मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चंदेरी क्षण… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ चंदेरी क्षण… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

आठवांच्या चांदराती मनास मोहत येती

धुंद मधुर क्षणांची गाणी ओठांवर येती || ध्रु ||

 

सूर लाभले श्वासांना स्पंदनांची गाणी झाली

चांदण्याची अविरत रम्य बरसात झाली

रसिक चंद्र हासला लोभस उर्मी येती

धुंद मधुर क्षणांची गाणी ओठांवर येती || १ ||

 

त्या क्षणांचेच चांदणे मनात भरुनी राही

अजूनही लाजणे ते गाली विलसत राही

अंतरात पुन्हा अशी आनंद स्पंदने येती

धुंद मधुर क्षणांची गाणी ओठांवर येती || २ ||

 

तूच चांद हृदयीचा तूच रम्य कोजागिरी

तुझ्या सवे विहरता होई पोर्णिमा साजिरी

ज्योत्स्नेची हो बरसात चैतन्य लहरी येती

धुंद मधुर क्षणांची गाणी ओठांवर येती || ३ ||

 

आठवांच्या चांदराती मनास मोहत येती

धुंद मधुर क्षणांची गाणी ओठांवर येती ||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 138 ☆ अभंग – कधीतरी.!! ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 138 ? 

☆ अभंग – कधीतरी.!!

बदल होतात रस्ते वळतात

झाडे वाळतात, कधीतरी.!!

 

माणूस हसतो माणूस रुसतो

माणूस संपतो, कधीतरी .!!

 

नात्यातला भाव, कमीकमी होतो

आहे तो ही जातो, कधीतरी.!!

 

नदी नाले सर्व, विहीर बारव

आटतात सर्व, कधीतरी.!!

 

वाडे पडतात, वांझोटे होतात

उग्र दिसतात, कधीतरी..!!

 

साडे तीन हात, अखेरचे घर

सासर माहेर, अखेरचे.!!

 

कवी राज म्हणे, शेवट कठीण

लागते निदान, कधीतरी.!!

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विठुमाऊली… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

विठुमाऊली ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆

नाचत नाचत वारी आली

विठ्ठलाच्या द्वारी

कोसळती सरीवर सरी

भक्त रंगला नाम गजरी

 

पांडुरंग सखा भेटला

भक्तीरसात चिंब भिजला

देहभान नाही उरले

ओलेत्याने नाचू लागला

 

हाक ऐकली भक्ताची

कृपा जाहली भगवंताची

नभ मेघांनी भरून आले

अवघे जीवन तृप्त झाले

 

दिन आजचा एकादशी

जलद वाजविती टाळ

सौदामिनीचा पदन्यास

भक्तीत नाचते आभाळ

 

विठुमाऊली भक्तांची

असे भुकेली भावाची

तिचीच आम्ही असू लेकरे

उदरभरणही तीच करे

 

तिच्या कृपेने पाऊस आला

धरणी माता प्रसवली

तिने ठेविला हस्त शिरावर

बीजातून रोपे अंकूरली

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “रान…” ☆ श्री आशिष मुळे ☆

श्री आशिष मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “रान …” ☆ श्री आशिष मुळे ☆

राखून राखून थकशील हे रान

वाकून अन वाकवून

जाईल जळून हिरवे पान

 

राखून राखून थकशील हे रान

अजुन किती निभवशील

कधी-काळीची आन

 

राखून राखून थकशील हे रान

मारून अन् मरुन

खरंच मिळते का जान?

 

राखून राखून थकशील हे रान

वाटे सोडून सगळे

नुसते बागडावे छान

 

राखून राखून थकशील हे रान

कोण रंक अन राव

राखेतच आहे विस्तवाचा मान

 

राखून राखून थकशील हे रान….

© श्री आशिष मुळे

(टीप: रान ही जुनाट प्रथा, परंपरा, भाकड कथा, अंधश्रद्धा यांचं जे रान माजलं आहे त्याला उद्देशून वापरलेली उपमा आहे)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – छत्री म्हणू की… – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– छत्री म्हणू की…– ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

छत्री म्हणू की याला फूल 

मनास पडली माझ्या भूल

इवले इवले नेत्र  तयाला

नकटे नाकही दिसे अनुकूल …. 

छोटीशी जीभ वेडावून  हे

दाखविसे का पर्ज॔न्याला

रक्षणास्तव उभा ठाकूनी

का भिजवीशी म्हणे आम्हाला …. 

नाजुक  इवला जीव परी 

धाडस याचे मोठे बाई

पाऊस पडला जोरात तर

फाटून जाऊ ,तमा ही नाही …. 

तमा कशाला करील वेडे

जीवन तयाचे एक दिसाचे

हासत खेळत  मिस्किलतेने

आनंदात ते जगावयाचे ….. 

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माऊली… ☆ सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ माऊली… ☆ सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर ☆

 पंढरीच्या राऊळात

 रखुमाई संगे नाही

 म्हणे पांडुरंगा मला

 आज सवडच नाही.

 

            देवा तुम्ही उभे रहा

            विटेवरी, दर्शनासी

            साद नका घालू मला

            पळभरी वेळ नाही.

 

 आज सण आषाढीचा

 पाहुण्यांची मांदियाळी

 दिंडी-पालखी, पंढरी!

 गावागावातून आली

 

           फोड फुटले पायाला

           मुखी अभंग या तरी

           चंद्रभागेच्या स्पर्शाचा

           ध्यास आहे मनोमनी!

 

     गुज-गोष्टी करा तुम्ही

     गळा-मिठी, कोणी घाली

     पायावरी ठेवून डोई

     लागे ब्रह्मानंदी टाळी!

   

         तहान-भूक हरपली

         दर्शनाने या भक्तांची

         तृप्ती होईल हो कशी

         गृहिणीच्या या मनाची?

 

   लेकी आल्या माहेरासी

   करू त्यांची सरबराई

   संगे कुटुंब – कबिला

   रांधू-वाढू, गोड काही!

 

          एकादशीचा उपास

          टाळ-चिपळ्या – कीर्तन

          लेकरांच्या मुखी घास

          तेव्हा सुखावेल मन !

©  सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

ही कथा आवडल्यास लेखिकेच्या नावासह आणि कोणताही बदल न करता अग्रेषित करण्यास हरकत नाही.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आम्ही वारकरी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ आम्ही वारकरी…  ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

आम्ही वारकरी  /आमुची पंढरी

नांदतो संसारी  / दृढ भावे

 

अखंड चिंतन / शब्दब्रह्मी लीन

देतसे प्रमाण  / वैराग्याचे

 

घ्यावा समाचार / करावा संसार

प्रेमे चराचर  / आदरावे

 

उदर भरण / नव्हे देव ध्यान

दांभिकाचे मन  / ओळखावे

 

मानावा अभाव  / खोटा भेदभाव

करावा स्वभाव  / मृदुतेचा

 

आत्ममग्न मन  / वैभवाची खाण

विश्वाचे कल्याण  / घ्यावे चित्ती

 

जीवनाचा सार  / सात्विक विचार

दैवी साक्षात्कार / मानावा तो

 

सुखाची ही वारी /पंढरीच्या दारी

संतांची चाकरी /स्वर्ग सुख

 

तुकोबा महान  / करी विवेचन

तोडतो बंधन  / देहाचे या

 

तुकाम्हणे मज  / भेटला विठ्ठल

संसाराचा झोल  / सोडवाया

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 159 – संत जनाई ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 159 संत जनाई ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

दमा कुरुंडाई पोटी

गंगाखेड नगरीत।

स्वयंसिद्ध कवयित्री

जनाबाई जन्म घेत।

 

दमा ठेवी चाकरीस

दामा घरी जनाईस।

विठ्ठलाचे भक्त थोर

नामा भेटे जनाईस।

 

रोज दळण कांडण

शेणपाणी करी जनी।

साथ विठ्ठल भक्तीची

पांडुरंग ध्यानीमनी।

 

जैसा नामा तैसी जनी

सत्ता ज्यांची विठूवरी।

भक्तीसाठी जाते ओढी

शेला सोडून श्रीहरी।

 

ओव्या अभंग रसाळ

नित्य जनाई मुखात।

गावोगावी कीर्ती त्यांची

गुंजे जनमानसात।

 

सामान्यात असामान्य

अशी जनाईची ख्याती

संत कबिरांच्या कानी

गेली जनाईची कीर्ती ।

 

भारी अप्रुप वाटले

आले कबीर भेटीस।

शेण्यासाठी भांडणारी

पडे जनाई दृष्टीस।

 

शेण्यातुनी विठू नाद

कबिरांना ऐकविला।

नाम स्मरणाचा ऐसा

श्रेष्ठ भावार्थ दाविला।

 

एकनिष्ठ शिष्या शोभे

संत श्रेष्ठ नामयास।

देह ठेविला दासीने

नामदेव पायरीस।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ शतजन्मशोधितांना… वि. दा. सावरकर ☆ रसास्वाद : अज्ञात ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? काव्यानंद ?

☆ शतजन्मशोधितांना… वि. दा. सावरकर ☆ रसास्वाद : अज्ञात ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

शत जन्म शोधिताना ।

शत आर्ति व्यर्थ झाल्या ।

शत सूर्यमालिकांच्या ।

दीपावली विझाल्या ॥

तेव्हां पडे प्रियासी ।

क्षण एक आज गांठी ।

सुख साधना युगांची ।

सिद्धीस अंति गाठी ॥

हा हाय जो न जाई ।

मिठी घालू मी उठोनी ।

क्षण तो क्षणांत गेला ।

सखी हातचा सुटोनी ॥

“संन्यस्त खड्ग” ह्या संगीत नाटकांतील हे पद म्हणजे सावरकरांनी लिहिलेल्या अत्त्युच्च पदांमधील एक!! ह्या माणसाच्या प्रतिभेवर साक्षात सरस्वतीने भाळून जावे इतक्या विलक्षण प्रतिभेचा धनी, बौद्धिक संपदा अशी की चक्क कुबेराला आपली पारमार्थिक संपत्ती त्याच्यापुढे फिकी वाटावी, आणि राष्ट्रभक्ती तर अशी की भारतमातेने तिच्या ह्या पुत्राला झालेल्या यातनांनी आसवे गाळावीत तर तिचे अश्रूचं विनायक दामोदर सावरकर ह्या तेजपुंज व्यक्तिमत्वासमोर थिजून जावेत!! स्वातंत्र्यवीर/हिंदूहृदयसम्राट विनायक दामोदर सावरकर म्हणजे अग्निकुंड. अटलजी म्हणायचे तसे सावरकर म्हणजे तितीक्षा, सावरकर म्हणजे तिखट. अशा राष्ट्रपुरुषाला प्रेम काव्य सुचलं तर ते कसे असेल ह्याची दिव्यानुभूती म्हणजे वरील पद!! 

अंदमानातून सुटका झाल्यावर सावरकरांनी रत्नागिरीत स्थानबद्ध असतांना ”संन्यस्त खड्ग“ लिहिले. ह्या नाटकात पात्रे आहेत बुद्ध, विक्रमसिंग, वल्लभ आणि सुलोचना. सुलोचना ह्या पात्राच्या तोंडी हे गीत आहे. सुलोचना ही वल्लभची पत्नी. त्यांच्या लग्नाला जेमतेम काही दिवस झालेले असतात. नवीन-नवीन संसाराची आता कुठे वेल फुलायला लागली असते. एकेदिवशी त्यांचा प्रेमळ संवाद सुरु असतांना अचानक राज्यसभेचा निरोप येतो म्हणून वल्लभ तो प्रेमळ संवाद उमलायच्या आत अर्ध्यावरच सोडून तडक उठून राज्यसभेत निघून जातो. उशिरा केंव्हातरी सैनिक निरोप घेऊन सुलोचनेकडे येतो की सेनापती तर राज्यसभेतूनच थेट रणांगणावर युद्धासाठी गेले आहेत. तेंव्हा सुलोचनेच्या मनात आलेल्या ह्या भावना म्हणजे हे गीत.

आता गंमत बघा सुलोचना ही साधी स्त्री नाहीय. ती कर्तृत्ववान आहे. त्यामुळे ती फक्त प्रेमळ विरह गीत कसे गाईल?? सावरकरांची विलक्षण प्रतिभा बघा . प्रेम विरह गीतात देखील सुलोचनेच्या जाणिवा प्रगल्भ आहेत.तिचे विचार परिपक्व आहेत. अशी दमदार स्त्री जेंव्हा विरह गीत गात असेल ते देखील किती अत्त्युच्च असेल नाही??

शत जन्म शोधिताना ।

शत आर्ति व्यर्थ झाल्या ।

शत सूर्यमालिकांच्या ।

दीपावली विझाल्या ॥

सुलोचना म्हणते माझा प्रियकराचा शोध हा जन्मोजन्मांचा आहे. माझ्या ह्या शोधापुढे ‘शत’ आर्ति (दुःख, पीडा) व्यर्थ आहेत, आणि ह्यात सुलोचनेने कशाची आहुती दिली आहे तर शत सूर्य मालिकांच्या दीपावलीची.  म्हणजे सामान्य माणसांप्रमाणे सुलोचनेची दीपावलीची पणती ही मातीची नाहीय तर ती आहे शंभर सूर्यमालिकेची!! कल्पना देखील किती भव्य असावी??

तेव्हां पडे प्रियासी ।

क्षण एक आज गाठी ।

सुख साधना युगांची ।

सिद्धीस अंति गाठी ॥

प्रियकर मिलनाचे सायास तिला (सुलोचना) कष्टप्रद तपश्चर्येसारखे वाटत नाहीत.  तिच्यासाठी तर ही आनंदाने केलेली साधना आहे, जिची सिद्धी आता कुठे तिने ’गाठली’ आहे. सावरकरांची शब्दप्रभू संपन्नता बघा गांठी (गाठभेट) आणि गाठी (पोचणे किंवा गाठणे) काय भन्नाट यमक त्यांनी जुळविले आहे!!

हा हाय जो न जाई ।

मिठि घालु मी उठोनी ।

क्षण तो क्षणांत गेला ।

सखी हातचा सुटोनी ॥

पुढे सुलोचना म्हणते नुकतीच तर आमची भेट झाली आहे. त्याला (वल्लभाला) मिठी मारायला म्हणून मी उठले तर, तर तो क्षण एका क्षणात माझ्या हातून सुटून गेला, संपून गेला!! पु.ल.देशपांडे ह्यांनी म्हटल्याप्रमाणे ह्या एका ओळीसाठी सावरकरांना खरोखर साहित्यातील नोबेल पुरस्कार द्यायला हवा.

सावरकरांची अनेक रूपं मला आवडतात. विज्ञानाधिष्ठित सावरकर, शब्दप्रभू सावरकर, लढवय्ये सावरकर, कवी सावरकर, लेखक सावरकर, सामाजिक चळवळीचे प्रणेते सावरकर, ब्रिटिशांवर तुटून पडलेले सावरकर, धाडसी सावरकर, राष्ट्रासाठी आपल्या घराची राखरांगोळी केलेले सावरकर. एक मनुष्य त्याच्या सबंध आयुष्यात कदाचित परमेश्वरही घेण्यास धजावणार नाही इतकी जाज्वल्य रूपं घेऊ शकतो?? आणि ह्या प्रतिभावान आत्म्याला आपण करंटे भारतीय एका जातीत तोलून त्याला माफीवीर म्हणतो?? ह्याहून करंटा समाज कुठल्या तरी देशात असेल. सावरकरांच्या त्या जाज्वल्य आयुष्यातील धगधणाऱ्या अग्निकुंडातील एकतरी अग्निशिखा होण्याचे सौभाग्य मिळाले तरी एखाद्याचा जन्म सत्कारणी लागायचा. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांना शतशः नमन!!

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ परवा अचानक… कवयित्री : इरावती ☆ प्रस्तुती डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ परवा अचानक… कवयित्री : इरावती ☆ प्रस्तुती डॉ. ज्योती गोडबोले 

परवा अचानक मी मेले

आणि चक्क स्वर्गात गेले 

म्हटलं चला पृथ्वीवरच्या

कटकटीतून सुटले

 

स्वर्गात मला माझे

बरेच आप्त भेटले.

संध्याकाळी विचार केला

जरा फेरफटका मारू

स्वर्गाचा आनंद लुटण्यासाठी

पाय मोकळे करू

 

पहिल्याच वळणावर मला

विंदा आणि बापट भेटले

त्यांना पाहून अवाक् झाले

शब्दच माझे मिटले.

 

मला पाहिल्यावर बापट

छान मिश्कील हसले

विंदा म्हणाले याच्या या

हसण्यावरच सगळे फसले.

 

मी नमस्कार केल्यावर

हळूच म्हणाले विंदा

ज्ञानपीठ पुरस्काराचा म्हणे

क्रायटेरिया बदललाय यंदा.

 

मी म्हटलं मी काय बोलणार

मी तर एक सामान्य वाचक

तुमच्या साहित्य पंढरीतला

एक साधासुधा याचक.

 

पुढच्या वळणावरच्या बाकावर 

गडकरी होते बसले

त्यांच्या शेजारी गप्पा मारताना

बालकवी अन् मर्ढेकर दिसले

 

तशीच गेले पुढे

करीत मजल दरमजल

छोट्याशा पारावर होते

सुरेश भट अन् त्यांची 

भन्नाट गझल!!!

 

पुढे एका कल्पवृक्षाखाली

सावरकर होते बसले

मी नमस्कार करताच

हात उंचावून हसले

 

म्हणाले मला,” कसा आहे

माझा भारत देश?

मला दूर नेणा-या सागराचा

तसाच आहे का अजून उन्मेष?”

 

त्यांच्या बलिदानाची आम्ही

काय ठेवलीय किंमत 

हे त्यांना सांगायची

मला झालीच नाही हिंमत.

 

तशीच पुढे गेले तर

गडबड दिसली सारी

कोणत्यातरी समारंभाची

चालली होती तयारी.

 

कोणी बांधीत होते तोरण

कोणी रचित होते फुलं

स्वागतगीताची तयारी 

करीत होते पु ल.

 

पुढं होऊन नमस्कार केला

म्हटलं, ‘कसली गडबड भाई?

विशेष काय आहे इथे? 

कसली चालल्ये घाई?’

 

पुल म्हणाले उद्या आहे

इथं मोठा सोहळा

त्याच्यासाठी थोडासा

वेळ ठेव मोकळा.

 

डोळे मिचकावून भाई म्हणाले

उद्या आहे शिरवाडकरांचा बर्थ डे

तुमच्या भाषेत सांगायचं म्हणजे

उद्या आहे मराठी भाषा डे!!

 

असं नाही हं भाई

मी म्हणाले हसून

मराठी दिनाला आम्ही

‘दिन’ च म्हणतो अजून.

 

अरे वा! पुढे येऊन

म्हणाल्या बहिणाबाई

आसं दिवस साजये करून

व्हतंय का काही?

 

एक दिस म-हाटी तुम्ही 

वरीसभर करता काय?

एक दिस पंचपक्वान्न

पन वरीसभर उपाशी

असती तुमची माय!!! 

कवयित्री  : इरावती

संग्रहिका : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print