श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ मी मतदार — भाग – ८ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

मी गोंधळलेला.

मत कुणाला द्यायचं याबाबतीत माझा गोंधळ होतो आहे. मला आगामी निवडणुकांच्या आत हे ठरवायचं आहे. पण कसं ठरवायचं ? इतक्या वर्षात पाहतो आहे बऱ्याच वेगवेगळ्या पक्षांची सरकारे येऊन गेली. पण कुठल्याही सरकारमुळे फार मोठा फरक किंवा बदल झाला असे दिसत नाही. हा थोड्याफार किरकोळ गोष्टी अधिक आणि उणे दोन्ही बाजूने होतात. सत्ताधारी पक्षाच्या बाजूने असणारे, सरकार किती चांगले आहे हे सांगत असतात. विरोधी पक्षाची मंडळी हे सरकार किती वाईट आहे हे सांगत असतात. सरकार बदललं की माणसं इकडची तिकडे होतात परंतु सत्ताधारी पक्ष जे बोलायचं तेच बोलतात विरोधी पक्ष जे बोलायचं तेच बोलतात. काहीच फरक नाही. कुठलंही बजेट आलं की हे बजेट कसं चांगलं आहे हे सत्ताधारी पक्ष सांगतात. हे बजेट कसं वाईट आहे हे विरोधी पक्ष सांगतात. विरोधी पक्षातील सत्तेत गेले आणि सत्तेतले पक्ष विरोधात आले तरी विरोधी पक्ष म्हणून जे मत त्यांनी व्यक्त केलेलं असतं तेच त्यांच्या विरोधी लोक बोलतात. अधिवेशनाच्या आधी चहापानावर बहिष्कार घालणं हे तर विरोधी पक्षांचे कामच. सतत तीच बातमी. कशासाठी ते चहापान ठेवतात ? आणि माध्यमे तरी या बातम्या जशाच्या तशा का सादर करतात? या सगळ्या गोष्टी पाहिल्या की सत्ताधारी पक्ष कुचकामाचा आणि विरोधी पक्ष मात्र ग्रेट आणि विरोधी पक्ष जेव्हा सत्ताधारी बनतो त्यावेळी तो कुचकामाचा ठरतो. शेवटी वेगवेगळे पुढारी वेगवेगळे नॅरेटिव्ह सेट करण्यासाठीच प्रयत्न करत असतात. एकूण विचार केला तर कुठल्याही राजकीय व्यक्तीला सामान्य माणसाच्या प्रॉब्लेम्स मध्ये फार मोठा इंटरेस्ट नसतो. त्यांना इंटरेस्ट फक्त स्वतःबद्दल प्रसिद्धी मिळवणे आणि एक विशिष्ट दिशेने समाजमनावर प्रभाव टाकण्याचा म्हणजेच नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करणे. एवढेच गरजेचं असतं असं वाटतं. भ्रष्टाचार तसाच चालू असतो. गुन्हेगारी तशीच चालू असते. आत्महत्या तशाच चालू असतात. बलात्कार तसेच चालू असतात. सरकारचं नुकसान तशाच पद्धतीने चालू असतं. दरडी कोसळत असतात. पुरामध्ये हानी होत असते. पुन्हा पुन्हा सगळ्या आपत्ती तशाच पद्धतीने येत असतात जात असतात. कॉपी करून परीक्षा पास होणे हे तसेच वर्षानुवर्षे चालू असते. कोणत्याही सरकारी कार्यालयात कोणतेही काम सहजासहजी न होणे हे तसेच चालू आहे. सरकारी काम आणि चार महिने थांब कधी कधी चार वर्षे थांब. परंतु असेच चालू आहे. न्यायव्यवस्था या नावाची जी व्यवस्था आहे त्याचा न्यायाशी फारसा संबंध आहे असे दिसत नाही. न्याय या नावाखाली जो निकाल मिळतो तो सुद्धा योग्य वेळी कधीच मिळत नाही. सच्चरित्र लोकांचा अपमान करणे. विरोधी पक्ष्यांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न करणे. या सगळ्या गोष्टी कुणाकडूनच चुकलेल्या नाहीत. शेवटी कधी कधी असे वाटते की कुणालाही मत दिले तरी आपल्या परिस्थितीत काय फरक पडणार आहे ? जाऊदे कुणी का निवडून येईना. मत द्यावे का मग? का न द्यावे?

मी पूर्णपणे गोंधळलेला

आणि कन्फ्यूज्ड (?)

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments