सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “बोगनवेल…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

तसा तो माझा फिरायचा नेहमीचा रस्ता नाही. पण तिथली बोगनवेल फार सुंदर आहे.म्हणून मी कधी कधी तिकडे जाते तिला बघायला… भेटायला..

त्यादिवशी गेले होते.म्हटलं

“कशी आहेस?

अगं आता काही  महिन्यांनी तुझे फुलायचे दिवस सुरू होतील..”

“हो ग…  त्याचीच तर तयारी सुरू आहे पण… कोण बघतं ग आमच्याकडे…. तो कॉर्नर वरचा चाफा त्याच वेळेस फुलतो त्याचेच सगळे कौतुक करतात.त्याची फुलं गोळा करतात, वास घेतात ,घरी नेतात ..आमच्याकडे पाहतही नाहीत…” .. ती आज जरा रुसलीच होती.

” मी येत असते की बघायला.. आणि अगं बघतात तुझ्याकडे ..गडबडीत असतात… निवांत वेळ नसतो आजकाल कोणाकडे  म्हणून…”

” उगीच माझी समजूत काढायची म्हणून सांगू नकोस…”

“नाही ग..खरचं…. तू आपली फुलत रहा. काही दिवसांनी येते परत भेटायला..” अस बोलुन निघाले.

तिला तरी अजून काय सांगू..

आसपास  कंपाउंड वर बोगनवेली दिसतातच. त्यांच्याकडे मी बघत असते .पण ही जरा जास्त लाडकी आहे…..

 

खरंच त्यानंतर बरेच  दिवस त्या रस्त्याकडे जाणेच झाले नाही. काल तिची आठवण आली. म्हणून ठरवले आता भेटायला जाऊ .मागच्या वेळेस  बिचारीचा मूड गेला होता…

गेले… तर ही आपली झाडाला लगटून  वरवर निघाली होती.

झाडाच्या हिरव्या रंगात तिच्या लाल फुलांचा रंग मिसळून गेला होता .

भरगच्च फुलांनी छान बहरली होती. भलतीच देखणी दिसत होती. वाऱ्यावर झुलत डुलत होती.

तिचा रंगोत्सव सुरू होता…. तिच्या वैभवानीशी….

आकाशाच्या पार्श्वभूमीवर किती गोड दिसत होती.

 

“काय  बाईसाहेब इतक्या उंच जाऊन बसलात ..कसं बोलायचं तुमच्याशी?..

“बोल ग..मी ऐकते आहे … तुझीच वाट पाहत होते .किती दिवसांनी आलीस. तुला एक गंमत सांगायची आहे..”

“काय ग..सांग ना…”

 

ती उत्साहाने बोलायला लागली.

“अगं या झाडांनी मला समजावलं….सांगीतल…. कोणी बघेल कौतुक करेल याची कशाला वाट बघतेस ?

तू छान फुलत रहा .निसर्गाची मुक्त हस्ते उधळण करत राहा आणि वर वर जा…इतरांशी तुलना करायचे सोडून दे… आपण आपलं फुलायचं आनंद घ्यायचा आणि इतरांना आनंद द्यायचा…आणि मलाही ते पटलं बरं का…”

“अरे वा”

“आणि पुढे तो काय म्हणाला माहित आहे?”

“काय ग..”

“ म्हणाला.. मी देतो तुला आधार अशी भरभरून बहरलीस की तुझा तुलाच आनंद मिळेल …मग इतरांनी बघितलं नाही आणि प्रशंसा केली नाही तरी तुला काही वाटणार नाही… अगं त्याच्या शब्दांचाच आधार घेऊन निघाले वरवर…. आता कोण काय बोलतय इकडे  लक्ष द्यायला वेळच नाही बघ…”

 

किती आणि काय सांगू असे तिला झाले होते…

मी कौतुकानी  तिचं बोलणं ऐकत होते

“तुझा आनंदी आवाज ऐकून फार छान वाटलं बघ…. झाडांनी किती सहजपणे समजावून सांगितलं तुला..

आणि त्याच ऐकून शहाणी झालीस.. आज तुमचा  दोघांचा  फोटो काढते आणि पाठवते मैत्रिणींना…

तुझं कौतुक सांगते त्यांना”

 

सळसळ पान हलली… चार दोन फुलं खाली पडली…

ती घेऊन घरी आले.

येताना परत एकदा मन भरून बघितलं  तिच्याकडे…

 

किती शिकवतो ना निसर्ग आपल्याला…  त्याचा आवाज ऐकायची आता सवय करून घेणार आहे…

 

तुम्ही पण बघत जा हं बोगनवेलीकडे… त्या आपली वाट पहात असतात…

आपल्या आसपासही  असतात अशा बोगनवेली…. त्यांनाही बघायची सवय करून घ्या…

लक्षपूर्वक बघितलं की त्या दिसतातच….

..  त्यांना तुमच्या शब्दांचा आधार द्या मायेचा स्पर्श द्या ……पाठीवर हात ठेवा…जरा जवळ घ्या…

चार गोड शब्द बोला……

…. मग बघा कसे परिवर्तन होते ….. कारण काही वेळेस फक्त त्याचीच जरूर असते.

मग जमीन तप्त असेल वरून सूर्य आग ओकत असेल तरीसुद्धा त्याची पर्वा  न करता बोगन वेली फुलतातच….

 

आणि त्यांचं ते फुलणं बघून आपल्याला फार मोठे समाधान मिळते…

एक खरं सांगू…

तो आनंद इतर कशानेही मिळत नाही हो .. खरंच .

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments