सुश्री त्रिशला शहा

? कवितेचा उत्सव ?

☆ बारा महिने… ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

वसंतातला मोहर सांगे,चैत्र  पहा आला

कडूनिंबासह साखरमाळ,गुढी उभी ती दारा

तप्त उन्हाळा वैशाखाचा,सण साजरा अक्षय्य तृतीयेचा

डोंगरची काळी मैना,सोबत  गोडवा आंब्याचा

भरभर वारे सरसर धारा,ज्येष्ठ घेऊनी आला

सजूनी त्या ललना निघाल्या वटपूजा करण्याला.

गुरुपूजनी वंदन करण्या,आषाढ उभा ठाकला

पुरणपोळी अन् कर तळण्या बेंदूर सण हा  आला

कधी ऊन तर कधी पाऊस,गंमत न्यारी श्रावणाची

नागपंचमी,गोकुळाष्टमी, रक्षाबंधन रेलचेल सणांची

ढमढम ढमढम ढोल वाजले,गणरायाचे आगमन झाले

भादव्यातली माहेरवाशीण गौरीपुजन थाटात झाले

घरोघरी ती घटस्थापना, दुर्गामाता बसली पाटा

रास-गरबा नाद घुमवित,अश्विनातला दसरा आला

दिव्यादिव्यांच्या ज्योति उजळीत,कार्तिकाचे आगमन झाले

लाडू,चकली,करंजीने पाडवा भाऊबीज  गोड झाले

मार्गशीर्षी दत्तजयंती,दत्तचरणी मन हे लागे

आल्हाददायक वातावरण,थंडीची ती चाहूल लागे.

‘तिळगुळ घ्या गोड बोला ‘,पौष मास अवचित आला

बाजरी,गुळपोळी,मिसळभाजीचा थाटच  आगळा,हलव्याचा काटा फुलला.

नविन धान्याची रास पडली,पूजन करा नव्याच्या पूनवी

माघ महिना थंडी भारी,उबदार वाटते शेकोटी

आता आला फाल्गुन महिना,होळीचे  करा पूजन

नविनची लागे चाहुल,जुने पुराणे होता विलीन.

वर्षाचे हे महिने बारा , रंग वेगळे प्रत्येकाचे

जीवन त्यामध्ये रंगून जाते,जरी रिवाज वेगळे सा-यांचे

तीन वर्षांनी अवचित येई,अधिक मास त्याला म्हणती

तेहतीस अनारसे ताट भरुनी,जावयास दान देती

© सुश्री त्रिशला शहा

मिरज

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments