डॉ. जयंत गुजराती

??

☆ फलाट… ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

दुपारची वेळ असूनही फलाट सुमसाम होता. गाडी यायला अजून दोन तासांचा वेळ होता. साडेचारची गाडी साडेचारला येईलच याची शाश्वती नव्हती. तोपर्यंत ताटकळणं आलंच. दिवसातून एकदा पॅसेंजर एकदा या दिशेला, दुसरी त्यादिशेला जायची. असलाच कुणी पॅसेंजर तर घ्यायची पोटात. नाहीतर थांब्याची वेळ तीन मिनिटे संपली की निघायची. तसं चाकांचं रूळावरून धावणं अव्याहत. बाकीच्या गाड्या थांबत नव्हत्या. धडधड धावून जात होत्या. फलाट त्यांच्यासाठी सावकाच.

रणरणत्या उन्हात फलाटावर तो एकटाच. स्टेशन तसं छोटं असल्याने छप्पर ही छोटंच. कौलारू. काही कौलं सुटी झालेली. त्यातून उन्हाची तिरीप फलाटावर येणारी तीही नेमकी बाकावर. बाकं ही मोजकीच. कोपऱ्यात मोठं रांजण लावलेलं आडोशाला.त्याला लाल कपडा गुंडाळलेला. तो मात्र ओला होता. माठातलं गार पाणी घशा खाली ढकललं. तेवढंच बरं वाटलं. जंबूखेडा हे काहीसं वेगळं वाटणारं नाव स्टेशनला. ते नाव लाल रंगाने मोठ्या अक्षरात पाटीवर लिहीलेलं ठळकपणे. स्टेशनच्या दोन्ही बाजूला. जिथून स्टेशनला उतार लागतो.पाटीवर गावाच्या नावाखाली एमएसएल ही लिहीलेलं. मीन सी लेवल नऊशे छत्तीस फूट. अर्थात गाड्यांतून मुशाफिरी करणाऱ्या मुशाफिराला त्या आकड्यांशी काही देणं घेणं नव्हतं. दिवसातून एकदा गाडी येते जाते हेच खूप होतं त्यांच्यासाठी.फलाटही फारसा उंच नव्हताच. सिंगल लाईनवर धावणाऱ्या गाडीसाठी फलाटावर दोन्ही बाजूला रूळ असलेले. कधी अवचित काही घडलं तर मालगाडी वा पॅसेंजरही थांबायच्या बराच वेळ दुसऱ्या रूळावर.       फलाट छोटासाच असल्याने नीटनेटका साफ असलेला. दिवसातून दोन वेळा केर काढला तरी पुरे. माणसांची नियमित ये जाच नसलेली तेव्हा कचरा होणार कसा? डोक्यावरून उन्हं कलली तरी फलाट तापलेलाच. घामाच्या धारांनी चिंब होणं होत असलेलं चिकट चिकट. कौलांवर कावळे तेवढे हजर असलेले. त्यांची काव काव अजून दोन तास ऐकावी लागणार. 

गाव तसं पाच मैल लांब तेही छोटंसंच. पाच पन्नास घरं असतील नसतील. आठवड्यातून एकदा आठवडे बाजार भरतो तेव्हा थोडा फार गलबला होतो गावात. एरवी शांतच. गावातली मंडळी दिवसभर शेतात. रात्रीही निजानिज लवकर घडत असलेली. गावाच्या मध्यावर असलेलं देवीचं देऊळ. त्यात गणपती, मारूती, शंकर पिंडीच्या रूपात, देवी समोर सिंह, शंकरा समोर नंदी सगळे गुण्यागोविंदाने नांदत असलेले. गणपतीला दुर्वा, महादेवाला बेल, देवीला लाल फुल, मारूतीला तेल अजूनही वाहिलं जात असलेलं. गाव अजूनही तसंच वीस पंचवीस वर्षांपूर्वी होतं तसंच. बदल तसा फारसा नाहीच. अनोळखी चेहेऱ्यांची भर पडली इतकंच. गावाच्या ओढीने आलो तर गावातल्या खाणाखुणा तशाच मात्र गाव तसं अनोळखीच. घरोघरी ओट्यावर बसून असलेली म्हातारी मंडळी सोडली तर परिचित असलेलं तसं कुणीच नाही. मुद्दाम ओळख लपवली मग. कुणाचाच विचार करायचा नाही हे पंचवीस वर्षांपूर्वी ठरवलं होतं जेव्हा गाव सोडलं होतं तेव्हा. आताही तेच. वेगळा विचार करणं शक्यच नव्हतं. राहत्या घरात दुसरीच माणसं राहत असलेली. शेत जमीनही गेलेली. नदीचं पाणी तर नेहेमीच आटणारं. जेमतेम चारसहा महिने वाहायची तेव्हा. उन्हाळ्यात कोरडीठाक. आताही तशीच होती कोरडीठाक. गावात मोजक्याच विहीरी. त्यावर निभावून नेलं जाई. तेवढाच ओलावा. येणं तर झालं गावात. पण जीव लावणारं, ओलावा देणारं कुणी उरलंच नव्हतं. 

एक कुत्रं धावत धावत गेलं फलाटावरून. तेही पाहत होतं विचित्र नजरेने. कोण हा पाहुणा? त्याचं धावणं पाहिलंन् आठवलं. असाच धावत येत होतो गावातून. गाडीची वेळ झाली की. मग डोकावून डोकावून पाहणं व्हायचं लांबचलांब रूळांवर. वेळ झाली की वेळेवर वा कधी उशिरा ते यायचंच काळं धुड धडधडत, कोळशाचा काळा धूर ओकत. त्या कोळशाच्या धुराचा वास ही खोलवर घ्यावासा वाटायचा. माथी फडकी बांधून असलेले ड्रायव्हर हीरो वाटायचे. कधीकधी गार्ड, स्टेशनमास्तर व ड्रायवरचे बोलणं व्हायचं. तितकाच वेळ गाडी जास्त थांबायची. तेवढ्यात ही गाडीत चढउतर करून घ्यायचो. गाडी हलली की उडी टाकायची. मग इंजिनकडे पळणं व्हायचं. गाडी बरोबर शर्यत लावणं मजेशीरच असायचं. करवंद, जांभळं विकणाऱ्या मुली हमखास असायच्या. मग तो मेवा चाखत चाखत गावाकडे परतणं व्हायचं.  तेव्हा माहित नव्हतं की एके दिवशी डोक्यात राख घालून याच गाडीतून लांब निघून जाणं होणारेय कायमचं. 

गाडी येण्याच्या अर्धातास अगोदर  स्टेशन मास्तरने खिडकी उघडली. सर्वात अगोदर तिकीट काढून घेतलं. थेट मुंबईचं तिकीट काढल्याने स्टेशन मास्तर अचंबित होऊन बघत होते. मागून आणखी एकाने तिकीट काढलं. बस तेवढाच व्यवहार खिडकीवर झाला. पुन्हा बाकावर येऊन बसलो तर स्टेशन मास्तरही शेजारी येऊन बसले.“ नवीन दिसताय गावात? ” चौकशी केलीच त्याने. “ मी इथलाच. ” इतकंच म्हटलं तर त्याच्या डोळ्यात कोण आश्चर्य उमटलेलं. “ कधी बघितलं नाही? ” तसं मग परवाच्या फ्लाईटचं युएसचं तिकीटच त्याच्या हातात ठेवलं. त्याने ते न्याहाळून लगेच परत केलं. दुसरे तिकीट काढलेला सुटेडबुटेड तरूण दुसऱ्या बाकावर ऐटीत बसला होता. त्याच्या पाया जवळ पागोटं घातलेला म्हातारा बसलेला. त्याचं सारखं टुकूरटुकूर पाहणं चाललेलं. काही वेळानं तो आलाच जवळ. पुन्हा एकदा त्याने निरखून घेतलं. हात जोडून राम राम केला.  “ निंबा पाटलाचा पोर ना रे तू! ” आठवत नव्हतं कोण असावा हा. पण जसं तो बोलला तसं लख्खं आठवलं. ज्याच्या अंगाखांद्यावर खेळलो होतो तो हा धोंडू. आता जख्ख म्हातारा झालेला.  पटकन खाली वाकणं झालं. धोंडूने तर  छातीशीच कवटाळलं. त्याच्या डोळ्यात पाणीच पाणी. “ पहाटेच आलास अन् लागलीच निघाला व्हय मुडद्या. ” गळाच दाटून आला. बोलवेचना त्याच्याने. पाण्याची बाटली धरली तर दोन घोट घेत भडाभडा बोलायलाच लागला. “ घराच्या जोत्या समूर उभं राह्यलं तवाच वळखलं तवास्नी. मालकाचं पोर हाय, लई मोठं झालंस रे! कुटं निगून गेला व्हतास. असं कुनी काय निगून जातं का रागास्नी!  तुजी आई गेली झुरून झुरून तुज्यापायी. आबांनी घर शेती विकली गेलं शहरात. तुजी भाऊ बहिणी कुनी फिरकत नाही गावाकडं. तू कसं येणं केलंस? ” आता माझ्या डोळ्यात पाणी. “ गाव आठवलं. गावाकडची माणसं आठवली. देवीच्या देवळातली शाळा आठवली. अन् हा फलाट आठवला बघ अन् आलो तसाच. ”

बराच वेळ धोंडू बोललाच नाही. नुसतं डोळ्यातनं पाणी.  मग स्वगत म्हटल्यासारखा धोंडू बडबडत राहिला. “ हा माझा नातू गाव सोडून शहरात चाललाय. एकेक करून सोडत चाललेत. गाव गाव नाही राहिलं आता. रयाच गेली. जुनी जिव्हाळ्याची माणसं नाही राहिली. विखरून पडलंय गाव. विसरलं ही जाईल काही दिसांत. ”  धोंडू स्वतःतच हरवत चाललेला. इतक्यात गाडीची  शिट्टी वाजली.  फलाटावर गाडी येऊन दिमाखात उभी राहिली. तसं धोंडूने स्वतःला आवरलं. तसं एकमेकांच्या पुन्हा पाया पडणं झालं. मी धोंडूचा खांदा थोपटत म्हटलं. “ गाडीची वेळ झाली की निघून जावं लागतं. थांबणं होत नाही. ” गाडीने वेग घेतला तसा फलाट मागे पडत गेला. 

© डॉ. जयंत गुजराती

नासिक

मो. ९८२२८५८९७५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments