मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पूर्वीचे तंत्रज्ञ… ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆
इंद्रधनुष्य
☆ पूर्वीचे तंत्रज्ञ... ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆
पूर्वीचे तंत्रज्ञ (Technicians)
पूर्वी एखाद्या वस्तू मध्ये थोडासा बिघाड झाला तर ती वस्तू दुरुस्ती करून घेऊन वापरण्याकडे लोकांचा कल होता. त्याचे कारण म्हणजे घरबसल्या लोकांना या वस्तू दुरुस्त करून मिळायच्या.
पूर्वी तांबे-पितळेची भांडी लोक वापरत असत. कधी कधी जास्त वापर झाला की भांडी गळायला लागत. मला आठवतंय माझी आजी माझ्या आईला सांगायची, "जा ग, जरा पातेल्याला ‘चाती’ बसवून आण." लहानपणी ते काही कळायचे नाही. पण मला आठवतेय पूर्वी दारावर अशा दुरुस्त्या करणारी माणसे यायची. त्यांच्या ठराविक आरोळ्या असत. बहुतेक दुपारच्या वेळात हे लोक यायचे. ‘बंबाला, पिंपाला डाग देणार, फुटकी भांडी नीट करणार.’
ही माणसे घरी येऊन म्हणजे वाड्यातच गळणारे बंब, पिंप, गळणारी पातेली, तपेली सगळ्यांना डाग देऊन किंवा चाती बसवून दुरुस्त करायचे. त्यांच्या जवळ दुरुस्तीचे सगळे सामान असायचे.
अजून एक म्हणजे, ‘डबे बनवणार, झाकणे बनवणार, चाळणी बनवणार’ असे ओरडत काही लोक यायचे. पूर्वी ‘डालडा’चे डबे मिळायचे. त्याला खूप लोक झाकणे बनवून वापरायचे. किंवा तेलाचे मोठे डबे मिळत. त्याचेही गोल डबे किंवा त्यालाच पत्र्याची झाकणे बनवून घेत.
त्या माणसाच्या खांद्यावर एक लोखंडी पेटी असे, त्यात पत्रा...