मराठी साहित्य – विविधा ☆ ॲनिमल फार्म…  भाग-१ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ ॲनिमल फार्म…  भाग-१ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

या कादंबरीचे लेखक ऑरवेल याच्या विषयी माहिती.

कितीतरी लेखक दारिद्र्यातून जात असताना, लोकांची टीका सहन करत, करत एक दर्जेदार सिद्ध लेखक म्हणून नावारूपाला येतात. अशा अनेकांपैकी जॉर्ज ऑरवेल याचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.

जॉर्ज  ऑरवेलचे मूळ नाव एरिक आर्थर  ब्लेयर. 25 जून 1903 मध्ये, भारतात बंगालमध्ये मोतीहरी येथे त्याचा जन्म झाला. त्याचे वडील सिविल सर्विसेस मध्ये नोकरी करीत होते .1907 साली त्यांचे कुटुंब इंग्लंडला गेले. 1911 मध्ये ससेक्स मधील बोर्डिंग स्कूलमध्ये आणि नंतर इंग्लंडमध्ये  इटन येथे ( 1917 ते 21) स्कॉलरशिप मिळवून शिक्षण घेतले तेथे त्यांना अल्डस  हक्सले हे शिक्षक लाभले. आणि तेथूनच त्यांचे लेखनाला सुरुवात झाली कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी वेगवेगळ्या मॅगझिन्स मध्ये लेखन करायला सुरुवात केली त्यांची पहिली कविता “awake young men of england “. हे लिहिली तेव्हा तो फक्त अकरा वर्षाचा होता. 1922 मध्ये बर्मा मध्ये भारतीय इंपिरियल  पोलीस दलात डिस्ट्रिक्ट सुपरीटेंडंट म्हणून पाच वर्षे नोकरी केली. त्या काळात त्याला 650 पाउंड इतका चांगला पगार होता. पण त्याचे मन नोकरीत रमेना. वडिलांचा विरोध पत्करूनही त्याने ती नोकरी सोडली .आणि लेखक होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोन वर्षे त्याला खूपच दारिद्र्यावस्थेत काढावी लागली. इंग्लंडला आल्यानंतर त्याने प्रसिद्ध लेखकांचा अभ्यास केला. आणि आपले लेखन विकसित करायला सुरुवात केली. उदारमतवादी आणि समाजवादी विचारांच्या संपर्कात तो आला. आणि तेथेच त्याच्या राजनैतिक विचारांना सुरुवात झाली. इंग्लंडला परत येण्यापूर्वी तो पॅरिस मध्ये दोन वर्षे राहिला होता. 1933 मध्ये त्याचे पहिले पुस्तक ” डाऊन अँड आऊट इन पॅरिस अंड लंडन ” मध्ये त्याने आपले अनुभव लिहिले. आणि या प्रकाशानापूर्वीच त्याने आपल्या नावात बदल करून, जॉर्ज ऑरवेल या टोपण नावाने लेखन करायला सुरुवात केली. इंग्लंडला परत येण्यापूर्वी तो पॅरिसमध्ये दोन वर्षे राहिला होता .तेथे खाजगी शिक्षक, शाळा शिक्षक, पुस्तकाच्या  दुकानात काम करत होता .1936 मध्ये त्याला लंके शायर आणि   आणि याँर्कशायर मधील बेरोजगारी असलेल्या भागांना भेट देण्यासाठी नियुक्त केले. आणि तेथील गरीबीवर त्यांनी पुस्तक लिहिले.( The road to vighan pear 1937.) 1936 साली तो रिपब्लिकन पक्षासाठी लढण्यासाठी स्पेनला गेला . तेथे तो जखमी झाला .नंतर तो पूर्ण तंदुरुस्त झालाच नाही . दुसऱ्या महायुद्धा दरम्यान त्याने होमगार्ड मध्येही काम केले .1941 ते 43 मध्ये बी. बी .सी .साठी प्रचाराचे काम केले. पुढे 1943 साली  “ट्रिब्यून”, या साप्ताहिकाचे संपादक झाले .रशियन राज्यक्रांतीवरील उपरोध प्रचूर रूपक, अनेक टीकात्मक लेखसंग्रह , स्पेन मधील यादवी युद्धाचे अनुभव आणि कादंबऱ्या असे बरेच लिखाण झाले. त्याने लिखाणात कल्पनाधारीत, तत्वनिष्ठ पत्रकारिता, समीक्षा,  काव्य असे अनेक लेखन प्रकार हाताळले.

17 ऑगस्ट 1945 साली , इंग्लंडमध्ये आणि एक वर्षानंतर अमेरिकेत , त्याची  ” ॲनिमल फार्म ” ही (रुपक )कादंबरी प्रकाशित झाली. 1949 मधे एक दीड वर्ष खर्च करून  “1984” हे कादंबरी प्रकाशित झाली .या दोन कादंबऱ्यांनी सर्वत्र खळबळ उडवून दिली. जर्मनीचा पाडाव झाला .आणि स्टॅलिनने  रशियाला वाचवले. त्याविरुद्ध लिहिण्याची कोणाची ताकद नव्हती .सरकार आणि व्यवस्थेचा भीतीचा पगडा, विचारांची घुसमट त्याने प्रकट केली आहे. ” ॲनिमल फार्म ” हे एक भाष्य आहे. संपूर्ण कादंबरी रशियन राज्यक्रांतीचे हुबेहूब रूपक आहे. झारशाही विरुद्ध होणारे रशियन बंड उत्तमरीत्या साकार केले आहे .त्याचा एकाधिकारशाहीला विरोध होता. आणि सामाजिक विषमतेबद्दल प्रचंड चिड होती .लोकशाहीशी संलग्न असलेल्या समाजवादावर त्याचा विश्वास होता. एका शेतातली प्राण्यांची राजनीतिक कथा ,पण स्टॅलिनच्या राज्यक्रांती, जनतेचा विश्वासघात ,स्वार्थीपणा यावर ही रूपकात्मक कादंबरी आहे . स्टॅलीनचा

तो टीकाकार होता. ब्रिटिश बुद्धिजीवींनी, स्टॅलीनचा  उच्च आदर केलेला त्याला पटला नव्हता . त्याचे लेखन तत्त्वज्ञान हे सत्या.चा शोध घेण्याची संबंधित होते. मार्क्सवाद्यांना त्याचे लेखन पटले नाही .या कादंबरीवर त्यांनी आक्रमण केले. आणि अनेक दिवस या कादंबरीवर बंदी आली. दोन कादंबऱ्यांनी त्याला जागतिक  कीर्ती  मिळवून दिली. 1995 मध्ये त्याला w. H. Smith  अँड  penguin बुक्स ऑफ द सेंचुरी पुरस्कार मिळाला.1950  पर्यंत इंग्लंड मध्ये 25 हजार 500 आणि अमेरिकेत पाच लाख 90 हजार प्रति होत्या. या आकडेवारीवरून या पुस्तकाचे यश लक्षात येते. टाईम मॅगेझिनने इंग्रजीतील सर्वोत्कृष्ट कादंबऱ्यांपैकी एक म्हणून ती निवडली. सर्व युरोपियन भाषा, पर्शियन, आइसलैंडिक, तेलगू भाषांमध्ये या कादंबरीचे भाषांतर झाले आहे. ”  ॲनिमल फार्म ” आणि ” 1984 ” या दोन प्रसिद्ध साहित्य कृतीनी विसाव्या शतकात खपाचा उच्चांक गाठला होता. राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेवरील अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. जॉर्ज ऑरवेलला केवळ 46 वर्षांचे इतके अल्प आयुष्य लाभले . 21 जानेवारी 1950 मध्ये लंडनमध्ये त्याचे निधन झाले.

क्रमशः…

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जमणार का तुम्हाला असा चातुर्मास? ☆ सुश्री सुनिता जोशी ☆

? मनमंजुषेतून ?

जमणार का तुम्हाला असा चातुर्मास? ☆ सुश्री सुनिता जोशी

एक सहज सुचलेली संकल्पना. १५ दिवसात चातुर्मास चालू होत आहे. आणि आजच दैनिक सकाळ मध्ये वाचनात आले की चातुर्मासातील आरोग्य जपण्यासाठी दिलेला एक उपाय. आणि तो म्हणजे मौन पाळणे किंवा कमी बोलणे. पावसाळ्यात अग्नी मंद झालेला असतो आणि मुख्य म्हणजे चैतन्य मंदावले की ताकद कमी झालेली असते. हा खरा आरोग्याचा नियम आहे. म्हणजे आजकालच्या काळात जेवढे कामासाठी आवश्यक आहे असे बोलणे. तर मुख्य मुद्दा हा आहे की मौन पाळणे. या गोष्टीची सगळ्यात जास्त गरज आहे ती म्हणजे सध्याच्या राजकारणातील वायफळ बडबड करणा-या नेत्यांना. खास करून महाराष्ट्रातील राजकारणी लोकांना.

खरं बघायला गेलं तर आपण निवडून दिलेला नेता किंवा विरोधी नेता हा त्या त्या भागातील लोकांचे प्रश्न, तेथील समस्या, त्या भागातील विकास या सगळ्याशी निगडीत असला पाहिजे. दिवस रात्र त्याच्या मनात माझ्या जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून दिलेल्या मताची किंमत हवी, जाणीव हवी, मदतीची म्हणजे योग्य सहकार्याची हमी असावी. परंतु कोणताही नेत्याला सध्या याचे काहीही पडलेले नाही. फक्त आणि फक्त तोंड उघडायचे आणि तोंडाला येईल ते बोलायचे. म्हणजे आपण काय बोलतो आहोत याचा विचारच नाही. खूप काही अभ्यास करता येण्याजोगे, काम करता येण्याजोग्या गोष्टी राजकारणी लोकांना करता येण्यासारख्या आहेत. पण त्या सोडून आपण प्रश्नाला उत्तर देत आपली बाजू मांडायची आणि पुन्हा दुस-याला प्रश्न विचारायचा. पुन्हा त्याने त्याचे उत्तर द्यायचे आणि परत प्रश्न. अरे काय चालू आहे हे? 

तुम्ही फक्त जनतेला बांधील असले पाहिजे उत्तरे द्यायला आणि जनतेनेही त्यांना तसेच प्रश्न विचारले पाहिजेत. पण असो. सध्या आपला मुद्दा आहे तो मौनाचा. खरच आजचे गलिच्छ राजकारण टि.व्ही. चालू केला की– याने त्याला असे म्हंटले, त्याने त्याला असे म्हंटले हे ऐकवत नाही, पहावत नाही. मिडियालाही हेच हवे आहे. दिवसभर ब्रेकींग न्यूज म्हणून तेच दाखवत बसायचे आणि गैरसमज वाढवायचे. कोणताच पाचपोच उरलेला नाही. कोणतीच अभ्यासपूर्ण कृती नाही. विकासाची कोणतीच दिशा नाही आणि जनतेचे भले कुणालाच पचत नाही. अशी सगळी अवस्था झाली आहे. काय आदर्श ठेवणार आहोत आपण पुढच्या पिढीसाठी याची भिती वाटते आहे.    

म्हणून माझी विठुरायाच्या चरणी आषाढी एकादशी निमित्त एकच प्रार्थना आहे की या बडबड करणा-या राजकारण्यांना निदान चातुर्मासातील चार महिने तरी मौन पाळायची बुध्दी दे. त्यामुळे मिडीयावालेही मौन पाळतील आणि आमच्यासारख्या आशेने त्यांच्या कडे पहाणा-या जनतेला थोडे दिवस तरी विकासाचे, सुखाचे येऊ देत.

© सुश्री सुनीता जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “जीवनाचे नवनीत पुरवणारा कृष्ण…” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

☆ “जीवनाचे नवनीत पुरवणारा कृष्ण…” ☆ श्री संभाजी बबन गायके 

जीवनाचे नवनीत पुरवणारा कृष्ण…

…अर्थात एका भारतीय जवानाचा पराक्रम ! 

सोळा जूनच्या दुपारच्या तीनचा सुमार. पंजाबातील भाक्रा-नांगल CANALच्या पाटातून अतिशय वेगाने पाणी वाहात होते. या पाटाच्या दोन्ही बाजुंनी लोकांची, वाहनांची ये जा सुरू होती. 

पतियाला येथील सैन्य रुग्णालयाची एक मोटार आवश्यक अन्नधान्य घेउन शहरातून रुग्णालयाकडे येत होती. या मोटारीत नवनीत कृष्णा नावाचे सैनिकी जवान मागील आसनावर बसलेले होते.

नवनीत यांना या पाटाच्या कडेला शेकडो लोकांचा जमाव उभा राहून आरडाओरडा करताना दिसला. नवनीत यांनी चालकाला गाडी थांबवायला सांगितली आणि ते खाली उतरले. 

एक तरुणी पाण्यात वाहून चाललेली आहे हे वाक्य कानावर पडताच नवनीत यांच्यातील भारतीय सैनिक कर्तव्यासाठी पुढे सरसावला. कारण बघ्यांच्या गर्दीतून कुणीही पुढे होत नव्हते, काहीजण मोबाईल चित्रीकरण करण्यात दंग होते. पाण्यात पडलेली तरुणी जीव वाचवण्यासाठी आकांत करीत होती.

नवनीत यांनी पाटाच्या कडेने वेगाने धावायला सुरुवात केली. पाण्याचा वेग त्या तरूणीला पुढे पुढे घेउन जात होता. नवनीत यांनी वेगाने धावत सुमारे शंभर मीटर्स अंतर कापले आणि अंगावरील पूर्ण गणवेशासह त्या पाण्यात सूर मारला.

पाण्यात बुडत असलेली व्यक्ती वाचवायाला आलेल्याला माणसाला जीवाच्या भीतीने मिठी मारण्याची शक्यता अधिक असते. या प्रयत्नात बुडणारा आणि वाचवणारा असे दोघेही बुडण्याची दाट शक्यता असते.

नवनीत यांनी आपले सारे कौशल्य पणाला लावून तिचे केस पकडले… तिच्यापासून सुरक्षित अंतर ठेवून, एका हाताने पाणी कापत कापत पाटाचा जवळचा किनारा गाठला. 

बघ्यांची गर्दी आता मात्र मदत करण्याच्या भानावर आली होती. कुणी तरी एक मोठा दोरखंड पाण्यात फेकला. त्यामुळे नवनीत यांचे काम काहीसे सोपे झाले. काठावर पोहोचताच लोकांनी त्या तरूणीला वर ओढून घेतले…नवनीत मागाहून वर आले. 

नाकातोंडात पाणी गेल्याने त्या तरूणीचा जीव धोक्यात होता. जवान नवनीत यांनी त्यांना भारतीय सैन्य सेवेत मिळालेले प्रशिक्षण उपयोगात आणले. त्या तरूणीला सीपीआर Cardio Pulmonary Resucitation दिला. त्यामुळे तिच्या जीवावरचे संकट टाळले. 

नवनीत थोडेसे सावरले, कपडे चिंब भिजलेले. त्यांनी त्या तरुणीचे नावही विचारले नाही, त्याची काही गरजही नव्हती. The mission was over and successful!

काम झाल्यावर सैनिक पुन्हा बराकीकडे निघतात …जणू काही झालेच नाही अशा सहज आविर्भावात नवनीत आपल्या वाहनात बसून आपल्या कर्तव्यावर रुजू होण्यासाठी फिल्ड हॉस्पिटल मध्ये परतले. 

ऐनवेळी एका सैनिकाने स्वतःच्या हिंमतीवर हाती घेतलेल्या Rescue Operation च्या अगदी शेवटच्या काही क्षणांचे कुणीतरी चित्रीकरण करण्यात यश मिळवले होते. हे चित्रीकरण अल्पावधीत viral झाले. तेंव्हा कुठे नवनीत यांचा पराक्रम सर्वांना माहीत झाला. 

अर्थात भारतात सर्वांनाच अशा गोष्टी समजतात, असे नाही. यथावकाश भारतीय सैन्यास ही माहिती मिळाली आणि सैन्याच्या महान परंपरेनुसार भारताच्या लष्कर प्रमुख साहेबांनी, चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल पांडे साहेबांनी या शूर शिपायास आपल्या कार्यालयात सन्मानपूर्वक बोलावून घेतले. गौरव चिन्ह देऊन त्याचा यथोचित गौरव केला. 

नवनीत कृष्णा यांचे शौर्य, नि;स्वार्थ सेवा हे गुण कदर करण्यासारखेच आहेत. सेनेच्या सर्व विभागाच्या सर्व सैनिकांना आणि कर्मचाऱ्यांनाही आवश्यक ते सैनिकी प्रशिक्षण दिले जातेच. 

सैनिक फक्त सीमेवरच नव्हे तर देशात जिथे जिथे गरज पडेल तिथे पराक्रम गाजवण्यास, प्रसंगी प्राणांची बाजीही लावण्यास सज्ज  असतात…. संधी मिळताच सैनिक आपले कर्तव्य बजावून अलगद बाजूला होतात…. A soldier is never off-duty  असे म्हणतात ते खरेच आहे. 

नवनीत कृष्णा यांच्या पालकांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये नवनीत यांना शिकवले आणि सैन्यात प्रवेश करण्याच्या योग्यतेचे बनवले. नवनीत याबद्दल आपल्या पालकांविषयी अत्यंत कृतज्ञ आहेत.

नवनीत हे अत्यंत चपळ, धाडसी, काटक, आज्ञाधारक सैनिक असून अत्यंत उत्तम वाहनचालकही आहेत असे त्यांचे अधिकारी मोठ्या कौतुकाने सांगतात.  

नवनीत हे मूळचे तामिळनाडू येथील रहिवासी आहेत. आपणा सर्वांना अशा या धाडसी जवानाचे कौतुक आहेच व रहायलाही हवे. 

🇮🇳 जयहिंद. जय भारत. 🇮🇳

जय हिंद की सेना.

(माहिती आणि छायाचित्र इंटरनेटच्या सौजन्याने ! पाकिस्तानला शरण आणणाऱ्या भारतीय सैन्याचे छायाचित्र या सत्कार प्रसंगी घेतलेल्या छायाचित्रात मागे दिसते आहे. असे पराक्रम करणाऱ्या सैन्याचा सामान्य सैनिक हा भक्कम कणा असतात. त्यांचे यथोचित कौतुक व्हावे !) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ स्वेच्छानिवृत्ती… लेखक : श्री. विठ्ठल बाबुराव घाडी ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पई ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ स्वेच्छानिवृत्ती… लेखक : श्री. विठ्ठल बाबुराव घाडी ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पई ⭐

निवृत्ती शब्द येताच कुणी म्हणाले..

आताच का?अचानक का?

कुणी दबाव आणला का तुझा निर्णय तू घेतला?

निवृत्त होवून पुढे काय करणार?

घरचा कोंबडा बनणार? का जंगलात जाणार?

रोजची गाडी चुकणार, दुपारच्या विविध चवीला तू मुकणार.

 

हे काय वय आहे?

पोट भरण्याचे साधन काय आहे?

तू काय ठरवलं आहेस?

मनात काय घेवून दूर जात आहेस?

 

 किती प्रश्न!किती व्यथा!

 निवृत्ती ही का नवी आहे कथा?

 

अहो! थांबायचं कुठे आणि कधी हेच तर ठरवलं.

जगण्याच्या धडपडीत हवं ते कुठं मिळवलं?

 

वृत्त म्हणजे बातमी वार्ता.

गोतावळ्याच्या परिघात अडकलेला कर्ता.

कवितेच्या अक्षरांचा छंद.

तर वर्तनात अडकलेला बंध.

 

    यातून मुक्त होणे म्हणजे निवृत्त.

    मोकळ्या हवेत श्वास घेणे म्हणजे निवृत्त.

    मनाप्रमाणे धावणे, वागणे म्हणजे निवृत्त.

    निसर्गाशी एकरूप होणं म्हणजे निवृत्त.

    स्वतःला वेळ देत ओळखणं म्हणजे निवृत्त.

    छंद जोपसण्यासाठी जगणं म्हणजे निवृत्त.

 

खरंच का सोप्पं असतं? का निवृत्त हे मृगजळ ठरतं?

एकटेपण खायला येतं का? एकांतात मन दुबळ बनतं?

 

म्हटलं तर असंच असतं. ठरवलं तर मात्र वेगळं होतं.

मुक्त होऊन मन आनंदात विहरतं

हवं तसं, हवं तेव्हा जगण्याचं स्वातंत्र्य मिळवतं.

 

बेभान झालं तर मी पणात फुगतं.

जगण्याच्या निखळ आनंदाला मुकतं.

मुक्त होऊन जगताना इतरांच्या मदतीला जे धावतं तेच निवृत्तपण

विश्वप्रार्थनेच्या स्मरणात जगण्याचं नवं तंत्र शिकवतं.

 

शुभप्रभाती येऊन तोही सायंकाळी निवृत्त होतो..

पुन्हा सकाळी शुभेच्छारुपी वृत्त आपल्या हाती देतो..

लेखक : श्री. विठ्ठल बाबुराव घाडी

संग्राहिका : सौ. उज्ज्वला पई

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ साठवणीतल्या आठवणी ☆ सौ. मुक्ता महेश अभ्यंकर ☆

सौ. मुक्ता महेश अभ्यंकर

?विविधा ?

☆ साठवणीतल्या आठवणी ☆ सौ. मुक्ता महेश अभ्यंकर ☆

माणूस जन्माला यायच्या आधी पासून साठा त्याच्याशी निगडीत आहे. मुलं जन्माला यायच्या आधी पासूनच आई त्याच्या साठी कपड्यांचा साठा करते. जन्मानंतर जसे वय वाढते आपण वेगवेगळ्या गोष्टीचा साठा करत जातो.

लहानपणी रेल्वेची तिकिटे, शंख शिंपले, बाटल्यांची झाकणे, रंगीत कागद, टरफले, काचांचे तुकडे अश्या विविध गोष्टी आपण साठवतो.

जसे वय वाढते साठवण्याचे प्रकार बदलत जातात.

शाळेत जायला लागलो की झाडाची पाने, वर्तमान पत्रातील व मासिकातील आवडीची कात्रणे, रंगीत सागरगोटे, स्टिकर्स, पत्ते, खोडरबर, पेन्सिली अश्या अनेक गोषटींबाबत आवड निर्माण होते.

तरुणपणी सौंदर्य सामुग्रिंचा साठा, कानातली, बांगड्या, टिकल्या, अत्तर, रुमाल, काही आवडत्या व्यक्ती चे फोटो, वेगवेगळ्या प्रकारचे कपडे, चपला व पुस्तकांचा आपण साठा करत असतो.

मधल्या वयात ह्यात आणखी बदल आढळतो जसे की सासरी गेलेल्या मुलीकडे नवीन कपडे, दागिने, भांडी, पर्स  सारेच नवे नवे आणि हवे हवे असे असते.

पन्नाशीच्या आसपास हा साठा अजून बदलतो. पूर्वी बायका धान्याचा साठा करायच्या, तळणीच्या पदार्थांचा साठा नाहीतर मसाल्यांचा साठा करायच्या. स्वयंपाक घरात डब्यात पैस्यांचा साठा असायचा.

पन्नाशीच्या बायकांचा तर साड्या, दागिने, घरातील भांडी ह्यांचा साठा आपोआप झालेलाच असतो. त्यात अजून नाविन्य पूर्ण वस्तूंचा भर पडतो. पुरुषांच्या बाबतीत जसे की कपडे, चपला, पुस्तके, पेन व पाकिटं ह्या वस्तूंचा साठा आढळतो.

जसे जसे वय वाढते तसे तर आपण आपल्याकडचा साठा कमी करायला पाहिजे पण तो वाढतच जातो मग तो पैश्याचा असो नाहीतर आणखी काही.

वृद्ध व्यक्ती औषधांचा साठा करतात. त्यातील काही पुस्तकांचा, छायाचित्रांचा  तर काही वर्तमान पत्राच्या कात्रणांचासंग्रह करतात. काहिंकडे पिशव्या, टॉवेल आणि पैष्यांचा साठा असतो.

नवीन पिढीला वस्तु साठवायला आवडत नाही. ते जुन्या वस्तू काढून नव्या घेत असतात. म्हणजे जुना साठा संपतो आणि नवीन वस्तूंचा साठा सुरू होतो.

असा सर्व गोष्टींचा साठा करत एक दिवस जेव्हा आपल्याला हे जग सोडून जायची वेळ येते तेव्हा आपण आयुष्यभर जपलेल्या ह्या वस्तू दुसऱ्यांसाठी निरुपयोगी ठरतात.

कधी कधी विचार येतो माणसाला सर्व वस्तू वर घेवून जाता आले असते तर त्याने किती वस्तु साठवल्या असत्या.

खरं तर आपण चांगल्या विचारांचा, कृतींचा आणि आरोग्याचा साठा केला तर आपण आपले आयुष्य अधिक सुखकारक रित्या जगू शकू……

माणूस करत जातो साठवणी

कालांतरी फक्त राहतात आठवणी

जेव्हा त्याची होते जगातून पाठवणी.

© सौ. मुक्ता महेश अभ्यंकर

साहाय्यक प्राध्यापिका, श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ फार्मसी , कोंढवा पुणे

संपर्क :  सन युनिव्हर्स फेज २, एम ५०३, नवले ब्रिज जवळ, नऱ्हे, पुणे.

फोन   : ७५०६२४३०५०

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “इच्छामरण…” – भाग-२ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ “इच्छामरण…” – भाग-२ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

( फार मोठी चूक करत होतो मी–आणि त्यासाठी त्या सगळ्या थोर पुरुषश्रेष्ठांची अगदी मनापासून क्षमा मागतो मी ताई…) -इथून पुढे.

‘ पण मग, धर्माचा आधार न घेताही, आपल्याला असणा-या असाध्य, असह्य अशा शारिरीक व्याधींपासून सुटका करणारा दुसरा कोणताच मार्ग शिल्लक नाही म्हणून कुणी मरणाची इच्छा केली तर त्यात फार काही वावगे आहे असे नाही, असे माझे म्हणणे आहे. ’  

‘ अर्थात् अशा इच्छामरणासाठी काही अटी असाव्यात, जसे की, त्या व्यक्तीला खरोखरच दुर्धर असा आजार आहे, जो औषधोपचारांना दाद देत नाही आहे, आणि कधीच देणार नाहीये, पुरेसा काळ त्या व्यक्तीवर योग्य ते व जास्तीत जास्त शक्य ते सर्व उपचार करून झालेले आहेत आणि आता केवळ मरणाची वाट पहात सहनशक्ती पणाला लावणे एवढेच करण्यासारखे आहे. या सर्व गोष्टी पडताळून पाहून त्यांची खातरजमा करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांची अधिकृत समिती सरकारने स्थापन केलेली असावी, ज्यांनी अशा व्यक्तीच्या प्रकृतीची त्रयस्थपणे पूर्ण तपासणी करून, आजारपणाच्या दुर्धरतेबद्दल खात्रीपूर्वक दुजोरा दिलेला असावा. आजारी माणसाने पूर्ण शुद्धीवर असतांना, त्रयस्थ साक्षीदारांसमोर आपली मरणेच्छा आपणहून मनापासून जाहीर केलेली असावी. किंवा आजारी माणूस पूर्ण बेशुध्दावस्थेत बराच काळपर्यंत असेल, आणि त्यातून बाहेर येऊन तो काही बोलेल याची डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अजिबात शक्यता नसेल, तर त्याच्या अगदी निकटच्या अशा मुला-माणसांनीही केवळ त्या व्यक्तीवरील प्रेमापोटी याबाबत विचार करण्यास हरकत नसावी. पण त्यांच्या या विचारामागे कोणतेही आथिक किंवा इतर व्यवहार गुंतलेले नाहीत याची स्वतंत्रपणे, अगदी  व अधिकृतपणे शहानिशा करण्याची तजवीज कायद्याने केलेली असावी.’

‘ सर्वात महत्त्वाचे म्हणजे, इच्छामरणाला परवानगी देण्यापूर्वी, ज्याला मरायचे आहे, त्याचीच फक्त तशी इच्छा आहे, इतर कोणाचीही नाही, याची पूर्ण खात्री करून घेणे सर्वात जास्त आवश्यक आहे. अर्थात् मरणासन्न अवस्थेत नेऊन पोहोचविणा-या ‘असाध्य’ शारीरिक व्याधीतून सुटण्यासाठीच केवळ ‘इच्छामरण’ हा पर्याय मान्य करता येण्याजोगा आहे. म्हणजेच कोणत्याही कारणामुळे आलेल्या मानसिक वैफल्यातून केलेल्या आत्महत्येला कधीही इच्छामरण म्हणता येणार नाही हे सर्वप्रथम स्पष्ट असावे…‘

बोलता बोलता हा भाऊ जरा थांबल्यावर दुसरा भाऊ लगेच बोलायला लागला. पहिल्याचे बोलणे एकदम खोडून काढत तो म्हणाला की …. ‘ कारण कोणतेही असले आणि कितीही नियमांमध्ये व अटींमध्ये बसत असले, तरी इच्छामरण म्हणजे शेवटी आत्महत्याच, जी अजिबात समर्थनीय नाही. जन्म आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी माणसाच्या हातात नाहीत. जन्माबद्दल तर काही प्रश्नच नाही, पण मृत्यूसुध्दा माणसाने असा ठरवून मागून घेणे, जरी शक्य असले तरी, अजिबात बरोबर नाही. कारण जन्माला येतांना जेवढ्या श्वासांची शिदोरी त्याने बरोबर आणली होती तेवढे श्वास घेऊन झाल्याशिवाय मरणे म्हणजे आत्म्याला अगदी ठरवून अतृप्त भरकटत ठेवण्यासारखे आहे. जे भोग भोगण्यासाठी हा जन्म मिळाला आहे, ते सर्व भोगल्याशिवाय मरण येऊच नये. ईश्वरी इच्छा नसतांना, स्वत:च्या इच्छेने मरण यावे यासाठी प्रयत्न करणे हे मोठे पापच आहे. म्हणून कुणालाही इच्छामरणाची मुभा नसावी. मरणासन्न असणा-या आजा-यालाही मरणाचा योग येईपर्यंत मरणयातना सोसण्याचा भोग भोगायलाच हवा, आणि हो, त्याची सेवा करणा-यांनीही, अशी सेवा करणे हा त्यांचा भोग आहे असे समजून शांतपणे सेवा करीत रहावे. इच्छामरण हा विचारही नको. ’ 

दोन सख्ख्या भावांच्या  या दोन टोकाच्या विचारांवर विचार करता करता माझे मन मात्र तिसरीकडेच भरकटत होते. आपल्या आजूबाजूचे आजकालचे भीषण वास्तव पहाता, सर्व जीवनावश्यक वस्तूंमधली सर्वात स्वस्त व सहजपणे उपलब्ध होणारी वस्तू म्हणजे ‘माणसाचा जीव’…. असे माझ्यासारख्या सर्वांनाच  जाणवत असेल. कितीही काळजीपूर्वक आणि पूर्ण सुरक्षित वाटणारी कायदेशीर तरतूद करून, सर्वसमावेशक अटी घालून, इच्छामरणाला अधिकृत परवानगी जरी दिली, तरी, हे नियम पाळले असे भासवण्यासाठी आवश्यक तो भ्रष्टाचार करून, एखाद्या व्यक्तीने इच्छामरण स्वीकारले असल्याचा देखावा निर्माण करून, आपल्या स्वार्थासाठी त्याला जिवे मारायचे आणि स्वत:च छाती पिटत त्याची अंत्ययात्रा काढायची, अशी नवीच कायदेशीर पळवाट तर गुंडांना मिळणार नाही ना, हीच भीती माझ्या मनात सर्वप्रथम आली. आणि इच्छामरणाला परवानगी म्हणजे एखाद्या असहाय्य जीवाला आपल्या असाध्य दुखण्याच्या यातनांमधून सोडविण्याची मुभा, एवढाच अर्थ न रहाता, ‘ नको असणा-या कोणालाही खात्रीशीर ‘संपविण्याचा’ कायदेसंमत राजमार्ग ‘ असा त्याचा सोयीस्कर वापर होण्याचा फार मोठा धोका त्यात आहे हे मला प्रकर्षाने जाणवून गेले. ‘मन चिंती ते वैरी न चिंती’ म्हणतात ते असं ! पण तरीही, माझ्या आईसारखी प्रकृतीची अवस्था असणा-यांना, माणुसकीच्या नात्याने, निव्वळ प्रेमापोटी – दयेपोटी इच्छामरणाची परवानगी असायला हवी हा विचार आधी वाटला तेवढा क्रूरपणाचा नाही, या विचाराकडे मात्र माझे मन नकळतच झुकू लागले होते.

आईबद्दल हा असा विचार मनात येताच, बोलणे तिथेच थांबवून मी झटकन् उठून खोलीकडे निघाले, तर नर्स आम्हाला बोलवायलाच येत होती. डॉक्टर आधीच आईजवळ पोहोचले होते. आम्हाला पाहताच डॉक्टरांनी नजरेनेच आम्हाला सत्य सांगितले. आमची आई आम्हाला कायमची सोडून गेली होती. तिच्या मरणेच्छेवर आम्ही विचारांचा खल करत बसलो होतो, पण देवाने मात्र तिची ती मनापासूनची इच्छा अखेर पूर्ण केली होती.

मनाच्या त्या अतीव दु:खी आणि हतबल अवस्थेतही मला प्रकर्षाने वाटून गेले की खरंच, मुलांना कधीही कोणताही त्रास व्हायला नको यासाठी आयुष्यभर दक्ष असणा-या आईने, आत्ताही ती काळजी घेतली होती. डॉक्टरांनी आमच्यासमोर टाकलेला जीवघेणा पेच, आम्ही त्यात अडकून गेलोय् हे पाहून, तिनेच नेहेमीसारखा सहजपणे सोडवून टाकला होता. आता आम्हाला करण्यासारखे काहीच उरले नव्हते…….

… तरीही मनात एका प्रश्नाचा भुंगा फिरायला लागलाच होता…… आईच्या मृत्यूला ‘ नैसर्गिक मृत्यू ‘ म्हणायचे, की …. तिच्या अंतर्मनात ठामपणे घर करून राहिलेल्या मरणाच्या विचाराचा विजय झाल्याने आलेले हे प्रामाणिक आणि अगदी मनापासूनचे “ इच्छामरण “ म्हणायचे हा ?????

– समाप्त –

प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ डोळा… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ डोळा… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

डोळा लागणे (झोप लागणे)

डोळा मारणे (इशारा करणे)

डोळा चुकवणे (गुपचूप जाणे)

डोळे येणे (नेत्रविकार होणे)

डोळे जाणे (दृष्टी गमावणे)

डोळे उघडणे (सत्य उलगडणे)

डोळे मिटणे (मृत्यू पावणे)

डोळे खिळणे (एकटक पाहणे)

डोळे फिरणे (बुद्धी भ्रष्ट होणे)

डोळे दिपणे (थक्क होणे)

डोळे वटारणे (नजरेने धाक दाखवणे)

डोळे विस्फारणे (आश्चर्याने पाहणे)

डोळे पांढरे होणे (भयभीत होणे)

डोळे भरून येणे (रडू येणे)

डोळे भरून पाहणे (समाधान होईपर्यंत पाहणे)

डोळे फाडून पाहणे (आश्चर्याने निरखून पाहणे)

डोळे लावून बसणे (वाट पाहात राहणे)

डोळेझाक करणे (दुर्लक्ष करणे)

डोळ्यांचे पारणे फिटणे (पूर्ण समाधान होणे)

डोळ्यात प्राण आणणे (आतुरतेने वाट पाहणे)

डोळ्यात धूळ फेकणे (फसवणूक करणे)

डोळ्यात तेल घालून बघणे (लक्षपूर्वक पाहणे)

डोळ्यात डोळे घालून पाहणे (एकमेकांकडे प्रेमाने बघणे)

डोळ्यात सलणे/खुपणे (दुसऱ्याचं चांगलं न बघवणे)

डोळ्यात अंजन घालणे (दुसऱ्याला परखडपणे त्याची चूक दाखवून देणे)

डोळ्यांवर कातडे ओढणे (जाणूनबुजून दुर्लक्ष करणे)

डोळ्याला डोळा नसणे (काळजीमुळे झोप न लागणे)

डोळ्याला डोळा भिडवणे (नजरेतून राग व्यक्त करणे)

डोळ्याला डोळा न देणे (अपराधी भावनेपोटी एखाद्याच्या नजरेस नजर न मिळवणे)

दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसणे ; पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ न दिसणे (दुसऱ्याची छोटीशी चूक दिसणे ; पण स्वतःची मोठी चूक न दिसणे)

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ मृगतृष्णा… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ मृगतृष्णा… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

 “अरं  ढवळ्या लेका! का असं गठुळ्यागत अंग मुडपूनशान खाली बसलास? मळ्याकडं जोताला जायचं नव्हं का आपुल्याला? धाकलं मालक आता वाड्यातून दहीभाकरचा तुकडा खाऊन बाहीर येतील कि मर्दा! आनी तु असा बसलेला बघितल्यावर खवळायचं न्हाई व्हयं?… आरं ह्यो आळस सोड नि गपगुमान उभा राहा बघू!.. “

“… पवळ्या दादा, म्या आता जो हथं बसलोय ना त्ये काय लवकर उठायचं नावं घेनार नायं… आवं दादा आता कालच दिव्याची आवस उलाटली.. अन सारवण सुरू झाला तरी पाउसाचा टिपुस काय गळाया तयार न्हाई… पार उन्हाळ्यातल्यावानी उनाचा कडाका तसाच पडतोय कि… आजवर चार बाऱ्या झाल्या नांगरटणीला खेटं घालून.. वळीवानं तोंड वळविलं, म्रिगानं तर तोंड दावलचं न्हाई, ती मधली दोनी बी लबाड नक्षत्रं पाठ दाखवूनच गायब… आरं जित्राबं सुध्दा बिळं सोडून गेली तत मानसांची नि  आपली काय गत झालीया, तुला कायं येगळं सांगाय हवं काय? ढेकळांचा चोक शोष पडल्यावानी उताणी पडलेली रानं… हिरीचं, ओढयाचं खरवडून निघालेलं  पानं.. रोज मैल मैल धुरळा उडवीत जाऊन एक कळशीभर पाणीची उसाभर करून आपला तर जीव पार धायकुतीला आला बघं… दादा आता अवसान गळाठयला बघं… चार पावलं उचलून टाकाया न्हाई जमायचं… ते धाकलं मालक येऊ देत न्हाई तर मोठ्ठं… मला  इथचं पडून राहावंसं वाटतया… दादा आता माझा राम राम करायची येळ झाली बघा… तुम्ही वाईट वाटूनशान घेऊ नका… तुमचा  आमचा संबंध इथवर छान जुळला… मला तुमी लै सांभाळून घेतलसा…. आता दादा तुम्ही सोताला सांभाळा… म्या जरा आता निवांत पडून राहतो… मालकानां माझा राम राम सांगा.. “

” अरं ढवळ्या, असं काय येड्यावानी बरळतूया! आरं ते बघं काळं निबारं ढग दाटून आल्याती… पावसाची झड येऊ लागली… गार वारं सुटलं लेका.. आला आला बघ पाऊस सुरू झाला कि येड्या! आरं उठं चटदिशी उभा राहा… पावसाच्ं पाणी पिऊन घे बघं कशी तरतरी येती ते… उठं कि रे गब्रु… अरं उठं.. उठं.. “

ढगांच्या गडगडाटात, विजेच्या लखलखाटात पावसाच्या रूपेरी धारा बरसू लागल्या… संजीवनी घेऊन आलेला पाऊस मात्र ढवळयाची तहान भागवू शकला नाही…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “या जन्मावर शतदा प्रेम करावे…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

☆ “या जन्मावर शतदा प्रेम करावे…” ☆ सौ राधिका भांडारकर 

या जन्मावर शतदा प्रेम करावे.

सुरुवातीलाच मी सांगू इच्छिते की,  या विषयावर लेख लिहिताना माझी भूमिका उपदेश करण्याची नक्कीच नाही. हे करा, ते करा, असे करावे, असे वागावे, सकारात्मक काय, नकारात्मक काय असे काहीही मला सांगायचे नाही. कारण माझी पक्की खात्री आहे की जे लोक दुसऱ्याला सांगण्याचा किंवा उपदेश करण्याचा अधिकार गाजवतात, त्यांना एक श्रेष्ठत्वाची भावना असते आणि जी अहंकारात परावर्तित होते आणि तिथेच त्यांच्या आनंदी जगण्याची पहिली पायरीच कोसळते.

“या जन्मावर शतदा प्रेम करावे”  हा ही एक सल्लाच आहे खरंतर.  पण तो पाडगावकरांसारख्या महान कवीने अत्यंत नम्रपणे दिलेला आहे.  त्यांच्या श्रेष्ठत्वाला मान देऊन मी फक्त माझ्या जगून झालेल्या आयुष्यात मी खरोखरच जगण्यावर प्रेम केले का या प्रश्नाचे फक्त उत्तर शोधणार आहे.  आणि ते जर “हो” असेल तर कसे,आणि त्यामुळे मला नक्की काय मिळालं एवढंच मी तुम्हाला सांगणार आहे.  बाकी तुमचं जीवन तुमचं जगणं यात मला ढवळाढवळ अजिबात करायची नाही.

जीवन एक रंगभूमी आहे, जीवन म्हणजे संघर्ष, जीवन म्हणजे ऊन सावली, खाच खळगे, चढ उतार, सुखदुःख,शंभर धागे, छाया प्रकाश असे खूप घासलेले, गुळगुळीत विचारही मला आपल्यासमोर मांडायचे नाहीत.  कारण मी एकच मानते जीवन हा एक अनुभव प्रवाह आहे. आणि तो प्रत्येकासाठी वेगळा असूच  शकतो.  त्यामुळे आता या क्षणी तरी मी कशी जगले, हरले की जिंकले, सुखी की दुःखी, निराश की आनंदी, माझ्या जगण्याला मी न्याय दिला का, मी कुणाशी कशी वागले, कोण माझ्याशी कसे वागले या साऱ्या प्रश्नांकडे मी फक्त डोळसपणे पाहणार आहे.  नव्हे, माझ्या आयुष्यरुपी पुस्तकातले  हे प्रश्न मी स्वतःच वाचणार आहे.

७५ वर्षे माझ्या जीवनाच्या इनबॉक्समध्ये कुणी एक अज्ञात सेंडर रोजच्या रोज मला  मेल्स पाठवत असतो. त्यातल्या मोजक्याच मेल्सकडे  माझं लक्ष जातं आणि बाकी साऱ्या जंक मेल्स मी अगदी नेटाने डिलीट करत असते.  आणि हे जाणत्या वयापासून आज या क्षणापर्यंत मी नित्यनेमाने करत आहे.  आणि याच  माझ्या कृतीला मी “माझं जगणं” असं  नक्कीच म्हणू शकते.

मला माहित नाही मी आनंदी आहे का पण मी दुःखी नक्कीच नाही.  त्या अज्ञात सेंडरने मला नित्यनेमाने माझ्या खात्यातील शिल्लक कळवली, सावधानतेचे इशारे दिले, कधी खोट्या पुरस्कारांचे आमीष दाखवून अगदी ठळक अक्षरात अभिनंदन केले,  कधी दुःखद बातम्या कळवल्या, कधी सुखद धक्के दिले,  अनेक प्रलोभने  दाखवली, अनेक वाटांवरून मला घुमवून आणलं,  दमवलं, थकवलंही  आणि विश्रांतही केलं.  पण त्याने  पाठवलेली एकही मेल मी अनरेड ठेवली नाही.  कधी व्हायरसही आला आणि माझे इनबॉक्स क्रॅशही झाले. मी मात्र ते सतत फॉरमॅट करत राहिले.

CONGRATULATIONS! YOU HAVE WON!

हा आजचा  ताजा संदेश. या क्षणाचा.

पण हा क्षण आणि पन्नास वर्षांपूर्वीचा एक क्षण याचं कुठेतरी गंभीर नातं आहे याची आज मला जाणीव होत आहे.

पन्नास वर्षांपूर्वी मी एका भावनिक वादळात वाहून गेले होते.  एका अत्यंत तुटलेल्या, संवेदनशील अपयशामुळे खचून गेले होते.  माझा अहंकार दुखावला होता, माझी मानहानी झाली होती, मला रिजेक्टेड वाटत होतं.

घराचा जिना चढत असताना एक एक पायरी तुटत होती. दरवाजातच वडील उभे होते. त्यांची तेज:पूंज मूर्ती, आणि त्यांच्या  भावपूर्ण पाणीदार डोळ्यांना  मी डोळे भिडवले तेव्हा त्यांनी मूक पण जबरदस्त संदेश मला क्षणात दिला,

” धिस इज नॉट द एन्ड ऑफ लाईफ.  खूप आयुष्य बाकी आहे. बघ, जमल्यास त्या “बाकी” वर प्रेम कर आपोआपच तुला पर्याय सापडतील.”

वडील आता नाहीत पण ती नजर मी माझ्या मनात आजपर्यंत सांभाळलेली आहे.  आणि त्या नजरेतल्या प्रकाशाने माझे भविष्यातले सगळे अंधार उजळवले. तेव्हांपासून  मी जीवनाला एक आवाहन समजले.  कधीच माघार घेतली नाही.  क्षणाक्षणावर प्रेम केले. फुलेही वेचली आणि काटेही वेचले. कधीच  तक्रार केली नाही.

महान कवी पर्सी  शेले म्हणतो

We look before and after,

And pine for what is not:

Our sincerest laughter

With some pain is fraught;

Our sweetest songs are those that tell of saddest thought.

शालेय जीवनात पाठ्यपुस्तकातील काळे सरांनी शिकवलेली ही कविता हृदयाच्या कप्प्यात चिकटून बसली आहे.  तेव्हां  एवढाच अर्थ कळला होता की,

“आपण मागे आणि पुढे बघतो आणि नसणाऱ्या,न मिळालेल्या  गोष्टींवर दुःख करतो आणि या दुःखी भावनेवर आपण आपलं सारं हास्यच उधळून लावतो.  मग आपले जीवन गाणे  हे फक्त एक रडगाणे  होते.

जगत असताना, पर्सी शेलेच्या  या सुंदर काव्यरचनेतला एक दडलेला उपहासात्मक अर्थ आहे ना,  त्याचा मागोवा घेतला आणि नकळतच कसे जगावे, जगणे एक मधुर गाणे कसे करावे याची एक सहज आणि महान शिकवण मिळाली. लिव्ह अँड लेट लिव्ह हे आपोआपच मुरत गेलं. 

चार्ली चॅपलीन हे माझं दैवत आहे.  तो तर माझ्याशी रोजच बोलतो जणू! मी थोडी जरी निराश असले तर म्हणतो,” हसा! हसा! भरपूर  आणि खरे हसा. दुःखांशी मैत्री करा,त्यांच्यासमवेत  खेळायला शिका.”

एकदा सांगत होता,” मी पावसात चालत राहतो म्हणजे माझ्या डोळ्यातले अश्रू कुणाला दिसत नाहीत.”

“अगं! मलाही आयुष्यात खूप समस्या आहेत पण माझ्या ओठांना त्यांची ओळखच नाही ते मात्र सतत हसत असतात.”

गेली ७५ वर्ष मी या आणि अशा अनेक प्रज्वलित पणत्या माझ्या जीवनाच्या उंबरठ्यावर तेवत ठेवल्या आहेत ज्यांनी माझं जगणं तर उजळलं पण मरणाचीही  भिती दूर केली.

परवा माझी लेक  मला साता समुद्रा पलीकडून चक्क रागवत होती.

“मम्मी तुझ्या मेल मध्ये फ्रेंड चे स्पेलिंग चुकले आहे. तू नेहमी ई आय एन डी का लिहितेस? इट इज  एफ आर आय  ई एन् डी.”

ज्या मुलीला मी हाताचे बोट धरून शिकवले ती आज माझ्या चुका काढते चक्क! पण आनंद आहे,  मी तिला,  “टायपिंग मिस्टेक”  असं न म्हणता म्हटलं,

“मॅडम! मला तुमच्याकडून अजून खूपच शिकायचे आहे. तुम्ही नव्या तंत्र युगाचे,आजचे  नवे शिल्पकार.  त्या बाबतीत मी तर पामर, निरक्षर.”

तेव्हा ती खळखळून हसली.  तिच्या चेहऱ्यावरचा हा दोन पिढ्यांमधला अंतर संपवून टाकणारा आनंद मला फारच भावला. 

तेव्हा हे असं आहे.  तुम्ही असं जगून पहा, शंभर वेळा प्रेम करा जीवनावर.

सॉरी!  असा उपदेश मी तुम्हाला करणार नाही कारण मला तो अधिकारच नाही.  मी फक्त माझा अनुभव सांगितला बाकी मर्जी तुमची.

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “इच्छामरण…” – भाग-१ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ “इच्छामरण…” – भाग-१ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

अतिशय उद्विग्न मनानेच मी खोलीतून बाहेर पडले. नेहेमीच लक्ष वेधून घेणा-या बाहेरील बागेकडे आज मात्र माझे अजिबात लक्ष गेले नाही. माझे मनच मुळी था-यावर नव्हते. जन्म-मृत्यूच्या सीमारेषेवर, तळ्यात की मळ्यात हे न कळण्याच्या टप्प्यावर येऊन थबकलेली माझी आई आत खोलीत निपचित पडली होती. एरवी खुट्ट झाले तरी जागी होणारी आई, आज व्हेंटिलेटरच्या धकधक आवाजातही अगदी शांत झोपली होती. आणि हे पाहून माझ्या मनाला एक अनामिक हुरहूर लागली होती. चालू असलेला कृत्रिम श्वासोच्छवास सोडला तर तिची इतर गात्रे अगदी म्लान, जीवच उरला नसल्यासारखी होऊन गेली होती. आणि ते पाहून आम्ही सर्वजण हरवल्यासारखे, हतबल होऊन, एकमेकांकडे पहात बसण्याखेरीज काहीच करू शकत नव्हतो. अगदी काही क्षणांसाठी व्हेंटिलेटर काढला तरी श्वासासाठी होणारी आईची असह्य तडफड आम्हाला अत्यंत बेचैन करत होती. आणि कालपासून दोन-तीन वेळा हा प्रयोग झाल्यावर मग डॉक्टरांनीच आमच्यासमोर तो मन हेलावून टाकणारा विचार मांडला होता. व्हेंटिलेटर काढून टाकून,आईचा शेवटचा नैसर्गिक श्वास कोणता असेल ते पहात बसण्याचा….  तिच्या मरणाची वाट पहात बसण्यासारखेच होते हे.

याच विचाराने उद्विग्न होऊन मी खोलीबाहेर आले होते. जरा वेळाने नकळतच या उद्विग्नतेची जागा विचारांनी घेतली. आईची दिवसेंदिवस खालावणारी प्रकृती, त्यावर अगदी प्रामाणिकपणे केले जाणारे पण अजिबात उपयोगी पडत नसलेले अद्ययावत, दीर्घ उपचार, एकामागोमाग एक शिथिल होत गेलेले जवळजवळ सगळेच अवयव, आणि आता हा शेवटचा उपचार – कृत्रिम श्वासोच्छवास. हा सगळा प्रवास अशा शेवटच्या पायरीवर येऊन एखाद्या कोड्यासारखा थांबला होता. ते कोडे सोडविणा-या एका चुटकीचीच जणू वाट पहात, आणि ही चुटकी वाजवण्याचे अत्यंत क्लेशदायी, मनात अपराधीपणाची भावना कायमसाठी रुजवू शकणारे काम डॉक्टरांनी अगदी निर्विकारपणे आमच्यावर सोपवले होते. काय निर्णय घेणार होतो आम्ही? आपल्या जन्मदात्या आईचे आयुष्य जाणीवपूर्वक संपवून टाकण्याचा असा क्रूर निर्णय घेऊ शकणार होतो का आम्ही? काहीच सुचत नव्हते.

विचार करता करता नाण्याची दुसरी बाजू लख्ख दिसायला लागली. इतर सर्व अवयव निकामी झाले तरी श्वास चालू असेपर्यंत आईचे अंतर्मन नक्कीच जागे असणार. मग अतिशय कष्टाने, स्वावलंबनाने आणि उमेदीने घडवलेले, सजवलेले आपले मनस्वी आयुष्य, असे विकलांगी, परावलंबी, जाणीव-नेणिवेवर हिंदकाळतांना पाहून तिच्या स्वाभिमानी मनाला किती अतोनात यातना होत असतील, या विचाराने मी एकदम अस्वस्थ झाले आणि जराशी सावरून बसले. तिच्या शारिरीक यातना अगदी तज्ञ डॉक्टरही दूर करू शकत नाहीत हे जरी खरे असले, तरी तिच्या मनाला होणा-या असह्य यातना तर आम्हीच थांबवू शकलो असतो ना… व्हेंटिलेटर काढून टाकून? हा विचार मनात आला आणि मी केवढ्यांदा तरी दचकले. 

…. पण मग वीस दिवसांपूर्वी, जेव्हा ती थोडे बोलू शकत होती, तेव्हाचे तिचे काकुळतीचे बोलणे आठवले. अगदी सहन करण्यापलिकडच्या त्या वेदनांमधून आम्ही तिला सोडवावे, असे ती अगदी आपणहून, मनापासून सारखं सांगत होती. ‘ आजपर्यंत तिने कधीच कोणाकडे काही मागितलेले नाही. तर आता तिचे हे पहिले आणि शेवटचेच मागणे आम्ही मान्य करावे. गांगरून न जाता नीट चौफेर विचार करावा व नाही म्हणू नये. दुखण्याच्या मरणयातनांपेक्षा प्रत्यक्ष मरणंच सुसह्य आहे तेव्हा आता आम्ही तिला जाणिवपूर्वक मरू द्यावं.’… असे आमच्यापैकी प्रत्येकाला ती सांगत होती. तेव्हा ऐकायलाही नकोशा वाटणा-या या बोलण्यावर, आता मात्र विचार करावा असे वाटू लागले. आज तिच्या स्पर्शातूनही तिची ही मरणेच्छा माझ्या मनाला स्पर्शून जात होती. माझ्याही नकळत मी मनाशी काही निश्चय केला आणि मन घट्ट करून सर्वांसमोर अशा इच्छामरणाचा विषय काढण्याचे ठरविले.

‘आईला या यातनांमधून सोडव देवा ’ या प्रार्थनेचा ‘ तिला आता मरण दे ’ असा थेट अर्थ लावायला साहजिकच सगळे घाबरत होते, पण हळूहळू सगळेच बोलते झाले. इच्छामरण काही अटींवर मान्य करावे, इथपासून ते इच्छामरणास अजिबात मान्यता नको, या टोकापर्यंत मतं मांडता मांडता, आपण आपल्या आईबद्दल बोलतो आहोत हा विचारही जरा वेळ नकळतच बाजूला झाला.

एका भावाचे असे म्हणणे होते की …  ‘‘इच्छामरण’ ही संकल्पना मरणासन्न, जराजर्जर माणसाच्या संदर्भात खरोखरच विचार करण्यासारखी आहे. ज्यांची अवस्था ‘ मरण येईना म्हणून जिते हे, जगण्याला ना अर्थ दुजा ’ अशी आहे, त्यांना त्यांच्या मरणप्राय यातनांसह जबरदस्तीने जगवत ठेवणे हे खरे तर विचार करण्याजोगे पाप आहे. वाट्टेल तितके प्रयत्न करूनही हा माणूस त्याच्या दुखण्यातून पूर्ववत् बरा होऊ शकत नाही, इतकेच नव्हे तर कमीतकमी स्वावलंबनही यापुढे शक्य नाही, याची डॉक्टर वारंवार खात्रीपूर्वक सूचना देत असतील आणि ती व्यक्तीही स्वत:ला या यातनांतून सोडवावे अशी अगदी मनापासून, कळकळीची विनंती करत असेल, तर अशावेळी आणखी काही तज्ञ डॉक्टरांचे त्याच्या तब्येतीविषयी, बरे होण्याच्या शक्यतेविषयी मत घेऊन, त्यानुसार त्या आजारी व्यक्तीच्या विनंतीला त्याच्या नातलगांनी, स्वत:च्या मनाविरुध्द पण त्रयस्थ प्रामाणिकपणे विचार करायला खरोखरच काही हरकत नाही. काही धर्मांमध्ये वयोवृद्ध पण अगदी धडधाकट माणसेसुध्दा, संथारा व्रतासारख्या व्रताद्वारा अगदी जाणीवपूर्वक, विचारपूर्वक, संयमाने व शांतपणे, अधिकृतपणे आपले आयुष्य धर्मसंमत मार्गाने संपवू शकतात.’ 

‘ स्वातंत्रवीर सावरकरांसारख्या अतिशय निधड्या छातीच्या ध्येयवेड्या माणसानेही … ‘ प्रायोपवेशन ‘ करून स्वतःहून आपले आयुष्य संपवले होते– नाही  का ? आत्ता खरं तर मला संत ज्ञानेश्वर आणि इतर काही संतही आठवताहेत, ज्यांनी आपले जीवनकार्य संपले हे जाणून जिवंत समाधी घेण्याचा मार्ग स्वीकारला होता, आणि अतिशय शांत आणि स्थिर मनाने ते हा इहलोक सोडून गेले होते. अर्थात हे सगळे संत आपल्यापेक्षा, आपल्याला विचारही करता येणार नाही आणि अजिबात गाठताच येणार नाही अशा फारच उच्च आध्यात्मिक पातळीवर पोहोचलेले होते हे मान्यच करायला हवे. ‘देहाबद्दल वाटणाऱ्या अहंकाराशी लढून, त्याचा पूर्ण नि:पात करून, कार्यकारण उपाधीवर विजय मिळवून जो आत्मरूप झाला आहे, त्याला मिळणारी एक फार महान पदवी म्हणजे संतत्व‘ असे म्हटले जाते.  असामान्य आणि ईश्वरासदृश असणाऱ्या अशा दुर्मिळ आणि अपवादात्मक देवमाणसांशी आपल्यासारख्या सामान्य माणसांनी मनातल्या मनातही तुलना करणे हे खरं तर पापच आहे. तेव्हा या इच्छामरणाच्या संदर्भात त्यांचा विचारही आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या मनात येणे अतिशय चुकीचे आहे. आत्ता इथे, आपल्या या अशा समस्येसंदर्भात त्यांची आठवण यावी हेही खरोखरच पाप आहे. फार मोठी चूक करत होतो मी–आणि त्यासाठी त्या सगळ्या थोर पुरुषश्रेष्ठांची अगदी मनापासून क्षमा मागतो मी ताई …. ‘ 

क्रमशः भाग पहिला

प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print