डॉ अभिजीत सोनवणे
© doctorforbeggars
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “नमाज .. प्रार्थना .. प्रेयर !!” – भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
ही घटना असेल साधारण पाच सहा वर्षांपूर्वीची !
त्या दिवशी मंगळवार होता मला चांगलं आठवतंय… कारण या दिवशी मी सकाळच्या वेळी सेंट अँथनी चर्च कॅम्प येथे असतो.
तिथे असताना, रस्त्यावर भिक्षेकऱ्यांमध्ये तपासताना, एका सुटाबुटातल्या माणसाने कार थांबवून मला “ऑर्डर दिली”, आमच्या बिल्डिंगच्या बाहेर एक माणूस निपचित पडलाय, बहुतेक मेलेला असेल, भिकारी वाटतो तो मला, बघून घ्या एकदा…!
तो कार मधून सुसाट निघून गेला, बिचाऱ्याच्या महत्त्वाच्या मीटिंग असतील.
घराबाहेर एक माणूस “मेला” असेल, पण त्याने काय फरक पडतो ? मीटिंग महत्त्वाची…!
असो,
ज्याला प्रतिष्ठा नसते, अशा व्यक्तीसाठी तो “गेल्यावर”… मेला हाच शब्द वापरतात…
बाकी कालकथीत, कालवश, पैगंबरवासी, दिगंबरवासी, कैलासवासी, देवाघरी… असे शब्द फक्त प्रतिष्ठा असणाऱ्यांनाच मिळतात.
माझ्याही भीक मागणाऱ्या लोकांना, गेल्यावर तरी प्रतिष्ठा मिळेल का ? यासाठी जगताना त्यांनी काय करायला हवं ? हा किडा तेव्हापासून डोक्यात वळवळतो आहेच…
असो, मी रस्त्यावर निपचित पडलेल्या या तरुणाला पाहिले, तो जिवंत होता, त्यानंतर लगेच त्याला ऍडमिट केले, जवळपास पाच लाख रुपये खर्च आला, तो आपणच सर्वांनी मिळून भागवला. (मी एकट्याने नाही…)
पूर्ण बरा झाल्यानंतर समजले, याला सर्व काही काम येतं, स्वयंपाक, वेल्डिंग, फॅब्रिकेटिंग, पेंटिंग, वायरिंग, अजूनही बरंच काही…!
डिस्चार्जच्या दिवशी मी त्याला भेटायला गेलो, त्यावेळी डोळ्यात कृतज्ञता होती… पाया पडून, हाताचे चुंबन घेऊन, मध्येच आकाशाकडे बघत अल्लाहकडे तो माझ्यासाठी काहीतरी मागत होता…
कृतज्ञता कशी व्यक्त करावी, हे त्याचं त्याला समजत नव्हतं…!
‘ भाई घर मे कौन है?’ मी सहज विचारलं.
‘कोई नही सर अकेला हूँ…’
‘कोई तो होगा ना भाई…’
‘न्नहि स्सर… कोई न्नही’ प्रत्येक शब्दावर दाब देत तो म्हणाला. राम कहो या रहीम कहो, उन्ही की भरोसे जिंदा हूँ..’
‘ठीक है, इतना कुछ क्वालिटी तुम्हारे पास है, तो कुछ काम करो, मांगने के लिये रस्ते पे मत आना’
असं म्हणून मी तिथून निघालो. तो परत मागे आला, नमाज पढण्यासाठी जसे हात जुळतात, तसेच जुळवत तो म्हणाला, ‘ मै आपके एहसान कैसे चुकाऊ सर…?’
वैयक्तिक माझ्या आयुष्याच्या सुरुवातीला, मला एका भीक मागणाऱ्या आजोबांनी मदत केली होती, त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी, मी पुढे भिक मागणाऱ्या लोकांच्या पुनर्वसनाचे काम सुरू केले आहे….
मी सुद्धा त्याकाळी त्यांना विचारले होते, ‘तुमच्या उपकारातून मी कसा उतराई होऊ…?’
ते म्हणाले होते, ‘मला काहीही परत करू नकोस बाळा, जे काही तुला द्यायचे आहे, ते समोरच्या अडलेल्याला दे… आणि त्याला सुद्धा हेच सांग की तुझी पात्रता निर्माण झाल्यानंतर, तू पुढे ही मदत पुढच्या नडलेल्याला दे… साखळी चालू राहू देत… साखळी बंद नाही झाली पाहिजे….!’
…… अर्थातच मी त्याला सुद्धा सांगितले, ‘ बाळा कोणीतरी माझ्यावर उपकार केले होते, मी त्याची परतफेड म्हणून तुला मदत केली… आता ही मदत मला परत न करता, तू पुढे एखाद्या अडल्या नडल्या व्यक्तीसाठी कर, म्हणजे एक साखळी तयार होईल… साखळी बंद नाही झाली पाहिजे….!’
.. त्याच्या चेहऱ्यावर भला मोठा शून्य होता… त्याला काय आणि किती समजले मला माहित नाही…!
मी तिथून निघून गेलो, नमाजासाठी जोडलेले हात घेऊन तो तसाच शून्यात बघत होता…!
पुढे जवळपास दोन वर्षे त्याचा माझा संपर्क झाला नाही, एकदा अचानक एका गॅरेजमध्ये काम करताना मला तो दिसला, त्याला काम करताना पाहून मला आनंद झाला. मी गाडीवरून उतरून त्याला मिठी मारली, पुन्हा तो अहसान वगैरेच्या गोष्टी करू लागला आणि पुन्हा मी त्याला सांगितले, कोणालातरी पुढे मदत कर रे… साखळी चालू राहिली पायजे भावा…
…. पुन्हा तो शून्यात…. त्याला काय आणि किती कळलं साखळीविषयी मलाच समजलं नाही….
नमाजासाठी जोडलेला हात मात्र पुन्हा तसाच…!
यानंतर पुन्हा त्या गॅरेजवर गेलो, परंतु तो दिसला नाही…! परत भीक मागायला सुरुवात केली असेल, असं समजून मी निराश झालो.
पुढे कधीतरी कॅम्प भागात मला तो ओझरता दिसला, यावेळी त्याच्यासोबत एक आजी होती…
मी त्याला गाठलं, ‘भाई कहा थे तुम?’
‘सर, दुसरा अच्छा जॉब मिल गया, वो छोड दिया…’ तो हसत म्हणाला
‘बढीया यार….ये साथ में कौन है?’ मी आजीकडे पाहत विचारले.
‘ये मेरी “आई” है सर…’
“आई”‘…? मी बुचकळ्यात पडलो
…… या जगात माझे कोणीही नाही, हे खूप पूर्वी त्याने मला ठासून सांगितले होते… तो माझ्याशी त्यावेळी खोटं बोलला होता… मला वाईट वाटलं.
‘भाई तुने मुझे बोला था, तेरा इस दुनिया मे कोई नही है, फिर ये अम्मी बीच मे कहा से आ गयी?’ मी जरा रागाने विचारलं. ‘झूठ बोला उस वक्त तुमने’ त्याने हातात घेतलेला माझा हात मी झटकून बोललो…. माझी नाराजी त्याला स्पष्ट दिसली.
तो हसला, आणि प्रथमच मराठीत बोलला, ‘ सर, तसं काय नाय ओ … एका दिवशी ही आई मला रस्त्यावर मेल्यागत पडलेली दिसली… मला मी आठवलो… मी पण असाच रस्त्यावर पडलो होतो…. परत सर तुम्ही सुद्धा आठवला…. मला तुम्ही ऍडमिट केलं होतं… मग मी पण तिलाससून ला ऍडमिट केलं. ती बरी झाली…. बरी झाल्यावर मी म्हणलं, मावशी आता कुटं सोडू तुला ?
मावशी म्हणाली, ‘मी आता कुटं जावू ? मला ना मूल… ना बाळ… जिथून आनलं होतंस, तिथंच सोड मला रस्त्यावर बाळा…’ … मला पण “अम्मी” नाही… पण, असती तर मी तिला रस्त्यावर सोडलं असतं का ???’
मंग मी तिला “आई” म्हणून डायरेक दत्तकच घेतलं ना सर… सरळ माझ्या झोपडीत घेऊन आलो, हां, आपल्याकडे हयगय नाय… उसकू बोला, अब तेरेको मय बच्चा हय, खाने का…. मस्त रयनेका… टेन्शन मेरे उप्पर छोडनेका… आता दिवसभर मी गॅरेजवर काम करतो, भाजी विकायचा मी तिला व्यवसाय टाकून दिला आहे, ती दिवसभर भाजी विकते, संध्याकाळी आम्ही मायलेकरं एकत्र भेटतो, सुखदुःख वाटून घेतो आणि जेवण करून मस्त झोपून जातो, टेन्शन कायकु लेनेका…??? “
त्याच्या बोलण्यात, वागण्यात कोणताही बडेजाव नव्हता… आपण काहीतरी विशेष केलं आहे हा भाव नव्हता….!
“आई” म्हणून डायरेक् दत्तकच घेतलं ना सर….! त्याच्या या वाक्यांनी मी किती वेळा रडलो असेल, याचं मोजमापच नाही… ‘ येड्या तु किती मोठा झालास आता तुला कसं सांगू…? ‘
लोक स्वतःच्या सख्ख्या आई बापाला रस्त्यावर आणून बिनधास्त सोडून निघून जातात, अशा दुनियेमध्ये कोणीतरी एक जण आई दत्तक घेतो…!
…. कित्येक जण आई बापाला आंबा समजून, गोड रस आणि गर खरवडून काढून खातात आणि पूर्ण खाऊन झाल्यानंतर त्यांना कोय म्हणून उकिरड्यावर फेकून देतात…! खरंतर ही कोय नसते…. ते बीज असतं…!!! हे बीज पुन्हा जमिनीत रुजवायचं असतं… प्रेमाचं खत घालून, मायेनं प्रेमाची धार सोडायची असते… दारात मग उमलतात आई बापाचे अंकुर, पुढे विशाल वृक्ष होऊन, हेच आई बाप आयुष्यभर आशीर्वाद देत राहतात… सावली होऊन…!
…… जे इतरांना समजलं नाही ते याला कसं समजलं असेल…???
– क्रमशः भाग पहिला
© डॉ अभिजित सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे
मो : 9822267357 ईमेल : abhisoham17@gmail.com,
वेबसाइट : www.sohamtrust.com
Facebook : SOHAM TRUST
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