श्रीमती उज्ज्वला केळकर

? काव्यानंद ?

☆ शतजन्मशोधितांना… वि. दा. सावरकर ☆ रसास्वाद : अज्ञात ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

शत जन्म शोधिताना ।

शत आर्ति व्यर्थ झाल्या ।

शत सूर्यमालिकांच्या ।

दीपावली विझाल्या ॥

तेव्हां पडे प्रियासी ।

क्षण एक आज गांठी ।

सुख साधना युगांची ।

सिद्धीस अंति गाठी ॥

हा हाय जो न जाई ।

मिठी घालू मी उठोनी ।

क्षण तो क्षणांत गेला ।

सखी हातचा सुटोनी ॥

“संन्यस्त खड्ग” ह्या संगीत नाटकांतील हे पद म्हणजे सावरकरांनी लिहिलेल्या अत्त्युच्च पदांमधील एक!! ह्या माणसाच्या प्रतिभेवर साक्षात सरस्वतीने भाळून जावे इतक्या विलक्षण प्रतिभेचा धनी, बौद्धिक संपदा अशी की चक्क कुबेराला आपली पारमार्थिक संपत्ती त्याच्यापुढे फिकी वाटावी, आणि राष्ट्रभक्ती तर अशी की भारतमातेने तिच्या ह्या पुत्राला झालेल्या यातनांनी आसवे गाळावीत तर तिचे अश्रूचं विनायक दामोदर सावरकर ह्या तेजपुंज व्यक्तिमत्वासमोर थिजून जावेत!! स्वातंत्र्यवीर/हिंदूहृदयसम्राट विनायक दामोदर सावरकर म्हणजे अग्निकुंड. अटलजी म्हणायचे तसे सावरकर म्हणजे तितीक्षा, सावरकर म्हणजे तिखट. अशा राष्ट्रपुरुषाला प्रेम काव्य सुचलं तर ते कसे असेल ह्याची दिव्यानुभूती म्हणजे वरील पद!! 

अंदमानातून सुटका झाल्यावर सावरकरांनी रत्नागिरीत स्थानबद्ध असतांना ”संन्यस्त खड्ग“ लिहिले. ह्या नाटकात पात्रे आहेत बुद्ध, विक्रमसिंग, वल्लभ आणि सुलोचना. सुलोचना ह्या पात्राच्या तोंडी हे गीत आहे. सुलोचना ही वल्लभची पत्नी. त्यांच्या लग्नाला जेमतेम काही दिवस झालेले असतात. नवीन-नवीन संसाराची आता कुठे वेल फुलायला लागली असते. एकेदिवशी त्यांचा प्रेमळ संवाद सुरु असतांना अचानक राज्यसभेचा निरोप येतो म्हणून वल्लभ तो प्रेमळ संवाद उमलायच्या आत अर्ध्यावरच सोडून तडक उठून राज्यसभेत निघून जातो. उशिरा केंव्हातरी सैनिक निरोप घेऊन सुलोचनेकडे येतो की सेनापती तर राज्यसभेतूनच थेट रणांगणावर युद्धासाठी गेले आहेत. तेंव्हा सुलोचनेच्या मनात आलेल्या ह्या भावना म्हणजे हे गीत.

आता गंमत बघा सुलोचना ही साधी स्त्री नाहीय. ती कर्तृत्ववान आहे. त्यामुळे ती फक्त प्रेमळ विरह गीत कसे गाईल?? सावरकरांची विलक्षण प्रतिभा बघा . प्रेम विरह गीतात देखील सुलोचनेच्या जाणिवा प्रगल्भ आहेत.तिचे विचार परिपक्व आहेत. अशी दमदार स्त्री जेंव्हा विरह गीत गात असेल ते देखील किती अत्त्युच्च असेल नाही??

शत जन्म शोधिताना ।

शत आर्ति व्यर्थ झाल्या ।

शत सूर्यमालिकांच्या ।

दीपावली विझाल्या ॥

सुलोचना म्हणते माझा प्रियकराचा शोध हा जन्मोजन्मांचा आहे. माझ्या ह्या शोधापुढे ‘शत’ आर्ति (दुःख, पीडा) व्यर्थ आहेत, आणि ह्यात सुलोचनेने कशाची आहुती दिली आहे तर शत सूर्य मालिकांच्या दीपावलीची.  म्हणजे सामान्य माणसांप्रमाणे सुलोचनेची दीपावलीची पणती ही मातीची नाहीय तर ती आहे शंभर सूर्यमालिकेची!! कल्पना देखील किती भव्य असावी??

तेव्हां पडे प्रियासी ।

क्षण एक आज गाठी ।

सुख साधना युगांची ।

सिद्धीस अंति गाठी ॥

प्रियकर मिलनाचे सायास तिला (सुलोचना) कष्टप्रद तपश्चर्येसारखे वाटत नाहीत.  तिच्यासाठी तर ही आनंदाने केलेली साधना आहे, जिची सिद्धी आता कुठे तिने ’गाठली’ आहे. सावरकरांची शब्दप्रभू संपन्नता बघा गांठी (गाठभेट) आणि गाठी (पोचणे किंवा गाठणे) काय भन्नाट यमक त्यांनी जुळविले आहे!!

हा हाय जो न जाई ।

मिठि घालु मी उठोनी ।

क्षण तो क्षणांत गेला ।

सखी हातचा सुटोनी ॥

पुढे सुलोचना म्हणते नुकतीच तर आमची भेट झाली आहे. त्याला (वल्लभाला) मिठी मारायला म्हणून मी उठले तर, तर तो क्षण एका क्षणात माझ्या हातून सुटून गेला, संपून गेला!! पु.ल.देशपांडे ह्यांनी म्हटल्याप्रमाणे ह्या एका ओळीसाठी सावरकरांना खरोखर साहित्यातील नोबेल पुरस्कार द्यायला हवा.

सावरकरांची अनेक रूपं मला आवडतात. विज्ञानाधिष्ठित सावरकर, शब्दप्रभू सावरकर, लढवय्ये सावरकर, कवी सावरकर, लेखक सावरकर, सामाजिक चळवळीचे प्रणेते सावरकर, ब्रिटिशांवर तुटून पडलेले सावरकर, धाडसी सावरकर, राष्ट्रासाठी आपल्या घराची राखरांगोळी केलेले सावरकर. एक मनुष्य त्याच्या सबंध आयुष्यात कदाचित परमेश्वरही घेण्यास धजावणार नाही इतकी जाज्वल्य रूपं घेऊ शकतो?? आणि ह्या प्रतिभावान आत्म्याला आपण करंटे भारतीय एका जातीत तोलून त्याला माफीवीर म्हणतो?? ह्याहून करंटा समाज कुठल्या तरी देशात असेल. सावरकरांच्या त्या जाज्वल्य आयुष्यातील धगधणाऱ्या अग्निकुंडातील एकतरी अग्निशिखा होण्याचे सौभाग्य मिळाले तरी एखाद्याचा जन्म सत्कारणी लागायचा. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांना शतशः नमन!!

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments