पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ – २००१ सालची एक आनंददायी आठवण – ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर. ☆

दि. २७ मार्च …. महान तबला वादक आदरणीय श्री. पंढरीनाथ नागेशकर यांची जयंती ! 

त्यानिमित्त त्यांची सुखद आठवण तुम्हां सर्वांबरोबर शेअर करावीशी वाटते…

माटुंग्याच्या कर्नाटक संघ हॉलमध्ये मी, सुनील आणि आदित्य – एका तबला वादकाच्या कार्यक्रमास निमंत्रणावरून ऐकावयास गेलो. तत्पूर्वी घरी एका कार्यक्रमाची रिहर्सल चालल्यामुळे, कार्यक्रमाला पोहोचण्यास आम्हाला उशीर झाला. आम्ही गेल्यावेळी कार्यक्रम जवळजवळ संपतच आला होता. उशिरा पोहोचल्याबद्दल मला जरा अपराधीच वाटत होतं. त्यामुळे आम्ही शेवटच्या खुर्च्यांवर जरी बसलो, तरी बरेच ओळखीचे चेहरे आम्हाला पाहत होते, येऊन भेटत होते. कार्यक्रम संपल्यावर, त्या तबलजींचे  आभार मानून, तसंच त्यांचे गुरू पंडित सुरेशजी तळवलकर यांना भेटून, आम्ही तिथंच थोडा वेळ गप्पा मारत उभे होतो. तिथं सभागृहाच्या मध्यभागी एक तपस्वी (साधारण ऐंशी-एक वर्षांचे), अनेक शिष्यगणांना आशीर्वाद देत होते. मी सर्वांच्या मधेच जाऊन लुडबुड करणं, मला शिष्टसंमत वाटेना. मी त्या तबलजींना विचारलं, “ते वयस्कर सद्गृहस्थ कोण?” ते उत्तरले, “वे तो हमारे गुरुजी पंडित तळवलकर जी के गुरू हैं – तबला नवाझ पंडित पंढरीनाथ नागेशकर जी!” एकदा मनात आलं, जाऊन त्यांना नमस्कार करावा. पण आपणहून सर्वांच्या पुढं पुढं करणं, हा माझा स्वभाव नसल्याने, मला तिथली काही मंडळी जरी ओळखत असली, तरी मी एका कोपर्‍यात सुनील व आदित्यसवे शांतपणे उभी होते. इतक्यात पंडित नागेशकरजी, नेमके मी उभी असलेल्या कोपर्‍यात त्यांची चप्पल असल्याने, तिथेच आले. त्यांना प्रत्यक्ष समोर  पाहून मात्र ते मला ओळखोत वा न ओळखो, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी त्यांना वाकून नमस्कार केला व म्हटले, “नमस्कार, मी पद्मजा फेणाणी जोगळेकर.” एवढ्यात त्यांनी मला आश्चर्याचा सुखद धक्काच दिला. ते म्हणाले, “अरे, मी ओळखतो की तुम्हाला. तुम्ही तर केवढ्या मोठ्या कलाकार! तुमचं फार चांगलं आणि मोठं नाव होतंय, हे पाहून मला खूप आनंद होतो. तुम्ही गोव्याला आमच्या घरी येऊन माझ्यासमोर, माझ्या मुलाबरोबर – विभवबरोबर तबल्यावर, शांतादुर्गेच्या कवळे मठाच्या मंदिरात क्लासिकल कॉन्फरन्सची रिहर्सल केलीत.” नंतर काही काळ ते आमच्या कोंकणीतून सुनीलची व आदित्यची चौकशी करत होते. आतापावेतो मी केवळ लाजेने चूर-चूर झाले होते. बापरे, मी त्या तपस्व्याला चेहऱ्याने ओळखू शकले नाही परंतु त्यांनी तर २० वर्षांपूर्वीचे सर्व कथन केले!

एवढ्यात त्यांनी आणखीन एक बॉम्ब टाकला. त्यांचे शिष्यगण त्यांना जेवायला बोलावण्यास आले व म्हणाले, “गुरुजी, लवकर चला, नाहीतर जेवायला मिळणार नाही..!” परंतु गुरुजी कसचे मिश्कील! त्यांनी म्हटले, “जेवण नाही मिळाले तरी चालेल, कारण आता पद्मजा भेटली, पुरे झाले!” यावर आम्ही सगळे दिलखुलासपणे हसलो…. 

या वयातही त्यांची अफाट स्मरणशक्ती, त्यादिवशी सकाळी १० ते रात्री १० पर्यंत शिष्यांचे प्रेमाने ऐकून घेत, खाली मांडी घालून बसण्याची सहनशक्ती, मिश्कीलपणा, बुद्धिचातुर्य व कमालीचा प्रांजळपणा पाहून मी, माझी बोटे केवळ तोंडात घालायची बाकी होते!! ही मंडळी माझ्यासारख्या लहानांना किती जबरदस्त प्रोत्साहन देतात हे खरेच शिकण्यासारखे होते. 

कार्यक्रम जरी फारसा ऐकायला मिळाला नाही तरी एका अत्यंत गुणी, महान साधू पुरुषाची भेट झाली आणि या दिग्गज कलाकाराकडून प्रेमपूर्वक आशीर्वाद तसंच प्रचंड ऊर्जा मिळाल्याच्या अवर्णनीय आनंदात होते मी!

© पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments