सौ.अश्विनी कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ सखी रंगावली… ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी ☆

दोन बोटांच्या चिमटीत अलवारपणे रांगोळी घ्यायची आणि मुक्तपणे जमिनीच्या अंगांगावर, फक्त तिच्यासाठी विविध रंग ढंगाचे, सुरेख, सुबक,कोरीव अमाप अलंकार आपण स्वतः घडवायचे,तिच्या सौदर्यासाठी आपल्या आत्म्याचा आविष्कार करायचा आणि तिला मनभावन करायचं! अहाहा! यातील अत्युच्य आनंद काय वर्णावा…

रांगोळी…अस नुसतं म्हटलं तरी अनेक आकार, आकृत्या, रंग, रेषा,ठिपके सगळं डोळ्यासमोर येऊ लागतं. 

मी कुठेही गेले तरी माझं लक्ष प्रथम दर्शनी रांगोळीकडे जात, त्यात काय नावीन्य आहे, त्यातील कलात्मकता, कल्पकता, सर्जनशीलता माझं लक्ष आपोआपच वेधून घेते. 

खर तर प्राचीन काळापासून घराच्या भिंतींवर, दारात विविध आकार, आकृत्या, सांकेतिक चिन्ह रेखाटून लिंपन केलं जात असे, पण तेव्हा  त्याला रांगोळी  म्हणत नसत. अशी चिन्ह ,आकृत्या शुभसुचक असल्याचं प्राचीन काळी मानत असत.

आपल्या संस्कृतीतही रोज देवघरात, दारात  रांगोळी काढली जाते. रांगोळी  नकारात्मक शक्तीला घरात प्रवेश करू देत नाही अशी समजूत आहे.

रांगोळीची शुभचिन्ह, स्वस्तिक, कमळ, गोपद्म, शंख, देवीची पावलं, ठिपक्यांच्या विविध रांगोळ्या सर्वांच्याच परिचयाच्या आहेत.विविध सण, समारंभ,  कार्यक्रम, उदघाटन, रांगोळी,स्पर्धा, उत्सव अशा अनेक प्रसंगी मोठं मोठ्या आकर्षक रांगोळ्या लक्षवेधी ठरत आहेत.

कुणी फुलापानांची, कुणी धान्याची रांगोळी काढत. कुणी पायघड्यांची तर कुणी पाण्यावर, तेलावरही रांगोळी काढतात.  दक्षिणेकडे तांदुळाच्या पीठाने रांगोळी काढतात. कुणी थ्रीडी रांगोळी काढतात तर कुणी पोर्ट्रेट रांगोळी काढतं.  कुणी देवदेवतांची  थोर व्यक्तीची रांगोळी काढतात. रांगोळीकार, कलाकार, रसिक त्या त्या ठराविक प्रसंगी अशा आपल्या कला, हौस  रांगोळीच्या माध्यमातून सादर करतात आणि प्रसंगाला शोभा आणतात. 

रांगोळी हाती आली की मला काय काढू नी काय नको असं होऊ लागतं. वेगळं काही काढावं अस वाटू लागतं!

अगदी नव्या वर्षारंभी, गुढीपाडव्याची उंच ऐटीत उभी असलेली गुढी, तिला नेसवलेलं हिरवं ,लाल काठाच रेशमी वस्त्र, झेंडूच्या फुलांचा हार आणि साखरेची केशरी माळ,वरचा उपडा केलेला कलश…जसच्या तस माझ्या रांगोळीत अवतरत! चैत्रगौरीची आरास करून झोपाळ्यातील गौरीसमोर तेहतीस प्रतिकांची रांगोळी म्हणजेच चैत्रागण काढताना त्या रेषा नाजूक, सुबक  रेखीव हुबेहूब दिसावीत असा प्रयत्न असतो. आता तर असे मोठं मोठ्या रांगोळ्यांचे तयार छाप ही मिळतात. पण मला ते छाप मारणं म्हणजे आळशीपणा,कामचलावूपणा केल्यासारखं वाटत. 

माझ्या रांगोळी रेखाटन प्रक्रियेतच आषाढी वारीही होते. या वारीतून साक्षात पांडुरंग अवतरतो. त्यासाठी तासनतास गेले तरी त्या पांडुरंगाच मुखकमल तयार होताच उच्च कोटीचा परमानंद मिळतो.

हिरव्या सरींचा श्रावण ,घरात आणि दारातही हिरवीगार रांगोळी माझ्याकडून काढून घेतोच. गणपतीत, रोज एक वेगळी गणपतीची रांगोळी! गौरी आगमनाला, तांब्याच्या गौरी..कलशावर बसवलेले त्यांचे मुखवटे,त्यांचे अलंकार, डोळ्यातील भाव, लाल ओठ,केस, हसरा चेहरा किती किती म्हणून त्यांना रांगोळीने मोहक करू अस होत मला! 

नवरात्रीत ठरलेल्या रंगांप्रमाणे रोज ठरलेल्या रंगाची रांगोळी, पण वैविध्यपूर्ण ,त्यात अमूर्त कलेचाही भाग येतो. अष्टमीला देवीचा मुखवटा रेखाटण्यात खरोखर एक आव्हान असत!

दसऱ्याला आपट्याची हृदयाच्या आकाराची हिरवीगार पानं काढताना, त्यातील शाखा ,उपशाखा तंतोतंत दिसल्या तर ते पान जीवंत वाटू लागतं! 

दिवाळीत, प्रत्येक दिवशी  रांगोळीची  वेगळी नक्षी ! कमळात विराजमान असलेल्या, आशीर्वाद देणाऱ्या महालक्ष्मी आणि गजलक्ष्मी यांची सुबकता ,मोहकता रेखाटताना… माझी आई नेहमी म्हणते आपण कोण काढणारे? ती जगन्माता आपल्याकडून करवुन घेत असते. 

या देवीच्या सेवेसाठी तिच्यासमोर रांगोळीचा पैठणीचा पदर,काठ, त्यातील नाजूक सोनेरी बुट्टे, पैठणीचा ठराविक रंग लक्ष्मीपूजनाच्या भाव भक्ती आणि  हर्षासोबत मनही सौदर्य भावनेने तुडुंब भरून जात.  शेजारी ठेवलेल्या दिव्यांच, पणत्यांच तेज, मनामनात आणि  वातावरणात पसरत असतानाच… त्या पैठणीच्या काठातील जरीची वीण मधूनच सोन्यासारखी चमचमत असते. 

ह्या दिवाळीच्या तेजोमय आठवणी सरत असतात तोपर्यंत येते संक्रांत!

दोन बाय दोन च्या चौकोनात  राखाडी रंगाच्या आकाशाच संध्याकाळीच दृश्य, खाली  हिरवळीवर हलव्याचे दागिने, मंगळसूत्र, कानातले, हळदी कुंकवाचे करंडे, वाटीभरून रंगीत तिळगुळ हलवा…सगळं रांगोळीच्या टपोऱ्या हलव्याचं ह! ” तिळगूळ घ्या गोड बोला” म्हणून सवाष्णींची ओटी भरून वाण देताना ,प्रत्येक मैत्रिणीने माझ्या रांगोळीच कौतुक केलेलं असत. कौतुकाने मूठभर मांस चढलेल असत आणि आनंदाने आतल्या आत ‘मोतीचुर के लड्डू फूटतात!’

मी  कित्येकदा रांगोळी प्रदर्शन बघायला आवर्जून जाते. तिकडे  हुबेहूब वाटणारी व्यक्तिचित्र, रेल्वेगाडी, पक्षी, अनेक निसर्गचित्र सगळं मनाला भावणारं! एके ठिकाणी तर घडी घातलेल वर्तमानपत्र जमिनीवर पडलंय अस वाटत होतं,इतकी सूक्ष्म, रेखीव हुबेहूब, त्यातील प्रिंट अक्षरही जबरदस्त  बारीक रेखाटली होती. खरच अशा महान कलाकारांना, त्यांच्या कलेला सलाम करावासा वाटतो.

मला अगदी सर्व प्रकारच्या रांगोळ्या येतात अस नाही पण हौस म्हणून  मनापासून प्रयत्न मात्र असतो. ठिपक्यांच्या रांगोळ्यापेक्षा  मुक्त, स्वैर  रांगोळ्या काढणं आणि त्यात माझ्या हृदयातील रंगांचं सौदर्य भरण मला फार आवडत. रांगोळीचे विविध रंग तिच्यात ‘जीव’ आणतात. मला तासनतास स्वतःजवळ थांबवून ,स्वतःला माझ्याकडून घडवून घेणारी, माझ्या रोमारोमाला आनंद देणारी, माझ्यात सर्जनशीलतेचे विचार जागृत करणारी माझी सखी रंगावली! तिच्या कायमच्या सोबतीने माझा प्रत्येक दिवस मंगलमय सण होतो! 

© सौ अश्विनी कुलकर्णी

मानसतज्ञ, सांगली  (महाराष्ट्र)

मो – 9421225491 Email – [email protected] 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments