कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

? इंद्रधनुष्य ?

अविस्मरणीय दरबारा सिंग साहेब ! ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

१९७७-८० या काळात मी NDA मध्ये होतो. तेथे असलेल्या अनेक ड्रिल इंस्ट्रक्टर्सपैकी, आम्हाला विशेष प्रिय असलेले (तत्कालीन) सुभेदार दरबारा सिंग यांची आज प्रकर्षाने आठवण झाली.

कोणाही सेनाधिकाऱ्याला विचारून पहा. ट्रेनिंग अकादमीमधील अनुभव, आणि विशेषतः तेथील ‘ड्रिल उस्ताद’, यांना तो कधीच विसरू शकत नाही. कारण, गाळलेल्या घामाच्या एकेक थेंबागणिक कॅडेट्सची शारीरिक आणि मानसिक जडण-घडण होत असते. आणि ड्रिल उस्तादही त्या घडणीचा एक शिल्पकार असतो.  

ज्यांनी-ज्यांनी NDA ची ‘पासिंग आऊट’ परेड पाहिली आहे त्यांना त्या सोहळ्यामागच्या कष्टांची जाणीव नक्की झाली असेल. अक्षरशः तासंतास परेड ग्राऊंडवर पाय आपटत आम्ही सराव करायचो. आम्हा कॅडेटसची कवायत पाहून प्रेक्षक उत्स्फूर्तपणे टाळ्याही वाजवायचे. पण आमच्याहूनही अधिक मेहनत घेणारे आमचे उस्ताद मात्र पडद्याआडच राहत असत. 

संपूर्ण सरावादरम्यान, परेड करणाऱ्या कॅडेट्सच्या पुढून, मागून, आणि दोन्ही बाजूंनी ड्रिल उस्तादांना बारीक नजर ठेवावी लागे. कुणाची चूक झाल्यास ती तात्काळ दुरुस्त करावी लागे. कारण एखाद्याच्या चुकीमुळे संपूर्ण परेडची लय बिघडणे हे अक्षम्य असे. त्यामुळे, सगळे उस्ताद पायाला भिंगरी लावल्यागत संपूर्ण ग्राउंडभर सतत थिरकत असायचे. एखादा सराव मनाजोगता न झाल्यास संपूर्ण परेड पुन्हा पहिल्यापासून सुरु करावी लागे. अशा वेळी दमल्या-भागलेल्या कॅडेट्सना हुरूप देत, त्यांना पुन्हा एकदा सरावासाठी उभे करणे सोपे काम नसे. 

आम्हाला प्रोत्साहित करण्याची दरबारा सिंग साहेबांची शैली खास होती. “बस एक और रिहर्सल, आपके उस्ताद के नाम!” इतकेच  म्हणणे अनेकदा पुरेसे असे. पण तेवढे बोलून थांबतील तर ते दरबारा सिंग कसले! 

“भरतनाट्यम का एक ‘शो’ करने के बाद हेमा मालिनी भी वन्स मोअर नही करती, लेकिन मेरा कॅडेट जरूर करेगा!” असे त्यांनी म्हटले की आम्ही पोट धरून हसत पुन्हा परेडसाठी तयार असायचो! 

आमच्या चुका काढतानाही ते असेच काहीतरी विनोदी बोलायचे, “कॅडेट बापट, ढीला क्यों पड गया? खटमल खुजली कर रहा है क्या ?” असे म्हणून “लेफ्ट-राईट” च्या ऐवजी “खटमल-खुजली, खटमल-खुजली” असे म्हणत ते आमच्या बाजूने चालायचे. अशा वेळी हसू दाबत-दाबतच, पण नव्या जोमाने आम्ही टाचा आपटायचो. 

पुढे सुभेदार मेजर या हुद्द्यावर बढती मिळून, दरबारा सिंग साहेब NDA मध्ये बरीच वर्षे पोस्टिंगवर राहिले. आम्ही पास आऊट झाल्यानंतरच्या काळातला एक प्रसंग काही वर्षांपूर्वी माझ्या वाचनात आला होता. 

पासिंग आऊट परेडचा सराव चालू होता. कॅडेट्स दमलेले होते. कदाचित NDA च्या सिनेमागृहातल्या ‘शो’ची वेळही होत आली असेल. मनाजोगती परेड न झाल्यामुळे आणखी एक सराव करायचा आदेश मिळाला होता. त्या जास्तीच्या सरावादरम्यान हजार-दीड हजार कॅडेट्सची आपसात कुजबूज आणि धुसफूस चाललेली होती. 

परेडच्या शेवटी, NDA चे ‘निशाण’, म्हणजेच राष्ट्रपतींनी प्रदान केलेला मानध्वज सन्मानपूर्वक घेऊन जाण्याची वेळ झाली. त्या कारवाईदरम्यानही कॅडेट्सची कुजबूज थांबलेली नव्हती.

एरवी सदैव हसतमुख असणाऱ्या दरबारा सिंग साहेबांना ‘निशाण’चा अवमान मात्र सहन झाला नाही. ताड-ताड चालत ते मंचावर जाऊन उभे राहिले. त्यांचा अवतार पाहून कॅडेट्सची कुजबुज काहीशी कमी झाली. 

महत्प्रयासाने राग आवरत दरबारा सिंग बोलू लागले. “कॅडेट्स, मी दोनच मिनिटात तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. आपल्या NDA मध्ये ‘Hut of Remembrance’ नावाची जी वास्तू आहे, त्यामध्ये गेल्या तीन वर्षात मी फक्त एकदाच गेलो आहे. त्या वास्तूमध्ये अखंड तेवत असलेल्या ज्योतीच्या आजूबाजूला जी नावे सुवर्णाक्षरात कोरलेली आहेत, ते सगळे तुमच्यासारखेच NDA कॅडेट होते. त्यामध्येच एक नाव आहे लेफ्टनंट योगराज पलटा, वीर चक्र.”

एक दीर्घ श्वास घेऊन दरबारा सिंग पुढे म्हणाले, “१९६२ साली चीन युद्धाच्या वेळी शीख रेजिमेंटची नववी बटालियन अरुणाचल प्रदेशमधील तवांग येथे तैनात होती. बटालियनच्या एका चौकीवर युद्धासाठी सज्ज असलेल्या तुकडीमध्ये मीदेखील होतो. साधारण माझ्याच वयाचे एक तरुण अधिकारी आमचे कमांडर होते. ते म्हणजे, हेच लेफ्टनंट योगराज पलटा. 

१५ नोव्हेंबर १९६२ रोजी आमच्या चौकीवर चिन्यांनी हल्ला चढवला. चिनी सैन्य आमच्यापेक्षा कैक पटींच्या संख्येने, आणि भरपूर शस्त्रे आणि दारुगोळ्यासह आले होते. पलटासाहेब आम्हाला प्रोत्साहित करत स्वतःदेखील गोळीबार करीत होते. ‘शेवटची गोळी, आणि रक्ताचा शेवटचा थेंब शिल्लक असेपर्यंत आपण लढायचं आहे’, हेच ते आम्हाला सतत सांगत होते.”

परेडमधल्या सगळ्याच कॅडेट्सना जाणवले की दरबारासिंग साहेबांचा आवाज आता जड झाला होता. 

भरल्या कंठानेच ते पुढे बोलत राहिले, “मी आणि लेफ्टनंट पलटासाहेब शेजारी-शेजारीच होतो. एका क्षणी मॉर्टरचा एक गोळा आला आणि थेट पलटा साहेबांच्या चेहऱ्यावर लागला. त्यांचे शीर धडापासून वेगळे झाले आणि त्यांचे निष्प्राण कलेवर माझ्या अंगावर पडले. क्षणार्धात माझी पगडी, दाढी,आणि छाती त्यांच्या रक्ताने चिंब झाली. 

माझ्या अंगावरून त्यांचा देह उचलण्याचाही अवधी मला मिळेस्तोवर चिनी सैनिक आमच्या चौकीमध्ये घुसले. एका मृतदेहाखाली रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला मीदेखील मेलेलोच आहे असे समजून, दिसेल त्या सैनिकाला भोसकत ते क्षणार्धात आमच्या अंगावरून पुढे गेले.” 

आता मात्र NDA च्या परेड ग्राउंडवर अक्षरशः स्मशानशांतता पसरलेली होती. महत्प्रयासाने अश्रू आवरत असलेल्या दरबारा सिंग साहेबांकडे सर्व कॅडेट अविश्वासाने पाहत होते. 

सद्गदित आवाजात दरबारा सिंग म्हणाले, “सर्वप्रथम जेंव्हा मी ‘Hut of Remembrance’ मध्ये पलटासाहेबांचे नाव वाचले तेंव्हा मी नखशिखांत थरारलो होतो. अचानक माझ्या आयुष्यातली २०-२५ वर्षे गळून गेली आणि माझ्या दाढीवर आणि छातीवर गरम रक्त वाहत असल्याचा भास मला झाला. त्यानंतर पुन्हा कधीच मी तिथे गेलो नाही. पण, पलटासाहेबांसारख्या अनेक NDA कॅडेट्सच्या सर्वोच्च बलिदानाचा सन्मान म्हणून, माननीय राष्ट्रपतींनी दिलेला हा ध्वज जेंव्हा-जेंव्हा परेडवर आणला किंवा नेला जातो तेंव्हा माझी छाती अभिमानाने भरून येते. माझा हात आपोआप सलामीसाठी उचलला जातो.”

“लक्षात ठेवा कॅडेट्स, त्या वीरांची आठवण आपल्याला करून देणारे हे ‘निशाण’ आहे. जे त्याला निव्वळ एक रंगीबेरंगी कापडाचा तुकडा समजतात त्यांच्यासारखे करंटे तेच !”

कसेबसे एवढेच बोलून, पुन्हा ताड-ताड चालत दरबारा सिंग साहेब परेडवरून निघून गेले. त्यापुढील कैक मिनिटे संपूर्ण परेड हतबुद्ध होऊन तिथेच उभी होती. 

अशा आमच्या अविस्मरणीय दरबारा सिंग साहेबांनी अगदी परवाच, म्हणजे ११ ऑक्टोबर २०२२ रोजी या इहलोकातून कूच केले! 

“सुभेदार मेजर व ऑनररी कॅप्टन दरबारा सिंग साहेब, आज १४ ऑक्टोबर २०२२ रोजी तुमच्या गावी, तुमच्यासाठी ‘अंतिम अरदास’ आयोजित केलेला आहे. तुम्हाला मानवंदना देण्यासाठी मी प्रत्यक्ष हजर राहू शकत नाही. म्हणून इथूनच तुमच्या कॅडेटचा तुम्हाला कडक सॅल्यूट!”

लेखक : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

मो  9422870294

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments