? मनमंजुषेतून ?

🍃 चैत्रगौर… सुश्री रश्मी भागवत ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

गाई कोकीळ भूपाळी सखे तुझ्या स्वागताला

इंद्रधनूचे तोरण शोभे तुझ्या गाभार्‍याला

घाल रात्रीचे काजळ, माळ वेणीत चांदणे

चंद्रकोरीची काकणे, दंवबिंदूंची पैंजणे

सोनसळीचा पदर, सांजरंगाची पैठणी

गर्भरेशमी आभाळशेला पांघर साजणी

सूर्यकिरणांनी रेख भाळी कुंकवाची चिरी

गळा नक्षत्रमण्यांची माळ खुलू दे साजिरी

 गो-या तळव्याला लाव चैत्रपालवीची मेंदी

कर आकाशगंगेला तुझ्या भांगातली बिंदी

रूपलावण्य हे तुझे, जशी मदनाची रती

ओठांवरी उगवती, गालांवरी मावळती

जाईजुईचा मांडव, त्यात चंदनाचा झूला

ये ग सये चैत्रगौरी, सख्या झुलविती तुला

चैत्र नवरात्री ,झुल्यावर बसलेली गौर आणि चैत्रातील हळदी कुंकू ,मंतरलेले बालपणीचे दिवस आठवांचे सुंदर हिंदोळे… घरातील साध्या सुध्या ट्रंक ,टेबल स्टूल आणि पारंपरिक गालिचे शेले असे ठेवणीतले सामान घेऊन आणि शोकेस मधील पक्षी प्राणी फुले फुलदाण्या घेऊन सजावटीत सुंदर पितळी झोपाळ्यावर गौर नटून सजून बसे . त्यात आमची पितळी भातुकली मांडली जाई .दारचे मोगऱ्याचे गजरे ,जाई जुईचे हार ,सोंनचाफ्याच्या  वेण्या ,आंब्याच्या पानांची तोरणे , बागेतल्या कैऱ्या , आणि इतर उन्हाळी फळे ,कलिंगड ,काकड्या ,टरबूज ,द्राक्षे आंबे अशा रसरशीत फळांच्या सुंदर सजावटीची उतरंड गौरीच्या पायथ्याशी सजवली जात असे . परिसरातील मुबलक पळसाची पाने धुवून पुसून आंब्याच्या डाळीसाठी दिली जात ,कैरीचे गूळ वेलची जायफळ केशर युक्त पन्हे अक्षरशः छोटे पिंप भरून केले जाई ,आदल्या रात्री टपोरे हरभरे भिजवून रोवळी रोवळी भरून उपसले जात .  ओल्या नारळाच्या करंज्या ,काही फराळाचे जिन्नस सजावटीत मांडले जात . केशरी भात , पाकातील चिरोटे अशी साधी पक्वान्ने रांधली जात.

दारात सुबक चैत्रांगण रेखत असू त्यावेळी  आम्ही… 

डाळ पन्हे हरभरे फळे यातील पोषणमूल्ये आणि कॅलरीज यांचा उहापोह न करता सख्यांसाठी हे पाठवत आहे .

आजूबाजूच्या चार पाच वाड्यांमधील बिऱ्हाडातील सख्या, त्यांच्या लेकी बाळी ,अगदी लांबच्या ओळखितील सुद्धा स्त्रिया पारंपरिक ठेवणीतील वस्त्र चार दागिने घालून एकमेकींची चैत्र गौर आवर्जून बघायला जात ,त्या निमित्ताने भेटी गाठी आणि ऐसपैस बोलणे बसणे होई.. सुंदर ताजी हळद ,पिंजर ,वाळ्याचे अत्तर ,गुलाबपाणी शिंपडून स्वागत होई .

बतासा , आंब्याची डाळ ,पन्हे देऊन समारंभ होई ,आणि प्रत्येकीची ओल्या हरभर्याची ओटी भरली जाई….घरी मग चटपटा चना तव्यावर परतला जाई ,त्याची चव खमंग खुमासदार लागत असे.

प्रत्येकीची कैरी डाळ त्याची खुमासदार फोडणी आणि पन्हे अगदी विविध चविंचे पण सुंदर चवीचे असे .

चैत्राची पालवी ,मनामनावर आलेली मरगळ झाकोळ सगळे घालवी आणि वसंताच्या चाहुलीने निसर्गातील चैतन्य पुन्हा सदाबहार होण्यासाठी अनुकूल असे .

हवेतील उष्मा सुसह्य करण्यासाठी पांढरा शुभ्र मोगरा , वाळा ,जाई जुई अशी फुले भरभरून फुलत , आसमंतात कडुलिंबाचा नाजूक फुलांचा मोहोर मधुर गंधाची बरसात करीत असे . उत्साहाची आनंदाची श्रीराम भक्तीची  गुढी उभारून चैत्राची सुरुवात होत असे . घरोघरी श्रध्देने जपलेले गीत रामायणाचे सुंदर सूर आवर्जून गुंजत असत.

चैत्राची अशी ही जादू अजूनही मनावर आपला  ठसा उमटवून आहेच.

चैत्रातील ही गौर म्हणजे पार्वतीचे माहेरघरी येणे होय. अशा माहेर वाशिणीचे कौतुक चराचराने केले नाही तर नवलच !! वर दिलेले गीत हे कोकणात पारंपरिक गौरीचे गीत म्हणून. गायले जाते. हा चैत्र गौरीचा चंदन झुला अनुभवला असेल त्या प्रत्येकीच्या मनात दर वर्षी नक्कीच झुलत असणार..

इरकली टोप पदरी अंजिरी जांभळ्या काठाची गर्भ नऊवारी साडी ,टपोरी मोत्याची नथ , चार मोजकेच पण ठसठशीत  दागिने , आईचा सात्विक चेहरा , कर्तृत्ववान कष्टाळू समाधानी वावर ….आत्ता कळतंय की पार्वती म्हणजे दुसरे तिसरे कोण ….ती आईच….जगन्माता ….आणि प्रत्येकाच्या घराघरात नांदणारी आपापली आईच !!!! 

लेखिका : सुश्री रश्मी भागवत

प्रस्तुती :  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments