श्री विनय माधव गोखले

? इंद्रधनुष्य ? 

☆ जगप्रसिद्ध मराठी चित्रकार गोपाळ दामोदर देऊस्कर ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

हैदराबाद येथील  सालारजंग वस्तू संग्रहालयाचे पहिले  व्यवस्थापक, तसेच  निर्मितीस नबाबास सहकार्य करणारे मागील शतकातील जगप्रसिद्ध मराठी चित्रकार गोपाळ दामोदर देऊस्कर यांचा  जन्म ११ सप्टेंबर १९११ रोजी अहमदनगर येथे झाला. गोपाळराव हे दोन वर्षाचे असताना आलेल्या फ्लूच्या साथीत आई आणि वडील यांचा मृत्यू झाला. त्यांचा व त्यांची मोठी बहिण शांता यांचा नातेवाइकांनी सांभाळ केला. नंतर ते हैदराबाद येथे रामकृष्ण देऊसकर या काकांकडे सहा वर्षे राहिले. मूळचे देवास, मध्यप्रदेश येथील देऊसकर कुटुंब  अहमदनगर येथे आले. देऊसकर यांच्या  घरात तीन पिढ्यांपासून कलेची पार्श्वभूमी होती. त्यांचे आजोबा वामन देऊसकर आणि त्यांचे वडील हे मूर्तिकार होते. गोपाळ यांचे वडील मिशन हायस्कूलमध्ये चित्रकला शिक्षक होते. मोठे काका रामकृष्ण देऊसकर हे विसाव्या शतकातील गाजलेले चित्रकार होते.

त्यांनी वर्ष १९२७-३६ दरम्यान मुंबईच्य जे.जे. स्कूल ऑफ आर्ट या मानांकित संस्थेत चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले. १९२७ साली मुंबईला आल्यावर खेतवाडी येथे ललितकलादर्श या नाटक मंडळीच्या बिऱ्हाडात ते राहिले. त्यांनी १९३१ मध्ये जे.जे.मधील अभ्यासक्रम पूर्ण करून प्रथम क्रमांक आणि सुवर्णपदक पटकावले. जे.जे.स्कूलचे तत्कालीन संचालक कॅप्टन ग्लॅडस्टन सॉलोमन यांनी लंडन येथे प्रदर्शन भरवले होते. तेथे देऊसकरांच्या चित्रांचे विशेष कौतुक झाले. त्यांची कला पाहून निजामाने पाच वर्षांकरिता खास शिष्यवृत्ती देऊन चित्रकलेच्या प्रगत अभ्यासाकरता त्यांना युरोपात पाठवले व लंडनमधील ‘रॉयल अकादमी’त त्यांनी शिक्षण घेतले. 

त्या संस्थेच्या लंडनमधील जागतिक कला प्रदर्शनांत त्यांनी सातत्याने पाच वर्षे कलाकृती प्रदर्शित करण्याचा बहुमान मिळवला होता. वर्ष १९३६ व १९३८ च्या रॉयल ॲकडमीच्या प्रदर्शनात देऊसकरांची ‘शकुंतला’ व ‘अ बुल्स हॉलिडे’ अशी शीर्षके असलेली चित्रे  लंडनमध्ये प्रदर्शित करण्यात आली. ही चित्रे बडोदा येथील संग्रहालयात आहेत. त्यांनी ‘शकुंतलेचे पत्रलेखन’ या चित्रांमध्ये निसर्गघटकांच्या  पार्श्वभूमीचा उत्कृष्ट वापर केला आहे. बडोदा-नरेश प्रतापसिंह गायकवाड यांची ‘घोड्यावरून सलामी’  आणि ‘राजगृहात संस्थानिक’ या दोन्ही चित्रांमधून त्यांच्या कल्पकतेचा प्रत्यय येतो. त्या वेळी ही चित्रे मराठी नियतकालिकांच्या मुखपृष्ठांवर छापली गेली. 

हैदराबाद येथील सालारजंग  उभारणीत नबाबासोबत त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. त्यामुळे त्याची खूपच प्रसिद्धी झाली. सालारजंग म्युझियमची मांडणी  ही मराठी माणसाच्या कल्पकतेचे द्योतक आहे. भारतात परतल्यावर त्यांना जे.जे.स्कूल ऑफ आर्ट संस्थेच्या डेप्युटी डायरेक्टर पदावर नेमले गेले. ‘व्यक्तिचित्रकार’ म्हणून देऊस्कर यांनी स्वतःची ‘व्यावसायिक कारकीर्द घडविली. त्यांच्या चित्रशैलीला बॉंबे आर्ट सोसायटीने सुवर्णपदक देऊन त्यांना गौरवले होते. आजही पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिर, तसेच टिळक स्मारक मंदिरातील त्यांनी रंगविलेली भित्तीचित्रे पाहण्यास मिळतात. व्यक्तिचित्रकार सुहास बहुळकर ह्यांनी ‘चित्रकार गोपाळ देऊसकर’ या पुस्तकातून देऊसकरांमधला कलावंत आणि माणूस याची सुंदर ओळख दिली आहे. त्याच्या आठवणी, किस्से, पत्रव्यवहार आणि सोबतची चित्रे, छायाचित्रे येथे पाहण्यास मिळतात. 

जे.जे.तून पदविका घेऊन बाहेर पडल्यानंतर देऊसकरांनी चित्रकलेच्या क्षेत्रातील अनेक महत्त्वाची पारितोषिके व पदके संपादन केली. बॉम्बे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक, सिमला येथील प्रदर्शनात व्हाइसरॉयचे पदक, भारतीय रेल्वेचे प्रथम पारितोषिक ही त्यांपैकी काही महत्त्वाची पारितोषिके होत. भारतात पेस्तनजी बोमनजी यांच्यापासून व्यक्तिचित्रे करणाऱ्या चित्रकारांच्या परंपरेतील श्रेष्ठ कलाकार म्हणून  गोपाळराव देऊसकर यांचे स्थान अव्वल आहे. फेब्रुवारी ८, १९९४ रोजी त्यांचे निधन झाले. 

लेखक – अज्ञात

संग्राहक : विनय मोहन गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments