मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शब्दसुमनांजली: गानकोकिळ स्व. लतादीदी ☆ श्रीशैल चौगुले

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ शब्दसुमनांजली: गानकोकिळ स्व. लतादीदी ☆ श्रीशैल चौगुले ☆

शब्द हे होतील अश्रू

गातील गीत लतांचे

कोकीळ एक अमर

वचने सत्य गीतां चे.

युगात कुणी जन्मती

एक असे देशा पुण्य

सप्तस्वर विणामाता

जगी नसावे अनन्य.

सरस्वतीचा साक्षात

ध्वनी मधुर लहर

पंचभुतही तल्लीन

सृष्टीस  जणू बहर.

दिशात नाद चौफेर

कृष्णाची साद राधेस

प्रफुल्ल प्रहर सांज

मोह तो चंद्रसुधेस.

अरुण प्रभा भूवरी

स्मरण नित्य प्रजेत

तार छेडता थेंबांनी

अश्रूत काव्य पुजेत.

भावांजली समर्पित

ऐरण प्रसन्न करी

वृक्षवल्ली सोयरिक

जना मुक्ता ‘लता’ खरी.

 

शब्दसमर्पण श्रध्दांजली.??

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ संक्रांत ….अशीही ☆ श्रीमती अनुराधा फाटक

श्रीमती अनुराधा फाटक

? कवितेचा उत्सव ?

☆ संक्रांत ….अशीही ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

 

संक्रांत ….अशीही

पुन्हा आली संक्रांत….

बेफिकीर वागणाऱ्यांच्यावर

घरातील सात्त्विक जेवण सोडून

हॉटेलमध्ये जाऊन

जिभेचे चोचले पुरवणाऱ्याच्यावर !

पुन्हा आली संक्रांत

श्रीमंतीचे प्रदर्शन

करणाऱ्यांच्यावर

कधीतरी मरायचेच आहे

असा विचार करत

बेमुर्वत जगणाऱ्यांच्यावर !

पुन्हा आली संक्रांत

आपण कुणाचे देणे लागत नाही असे समजून

समाजभान विसरून

स्वतःसाठीच जगणाऱ्यांच्यावर!

 © श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 124 ☆ गळ्यातला फास ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 124 ?

☆ गळ्यातला फास ☆

मी साधा कागद

कुणी लिहितो चार शब्द

माझ्या काळजावर

त्याच्या काळजातल्या संवेदनांचे

आपल्याच प्रियेसाठी

काळजातले ते कोरडे शब्द

त्यालाच भावत नाहीत

मग

राग निघतो माझ्यावर

माझा देहाचा चोळामोळा करून

टाकतो डस्टबिनमध्ये

आणि घेतो दुसरा कागद…

 

बालमित्रा तू तर

खूप मोठं काम केलंस

फक्त दोन काड्या जोडून

मला पार आकाशात नेलंस

भाताने चिटकवल्यास

कागदावर काड्या

वापरला होतास

साधा पुड्यांचा दोरा

आज आहेस निरागस

उद्या होशील मोठा

पतंग छाटण्याच्या नादात

वापरशील नायलॉन दोरा

मला वरती उडताना पाहून

पाहिजे तेवढा हास

फक्त होऊ नकोस रे

कुणाच्या गळ्यातला फास

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव  ☆ शब्दसुमनांजली – स्वरलतादीदी ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे

सुश्री उषा जनार्दन ढगे

 ? कवितेचा उत्सव  ? 

☆ शब्दसुमनांजली – स्वरलतादीदी ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे ☆ 

आगमनसमयी वसंत ऋतूच्या

    कोकिळेचा तो सूर हरवला

स्वर..सम्राज्ञीच्या कंठातला

    दशकानुदशके मनांत जपलेला..

 

गानकोकिळा..गानसरस्वती

    नावभूषणें असती तिची किती

भारतरत्नही ती शान देशाची

    तीच सूरांची महासम्राज्ञी होती..

 

चेहेर्‍यावरी सुहास्य सस्मित

    साधीच होती तिची रहाणी

दोनही खांद्यांवरी पदर सावरीत

   अदबीने सजली दीदीची गाणी..

 

ज्येष्ठ सुकन्या मंगेशकरांची

    किती गावी तरी तिची थोरवी ?

ज्यांची गाणी लतादीदीने गायिली

    ते जाहले भारतातील महाकवि..

 

नित्य देतच राहिली जगताला

    स्वर्गीय स्वरांची अपूर्व अनुभूती

सूरासूरांतून जोडीत राहिली

    मनांशी भावनिक आत्मिक नाती..

 

तिच्या आवाजातील माधुर्याने

     शब्दांसही रत्नांचे मुकुट चढले

निःशब्द भावनांना त्या सजविले

    ते शब्दचि आज ओठी मुके जाहले..

 

गीत गाण्यांनी मंत्रमुग्ध केले

    कानसेनांचे कान तृप्त जाहले

ठेविला ठेवा अजरामर गीतांचा

    परि जग सूरांचे आज पोरके झाले..

 

गानसम्राज्ञ्री आज ही भारताची

    अलविदा करूनी सोडूनी गेली

रफी मुकेश तलत किशोरदांसंगे

    स्वर्गात आज हो महेफिल सजली..

 

तपस्विनी एक शारदास्वरुप

    सफल झाली तिची आराधना

श्वासात हळहळले गिळले हुंदके

    शोक न आवरे आजि रसिक जनांना..

 

कितीक तर्‍हेची गीते आळविली

    सप्तसूरांनीच आकंठ भिजलेली

आज आलाप कातरतोय मनांत

    लतादीदींच्या चरणी अर्पिते मी श्रध्दांजली..!

 

© सुश्री उषा जनार्दन ढगे

०६-०२-२०२२

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ एक तीळ… ☆ सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ एक तीळ…. ☆ सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

     एक एवढासा तीळ

    तीळ तीळ तुटतो जेव्हा

    जीव कोणाचा कोणासाठी तरी

    तीळभर दु: खही घ्यावे तसेच

    तीळभर सुखही द्यावे तसेच

 

         गहूभर कोणी पुढे जातो

         तीळभर मागे येतो

         गहूभर यशासाठी जेव्हा

         तीळभर दु:ख सोसत राहतो

         दु:ख सोसत राहतो, सुखाच्या आशेने

         एवढासा तीळ —

 

     एक एवढासा तीळ–

     साखरपाकात घोळतो

     तळहातावर विसावतो

     जिभेवर विरघळतो जेव्हा

     गोड बोलावर तेव्हा

     गोड पण टोचणारे काटे असतात

 

              एक एवढासा तीळ —

              गोड होतो तेव्हा

              तीळ तोंडात भिजला नाही तरी चालेल

              तिळा तिळा दार उघड म्हंटल्याने

              मनाची दारे सताड उघडतात

              तेव्हा तो तीळगूळ आपल्यासाठी असतो

              आणि आपण सर्वांसाठी असतो.

 

©️ सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 68 ☆ आयुष्य अष्टाक्षरी…. ☆ महंत कवी राज शास्त्री

महंत कवी राज शास्त्री

? साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 68 ? 

आयुष्य अष्टाक्षरी…. ☆

कसे असावे आयुष्य

याचा विचार करावा

शांत वृत्ती मन शुद्ध

संग चांगला असावा…!!

 

संग चांगला असावा

क्षण इथे महत्वाचा

वेळ थांबत नाहीच

घ्यावा माग अनेकांचा…!!

 

घ्यावा माग अनेकांचा

दृष्टी असावी सोज्वळ

मित भाष्य प्रेमभाव

मनी नसावा कश्मळ…!!

 

मनी नसावा कश्मळ

स्नेह भावना जपावी

घ्यावा निरोप सप्रेमे

अशी तयारी असावी…!!

 

अशी तयारी असावी

राज माझ्या मनीचे

उक्त केले सहज मी

जपा बंध जीवनाचे…!!

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ देव तारी त्याला…. ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

डॉ. ज्योती गोडबोले

 

? मनमंजुषेतून ?

☆ देव तारी त्याला…. ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

देव तारी त्याला।

सत्य हे कल्पिता पेक्षा अद्भुत असते, याचा अनुभव आम्ही डॉक्टर मंडळी, रोजच्या आयुष्यात घेतच असतो.

काहीवेळा छातीठोकपणे सांगितलेले  अंदाज सपशेल चुकतात आणि काहीवेळा हताश होऊन सोडून दिलेले निदान साफ चुकते आणि रुग्ण खडखडीत बरे होतात.

माझ्या हॉस्पिटलमध्ये एक रात्री अचानक एक patient प्रसूतीसाठी आली. तिने नावनोंदणीही केलेली नव्हती.

 दुसरीच माझी patient तिला घेऊन आली होती.

मी  patient ला टेबलवर घेतले,तपासले.

तरुण मुलगी होती ती.

खूप रक्तस्त्राव झाला होता आणि जेमतेम सातवा महिना असेल नसेल.

प्रश्न विचारत बसण्याची ती वेळच नव्हती.

मी सर्व उपचार लगेच सुरू केले तिच्या नवऱ्याला रक्तपेढीत रक्त  आणायला पाठवले.पैसेही मीच दिलेत्याला. होते कुठे त्याच्या जवळ काहीच.

तिला saline लावले,योग्य ते उपचार सुरू केले.तोपर्यन्त त्याने रक्ताची  बाटलीही आणली होती.

तिला चांगल्या वेदना सुरू झाल्या आणि ती सुखरूप प्रसूत झाली.

मी ते मूल जेमतेम बघितले आणि त्या बाईंचे bp नीट आहे ना,रक्तस्त्राव कमी झालाय ना यात गुंतले ते मूल आमच्या  नर्सबाईने नीट गुंडाळून ठेवले. क्षीण आवाजात त्याने आपण आहोत ही ग्वाही दिली मीत्याच्या कडे वळले मुलगा होता तो.वजन 1000 ग्रॅम.

अगदी अपुरी,,वाढ आणि  बिचारे ते बाळ धाप लागली म्हणून कण्हत होते.

मी बाहेर आले,तिच्या नवऱ्याला म्हटले तुमची बायको वाचलीय पण हे एव्हढेसे अपुऱ्या दिवसाचे बाळ जगणे फार अवघड आहे हो तुम्ही त्याला आमच्या बाळाच्या डॉक्टर च्या हॉस्पिटल मध्ये दाखल करा तरच काही आशा आहे याची.

त्यांनी   आपापसात चर्चा केली.

बाई आमच्याकडे एवढे पैसे नाहीत त्याला काचेच्या पेटीत ठेवावं लागंल ना.

मी  आता मात्र चिडले आणि म्हणाले या मुलीची हेळसांड केलीतच पण आता हे बाळ तरी वाचवायचा  प्रयत्न नको का करायला.

कसली हो माणसे आहात तुम्ही आत्ता लगेच दाखल करा याला ते जगायची शक्यता अगदी थोडी आहे पण तरीही न्या त्याला मग ते त्याला घेऊन गेले आणि  बाळाच्या हॉस्पिटल मध्ये ते मूल भरती झाले मला लगेच आमच्या बालरोगतज्ञांचा फोन.

अग बाई, हे किती गंभीर स्थितीतले बाळ आहे कल्पना दिली आहेस ना, की हे वाचण्याचे  चान्सेस 10 टक्के पण नाहीत.

मी हो म्हणाले,त्यांनीही सर्व परिस्थितीची कल्पना नातेवाईकांना दिली, आणि उपचार सुरु झाले.

ते मूल 3 आठवडे तिकडे होते.आमचे बाळाचे डॉक्टर म्हणाले जगणार बर का ते मूल पण मंद बुद्धी होतेय की काय अशीही भीती असतेच ,या केसेस मध्ये

तशी स्पष्ट कल्पना दिलीय मी त्याच्या आईवडिलांना.

 या गोष्टीला खूप वर्षे झाली.निदान पंचवीस तरी.

किती तरी घडामोडी झाल्या आमच्याही आयुष्यात.

माझी मोठी मुलगी लग्न होऊन परदेशी गेली बाळाच्या डॉक्टरांचा मुलगाही डॉक्टर झाला.

एक दिवस माझ्या दवाखान्यात, एक पोलीस जीप थांबली झाले..दवाखान्यासमोर गर्दीच झाली.

बाईंच्या दवाखान्यात पोलीस कसे?

मीही घाबरूनच गेले, की काय बुवा भानगड झाली.. जीप मधून एक उमदा पोलीस इन्स्पेक्टर उतरला.

आत येऊ का बाई?

होहो या ना. मी म्हटले बसा, बसा.

माझ्याकडे काय काम काढले.

हे बघा,भीतीच वाटते बर का पोलिस बघितले की.

आम्ही डॉक्टर असलो तरी,एक ठोका चुकतोच.

तो हसला,आणि बाहेर जमलेल्या गर्दीला क्षणात  पिटाळून लावले.  आत आला आणि चक्क माझ्या पाया पडला. अहो अहो, हे काय करताय प्लीज असे नका करू, मी ओळखत नाही तुम्हाला.

बाई ,तुमचा पत्ता शोधत आलोय बघा माझ्या आईने मला पाठवलंय तुम्हाला आठवतंय का, त्या एका तरुण मुलीला तुम्ही वाचवले आणि ते  बाळ दुसऱ्या  दवाखान्यात पाठवले?

आता मला आठवले,होय हो,आठवले तर.

काय हो ते मूल. कोबीच्या गड्ड्या एवढे होते हो चिमुकले.पण त्याचे,आता काय?

तो हसला आणि म्हणाला,तोच कोबीचा   गड्डा तुमच्या समोर उभा आहे.

तुम्ही आणि त्या डॉक्टर साहेबानी वाचवलेले ते मूल म्हणजे मीच.

तुम्ही मला जीवदान दिलेत बाई.

माझी आई रोज तुमची आठवण काढते म्हणते, तुझा बाप  तयारच नव्हता  तुला ऍडमिट करायला.

ती बाई देवासारखी उभी राहिली खूप रागावली तुझ्या आजीला,बापाला मग केले तुला ऍडमिट नाहीतर कसला जगणार होतास  रे तू बाळा.

बाई,तुमचा पत्ता शोधत आलो.

खूप हाल काढले हो आम्ही मी आणि आईनी.

बाप मी लहान असताना  शेतात साप चावून वारला.

माझ्या आईने लोकांची धुणीभांडी करून मला मोठाकेला.

मी बीकॉम झालो,आणि मग  mpsc पास केली तुमच्या कृपेने पोलीस इन्स्पेक्टर झालो मी तर अवाकच झाले हे ऐकून.

म्हटले,अहो,मी काय केलेय सगळे कष्ट तुम्हा माय लेकराचे आहेत हो आणि बाळा,तूजगलास,  ती त्या परमेश्वराचीच कृपा.

माझ्या डोळ्यातून आणि त्याच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले म्हणाला,माझे लग्न आहे पुढच्या महिन्यात आई म्हणाली बाईना आणि बाळाच्या डॉक्टरांना अवश्य बोलवायचे.

त्यांनी दुनिया दाखवली तुला बाबा.

बाई,गावाला लग्न आहे.

मी जीप पाठवीन  तुम्ही ,आणि ते डॉक्टर यायलाच  पाहिजे माझ्या हातात मोठी पेढ्याची बॉक्स आणि एक भारी साडी ठेवून तो निघून गेला.

मी आणि  आमचे मुलांचे डॉक्टर, मुद्दाम त्याच्या लग्नाला,आवर्जून गेलो.

त्याच्या आईला ,आम्हाला बघून आभाळ  ठेंगणे झाले .

आम्हालाही खूप  आनंद झाला ते लक्ष्मी नारायणा सारखे जोडपे बघून आम्हाला गहिवरूनच आले.

मुलांचे डॉक्टर मला  म्हणाले, अग, या  पोरा बरोबरच एक चांगले 8 पौंडी मूल  ऍडमिट झाले होते.

ते काहीही कारण नसताना दगावले बघ.

आणि देवाचे तरी आश्चर्य बघ हे आपण आशा सोडलेले पोर, आज किती मोठे झाले.

देवाची लीला अगाध आहे हेच खरे ग बाई.  त्या दोघांना  आशीर्वाद देऊन, ते नकोनको म्हणत असतानाही भरपूर आहेर,करून आम्ही परतलो.

 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आता उतार….अनिल अवचट ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

आता उतार….अनिल अवचट ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

आता उतार सुरू

किती छान

चढणे ही भानगड नाही

कुठलं शिखर जिंकायचं नाही

आता नुस्ता उतार

समोरचं झाडीनं गच्च  भरलेलं दृश्य,

दरीतून अंगावर येणारा

आल्हाददायक वारा,

कधी धुकं, तर कधी ढगही..

टेकावं वाटलं तर टेकावं

एखाद्या दगडावर..

बसलेल्या छोट्या पक्ष्याशी

गप्पा माराव्यात,

सुरात सूर मिसळून…

अरे, हे सगळं इथंच होतं?

मग हे चढताना का नाही दिसलं?

पण असू दे

आता तर दिसतंय ना

मजेत बघत

उतरू हळूहळू

मस्त मस्त उतार

 

 – श्री अनिल अवचट

प्रस्तुती  श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – ३३ – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – ३३– रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

 

[१४९]

बुरखा पांघरून

ही सावली

किती नकळत

प्रकाशाच्या मागून

जातच रहाते

प्रेमाच्या पावलांचा

आवाजाही न करता

 

[१५०]

ईश्वर अजूनही

निराश झालेला नाही

माणसाच्या बाबतीत

हाच संदेश घेऊन येतं

प्रत्येक नवजात बालक…

 

[१५१]

मावळत्या दिवसाचं

प्रेमानं चुंबन घेत

रात्र म्हणाली,

’महानिद्रा’

म्हणजे मृत्यू म्हणतात मला

पण माता आहे मी तुझी

मीच तुला पुन्हा

नवा जन्म देईन

 

[१५२]

पक्षी जेव्हा

विचार करतो

पुण्य करायचा.

तेव्हा ठरवतो ,

पाण्यातल्या माशाला

हवेत आणून   

उद्धार करावा त्याचा.

 

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चंद्रा… ☆ श्री तुकाराम दादा पाटील

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ चंद्रा… ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆ 

नको बसू तू रुसून चंद्रा

नभात ये तू नटून चंद्रा

 

बघावयाचे सदैव मजला

 तुझेच लाघव दडून चंद्रा

 

नकोस सांगू हळू कहाणी

प्रियेस माझ्या बघून चंद्रा

 

मनात गुंता कशाकशाचा

उगाच शंका धरून चंद्रा

 

खरेच वेडा म्हणेल ती मज

तूझ्या वरी मग चिडून चंद्रा

 

तिच्या सोबती वनात जावे

निवांत यावे फिरून चंद्रा

 

मनात आहे तसे घडावे

तिने बघावे वळून चंद्रा

 

 © श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print