श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

☆ SSLV-D2 प्रक्षेपणाचा आँखो देखा हाल – भाग-2 ☆ श्री राजीव गजानन पुजारी

(मी विचारले, “किती चालावे लागेल?” ते म्हणाले, “साधारण दोन मैल” मी चालायला सुरुवात केली.) इथून पुढे —- 

वाटेत अनेक ठिकाणी गणवेशधारी जवान होते. मला वाटतं मी दोन मैलांपेक्षा नक्कीच जास्त चाललो असेन. पुढे गेल्यावर डावीकडे काही जवान होते त्यांना मी व्ह्यूईंग गॅलरीला कसं जायचं असे विचारल्यावर असंच पुढे जावा म्हणून सांगितलं. त्यांनी परत माझ्याकडील आधार कार्ड व पास तपासला. बरेच पुढे गेल्यावर इस्त्रोचा लोगो शिरावर धारण केलेली एक इमारत दिसली. त्याच्या पार्श्वभूमीवर फोटो काढून घेण्याचा मोह झाला. पण न जाणो फोटो काढले तर काही प्रॉब्लेम तर येणार नाही ना, असे वाटले व परतताना फोटो काढायचे ठरवले. माझ्या पास वरील क्यूआर कोड स्कॅन करून मला जाऊ देण्यात आले. उजवीकडे वर जाण्यासाठी मार्ग आहे. वर जाऊन एका दरवाज्यातून आत गेल्यावर आपण व्ह्यूईंग गॅलरीत प्रवेश करतो. व्ह्यूईंग गॅलरीला स्टेडियमच्या प्रेक्षागाराला असतात तशा एका विस्तीर्ण अर्धवर्तुळाकारात अनेक पायऱ्या आहेत. एकूण प्रेक्षक क्षमता पाच हजार एव्हढी आहे. गॅलरीची रचना अशी आहे की कोणत्याही लाँच पॅड वरून केलेले लॉन्च सहजपणे पाहता यावे.  मी ज्यावेळी गेलो त्यावेळी मोजके लोक आले होते. समोर एका टेंट मध्ये इस्त्रोच्या पीएसएलव्ही, जीएसएलव्ही व जीएसएलव्ही मार्क तीन या तीनही प्रक्षेपकांची मॉडेल्स ठेवली होती. बरेच लोक त्यांच्याबरोबर फोटो काढून घेत होते. जवळच नाश्ता व चहाची सोय होती. मी इडली वडा खाऊन घेतला. हळूहळू गर्दी वाढू लागली. मी अगदी वरच्या बाजूला मोक्याची जागा पाहून बसलो. अनेक शाळांच्या ट्रिप्स आल्या होत्या. त्यातल्या पिवळी जर्किन्स व मागे ‘आझादी सॅट क्रू’ असे लिहिलेल्या एका टीमने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ती टीम म्हणजे देशभरातल्या शाळातून आलेल्या सुमारे ७५ ते ८० मुली होत्या. त्यांनी सर्वांनी मिळून ‘आझादी सॅट’ हा उपग्रह बनविला होता व SSLV-D2 च्या तीन पेलोड्स पैकी हा उपग्रह एक होता. तो देखील आज अंतराळात सोडण्यात येणार होता. त्या अत्यंत उत्साहात होत्या. त्यांचे बरोबर त्यांचे शिक्षक होते. इस्त्रोतील ज्या तंत्रज्ञानी तो बनविण्यास मदत केली होती तेही त्यांच्या बरोबर होते. सूत्रसंचालकांची एक टीम होती. ते प्रेक्षकांना चिअरअप करण्यास सांगत  होते. ‘थ्री चिअर्स फॉर इस्त्रो’ वगैरे घोषणांनी स्टेडियम दुमदुमत होते. विविध चॅनेल्स व वृत्तपत्रांचे बातमीदार प्रेक्षकांतील काहींच्या व त्या आझादी सॅट क्रू मधल्या मुलींच्या मुलाखती घेत होते. सूत्रसंचालकांनी त्या मुलींपैकी काहींना खाली बोलावून त्यांचे मनोगत व्यक्त करण्यास सांगितले. किती लहान मुली त्या!वय वर्षे आठ ते बाराच्या दरम्यानच्या!! त्यांनी धीटपणे त्यांचे मनोगत व्यक्त केले व ही संधी दिल्याबद्दल इस्रोचे आभार मानले. देशभरातील विविध सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या सातशे पन्नास शाळकरी मुलींकडून उपग्रह बनवून घेणे ही कल्पना ‘स्पेस किड्झ इंडिया’ या चेन्नई स्थित खाजगी अंतरीक्ष नवउद्योगाची (space start-up)आहे. या कंपनीने देशभरातील विविध शाळांमध्ये जाऊन – त्यातील कांही शाळा तर दुर्गम भागातील आहेत- त्यांना उपग्रहाचे विविध भाग बनविण्यासाठी मार्गदर्शन केले व अशा रीतीने AzaadiSat-2 या उपग्रहाचे निर्मिती करण्यात आली. हे स्टेडियम तीन भागात विभागले आहे. सूत्रधार मॅडमनी सर्व प्रेक्षकांना मधल्या भागात यायला सांगितले, जेणेकरून प्रक्षेपण व्यवस्थित बघता येईल. सर्व मिळून साधारण तीन हजार च्या दरम्यान प्रेक्षक होते. हळूहळू घड्याळाचा काटा पुढे सरकू लागला. दहा मिनिटे.. पाच मिनिटे..दोन मिनिटे.. एक मिनिट… नंतर उलट मोजणी दहा.. नऊ.. आठ.. सात.. सहा.. पाच.. चार.. तीन.. दोन.. एक.. अँड गो… पण अजून समोर कांहीच दिसत नव्हते. पण नंतर क्षणातच समोरच्या गर्द झाडीतून SSLV-D2 प्रक्षेपक त्याच्या पिवळ्या धमक्क ज्वाळांसहित वर आला आणि सर्वांनी एकच जल्लोष केला. मी डोळ्यांची पापणीही न लाववीता(अनिमिष नेत्रांनी) ते अद्भुत दृश्य पाहू लागलो. बरेच वर गेल्यावर क्षितिजाशी दीर्घलघुकोन करून यान झपाट्याने पुढे सरकू लागले. आम्हाला माना उजवीकडे वर कराव्या लागल्या. आमच्या पुढील क्षितिज व मागील क्षितिज असे १८०° धरले तर साधारण १००° गेल्यावर यान दिसेनासे झाले. मागे राहिला पांढऱ्याशुभ्र धुराचा लोळ. हवेमुळे तो ही विरळ होत गेला. आमच्या गॅलरी समोर दोन प्रचंड मोठे स्क्रीन्स लावले होते. त्यावर कंट्रोल रूम मधील दृश्य दिसत होती. एकही प्रेक्षक जागेवरून हालला नव्हता. साधारण तेरा मिनिटांनी EOS-07 उपग्रह यानापासून वेगळा होऊन त्याच्या ठरलेल्या कक्षेत प्रस्थापित केला गेला, साडे चौदा मिनिटांनी Janus-1 वेगळा झाला, पंधरा मिनिटांनी AzaadiSat-2 वेगळा होऊन त्याच्या कक्षात प्रस्थापित केला गेला असे जाहीर करण्यात आले. त्यावेळी AzaadiSat crew ने जो जल्लोष केला तो बघून डोळे भरून आले. खरोखर देशातल्या विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञानात रस निर्माण व्हावा म्हणून  इस्रो जे कार्य करीत आहे ते कौतुकास्पद आहे. हळूहळू गर्दी पांगु लागली. लोक खाली येऊ लागले. येताना स्पेस म्युझियम लागते, तेथे भारताने अंतरिक्षात प्रस्थापित केलेले विविध उपग्रह तसेच प्रक्षेपकांची मॉडेल्स ठेवली आहेत. त्यांजवळ उभारून लोक फोटो काढून घेत होते. मी अहमदाबाद येथील VSSE म्युझियम बघितलेले असल्याने फक्त एक फेरफटका मारून बाहेर पडलो. जवळच एक ऑडिटरियम आहे ते बंद होते. बाहेर पडल्यावर त्या इमारतीच्या पार्श्वभूमीवर आवर्जून एक फोटो काढून घेतला. आता परत अडीच तीन मैल चालावे लागणार अशी भीती वाटत होती, तोवर इस्त्रोचा एक इलेक्ट्रिकल विभागात काम करणारा माणूस भेटला, तो म्हणाला लॉन्च बघून परतणाऱ्यांसाठी इस्त्रोने आंध्र प्रदेश स्टेट कॉर्पोरेशनच्या बसेसची सुलुरूपेटा पर्यंत व्यवस्था केली आहे. थोडे चालल्यावर हे बस दिसली. त्यात बसून मी सुलुरूपेटा येथे आलो.

इथे आवर्जून एक गोष्ट सांगावीशी वाटते की श्रीहरीकोट्याला येताना स्वतःचे वाहन असणे केव्हाही चांगले. स्वतःचे वाहन असले की थेट व्ह्यूईंग गॅलरीच्या इमारतीपर्यंत जाता येते. तेथे पार्किंगची व्यवस्था आहे. त्यामुळे तीन चार मैलांची पायपीट वाचते. तसेच लॉन्च बघून परततांना ज्यांनी यापूर्वी स्पेस म्युझियम बघितले नसेल त्यांना आरामात त्याचा आस्वाद घेता येतो. येथे रॉकेट गार्डन म्हणून एक उद्यान आहे तेथे आपल्या सर्व प्रक्षेपकांच्या पूर्णाकार प्रतिकृती ठेवल्या आहेत आणि काही सुंदर असे वास्तुकलेचे नमुने आहेत, तेथे पण जाता येते. निव्वळ स्वतःचे वाहन घेऊन न गेल्याने मला रॉकेट गार्डन बघता आले नाही.

सकाळी खूप चालल्यामुळे दमायला झाले होते, त्यामुळे काल आणलेला ब्रेड बटर खाऊन ताणून दिली ते रात्री साडेआठलाच उठलो. उठून काउंटरवर जाऊन जवळ कोठे शाकाहारी जेवणाचे हॉटेल आहे का याची चौकशी केली. त्यावेळी मार्केटमध्ये कोमला निवास म्हणून हॉटेल आहे असे कळले. रिक्षाने हॉटेलमध्ये गेलो. खवय्यांची रांग लागली होती. सर्व व्यवहार तेलगूत चालू होते. माझा नंबर आल्यावर मी प्रथम हिंदीत व नंतर इंग्रजीत राईस प्लेटची चौकशी केली. काऊंटरवरील माणसास हिंदी अजिबात येत नव्हते व इंग्रजीही अगदी मोडकेतोडके येत होते. राईस प्लेट उपलब्ध नसते असे कळले. कोण कोणते पदार्थ उपलब्ध आहेत याची चौकशी केल्यावर मसाला डोसा, रोटी, चपाती वगैरे उपलब्ध असल्याचे कळले. ‘आंध्रात चपाती कशी असेल कोण जाणे’ असा विचार करून दोन रोटी व ग्रेव्ही असे सांगितले. त्याने नव्वद रुपये म्हणून सांगितले. मी पैसे दिले. त्याने कुपन दिले. पण कुपनावर फक्त दोन रोटीच दिसले. मी याबरोबर काय असे इंग्रजीत विचारले. त्याला नीट कळले नाही. नुस्ती रोटी कशी खाणार असा विचार करून मी मसाला डोसा सांगितला. काउंटरवरील माणसाने जरा रागाने बघून त्या कुपनवर पेनने काही लिहिले व माझ्याकडे दहा रुपये मागितले व त्याचे वेगळे कुपन दिले. मला वाटलं डोसा शंभर रुपयांना मिळत असावा. मी रांगेत जाऊन मसाला डोसा घेतला व एका टेबलावर येऊन खायला सुरुवात केली.

— क्रमशः भाग दुसरा

© श्री राजीव  गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – [email protected] मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments