सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ “इच्छामरण…” – भाग-२ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

( फार मोठी चूक करत होतो मी–आणि त्यासाठी त्या सगळ्या थोर पुरुषश्रेष्ठांची अगदी मनापासून क्षमा मागतो मी ताई…) -इथून पुढे.

‘ पण मग, धर्माचा आधार न घेताही, आपल्याला असणा-या असाध्य, असह्य अशा शारिरीक व्याधींपासून सुटका करणारा दुसरा कोणताच मार्ग शिल्लक नाही म्हणून कुणी मरणाची इच्छा केली तर त्यात फार काही वावगे आहे असे नाही, असे माझे म्हणणे आहे. ’  

‘ अर्थात् अशा इच्छामरणासाठी काही अटी असाव्यात, जसे की, त्या व्यक्तीला खरोखरच दुर्धर असा आजार आहे, जो औषधोपचारांना दाद देत नाही आहे, आणि कधीच देणार नाहीये, पुरेसा काळ त्या व्यक्तीवर योग्य ते व जास्तीत जास्त शक्य ते सर्व उपचार करून झालेले आहेत आणि आता केवळ मरणाची वाट पहात सहनशक्ती पणाला लावणे एवढेच करण्यासारखे आहे. या सर्व गोष्टी पडताळून पाहून त्यांची खातरजमा करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांची अधिकृत समिती सरकारने स्थापन केलेली असावी, ज्यांनी अशा व्यक्तीच्या प्रकृतीची त्रयस्थपणे पूर्ण तपासणी करून, आजारपणाच्या दुर्धरतेबद्दल खात्रीपूर्वक दुजोरा दिलेला असावा. आजारी माणसाने पूर्ण शुद्धीवर असतांना, त्रयस्थ साक्षीदारांसमोर आपली मरणेच्छा आपणहून मनापासून जाहीर केलेली असावी. किंवा आजारी माणूस पूर्ण बेशुध्दावस्थेत बराच काळपर्यंत असेल, आणि त्यातून बाहेर येऊन तो काही बोलेल याची डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अजिबात शक्यता नसेल, तर त्याच्या अगदी निकटच्या अशा मुला-माणसांनीही केवळ त्या व्यक्तीवरील प्रेमापोटी याबाबत विचार करण्यास हरकत नसावी. पण त्यांच्या या विचारामागे कोणतेही आथिक किंवा इतर व्यवहार गुंतलेले नाहीत याची स्वतंत्रपणे, अगदी  व अधिकृतपणे शहानिशा करण्याची तजवीज कायद्याने केलेली असावी.’

‘ सर्वात महत्त्वाचे म्हणजे, इच्छामरणाला परवानगी देण्यापूर्वी, ज्याला मरायचे आहे, त्याचीच फक्त तशी इच्छा आहे, इतर कोणाचीही नाही, याची पूर्ण खात्री करून घेणे सर्वात जास्त आवश्यक आहे. अर्थात् मरणासन्न अवस्थेत नेऊन पोहोचविणा-या ‘असाध्य’ शारीरिक व्याधीतून सुटण्यासाठीच केवळ ‘इच्छामरण’ हा पर्याय मान्य करता येण्याजोगा आहे. म्हणजेच कोणत्याही कारणामुळे आलेल्या मानसिक वैफल्यातून केलेल्या आत्महत्येला कधीही इच्छामरण म्हणता येणार नाही हे सर्वप्रथम स्पष्ट असावे…‘

बोलता बोलता हा भाऊ जरा थांबल्यावर दुसरा भाऊ लगेच बोलायला लागला. पहिल्याचे बोलणे एकदम खोडून काढत तो म्हणाला की …. ‘ कारण कोणतेही असले आणि कितीही नियमांमध्ये व अटींमध्ये बसत असले, तरी इच्छामरण म्हणजे शेवटी आत्महत्याच, जी अजिबात समर्थनीय नाही. जन्म आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी माणसाच्या हातात नाहीत. जन्माबद्दल तर काही प्रश्नच नाही, पण मृत्यूसुध्दा माणसाने असा ठरवून मागून घेणे, जरी शक्य असले तरी, अजिबात बरोबर नाही. कारण जन्माला येतांना जेवढ्या श्वासांची शिदोरी त्याने बरोबर आणली होती तेवढे श्वास घेऊन झाल्याशिवाय मरणे म्हणजे आत्म्याला अगदी ठरवून अतृप्त भरकटत ठेवण्यासारखे आहे. जे भोग भोगण्यासाठी हा जन्म मिळाला आहे, ते सर्व भोगल्याशिवाय मरण येऊच नये. ईश्वरी इच्छा नसतांना, स्वत:च्या इच्छेने मरण यावे यासाठी प्रयत्न करणे हे मोठे पापच आहे. म्हणून कुणालाही इच्छामरणाची मुभा नसावी. मरणासन्न असणा-या आजा-यालाही मरणाचा योग येईपर्यंत मरणयातना सोसण्याचा भोग भोगायलाच हवा, आणि हो, त्याची सेवा करणा-यांनीही, अशी सेवा करणे हा त्यांचा भोग आहे असे समजून शांतपणे सेवा करीत रहावे. इच्छामरण हा विचारही नको. ’ 

दोन सख्ख्या भावांच्या  या दोन टोकाच्या विचारांवर विचार करता करता माझे मन मात्र तिसरीकडेच भरकटत होते. आपल्या आजूबाजूचे आजकालचे भीषण वास्तव पहाता, सर्व जीवनावश्यक वस्तूंमधली सर्वात स्वस्त व सहजपणे उपलब्ध होणारी वस्तू म्हणजे ‘माणसाचा जीव’…. असे माझ्यासारख्या सर्वांनाच  जाणवत असेल. कितीही काळजीपूर्वक आणि पूर्ण सुरक्षित वाटणारी कायदेशीर तरतूद करून, सर्वसमावेशक अटी घालून, इच्छामरणाला अधिकृत परवानगी जरी दिली, तरी, हे नियम पाळले असे भासवण्यासाठी आवश्यक तो भ्रष्टाचार करून, एखाद्या व्यक्तीने इच्छामरण स्वीकारले असल्याचा देखावा निर्माण करून, आपल्या स्वार्थासाठी त्याला जिवे मारायचे आणि स्वत:च छाती पिटत त्याची अंत्ययात्रा काढायची, अशी नवीच कायदेशीर पळवाट तर गुंडांना मिळणार नाही ना, हीच भीती माझ्या मनात सर्वप्रथम आली. आणि इच्छामरणाला परवानगी म्हणजे एखाद्या असहाय्य जीवाला आपल्या असाध्य दुखण्याच्या यातनांमधून सोडविण्याची मुभा, एवढाच अर्थ न रहाता, ‘ नको असणा-या कोणालाही खात्रीशीर ‘संपविण्याचा’ कायदेसंमत राजमार्ग ‘ असा त्याचा सोयीस्कर वापर होण्याचा फार मोठा धोका त्यात आहे हे मला प्रकर्षाने जाणवून गेले. ‘मन चिंती ते वैरी न चिंती’ म्हणतात ते असं ! पण तरीही, माझ्या आईसारखी प्रकृतीची अवस्था असणा-यांना, माणुसकीच्या नात्याने, निव्वळ प्रेमापोटी – दयेपोटी इच्छामरणाची परवानगी असायला हवी हा विचार आधी वाटला तेवढा क्रूरपणाचा नाही, या विचाराकडे मात्र माझे मन नकळतच झुकू लागले होते.

आईबद्दल हा असा विचार मनात येताच, बोलणे तिथेच थांबवून मी झटकन् उठून खोलीकडे निघाले, तर नर्स आम्हाला बोलवायलाच येत होती. डॉक्टर आधीच आईजवळ पोहोचले होते. आम्हाला पाहताच डॉक्टरांनी नजरेनेच आम्हाला सत्य सांगितले. आमची आई आम्हाला कायमची सोडून गेली होती. तिच्या मरणेच्छेवर आम्ही विचारांचा खल करत बसलो होतो, पण देवाने मात्र तिची ती मनापासूनची इच्छा अखेर पूर्ण केली होती.

मनाच्या त्या अतीव दु:खी आणि हतबल अवस्थेतही मला प्रकर्षाने वाटून गेले की खरंच, मुलांना कधीही कोणताही त्रास व्हायला नको यासाठी आयुष्यभर दक्ष असणा-या आईने, आत्ताही ती काळजी घेतली होती. डॉक्टरांनी आमच्यासमोर टाकलेला जीवघेणा पेच, आम्ही त्यात अडकून गेलोय् हे पाहून, तिनेच नेहेमीसारखा सहजपणे सोडवून टाकला होता. आता आम्हाला करण्यासारखे काहीच उरले नव्हते…….

… तरीही मनात एका प्रश्नाचा भुंगा फिरायला लागलाच होता…… आईच्या मृत्यूला ‘ नैसर्गिक मृत्यू ‘ म्हणायचे, की …. तिच्या अंतर्मनात ठामपणे घर करून राहिलेल्या मरणाच्या विचाराचा विजय झाल्याने आलेले हे प्रामाणिक आणि अगदी मनापासूनचे “ इच्छामरण “ म्हणायचे हा ?????

– समाप्त –

प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments