डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

आई आणि शिकेकाई — ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

लंडनला प्रथमच लेकीकडे चाललेल्या वर्षाने मला भेटायला बोलावले होते म्हणून गेले होते तिच्याकडे. तिची मुलगी गेली सात आठ वर्षे लंडनला आहे.सगळी तयारी दाखवताना वर्षाने मला स्वतः दळून आणलेली शिकेकाई दाखवली. म्हणाली, “ बघ मी ही गव्हला कचरा, नागरमोथा असं घालून सुगंधी शिकेकाई करून आणलीय. माझ्या नातीचे, लेकीचे केस खूप सुंदर आणि लांबसडक आहेत. छान न्हायला घालीन मी त्यांना या शिकेकाईने.” 

मनात खूप शंका आल्या पण न बोलता घरी परत आले मी. पण मनातून मात्र ती सुगंधी शिकेकाई जाईना. आमची आई अशीच आम्हाला तिने स्वतः केलेल्या सुगंधी शिकेकाईने दर रविवारी न्हायला घालायची. शिकेकाईत नाना वस्तू घालून ती स्वतः गिरणीतून दळून आणायची. डोक्याला लावायचे तेलही ती घरीच तयार करायची. माका आवळा ब्राह्मी असं ते हिरवेगार सुगंधी तेल किती छान असायचे. रविवारचे नहाणे हा मोठा कार्येक्रमच असायचा.

गरम कडकडीत पाण्याने आणि त्या शिकेकाईने आई आम्हाला न्हायला घालायची. टॉवेलने खसखसून केस पुसून मग केस वाळले की ते हिरवे तेल लावून छान वेण्या घालून द्यायची. त्या तेलाने आणि डोक्याच्या मालिशने गुंगी येऊन झोपच यायची मग आम्हाला. त्या सोहळ्याची फार आठवण झाली मला. आता वर्षा लंडनला लेकीला आणि नातीला कशी न्हायला घालते याची खूप उत्सुकता होती मला. 

वर्षा परत आल्याचे समजले आणि मग मी निवांत गेले तिला भेटायला. गप्पा झाल्यावर सहज बघितले तर ते शिकेकाईचे पुडके तसेच पडले होते टेबलावर. न उघडताच. “ काय ग बाई? हे परत कसे आले ? “ मी विचारलं. खिन्न होऊन वर्षा म्हणाली, “ काय सांगू बाई तुला. नात म्हणाली, आजी प्लीज.मी असल्या पावडरने नाही हं केस वॉश करणार. माझा वेगळा शाम्पू असतो तोच चालतो मला. सॉरी ग आजी पण माझा बाथ टब पण किती खराब होईल ना या पावडरने.” तिला दुजोरा देत लेक म्हणाली  “ हो ग आई.आता कसली ग शिकेकाई आणि काय. नुकतेच आम्ही घर रिनोव्हेट केलंय ना. या कार्पेटवर शिकेकाईचे डाग पडले तर? आणि मी आता बॉयकटच केलाय की. काय उपयोग या शिकेकाईचा मला. डाग पडले तर नसता व्याप व्हायचा.” … म्हणून हे बापडे पुडके आले परत माझ्याबरोबर.” उदास होऊन वर्षा मला सांगत होती.

मी म्हटले, “ सखे रागावू नको रुसू नको. दुःखी तर मुळीच होऊ नको बाई . पुढच्या महिन्यात आपण जाणार आहोत ना आदिवासी मुलींच्या कॅम्पला? तिथे दे ही शिकेकाई. अगदी सुस्थळी पडेल बरं ती.” वर्षाच्या चेहऱ्यावर आनंद दाटला. लंडनचा प्रवास करून आलेली शिकेकाई पुढच्याच महिन्यात ठाण्याच्या आदिवासी पाड्यावर सुखाने रवाना झाली. 

आणि अशी ही शिकेकाईची कहाणी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण झाली.

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
4 2 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments