श्री मकरंद पिंपुटकर

? मनमंजुषेतून ?

बाबांची आठवण… ☆ श्री मकरंद पिंपुटकर

मी सातवी आठवीत असतानाची गोष्ट. आम्ही गुजरातमध्ये उंबरगावला राहायचो तेव्हा, तालुक्याचं ठिकाण असलेलं छोटंसं गाव. बाबा तिथल्या एका को ऑपरेटिव्ह बँकेत होते. 

संध्याकाळी घरी आले की तडक ते परसदारातल्या त्यांच्या छोट्याश्या बागेत जायचे. गुलाबाभोवतीचं तण काढ, तुळशीला पाणी दे, अबोलीभोवतीची माती उकर, कडीपत्त्याकडे लक्ष दे – काही ना काहीतरी खुडबुड करायचे ते. 

सुट्टीचा दिवस असला किंवा शनिवारी अर्धा दिवस असला की मग घरात काहीतरी काम काढून बसायचे ते. 

एखाद्या खुर्चीचा डुगडुगता पाय दुरुस्त कर, आरामखुर्चीचं कापड शिवून घे, कंदिलाच्या काचा स्वच्छ कर, झोपाळ्याला varnish लाव, पितळ्याचे कडी कोयंडे ब्रासो लावून घासून पुसून चकचकीत कर – काही ना काही उद्योग चालू असायचे त्यांचे. 

किंवा काहीच नाही तर त्यांनीच बनवलेल्या लाकडी बाकावर बसून सूर्यास्त बघत बसायचे ते, कधी एकटे – कधी आई निवांत असली तर तिच्याबरोबर. 

बाबा घरी यायचे, त्यासुमारास मी खेळून परत आलेलो असायचो. शनिवारी रविवारी घरात कुठेतरी पसरलेला असायचो – चांदोबा, चंपक, किशोर काहीतरी वाचत बसलेलो असायचो. 

ते मला हटकून बोलवायचे. बागेत मदत करायला बोलवायचे, किंवा ते डुगडुगतं स्टूल धरायला बोलवायचे, किंवा काहीच नाही तर बाकावर बसले की सूर्यास्त बघायला शेजारच्या जागी बसायला बोलवायचे. 

मला ते कंटाळवाणं वाटायचं, मी शक्यतो काही ना काही बहाणा काढून टाळायचो, तेही फार आग्रह धरायचे नाहीत.

आज या गोष्टीला तीस चाळीस वर्षे होऊन गेली. आज बाबा नाहीत. ते गावही कधीच सुटलं.

आज मी चिंचवडला एका फ्लॅटमध्ये राहतो, गॅलरीत थोड्याफार कुंड्या आहेत, दुसऱ्या गॅलरीतून संध्याकाळी सूर्यास्त दिसतो. आता कुंड्यांशी खुडबुड मी करतो, गॅलरीतून सूर्यास्त मी बघतो.

पण आता माझी लेक शिक्षणासाठी मुंबईला गेली आहे. 

आज जाणवतं आहे.  आपल्याबरोबर वेळ घालवण्यासाठी, बाबांनी काय किंवा मी काय, मुलांना जास्त ठामपणे सांगायला हवं होतं – आग्रह धरायला हवा होता. वरवर जरी त्यांनी नाराजी दाखवली, तरी तुमच्या वागण्या – बोलण्याला ते बघत असतात, त्याने प्रभावित होत असतात, ते आत्मसात करत असतात. 

तुमचा ठसा त्यांच्यावर उमटत असतो.

आणि माझ्या मुलीला आणि तिच्या वयाच्या मुलांना मी म्हणेन, आईबाबा जेव्हा केव्हा तुम्हाला असं बोलावतील, तेव्हा त्यांना प्रतिसाद देत जा, आज नाही म्हणालात तर, माझ्यासारखा, उद्या हा आठवणींचा खजिना तुम्हीही गमावून बसाल.

(आधारित)

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments