळी रेखाटन प्रक्रियेतच आषाढी वारीही होते. या वारीतून साक्षात पांडुरंग अवतरतो. त्यासाठी तासनतास गेले तरी त्या पांडुरंगाच मुखकमल तयार होताच उच्च कोटीचा परमानंद मिळतो.

हिरव्या सरींचा श्रावण ,घरात आणि दारातही हिरवीगार रांगोळी माझ्याकडून काढून घेतोच. गणपतीत, रोज एक वेगळी गणपतीची रांगोळी! गौरी आगमनाला, तांब्याच्या गौरी..कलशावर बसवलेले त्यांचे मुखवटे,त्यांचे अलंकार, डोळ्यातील भाव, लाल ओठ,केस, हसरा चेहरा किती किती म्हणून त्यांना रांगोळीने मोहक करू अस होत मला! 

नवरात्रीत ठरलेल्या रंगांप्रमाणे रोज ठरलेल्या रंगाची रांगोळी, पण वैविध्यपूर्ण ,त्यात अमूर्त कलेचाही भाग येतो. अष्टमीला देवीचा मुखवटा रेखाटण्यात खरोखर एक आव्हान असत!

दसऱ्याला आपट्याची हृदयाच्या आकाराची हिरवीगार पानं काढताना, त्यातील शाखा ,उपशाखा तंतोतंत दिसल्या तर ते पान जीवंत वाटू लागतं! 

दिवाळीत, प्रत्येक दिवशी  रांगोळीची  वेगळी नक्षी ! कमळात विराजमान असलेल्या, आशीर्वाद देणाऱ्या महालक्ष्मी आणि गजलक्ष्मी यांची सुबकता ,मोहकता रेखाटताना… माझी आई नेहमी म्हणते आपण कोण काढणारे? ती जगन्माता आपल्याकडून करवुन घेत असते. 

या देवीच्या सेवेसाठी तिच्यासमोर रांगोळीचा पैठणीचा पदर,काठ, त्यातील नाजूक सोनेरी बुट्टे, पैठणीचा ठराविक रंग लक्ष्मीपूजनाच्या भाव भक्ती आणि  हर्षासोबत मनही सौदर्य भावनेने तुडुंब भरून जात.  शेजारी ठेवलेल्या दिव्यांच, पणत्यांच तेज, मनामनात आणि  वातावरणात पसरत असतानाच… त्या पैठणीच्या काठातील जरीची वीण मधूनच सोन्यासारखी चमचमत असते. 

ह्या दिवाळीच्या तेजोमय आठवणी सरत असतात तोपर्यंत येते संक्रांत!

दोन बाय दोन च्या चौकोनात  राखाडी रंगाच्या आकाशाच संध्याकाळीच दृश्य, खाली  हिरवळीवर हलव्याचे दागिने, मंगळसूत्र, कानातले, हळदी कुंकवाचे करंडे, वाटीभरून रंगीत तिळगुळ हलवा…सगळं रांगोळीच्या टपोऱ्या हलव्याचं ह! ” तिळगूळ घ्या गोड बोला” म्हणून सवाष्णींची ओटी भरून वाण देताना ,प्रत्येक मैत्रिणीने माझ्या रांगोळीच कौतुक केलेलं असत. कौतुकाने मूठभर मांस चढलेल असत आणि आनंदाने आतल्या आत ‘मोतीचुर के लड्डू फूटतात!’

मी  कित्येकदा रांगोळी प्रदर्शन बघायला आवर्जून जाते. तिकडे  हुबेहूब वाटणारी व्यक्तिचित्र, रेल्वेगाडी, पक्षी, अनेक निसर्गचित्र सगळं मनाला भावणारं! एके ठिकाणी तर घडी घातलेल वर्तमानपत्र जमिनीवर पडलंय अस वाटत होतं,इतकी सूक्ष्म, रेखीव हुबेहूब, त्यातील प्रिंट अक्षरही जबरदस्त  बारीक रेखाटली होती. खरच अशा महान कलाकारांना, त्यांच्या कलेला सलाम करावासा वाटतो.

मला अगदी सर्व प्रकारच्या रांगोळ्या येतात अस नाही पण हौस म्हणून  मनापासून प्रयत्न मात्र असतो. ठिपक्यांच्या रांगोळ्यापेक्षा  मुक्त, स्वैर  रांगोळ्या काढणं आणि त्यात माझ्या हृदयातील रंगांचं सौदर्य भरण मला फार आवडत. रांगोळीचे विविध रंग तिच्यात ‘जीव’ आणतात. मला तासनतास स्वतःजवळ थांबवून ,स्वतःला माझ्याकडून घडवून घेणारी, माझ्या रोमारोमाला आनंद देणारी, माझ्यात सर्जनशीलतेचे विचार जागृत करणारी माझी सखी रंगावली! तिच्या कायमच्या सोबतीने माझा प्रत्येक दिवस मंगलमय सण होतो! 

© सौ अश्विनी कुलकर्णी

मानसतज्ञ, सांगली  (महाराष्ट्र)

मो – 9421225491 Email – [email protected] 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी मतदार — भाग – ७ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ मी मतदार — भाग – ७ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

मी गोंधळलेला.

मी मत देतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला, तेव्हा त्या व्यक्तीच्या विचारांनी आणि त्याच्या वक्तव्याने भारावलेला असतो म्हणून.

मी जेव्हा एखाद्या पक्षाला मत देतो तेव्हा त्या पक्षाच्या वैचारिक आणि राजकीय भूमिकेला माझे विचार अनुरुप असतात म्हणून.

परंतु निवडून आल्यानंतर पुढील काळात वैयक्तिक स्वार्थापोटी किंवा राजकीय स्वार्थापोटी किंवा तात्पुरत्या काळासाठी का होईना त्या काळाची गरज म्हणून स्वतःच्या अथवा पक्षाच्या पूर्वी जाहीर केलेल्या भूमिकांच्या संपूर्ण विरोधी भूमिकेत शिरतो. तेव्हा मतदार म्हणून मी गोंधळून जातो. या माणसाला मी मत दिले ते योग्य की अयोग्य याबाबत मीच निश्चित काही माझ्या मनाशी ठरवू शकत नाही. अशा परिस्थितीत काय व्हायला पाहिजे?

पक्षांतर बंदी कायद्यामुळे फारसा काही फरक पडलेला नाही असे दिसून येते. त्या कायद्यातील पळवटांचा यथेच्छ गैरवापर होत असतो असे दिसते. मला असे वाटते जर एखाद्या व्यक्तीने एका विशिष्ट पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली असेल तर त्या पक्षाच्या विरोधी भूमिका असलेल्या पक्षाशी हात मिळवणी करायची असेल तर त्याने राजीनामा देऊन पुन्हा निवडून येणे आवश्यक आहे. अशी कायद्यामध्ये तरतूदच हवी. मग जरी सगळेच्या सगळे निवडून आलेले व्यक्ती दुसऱ्या पक्षात जाणार असतील तरी त्या सगळ्यांनी राजीनामे देऊन पुन्हा निवडून यावे. जर पुन्हा निवडून यायचे नसेल तर ज्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली त्याच पक्षामध्ये पुढील निवडणूक होईपर्यंत त्याने असले पाहिजे. अपक्ष आमदाराने सुद्धा जेव्हा सभागृहामध्ये सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाशी हात मिळवणी केली असेल तर पूर्ण पाच वर्षे त्याच पक्षाबरोबर राहावे. अन्यथा त्यानेही राजीनामा देऊन पुन्हा निवडून यावे. आपली नवी भूमिका मतदारांना पुन्हा समजावून सांगून त्यांची मते मिळवावीत.

एखादी व्यक्ती बहुमताने निवडून आली असेल तर क्वचित १५ टक्के मते मिळवून सुद्धा निवडून आली असेल. आठ दहा उमेदवारांची यादी ज्यावेळेला असेल त्यावेळेला काही डमी उमेदवार मुद्दाम मते खाण्यासाठी उभे केलेले असतात हे आता सर्वांच्याच लक्षात आले आहे. साधारण दोन माणसांच्यातच लढत होणे आवश्यक आहे. अनेक माणसांच्यात लढत होत असेल तर ती निवडणूक दोन वेळेला घ्यावी. पहिल्या निवडणुकीत त्या उमेदवारांना जी मते पडतील त्यापैकी पहिल्या दोन मतसंख्येतील क्रमांकाच्या उमेदवारांमध्ये पुन्हा निवडणूक घ्यावी म्हणजे जरी ६०% मतदान होत असेल तरी किमान त्यातल्या तरी ५० टक्के पेक्षा जास्त लोकांनी निवडून दिलेला उमेदवार हाच बहुमताने निवडून आलेला उमेदवार म्हणण्यास तरी हरकत नाही.

असे होत नसेल तर माझे मत हे योग्य माणसाला दिले असे होणार नाही. मग मी मतदान करावे का न करावे? मतदानावरचा हक्क सोडावा का? पण का सोडावा?

काहीच कळत नाही.

मी पूर्णपणे गोंधळलेला

आणि कन्फ्यूज्ड (?)

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ विंटेज… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? मनमंजुषेतून ?

 ☆ विंटेज… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे

माझ्या एकटेपणाच्या दुःखाने आता बाळसं धरायला सुरुवात केली आहे. 

5 वर्षांपूर्वी रिटायर झाल्यावर खरं तर खूप काही प्लॅनिंग केलं होतं, पण आमची ही सहा महिन्यापूर्वी पुढच्या प्रवासाला निघून गेली. एकटीच.

आता मी माझं रुटीन सेट करुन घेतलंय. सकाळी जरा लवकरंच उठतो. त्याचं काय आहे… मुलगा आणि सून दोघेही नोकरी करतात यायला जरा उशीरंच होतो त्यांना… म्हणून सकाळी चहा बरोबर जरा गप्पा पण होतील असं मला वाटायचं. हो वाटायचं. कारण त्यांना माझ्याशी बोलायला वेळंच नाही मिळत. नाही नाही गैरसमज करुन घेऊ नका, सिनेमा किंवा सिरियल मध्ये दाखवतात तसे काही माझे मुलगा किंवा सून नाहीयेत. वडिलांची आणि सासर्‍यांची जेवढी काळजी घ्यायला पाहिजे तेवढी नक्कीच घेतात. माझी तक्रार काही नाही. पण एकदा सकाळी इतरांपेक्षा लवकर जाग आली, म्हणुन चहा करायला घेतला पण नेमकं दूध उतू गेलं, सगळा ओटा खराब झाला. सुन नाराज झाली. मला काही बोलली नाही, पण तीच्या हालचाली मधून ते स्पष्ट जाणवत होत. त्या दिवशी मुलानी लगेच फर्मान काढले. “बाबा उद्यापासून आमचं आवरल्यावर मी तुम्हाला चहा आणून देईन रुममधे !” 

असाच एकदा नातवाला म्हणालो, “ चल तुला स्कूल बस पर्यंत येतो सोडायला.”  

तर म्हणतो कसा “आबा मी मोठा झालोय आता, मी एकटा जाऊ शकतो.  तू आलास तर बाकीच्या मुलांना वाटेल मी घाबरतो एकटा यायला. हसतील मला सगळे.”

म्हणून सध्या उठल्यावर मी माझ्या खोलीतच असतो. बाहेरचा अंदाज घेऊनच हॉल मधे येतो. मला कळून चुकलंय की, मी, त्यांच्या आयुष्यातला फक्त्त एक भाग आहे, कदाचित थोडासा दुर्लक्षित.

आता मी संध्याकाळी फिरायला जातो. तेवढाच माझाही वेळ जातो. रोजचा मार्ग ठरलाय माझा Agricultural College च्या चौकातून सरळ जाऊन विद्यापीठाच्या चौकातून परत घरी. त्या मार्गावर एक दोन शोरुम आहेत चार-चाकी गाड्यांच्या. पहिल्यापासूनच गाड्यांचे आकर्षण होते. म्हणुन मग येता जाता त्या शोरुममधल्या गाड्या बघत बघत जायचो अर्थात बाहेरुनच. 

पण एक दिवस त्या शोरुममधे, एक वेगळीच गाडी दिसली, काहीशी जुनी होती पण त्या गाडीला वेगळी जागा होती, तीला वेगळ्या पद्धतीने सजवलं होतं. कुतुहल वाटलं म्हणून आत गेलो. एक चकचकीत कपड्यातला सेल्समन आला. “Yes Sir कुठली गाडी बघताय ?”

“ नाही… म्हणजे हो बघतोय पण विकत नाही घ्यायची मला. ही एव्हढी जुनी गाडी तुमच्या शोरुममधे कशी काय हा विचार करतोय “ . 

” सर ही Vintage Car आहे. 1965 साली बडोद्याच्या महाराजांनी घेतली होती.”

“ का हो सगळ्या गाड्यांवर किमतीचा कागद लावला आहे. या गाडीवर मात्र तो नाही.”  

” सर ही विंटेज कार आहे, हीची किंमत ठरवता येत नाही. ज्याला या गाडीचं मोल कळेल, तो कस्टमर ही गाडी घेईल. थोडक्यात ही गाडी महाग नाही तर मौल्यवान आहे.” 

मी शोरुम मधून बाहेर पडलो. कसला तरी विचार येत होता मनामधे, पण नक्की कळत नव्हतं काय ते.

असेच मध्ये काही दिवस गेले, रोज मी येता जाता ती गाडी कौतुकाने बघायचो.

गुढी पाडव्याच्या दिवशी सुट्टी असल्याने सगळे घरीच होते. ही गेल्या नंतरचा पाहिलाच गुढी पाडवा. जरा उदासंच होतो मी, पण नातवाशी खेळण्यात वेळ जात होता. ” आबा तुला माहितीये का आमच्या शाळेच्या समोर ना 100 पेक्षा जास्त वर्षे जुने पिंपळाचे झाड होते, रोड वायडींग मधे ते पाडणार होते. मग कुठले तरी लोक आले मोर्चा घेऊन आणि ते झाड दुसरीकडे नेऊन पुन्हा लावलं. आमच्या टीचरनी सांगितलं ते झाड जुनं असलं तरी 24 तास ऑक्सिजन देत म्हणून ते महत्वाचं आहे.”

… त्या गाड्यांच्या शोरुम मधून बाहेर पडल्यावर जसं  वाटलं होतं तसंच काहीसं वाटून गेलं. 

सुनबाई म्हणाली ” बाबा तुम्ही पूजा कराल का गुढीची. इतकी वर्षे आई करायच्या म्हणून वाटतं आज तुम्ही करावी.” मी पण तयार झालो.

आम्ही सगळे जेवायला बसलो सूनबाईने छान तयारी केली होती. जेवायला तांब्याची ताट काढली. मुलगा म्हणाला, “अगं, आज तो काचेचा सेट काढायचा ना”

“अरे असू दे.  आईने पाहिल्या दिवाळसणाला दिला होता हा तांब्याच्या सेट. त्या सेटमधली आता फक्त्त ताटंच उरली आहेत. म्हणून मुद्दाम जपून ठेवली आहेत सणासुदीसाठी …  आईची आठवण म्हणून.” 

आणि सूनबाईने नकळत हातातले फडके खाली ठेवले आणि ती ताटं स्वतःच्या पदराने पुसली. 

अचानक मला त्या शोरुममधून बाहेर पडल्यावर मनात जो विचार आला होता त्याचा अर्थ कळायला लागला….  मौल्यवान या शब्दाचा. ती विंटेज गाडी, ते पिंपळाचे झाड, काही तरी इशारा करत होते.

आता माझे मला समजले होते, मी म्हातारा असलो तरी टाकाऊ नव्हतो. 

आता मुलाच्या आणि सुनेच्या रोजच्या आयुष्याचा भाग होण्याचा अट्टाहास मी सोडून दिलाय …  स्वखुशीने. कारण मला माहितीये त्यांच्या आयुष्यातील माझं स्थान त्या विंटेज कारसारखं आहे. एकदम स्पेशल….. 

लेखक : अज्ञात

संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी मतदार — भाग – ६ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ मी मतदार — भाग – ६ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

मी गोंधळलेला.

मी मतदार का आहे ?

कारण आपल्या देशात लोकशाही आहे.

पण नक्की लोकशाही म्हणजे काय याबाबत माझा गोंधळ आहे.

मूळ लोकशाही संकल्पना, लोकशाही कायदा, लोकशाहीचं आकलन आणि लोकशाहीचं आचरण यामध्ये तफावत जाणवते.

बहुधा विचारांमध्ये तफावत किंवा वागणे आणि विचार यामध्ये गोंधळ आहे.

जे काही असेल ते, पण त्याचे नीट आकलन आज ७५ वर्षानंतरही होत नाही ही वस्तुस्थिती आहे.

पूर्वी म्हणे टिळक आणि आगरकर यांच्यात तात्विक विचारसरणीचा फरक होता. आधी स्वातंत्र्य की आधी जनप्रबोधन यामध्ये वाद होता.

आज ७५ वर्षानंतर बहुधा आगरकरांचे बरोबर असावं असं वाटू लागलं आहे.

लोकशाही संकल्पना एक तर लोकांना समजलेली नाही किंवा लोकांच्या मनात नीट रुजलेली नाही. जे असेल ते असो.

माझी एक संस्था आहे. ती मी स्थापन केलेली आहे. संस्थेची घटना ही संपूर्ण लोकशाही पद्धतीची आहे. परंतु माझ्यानंतर ही संस्था माझ्या मुलाचीच किंवा मुलीचीच असली पाहिजे ही विचारसरणी लोकशाही विचारसरणी आहे काय ? ही विचारसरणी चुकीची आहे असे कुणाला वाटतही नाही. मग लोकशाही संकल्पनेत हेच बरोबर आहे असे म्हणावे काय ?

पूर्वी वाचलेली एक कथा आठवते. एक राजा आणि प्रधान एकदा शिकारीला जातात. त्यावेळी राज्यात एक साधू येतो. त्याचा कोणीतरी अपमान करतो म्हणून तो शाप देतो की या शहरातले सर्व लोक वेडे होऊन जातील. राजा आणि प्रधान परत येतात सगळ्या लोकांना वेडे चाळे करताना बघून ते विचारत असतात “अरे हे काय वेड्यासारखं चालवलंय?” राजा आणि प्रधान यांचा हा प्रश्न राजवाड्यातील सगळ्यांना अगदी महाराणीला सुद्धा त्रासदायक ठरू लागतो. सगळेजण असा विचार करतात की राजा आणि प्रधान यांना वेड लागले आहे. मग हळूहळू सगळ्या लोकांमध्ये ही बातमी पसरते आणि आम्हाला हा वेडा राजा नको. आपणा राजा बदलूया. अशी भावना सगळे व्यक्त करू लागतात. तेव्हा प्रधान महाराजांना म्हणतो राजे आता आपले स्थान वाचवायचे असेल तर आपल्यालाही या लोकांसारखे वेडे चाळे करावे लागतील, नाहीतर आपले स्थान धोक्यात आहे. राजा आणि प्रधान दोघेही जाणीवपूर्वक वेडे चाळे करू लागतात आणि मग सगळेजण म्हणतात राजा सुधारला. आता हाच राजा असू देत. लोकशाहीची संकल्पना अशी तर नव्हती ना ? वि. स. खांडेकर यांनी एका ठिकाणी वाक्य लिहिलेलं आहे ‘अविचारी लोकांच्या मतावर आधारलेली लोकशाही ही राष्ट्राला घातक असते.’ आपण जातीव्यवस्था नष्ट करण्याचे ठरवले होते परंतु ती अधिकाधिक घट्ट होत चालली आहे. आपण लोक मतावर आधारित राजकारण असावे असे ठरवले होते परंतु ते वंशपरंपरेने चालत असलेले दिसते. आपण जनप्रबोधन करण्यावर भर द्यायचे ठरवले होते. परंतु लोकांची दिशाभूल करणे हेच कार्य नेत्यांकडून होताना दिसते. ‘सत्यमेव जयते’ हे आपले ब्रीदवाक्य ठरवले होते परंतु सत्याचा अभाव पदोपदी दिसून येतो. सध्या तर प्रत्येक व्यक्तीगणिक सत्य बदलते. वैद्यकीय क्षेत्रात जसे भूलतज्ञ असतात तसे राजकीय क्षेत्रामार्फत अनेक दिशाभूलतज्ञ निर्माण होत आहेत. या दिशाभूलीमुळे खरे सत्य कोणते आणि भुललेले सत्य कोणते ?

खरे सत्य ? खोटे सत्य?

मग खरंच सत्य म्हणजे काय ?

डोक्यामध्ये विचारांचा विस्फोट होत आहे.

मी सर्वसामान्य.

मी पूर्णपणे गोंधळलेला.

आणि कन्फ्यूज्ड (?)

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “बोगनवेल…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “बोगनवेल…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

तसा तो माझा फिरायचा नेहमीचा रस्ता नाही. पण तिथली बोगनवेल फार सुंदर आहे.म्हणून मी कधी कधी तिकडे जाते तिला बघायला… भेटायला..

त्यादिवशी गेले होते.म्हटलं

“कशी आहेस?

अगं आता काही  महिन्यांनी तुझे फुलायचे दिवस सुरू होतील..”

“हो ग…  त्याचीच तर तयारी सुरू आहे पण… कोण बघतं ग आमच्याकडे…. तो कॉर्नर वरचा चाफा त्याच वेळेस फुलतो त्याचेच सगळे कौतुक करतात.त्याची फुलं गोळा करतात, वास घेतात ,घरी नेतात ..आमच्याकडे पाहतही नाहीत…” .. ती आज जरा रुसलीच होती.

” मी येत असते की बघायला.. आणि अगं बघतात तुझ्याकडे ..गडबडीत असतात… निवांत वेळ नसतो आजकाल कोणाकडे  म्हणून…”

” उगीच माझी समजूत काढायची म्हणून सांगू नकोस…”

“नाही ग..खरचं…. तू आपली फुलत रहा. काही दिवसांनी येते परत भेटायला..” अस बोलुन निघाले.

तिला तरी अजून काय सांगू..

आसपास  कंपाउंड वर बोगनवेली दिसतातच. त्यांच्याकडे मी बघत असते .पण ही जरा जास्त लाडकी आहे…..

 

खरंच त्यानंतर बरेच  दिवस त्या रस्त्याकडे जाणेच झाले नाही. काल तिची आठवण आली. म्हणून ठरवले आता भेटायला जाऊ .मागच्या वेळेस  बिचारीचा मूड गेला होता…

गेले… तर ही आपली झाडाला लगटून  वरवर निघाली होती.

झाडाच्या हिरव्या रंगात तिच्या लाल फुलांचा रंग मिसळून गेला होता .

भरगच्च फुलांनी छान बहरली होती. भलतीच देखणी दिसत होती. वाऱ्यावर झुलत डुलत होती.

तिचा रंगोत्सव सुरू होता…. तिच्या वैभवानीशी….

आकाशाच्या पार्श्वभूमीवर किती गोड दिसत होती.

 

“काय  बाईसाहेब इतक्या उंच जाऊन बसलात ..कसं बोलायचं तुमच्याशी?..

“बोल ग..मी ऐकते आहे … तुझीच वाट पाहत होते .किती दिवसांनी आलीस. तुला एक गंमत सांगायची आहे..”

“काय ग..सांग ना…”

 

ती उत्साहाने बोलायला लागली.

“अगं या झाडांनी मला समजावलं….सांगीतल…. कोणी बघेल कौतुक करेल याची कशाला वाट बघतेस ?

तू छान फुलत रहा .निसर्गाची मुक्त हस्ते उधळण करत राहा आणि वर वर जा…इतरांशी तुलना करायचे सोडून दे… आपण आपलं फुलायचं आनंद घ्यायचा आणि इतरांना आनंद द्यायचा…आणि मलाही ते पटलं बरं का…”

“अरे वा”

“आणि पुढे तो काय म्हणाला माहित आहे?”

“काय ग..”

“ म्हणाला.. मी देतो तुला आधार अशी भरभरून बहरलीस की तुझा तुलाच आनंद मिळेल …मग इतरांनी बघितलं नाही आणि प्रशंसा केली नाही तरी तुला काही वाटणार नाही… अगं त्याच्या शब्दांचाच आधार घेऊन निघाले वरवर…. आता कोण काय बोलतय इकडे  लक्ष द्यायला वेळच नाही बघ…”

 

किती आणि काय सांगू असे तिला झाले होते…

मी कौतुकानी  तिचं बोलणं ऐकत होते

“तुझा आनंदी आवाज ऐकून फार छान वाटलं बघ…. झाडांनी किती सहजपणे समजावून सांगितलं तुला..

आणि त्याच ऐकून शहाणी झालीस.. आज तुमचा  दोघांचा  फोटो काढते आणि पाठवते मैत्रिणींना…

तुझं कौतुक सांगते त्यांना”

 

सळसळ पान हलली… चार दोन फुलं खाली पडली…

ती घेऊन घरी आले.

येताना परत एकदा मन भरून बघितलं  तिच्याकडे…

 

किती शिकवतो ना निसर्ग आपल्याला…  त्याचा आवाज ऐकायची आता सवय करून घेणार आहे…

 

तुम्ही पण बघत जा हं बोगनवेलीकडे… त्या आपली वाट पहात असतात…

आपल्या आसपासही  असतात अशा बोगनवेली…. त्यांनाही बघायची सवय करून घ्या…

लक्षपूर्वक बघितलं की त्या दिसतातच….

..  त्यांना तुमच्या शब्दांचा आधार द्या मायेचा स्पर्श द्या ……पाठीवर हात ठेवा…जरा जवळ घ्या…

चार गोड शब्द बोला……

…. मग बघा कसे परिवर्तन होते ….. कारण काही वेळेस फक्त त्याचीच जरूर असते.

मग जमीन तप्त असेल वरून सूर्य आग ओकत असेल तरीसुद्धा त्याची पर्वा  न करता बोगन वेली फुलतातच….

 

आणि त्यांचं ते फुलणं बघून आपल्याला फार मोठे समाधान मिळते…

एक खरं सांगू…

तो आनंद इतर कशानेही मिळत नाही हो .. खरंच .

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी मतदार — भाग – ५ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ मी मतदार — भाग – ५ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

मी गोंधळलेला.

मी मतदार का आहे ?

कारण आपल्या देशात लोकशाही आहे. लोकशाही म्हणजे लोकांचे, लोकांनी बनवलेले लोकांसाठी असलेले सरकार. म्हणजेच जनता सार्वभौम. म्हणजे जनताच राज्य करणार.

बूट पॉलिश मधल्या गाण्यामधले शब्द आठवतात…..

आने वाली दुनिया मे,

सबके सर पे ताज होगा !

हे सर्व म्हणजे नागरिक शास्त्राचे पुस्तकातील लोकशाही बाबतचे तत्त्व. लोकशाही येण्यापूर्वी रचलेली गाणी किंवा सिनेमातील कल्पना म्हणजे लोकशाही बद्दलचे स्वप्नरंजन. आता पंचाहत्तर वर्षानंतर लोकशाही म्हणजे काय हे थोडे थोडे प्रत्यक्षपणे समजू लागले आहे असे वाटत असतानाच मनात सगळा गोंधळ दाटला आहे.

लोकशाहीचे पहिले तत्व बहुमताचे सरकार.

इतक्या वर्षांमध्ये एकच लक्षात आले आहे की ज्या पक्षाला वीस ते पंचवीस टक्के मते मिळतात तो पक्ष राज्यकर्ता होतो. म्हणजेच पंचाहत्तर ते ऐंशी टक्के लोकांना नको असलेला पक्ष हा राज्य करतो. हे बहुमताचे सरकार ?

मतदार हा राजा .

या राजाच्या स्वागतासाठी काय काय गोष्टी राज्यकर्त्यांकडे असतात ? पोलीस यंत्रणा, लाठी मार, अश्रुधुर, धरपकड, अटक सर्वात शेवटी सैन्यबळ.

पूर्वी ज्याप्रमाणे संपूर्ण सिनेमांमध्ये (किंवा त्याकाळी प्रत्यक्षही असेल) असे दाखवायचे की जो खलनायक असतो तो चुकीच्या गोष्टी राजाच्या मनात भरवतो. गैरसमज निर्माण करतो. राजाची मती भ्रष्ट करतो. चुकीचे आणि खोटे पुरावे राजासमोर ठेवतो, आणि प्रत्यक्ष राजाच्या नावावर खलनायकसुद्धा राज्य करू शकतो.

लोकशाहीमध्ये वेगळे काय दिसते आहे ?

मतदार फक्त एक दिवसाचा राजा. फक्त मतदानाच्या दिवशी. पण त्याही दिवशी धाक, दपटशा, पळवा पळवी, लाचलुचपत व फसवणूक अशा पद्धतीने त्या दिवशी सुद्धा राजाला स्वस्थपणे मतदान करू न देता नामोहरम केले जाते.

या सर्व भल्या बुऱ्या मार्गाने सत्ता मिळाल्यानंतर पुढील निवडणूक येईपर्यंत त्या राजाला नामोहरम करण्याच्या बाबतीत कुठेही कमतरता होत नाही. गेली पंचाहत्तर वर्षे ज्या पद्धतीचे राज्य नशिबाला आले आहे त्यात सर्वांचे भले, गरिबांचे भले करणे हे सर्वच राज्यकर्त्यांचे ध्येय असते म्हणे. परंतु ते काही होत नाही. शेतकरी राज्यकर्ता झाला तरी त्या राज्यात शेतकऱ्यांचे भले झालेले दिसले नाही. कामगार राज्यकर्ता झाला तरी त्याच्या राज्यात कामगारांचे भले झालेले दिसले नाही. सर्वसामान्य मनुष्य राज्यकर्ता झाला तरी त्याच्या राज्यात सर्वसामान्यांचे भले झालेले दिसले नाही.

प्रशासनाने स्वतःच्या राजाला ज्या पद्धतीने वागवले आहे त्यावरून मतदार राजा खरंच आहे का हो ?

या प्रश्नाचे उत्तर मी मतदार म्हणून शोधतो आहे.

पूर्णपणे गोंधळलेला,

आणि कन्फ्युज्ड !

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print