श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ महाभोजन तेराव्याचे… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(गण्याने त्याला आपल्या हॉटेलात नेऊन पाहिले, पण आपा पैसे लंपास करू लागला,गिर्हाईक बरोबर हुज्जत घालू लागला.) –इथून पुढे 

शेवटी एकदाचा आपा दोन पैसे कमावू लागला म्हणून गण्या आणि त्याची बायको खूष झाली. पण ते गवंडी पण व्यसनी, मटका खेळणारे, त्याच्या नादाला लागून आपा दारू सोबत मटका लावायला आणि गुटखा खायला लागला.

अधूनमधून दारू पिऊन गण्याला मारू लागला, जमीन आपल्या नावावर करून दे म्हणून भांडू लागला.

मी निवृत्त झालो आणि मी आणि पत्नी पुण्याला आलो, पुण्याला आमची लग्न झालेली कन्या होती, तिच्या जवळच मी आम्ही दोघासाठी ब्लॉक घेऊन ठेवला होता.

मी पुण्याला आलो तरी मला गावातील बातम्या कळत होत्या, माझा शेजारी अतुल मला वाडीतील सर्व बातम्या कळवत होता,.

अचानक एक दिवस मला गण्याचा फोन आला.

गण्या -काकानू, झिलाचा लगीन ठरवलंय. कट्ट्याची मुलगी असा

मी -अरे पण तो बरो आसा मा, नायतर दारू मटको..

गण्या -माऊली  शप्पत सगळा सोडल्यानं, आत रोज घराक येता आणि घरात काय तरी हाडता. काकानू, मी हाटेल बंद केलंय, माका आणि बायलेक झेपणा नाय हो. तुमका म्हाईत आसा मा माका दमो आसा आणि बायलेक चलाक जमणा नाय.

मी – ता माका माहित आसा, तुझो दमो चळवलॊ काय तुका रातदिस झोप लागणा नाय.

गण्या -होय हो, म्हणान हाटील बंद केलव आत आपाचा लगीन झाला की नातवाक खेळवीन रवान.

शेवटी आपाचे लग्न झाले, बायको होती कलिसावळी पण धड धाकट होती. आम्ही दोघे आणि अर्पिता लग्नाला गेलो, मोठा आहेर केला, दोघांना आशीर्वाद दिला आणि चार दिवस राहून परत आलो.

पंधरा दिवस झाले आणि वेगळ्याच बातम्या ऐकू येऊ लागल्या, आपाची बायको भलतीच आगाऊ होती, ती आपाच्या खिशातून पैसे काढू लागली आणि आपल्या भावाला पाठवू लागली. त्यावरून त्यांची भांडणे सुरु झाली, आपा परत भरपूर दारू पिऊ लागला आणि घरातील सर्वाना शिव्या देऊ लागला.

एवढे दिवस त्याचे आईबाबा गुमान ऐकायचे पण आत त्याची बायको त्याच्याशी वाद घालायची, त्यामुळे तो तिला मारायचा. एकदा आपा असाच दारू पिऊन आला आणि बायको बरोबर भांडण, मग तिचे मोठ्याने ओरडणे यातून आपाने कोयत्याने बायको वर वार केले. ती रक्तबंबाल झाली. तिला सरकारी हॉस्पिटल मध्ये नेऊन तिची जखमेवर उपचार झाले.

आपावर पोलीस केस झाली, पोलिसांनी त्याला पकडून बेदम मारले. मला कळले तसें इस्पेक्टर माझ्या ओळखीचा असल्याने त्याला सांगून जामीन मिळवून दिला, आपा जमिनावर सुटला पण केस सुरु झाली.

या घटनेमुळे त्याची बायको माहेरी निघून गेली. रोज पोलीस स्टेशन ला जावे लागत असल्याने आपा काही दिवस गप्प होता, पण हळूहळू त्याचे पिणे सुरु झाले.

मी गणपती ला गावी गेलो तेंव्हा माझ्या लक्षात आले गण्या आत पार थकला आहें. एक तर त्याचा दमा आणि मुलाने उधलेले हे गुण.गण्याची बायको पण खूपच म्हातारी दिसू लागली. गण्या मला भेटायला आला आणि रडायला लागला.

“काकानू, तुमी माका वर काढलात, मी हाटेलात गडी होतय तो हाटीलचो मालक बनवलात, ही तुमच्या पावन्याची जागा घेऊन दिलात, माज्या लग्नात खर्च केलत. पण माझ्या झिलान माजो सगळो संवसार मातीत घालवल्यानं ‘

गण्या रडू लागला. माझी बायको त्याची समजूत घालू लागली

“तुम्ही तरी काय करणार, तुम्ही त्याचे लग्न करून दिलात, घर बांधून दिलात, पण त्यालाच ही व्यसने लागली आणि…

गण्या रडतरडत गेला. मी बायकोला म्हणालो “गण्या फार दिवस काढेल असे वाटतं नाही ‘.

बायको म्हणाली “तसे झाले तर गण्याच्या बायकोचे फार हाल होतील. पण एक करता येईल तिला आपल्याबरोबर नेता येईल. पण आत ती येणार नाही ‘

आम्ही पुण्याला परतलो आणि तीन महिन्यात गण्या गेल्याची बातमी समजली.मला फार वाईट वाटले. ऑफिस मध्ये चहा भजी घेऊन येणारा गण्या, मग स्वतः चें हॉटेल काढणारा गण्या, लग्न केलेला आणि बायको सह बिऱ्हाड केलेला गण्या, मग गावात जमीन घेऊन घर बांधणारा गण्या आणि मागच्या वेळी गावी गेलेलो तेंव्हा मुलाच्या व्यसनाने थकलेला गण्या डोळ्यसमोर येत राहिले.

गण्याच्या आठव्या दिवशी आम्ही दोघे गावी आलो, घर उघडून झाडू मारत असताना आमचे घर उघडे पाहून मोठमोठ्याने रडत आपा आला आणि माझ्या पायावर पडून डोकं आपटू लागला “काकानू, माजो बाबा गेलो हो…., तेका सुखात ठेवतालाय असतंय… पण म्हदीच गेलो हो..माजी बाईल माहेरक जाऊन रवली तेंच त्यांना टेन्शन घेतला हो..

मी त्याला उठवून गप्प केला. माजी बायको त्याला म्हणाली

“झाले ते झाले, आत बाबा येणार आहें का, तूझ्या व्यसनाला कंटाळला तो, त्यात रोज तूझ्या शिव्या आणि आईबाबांना मारहाण.. कसा जगेल तो..

त्याबरोबर माज्या बायकोच्या पायावर पडून भोकाड पसरून तो आपल्या तोंडात मारून घेऊन लागला.

“होय गे काकी, माजा चुकला गे.. माज्या बायलेन तेका टेन्शन दिल्यानं..

माज्य्वार केस घातल्यानं..माका पोलिसांनाकडसून मारुक लावलायन.. आणि तो त्याच्या बायकोला शिव्या देऊ लागला.

थोडया वेळाने आपा गेला, माझा शेजारी मनोहर मला भेटायला आला. तो मला म्हणाला ” अरे ह्याच्या रडण्यावर जाऊ नकोस, हा आपा बाबाचे तेरावे घालतो आहें, विजू भटजीला विचारून आला आहें. तेरावे लहान सहन नाही, अख्या गावाला आमंत्रण देणार आहें.

मी म्हणालो “अख्ख्या गावाला तेराव्याला जेवणाचे आमंत्रण, म्हणजे हे महाभोजन झाले.

” होय, महाभोजन तेराव्याचे ‘

“अरे पण एवढा खर्च कोण करणार?

“खर्च? खर्च गाव करणार.

“पण ह्याच्या बापाच्या तेराव्याचा जेवणाचा खर्च गाव कशाला करेल?

“अरे बाबा, आत तुझ्याकडे भोकाड पसरून रडू लागला ना, तसा गावात सगळीकडे भोकाड पसरतो, थांबायचे नाव घेत नाही मग कोण दोनशे कोण पाचशे कोण दहा किलो तांदूळ कोण नारळ असे गेलय चार दिवसात भरपूर जमा केले आहें त्याने, आहेस कुठे तू /

मी डोक्याला हात लावला, पुढील दोन दिवस असेच भोकाड पसरून आपाने अजून पैसे, तांदूळ, डाळ, नारळ जमा केले.

तेराव्या दिवशी सकाळ पासून लाऊड स्पीकर लावला आणि ओळखीच्या लोकांना बोलावून मोठया चुली पेटवलंय आणि सकाळपासून मोठमोठी जेवणाची शिजवलेली भांडी उतरवाली.

भटजीनी त्यांचे काम आटोपले, कावळा पिंडला शिवला नाही म्हणून दर्भाचा कावळा शिववला आणि मग सुरु झाले, “महाभोजन तेराव्याचे ‘.

कुठून कुठून माणसे येत होती, आपाला येऊन मिठी मारत होती मग आपा भोकाट पसरून रडत होता, येणारा बिचारा त्याच्या रडण्याने गहिवरून जात होता, जेवण जेवत होता, जाताना आपाच्या खिशात नोट सरकावत होता.

गण्याचे तेरावे करून आम्ही दोघे पुण्याला जाताना गण्याच्या बायकोला भेटायला गेलो. तिथे अजून काही लोक भेटायला आली होती, त्यातील एक बाई गण्याच्या बायकोला म्हणाली “कसय असो पण आपाने बापाशीच्या तेराव्याक गावक जेवणं घातल्यानं अगदी महाभोजनच.’

गण्याची बायको रागाने बोलली “महाभोजन घालीत तर काय, माज्या नवऱ्याने दोन तोळ्याचा मंगळसूत्र घातलेल्यानं, ता भांडण करून नेल्यानं आणि विकल्यानं, त्या पैशाचा जेवणं गावक घातल्यानं ‘

एव्हड्यात माझी पत्नी बोलली “मग तेराव्यासाठी गावातील अनेकांनी पैसे, धान्य दिले ते? आम्ही पण दोन हजार दिले?

“ते याच्यासाठी ‘गण्याच्या बायकोने उजव्या हाताचा अंगठा ओठाला लावला आणि डोक्याला हात लावला.

– समाप्त – 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments