मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ नाते असे… ☆ श्री प्रमोद जोशी ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ?  नाते असे…  ?  श्री प्रमोद जोशी ☆

एका आकाशाच्या खाली,

एक दुसरे आकाश !

रविबिंब वर तरी,

खाली चंद्राचा प्रकाश !

माया सांडते वरून,

दीन वाटे गंगास्नान !

अंगावरून ओघळे,

ईश्वराचे वरदान !

तीन पिढ्यांना जोडतो,

असा स्निग्ध भावसेतू !

एका काठावर आजी,

आणि दुजा काठ नातू !

साय सांगा केव्हा येते?

दूध तापल्यावरती !

आजी केव्हा होता येते,

माया मुरल्यावरती !

नदी आटते वाहून,

आजी नेहमी दुथडी !

दोन्ही फाटती शेवटी,

आजी आणखी गोधडी !

दोघांच्याही सुरकुत्या,

त्यांना फक्त उब ठावी !

स्पर्श जणू चंदनच,

चंदनाला उटी लावी !

नातू नाती होती तेव्हा,

येई आजीला मोहर !

आणि सासरीच येई,

तिचे नव्याने माहेर !

आजी नाही अशा घरी,

झाडे उभी पानाविणा !

आजी नाही अशा घरी,

माळ खिन्न रानाविणा !

नातू,नात असे नाते,

शेंडा भेटे जसा मुळा !

आंघोळीच्या बादलीला,

झरा सुचे झुळझुळा !!!!!

 चित्र साभार – श्री प्रमोद जोशी.

© श्री प्रमोद जोशी

देवगड.

9423513604

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्वामी कार… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव ?

☆ स्वामी कार… ✒ ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

(आज ८ एप्रिल. ज्येष्ठ प्रसिद्ध मराठी कादंबरी कार,साहित्यिक,‌स्वामीकार, पद्मश्री पुरस्कार प्राप्त मा. रणजित देसाई यांचा आज जन्मदिवस.त्या निमित्ताने केलेली ही स्वरचित अष्टाक्षरी काव्य रचना)

कथा, कादंबरी नाट्य

स्वामीकार मानांकित

ग्रंथ श्रीमान योगीने 

झाले ज्ञान शब्दांकित…! १

 

कोल्हापूरी कोवाडात

जन्मा आले रणजित

माध्यमिक शाळेतून

झाले सर्वां परिचित…! २

 

रणजित देसाई हे

असामान्य व्यक्तिमत्व

मान पद्मश्री लाभला

आकारीले शब्दसत्व…! ३

 

शेती मातीचा लेखक

सर्जनाचा केंद्र बिंदू

कथा, ललित साहित्य

प्रतिभेचा शब्दसिंधू….! ४

 

महाद्वार प्रसादने

लेखनास दिलें रूप

शारदीय सारस्वती

तेजाळला शब्द धूप…! ५

 

कमोदिनी मधुमती

मोरपंखी सावल्यात

साकारला शब्द स्वामी

कला साहित्य विश्वात…! ६

 

राजा रवी वर्मा,बारी

लक्ष्यवेध कादंबरी

कर्णकीर्ती राधेयने

मात केली काळावरी..! ७

 

खिंड पावन जाहली

रणजित शैलीतून

रामशास्त्री तानसेन

शब्द चित्र बोलीतून…! ,८

 

सत्य ग्रामीण जीवन

किंवा असो इतिहास

पौराणिक ढंगातून

कथा पात्र रंगे खास..! ९

 

पत्नी माधवी देसाई

आत्म चरीत्र गाजले

पत्नी पत्नी नात्यातले

शब्द अंतरी नाचले…! १०

 

नाट्य साहित्य क्षेत्रात

अध्यक्षीय बहुमान

अकादमी पुरस्कार

दिले शारदीय वाण..! ११

 

महाराष्ट्र गौरवात

चिरंतन आहे स्मृती

रणजित देसाई ही

स्वामी कार फलश्रृती..! १२

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रे घना!… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ रे घना!… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆ 

अश्या सोनवेळी का व्याकुळ होशी

असे काय दाटून आले घना!

इथे मोर देखील टाके उसासा

तळेही निःशब्द, मौन दाटे वना

 

दरवळे ना सुगंध, ना उमले कळीही

ना दवबिंदू, ना भ्रमर, काय उरले वना

का आळविशी ते सूर भैरवीचे

कुणी छेडली तार हळव्या घना !

 

इथे चिंब झाली वनातील वाट

सोसवेना तरूला वसंताचा थाट

एकेक वृक्ष करी पर्णत्याग

अनासक्तीने का व्यापशी घना !

 

अश्या सोनवेळी का व्याकुळ होशी

असे काय दाटून आले घना!

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 147 – कौतुकाची थाप ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 147 – कौतुकाची थाप ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

मिळता विजयाचे दान जगी वाढता सन्मान।

तुझी कौतुकाची थाप आज ओथबले मन।।धृ।। ं

 

 बोट हातात धरून वाट जगाची दाविली।

तुझी आमृताची बोली माझ्या ओठी ग सजली।

असे प्रेमाचे लाभले माझ्या जीवना कोंदन।।१।।

 

माझे पुरविलेस लाड मारून वस्त्राला ग गाठी।

के लेस दिनरात काम मला शिकविण्यासाठी।

तुझ्या हाताला ग घटे माझ्या हाती ग लेखन।।२।।

 

चढून शंभर पायरी भरले बारवाचे पाणी।

दिली ओठावर गाणी पाय तुझे ग अनवाणी ।

तुझ्या घामाच्या थेंबानं  माझा वाढविला मान।३।।

 

तुझ्या शिस्तीने घडले चढले यशाच्या शिखरी।

राहिलीस तू अर्ध पोटी देण्या ज्ञानाची शिदोरी।

कसे विसरावे सांग तुझे वात्सल्याचे दान।।४।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चैत्रगौर… सुश्री रश्मी भागवत ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

? मनमंजुषेतून ?

🍃 चैत्रगौर… सुश्री रश्मी भागवत ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

गाई कोकीळ भूपाळी सखे तुझ्या स्वागताला

इंद्रधनूचे तोरण शोभे तुझ्या गाभार्‍याला

घाल रात्रीचे काजळ, माळ वेणीत चांदणे

चंद्रकोरीची काकणे, दंवबिंदूंची पैंजणे

सोनसळीचा पदर, सांजरंगाची पैठणी

गर्भरेशमी आभाळशेला पांघर साजणी

सूर्यकिरणांनी रेख भाळी कुंकवाची चिरी

गळा नक्षत्रमण्यांची माळ खुलू दे साजिरी

 गो-या तळव्याला लाव चैत्रपालवीची मेंदी

कर आकाशगंगेला तुझ्या भांगातली बिंदी

रूपलावण्य हे तुझे, जशी मदनाची रती

ओठांवरी उगवती, गालांवरी मावळती

जाईजुईचा मांडव, त्यात चंदनाचा झूला

ये ग सये चैत्रगौरी, सख्या झुलविती तुला

चैत्र नवरात्री ,झुल्यावर बसलेली गौर आणि चैत्रातील हळदी कुंकू ,मंतरलेले बालपणीचे दिवस आठवांचे सुंदर हिंदोळे… घरातील साध्या सुध्या ट्रंक ,टेबल स्टूल आणि पारंपरिक गालिचे शेले असे ठेवणीतले सामान घेऊन आणि शोकेस मधील पक्षी प्राणी फुले फुलदाण्या घेऊन सजावटीत सुंदर पितळी झोपाळ्यावर गौर नटून सजून बसे . त्यात आमची पितळी भातुकली मांडली जाई .दारचे मोगऱ्याचे गजरे ,जाई जुईचे हार ,सोंनचाफ्याच्या  वेण्या ,आंब्याच्या पानांची तोरणे , बागेतल्या कैऱ्या , आणि इतर उन्हाळी फळे ,कलिंगड ,काकड्या ,टरबूज ,द्राक्षे आंबे अशा रसरशीत फळांच्या सुंदर सजावटीची उतरंड गौरीच्या पायथ्याशी सजवली जात असे . परिसरातील मुबलक पळसाची पाने धुवून पुसून आंब्याच्या डाळीसाठी दिली जात ,कैरीचे गूळ वेलची जायफळ केशर युक्त पन्हे अक्षरशः छोटे पिंप भरून केले जाई ,आदल्या रात्री टपोरे हरभरे भिजवून रोवळी रोवळी भरून उपसले जात .  ओल्या नारळाच्या करंज्या ,काही फराळाचे जिन्नस सजावटीत मांडले जात . केशरी भात , पाकातील चिरोटे अशी साधी पक्वान्ने रांधली जात.

दारात सुबक चैत्रांगण रेखत असू त्यावेळी  आम्ही… 

डाळ पन्हे हरभरे फळे यातील पोषणमूल्ये आणि कॅलरीज यांचा उहापोह न करता सख्यांसाठी हे पाठवत आहे .

आजूबाजूच्या चार पाच वाड्यांमधील बिऱ्हाडातील सख्या, त्यांच्या लेकी बाळी ,अगदी लांबच्या ओळखितील सुद्धा स्त्रिया पारंपरिक ठेवणीतील वस्त्र चार दागिने घालून एकमेकींची चैत्र गौर आवर्जून बघायला जात ,त्या निमित्ताने भेटी गाठी आणि ऐसपैस बोलणे बसणे होई.. सुंदर ताजी हळद ,पिंजर ,वाळ्याचे अत्तर ,गुलाबपाणी शिंपडून स्वागत होई .

बतासा , आंब्याची डाळ ,पन्हे देऊन समारंभ होई ,आणि प्रत्येकीची ओल्या हरभर्याची ओटी भरली जाई….घरी मग चटपटा चना तव्यावर परतला जाई ,त्याची चव खमंग खुमासदार लागत असे.

प्रत्येकीची कैरी डाळ त्याची खुमासदार फोडणी आणि पन्हे अगदी विविध चविंचे पण सुंदर चवीचे असे .

चैत्राची पालवी ,मनामनावर आलेली मरगळ झाकोळ सगळे घालवी आणि वसंताच्या चाहुलीने निसर्गातील चैतन्य पुन्हा सदाबहार होण्यासाठी अनुकूल असे .

हवेतील उष्मा सुसह्य करण्यासाठी पांढरा शुभ्र मोगरा , वाळा ,जाई जुई अशी फुले भरभरून फुलत , आसमंतात कडुलिंबाचा नाजूक फुलांचा मोहोर मधुर गंधाची बरसात करीत असे . उत्साहाची आनंदाची श्रीराम भक्तीची  गुढी उभारून चैत्राची सुरुवात होत असे . घरोघरी श्रध्देने जपलेले गीत रामायणाचे सुंदर सूर आवर्जून गुंजत असत.

चैत्राची अशी ही जादू अजूनही मनावर आपला  ठसा उमटवून आहेच.

चैत्रातील ही गौर म्हणजे पार्वतीचे माहेरघरी येणे होय. अशा माहेर वाशिणीचे कौतुक चराचराने केले नाही तर नवलच !! वर दिलेले गीत हे कोकणात पारंपरिक गौरीचे गीत म्हणून. गायले जाते. हा चैत्र गौरीचा चंदन झुला अनुभवला असेल त्या प्रत्येकीच्या मनात दर वर्षी नक्कीच झुलत असणार..

इरकली टोप पदरी अंजिरी जांभळ्या काठाची गर्भ नऊवारी साडी ,टपोरी मोत्याची नथ , चार मोजकेच पण ठसठशीत  दागिने , आईचा सात्विक चेहरा , कर्तृत्ववान कष्टाळू समाधानी वावर ….आत्ता कळतंय की पार्वती म्हणजे दुसरे तिसरे कोण ….ती आईच….जगन्माता ….आणि प्रत्येकाच्या घराघरात नांदणारी आपापली आईच !!!! 

लेखिका : सुश्री रश्मी भागवत

प्रस्तुती :  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ असं कुठं असतं का देवा ?… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती सुश्री नेहा जोशी ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ असं कुठं असतं का देवा ?… लेखक – अज्ञात  ☆ प्रस्तुती सुश्री नेहा जोशी

चौऱ्याऐंशी लक्ष योनीनंतर

जन्म दिलास माणसाचा..

हाच एक जन्म जिथून

मार्ग खुला मोक्षाचा….. 

 

दिलंस एक मन त्यात

अनेक विचारांचा वावर..

आणि म्हणतोस आता

या विचारांना आवर…… 

 

दिलेस दोन डोळे

सौंदर्य सृष्टीचे बघायला..

आता म्हणतोस मिटून घे

आणि बघ तुझ्यातल्या स्वतःला…… 

 

नानाविध चवी घेण्यास

दिलीस एक रसना..

आणि आता म्हणतोस

अन्नावर ठेवू नकोस वासना…… 

 

जन्मापासून नात्यांच्या

बंधनात अडकवतोस..

बंध सगळे खोटे असतात

असं आता म्हणतोस…… 

 

भाव आणि भावनांचा

इतका वाढवतोस गुंता..

आणि मग सांगतोस

व्यर्थ आहे ही चिंता…… 

 

संसाराच्या रगाड्यात

पुरता अडकवून टाकतोस..

म्हणे शांतपणे ध्यान कर आता

अशी कशी रे मजा करतोस ?…… 

 

मेजवानीने भरलेले ताट 

समोर बघून उपास करायचा..

हाच अर्थ का रे

सांग बरं मोक्षाचा ?…… 

 

वर बसून छान पैकी

आमची बघ हो तू मजा..

पाप आणि पुण्याची 

मांड बेरीज आणि वजा…… 

 

माहीत नाही बाबा मला

मिळेल की नाही मोक्ष..

तू जवळ असल्याची फक्त

पटवून देत जा साक्ष……….. 

लेखक : अज्ञात…🙏 

संकलन : सुश्री नेहा जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #169 ☆ महाबली हनुमान!… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 169 – विजय साहित्य ?

☆ महाबली हनुमान!… ✒ ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

बलभीम वीर। आंजनेय सूत॥

केसरीचा पूत। हनुमान॥१॥

नाशिक हा जिल्हा । अंजिनेरी ग्राम॥

देवभूमी धाम। चिरंतन॥२॥

शक्ती सिद्धी युक्त। घेतलीसे धाव ॥

इंद्रवज्र घाव। हनुवटी॥३॥

शेंदूर नी तेल। रूई फुले पाने ॥

मंदिर घोषाने। निनादले॥४॥

शाप मिळालेला।  विसर शक्तीचा॥

व्यासंग भक्तीचा। रामनामी ॥५॥

घडे रामभेट। शब्द चिरंजीव॥

दासभक्ती नीव । हनुमंत ॥६॥

जांबुवंत कृपे। परतली शक्ती॥

रामनामी भक्ती। स्थिरावली॥७॥

सीता शोध कार्य। झाला अग्रेसर ॥

रावणाचे घर। पेटविले॥८॥

जानकीचा शोध। वायुपुत्र घेई॥

संदेश तो देई। राघवासी॥९॥

जिथे जिथे राम। तिथे हनुमान॥

भक्ती शक्ती वाण। अलौकिक॥१०॥

चातुर्य नी शौर्य। पराक्रम गाथा॥

लीन होई माथा। बजरंगी॥११॥

मारुतीचे स्तोत्र। भीमरुपी पाठ॥

महारूद्र वाट। फलदायी॥१२॥

 संकट मोचन। बल उपासना॥

समर्थ प्रेरणा। रामदासी॥१३॥

बजरंग बली। उपासना मंत्र॥

यशदायी तंत्र। हनुमंत॥१४॥

चिरंजीवी दास। देव पंचमुखी॥

रामनाम मुखी। अव्याहत॥१५॥

कविराज शब्दी। वर्णाया मारुती॥

द्यावी अनुभूती। रामराया॥१६॥

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बारा महिने… ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

? कवितेचा उत्सव ?

☆ बारा महिने… ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

वसंतातला मोहर सांगे,चैत्र  पहा आला

कडूनिंबासह साखरमाळ,गुढी उभी ती दारा

तप्त उन्हाळा वैशाखाचा,सण साजरा अक्षय्य तृतीयेचा

डोंगरची काळी मैना,सोबत  गोडवा आंब्याचा

भरभर वारे सरसर धारा,ज्येष्ठ घेऊनी आला

सजूनी त्या ललना निघाल्या वटपूजा करण्याला.

गुरुपूजनी वंदन करण्या,आषाढ उभा ठाकला

पुरणपोळी अन् कर तळण्या बेंदूर सण हा  आला

कधी ऊन तर कधी पाऊस,गंमत न्यारी श्रावणाची

नागपंचमी,गोकुळाष्टमी, रक्षाबंधन रेलचेल सणांची

ढमढम ढमढम ढोल वाजले,गणरायाचे आगमन झाले

भादव्यातली माहेरवाशीण गौरीपुजन थाटात झाले

घरोघरी ती घटस्थापना, दुर्गामाता बसली पाटा

रास-गरबा नाद घुमवित,अश्विनातला दसरा आला

दिव्यादिव्यांच्या ज्योति उजळीत,कार्तिकाचे आगमन झाले

लाडू,चकली,करंजीने पाडवा भाऊबीज  गोड झाले

मार्गशीर्षी दत्तजयंती,दत्तचरणी मन हे लागे

आल्हाददायक वातावरण,थंडीची ती चाहूल लागे.

‘तिळगुळ घ्या गोड बोला ‘,पौष मास अवचित आला

बाजरी,गुळपोळी,मिसळभाजीचा थाटच  आगळा,हलव्याचा काटा फुलला.

नविन धान्याची रास पडली,पूजन करा नव्याच्या पूनवी

माघ महिना थंडी भारी,उबदार वाटते शेकोटी

आता आला फाल्गुन महिना,होळीचे  करा पूजन

नविनची लागे चाहुल,जुने पुराणे होता विलीन.

वर्षाचे हे महिने बारा , रंग वेगळे प्रत्येकाचे

जीवन त्यामध्ये रंगून जाते,जरी रिवाज वेगळे सा-यांचे

तीन वर्षांनी अवचित येई,अधिक मास त्याला म्हणती

तेहतीस अनारसे ताट भरुनी,जावयास दान देती

© सुश्री त्रिशला शहा

मिरज

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ म्हणून काय झाले… ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? मनमंजुषेतून ?

☆ म्हणून काय झाले… ☆ सुश्री सुनीला वैशंपायन 

  आम्ही अजूनही मस्ती करतो

    एकमेकांची खेचत असतो

     मस्त शाब्दिक गुदगुल्या करतो

       सत्तरीच्या झालो म्हणून काय झाले …… 

 

   आजही आम्ही मस्त नट तो

    खूप खूप shopping करतो

     खादाडी पण करत राहतो

      सत्तरीच्या झालो म्हणून काय झाले . …. 

 

   आम्ही यथेच्छ रुसत असतो

      रागाने धुसमुसत राहतो

        पण लगेच छान हसून घेतो

          सत्तरीच्या झालो म्हणून काय झाले…… 

 

     परदेश वाऱ्या करत असतो

      देशातही मस्त फिरत असतो

       नव नवीन ठिकाणे पालथी घालतो

          सत्तरीच्या झालो म्हणून काय झाले …… 

    

  छान छान साडी नेसून मिरवतो

      पंजाबी ड्रेस ची ही मजा घेतो

        जीन्स पँट ही आपल्याशा करतो

            सत्तरीच्या झालो म्हणून काय झाले …… 

 

     आंबट चिंबट जोक ऐकत असतो

       मनसोक्त खिदळत असतो

         पण कधीतरी एकदम गंभीर होतो

              सत्तरीच्या झालो म्हणून काय झाले …… 

 

      देवदर्शन करत असतो

         निसर्ग दर्शन पण करत राहतो

            मनःस्वास्थ्य टिकवून ठेवतो

               सत्तरीच्या झालो म्हणून काय झाले ……     

 

       टीव्ही यूट्यूब शी नाते जोडतो

        अवतीभवती चे जग जाणून घेतो

          स्वतः च त्यातून काही बोध घेतो

             सत्तरीच्या झालो म्हणून काय झाले ….. . 

 

      Get together करत असतो

        मस्त गप्पा झोडत असतो

          प्रत्येकाचे अनुभव share करतो

            सत्तरीच्या झालो म्हणून काय झाले ……

 

       गोड गाणे गुणगुणत असतो

         उडत्या गाण्यावर बसूनच थिरकत असतो

           मौज मस्ती करत राहतो

              सत्तरीच्या झालो म्हणून काय झाले ….  . 

 

        कधी कधी मुखवटे लावून जगत असतो

          जग रहाटी चा मान राखत असतो

            देवाण घेवाण करून सुखावत असतो

                सत्तरीच्या झालो म्हणून काय झाले …… 

 

        Morning walk करत रहातो           

           Sports shoes चे सुख अनुभवतो

              कित्ती स्टेप्स चाललो ते मोजत राहतो

                  सत्तरीच्या झालो म्हणून काय झाले ……

 

         Laptop, Tab शी मैत्री करतो

           स्मार्टफोनशी हितगुज करतो

             एकमेकामधील अंतर कमी करतो

                 सत्तरीच्या झालो म्हणून काय झाले …… 

       कडू गोळ्या औषधाच्या गिळत असतो

           पण गोड आठवणी मनात घोळवत असतो

             त्याच शिदोरीवर जीवन आनंददायी बनवतो

                सत्तरीच्या झालो म्हणून काय झाले …… 

कवयित्री- अज्ञात

प्रस्तुती : सुनीला वैशंपायन

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २२ – ऋचा १५ ते  २१ ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २२ – ऋचा १५ ते  २१   ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २२ ऋचा १५ ते  २१

देवता : विष्णू

आज मी आपल्यासाठी मेधातिथि कण्व या ऋषींनी विष्णुदेवतेला  उद्देशून रचलेल्या ऋग्वेदाच्या पहिल्या मंडळातील  बाविसाव्या सूक्तातील सोळा ते एकवीस या ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे. 

