मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जगप्रसिद्ध मराठी चित्रकार गोपाळ दामोदर देऊस्कर ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

श्री विनय माधव गोखले

? इंद्रधनुष्य ? 

☆ जगप्रसिद्ध मराठी चित्रकार गोपाळ दामोदर देऊस्कर ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

हैदराबाद येथील  सालारजंग वस्तू संग्रहालयाचे पहिले  व्यवस्थापक, तसेच  निर्मितीस नबाबास सहकार्य करणारे मागील शतकातील जगप्रसिद्ध मराठी चित्रकार गोपाळ दामोदर देऊस्कर यांचा  जन्म ११ सप्टेंबर १९११ रोजी अहमदनगर येथे झाला. गोपाळराव हे दोन वर्षाचे असताना आलेल्या फ्लूच्या साथीत आई आणि वडील यांचा मृत्यू झाला. त्यांचा व त्यांची मोठी बहिण शांता यांचा नातेवाइकांनी सांभाळ केला. नंतर ते हैदराबाद येथे रामकृष्ण देऊसकर या काकांकडे सहा वर्षे राहिले. मूळचे देवास, मध्यप्रदेश येथील देऊसकर कुटुंब  अहमदनगर येथे आले. देऊसकर यांच्या  घरात तीन पिढ्यांपासून कलेची पार्श्वभूमी होती. त्यांचे आजोबा वामन देऊसकर आणि त्यांचे वडील हे मूर्तिकार होते. गोपाळ यांचे वडील मिशन हायस्कूलमध्ये चित्रकला शिक्षक होते. मोठे काका रामकृष्ण देऊसकर हे विसाव्या शतकातील गाजलेले चित्रकार होते.

त्यांनी वर्ष १९२७-३६ दरम्यान मुंबईच्य जे.जे. स्कूल ऑफ आर्ट या मानांकित संस्थेत चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले. १९२७ साली मुंबईला आल्यावर खेतवाडी येथे ललितकलादर्श या नाटक मंडळीच्या बिऱ्हाडात ते राहिले. त्यांनी १९३१ मध्ये जे.जे.मधील अभ्यासक्रम पूर्ण करून प्रथम क्रमांक आणि सुवर्णपदक पटकावले. जे.जे.स्कूलचे तत्कालीन संचालक कॅप्टन ग्लॅडस्टन सॉलोमन यांनी लंडन येथे प्रदर्शन भरवले होते. तेथे देऊसकरांच्या चित्रांचे विशेष कौतुक झाले. त्यांची कला पाहून निजामाने पाच वर्षांकरिता खास शिष्यवृत्ती देऊन चित्रकलेच्या प्रगत अभ्यासाकरता त्यांना युरोपात पाठवले व लंडनमधील ‘रॉयल अकादमी’त त्यांनी शिक्षण घेतले. 

त्या संस्थेच्या लंडनमधील जागतिक कला प्रदर्शनांत त्यांनी सातत्याने पाच वर्षे कलाकृती प्रदर्शित करण्याचा बहुमान मिळवला होता. वर्ष १९३६ व १९३८ च्या रॉयल ॲकडमीच्या प्रदर्शनात देऊसकरांची ‘शकुंतला’ व ‘अ बुल्स हॉलिडे’ अशी शीर्षके असलेली चित्रे  लंडनमध्ये प्रदर्शित करण्यात आली. ही चित्रे बडोदा येथील संग्रहालयात आहेत. त्यांनी ‘शकुंतलेचे पत्रलेखन’ या चित्रांमध्ये निसर्गघटकांच्या  पार्श्वभूमीचा उत्कृष्ट वापर केला आहे. बडोदा-नरेश प्रतापसिंह गायकवाड यांची ‘घोड्यावरून सलामी’  आणि ‘राजगृहात संस्थानिक’ या दोन्ही चित्रांमधून त्यांच्या कल्पकतेचा प्रत्यय येतो. त्या वेळी ही चित्रे मराठी नियतकालिकांच्या मुखपृष्ठांवर छापली गेली. 

हैदराबाद येथील सालारजंग  उभारणीत नबाबासोबत त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. त्यामुळे त्याची खूपच प्रसिद्धी झाली. सालारजंग म्युझियमची मांडणी  ही मराठी माणसाच्या कल्पकतेचे द्योतक आहे. भारतात परतल्यावर त्यांना जे.जे.स्कूल ऑफ आर्ट संस्थेच्या डेप्युटी डायरेक्टर पदावर नेमले गेले. ‘व्यक्तिचित्रकार’ म्हणून देऊस्कर यांनी स्वतःची ‘व्यावसायिक कारकीर्द घडविली. त्यांच्या चित्रशैलीला बॉंबे आर्ट सोसायटीने सुवर्णपदक देऊन त्यांना गौरवले होते. आजही पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिर, तसेच टिळक स्मारक मंदिरातील त्यांनी रंगविलेली भित्तीचित्रे पाहण्यास मिळतात. व्यक्तिचित्रकार सुहास बहुळकर ह्यांनी ‘चित्रकार गोपाळ देऊसकर’ या पुस्तकातून देऊसकरांमधला कलावंत आणि माणूस याची सुंदर ओळख दिली आहे. त्याच्या आठवणी, किस्से, पत्रव्यवहार आणि सोबतची चित्रे, छायाचित्रे येथे पाहण्यास मिळतात. 

जे.जे.तून पदविका घेऊन बाहेर पडल्यानंतर देऊसकरांनी चित्रकलेच्या क्षेत्रातील अनेक महत्त्वाची पारितोषिके व पदके संपादन केली. बॉम्बे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक, सिमला येथील प्रदर्शनात व्हाइसरॉयचे पदक, भारतीय रेल्वेचे प्रथम पारितोषिक ही त्यांपैकी काही महत्त्वाची पारितोषिके होत. भारतात पेस्तनजी बोमनजी यांच्यापासून व्यक्तिचित्रे करणाऱ्या चित्रकारांच्या परंपरेतील श्रेष्ठ कलाकार म्हणून  गोपाळराव देऊसकर यांचे स्थान अव्वल आहे. फेब्रुवारी ८, १९९४ रोजी त्यांचे निधन झाले. 

लेखक – अज्ञात

संग्राहक : विनय मोहन गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ म्हातारपण, श्रवणयंत्र व ऐकू न येणे… लेखक – श्री अतुल मुळे ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ म्हातारपण, श्रवणयंत्र व ऐकू न येणे… लेखक – श्री अतुल मुळे ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

—  हे प्रॉब्लेम आम्ही आमच्या आईचे कसे सोडवले? याचा स्वानुभव. 

आमच्या आईसाठी केवळ घ्यायचे म्हणून तीन श्रवणयंत्रे ती जाईपर्यंत घेतली. साधारण ₹ ४५ हजार खर्च झाला. साधारण ₹ १५ हजार श्रवणयंत्राची किंमत असते. त्या श्रवणयंत्राचा, आई फक्त कुठे प्रोग्रामला गेली तर एक दागिना येवढाच उपयोग झाला. ते ॲडजस्ट करणे, सांभाळून वापरणे, म्हातारपणी त्रास असतो. प्रॅक्टिकली वापर फार कमी केला जातो व खराब होतात. पेशंटला फक्त समाधान असते की आपल्या प्रॉब्लेमवर मुलांनी खर्च केला. दुर्लक्ष केले नाही. 

यावर प्रॅक्टिकल उपाय काय? हा प्रश्न अनेक नातेवाईकांना असतो. 

यावर अनुभवातून सापडलेले उपाय सांगतो…… 

) श्रवणयंत्रापेक्षा खूप चांगला नोकियाचा साधा एक फोन या लोकांना द्यावा. टीव्हीला एक लोकल एफ एम ट्रान्समीटर लावावा. आम्ही असे १५ वर्षे आमच्या घरात आईसाठी केले होते. त्या एफ एम ट्रान्समीटरची रेंज घरापुरतीच असते. त्याची फ्रिक्वेन्सी मोबाईलवरील एफ एम रेडिओवर छान कॅच होते. टीव्ही इतका सुंदर ऐकू येतो की बहिरे लोक फारच खूश होतात व ते लोक टीव्ही बघताना बाहेर मोठा आवाज नसल्याने घरात शांतता राहते. —–अशा प्रकारे टीव्हीचा प्रॉब्लेम सोडवावा. 

) इतर वेळेस अशा घरातील पेशंटबरोबर बोलताना अनलिमिटेड टॉकटाईम पॅक मोबाईलवर टाकावे व या लोकांशी मोबाईलवरूनच संपर्क साधावा. 

मोबाईलला हेडफोन्स लावून या लोकांना टीव्ही ऐकणे व इतर संभाषण करणे या प्रकारे सोपे जाते. नोकियाचे साधे हजार रूपयाचे फोन दहा वर्षे खराब होत नाहीत. कायम गळ्यात फोन लटकवायची सवय होते. 

मी माझ्या आईची शेवटची १५ वर्षे अशीच मॅनेज केली व त्याचे मला व घरातील सर्वांनाच समाधान आहे.

शेवटपर्यंत तिने टीव्ही ऐकला. फोनवर नातेवाईक लोकांशी संवाद साधला. 

त्या काळात अनलिमिटेड टॉक टाईम पॅक सेवा फोनसाठी नसायची. म्हणून कधी कधी मोठ्याने बोलावे लागायचे. पण आता तो प्रश्न शिल्लक नाही. सर्वत्र वायफाय वगैरे असते. फोनवरही अनलिमिटेड डाटा टाकता येतो. व्हॉटस ॲप कॉलही छान होतात. 

श्रवणयंत्रापेक्षा, वृद्ध व कमी ऐकू येणारे बहि-या लोकांसाठी ‘ स्वस्त मोबाईल फोन सेवा ‘ अशी पद्धत सरकारनेच स्वस्तात द्यायची गरज आहे. ते फार सोईस्कर आहे. ही कल्पना संबंधितांपर्यंत पोहोचवा. 

॥ शुभम् भवतु ॥

संग्राहक :  स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ धोंडी महार… – लेखक – श्री आनंद नाईक ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ धोंडी महार… – लेखक – श्री आनंद नाईक ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

अठराव्या शतकाच्या अखेरच्या टप्प्यात “थिओडोर कुक” या, बोरघाटात ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वेसाठी काम करणाऱ्या ब्रिटीश अभियंत्याने “धोंडी महार” या त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या कामगाराच्या मदतीने खंडाळा घाटातील वनस्पतींच्या नोंदी करून सखोल अभ्यास केला आणि “फ्लोरा ऑफ दी प्रेसिडेंन्सी ऑफ बाॅम्बे” हा वनस्पतीशास्त्रावरील अप्रतिम ग्रंथ लिहिला आणि हा ग्रंथ त्याने त्या वेळी त्याच “धोंडी महार” या व्यक्तीस सादर अर्पण केला होता, त्याची गोष्ट…..

मुंबईत रेल्वे आली होती. पण पुण्यात येण्यासाठी रेल्वेमार्ग नव्हता, त्या काळातली ही गोष्ट. पूर्वीच्या काळी मुंबई पुणे प्रवासासाठी १८ तास लागायचे. इतक्या कमी वेळात पुण्यातून मुंबईस जाता येतं  म्हणून लोक खुषीत असायचे.

तो प्रवास कसा असायचा, तर पुण्याची गाडी खंडाळ्याला आली की, सगळ्या लोकांना खाली उतरवून तिथून पालख्या, डोल्या, खुर्च्या नि बैलगाड्यात बसवून सर्वांना घाटाखाली खोपोलीत आणले जायचे. ठाकर आणि कातकरी लोकांच्याकडे सामान वहाण्याचे काम होते. लोकांना अशा प्रकारे खंडाळ्यातून खोपोलीस घेऊन जाण्याचे कंत्राट मुंबईच्या करशेटजी जमशेटची या पारशी व्यापाऱ्याकडे होते. हा प्रवास अठरा तासात पूर्ण व्हायचा आणि इतक्या कमी वेळात पुणे-मुंबई प्रवास होतो, म्हणून लोक खूष असायचे.

याच काळात कर्जत पळसदरीवरून बोरघाट खोदण्याचे काम चालू होते. इंग्रज अभियंता असलेला थिओडोर कुक यांच्या मार्गदर्शनाखाली बोरघाटात रेल्वेलाईन टाकण्याचे व बोगदे खोदण्याचे काम सुरू होते.

आजही घाट पाहिल्यानंतर जाणवते की, त्या काळात पुरेशा सोईसुविधा नसताना देखील हे काम कसे केले असेल. या कामासाठी लाखांहून अधिक कामगार दिवसरात्र खपत होते. कोणतीही यांत्रिक अवजारं नसल्याने मजुरांकरवी साधी घमेली, फावडी व लोखंडी पहारी अशी जुजबी हत्यारं वापरून हे काम चालायचे. साहजिक त्यामुळे दररोज शेकडो अपघात होत असत. 

दिवसाला याची गणती कशी होती, तर दर दिवशी १०० एक अपघात व्हायचे. त्यामध्ये कित्येकांची हाडे तुटायची, कुणाच्या पायावर भल्लामोठ्ठा दगड पडायचा. खरचटण्यापासून जीवघेण्या अपघातापर्यन्तच्या जखमा व्हायच्या. इतक्या मोठ्या कामगारांसाठी वैद्यकीय सेवा उभारणे ही त्यावेळी अशक्य कोटीतली गोष्ट होती. नाही म्हणायला आठ दहा डॉक्टर प्राथमिक उपचार करण्यासाठी तळ ठोकून असल्याच्या नोंदी मिळतात, मात्र लाखोंच्या संख्येने असणाऱ्या कामगारांवर उपचार करण्यासाठी असणारी डॉक्टरांची संख्या असून नसल्यासारखी होती.

अशा वेळी लाखभर लोकांसाठी उपचार असायचा, तो धोंडी नावाच्या व्यक्तीचा. धोंडी इथेच मजूर म्हणून काम करीत होता. पण त्याला वनस्पतीशास्त्राची चांगली माहिती व जाणीव होती. कुणाचा पाय मुरगळला किंवा मोठमोठ्या जखमा झाल्या तर मजूर धोंडीकडे जात. तो जंगलातला पाला तोडून आणत असे, आणि त्यावर तात्काळ उपचार करीत असे. पिचलेली हाडे तो वनस्पतींचा लेप लावून ठीक करत असे. आपल्या डॉक्टरांकडून उपचार होत नाहीत, पण इथे असणाऱ्या या धोंडी महार या व्यक्तीकडून कसे पटकन उपचार होतात, जखमा बऱ्या होतात, असा प्रश्न मुख्य इंजिनियर असणाऱ्या थिओडोर कुक्स या अधिकाऱ्याला पडत असे.

त्याने धोंडी महार या व्यक्तीला सोबत घेतलं आणि संपूर्ण बोरघाट पालथा घातला. घाटात असणाऱ्या वनस्पतींची इत्यंभूत माहिती, त्यांचे औषधी गुणधर्म नोंद करुन घेतले. वनस्पतींचे नमुने गोळा करून त्यांची हुबेहुब चित्रं काढून घेतली आणि वनस्पतीशास्त्रावर इत्थंभूत माहिती असणारा इंग्रजी ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचे नाव ‘फ्लोरा ऑफ दी प्रेसिडेंन्सी ऑफ बाॅम्बे’. वनस्पतीशास्त्रात हा ग्रंथ आजही आधारभूत गणला जातो.

विशेष म्हणजे कुकने हा ग्रंथ धोंडी महार या व्यक्तीस अर्पण केला. त्याने पुस्तकामध्ये हा ग्रंथ ‘धोंडी महार’ यास नम्रपणे  अर्पण करत असल्याचे नमूद केले आहे.

संदर्भ : प्रबोधनकार ठाकरे समग्र साहित्य

लेखक : श्री आनंद नाईक 

9822314544.

संग्रहिका : सौ प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सहस्त्रगंगाधर… लेखक बाबासाहेब पुरंदरे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

सहस्त्रगंगाधर… लेखक बाबासाहेब पुरंदरे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

अग्नि आणि पृथ्वी यांच्या धुंद प्रणयांतून सह्याद्रि जन्मास आला. अग्नीच्या धगधगीत उग्र वीर्याचा हा आविष्कारही तितकाच उग्र आहे! पौरूषाचा मूर्तिमंत साक्षात्कार म्हणजे सह्याद्रि!

त्याच्या आवडीनिवडी आणि खोडी पुरूषी आहेत, त्याचे खेळणे-खिदळणेहि पुरूषी आहे, त्यांत बायकी नाजूकपणाला जागाच नाही. कारण सह्याद्रि हा ज्वालामुखीचा उद्रेक आहे. अतिप्रचंड, अतिराकट, अतिदणकट अन् काळा कभिन्न… रामोशासारखा. 

पण मनाने मात्र दिलदार राजा आहे तो!

आडदांड सामर्थ्य हेच त्याचे सौंदर्य!

तरीपण कधीकाळी कुणा शिल्पसोनारांनी सह्याद्रीच्या कानात सुंदर आणि नाजूक लेणी घातली,

त्याच्या अटिव अन् पिळदार देहाला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून मराठी मुलुखाने त्याच्या दंडावर जेजुरीच्या खंडोबाच्या आणि कोल्हापूरच्या ज्योतिबाच्या घडीव पेट्या बांधल्या, 

त्याच्या गळ्यात कुणी सप्तशृंग भवानीचा टाक घातला,

मनगटात किल्ले कोटांचे कडीतोडे घातले…

सह्याद्रीला इतके नटवले सजवले तरीपण तो दिसायचा तसाच दिसतो! रामोशासारखा ! तालमीच्या मातीत अंग घुसळून बाहेर आलेल्या रामोशासारखा! सह्याद्रीचा खांदाबांधा विशाल आहे, तितकाच तो आवळ आणि रेखीव आहे. त्याच्या घट्ट खांद्यावरून असे कापीव कडे सुटलेले आहेत की, तेथून खाली डोकावत नाही, डोळेच फिरतात!

मुसळधार पावसात तो न्हाऊ लागला की, त्याच्या खांद्यावरून धो धो धारा खालच्या काळदरीत कोसळू लागतात आणि मग जो आवाज घुमतो, तो ऐकावा. सह्याद्रीचे हसणे, खिदळणे ते! बेहोश खिदळत असतो. 

पावसाळ्यात शतसहस्त्र धारांखाली सह्याद्रि सतत निथळत असतो. चार महिने त्याचे हे महास्नान चालू असते. काळ्यासावळ्या असंख्य मेघमाला, त्याच्या राकट गालावरून अन् भालावरून आपले नाजूक हात फिरवित, घागरी घागरींनी त्याच्या मस्तकावर धारा धरून त्याला स्नान घालीत असतात. हे त्याचे स्नानोदक खळखळ उड्या मारीत त्याच्या अंगावरून खाली येत असते. त्याच्या अंगावरची तालमीची तांबडी माती या महास्नानात धूऊन निघते. तरी सगळी साफ नाहीच. बरीचशी.दिवाळी संपली की सह्याद्रीचा हा स्नानसोहळा संपतो. त्या हसर्‍या मेघमाला सह्याद्रीच्या अंगावर हिरवागार शेला पांघरतात. त्याच्या आडव्या भरदार छातीवर तो हिरवा गर्द शेला फारच शोभतो. कांचनाच्या, शंखासुराच्या, सोनचाफ्याच्या व बिट्टीच्या पिवळ्या जर्द फुलांची भरजरी किनार त्या शेल्यावर खुलत असते. हा थाटाचा शेला सह्याद्रीला पांघरून त्या मेघमाला त्याचा निरोप घेतात. मात्र जातांना त्या त्याच्या कानांत हळूच कुजबुजतात, “आता पुढच्या ज्येष्ठांत मृगावर बसून माघारी येऊं हं ! तोपर्यंत वाट पाहा !” रिकामे झालेले कुंभ घेऊन मेघमाला निघून जातात.दाट दाट झाडी, खोल खोल दर्‍या, भयाण घळी, अति प्रचंड शिखरे, उंचच उंच सरळ सुळके, भयंकर तुटलेले ताठ कडे, अस्ताव्यस्त पसरलेली पठारे, भीषण अन् अवघड लवणे, घातली वाकणे, आडवळणी घाट, अडचणीच्या खिंडी, दुर्लंघ्य चढाव, आधारशून्य घसरडे उतार, फसव्या खोंगळ्या, लांबच लांब सोंडा, भयाण कपार्‍या, काळ्याकभिन्न दरडी आणि मृत्यूच्या जबड्यासारख्या गुहा !

असे आहे सह्याद्रीचे रूप. सह्याद्रि बिकट, हेकट अन् हिरवट आहे. त्याच्या कुशी-खांद्यावर राहायची हिम्मत फक्त मराठ्यांत आहे. वाघांतहि आहे. कारण तेहि मराठ्यांच्याइतकेच शूर आहेत !सह्याद्रीच्या असंख्य रांगा पसरलेल्या आहेत. उभ्या आणि आडव्याहि.

सह्याद्रीच्या पूर्वांगास पसरलेल्या डोंगरामधील गल्ल्या फार मोठमोठ्या आहेत. कृष्णा आणि प्रवरा यांच्या दरम्यान असलेल्या गल्ल्यांतच चोवीस मावळे बसली आहेत. दोन डोंगर रांगांच्या मधल्या खोर्‍याला म्हणतात मावळ. एकेका मावळांत पन्नास-पन्नास ते शंभर-शंभर अशी खेडी नांदत आहेत.प्रत्येक मावळामधून एक तरी अवखळ नदी वाहतेच. सह्याद्रीवरून खळखळणारे तीर्थवणी ओढ्या-नाल्यांना सामील होते. ओढेनाले ते या मावळगंगांच्या स्वाधीन करतात. सगळ्या मावळगंगा हे माहेरचे पाणी ओंजळीत घेऊन सासरी जातात. या नद्यांची नावे त्यांच्या माहेरपणच्या अल्लडपणाला शोभतील अशीच मोठी लाडिक आहेत. एकीचे नाव कानंदी, दुसरीचे नाव गुंजवणी, तिसरीचे कोयना. पण काही जणींची नावे त्यांच्या माहेरच्या मंडळींनी फारच लाडिक ठेवलेली आहेत. एकीला म्हणतात कुकडी, तर दुसरीला म्हणतात घोडी ! तिसरीला म्हणतात मुठा, तर चौथीला वेलवंडी ! काय ही नावे ठेवण्याची रीत ? चार चौघीत अशा नावांनी हाक मारली की, मुलींना लाजल्यासारखें नाही का होत ?कित्येक मावळांना या नद्यांचीच नांवे मिळाली आहेत. कानंदी जेथून वाहते ते कानद खोरे. मुठेचे मुठे खोरे. गुंजवणीचे गुंजणमावळ, पवनेचे पवन मावळ, आंद्रेचे आंदरमावळ आणि अशीच काही.मावळच्या नद्या फार लहान. इथून तितक्या. पण त्यांना थोरवी लाभली आहे, गंगा यमुनांची.

सह्याद्रि हा सहस्त्रगंगाधर आहे. मावळांत सह्याद्रीच्या उतरणीवर नाचणी उर्फ नागली पिकते. नाचणीची लाल लाल भाकरी, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि कांदा हे मावळचे आवडते पक्वान्न आहे. हे पक्वान्न खाल्ले की बंड करायचे बळ येते! भात हे मावळचे राजस अन्न आहे. आंबेमोहोर भाताने मावळी जमीन घमघमत असते. अपार तांदूळ पिकतो. कांही मावळांत तर असा कसदार तांदूळ पिकतो की, शिजणार्‍या भाताच्या पेजेवर तुपाळ थर जमतो. खुशाल वात भिजवून ज्योत लावा. नाजूक व सोन्यासारखा उजेड पडेल. महाराष्ट्राच्या खडकाळ काळजातून अशी ही स्निग्ध प्रीत द्रवते. मावळे एकूण चोवीस आहेत. पुण्याखाली बारा आहेत व जुन्नर-शिवनेरीखाली बारा आहेत.

मोठा अवघड मुलूख आहे हा…..  इथे वावरावे वार्‍याने, मराठ्यांनी नि वाघांनीच.

लेखक – बाबासाहेब पुरंदरे

संग्राहक – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कुठलाही आजार आपल्याला का होतो? ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ कुठलाही आजार आपल्याला का होतो?  ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

या प्रश्नाचे सहज सोपे उत्तर आहे…….  तुम्ही स्वीकारल्यामुळे !

आपल्या शरीरात पाण्यावर तरंगण्याची नैसर्गिक शक्ती आहे. पण तरीही माणूस पाण्यात बुडून मरतो. याला काय म्हणाल ? आपल्या मनाने अतिशय स्ट्रॉंगली स्विकारलेय की मला पोहायला येत नाही आणि कोणालाही पोहायला येत नाही ही अंधश्रद्धा आहे. हत्ती किती जड आहे तोही पोहतो. कारण त्याने ठरवलेले नाही. त्याला माहीतच आहे,  तो पाण्यावर तरंगणार आहे. अहो सापाला हात पाय नसतात. तोही पाण्यात पोहतो. म्हणजे हात पाय हलवले, तरच आपण पाण्यावर तरंगू शकतो हाही गैरसमजच आहे. बघा जी माणसं पाण्यात बुडून मरतात त्यांचे शरीर काही वेळाने पाण्यावर तरंगायला लागते. 

याप्रमाणेच आपल्यात प्रतिकारशक्ती आहे. ती आपल्याला कसलाच आजार होऊ नये यासाठी सतत काम करत असते. तिला मनापासून स्ट्रॉंगली मान्य करा. हेच खरे शरीर शास्त्र आहे. ही शक्ती तुमच्यात नसेल तर मेडीकल सायन्स काहीच करू शकत नाही. तर ताप आल्यावर,सर्दी झाल्यावर, शिंक आल्यावर कसलाही आजार झाल्यावर थोडे थांबा. तुमच्यातील प्रतिकारशक्तीला काम करू द्या.

अशा आजारांवर वारेमाप खर्च करणे शरीरावर अत्याचार आहेत. ही अंधश्रद्धा आहे. शरीरशास्त्रात नैसर्गिक प्रतिकारशक्ती म्हणजे खरे विज्ञान आहे.

आपल्या शरीरातली अर्ध्याहून अधिक आजारांच्या मागे आपलं अज्ञ मन असतं. पण कित्येकदा पेशंटला याची माहिती नसते. डॉक्टरांकडे गेलं आणि उपचार घेतले की तात्पुरतं बरं वाटतं, थोड्या दिवसांनी पुन्हा दुखणं, उफाळून येतं, काय करावं, ते समजत नाही.

मन आणि शरीर यांना जोडणारी काही लक्षणे बघू या.

१) एखाद्या गोष्टीची जबरदस्त भिती किंवा चिंता वाटली की घशाला कोरड पडते. 

२) परीक्षेचा किंवा अजून कसला तणाव असेल तर पोटात गोळा येतो, 

३) समोर एखादा अपघात किंवा दुर्घटना पाहिली की हातापायातली शक्ती गळून जाते.

४) आणि याविपरीत सतत हसतमुख असणारी व्यक्ती नेहमी क्वचितच आजारी पडते.

तर हे सिद्ध झाले आहे की, आपल्या शरीरातल्या आंतरिक क्रियांवरही अज्ञात मनाची सत्ता चालते. जसं की, समोर मातीचे कण उडाले की सेकंदाच्या दहाव्या भागात लगेच पापण्या मिटतात. अज्ञात मन शक्तीशाली आहे, पण एखाद्या सेनापतीसारखं, त्याच्यावर सत्ता चालते विचारांची ! ताकतवार असला तरी तो गुलामच ! दिलेला आदेश पाळणं एवढचं त्याचं काम ! आपण जे काही बोलतो तेच आपले विचार आहेत.

१) ब्लडप्रेशर आणि हृदयविकार : – समजा एखादा माणूस नकळत, अशी वाक्ये पुन्हा पुन्हा वापरत असेल, उदा. – त्याला बघितलं की माझं रक्तच खवळतं!

        – ह्यांच्यासाठी मी रक्ताचं पाणी केलं, आणि हे बदलले!

        – माझी तळपायाची आग मस्तकाला जाते!

— क्वचित अशी वाक्ये वापरली गेली, तर हरकत नाही, पण पुन्हा पुन्हा हेच बोलल्यास आणि ते सुप्त मनात गेल्यास त्याचा विपरीत परिणाम रक्ताभिसरणावर नक्कीच होतो. डॉक्टरकडे गेल्यावर औषध-उपचाराने काही काळ बरं वाटतं, पण अज्ञात मन त्याचा पिच्छा सोडत नाही. ही सर्व वाक्य सतत तणावात असणार्‍या व्यक्तीच्या सवयीचा भाग बनतात आणि लवकरच तिला ब्लडप्रेशर आणि मोठ्या स्वरुपाचे हृदयाचे विकार घेरण्यास सुरुवात करतात.

—  थोडक्यात सतत मानसिक तणाव, हताशपणा आणि निराशा अनुभव करणाऱ्या व्यक्तीला हृदयाचे विकार लवकर घेरतात.

२) आतड्यांचे विकार – जी व्यक्ती स्वतःलाच घालून पाडून बोलते, स्वतःची निंदा करते, स्वतःला दुबळा समजते, तिला छोट्या आतड्यांच्या विकारांची समस्या उदभवते.

३) अपचन – बहुसंख्य लोक ह्या आजाराने त्रस्त आहेत. खरं तर मलविसर्जन ही अतिसहज आणि नैसर्गिक क्रिया आहे. तरीही काही जणांना ‘धक्का देण्यासाठी’ कृत्रिम उपायांचा, जसं की एखादे चूर्ण किंवा एखादं औषध ह्यांचा आधार घ्यावा लागतो.—- आता ह्याची बरीचशी कारणं आहेत, इथे एका उदाहरणची चर्चा करुयात……. 

काही वेळा ह्याचं कारण बाल्यावस्थेत दडलेलं सापडतं.. कडक शिस्तीच्या नादात आई वडीलांनी मुलाला एखादी शिक्षा केलेली असते, त्याचा राग त्याच्या मनात असतो, लहान मूल आईवडीलांवर राग काढू शकत नाही, त्याला त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकावीच लागते, त्यांना विरोध म्हणून ही क्रिया तो रोखून धरतो.

ह्या ठिकाणी आई वडील त्याला जबरदस्ती करु शकत नाहीत, हळुहळू तो मोठा होतो, शिस्तीचा बडगाही संपतो. पण आपल्या आतड्यांवरचं नैसर्गिक नियंत्रण तो हरवून बसतो.

असंही बघण्यात आलं की जेव्हा व्यक्ती आर्थिक संकटात सापडते, तेव्हा तिची पचनशक्ती कमजोर होते. जे लोक कंजुष वृत्तीचे असतात, त्यांच्यामध्ये मुळव्याध्याची समस्या जास्त आढळते.

४) छोट्याछोट्या गोष्टींवरही एखादी व्यक्ती वारंवार उत्तेजित होते, चिडते, अस्वस्थ होते, त्याचा परिणाम जठर आणि पित्ताशयावर पडतो.

५) डोकेदुखी – 

आजकाल बहुतांश भगिनीवर्गाला झंडुबाम शिवाय झोप येत नाही. कारण काय असेल बरं?

– ह्या व्यक्तीला बघितलं की माझं डोकं दुखतं!

– त्याने माझं खुप डोकं खाल्लं!

– आमच्या ह्यांच्यासमोर कितीही डोकं फोडा, काही फायदा नाही,

— निरंतर, नकळत असं बोलत राहील्याने अज्ञ मनात संदेश पोहचतो की माझ्या डोक्याला दुखायचे आहे. — आणि मायग्रेनचा त्रास चालू !

डोकेदुखीची अजूनही काही कारणे आहेत, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी अप्रिय घटना घडलेली असतेच, पण तिला मनातल्या मनात पुन्हा पुन्हा तिला उगाळण्याचा स्वभाव असेल तर डोकेदुखी सुरु होते.

तेव्हा असे कटू अनुभव विसरुन जाणेच इष्ट !

कधी नकोसे वाटणारे काम, त्रासदायक काम अंगावर येऊन पडते, आणि डोके दुखते. जितके पोस्टपोन केले तेवढा त्रास होतो, तेव्हा अशी कामे तात्काळ निपटून काढावीत.

६) पाठदुखी वा कम्बर दुखी – 

एखादी व्यक्ती सतत जबाबदारीच्या ओझ्याने वाकून थकून गेली असेल तेव्हा तिला पाठदुखीला वा कम्बरदुखीला सामोरं जावं लागतं. असह्य वेदना होतात. ह्यात मानेपर्यंतचे स्नायू आखडले जातात. त्यांच्यावरचा ताण जाणवतो. चेहरा मूळ स्थानी न राहता उजवीकडे किंवा डावीकडे कलतो.

— आता सर्वात महत्वाचे, ह्यावर उपाय काय आहे?—- 

आपापले औषधौपचार चालू ठेवा, पण हे रोग शरीरातून समूळ उपटून काढायचे असतील तर स्वयंसुचना हाच ह्यावरचा एकमेव उपाय आहे.

जसं की डोकेदुखीचं उदाहरण घेऊ – तंद्रावस्थेत जाऊन आपल्या अज्ञात मनाला सूचना द्या –

‘आता माझं डोकं एकदम हलकं हलकं होत आहे — आता ते अजून शिथील आणि हलकं झालं आहे —डोके दुखण्याचे प्रमाण कमी होत आहे —  माझ्या डोक्यात जमा झालेलं अतिरिक्त रक्त आता शरीराच्या इतर भागात सुरळीतपणे पसरत आहे — माझा डोकेदुखीचा त्रास नाहीसा होत आहे — काही क्षणांमध्ये ही बैचेनी दुर होईल !—आणि डोकेदुखी गायब !

प्रत्येक रोगासाठी अशा सूचना तयार करुन त्या अज्ञ मनापर्यत पोहचवून रोगमुक्त होता येते.

सारांश काय तर मित्रांनो, भावनांची कोंडी करुन जगू नका, रोग बनून ते शरीराला पोखरतील.  राग व्यक्त करा, आणि मोकळे व्हा !

इथे मला एका महापुरुषाचा दृष्टांत आठवतो. त्यांना राग आल्याक्षणी ते कागद घ्यायचे आणि सविस्तर लिहून काढायचे, मनातले संपूर्ण भाव ओतून रिते व्हायचे.  ते कागद दोन चार दिवस तसेच टेबलावर ठेवायचे आणि नंतर जाळून किंवा फाडून टाकायचे.

— अशा प्रकारे मनातली सारी खळबळ बाहेर काढून टाकता येते. आता क्रोधाची भावना नाहीशी होते आणि हलकं हलकं वाटतं.

तुम्हा सर्वांना, निरोगी आणि ठणठणीत आयुष्यासाठी मनःपुर्वक शुभेच्छा!

संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २१ (इंद्राग्नि सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २१ (इंद्राग्नि सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २१ (इंद्राग्नि सूक्त )

ऋषी – मेधातिथि काण्व : देवता – इंद्र, अग्नि

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील एकविसाव्या सूक्तात मेधातिथि कण्व या ऋषींनी इंद्रदेवतेला आणि अग्निदेवतेला आवाहने केलेली आहेत. त्यामुळे हे सूक्त इंद्राग्नि सूक्त म्हणून ज्ञात आहे. 

मराठी भावानुवाद 

इ॒हेन्द्रा॒ग्नी उप॑ ह्वये॒ तयो॒रित्स्तोम॑मुश्मसि । ता सोमं॑ सोम॒पात॑मा ॥ १ ॥

देवेंद्राला  गार्ह्यपत्या अमुचे आवाहन

आर्त होउनी उभयतांचे त्या करितो स्तवन

त्या दोघांना सोमरसाची मनापासुनी रुची

सोमपान करुनिया करावी तृप्ती इच्छेची ||१||

ता य॒ज्ञेषु॒ प्र शं॑सतेन्द्रा॒ग्नी शु॑म्भता नरः । ता गा॑य॒त्रेषु॑ गायत ॥ २ ॥

इंद्राचे अन् अग्नीचे या यज्ञी स्तवन करा

हे मनुजांनो अलंकार स्तुति त्यांना अर्पण करा

स्तोत्रे गाउनिया दोघांची प्रसन्न त्यांना करा

आशिष घेउनी उभयतांचे यज्ञा सिद्ध करा ||२||

ता मि॒त्रस्य॒ प्रश॑स्तय इंद्रा॒ग्नी ता ह॑वामहे । सो॒म॒पा सोम॑पीतये ॥ ३ ॥

इन्द्राग्नी यज्ञासी यावे करितो आवाहन 

सोमरसाचे प्राशन करिण्या करितो पाचारण 

सन्मानास्तव मित्राचा तुम्हासी आमंत्रण

सोमपात्र भरलेले करितो तुम्हासी अर्पण ||३||

उ॒ग्रा सन्ता॑ हवामह॒ उपे॒दं सव॑नं सु॒तम् । इ॒न्द्रा॒ग्नी एह ग॑च्छताम् ॥ ४ ॥

सिद्ध करुनिया हवी ठेवला या वेदीवरती

अर्पण करण्या इंद्राग्निंना आतुर अमुची मती

उग्र असुनिही उदार इन्द्र आणि अग्नी देवता

स्वीकाराया हविर्भाग हा यज्ञी यावे आता ||४||

ता म॒हान्ता॒ सद॒स्पती॒ इंद्रा॑ग्नी॒ रक्ष॑ उब्जतम् । अप्र॑जाः सन्त्व॒त्रिणः॑ ॥ ५ ॥

समस्त जनतेचे रक्षक तुम्ही चंड बलवान

अग्निदेवते सवे घेउनी करता संरक्षण

दुष्ट असुरांना निर्दाळुनी तुम्ही करा शासन

शौर्याने तुमच्या कुटिलांचे होवो निःसंतान ||५||

तेन॑ स॒त्येन॑ जागृत॒मधि॑ प्रचे॒तुने॑ प॒दे । इंद्रा॑ग्नी॒ शर्म॑ यच्छतम् ॥ ६ ॥

चैतन्याच्या तेजाने उज्ज्वल तुमचे स्थान

कृपा करुनिया आम्हावरती व्हावे विराजमान

सत्यमार्गी ही तुमची कीर्ति दिगंत विश्वातून 

जागुनिया तुमच्या महिमेला करी सौख्य दान ||६||

(हे सूक्त व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे.. या व्हिडीओची लिंक येथे देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.  त्यामुळे आपल्याला गीत ऋग्वेदातील नवनवीन गीते आणि इतरही कथा, कविता व गीते प्रसारित केल्या केल्या समजू शकतील.  चॅनलला सबस्क्राईब करणे निःशुल्क आहे.)

https://youtu.be/U07wHkVNtT4

Attachments area

Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 21

Rugved Mandal 1 Sukta 21

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ SSLV-D2 प्रक्षेपणाचा आँखो देखा हाल – भाग-3 ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

☆ SSLV-D2 प्रक्षेपणाचा आँखो देखा हाल – भाग-3 ☆ श्री राजीव गजानन पुजारी

(मी रांगेत जाऊन मसाला डोसा घेतला व एका टेबलावर येऊन खायला सुरुवात केली.) इथून पुढे —-

माझ्या शेजारीच शार मध्ये काम करणारे एक गृहस्थ, त्यांची पत्नी व त्यांची छोटी मुलगी येऊन बसले. आम्ही गप्पा मारायला सुरुवात केली. त्यांचे नाव संग्राम असून ते मूळ ओरिसाचे आहेत. त्यांना उत्तम हिंदी येते. ते SHAR मध्ये VAB(vehicle assembly building) मध्ये कामाला आहे व इस्त्रो क्वार्टर्स मध्ये राहतात. मी महाराष्ट्रातील सांगलीहून निव्वळ लाँच बघायला आलोय याचे त्यांना फार कौतुक वाटले. मी एकटाच आलोय म्हटल्यावर त्यांच्या पत्नीने ‘परत आला तर पत्नीला घेऊन या व आमच्याच घरी उतरा’ असे सांगितले. ओळख पाळख नसतांना एवढे अगत्यपूर्ण आमंत्रण ओरिसातील माणसेच करू जाणोत. ओरिसाच्या आदरतिथ्याचा अनुभव मी कासबहाल येथे ट्रेनिंगला गेलो असताना अनुभवला होता. त्यावेळी ट्रेनिंग दरम्यान दिवाळी आली होती व आमच्या एका प्रोफेसरनी आम्हा सर्वांना त्यांच्या घरी अगत्याने फराळाला बोलावले होते. असो. मसाला डोसा खात असताना स्वयंपाक घरातील एक डिलिव्हरी देणारा माणूस मला हुडकत आला व माझ्यासमोर आणखीन एक मसाला डोसा ठेवून गेला. तो काय बोलला ते मला कळलं नाही. पण संग्राम म्हणाले, ” तुम्ही दोन रोटींची ऑर्डर दिली होती. ती कॅन्सल केल्यावर आणखी दहा रुपयांचे कुपन तुम्हाला दिले. एक मसाला डोसा पन्नास रुपयांना मिळतो. तुम्ही एकच डोसा घेऊन आलात म्हणून हा माणूस दुसरा डोसा घेऊन आला आहे. मला हसावे कि रडावे ते कळेना. नाईलाजास्तव दुसरा डोसा पण खावा लागला. मसाला डोशाची भाजी आपल्याकडे असते तशी सुक्की नसते तर आपण कांदा बटाटा रस्सा करतो तशी पण जरा घट्ट अशी असते. संग्राम यांच्याशी बोलल्यावर कळलं की तुम्हाला फक्त रोटी किंवा चपातीचे कुपन मिळते, त्याचे बरोबर भाजी व आमटी मिळतेच. कुपनावर त्याचा उल्लेख नसतो. शेजारच्या टेबलावर एक मुलगा भाजीबरोबर चपाती खात होता. बघतो तर आपण घरी करतो तशीच चपाती होती. असो. त्या दिवशी दोन मसाला डोसा खाण्याचा योग होता हेच खरे. जेवून उठताना श्री संग्राम यांनी आवर्जून माझा फोन नंबर घेतला व त्यांचा मला दिला. ती छोकरी पण ‘बाय अंकल’ म्हणाली. जेवण करून रूमवर आलो थोडा वेळ टी.व्ही. बघून झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांनी माझी ट्रेन होती (पिनाकिनी एक्स्प्रेस) मी साडेनऊ वाजता लॉज सोडले व रिक्षाने स्टेशनला आलो. वेळ होता म्हणून फिरत फिरत तेथून जवळच असलेल्या एस्. टी. स्टॅन्डला गेलो व शारला जायला इथून एस्. टी. ची सोय असते का याची चौकशी केली; तर तशी कांही सोय नसते व आपणास रिक्षाने जावे लागते असे कळले. परत स्टेशनवर आलो. गाडी पाऊणतास लेट होती. ती बाराला आली. गाडीत एक आय.टी. इंजिनियर व त्यांचा आठ वर्षाचा मुलगा असे माझ्यासमोरील सीटवर बसले होते. माणूस आय.टी. इंजिनियर असूनही विजयवाडा येथे कॉलेजमध्ये शिकविण्याचे काम करत होता. ती त्यांची आवड होती. ते दोघे शेगांव येथे एका लग्नासाठी चालले होते. घरी लहान बाळ असल्याने पत्नी घरीच थांबली होती. मी त्यांना गजानन महाराजांच्या समाधी विषयी माहित आहे का असे विचारले. त्यांना त्या भागाची काहीच माहिती नव्हती. मग मी त्यांना गजानन महाराजांविषयी माहिती सांगितली व समाधी मंदिराचे नक्की दर्शन घ्या असे सांगितले. शेगांव कचोरी पण आवर्जून टेस्ट करा असेही सांगितले.   झालेला बराचसा उशीर गाडीने भरून काढला व एकच्या ऐवजी सव्वाला गाडी चेन्नई सेंट्रलला पोहोचली. माझे पुढची ट्रेन शताब्दी एक्सप्रेस संध्याकाळी साडेपाचला होती चेन्नई सेंट्रलला एक सोय चांगली आहे ती म्हणजे सर्व प्लॅटफॉर्म्स समपातळीत आहेत, त्यामुळे जिने चढउतार करावे लागत नाहीत. मी वेटिंग हॉलमध्ये ‘इंडिया टुडे’ चाळत असतांना एक युवक माझ्या शेजारी येऊन बसला व मला विचारले ‘तुम्ही केरळचे का?’  मी म्हटलं, ‘नाही, पण आपण असे का विचारत आहात?’ तो म्हणाला, ‘तुम्ही केरळी दिसता म्हणून विचारलं.’ चला, मला माझ्याविषयी एक नवीनच माहिती मिळाली. नंतर मी त्याला त्याची माहिती विचारली. तो केरळचा असून त्याने गेल्याच वर्षी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले होते व तो नोकरीच्या शोधात होता. अनेक ठिकाणी प्रयत्न करून सुद्धा त्याला नोकरी मिळत नव्हती. मी त्याला त्याची आवड विचारली. तो म्हणाला, ‘ मला फॅब्रिकेशन विषयी आवड आहे.’ मी त्याला सुचवलं, ‘मग तू एखादे फॅब्रिकेशन शॉप का सुरू करत नाहीस? तसंही कोरोनानंतर बांधकाम व्यवसायात तेजी आली आहे, आणि बांधकाम म्हटलं कि, ग्रील, खिडक्या वगैरे आलंच.’ तो म्हणाला,’भांडवलाचं काय?’ मी म्हटलं, ‘हल्ली बँकांच्या कर्जपुरवठ्याच्या चांगल्या योजना आल्या आहेत. तू पण चौकशी कर.’ त्याचा चेहरा उजळलेला दिसला. मला पण बरं वाटलं. नंतर मी लंचसाठी प्लॅटफॉर्मच्या बाजूला

‘ए टू बी म्हणून लंच हाउस होते तेथे गेलो. तेथे रांग होती. रांगेत उभेराहून चपाती,भाजी व शिरा यांचे कुपन घेतले. ऑर्डर सर्व्ह करणाऱ्याने एका डिस्पोजिबल प्लेटमध्ये सर्व वाढून दिले. बाजूला कट्ट्यावर ताट ठेवून उभेराहून खायचं. खरंतर मला हे असे उभेराहून वचा वचा खाणे आवडत नाही. खाणे कसे व्यवस्थित बसून असावे. पण साउथ मध्ये जास्त करून अशा पद्धतीने खायची पद्धत आहे. ‘व्हेन इन रोम वन मस्ट डू ॲज द रोमन्स डू’ असे म्हणून मी समाधान मानले व सव्वा पाचला ट्रेनमध्ये जाऊन बसलो. ट्रेनमध्ये  बरेच विद्यार्थी व विद्यार्थिनी होत्या. ते सर्व बेंगलोरला उतरून पुढे पुण्याला जाणार होते. ती सर्व मुले VIT कॉलेज वेल्लूरची होती. त्यांच्या टीवल्या बावल्या चालल्या होत्या, ते अनुभवण्यात वेळ छान गेला. साडेदहाला बेंगलोर आले. ईशा व योगेश स्टेशनवर आले होते. गाडीत भरपेट नाश्ता झाल्याने दूध पिऊन झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याला ईशाने उप्पीट केले होते. जेवायला पोळी भाजी व जिरा राईस होते. बऱ्याच दिवसांनी पोळी भाजी खाल्ल्याने बरे वाटले. रात्री आठच्या कोंडुस्कर स्लीपरचे रिझर्वेशन होते. ईशा व योगेश सोडायला आले होते. सकाळी साडेआठला सांगलीला पोहोचलो. एका स्वप्नाची इथे कर्तव्यता झाली.

नोंद :- 

१)श्रीहरीकोट्याला जाण्यासाठी मी मला सोयीचे म्हणून बेंगलोरला जाऊन चेन्नईला गेलो होतो.  काहीजणांना थेट चेन्नईला जाणे सोयीचे असेल तर तसं करायला हरकत नाही.

२) सुलुरूपेटा लॉजचा पत्ता – श्री लक्ष्मी पॅलेस, c/o लक्ष्मी थिएटर, शार रोड, सुलुरूपेटा -५२४१२१। जिल्हा -तिरुपती (आंध्र प्रदेश) प्रोप्रायटर – श्री दोराबाबू , फोन – 9985038339.

— समाप्त — 

© श्री राजीव  गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – [email protected] मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ SSLV-D2 प्रक्षेपणाचा आँखो देखा हाल – भाग-2 ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

☆ SSLV-D2 प्रक्षेपणाचा आँखो देखा हाल – भाग-2 ☆ श्री राजीव गजानन पुजारी

(मी विचारले, “किती चालावे लागेल?” ते म्हणाले, “साधारण दोन मैल” मी चालायला सुरुवात केली.) इथून पुढे —- 

वाटेत अनेक ठिकाणी गणवेशधारी जवान होते. मला वाटतं मी दोन मैलांपेक्षा नक्कीच जास्त चाललो असेन. पुढे गेल्यावर डावीकडे काही जवान होते त्यांना मी व्ह्यूईंग गॅलरीला कसं जायचं असे विचारल्यावर असंच पुढे जावा म्हणून सांगितलं. त्यांनी परत माझ्याकडील आधार कार्ड व पास तपासला. बरेच पुढे गेल्यावर इस्त्रोचा लोगो शिरावर धारण केलेली एक इमारत दिसली. त्याच्या पार्श्वभूमीवर फोटो काढून घेण्याचा मोह झाला. पण न जाणो फोटो काढले तर काही प्रॉब्लेम तर येणार नाही ना, असे वाटले व परतताना फोटो काढायचे ठरवले. माझ्या पास वरील क्यूआर कोड स्कॅन करून मला जाऊ देण्यात आले. उजवीकडे वर जाण्यासाठी मार्ग आहे. वर जाऊन एका दरवाज्यातून आत गेल्यावर आपण व्ह्यूईंग गॅलरीत प्रवेश करतो. व्ह्यूईंग गॅलरीला स्टेडियमच्या प्रेक्षागाराला असतात तशा एका विस्तीर्ण अर्धवर्तुळाकारात अनेक पायऱ्या आहेत. एकूण प्रेक्षक क्षमता पाच हजार एव्हढी आहे. गॅलरीची रचना अशी आहे की कोणत्याही लाँच पॅड वरून केलेले लॉन्च सहजपणे पाहता यावे.  मी ज्यावेळी गेलो त्यावेळी मोजके लोक आले होते. समोर एका टेंट मध्ये इस्त्रोच्या पीएसएलव्ही, जीएसएलव्ही व जीएसएलव्ही मार्क तीन या तीनही प्रक्षेपकांची मॉडेल्स ठेवली होती. बरेच लोक त्यांच्याबरोबर फोटो काढून घेत होते. जवळच नाश्ता व चहाची सोय होती. मी इडली वडा खाऊन घेतला. हळूहळू गर्दी वाढू लागली. मी अगदी वरच्या बाजूला मोक्याची जागा पाहून बसलो. अनेक शाळांच्या ट्रिप्स आल्या होत्या. त्यातल्या पिवळी जर्किन्स व मागे ‘आझादी सॅट क्रू’ असे लिहिलेल्या एका टीमने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ती टीम म्हणजे देशभरातल्या शाळातून आलेल्या सुमारे ७५ ते ८० मुली होत्या. त्यांनी सर्वांनी मिळून ‘आझादी सॅट’ हा उपग्रह बनविला होता व SSLV-D2 च्या तीन पेलोड्स पैकी हा उपग्रह एक होता. तो देखील आज अंतराळात सोडण्यात येणार होता. त्या अत्यंत उत्साहात होत्या. त्यांचे बरोबर त्यांचे शिक्षक होते. इस्त्रोतील ज्या तंत्रज्ञानी तो बनविण्यास मदत केली होती तेही त्यांच्या बरोबर होते. सूत्रसंचालकांची एक टीम होती. ते प्रेक्षकांना चिअरअप करण्यास सांगत  होते. ‘थ्री चिअर्स फॉर इस्त्रो’ वगैरे घोषणांनी स्टेडियम दुमदुमत होते. विविध चॅनेल्स व वृत्तपत्रांचे बातमीदार प्रेक्षकांतील काहींच्या व त्या आझादी सॅट क्रू मधल्या मुलींच्या मुलाखती घेत होते. सूत्रसंचालकांनी त्या मुलींपैकी काहींना खाली बोलावून त्यांचे मनोगत व्यक्त करण्यास सांगितले. किती लहान मुली त्या!वय वर्षे आठ ते बाराच्या दरम्यानच्या!! त्यांनी धीटपणे त्यांचे मनोगत व्यक्त केले व ही संधी दिल्याबद्दल इस्रोचे आभार मानले. देशभरातील विविध सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या सातशे पन्नास शाळकरी मुलींकडून उपग्रह बनवून घेणे ही कल्पना ‘स्पेस किड्झ इंडिया’ या चेन्नई स्थित खाजगी अंतरीक्ष नवउद्योगाची (space start-up)आहे. या कंपनीने देशभरातील विविध शाळांमध्ये जाऊन – त्यातील कांही शाळा तर दुर्गम भागातील आहेत- त्यांना उपग्रहाचे विविध भाग बनविण्यासाठी मार्गदर्शन केले व अशा रीतीने AzaadiSat-2 या उपग्रहाचे निर्मिती करण्यात आली. हे स्टेडियम तीन भागात विभागले आहे. सूत्रधार मॅडमनी सर्व प्रेक्षकांना मधल्या भागात यायला सांगितले, जेणेकरून प्रक्षेपण व्यवस्थित बघता येईल. सर्व मिळून साधारण तीन हजार च्या दरम्यान प्रेक्षक होते. हळूहळू घड्याळाचा काटा पुढे सरकू लागला. दहा मिनिटे.. पाच मिनिटे..दोन मिनिटे.. एक मिनिट… नंतर उलट मोजणी दहा.. नऊ.. आठ.. सात.. सहा.. पाच.. चार.. तीन.. दोन.. एक.. अँड गो… पण अजून समोर कांहीच दिसत नव्हते. पण नंतर क्षणातच समोरच्या गर्द झाडीतून SSLV-D2 प्रक्षेपक त्याच्या पिवळ्या धमक्क ज्वाळांसहित वर आला आणि सर्वांनी एकच जल्लोष केला. मी डोळ्यांची पापणीही न लाववीता(अनिमिष नेत्रांनी) ते अद्भुत दृश्य पाहू लागलो. बरेच वर गेल्यावर क्षितिजाशी दीर्घलघुकोन करून यान झपाट्याने पुढे सरकू लागले. आम्हाला माना उजवीकडे वर कराव्या लागल्या. आमच्या पुढील क्षितिज व मागील क्षितिज असे १८०° धरले तर साधारण १००° गेल्यावर यान दिसेनासे झाले. मागे राहिला पांढऱ्याशुभ्र धुराचा लोळ. हवेमुळे तो ही विरळ होत गेला. आमच्या गॅलरी समोर दोन प्रचंड मोठे स्क्रीन्स लावले होते. त्यावर कंट्रोल रूम मधील दृश्य दिसत होती. एकही प्रेक्षक जागेवरून हालला नव्हता. साधारण तेरा मिनिटांनी EOS-07 उपग्रह यानापासून वेगळा होऊन त्याच्या ठरलेल्या कक्षेत प्रस्थापित केला गेला, साडे चौदा मिनिटांनी Janus-1 वेगळा झाला, पंधरा मिनिटांनी AzaadiSat-2 वेगळा होऊन त्याच्या कक्षात प्रस्थापित केला गेला असे जाहीर करण्यात आले. त्यावेळी AzaadiSat crew ने जो जल्लोष केला तो बघून डोळे भरून आले. खरोखर देशातल्या विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञानात रस निर्माण व्हावा म्हणून  इस्रो जे कार्य करीत आहे ते कौतुकास्पद आहे. हळूहळू गर्दी पांगु लागली. लोक खाली येऊ लागले. येताना स्पेस म्युझियम लागते, तेथे भारताने अंतरिक्षात प्रस्थापित केलेले विविध उपग्रह तसेच प्रक्षेपकांची मॉडेल्स ठेवली आहेत. त्यांजवळ उभारून लोक फोटो काढून घेत होते. मी अहमदाबाद येथील VSSE म्युझियम बघितलेले असल्याने फक्त एक फेरफटका मारून बाहेर पडलो. जवळच एक ऑडिटरियम आहे ते बंद होते. बाहेर पडल्यावर त्या इमारतीच्या पार्श्वभूमीवर आवर्जून एक फोटो काढून घेतला. आता परत अडीच तीन मैल चालावे लागणार अशी भीती वाटत होती, तोवर इस्त्रोचा एक इलेक्ट्रिकल विभागात काम करणारा माणूस भेटला, तो म्हणाला लॉन्च बघून परतणाऱ्यांसाठी इस्त्रोने आंध्र प्रदेश स्टेट कॉर्पोरेशनच्या बसेसची सुलुरूपेटा पर्यंत व्यवस्था केली आहे. थोडे चालल्यावर हे बस दिसली. त्यात बसून मी सुलुरूपेटा येथे आलो.

इथे आवर्जून एक गोष्ट सांगावीशी वाटते की श्रीहरीकोट्याला येताना स्वतःचे वाहन असणे केव्हाही चांगले. स्वतःचे वाहन असले की थेट व्ह्यूईंग गॅलरीच्या इमारतीपर्यंत जाता येते. तेथे पार्किंगची व्यवस्था आहे. त्यामुळे तीन चार मैलांची पायपीट वाचते. तसेच लॉन्च बघून परततांना ज्यांनी यापूर्वी स्पेस म्युझियम बघितले नसेल त्यांना आरामात त्याचा आस्वाद घेता येतो. येथे रॉकेट गार्डन म्हणून एक उद्यान आहे तेथे आपल्या सर्व प्रक्षेपकांच्या पूर्णाकार प्रतिकृती ठेवल्या आहेत आणि काही सुंदर असे वास्तुकलेचे नमुने आहेत, तेथे पण जाता येते. निव्वळ स्वतःचे वाहन घेऊन न गेल्याने मला रॉकेट गार्डन बघता आले नाही.

सकाळी खूप चालल्यामुळे दमायला झाले होते, त्यामुळे काल आणलेला ब्रेड बटर खाऊन ताणून दिली ते रात्री साडेआठलाच उठलो. उठून काउंटरवर जाऊन जवळ कोठे शाकाहारी जेवणाचे हॉटेल आहे का याची चौकशी केली. त्यावेळी मार्केटमध्ये कोमला निवास म्हणून हॉटेल आहे असे कळले. रिक्षाने हॉटेलमध्ये गेलो. खवय्यांची रांग लागली होती. सर्व व्यवहार तेलगूत चालू होते. माझा नंबर आल्यावर मी प्रथम हिंदीत व नंतर इंग्रजीत राईस प्लेटची चौकशी केली. काऊंटरवरील माणसास हिंदी अजिबात येत नव्हते व इंग्रजीही अगदी मोडकेतोडके येत होते. राईस प्लेट उपलब्ध नसते असे कळले. कोण कोणते पदार्थ उपलब्ध आहेत याची चौकशी केल्यावर मसाला डोसा, रोटी, चपाती वगैरे उपलब्ध असल्याचे कळले. ‘आंध्रात चपाती कशी असेल कोण जाणे’ असा विचार करून दोन रोटी व ग्रेव्ही असे सांगितले. त्याने नव्वद रुपये म्हणून सांगितले. मी पैसे दिले. त्याने कुपन दिले. पण कुपनावर फक्त दोन रोटीच दिसले. मी याबरोबर काय असे इंग्रजीत विचारले. त्याला नीट कळले नाही. नुस्ती रोटी कशी खाणार असा विचार करून मी मसाला डोसा सांगितला. काउंटरवरील माणसाने जरा रागाने बघून त्या कुपनवर पेनने काही लिहिले व माझ्याकडे दहा रुपये मागितले व त्याचे वेगळे कुपन दिले. मला वाटलं डोसा शंभर रुपयांना मिळत असावा. मी रांगेत जाऊन मसाला डोसा घेतला व एका टेबलावर येऊन खायला सुरुवात केली.

— क्रमशः भाग दुसरा

© श्री राजीव  गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – [email protected] मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ SSLV-D2 प्रक्षेपणाचा आँखो देखा हाल – भाग-1 ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

☆ SSLV-D2 प्रक्षेपणाचा आँखो देखा हाल – भाग-1 ☆ श्री राजीव गजानन पुजारी

डिसेंबरमध्ये आम्ही बेंगलोरला ईशाकडे गेलो होतो. मला बरेच दिवस इस्रो करत असलेल्या प्रक्षेपकांचे प्रक्षेपण प्रत्यक्ष बघण्याची अतिशय इच्छा होती. त्यामुळे बेंगलोरमध्ये असतानाच सहज म्हणून बेंगलोर ते श्रीहरीकोटा अंतर गुगलवर बघितले. ते कारने साधारण सहा तासांचे आहे असे दिसले. ऑक्टोबरमध्ये इस्रोने वन वेब कंपनीच्या छत्तीस उपग्रहांच्या तुकडीचे प्रक्षेपण केले होते. पुढील छत्तीस उपग्रहांचे प्रक्षेपण जानेवारी २०२३ मध्ये करण्यात येईल असे इस्रोने तत्वतः जाहीर केले होते. त्यामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निघतांना मी योगेशला म्हटले, ” बहुतेक या महिन्यात मी परत येईन असं दिसतंय. कारण या महिन्यात इस्रो एक प्रक्षेपण करणार आहे आणि मला ते बघायचे आहे.” तो म्हणाला, “मग कशाला जाताय? प्रक्षेपण बघूनच जावा कि!” पण प्रक्षेपणाची तारीख नक्की नसल्याने आम्ही सांगलीला परत आलो. सांगलीला आल्यावर कांही दिवसांनी हे प्रक्षेपण मार्च २०२३ ला होणार असल्याचे समजले. दरम्यान सात फेब्रुवारीला सहज फेसबुक बघत असताना इस्त्रोच्या फेसबुक पेजवर वाचनात आले की दहा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजून अठरा मिनिटांनी SSLV-D2(Small satellite launch vehicle-demonstration launch 2)चे प्रक्षेपण आहे. मला माहित होते की हल्ली  सतीश धवन अंतरिक्ष केंद्रात थेट प्रक्षेपण बघण्यासाठी एक प्रेक्षागार उभारण्यात आले आहे व तेथून आपणास प्रक्षेपकाचे प्रक्षेपण थेट पाहता येते व त्यासाठी आगाऊ नोंदणी करावी लागते. त्यानंतर रजिस्ट्रेशन कसे करायचे हे  SDSC-SHAR (Satish Dhavan space center- Shriharikota high altitude range)च्या वेबसाईटवरून हुडकून काढले. lvg. shar. gov या साइटवर ‘Schedulded’ म्हणून एक ऑप्शन आहे त्यावर क्लिक केले असता एक पेज उघडते त्या पेजवर ‘click here for witness the launch’ असा ऑप्शन येतो. त्यावर क्लिक केले असता आपणास रजिस्ट्रेशन करता येते.  अशा पद्धतीने माझे रजिस्ट्रेशन झाले (REGISTRATION NO/SNO: T333A0C7774/7382). मला अत्यंत म्हणजे अत्यंत आनंद झाला. लगेच मी इशाला फोन केला. हे घडले संध्याकाळी साडेचार वाजता. दहा तारखेला सकाळी प्रक्षेपण म्हणजे नऊ तारखेलाच मला तिथे पोचावे लागणार होते. ईशाने लगेचच संध्याकाळच्या साडेपाचच्या कोंडुस्करच्या स्लीपरचे बुकिंग केले. मी नेट कॅफेमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन केल्यावर आलेल्या पासची प्रिंट काढून आणली. तोपर्यंत श्रीहरीकोटाला कसे जायचे हे अजिबात माहीत नव्हते. बेंगलोर मध्ये ईशा व योगेश यांनी व मी कोंडुस्कर मध्ये बसल्या बसल्या google वरून माहिती मिळवली. बेंगलोरहून चेन्नई व तेथून सुलूरूपेटा या श्रीहरीकोटा जवळ असलेल्या गावी मला जावे लागणार होते. प्रत्यक्ष श्रीहरीकोटा मध्ये राहण्याची व्यवस्था नाही, त्यामुळे श्रीहरीकोटा पासून १७ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या गावात मला मुक्काम करावा लागणार होता व तेथून प्रक्षेपणाच्या दिवशी मला  श्रीहरीकोटाला जावे लागणार होते. ईशा- योगेश यांनी नऊ तारखेचे बेंगलोर ते चेन्नई साठीचे रिझर्वेशन पाहिले.पण कोणत्याही गाडीचे रिझर्वेशन उपलब्ध नव्हते. मग त्यांनी बेंगलोर ते पेराम्बूर आठ तारखेचे रात्री साडेबाराचे म्हणजेच नऊ तारखेचे 0.30 चे रिझर्वेशन केले. पेरांबूर गाव चेन्नई सेंट्रल पासून आठ किलोमीटर अंतरावर आहे. चेन्नई ते सुलुरूपेटा रिझर्वेशन  एसी टू टायरचे मिळाले.

    बेंगलोरला सकाळी सात वाजता पोचलो. योगेश घ्यायला आला होता. आठ वाजता घरी पोचलो. नाश्ता वगैरे झाल्यावर ईशाने सुलुरूपेटा मधील हॉटेल बुक केले. प्रक्षेपण झाल्यावर व्ह्यूइंग गॅलरीमध्येच स्पेस म्युझियम व रॉकेट गार्डन आहे असे SHAR च्या साइटवर दिसले. त्यामुळे परतीची रिझर्वेशन्स ११ तारखेची केली. जेवण करून मस्तपैकी झोप काढली. रात्री साडेबारा वाजता मुजफ्फुर एक्सप्रेसने मला जायचे होते. ईशा व योगेश मला सोडायला आले होते. सकाळी सात वाजता गाडी पेरांबूर स्टेशनवर पोहोचली. रिक्षा करून मी चेन्नई सेंट्रलला आलो. एमजीआर चेन्नई सेंट्रल(MAS) ते सुलुरूपेटा नवजीवन एक्सप्रेस दहा वाजून दहा मिनिटांनी होती ती साडेअकराला सुलुरूपेटा येथे पोहोचली. उतरल्यावर रिक्षा केली आणि अगोदर बुकिंग केलेले श्री लक्ष्मी पॅलेस हे लॉज गाठले. (जनरली गाडी एक नं प्लॅटफॉर्मला लागते. तेथून वर उल्लेखलेल्या लॉजला जायला रिक्षा केली तर महाग पडते, म्हणून रेल्वे ब्रिज वरून दुसऱ्या टोकाला जाऊन तिथून रिक्षा केली तर स्वस्त पडते) सुलुरूपेटा हे  तालुक्याचे ठिकाण आहे. त्यामानाने हे लॉज खूपच चांगले आहे. रूम स्वच्छ, प्रशस्त व हवेशीर आहेत. ए.सी. व टी.व्ही. ची सोय आहे. २४ तास गरम पाणी उपलब्ध असते. रूममध्ये गेल्यावर अन्हीके उरकून खालीच असलेल्या चंदूज रेस्टॉरंट मध्ये जेवायला गेलो. शाकाहारी व मांसाहारी एकत्र आहेत. राईस प्लेट मिळत नाही. वेगवेगळे जिन्नस मागवावे लागतात आणि अति महागडे आहेत. जेवण एवढे खास नव्हते, पण भुकेपोटी खाऊन घेतले. जेवण करून थोडे विश्रांती घेतली. नंतर काउंटर वर जाऊन लॉजचे मालक श्री दोराबाबू यांना भेटलो व श्रीहरीकोटाला कसे जायचे याची चौकशी केली. त्यांनी खिडकीतून जवळच असलेल्या एका चौकाकडे बोट दाखवून सांगितले की येथे सकाळी सहा वाजल्यापासून SHAR ला जायला जीप मिळतात. एका जीपमध्ये दहाजण बसवतात व माणसे पन्नास रुपये आकारतात. माहिती जाणून घेतल्यावर मी गावात रपेट मारायला बाहेर पडलो. तालुक्याचे गाव जसे असायला पाहिजे तसेच हे आहे. दोन तास फिरून परत रूमवर आलो. दुपारचे जेवण जास्त झाल्याने लॉज शेजारच्या मॉल मधून ब्रेड व बटर आणून  खाल्ले. सकाळचा साडेपाचचा गजर लावून झोपलो. उद्या प्रत्यक्ष प्रक्षेपण बघायचे या कल्पनेने बराच वेळ झोप लागली नाही, पण नंतर लागली. सकाळी साडेपाचला उठून अन्हीके आवरून बरोबर सहा वाजता चौकात आलो. जीप उभी होती. जीपमध्ये अजून कोणी आले नव्हते, म्हणून ‘गणेश टी स्टॉल’ असे नांव लिहिलेल्या टपरीवर कॉफी प्यायला गेलो. कॉफी अप्रतिम होती. टपरीचा मालक राजस्थानी होता. त्याला हिंदी व इथली तेलगू भाषा दोन्ही चांगल्या अवगत होत्या. बोलता बोलता मला शारला  जायचे आहे असं मी त्याला म्हणालो. तेथेच एक रिक्षावाला होता. तो कॉफीवाल्याला तेलगूत म्हणाला, ” यांना म्हणावं मी त्यांना तीनशे पन्नास रुपयात शारला नेतो.” कॉफी वाल्याने मला हे हिंदीत सांगितले. मी कॉफीवाल्याला सांगितले,  “तीनशे रुपयात नेतो काय विचार.” तो तयार झाला. नाही तरी  जीपमध्ये दहा माणसांची जुळणी व्हायला किती वेळ लागणार होता कोणास ठाऊक! मी रिक्षात बसलो. मस्त गुलाबी थंडी होती. दोन्हीकडे समुद्राच्या भरती ओहोटीमुळे तयार झालेली क्षारपड जमीन आहे. सूर्योदय व सूर्यास्त बघण्यासाठी थोड्या थोड्या अंतरावर मचाणे आहेत, त्यांना व्ह्यू पॉईंट्स म्हणतात. अर्ध्या तासात आम्ही श्रीहरीकोटाच्या मुख्य प्रवेशाजवळ  पोहोचलो. तेथे रिक्षावाल्याने मला सोडले. उजवीकडे towards viewing gallary असा बोर्ड होता. तेथे गणवेशधारी जवान होते. त्यांनी माझ्याकडील आधार कार्ड व पास बघून मला पुढे जाण्याची अनुमती दिली. मी विचारले, “किती चालावे लागेल?” ते म्हणाले, “साधारण दोन मैल” मी चालायला सुरुवात केली. 

– क्रमशः भाग पहिला

© श्री राजीव  गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – [email protected] मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ई-सिगारेट… ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

? इंद्रधनुष्य ? 

☆ ई-सिगारेट… ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

शाळा, महाविद्यालयातील तरुणाई अडकतेय ‘इलेक्ट्रॉनिक सिगरेट’च्या जाळ्यात,सिगारेटची जागा आता” ई सिगारेटनी” घेतली. वेब सिगरेट नाव नवीन नसले तरी अनेक शाळांमध्ये व महाविद्यालयीन परीसरात या वेब ची लाट आली आहे. सातशे पन्नास रुपया पासून पाच हजार रुपया पर्यंत किंमत असलेली ही वेब सिगरेट शाळा महाविद्यालयातील शिक्षकांची डोके दुखी बनली आहे ज्या सिगारेटसारखा धूर होत नाही, अशी सिगारेट म्हणजे ‘ई- सिगारेट’ किंवा ‘इलेक्ट्रॉनिक सिगरेट’. तंबाखूजन्य सिगरेट न ओढता तंबाखूमध्ये असलेलं निकोटिन हे द्रव्य शरीरात घेण्याचा एक मार्ग म्हणून ही सिगारेट वापरली जाते. ई-सिगारेट दिसतेही साध्या सिगारेटसारखीच. आता नवीन जी वेब सिगरेट आली आहे ती पेनड्राइव, पेन, लायटरच्या आकाराची. फरक असा की ई-सिगारेटमध्ये तंबाखू नव्हे, तर थेट द्रवरूपातलं निकोटिन असतं. ही सिगारेट पेटवण्यासाठी लाईटर किंवा काडेपेटी लागत नाही, कारण या सिगारेटच्या उपकरणात एका लहानशा बॅटरीचा समावेश असतो. जेव्हा सिगारेट ओढण्याची कृती केली जाते तेव्हा या सिगारेटमधील द्रवरूप निकोटिनची वाफ तयार होऊन ती ओढली जाते. या वाफेला प्रत्यक्ष धूम्रपान केल्यासारखा वास नसतो. सिगारेट प्रत्यक्ष पेटवली जात नसल्यामुळे त्यापासून राखही तयार होत नाही.यामुळे सिगारेट ओढल्याची निशाणी राहत नाही. शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी मधल्या सुट्टीत याचा वापर बिनदिक्कत करतात आणि नेहमी प्रमाणेच वर्गात बसतात. काही विद्यार्थी शाळेत पेंगलेले दिसताहेत. शिक्षक सुध्दा भयभीत झाले आहेत. कारवाई करण्याचे अधिकार नाहीत. ओरडण्याचा सोय नाही.

अशी मुले ओळखणे फारच कठीण असतात. इतर नशे प्रमाणे कोणत्याही प्रकारची चिन्हे दिसत नसल्याने विद्यार्थ्यांना हुडकून काढणे दुरास्पद असते.वर्गीतील असामान्य वर्तन. व अध्ययन अध्यापन प्रक्रियेत अशा मुलांचा समावेश नसणे यावरून तर कधी विद्यार्थ्यांकडून अशा विद्यार्थ्यांची माहिती शिक्षकांना प्राप्त होते. अशा मुलांचे समुपदेशन करणे व व्यसनापासून दूर करणे हे शिक्षकांचे काम आहे. अनेकदा विद्यार्थी आपण व्यसन करतच नाही असे सांगतात. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे पालक अनभिज्ञ आहेत. ज्यावेळी पालकांना शाळेतून फोन जातो त्यावेळी त्यांना सुद्धा मानसिक धक्का बसतो.

अनेकदा काही पालक आपला मुलगा या वेब सिगरेटच्या आहारी गेला आहे हे मान्य करण्यास तयार होत नाही. अशावेळी शिक्षक मात्र पालकांच्या रोषास बळी पडतो. शाळा, महाविद्यालयाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न म्हणून पोलीस तक्रार नाही व कुठेही वाच्यता नाही. अनेक प्रकरणे दाबून टाकली जातात. भारतीय कायद्याने अशा प्रकारच्या सिगारेट वापरण्यावर व विक्रीवर बंदी आहे. असे असले तरी या व्यवसायात गुंतलेले लोक आपले सावज शाळा, महाविद्यालयाबाहेर असलेल्या पानपट्टी दुकाने व खाऊगल्लीत हेरतात. दुर्दैवाने तरुण मुले, मुलीही या व्यसनात गुरफटत आहेत. सर्व साधारणपणे हुक्या प्रमाणेच वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लेवर्सची जत्रा वेब सिगरेट मध्ये असते असे या मुलांच्या बोलण्यातून जाणवले. आकर्षणापोटी तर कधी मौज मजेसाठी हजारो रुपये खर्चून वेब घेतली जाते व सामाईक चस्का घेतले जातात.

द्रव्यरूपातील निकोटिनची विद्युत उपकरणाच्या माध्यमातून वाफ बनवली जाते आणि याचा धूम्रपानासाठी वापर केला जातो याला ई धूम्रपान असे म्हटले जाते. यामध्ये ई सिगारेट, फ्लेवर हुक्का, ई शिशा इत्यादी निकोटिनयुक्त उपकरणांचा समावेश आहे.शरीराला अपायकारक असलेली ही द्रवे आमच्या तरुणपिढीची शरीर व मने खोकली करत आहे व त्याबरोबर आपल्या देशातील तरुण पिढी बरबाद होत आहे. या वेबचा धूर वेळीच रोखला नाही तर भविष्यात शाळा महाविद्यालये ही वेबचा अड्डा बनतील अशी भीती व्यक्त केली जात आहे.

संग्रहिका : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print