डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

☆ खेळ आवरायला हवा… — ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

आद्या आणि डॉली भातुकली खेळत होत्या. खेळून झाल्यावर त्यांनी सगळा खेळ आवरून नीट खोक्यात भरून ठेवला, नीट सगळं आवरलं, प्लेरूम स्वच्छ केली आणि मग अभ्यासाला बसल्या. मी लांबूनच त्यांचा खेळ बघत होते. मनात विचार आला, ‘ किती रंगून जाऊन या मुली खेळत होत्या आणि कंटाळा आल्या बरोबर त्यांनी सगळा खेळ आवरून टाकला.’ 

मग माझ्या मनात असा विचार आला, की ‘ आपण कधी शिकणार असा खेळ आवरायला? चार बुडकुली आणि तीन छोट्या खोल्यात सुरू केलेला संसार आता मोठ्या बंगल्यात आला. तरी आपले अजून भातुकली खेळणे सुरूच आहे की. भातुकलीची भांडी बदलली, खेळाचा पसारा वाढला. खेळगडीही बदलले. तरीही आपण अजूनही त्यातच रंगलो आहोत. वयाची साठी केव्हाच ओलांडून गेली. आता नव्या दमाचे  खेळाडू हा खेळ खेळायला सज्ज झालेत आणि उत्सुकही आहेत. हा खेळ आता देऊया ना त्यांच्या हातात. खेळत असताना आद्याने कुठे मला विचारले, “ आजी मी आता कशी खेळू?”  तिला हवा तसा ती खेळ मांडत होती, मोडत होती, पुन्हा नवीन रचना करून बघत होती.  तिला माझी मदत नको होती. आपणही आता हा डाव आपल्या मुलांच्या हाती देऊया. त्यांना हवी तशी ती त्यांच्या मनाप्रमाणे खेळतील. नव्या रचना करतील, नवे डाव  मांडतील. आपण नको त्यात हस्तक्षेप करायला.  चुकतील, धडपडतील पण कधीतरी बरोबर जागा मिळेलच की त्यांना. आपण आता नको त्यात पडायला. अनुभवाने होतीलच की तीही शहाणी. तो वर बसलेला परमेश्वर आपला हा भातुकलीचा डाव अर्धवट सोडायला लावून कधी आपल्याला हाक मारेल, सांगता येतंय का? आपण आपले आधीच आपलीही खोकी भरून तयारीत असलेले बरे.  कोणी गरजवंताने जर नवा खेळ मांडला असेल तर त्यालाही देऊया ना आपली चार भांडी, नको असलेले पण उत्तम स्थितीतले कपडे, पुस्तके, फर्निचर. नको आता हा ‘अती’चा हव्यास.त्यांनाही मिळू दे खेळ खेळण्यातला आनंद. जुनी ओझी आता नकोत कवटाळायला.’ 

कितीतरी घरातले पक्षी दूरदेशी उडून गेलेत, त्यांना तुमच्या जुन्यापुराण्या वस्तू आणि भांड्याकुंड्याची, अवजड फर्निचरची आणि कशाचीच अजिबात गरज नाहीये. तर मंडळी, आवरता घ्या हा पसारा  खेळ आवरा आणि त्या वरच्या नवीन घराचे कधी बोलावणे येईल तेव्हा हसतमुखाने त्याच्या घरी जायला सज्ज व्हा….. रिकाम्या हाताने .. आणि मनानेही.

खरंच हा खेळ वेळेवर आवरायला हवा …. बघा पटतेय का ? 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments