मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “चढ आणि उतार…” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ ☆

सौ विजया कैलास हिरेमठ

? कवितेचा उत्सव ?

☆ “चढ आणि  उतार…” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ 

सगळेच दिवस

कसे असतील एकसारखे

येतच राहणार

चढ उतार अडथळे….

 

अडथळे येतात

मार्ग बदलायला लावतात

वेगळे वळण देऊन

हिंमतीने जगायला शिकवतात….

 

चढ आणि उतार

जीवनाचा आधार

संयम बाळगावा

हाच त्यांचा प्रचार….

 

अडथळे म्हणजे

फक्त संकट नव्हे

कदाचित इथूनच

सुरू होते जगणे नवे……

 

चढताना थकलो तरीही

पोहचण्याचा हुरूप असतो

उतारावर मात्र घाबरून जातो

इथे गतीला नियंत्रित करावच लागतं…

 

संकटे येतात निघून जातात

खूप काही शिकवतात

कोण आपलं कोण परकं

आपलं ही आपलेपण इथे कळतं…

 

सुप्त गुण काही

आपले आपल्याला भेटतात

संकटे डिवचतात म्हणून

मार्ग नवे सापडतात ….

 

सरळ एकमार्गी आयुष्य

वाटत असतं बरं

संकटांशिवाय कळतं नाही

आपल्यातील बळ खरं….

💞शब्दकळी विजया💞

©  सौ विजया कैलास हिरेमठ

पत्ता – संवादिनी ,सांगली

मोबा. – 95117 62351

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “माझे माझेचे गाठोडे…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ माझे माझेचे गाठोडे… – कवी :अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

माझे   माझेचे   गाठोडे    

 तुझ्या  चरणाशी  वाहिले

 तुझे    तुझे    म्हणताना 

 किती मोकळी  मी  झाले

*

 माझे   माझे  गणगोत

चिंता    सर्वांची   वाहिली

तुझे   तुझे    म्हणताना

 गुंतागुंत   ती   सुटली  

*

 माझा   माझा  रे   संसार

 करिता   आयुष्य हे  गेले

 तुझे     तुझे     म्हणताना

 मुक्त    मनोमनी    झाले.

*

  माझी  माझी    मुलेबाळे

  मोह    सुटता      सुटेना

  तुझे     तुझे      म्हणताना

  चिंता    काहीच    वाटेना

*

  माझे   माझे   हे    वैभव

  हाच    ध्यास    जीवनात

  तुझे    तुझे      म्हणताना

  मन     झाले   हे  निवांत 

*

  माझे   माझे   हे   चातुर्य

  करी    सदा   रे    विवाद

  तुझे    तुझे      म्हणताना

  ऐकू    येई      अंतर्नाद   

*

  माझे   माझे    म्हणताना

  मोह   माया  ताप   जाळी

  तुझे    तुझे      म्हणताना

  लागे   ब्रह्मानंदी     टाळी

*

  माझे   माझे    मीपण

  तुझ्या    चरणी    वाहिले

   तुझे  तुझे    म्हणताना

   तुझ्यातच     विलोपले 

कवी :अज्ञात

संग्राहक  : श्री कमलाकर नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ एक हरीण… – चित्र एक काव्ये दोन ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?️?  चित्रकाव्य  ?️?

? एक हरीण… – चित्र एक काव्ये दोन ?  सुश्री वर्षा बालगोपाल 

( १ ) 

एका रानात होता हरीण कळप सुरेख

होते लंगडे बिचारे पिल्लू तयात एक

*

सारे पळूनी जाती दिसता समोर शिकारी 

लपवुनी स्वतःला ते शोधते कपारी 

वाचे हरेक वेळी हा दैव योग एक 

होते लंगडे बिचारे पिल्लू तयात एक

*

सदा भेदरे राही , पळता येईल का नाही 

मदतीची वेळ येता , जो तो हो पळ काढी 

टर उडवून त्याची खोड्या काढती कैक 

होते लंगडे बिचारे पिल्लू तयात एक

*

एके दिनी परंतु नवल मोठेच घडले 

अरुणाच्या हस्त स्पर्षे लंगडेपण निमाले 

पाण्यात पाहताना प्रतिबिंब आपले नेक 

त्याचेच त्या कळले, तो सुवर्णमृग एक

*

पिलाची चिंता वाढली अरुणास ते म्हणाले

मज “मारीच” समजून मारतील लोक इथले

नको ही सुवर्णकाया असुदे पाय बारीक

होते लंगडे बिचारे पिल्लू तयात एक

कवयित्री : वर्षा बालगोपाल 

( २ ) 

जीव धरूनी मुठीत बिचारे धावत होते हरीण

हरीनं पण कृपा केली ठरवून याला मी तारीन

तारी न जो कोणी त्याला शासन ही करीन

करी न जो आदेश पालन तो दंड पात्र ठरवीन||

*

सलमान मागे लागला आणि आठवला नारायण

नारायण दिसता गगनी हरीण पाही स्तब्ध होऊन

होऊ न आता चिंतीत सोपवू सारे मित्रावर

मित्रा वर देतो अभयाचा हत्यारोप सलमानवर ||

*

कवच लाभले वाटे हस्त पाहुनी डोईवर

डोई वर करुनी दान घेतले शिंग अंजलीभर

भर सकाळी साक्षी याचे झाले मोठे तरुवर

तरु वरही कृपादृष्टी दिनेशाची प्रतिबिंब दावी सरोवर ।।

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 227 ☆ तीर्थक्षेत्र ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 227 ?

☆ तीर्थक्षेत्र ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

दूरच्या प्रदेशात…

रणरणत्या उन्हात,

लोक निघाले होते ईश्वराच्या दर्शनास!

उंच डोंगरावर वसलेला—

तो श्रीमंत देव व्यंकटेश बालाजी !

जायचं ठरवलं होतं मी ही,

कधीतरी,

आणि “बुलावा” ही आला ,

आपल्या ईश्वर निष्ठा ,

किती प्रबळ,

त्याच देतात बळ,

त्या अलौकिक ईश्वराला,

क्षणभर पाहण्यासाठी,

तासनतास रांगेत तिष्ठत!

कुठली ओढ असते,

त्या कृष्णवर्णी मूर्तीची –‐

 

कुणीतरी विचारतं,

“आंटी पानी चाहिए?”

आणि जाणवतं,

कंठशोष झाल्याचं!

हवं असताना पाणी देणारा,

तोच असावा , माणसामाणसातील!

दर्शनाच्या रांगेतली धक्काबुक्की,

कळत नसलेल्या भाषेतली,

बाचाबाची!

ही सारी शर्यत पार करत,

क्षणभरच दिसतो,

लखलखीत तेजोमय,

तो ईश्वर!

आणि खरोखरच वाटते,

भरून पावल्या सारखे !

कृतार्थ…..

कानात गुंजतय अजूनही….

गोविंदा….. गोविंदा..

व्यंकट रमणा गोविंदा !

या देवभूमीतच, समजतात माणसं,

चांगली वाईट,

म्हणूनच ही तीर्थक्षेत्रं,

बनवतात अधिकाधिक प्रगल्भ !

कोणीच येत नाही रिकामा,

प्रत्येकाची झोळी भरलेलीच,

ज्याच्या त्याच्या कर्मानुसार,

गोविंदा गोविंदा !

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ निसटलेली वाळू… ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी ☆

सौ.अश्विनी कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

निसटलेली वाळू… ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी

दिवसभर तापलेल्या वाळूला

संध्याकाळी आवेशात येणाऱ्या,

समुद्राच्या सहस्त्र लाटांच्या बाहुत,

सामावून जायचं असत….

 

तो येतो,

घेतो तिला आपल्या बळकट बाहुंनी,

घट्ट  कवेत…कितीतरी वेळ

शांत करतो तिला…

दोघेही निःशब्द असतात

 

त्याचे डोळे लागतात,

परतीच्या वाटेकडे…

त्याला पार पाडायची असतात,

अनेक कर्तव्य…

तेव्हा तिला वाटत,

आपल्याला अस एकट सोडून,

त्याने जाऊ नये…

मग त्या अथांगाच्या नकळत,

त्याला आपल्या कायेवर घेऊन,

ती जाऊ लागते,

खोल खोल त्याच्यासोबत…

त्याला बघत बघत…

 

पण आपल्या पायाखालून,

कधी निसटून जाते वाळू,

कळतच नाही…

© सौ अश्विनी कुलकर्णी

मानसतज्ञ, सांगली  (महाराष्ट्र)

मो – 9421225491 Email – [email protected] 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तिला विचारलं नाही… – कवी :अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

?  वाचताना वेचलेले  ? 

तिला विचारलं नाही… – कवी :अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

ज्या क्षणी पाहिले तिला

होकार गृहीतच धरला

मी तुला आवडलो का?

तिला विचारलंच नाही

 

सप्तपदी चालताना

घुटमळली पाऊले तिची

हुरहुर कसली होती?

तिला विचारलंच नाही

 

माप ओलांडताना उंबरठ्याचं

मी आलो सहज आत

तुलाही यावंसं वाटतंय का?

तिला विचारलंच नाही

 

झाली पहिली भेट

किती आतुर होतो मी

ओढ तुलाही आहे का?

तिला विचारलंच नाही

 

वंशाला दिवाच हवा

सांगून मोकळा झालो

पण आई व्हायचंय का?

तिला विचारलंच नाही

 

संगोपन करतांना मुलांचं

कसरत होत होती तिची

गरज माझीही लागेल का?

तिला विचारलंच नाही

 

आयुष्यभर दिली साथ

झाली सुख दु:खाची सोबती

कधी मन तिचं दुखलं का?

तिला विचारलंच नाही

 

न मागताच तिच्याकडून

घेतलं मी सारं काही

तुलाही काही हवं का?

तिला विचारलंच नाही

 

खरंच किती स्वार्थी झालो

गृहीतच धरलं मत तिचं

तिचं मन काय म्हणतं?

तिला विचारलंच नाही

 

आत्ता विचारलं तिला

सांग काय हवंय तुला?

वय तिचं केव्हा झालं?

समजलेच नाही समजलेच नाही

 

कवी :अज्ञात

संग्राहक  : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शब्दसरस्वती… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ शब्दसरस्वती ☆ श्रीशैल चौगुले ☆

तुझ्या शब्दांनी दिला धोका

कवितेत जीवन लुटले

काळजात लेखणी निळी

लिहीताना उमाळे फुटले.

*

कोणताच अर्थ ना उरे

अक्षरावीन घुसमटले

पुन्हा कविताच भेटता

मनातले संघर्ष मिटले.

*

संचार प्रतिभा भावूक

वादळ अंतरी उठले

सांग सरस्वती माते

वरदान आले कुठले ?

*

ज्ञानाचे मंदिर सजले

पारणे भक्तीचे फिटले

तेवाताना दिप शब्दांनी

चैतन्य काव्यात दाटले.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #234 ☆ घातकी श्वास… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 234 ?

घातकी श्वास ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

येवढा विश्वास त्यावर, देह झाला दास होता

थांबलेला ऐन वेळी, घातकी तर श्वास होता

*

कोडमारा होत होता, मोडता चौकट न आली

उंबरा शालीनतेचा, माझिया दारास होता

*

पान मेंदीचे मनाला, भावले होतेच हिरवट

लाल केले हात त्याने, खेळला मधुमास होता

*

कंगव्याची पाच बोटे, मोगऱ्याने धुंद झाली

म्हणुन गजरा माळण्याचा, ध्यास ह्या केसास होता

*

चावुनी केला विड्याचा, तू जरी चोथा तरीही

रंगण्याचा छंद येथे, केवढा कातास होता

*

अन्नपूर्णा या घराची, रांधणारी वाढणारी

वैभवाचा वारसाही, आमच्या वंशास होता

*

चूल होती जाळ होता, होम होता पेटलेला

धूर राखेशी घरोबा, वाढलेला खास होता

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ शब्द… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– शब्द – ? ☆श्री आशिष  बिवलकर ☆

हरवलेल्या शब्दांनो,

या तुम्ही परत या |

रहाटगाड्यापासून मज,

काही क्षण दूर न्या |

*

शब्दांनो फुलागत सुंदर तुम्ही,

तुमचीच गुंफायचो माळ |

एक एक शब्द हसत यायचा,

जणू तुमच्याशी जोडली नाळ |

*

कामाचा उरक संपवता संपवता,

काही दिवस दूर तुम्हाला सारले |

दुरावा का असा आपल्यात यावा ,

कळेना माझेच मला ना स्मरले |

*

रोजच्या धकाधकीच्या गर्दीत,

तुमच्यामुळेच मिळतो एकांत |

छान गुफावून तुम्हाला एकत्र,

तेव्हाच माझा जीव होतो शांत |

*

काही कठोर, काही मृदू,

काही भावनिक घालतात साद |

काही उन्हात, काही पावसात,

लावून जातात मनासी नाद |

*

शब्द शब्द आणि शब्दच,

शब्दाविना प्रतिभेचे अधुरे प्रारब्ध  |

दूर जातात नकळत ते ,

संवादही तेव्हा होऊन जातो स्तब्ध |

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ राजा… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ राजा☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

धूळ चारण्या अन्यायाला

उभाठाकतो रणांगणावर

प्रिय मानतो सकल चराचर

बनतो राजा कधी कुणीतर

*

प्राणाहूनही प्रिय जयाला

असते वाटत माय धरोवर

जबाबदारी तिची शिरावर

घेतो राजा कधी कुणीतर

*

आदर्शाचा घेत सुगावा

मानवतेचा होतो चाकर

वावरणारा असा धुरंधर

बनतो राजा कधी कुणीतर

*

ठेवत असतो पुरा भरवसा

जनतेमधल्या सामर्थ्यावर

स्वबळाच्या  कर्तृत्वावर

बनतो राजा कधी कुणीतर

*

सेवाभावी समर्पणाचे

ध्येय जयाचे असते सुंदर

जनसेवेला मानत ईश्वर

बनतो राजा कधी कुणीतर

*

साधक बाधक हितोपदेशी

पण मायेचा करुणा सागर

ठेवत श्रद्धा संस्कारावर

बनतो राजा कधी कुणावर

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares
image_print