मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मास्टरपीस” -लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

??

☆ “मास्टरपीस” -लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

मी काही कामानिमित्त बॅास्टनला गेले होते. काम झाल्यावर जवळच्या एका मॅालमधे जेवायला गेले. तिथे दहा पंधरा प्रकारची वेगवेगळी रेस्टॅारंटस् होती. सगळे प्रकार बघून मी शाकाहारी असल्याने भारतीय जेवणच घ्यायचं ठरवलं. भात व पालक-दाल घेऊन तिथल्या टेबलावर बसले. आजूबाजूला अनेक भाषा, अनेक रंग, अनेक पेहराव, अनेक मूड असलेले सर्व वयाचे लोक होते. 

माझ्या टेबलाच्या अगदी शेजारच्या टेबलवर एक आई व दोन मुली बसल्या होत्या. आईने डोक्याला हिजाब गुंडाळला होता पण बारा आणि दहा वर्षाच्या मुलींनी हिजाब न घालता काळ्या केसांची एक वेणी घातली होती. त्या वेणीला वर आणि खाली चकचकीत फुलाचे रबरबॅंडस लावले होते. आईच्या कपड्यांवरून व भाषेवरून ते कुटुंब इराकचे असावे असे वाटत होते. त्या दोन मुलींनी काय पुण्य केले म्हणून त्यांची इराक मधून सुटका झाली असे वाटले. तिथे या मुली अन्यायाखाली दबून गेल्या असत्या. बायकांना अत्यंत कनिष्ठ दर्जा देणाऱ्या इराकमधे १८ व्या वर्षी त्यांचे लग्न उरकून त्यांच्यावर अत्याचार पण झाले असते. पिंजऱ्यातून सुटलेल्या पक्षासारख्या त्या तिथे बागडत होत्या. त्या आईच्या चेहऱ्यावर मात्र अत्याचार सहन केलेल्या अनेक रेषा दिसत होत्या. Nike कंपनीनं हल्ली हिजाब बनवून विकायला सुरूवात केली आहे म्हणून त्या आईने Nike चा हिजाब घातला होता. “आम्ही तुझ्याबरोबर आहोत” हे Nike सारख्या मोठ्या कंपनीनं सांगितल्या सारखे होतं ते! मला Nike कंपनीचे हिजाब बनवण्यासाठी मनापासून कौतुक वाटले.  

त्या पुढच्या टेबलावर एक भारतीय कुटुंब बसले होते.  त्यांचा १२ वर्षाच्या मुलगा कसाबसा चालत होता. त्याच्या डोळ्याला अत्यंत जाड चष्मा होता. वडील जेवण घेऊन आले पण ते मुलाशी फारसे बोलत नव्हते. आई मात्र कौतुकाने तिच्या लेकराशी गप्पा मारत त्याला भरवत होती. त्या मातृत्वापुढे माझी मान आदराने झुकली. काय काय सहन केलं असेल त्या माऊलीने! आपल्या बाळानं जगातलं सर्व यश मिळवावं हे चिंतणाऱ्या आईला आपला मुलगा आपल्या हाताने जेऊ शकत नाही..चालू शकत नाही हे पाहतांना काय यातना झाल्या असतील? ते दु:ख गिळून कोणाचीही पर्वा न करता ती आई लेकराला भरवताना बघून देवानं आई का निर्माण केली हे परत एकदा कळलं. 

त्याच्या शेजारच्या टेबलावर एक अमेरिकन कुटूंब बसलं होतं. त्यांनाही १३-१४ वर्षांचा मुलगा व ८-१० वर्षांची मुलगी होती. दोघं उंच व बाळसेदार होते. भरपूर खरेदी केल्याने बरोबर अनेक बॅगा होत्या. अत्यंत सुबत्तेत वाढणाऱ्या या मुलांना कसं कळेल की जगात लहानशी गोष्ट मिळावी म्हणून काहींना भगीरथ प्रयत्न करावे लागतात ते! पण तो त्यांचा दोष नाही. ते त्यांचं नशीब होतं. गदिमा नाही का म्हणाले..

घटाघटांचे रूप आगळे। प्रत्येकाचे दैव वेगळे..॥

मुखी कुणाच्या पडते लोणी कुणा मुखी अंगार ॥

चौथं टेबल होतं माझं ! भारतातल्या मिरजेसारख्या लहान गावातून अमेरिकेत आलेली मी भारतातच रहात असते तर कशी घडले असते? परक्या देशात येऊन इथले रितीरिवाज शिकून या देशांतल्या चांगल्या गोष्टी व भारतातल्या चांगल्या गोष्टी याची सांगड मला व माझ्या नवऱ्याला घालता आली का? मुलं आमच्या परीने आम्ही उत्तम वाढवली. त्यांचं कॅालेज, नोकरी, लग्न होऊन सेटल झालेलं बघताना खूप समाधान आहे पण काही करायचं राहिलं का हा प्रश्न मान वर करतोच! 

या विचारांच्या भोवऱ्यात मी खोलात जात असताना समोर एक गोष्ट घडली. इराकी मुलीचा बॅाल त्या भारतीय मुलाकडे गेला. त्याने तो पायाने ढकलला. पुढच्या वेळी तो बॅाल त्या अमेरिकन मुलाकडे गेला. त्याने तो झेलला व परत तिच्याकडे टाकला. धाकटीला तो झेलता आला नाही. त्याने तिला कसा झेलायचा दाखवले. “To me..” तो भारतीय मुलगा म्हणाला. त्याच्या पायातून तो बॅाल घरंगळत पलिकडे बसलेल्या कृष्णवर्णीय मुलीकडे गेला. तिने तो परत त्या मुलीकडे टाकला व त्यांचा खेळ सुरू झाला. ती मुलं एकमेकांकडे बॅाल टाकून खेळत असताना हळूहळू तुझं नाव, गाव, इयत्ता काय वगैरे देवाण घेवाण झाली. एका लहानशा बॅालने जात, धर्म, भाषा, देशाच्या सीमा ओलांडून मैत्री घडवून आणली जे भल्या भल्या राजकारण्यांना हजार वेळा भेटून जमत नाही. 

तेवढ्यात तिथे एक विदूषक आलेला बघून ही मुलं घाईने त्याच्याभोवती गोळा  होऊ लागली. इराकी मुलीनं भारतीय मुलाचा हात धरला व त्याच्या आईला विचारलं,” Can I take him to see the show?” आईने कौतुकाने हो म्हटलं. मुलाच्या डोळ्यात उत्साह मावत नव्हता. त्याने तिचा हात धरला व तो तिरकी पावलं कष्टाने पण उत्साहाने टाकत त्या विदूषकाजवळ गेला. त्याचे बाबा घाईने त्याला आधार द्यायला उठले पण आई म्हणाली, “Let him go!” तिचा मुलाला सुटा करण्याचा प्रयत्न बघून मी मनात टाळ्या वाजवल्या. 

विदूषक त्यांना डोळ्यात पाणी येईपर्यंत हसवत होता आणि ते वेगवेगळ्या संस्कृतीचं, रंगांचं, भाषांचं, देशांचे सुंदर चित्र निरोगी व अपंग या मर्यादा ओलांडून एक मास्टरपीस बनून माझ्यासमोर उभं होतं. माझ्या हातात जवळच्या Museum of Fine Arts ची तिकीटं होती पण तिथे काय दिसेल असं चित्र इथे बघताना अंगावर काटा आला.  

ते सुंदर चित्र माझ्या कॅमेऱ्यात पकडताना वाटलं..

पंछी, नदिया, पवन के झोंके, कोई सरहद ना इन्हें रोके

बदलून 

पंछी, नदिया, बच्चे, और पवन के झोंके…

असं करावं. 

मुलांकडून मोठ्यांनी हे शिकायला हवं. सतत बॅार्डरवर युध्द करणाऱ्यांनी तर नक्कीच शिकलं पाहिजे ! मग ते भारत-पाकिस्तान असो, रशिया-युक्रेन असो नाहीतर इस्त्राईल-हमास असो..माणूसकी, दया आणि प्रेम यांनी बनवलेला बॅाल मोठे एकमेकांकडे का नाही टाकू शकत? त्यांना एकमेकांकडे बॅाम्बच का टाकावेसे वाटतात? 

जग मुलांकडे बघून मैत्रीचा हात पुढे करायला कधी शिकेल का?

लेखिका : ©® ज्योती रानडे

(खरी घडलेली घटना आहे. काल्पनिक नाही.) 

प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी. 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बाबा… लेखिका : सुश्री फुलवा खामकर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

☆ बाबा… लेखिका : सुश्री फुलवा खामकर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

बाबा…

आज तुम्हाला जाऊन ३९ वर्ष झाली. मी पाचवी मधे होते.सकाळपासून खूप धडधडत होतं.आई हॉस्पिटल मधून आली आणि तिने सांगितलं.बाबा गेले.मला फक्त आजोबांचा आक्रोश आठवतोय.आजी आणि आई खूप शांत होत्या ! 

दारूमुळे माणूस इतका असहाय्य होऊ शकतो?एक अत्यंत प्रतिभावान,हुशार आणि जगाच्या पुढे असणारा माणूस दारू मुळे वयाच्या अवघ्या३६ व्या वर्षी जातो हे भयानक आहे! मग बाबा हा कप्पा मी पूर्णपणे बंद करुन ठेवला! 

मात्र तुमच्या लिखाणामुळे आजच्या पिढीला सुद्धा लेखक अनिल बर्वे माहीत आहेत याचा खूप आनंद आम्हाला होतो. अनिल बर्वेची आम्ही मुलं आहोत हा अभिमान सुद्धा आम्हाला आहे ! 

ज्यूलिएटचे डोळे,रोखलेल्या बंदुका आणि उठलेली जनता, कोलंबस वाट चुकला, अकरा कोटी गॅलन पाणी, थँक यू मिस्टर ग्लाड, हमीदा बाईची कोठी, स्टड फार्म, डोंगर म्हातारा झाला, पुत्र कामेष्टी, मी स्वामी या देहाचा, आकाश पेलताना… .. किती किती वेगळं आणि काळाच्या पुढचं लिखाण होतं तुमचं बाबा !! 

तुमच्या उमेदीच्या काळात तुम्ही केलेल्या अनेक गोष्टींपैकी एक म्हणजे तुम्ही चालवलेलं एक फिल्मी मासिक, ज्याचं नाव होतं फुलवा. नेहमीप्रमाणे ते सगळं व्यवस्थित बुडलं, कुण्या एका मित्राने तुम्हाला सांगितलं की फुलवा हे नाव लाभदायक नव्हे. झालं ..  भविष्य, देव, धर्म यावर विश्वास नसलेल्या तुम्हाला याचा राग आला आणि तुम्ही  म्हणालात मला जर मुलगी झाली तर तिचं नाव मी फुलवाच ठेवणार, ती नाव काढेल ! हा किस्सा मला हल्लीच समजला आणि आम्ही खूप हसलो. आणीबाणीच्या काळात तुमच्यावर नजर ठेवणाऱ्या गुप्त पोलिसाला, त्याला उगाच त्रास नको म्हणून तुम्ही बरोबरच घेऊन फिरत होता.

बाबा तुम्ही ‘ सामान्य माणूस ‘ या कक्षेत बसणारे नव्हता. पण एक मुलगी म्हणून मात्र माझ्याकडे तुमच्या खूप वेगळ्या आणि काहीशा कटू आठवणी आहेत, कारण मला आठवणारे बाबा दारूच्या खूप आहारी गेले होते. इतक्या गोड माणसाला ती दारू संपवीत होती. आम्ही खूप लहान होतो ! मी ९ वर्षांची,राही ४ आणि आमच्या हातात काहीच नव्हतं ! असहाय्य होतो आम्ही… 

बाबा, इतकी वर्ष तुमच्या बद्दल मनात एक किंतू होता,  पण आता तो नाहीये ! कदाचित आता तुमच्याकडे एक माणूस म्हणूनसुद्धा मी पाहू शकतेय इतका समजूतदारपणा वयामुळे माझ्यात आला असावा. आज मला खरंच खूप  वाटतंय की तुमच्या दोन्ही मुलांचं पुढे काय झालं हे पहायला तुम्ही हवे होतात. आज तुमच्या मुलीचं नाव फुलवा ठेवल्याचा तुम्हाला आनंद झाला असता आणि राहीला पाहून, त्याचं काम पाहून त्याला डोक्यावर घेऊन तुम्ही नाचला असतात. तुमच्या लिखाणाचा वारसा त्याने घेतला आहे. आज तुम्हाला आमचा अभिमान वाटावा असं काम करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय बाबा !

तुमची फुलवा… 

(प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर ही प्रतिभावंत लेखक अनिल बर्वे यांची मुलगी हे माहीत नव्हतं .पण फुलवाच्या या पत्रामुळे कळलं. .हे पत्र जरूर वाचा ! एका दारू व्यसनाच्यापायी केवढा मोठा लेखक आयुष्य संपवतो हे लक्षात येईल ! ) 

संग्राहिका – सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मराठी” च्या काही व्याख्या… — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

??

मराठी” च्या काही व्याख्या… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

मराठी कशी आहे.. म्हणजे मराठी म्हणजे काय असे मला वाटते ..  ते या काही व्याख्यांमधून मांडण्याचा प्रयत्न…  मराठी भाषादिनानिमित्त…

 नामनात प्रत्येकाच्या

 राहणारी अशी 

 ठीपक्या ठीपक्यांची सुंदर रांगोळी…… ती मराठी.

 

न्जूळ नादाने 

रात्रंदिवस जी

ठीबकते मन पिंडीवर…… ती मराठी.

 

शाल चंद्राची पेटलेली असताना

रात्रीच्या त्या रम्य आकाशात

ठीणग्या चांदण्यांच्या सांडते…… ती मराठी

 

हाल शब्दांचा सजवून

राग विविध छेडून

ठीकठिकाणी रसाळता शिंपडणारी …… ती मराठी

 

धुर मिलनाची ओढ मनात ठेउन

राजीव अंतरंगी फुलवत 

ठीय्या मनाचा घेऊन क्षणात अंगी भिनते …… ती मराठी

 

हान लेणीमध्ये 

राष्ट्रीयतेचा झेंडा हाती फडकवत

ठीक-या न उडालेला शीलालेख ……. ती मराठी

 

नगाभा-यात जळणारी कापराची लडी जी

रानावनातून भरून वाहणारी दुथडी जी

ठीगळे जोडून ऊब देणारी गोधडी जी ……ती माय मराठी

 

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ खेळ आवरायला हवा… — ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

☆ खेळ आवरायला हवा… — ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

आद्या आणि डॉली भातुकली खेळत होत्या. खेळून झाल्यावर त्यांनी सगळा खेळ आवरून नीट खोक्यात भरून ठेवला, नीट सगळं आवरलं, प्लेरूम स्वच्छ केली आणि मग अभ्यासाला बसल्या. मी लांबूनच त्यांचा खेळ बघत होते. मनात विचार आला, ‘ किती रंगून जाऊन या मुली खेळत होत्या आणि कंटाळा आल्या बरोबर त्यांनी सगळा खेळ आवरून टाकला.’ 

मग माझ्या मनात असा विचार आला, की ‘ आपण कधी शिकणार असा खेळ आवरायला? चार बुडकुली आणि तीन छोट्या खोल्यात सुरू केलेला संसार आता मोठ्या बंगल्यात आला. तरी आपले अजून भातुकली खेळणे सुरूच आहे की. भातुकलीची भांडी बदलली, खेळाचा पसारा वाढला. खेळगडीही बदलले. तरीही आपण अजूनही त्यातच रंगलो आहोत. वयाची साठी केव्हाच ओलांडून गेली. आता नव्या दमाचे  खेळाडू हा खेळ खेळायला सज्ज झालेत आणि उत्सुकही आहेत. हा खेळ आता देऊया ना त्यांच्या हातात. खेळत असताना आद्याने कुठे मला विचारले, “ आजी मी आता कशी खेळू?”  तिला हवा तसा ती खेळ मांडत होती, मोडत होती, पुन्हा नवीन रचना करून बघत होती.  तिला माझी मदत नको होती. आपणही आता हा डाव आपल्या मुलांच्या हाती देऊया. त्यांना हवी तशी ती त्यांच्या मनाप्रमाणे खेळतील. नव्या रचना करतील, नवे डाव  मांडतील. आपण नको त्यात हस्तक्षेप करायला.  चुकतील, धडपडतील पण कधीतरी बरोबर जागा मिळेलच की त्यांना. आपण आता नको त्यात पडायला. अनुभवाने होतीलच की तीही शहाणी. तो वर बसलेला परमेश्वर आपला हा भातुकलीचा डाव अर्धवट सोडायला लावून कधी आपल्याला हाक मारेल, सांगता येतंय का? आपण आपले आधीच आपलीही खोकी भरून तयारीत असलेले बरे.  कोणी गरजवंताने जर नवा खेळ मांडला असेल तर त्यालाही देऊया ना आपली चार भांडी, नको असलेले पण उत्तम स्थितीतले कपडे, पुस्तके, फर्निचर. नको आता हा ‘अती’चा हव्यास.त्यांनाही मिळू दे खेळ खेळण्यातला आनंद. जुनी ओझी आता नकोत कवटाळायला.’ 

कितीतरी घरातले पक्षी दूरदेशी उडून गेलेत, त्यांना तुमच्या जुन्यापुराण्या वस्तू आणि भांड्याकुंड्याची, अवजड फर्निचरची आणि कशाचीच अजिबात गरज नाहीये. तर मंडळी, आवरता घ्या हा पसारा  खेळ आवरा आणि त्या वरच्या नवीन घराचे कधी बोलावणे येईल तेव्हा हसतमुखाने त्याच्या घरी जायला सज्ज व्हा….. रिकाम्या हाताने .. आणि मनानेही.

खरंच हा खेळ वेळेवर आवरायला हवा …. बघा पटतेय का ? 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वृद्धाश्रम नाही… केअर सेंटर… ☆ सुश्री नीता कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ वृद्धाश्रम नाही… केअर सेंटर… ☆ सुश्री नीता कुलकर्णी

अजूनही वृद्धाश्रम म्हटलं की गरीब  बिचारी म्हातारी माणसं…

असंच मनात येतं.

आता केअर सेंटर असे नाव दिले जात  आहे.

आणि तिथे खरंच काळजीपूर्वक वृद्धांना सांभाळलं जातं.

ते आनंदी कसे राहतील हे पण बघीतल जातं.

अशाच एका केअर सेंटरला गेले होते. इथे वृद्ध लोक काही दिवसांसाठी किंवा काही महिन्यांसाठी रहायला येतात.

काही तिथेच रहायला आले आहेत.

तिथे भरपूर झाडं होती ,कुंड्या होत्या. समोर छोट्या टेबलावर गणपतीची मूर्ती होती. हार फुलं घालून पूजा केली होती. समोर मंद दिवा तेवत होता.

 एका ओळखीच्या  आजींचा वाढदिवस होता.  आजींना भेटाव व ईतर लोकांशी बोलाव म्हणून मी थोडी आधीच तिथे गेले .

तिथल्या खोल्या बघितल्या .काॅट, कपाट, टीव्ही, फॅन, या सोयी होत्या.. काॅलेजच्या होस्टेलचीच आठवण आली.

खोल्याखोल्यातुन मी चक्कर मारली.

स्वतःचं घर असावं अशा खोल्या त्यांनी स्वच्छ ठेवल्या होत्या…

सगळे आजी-आजोबा गप्पा मारायला आपली कहाणी सांगायला उत्सुक होते…

एक एकजण सांगत होते.

“अग माझ्या दोन्ही मुली आपापल्या संसारात त्यांच्यात माझी लुडबुड नको ग …..  शिवाय संकोचही वाटतो बघ आणि  हे गेले आता एकटी कशी राहु ?म्हणून मी ईथे आले.”

“मुंबईत घर घेणं कुठे परवडतं…नातवाच लग्न झाल  म्हणून मीच म्हटलं मला इथे ठेवा….”

” मला तर मूलबाळच नाही… भाचे पुतणे करतात पण तेही आता पन्नाशी ..साठीला आले….”

” माझी नात सून नोकरी करते सुनेला तिची मुले सांभाळावी लागतात….माझं अजून एक ओझं  तिच्यावर कुठे घालू ग….”

“माझा मुलगा सून  परदेशी गेले आहेत…..लेकीच  बाळांतपण करायला..  म्हणून  काही महिन्यांसाठी मी इथे….”

एक आजोबा शांतपणे जपमाळ हातात घेऊन जप करत बसले होते.

दुसरे आजोबा सांगायला लागले..

 ” माझी  एकुलती एक मुलगी मला छान संभाळते. पण तिला चार महिन्यांसाठीऑफीसच्या कामासाठी अमेरिकेला जावे लागले म्हणून तोपर्यंत मी इथे “

प्रत्येकाकडे एक एक कारण होते…..इथे येण्याचे… मुख्य म्हणजे कोणाचाच तक्रारीचा सूर अजिबात नव्हता.

इतक्यात एक मुलगा सांगत आला 

” चला … चला खाली  तयारी झाली आहे ….”

एक आजी थोड्या भांबावलेल्या दिसत होत्या. 

“अग या कालच आल्या आहेत ” एकीनी सांगितलं 

दुसऱ्या  आजींनी त्यांचा हात धरला.. म्हणाल्या ” हळूहळू होईल तुम्हाला सवय … चला आता खाली “

असं म्हणून त्यांना घेऊन गेल्या.

खालच्या पार्किंगमध्ये सजावट केली होती .खुर्च्या मांडल्या होत्या. समोरच्या टेबलावर केक ठेवला होता.

छान  जरीची साडी नेसुन आलेल्या आजींनी केक कापला. सगळ्यांनी टाळ्या वाजवून  हॅपी बर्थडे चा गजर केला…

नव्वदीचे चे आजोबा ….  “जीवेत शरद शतम्……” असा आशीर्वाद देत होते.

डिशमध्ये सर्वांना केक वेफर्स आणि बटाटेवडे खायला दिले.

“झालं न खाणपीणं….आता गाणी म्हणायला सुरू करूया..” केअर सेंटरच्या डॉक्टरीण  बाईंनी सांगितले.

एक आजोबा पेटी घेऊन आले. टाळ, चिपळ्या आल्या गाणी सुरू झाली…..एकच घमाल सुरू झाली.

पंच्याऐंशीच्या आजी

“सोळावं वरीस धोक्याचं गं…” ठेक्यात म्हणत होत्या.

” पाऊले चालती पंढरीची वाट ” सुरू झालं ..अभंग म्हणत म्हणत सर्वांनी एक गोल चक्कर मारली.

मी प्रसन्न मुद्रेने हे सगळं बघत होते.

अध्यात्म प्रत्यक्ष आयुष्यात जगणाऱ्या या शहाण्या आजी-आजोबांना मी मनोमन साष्टांग दंडवत केला…

 वानप्रस्थाश्रम संपवून या आधुनिक संन्यासाश्रमात प्रवेश केलेले हे लोक होते…..

खरं सांगू हे वाटतं तितकं सोपं नाही…..मोह ,माया इतकी लगेच सुटत नाही…. भरल्या घरातून इथे यायचं.. फोनद्वारे कनेक्ट राहायचं आणि तरीही अलिप्त रहायचं….

आपल्या मुलांची अडचण ओळखून स्वतःहून हे सगळे  इथे आले होते…..

तरीपण…. यांच्या मनात काय काय चाललं असेल हे मला समजत होते.

फार अवघड आहे… हे सगळं स्वीकारून आनंदात राहणाऱ्या या लोकांकडून मी आज खूप काही शिकले….

वाटलं… येत जावं इथं अधून मधून…आपलेही पाय जमिनीवर राहतील…

घरात राहून आपण  छोट्या मोठ्या तक्रारी करणार नाही….

इतक्यात खणखणीत आवाज ऐकू आला…. गाऊन घातलेल्या आजी…

 ” पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा……आई मला नेसव शालु नवा…” म्हणत होत्या..

माझ्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. सगळं कसं धूसर धूसर दिसत होतं….

त्या नादमयी वातावरणाला एक कारूण्याची झालर आहे हे आतल्या आत कुठेतरी जाणवत होते…

तरीसुद्धा यांचा उत्साह बघुन म्हटलं..

“वाह क्या बात है…असेच मजेत आनंदात  रहा…. परत येईन भेटायला……..”

© सुश्री नीता कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ 3 G.? की दत्तगुरू !… लेखिका : सुश्री अनुजा बर्वे ☆ प्रस्तुती – सौ उज्ज्वला केळकर ☆

सौ उज्ज्वला केळकर

??

☆ 3 G.? की दत्तगुरू !… लेखिका : सुश्री अनुजा बर्वे ☆ प्रस्तुती – सौ उज्ज्वला केळकर ☆

“अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ” भाजी निवडतांना एकीकडे माझा जप चालू होता, इतक्यात माझ्या नातवाचा, रोहिनचा प्रश्न आला.

‘एव्हरीटाईम हे काय म्हणत असतेस तू आज्जी ?’

‘ही माझ्या जपाची “टॅग लाईन” आहे.’

‘पण हे म्हणत असलीस की तुझं माझ्याकडे लक्षच नसतं’ फुरंगटलेल्या रोहिनची तक्रार.

रोहिनचा रूसवा दूर करण्यासाठी,पटकन संवाद साधला जाण्यासाठी म्हणून त्याच्या स्टाईलच्या मराठीचा आधार घेत मी म्हटलं,

‘बच्चमजी,व्हिडिओ गेम -मोबाईल मध्ये रमलात की आपणही माझ्या प्रश्नाला आन्सर देत नाही. अगदी तश्शीच मी पण “3G”मध्ये रमून जाते.’

‘आज्जी,”हे” म्हणायला यू आल्सो नीड “3G”?’

रोहिनच्या चेहरयावरचं आश्र्चर्य बघून मला हसू आवरलं नाही.त्याला समजवायला म्हटलं,

‘अरे,दत्तात्रय म्हणजे ‘ब्रम्हा -विष्णु -महेश” टुगेदर, म्हणजे “3G”च नाही का ?अर्थात माझ्या आणि हल्ली सगळ्यांची ‘नीड’ असलेल्या “3G” मध्ये एक मेजर फरक आहे.’

‘फरक म्हणजे डिफरन्स,राइट?तो कोणता?’ रोहिनने खात्री करण्यासाठी विचारलं.

‘सांगते! सगळे ज्याचे फॅन झालेत ‘ते “3G” मिळतंय की नाही ,नसेल तर कोणत्या डायरेक्शनला मिळेल हे सर्व चेक करावं लागतं. पण मी नुसतं “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” असं म्हटलं तरी इनफ आहे.’

 ‘का ?असं का ?आणि “दिगंबरा” म्हणजे ?’ रोहिनच्या अनेक शंका धडाधड बाहेर आल्या.

‘अरे,”दिगंबरा”चा अर्थ सर्व दिशांना व्यापून राहिलेला म्हणजे स्प्रेड होऊन राहिलेला.”दिगंबरा”

हे दत्ताचं अजून एक नाव आहे.’

या अशा संवादानंतर “3G” ची गोष्ट सांगण्याची रोहिन मागणी करणार याची मला खात्री होती.

‘So श्रीदत्त  म्हणजे 3 in one देव आहे?कसं काय? सांग ना आज्जी ‘ गेममध्ये पाॅझ घेऊन माझ्याजवळ येऊन रोहिननं विचारलं.अशा सुवर्ण संधीचा लाभ सोडून देणं मला शक्यच नव्हतं.मी लगेचच गोष्टीला सुरूवात केली.

‘दत्तात्रय या नावातच त्यांच्या वडिलांचं नाव लपलेलं आहे.पिता अत्रीऋषी आणि माता अनुसूया यांचा सुपुत्र means son म्हणजेच “श्रीदत्तात्रय”!फार पूर्वींची गोष्ट-अत्रीऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी “ब्रम्हा-विष्णु-महेश” या देवांची कठोर आराधना केली.’

‘कठोर आराधना म्हणजे?’ मला मध्येच अडवत रोहिनचा प्रश्न आलाच.

‘म्हणजे “hard worship” ! त्याला मराठी शब्द अर्थासहित समजावणं हे माझं आवडतं काम. मातृभाषेची हसतखेळत ओळख करून द्यायला “गोष्ट” हे एक उत्तम साधन आहे असं मला वाटतं.

‘म्हणजे गेममध्ये वरची लेव्हल क्राॅस करायला मला जसं continuous hard try करायला लागतं….’त्याच्या विश्वातल्या गोष्टींशी अर्थ रिलेट करण्याच्या रोहिनच्या प्रयत्नाची गंमत वाटून मी पुढे सांगायला सुरुवात केली.

‘अत्रीऋषींच्या आराधनेमुळे ब्रम्हा-विष्णु-महेश हे तिन्ही देव प्रसन्न झाले.अत्रीऋषी -अनुसूयेला “त्रिदेव पुत्रप्राप्ती” झाली म्हणजेच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला. दत्तजयंतीच्या दिवशी ” त्रिगुणात्मक त्रैमूर्ति दत्त हा जाणा….” ही आरती आपण म्हटलेली आठवतेय ?’ 

मला मध्येच थांबवत रोहिनची प्रतिक्रिया आली, ‘आरतीमध्ये “त्रैमूर्ति” का म्हटलंय ते आता मला करेक्ट समजलंय आजी. पण दत्ताच्या तसबिरीमध्ये गाय, कुत्रे एटसेट्रा का असतात आज्जी ?’

खरंतर त्याच्या तोंडून ‘तसबीर’ हा शब्द ऐकून मला अगदी गहिवरून आलं. माझे ‘मराठी प्रयत्न’ रूजतांना पाहून छान वाटतं होतं. पण आधीच चमकदार असलेल्या रोहिनच्या डोळ्यातली उत्सुकता अधिक न ताणता मी म्हटलं,

‘पृथ्वी – म्हणजे “मदर अर्थ” कशी एखाद्या आईप्रमाणे सगळ्यांच्या डिमाण्डस् फुलफिल करते. तसबिरीतली गाय हे पृथ्वीचं “प्रतिक” आहे.”प्रतिक” म्हणजे symbol. आता पहा, ते “3G” symbol दिसत असलं की सगळे कसे खूश असतात. त्यामुळेच तर सगळ्यांच्या वेगवेगळ्या मागण्या पूर्ण होतात नं ! ४ कुत्रे हे आपल्या वेदांचं प्रतिक आहे– “ऋग्वेद,यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद” !’

‘वेद म्हणजे काय आजी ?’ रोहिननं अधीरपणे विचारलं.

खरं तर “वेद” म्हणजे काय हे सोप्पं करून सांगणं हे खरोखरच अवघड काम होतं.तरीही मी म्हटलं,

‘काही माहिती हवी असेल, काही क्वेरी असेल, काही अडलं असेल तर हल्ली सर्वजण विकिपिडिया रिफर करतात,राइट ? ‘वेद’ म्हणजे आपल्या अॅन्सेस्टर्सनी जपलेलं “ज्ञानाचं भांडार” आहे.’   त्याला  चटकन समजेल अशा प्रकारे समजावण्याचा मी आपला एक प्रयत्न केला.

‘व्हेरी इंटरेस्टींग. आज्जी अजून सांग नं ‘आता रोहिनला राहवेना.

‘शंख-चक्र हे श्रीविष्णूचे तर त्रिशूल-डमरू हे श्रीशिवाचं प्रतिक आहे. मला आठवतंय ,तू एकदा मोबाईलमधले डमरू आणि चक्र चे सिम्बाॅल दाखवले होतेस,हो नं?’

‘अगदी बरोबर आज्जी,” ब्लूटूथसाठी डमरू आणि जनरल सेटिंग्ज ला चक्र “अशा साइन्स असतात. आज्जी हे थोडंसं ब्राॅड पण व्हाॅटस्अॅपच्या साइन सारखं दिसतंय ते काय आहे ?’

‘अरे त्याला कमंडलू म्हणतात. कमंडलू आणि जपमाला हे श्रीब्रम्हाचं प्रतिक आहे.’

व्हाॅटस्अॅपच्या सिम्बाॅलशी त्याने शोधलेल्या साधर्म्याचं मला मनात कौतुक वाटत होतं. माझ्या गोष्टीचे तपशील त्याला आवडलेत असं लक्षात येत असतानाच पुढचा प्रश्न आला.

‘पण मग आज्जी श्रीदत्तांचा जप करतांना तू “अवधूत चिंतन …..”असं का म्हणतेस ?अवधूत म्हणजे ?’

‘अवधूत हेही श्रीदत्ताचंच नाव आहे. ह्या नावाचं मिनिंग आहे ” नेहमी आनंदात,वर्तमानात रहाणारा “.

म्हणून तर मी म्हटलं की ही माझ्या जपाची “टॅग लाईन” आहे, नेहमी आनंदात ठेवणारी. पहा, आजकाल “3G” चा टॅग स्पष्ट असेल तर असतात की नाही सगळे आनंदात अन् अपडेटेड?

काय?’

रोहिनला मनापासून हसू आलं ,अन् अर्थातच मलाही ! खूपशा मराठी शब्दांची अर्थासहित रोहिनला ओळख करून दिली, एक पौराणिक कथा त्याला आवडेल अशा पध्दतीनं सांगता आली ह्याचा मलाही आनंद वाटला.

सध्याच्या “4 G” च्या जमान्यात मी रोहिनला माझ्या “3G” शी कनेक्ट करू शकले… आणखी काय हवंय माझ्यासारख्या आज्जीला ?

लेखिका : सुश्री अनुजा बर्वे

प्रस्तुती : सौ उज्ज्वला केळकर

संपर्क –17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मराठी पुराण — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

??

☆ मराठी पुराण — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

आज मराठी भाषा दिन. त्या निमित्ताने मराठीचे अवलोकन करताना त्यातील बाराखडी व मुळाक्षरांच्या वेगवेगळ्या दर्शनानी भावली आणि मराठी असल्याचा आनंद झाला. पहा तुम्हालाहि मिळ्तोय का? आणि खरच आवड्ल्यास कॉमेन्ट्स द्यायला,शेअर करायला,लाईक करायला विसरू नका.

ऐका मंडळी सुजाण। मराठीचे हे पुराण।वर्षा तुम्हा समजावूनी सांगतसे॥

मराठी भाषेसी ना तोड। तया नाही कशाची जोड।अमृताहूनी गोड, देववाणी॥

३६ मुळाक्षरांची मुळे। बाराखडीची बारा पाने।हलवूनी कल्पवृक्ष साकार होई॥

आता सारे आपण। बाराखडीचे करू अवलोकन।ठेवूनी ध्यान,कान देऊनी ऐका॥

अ असे निराकार। आत्मा होई मिळता आकार। इजा बिजेने भेटा ईश्वरासी॥

उल्हास मनी दाटे। ऊठोनी मन पळू लागे। एकदा तरी धागे ऐसे जुळावे॥

ओज येता भुईवर। औटघटकाभर। अंबराकडे पाहून अः म्हणा॥ 

मुळाक्षरांकडे आता। नजर आपली करू चला।किती संत अन् देवांनी ही भारली असे॥

 

‘क’ असे विठ्ठल। ठेऊनी ऊभा कटेवरी कर। त्यात  तयाचे रूप दिसतसे॥

‘ख’ असे एकमेव। एकत्र येती दोन जीव। जीव-शीव दर्शन घडतसे॥

‘ग’ वाटे गजानन। पहा जरा देऊन ध्यान। सोंड वळवून बसला असे॥

‘घ’ म्हणजे रिद्धि-सिद्धी। तयार  गणेश सेवेसी। चवरी घेऊन, वारा घालती॥

‘ङ’ म्हणजे लक्ष्मी माता। सजली पहा दागिण्यांनी आता। हिरा तिच्या नथणीचा चमकतो॥

‘च’ कडे जाता नजर।साई मज दिसे सत्वर।हात पसरूनी बसला असे॥

‘छ’ म्हणजे छत्रपती।घोड्यावर बसले तलवार हाती।अन्याय मुळीना खपतसे॥

‘ज’ वाटती गाडगेबाबा।गाडगे हाती घेऊनी ऊभा। स्वच्छता सकला मागतसे॥

‘झ’ वाटतो अर्जून। उभा धनूष्य ताणून । मनोवेध अचूक साधतसे॥

‘ञ’ म्हणजे समर्थ रामदास। दंडूका तयांचा हा खास। मनोभावे त्यास करू वंदन॥

‘ट’ म्हणजे कालीमाता।असूरांचा करी वध आता। चरणावरी माथ टेकवू चला॥

‘ठ’ म्हणजे वाटे जनी। तिचे ते जाते असे बाई।पिठ त्यातून दळू चला॥

‘ड’ म्हणजे असे नारद। उभा दारी शेंडी वर।नारायण जप करीतसे॥

‘ढ’ म्हणजे गोराकुंभार।चाक त्याचे अन् माती त्यावर।आकार मडक्यास देत असे॥

‘ण’ म्हणजे बालाजी रूप। गंध त्याचे सुखवी खूप। श्रीमंतीही वाढवू चला॥

‘त’ म्हणजे देवराज ईंद्र। ऐरावताची ती सरळ सोंड। ऐश्वर्य पाहू डोळाभरी॥

‘थ’ म्हणजे हनूमान।बसला चरणी गदा घेऊन। स्वामीभक्तासही नमू आपण॥

‘द’ असे कोणी योगी। तपश्चर्या करी एका पायावरी। सिद्धी तयास मिळोनी जावो॥

‘ध’ असे हो एकवचनी राम।सज्ज बाण भाता घेऊन। पुन्हा रामयूग मागू चला॥

‘न’ म्हणजे बटू कोणी। आला याचक होऊनी।दान तयास देऊ चला॥

‘प’ म्हणजे सावतामाळी मळ्यातील मचाणावर बसोनी तो राखी मळा॥

‘फ’ म्ह्णजे धन्वंतरी । एका हाती कलश घेऊनी। आरोग्य दान करीतसे॥

‘ब’ म्हणजे तुकाराम। उभे गळ्यात एकतारी घालून । विठ्ठल नाम सदा मुखी॥

‘भ’ म्हणजे बलराज भीम। खांद्यावरी ती गदा घेऊन।शक्तीने तो विजयी होई॥

‘म’ म्हणजे कार्तीकेय। मयूरावर बसून। विश्व प्रदक्षिणेस निघाला॥

‘य’ म्हणजे मीरा भोळी।एकतारी करी घेऊनी।एक पाय्वर घेऊनी बसली असे॥

‘र’ म्हणजे पार्वती देवी।सड्पातळ अन गौर वर्णी।तिजलाही वंदन आता माझे॥

‘ल’ असे हो विष्णूदेव।कमल पुष्पावरी स्वार।तिन्ही लोकांचे नियंत्रण करी॥

‘व’ असेहो सूर्य देव। ऊगवे तो क्षितीजावर।चराचरा चैतन्य देई॥

‘श’ असती विवेकानंद।ऊभे फेटा बांधून।हाताच्या घडीसह चिंतन करती॥

‘ष’ असे सरस्वती देवी।मांडीवरती वीणा ठेऊनी।गान मराठीचे गात असे॥

‘स’ वाटे राधाकृष्ण। ऊभा पाय दुमडून। खांद्यावरी राधा विसावतसे॥

‘ह’ म्हणजे पवनदेव।जोराने ती ऊठे वावटळ।परी सकल विश्व व्यापलेसे॥

‘ळ’ म्हणजे ज्ञानेश्वर।बसले पद्मासन घालून।पसायदान मागती हे॥

‘क्ष’ म्हणजे शंकरदेव।उभे ते डमरू घेऊन।एका हाती त्रिशूळ असे॥

‘ज्ञ’ म्हनजे महिषासूर मर्दिनी।पायी महिषासूर, हाती त्रिशूळ घेऊनी।सकल जनास शांती देई॥

ऐसी सर्व मुळाक्षरे वसती पहा मराठी गृही।बाराखडी सवे त्यास सजवावे॥

करावा त्यांचा आदर।शब्दांस द्यावा आधार।शब्दांगण फुलोनी जाई॥

अक्षरांपासून शब्द बनती।शब्द काव्य अथवा लेखन साकारती।तयातून ग्रंथभांडार निर्मीतसे॥

म्हाणोनी घ्यावी शपथ।वर्णमालेसी कंठात घालेन।तिजला सांभाळेन जन्मभरी॥

उतू नये मातू नये। घेतला वसा टाकू नये।मराठीस करावे आपलीशी॥

प्रसार हिचा करू चला।घट्ट वीण गुंफू चला।मराठीस वंदू मनोभावे॥

बोला पुंडलीक वरदा हारी विठ्ठल।श्री ज्ञानदेव तुकाराम।

पंढरीनाथ महाराज की जय।मराठी माऊलीचा जय॥

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ फलाट… ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

डॉ. जयंत गुजराती

??

☆ फलाट… ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

दुपारची वेळ असूनही फलाट सुमसाम होता. गाडी यायला अजून दोन तासांचा वेळ होता. साडेचारची गाडी साडेचारला येईलच याची शाश्वती नव्हती. तोपर्यंत ताटकळणं आलंच. दिवसातून एकदा पॅसेंजर एकदा या दिशेला, दुसरी त्यादिशेला जायची. असलाच कुणी पॅसेंजर तर घ्यायची पोटात. नाहीतर थांब्याची वेळ तीन मिनिटे संपली की निघायची. तसं चाकांचं रूळावरून धावणं अव्याहत. बाकीच्या गाड्या थांबत नव्हत्या. धडधड धावून जात होत्या. फलाट त्यांच्यासाठी सावकाच.

रणरणत्या उन्हात फलाटावर तो एकटाच. स्टेशन तसं छोटं असल्याने छप्पर ही छोटंच. कौलारू. काही कौलं सुटी झालेली. त्यातून उन्हाची तिरीप फलाटावर येणारी तीही नेमकी बाकावर. बाकं ही मोजकीच. कोपऱ्यात मोठं रांजण लावलेलं आडोशाला.त्याला लाल कपडा गुंडाळलेला. तो मात्र ओला होता. माठातलं गार पाणी घशा खाली ढकललं. तेवढंच बरं वाटलं. जंबूखेडा हे काहीसं वेगळं वाटणारं नाव स्टेशनला. ते नाव लाल रंगाने मोठ्या अक्षरात पाटीवर लिहीलेलं ठळकपणे. स्टेशनच्या दोन्ही बाजूला. जिथून स्टेशनला उतार लागतो.पाटीवर गावाच्या नावाखाली एमएसएल ही लिहीलेलं. मीन सी लेवल नऊशे छत्तीस फूट. अर्थात गाड्यांतून मुशाफिरी करणाऱ्या मुशाफिराला त्या आकड्यांशी काही देणं घेणं नव्हतं. दिवसातून एकदा गाडी येते जाते हेच खूप होतं त्यांच्यासाठी.फलाटही फारसा उंच नव्हताच. सिंगल लाईनवर धावणाऱ्या गाडीसाठी फलाटावर दोन्ही बाजूला रूळ असलेले. कधी अवचित काही घडलं तर मालगाडी वा पॅसेंजरही थांबायच्या बराच वेळ दुसऱ्या रूळावर.       फलाट छोटासाच असल्याने नीटनेटका साफ असलेला. दिवसातून दोन वेळा केर काढला तरी पुरे. माणसांची नियमित ये जाच नसलेली तेव्हा कचरा होणार कसा? डोक्यावरून उन्हं कलली तरी फलाट तापलेलाच. घामाच्या धारांनी चिंब होणं होत असलेलं चिकट चिकट. कौलांवर कावळे तेवढे हजर असलेले. त्यांची काव काव अजून दोन तास ऐकावी लागणार. 

गाव तसं पाच मैल लांब तेही छोटंसंच. पाच पन्नास घरं असतील नसतील. आठवड्यातून एकदा आठवडे बाजार भरतो तेव्हा थोडा फार गलबला होतो गावात. एरवी शांतच. गावातली मंडळी दिवसभर शेतात. रात्रीही निजानिज लवकर घडत असलेली. गावाच्या मध्यावर असलेलं देवीचं देऊळ. त्यात गणपती, मारूती, शंकर पिंडीच्या रूपात, देवी समोर सिंह, शंकरा समोर नंदी सगळे गुण्यागोविंदाने नांदत असलेले. गणपतीला दुर्वा, महादेवाला बेल, देवीला लाल फुल, मारूतीला तेल अजूनही वाहिलं जात असलेलं. गाव अजूनही तसंच वीस पंचवीस वर्षांपूर्वी होतं तसंच. बदल तसा फारसा नाहीच. अनोळखी चेहेऱ्यांची भर पडली इतकंच. गावाच्या ओढीने आलो तर गावातल्या खाणाखुणा तशाच मात्र गाव तसं अनोळखीच. घरोघरी ओट्यावर बसून असलेली म्हातारी मंडळी सोडली तर परिचित असलेलं तसं कुणीच नाही. मुद्दाम ओळख लपवली मग. कुणाचाच विचार करायचा नाही हे पंचवीस वर्षांपूर्वी ठरवलं होतं जेव्हा गाव सोडलं होतं तेव्हा. आताही तेच. वेगळा विचार करणं शक्यच नव्हतं. राहत्या घरात दुसरीच माणसं राहत असलेली. शेत जमीनही गेलेली. नदीचं पाणी तर नेहेमीच आटणारं. जेमतेम चारसहा महिने वाहायची तेव्हा. उन्हाळ्यात कोरडीठाक. आताही तशीच होती कोरडीठाक. गावात मोजक्याच विहीरी. त्यावर निभावून नेलं जाई. तेवढाच ओलावा. येणं तर झालं गावात. पण जीव लावणारं, ओलावा देणारं कुणी उरलंच नव्हतं. 

एक कुत्रं धावत धावत गेलं फलाटावरून. तेही पाहत होतं विचित्र नजरेने. कोण हा पाहुणा? त्याचं धावणं पाहिलंन् आठवलं. असाच धावत येत होतो गावातून. गाडीची वेळ झाली की. मग डोकावून डोकावून पाहणं व्हायचं लांबचलांब रूळांवर. वेळ झाली की वेळेवर वा कधी उशिरा ते यायचंच काळं धुड धडधडत, कोळशाचा काळा धूर ओकत. त्या कोळशाच्या धुराचा वास ही खोलवर घ्यावासा वाटायचा. माथी फडकी बांधून असलेले ड्रायव्हर हीरो वाटायचे. कधीकधी गार्ड, स्टेशनमास्तर व ड्रायवरचे बोलणं व्हायचं. तितकाच वेळ गाडी जास्त थांबायची. तेवढ्यात ही गाडीत चढउतर करून घ्यायचो. गाडी हलली की उडी टाकायची. मग इंजिनकडे पळणं व्हायचं. गाडी बरोबर शर्यत लावणं मजेशीरच असायचं. करवंद, जांभळं विकणाऱ्या मुली हमखास असायच्या. मग तो मेवा चाखत चाखत गावाकडे परतणं व्हायचं.  तेव्हा माहित नव्हतं की एके दिवशी डोक्यात राख घालून याच गाडीतून लांब निघून जाणं होणारेय कायमचं. 

गाडी येण्याच्या अर्धातास अगोदर  स्टेशन मास्तरने खिडकी उघडली. सर्वात अगोदर तिकीट काढून घेतलं. थेट मुंबईचं तिकीट काढल्याने स्टेशन मास्तर अचंबित होऊन बघत होते. मागून आणखी एकाने तिकीट काढलं. बस तेवढाच व्यवहार खिडकीवर झाला. पुन्हा बाकावर येऊन बसलो तर स्टेशन मास्तरही शेजारी येऊन बसले.“ नवीन दिसताय गावात? ” चौकशी केलीच त्याने. “ मी इथलाच. ” इतकंच म्हटलं तर त्याच्या डोळ्यात कोण आश्चर्य उमटलेलं. “ कधी बघितलं नाही? ” तसं मग परवाच्या फ्लाईटचं युएसचं तिकीटच त्याच्या हातात ठेवलं. त्याने ते न्याहाळून लगेच परत केलं. दुसरे तिकीट काढलेला सुटेडबुटेड तरूण दुसऱ्या बाकावर ऐटीत बसला होता. त्याच्या पाया जवळ पागोटं घातलेला म्हातारा बसलेला. त्याचं सारखं टुकूरटुकूर पाहणं चाललेलं. काही वेळानं तो आलाच जवळ. पुन्हा एकदा त्याने निरखून घेतलं. हात जोडून राम राम केला.  “ निंबा पाटलाचा पोर ना रे तू! ” आठवत नव्हतं कोण असावा हा. पण जसं तो बोलला तसं लख्खं आठवलं. ज्याच्या अंगाखांद्यावर खेळलो होतो तो हा धोंडू. आता जख्ख म्हातारा झालेला.  पटकन खाली वाकणं झालं. धोंडूने तर  छातीशीच कवटाळलं. त्याच्या डोळ्यात पाणीच पाणी. “ पहाटेच आलास अन् लागलीच निघाला व्हय मुडद्या. ” गळाच दाटून आला. बोलवेचना त्याच्याने. पाण्याची बाटली धरली तर दोन घोट घेत भडाभडा बोलायलाच लागला. “ घराच्या जोत्या समूर उभं राह्यलं तवाच वळखलं तवास्नी. मालकाचं पोर हाय, लई मोठं झालंस रे! कुटं निगून गेला व्हतास. असं कुनी काय निगून जातं का रागास्नी!  तुजी आई गेली झुरून झुरून तुज्यापायी. आबांनी घर शेती विकली गेलं शहरात. तुजी भाऊ बहिणी कुनी फिरकत नाही गावाकडं. तू कसं येणं केलंस? ” आता माझ्या डोळ्यात पाणी. “ गाव आठवलं. गावाकडची माणसं आठवली. देवीच्या देवळातली शाळा आठवली. अन् हा फलाट आठवला बघ अन् आलो तसाच. ”

बराच वेळ धोंडू बोललाच नाही. नुसतं डोळ्यातनं पाणी.  मग स्वगत म्हटल्यासारखा धोंडू बडबडत राहिला. “ हा माझा नातू गाव सोडून शहरात चाललाय. एकेक करून सोडत चाललेत. गाव गाव नाही राहिलं आता. रयाच गेली. जुनी जिव्हाळ्याची माणसं नाही राहिली. विखरून पडलंय गाव. विसरलं ही जाईल काही दिसांत. ”  धोंडू स्वतःतच हरवत चाललेला. इतक्यात गाडीची  शिट्टी वाजली.  फलाटावर गाडी येऊन दिमाखात उभी राहिली. तसं धोंडूने स्वतःला आवरलं. तसं एकमेकांच्या पुन्हा पाया पडणं झालं. मी धोंडूचा खांदा थोपटत म्हटलं. “ गाडीची वेळ झाली की निघून जावं लागतं. थांबणं होत नाही. ” गाडीने वेग घेतला तसा फलाट मागे पडत गेला. 

© डॉ. जयंत गुजराती

नासिक

मो. ९८२२८५८९७५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “हे सोहळे की देखावे…….” – लेखिका : सुश्री ज्योती चौधरी ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

??

☆ “हे सोहळे की देखावे….…” – लेखिका : सुश्री ज्योती चौधरी ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित

नाना आमचे स्नेही.. परवा त्यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा मोठ्या थाटामाटानं संपन्न झाला खरंतर हा सोहळा त्यांच्या मनाविरुद्धच, कारण त्यांना त्यांचा जन्मसोहळा नव्हे तर 81 वी जीवनयात्रा त्यांच्या ठराविक स्नेह्यांसमवेत  घरी साजरी करायची होती पण मुलांसाठी सुनांसाठी अन नातवंडांसाठी ही एक पर्वणी होती स्वतः चे हितसंबंध जपण्याची ! 

आता बघा नाना रिटायर्ड -80 पूर्ण तर  नानी 75 वर्षाच्या!  तिन्ही मुलं फ्लॅट संस्कृतीत रमणारे, गावातच राहतात अन बैठ्या घरात नाना नानी एकटेच राहतात ! जमत नाही हल्ली स्वयंपाक करणं म्हणून एका मावशींकडचा डबा  सकाळीच येतो. खरं तरं गरमागरम जेवण ही नानांची तरुणपणची आवडच ! 

“ बरेच दिवस झालेत गरमागरम जेवण जेवून “..  चार दिवसापूर्वीच ते नानींना म्हणालेत ! पोळी चावत नाही, भाजी तिखट असते म्हणून नानी मिक्सरमधून  पोळी काढून वरणासोबत देतात. घरकामास अनेक  वर्षांपासून मदतीला असते मालू ! 

आठ दिवसांपूर्वी मुलं सुना सर्वजण नानींकडे जमले, नानींना कोण आनंद झाला. लगेच त्यांनी श्रीखंडाच्या वड्या सर्वांच्या हातावर ठेवल्या. धाकट्या सुनेनं येण्याचं  प्रयोजन सांगितलं .. ‘ आम्हा सगळ्यांना नानांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा करायचाय,’  क्षणभर शांतता.!.

.. हल्ली असले  सोहळे आणि तो दिखावू थाट नाही सहन होत म्हणून नानांनी विषय बंद केला ,नानी म्हणाल्या, ” छान घरी करू साजरा यांचा वाढदिवस, तुमच्या किलबिलाटानं घरं हसेल, आनंदून मोहरेल . यांना आवडेल असे गरमागरम दोन पदार्थ अन् मऊसा वरण- भात- तूप ठेवू, त्यांचे समवयस्क  स्नेही 

बोलवू !”  …..पण नवीन पिढीला नव्या पद्धतीने करायचं होतं सेलिब्रेशन.. परवा नाना-नानींना  सत्कार मूर्ती   बनवून बॅंक्वेट हॉलच्या सजवलेल्या सोफ्यावर बसवलं, नाना कडक सफारीत तर नानी  भारी भक्कम पैठणीत आणि दागिन्यांनी मढवलेल्या..चेहरा थकलेला न् शरीर दमलेलं ! येणारे पाहुणे कुणीच ओळखीचे नसल्यानं आलेली, भेदरलेली भावना ! 

मुलांचे बॉस.. सहकारी.. मित्र मंडळ.. नातवंडांचे कॉलेज कंपू.. सुनांचे किटी ग्रुप्स.. सोशल नेटवर्किंग, यात 250 माणसं झाली  मग झालं काय…नाना अन् नानींचे 8-10 जण ‘ उगीचच वाढतात ‘ म्हणून बोलवले गेलेच  नाहीत..! त्यामुळे सोहळा नक्की कुणाचा याचा नाही म्हटलं तरी नानींना राग आलेला ! बरं दणक्यात सोहळा करायचा तर पदार्थही वेगवेगळे हवेत ! कुणाला चायनीज आवडतं तर कुणाला पंजाबी ..साउथ इंडियन डिशसुद्धा आपली स्टाईल दाखवत होत्या..महाराष्ट्रीयन पदार्थ नेहमीच होतात म्हणून त्यांना सुट्टी दिलेली ! आईस्क्रीम अन्  विविध पदार्थांची  रेलचेल ..पण नाना नानींना गोडबंदी होती, मग खायचं काय..?दात नसलेल्या सत्कारमूर्तींसाठी खाण्याचा पार आनंदच होता ! बरं खाण्याच्या टेबलपर्यंत जायचं कसं? मॅनर्स पाळायला हवेत म्हणून आजी आजोबा गेल्या तीन तासापासून नुसतेच सूप पिवून गप होते ! 

एकदाचा सत्कार सोहळा दिमाखात  संपन्न झाला अन आता रात्रीचे 10:30  झालेत. ‘ जेवण  जात  नाही रे बाबाsss ‘ म्हणत दोघांनी जरासं पुन्हा सूपच घेतलं !  मुलांनी रात्री 11वाजता नानांना  घरीच रिलॅक्स वाटतं म्हणून बैठ्या घरी आणून सोडलं…!

 ….. …. 

सकाळी मालू आली.. जणू सगळं जाणणारी… 

नानांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा याचा नीट उच्चारही करता न येणा-या, न समजणा-या तिनं  मात्र आज त्यांच्या आवडीचा  गरमागरम वरण भात घरून करून  आणला अन् वरून तुपाची धार ओतत ती म्हणाली, 

” माह्या मायबापाले मी तं पायलं नाय जी, पर तुमी मायेनं मले वागोता यातच मले माहे बावाजी भेटले.. माह्याकडून काय द्यावा इचार केल्लो अन् आठोलं तुमाले गरम वरन भात लै आवडते..नानी नं दिवाडीले देल्लेल्या जास्तीच्या  पैशातनं तूप आनलं.. नाई मनू नका जी..! “ 

… काय बोलणार  होते दोघं …. डबडबलेल्या डोळ्यांनी नानींनी नानांना वरण भाताचा घास भरवला.. 

मालू आज दोघांसाठी ख-या अर्थी अन्नपूर्णा होती. ! 

लेखिका : ज्योती चौधरी

प्रस्तुती : स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आई आणि शिकेकाई — ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

आई आणि शिकेकाई — ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

लंडनला प्रथमच लेकीकडे चाललेल्या वर्षाने मला भेटायला बोलावले होते म्हणून गेले होते तिच्याकडे. तिची मुलगी गेली सात आठ वर्षे लंडनला आहे.सगळी तयारी दाखवताना वर्षाने मला स्वतः दळून आणलेली शिकेकाई दाखवली. म्हणाली, “ बघ मी ही गव्हला कचरा, नागरमोथा असं घालून सुगंधी शिकेकाई करून आणलीय. माझ्या नातीचे, लेकीचे केस खूप सुंदर आणि लांबसडक आहेत. छान न्हायला घालीन मी त्यांना या शिकेकाईने.” 

मनात खूप शंका आल्या पण न बोलता घरी परत आले मी. पण मनातून मात्र ती सुगंधी शिकेकाई जाईना. आमची आई अशीच आम्हाला तिने स्वतः केलेल्या सुगंधी शिकेकाईने दर रविवारी न्हायला घालायची. शिकेकाईत नाना वस्तू घालून ती स्वतः गिरणीतून दळून आणायची. डोक्याला लावायचे तेलही ती घरीच तयार करायची. माका आवळा ब्राह्मी असं ते हिरवेगार सुगंधी तेल किती छान असायचे. रविवारचे नहाणे हा मोठा कार्येक्रमच असायचा.

गरम कडकडीत पाण्याने आणि त्या शिकेकाईने आई आम्हाला न्हायला घालायची. टॉवेलने खसखसून केस पुसून मग केस वाळले की ते हिरवे तेल लावून छान वेण्या घालून द्यायची. त्या तेलाने आणि डोक्याच्या मालिशने गुंगी येऊन झोपच यायची मग आम्हाला. त्या सोहळ्याची फार आठवण झाली मला. आता वर्षा लंडनला लेकीला आणि नातीला कशी न्हायला घालते याची खूप उत्सुकता होती मला. 

वर्षा परत आल्याचे समजले आणि मग मी निवांत गेले तिला भेटायला. गप्पा झाल्यावर सहज बघितले तर ते शिकेकाईचे पुडके तसेच पडले होते टेबलावर. न उघडताच. “ काय ग बाई? हे परत कसे आले ? “ मी विचारलं. खिन्न होऊन वर्षा म्हणाली, “ काय सांगू बाई तुला. नात म्हणाली, आजी प्लीज.मी असल्या पावडरने नाही हं केस वॉश करणार. माझा वेगळा शाम्पू असतो तोच चालतो मला. सॉरी ग आजी पण माझा बाथ टब पण किती खराब होईल ना या पावडरने.” तिला दुजोरा देत लेक म्हणाली  “ हो ग आई.आता कसली ग शिकेकाई आणि काय. नुकतेच आम्ही घर रिनोव्हेट केलंय ना. या कार्पेटवर शिकेकाईचे डाग पडले तर? आणि मी आता बॉयकटच केलाय की. काय उपयोग या शिकेकाईचा मला. डाग पडले तर नसता व्याप व्हायचा.” … म्हणून हे बापडे पुडके आले परत माझ्याबरोबर.” उदास होऊन वर्षा मला सांगत होती.

मी म्हटले, “ सखे रागावू नको रुसू नको. दुःखी तर मुळीच होऊ नको बाई . पुढच्या महिन्यात आपण जाणार आहोत ना आदिवासी मुलींच्या कॅम्पला? तिथे दे ही शिकेकाई. अगदी सुस्थळी पडेल बरं ती.” वर्षाच्या चेहऱ्यावर आनंद दाटला. लंडनचा प्रवास करून आलेली शिकेकाई पुढच्याच महिन्यात ठाण्याच्या आदिवासी पाड्यावर सुखाने रवाना झाली. 

आणि अशी ही शिकेकाईची कहाणी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण झाली.

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print