मराठी भावानुवाद : 

स्यो॒ना पृ॑थिवि भवानृक्ष॒रा नि॒वेश॑नी । यच्छा॑ नः॒ शर्म॑ स॒प्रथः॑ ॥ १५ ॥

कनवाळू हे पृथ्वीमाते रक्षण हे तव कर्म

विध्वंस न करणे कोणाचा हाची तुझा गे धर्म

सकलसमावेशक तू असशी आम्हावरी धरि दृष्टी

सौख्यदायि होउनी आम्हाला दान करी संतुष्टी ||१५||

अतो॑ दे॒वा अ॑वन्तु नो॒ यतो॒ विष्णु॑र्विचक्र॒मे । पृ॒थि॒व्याः स॒प्त धाम॑भिः ॥ १६ ॥

जेथे म्हणुनी श्रीविष्णूंनी केले आक्रमण 

अवनीच्या सप्तप्रदेशांचे  केले ते खंडन

सर्वप्रदेशी हे देवांनो करा अमुचे रक्षण

तुम्हाविना संरक्षण करण्या आहे दुसरे कोण ||१६|| 

इ॒दं विष्णु॒र्वि च॑क्रमे त्रे॒धा नि द॑धे प॒दम् । समू॑ळ्हमस्य पांसु॒रे ॥ १७ ॥

श्रीविष्णूंनी अखील विश्व केले पादाक्रांत

वामनरूपे तीन पाऊले ठेउनिया जगतात

निमग्न झाली त्यांच्या चरणाच्या धुळीत सृष्टी

आम्हावरती धरा सदैव कृपापूर्ण तव दृष्टी ||१७||

त्रीणि॑ प॒दा वि च॑क्रमे॒ विष्णु॑र्गो॒पा अदा॑भ्यः । अतो॒ धर्मा॑णि धा॒रय॑न् ॥ १८ ॥

संरक्षण करतो जगताचा विष्णू अपराजित

स्थापियले अवनीवरती धर्माचे नियम समस्त

विशाल अपुली तीन पावले टाकुनिया त्याने 

अवघ्या विश्वाला व्यापीले अपुल्या मायेने ||१८||

विष्णोः॒ कर्मा॑णि पश्यत॒ यतो॑ व्र॒तानि॑ पस्प॒शे । इंद्र॑स्य॒ युज्यः॒ सखा॑ ॥ १९ ॥

पराक्रमी विष्णूंची कर्मे अलौकीक गाजती 

कृत्यांच्या योगे ते  साऱ्या कर्मांना पाहती 

इंद्राचा हा सहाय्यकारक असे स्नेही त्याचा

श्रद्धेच्या दृष्टीने पहावे  कर्मांना त्याच्या ||१९||

तद्विष्णोः॑ पर॒मं प॒दं सदा॑ पश्यन्ति सू॒रयः॑ । दि॒वीव॒ चक्षु॒रात॑तम् ॥ २० ॥

पंडित जेव्हा  विष्णूच्या त्या परमपदा पाहती

महती त्याची जाणून घ्याया जिज्ञासू होती

चकित होऊनी विस्मयकारक विष्णूलोकाने 

नेत्र तयांचे विस्फारत जणु व्योमाच्या दर्शने ||२०||

तद्विप्रा॑सोःविप॒न्यवो॑ जागृ॒वांसः॒ समिं॑धते । विष्णो॒र्यत्प॑र॒मं प॒दम् ॥ २१ ॥

सदैव जागृत भक्त स्तवितो बुद्धिशाली विद्वान 

परमपदाने विष्णूच्या त्या प्रभावीत होऊन 

ज्ञात जाहल्या विष्णूलोकाचे करिती स्तवन

अखील विश्वामध्ये प्रसार करिती त्या गाउन ||२१||

(या ऋचांचा व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे.या व्हिडीओची लिंक येथे देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.) 

https://youtu.be/khU_eGlo-GY

Attachments area

Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 25 Rucha 15 – 21

Rugved Mandal 1 Sukta 25 Rucha 15 – 21

 

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print