डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

माझी मी। — ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

माझ्याकडे पोळ्या करणाऱ्या सुरेखा बाई चार दिवस आल्याच नाहीत. निरोप नाही काहीच नाही.मी अगदी वैतागून गेले.आता जर आल्या नाहीत तर मात्र घरी जाऊन बघून यायचे असं ठरवत होते मी. सकाळीच गेट वरची बेल वाजली. खिडकीतून बघितलं तर दोन मुली उभ्या होत्या.” बाई , सुरेखाबाई पडल्या,त्यांना

लागलंय. त्या येनार नाहीत कामाला !”  “ हो का?मग तू कोण आहेस? “ “ मी सून आहे त्यांची  कांता माझं नाव. “  .” वर या ग दोघी जरा!” .. मी त्यांना घरी बोलावलं. कांता अगदी साधी,जरा खेडवळच वाटली मला.

“ कांता,मग तू का नाही येत माझ्याकडे ग? कर की पोळ्या. त्या येत नाहीत तर तू ये ना! “ ती घाबरून म्हणाली, “ बया! मी नाही यायची ! “ “ अग पण का?मी तुला पगार देईन ना ! “ “ बाई, मिष्टर दारू  पितो माझा आणि संशोव घेतो वो.  मागं मागं येतो. मला लै भीति वाटती त्याची.” मी म्हटले “ असं नको करू

कांता. तुलाही नाही का  वाटत गं,आपल्याला चार पैसे मिळावेत? “ “  वाटतं ना बाई.  पण काय करू?चांगली दहावी पर्यंत शिकलेली आहे मी बाई. हाही बारावी झालाय पण दारूने सगळं बिघडत

गेलं. लग्नात नव्हता हो असा. पण वाईट मित्र भेटले आणि हा गेला वाहवत !  आता तर घरीच बसतो आणि काहीच काम करत नाही हो बाई . मी काम लावून दिलं तर चार दिवस पण नाही धड गेला.”  

कांताच्या डोळ्यात अश्रू होते. तिने थोडा विचार केला आणि म्हणाली,” बाई,मी लवकर सकाळी तो उठायच्या आत येऊन जाऊ का?  म्हणजे सातला ? चालेल का? करून बघते काय होतं ते.”  मी म्हटलं “ चालेल की अग. कशाला अवलंबून राहतेस ग त्या नवऱ्यावर? रहा की पायावर उभी. येतात ना पोळ्या भाकरी करता?” ती हसली.. म्हणाली “ तर वो. न यायला काय झालंय? येते उद्या.”  मला अगदी हायसं झालं.

दुसऱ्याच दिवशी सकाळी सातच्या आतच कांता आली. मी तिला सगळं दाखवलं. कांताने छान केल्या पोळ्या.पटापट आवरून ती गेली सुद्धा. एकही दिवस खाडा न करता  कांता येऊ लागली. आधी न बोलणारी कांता आता खुशाल गप्पा मारू लागली.कित्ती बडबडी होती ती. माझ्या नवऱ्याला म्हणायची  

 “ दादा,मधेमधे येऊ नका. मी देते आणून चहा तुमच्या खोलीत. बसा पेपर वाचत.” 

त्यांनाही प्रेम लागलं तिचं.  म्हणाले “ ससूनला नोकरी करतेस का कांता.?देतो लावून आया म्हणून.” 

तर म्हणाली “ या बया नको. लै घाणीचं काम ते . मला घाण वाटती.आणि रोज कोण जाणार ससूनला?मला लै भीती वाटती बया! मला नको रे बाबा.” आम्ही सगळे हसलो मग.

धाकट्या मुलीला म्हणायची”,ताई,पोळ्या शिका बरं का माझ्याकडून. बाईच्या जातीला सुटका नाही.तुम्ही किती पगार मिळवला तरी लग्न  झाल्यावर कुठे होतेय सुटका स्वयंपाकातून.  त्यातून तुम्ही  लै शिकलेल्या मुली. मिळाला नवरा अमेरिकेचा की सगळं करावं लागेल स्वतः . तिकडे बाया मिळत नाहीत ना म्हणे? ” कांताकडून माझी मुलगी पोळ्या भाजी सगळं शिकली. तिच्या कलाकलाने घेत कांताने तिला छान तयार केली  .माझ्याकडून मी हजार वेळा सांगून सुद्धा “ तू ओरडतेस मला ! नको जा शिकवू मला तू “ असं मला म्हणणारी माझी मुलगी निमूट शिकली सगळं कांताकडूनच !  अगदी तिच्या पद्धतीचं गावरान चिकन सुद्धा.  कांता माझी अत्यंत लाडकी झाली. मी तिला पगार वाढवला आणि सगळा आपल्या पद्धतीचा स्वयंपाक शिकवला .कांताला आणखीही कामं आमच्याच सोसायटीत लागली. 

एक दिवस म्हटलं ” काय ग कांता,आता नाही का  मिष्टर संशय घेत आणि मागं मागं येत?” 

ती म्हणाली “ हॅट! तो काय येतोय? असा झाडला त्याला एक दिवस बाई मी ! म्हटलं दारू पितोस

आणि वर रुबाब करतोयस होय रे? पैसा मिळवून आण आणि मगच बोल.”  गप बसला मग. हुशार आहे

हो ,पण या दारूने घात केलाय बघा.” 

आता कांता मस्तच रहायला लागली. आधीचं खेडवळ ध्यान आता पूर्ण बदललं. आम्ही दिलेल्या साड्या मस्त पिन अप करून ऐटीत येऊ लागली ती.  मला अतिशय कौतुक कांताचं.   तिचंही माझ्यावर खूप प्रेम. इतर  मालकिणी हेव्याने म्हणतात .. हो! त्या डॉक्टर बाईंकडे जायचं असेल आधी.आमच्याकडे उशीर करतेस कांता हल्ली!’ ती म्हणते ‘ हो मग.माझं पहिलं काम आहे ते. किती प्रेम करतात माझ्यावर

त्या. करणारच मी त्यांचं काम आधी .नसेल पटत तर बघा दुसरी बाई!’  बिचाऱ्या गप्प बसतात कारण हिच्यासारखी बाई मिळणार नाही हे पक्के माहीत आहे त्यांना.  

मध्यंतरी  कांताच्या नवऱ्याला खूप बरे नव्हते. हिने त्याला ऍडमिट केलं,त्या डॉक्टरला सगळी कथा

सांगितली. त्याने हिच्या नवऱ्याला चांगला दम भरला आणि म्हणाला दारू सोडली नाहीत तर दोन वर्षात मरालच तुम्ही.’ पुन्हा मी तुम्हाला ऍडमिट करणार नाही.हे शेवटचं!” 

काय आश्चर्य.त्या दिवसापासून त्याची दारू सुटली हे कांताचं भाग्यच म्हणायचं. त्याला शिपायाची नोकरी पण लागली एका शाळेत. खूप छान झालं मग कांताचं. हळूहळू त्यांनी होत्या त्या जागेत छानसं तीन

खोल्यांचं घर बांधलं.  हौसेने छान भांडी घेतली ,बसायला सोफा घेतला. एका मालकीणबाईकडून त्यांचा जुना पण छान अवस्थेतला फ्रीज घेतला. आम्हाला सगळ्याना  कांताचं अतिशय कौतुक आहे. माझ्या मुली परदेशातून आल्या की आठवणीने कांतासाठी मुद्दाम खूप छान उपयोगी वस्तू घेऊन येतातच. माझ्या बहिणींची पण  कांतावर माया आहे.त्या आल्या की कांता मस्त चहा करते ,त्यांच्याशी गप्पा मारते. बहिणीने तिच्या मुलाच्या लग्नात  कांताला आवर्जून बोलावलं होतं. तीही ऐटीत सुंदर साडी नेसून आली होती. 

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी लेकीच्या बाळंतपणासाठी अमेरिकेला  सहा महिने गेले होते. घर बंद होतं म्हणून काय अवस्था झाली असेल ही चिंता होतीच मनात. मी येण्याच्या आधी एक आठवडा कांताला फोन केला. ‘ मी अशी अशी या तारखेला येतेय.’  मुंबई एअरपोर्टला पोचल्यावर परत तिला फोन केला .मी पुण्याला सकाळी 6 ला पोचले. लॅच उघडून बघते तर काय… कांताने आमच्या कामवाल्या मावशीकडून सगळं घर सुंदर आवरून चकाचक करून घेतलं होतं.  बेडशीट्स बदललेली, बाथरूम्स स्वच्छ  केलेल्या,  फर्निचर झकास पुसलेलं ,फ्रीज मध्ये दूध,टोस्ट ब्रेड दही बिस्किटे आणून ठेवलेली. गॅसखाली चिट्ठी… ‘ मी बारा वाजता येतेय.’ माझ्या डोळ्यात पाणीच आलं बघा. 

बारा वाजता कांता मला पोळी मटकीची उसळ भात असा घरून डबा घेऊन आली. किती कौतुक वाटलं मला तिचं. गहिवरून आलं मला. कोण करतं हो इतकं ? पण ही मुलगी वेगळीच आहे. 

मध्ये माझ्या मैत्रिणींना मी घरीच पार्टी दिली. कांताला मदत करायला चारला बोलावलं. सगळ्या जणी आल्या, हिने सगळ्या डिशेस भरल्या, सगळ्यांशी हसून खेळून बोलली. मैत्रिणींना माझा चक्क हेवाच वाटला. एक म्हणाली ‘ अशी पाहिजे बाबा कांता आम्हालाही.’

कांता हसत म्हणाली, ”आमच्या बाई पण किती माया लावतात मला. आज पंधरा वर्षे झाली की मला इथं येऊन. मला हे घर माझंच वाटतं.”  तिने पटापट सगळं  मागचं आवरलं आणि घर ओटा स्वच्छ

करून गेली सुद्धा. मध्येच लाजत लाजत येऊन मला पायातले पैंजण दाखवले. म्हणाली, “देव

पावला बघा.एवढ्या वर्षात पहिल्यांदाच  केले नवऱ्याने पैंजण आणि हे सोन्याचे कानातले.”  मला वर

म्हणाली, “ बाई,तुमची कृपा.” 

“ अग मी काय केलं कांता? “ तर म्हणाली, “ बया ! नाही कसं?तुम्हीच की मला पायावर उभं केलं नाही का?बसले होते घरी भिऊन. आता बघा. नाही म्हटलं तरी आठ हजाराची काम आहेत मला.पुन्हा एक ला

घरी असते मी.आता स्वतः कमावतेय म्हणून नवरा पण आदर करतोय आणि सासूबाई पण दबून

असतात. हे सगळं माझं चांगलं तुम्हीच केलं नाही का? “ मला कांताने खाली वाकून नमस्कार केला. माझ्या आणि तिच्याही  डोळ्यात पाणी आलं. डोळे पुसून हसून म्हणाली, “ आता दिवाळीला स्कूटी घेतो तुला म्हणालाय आमचा नवरा ! बघते काय करतो.“ 

“ येते का पण तुला चालवता स्कूटी ग’? “ 

 “हो मग ! कवाच शिकली मी  .भुंगाट जाते की मैत्रिणीच्या स्कूटीवरून.. आता हा बाबा घेतोय तर घेऊ दे की. देव पावला म्हणायचा.” 

दोघीही हसलो आणि  कांता हसत हसत जिना उतरली.

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments