? मनमंजुषेतून ?

जमणार का तुम्हाला असा चातुर्मास? ☆ सुश्री सुनिता जोशी

एक सहज सुचलेली संकल्पना. १५ दिवसात चातुर्मास चालू होत आहे. आणि आजच दैनिक सकाळ मध्ये वाचनात आले की चातुर्मासातील आरोग्य जपण्यासाठी दिलेला एक उपाय. आणि तो म्हणजे मौन पाळणे किंवा कमी बोलणे. पावसाळ्यात अग्नी मंद झालेला असतो आणि मुख्य म्हणजे चैतन्य मंदावले की ताकद कमी झालेली असते. हा खरा आरोग्याचा नियम आहे. म्हणजे आजकालच्या काळात जेवढे कामासाठी आवश्यक आहे असे बोलणे. तर मुख्य मुद्दा हा आहे की मौन पाळणे. या गोष्टीची सगळ्यात जास्त गरज आहे ती म्हणजे सध्याच्या राजकारणातील वायफळ बडबड करणा-या नेत्यांना. खास करून महाराष्ट्रातील राजकारणी लोकांना.

खरं बघायला गेलं तर आपण निवडून दिलेला नेता किंवा विरोधी नेता हा त्या त्या भागातील लोकांचे प्रश्न, तेथील समस्या, त्या भागातील विकास या सगळ्याशी निगडीत असला पाहिजे. दिवस रात्र त्याच्या मनात माझ्या जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून दिलेल्या मताची किंमत हवी, जाणीव हवी, मदतीची म्हणजे योग्य सहकार्याची हमी असावी. परंतु कोणताही नेत्याला सध्या याचे काहीही पडलेले नाही. फक्त आणि फक्त तोंड उघडायचे आणि तोंडाला येईल ते बोलायचे. म्हणजे आपण काय बोलतो आहोत याचा विचारच नाही. खूप काही अभ्यास करता येण्याजोगे, काम करता येण्याजोग्या गोष्टी राजकारणी लोकांना करता येण्यासारख्या आहेत. पण त्या सोडून आपण प्रश्नाला उत्तर देत आपली बाजू मांडायची आणि पुन्हा दुस-याला प्रश्न विचारायचा. पुन्हा त्याने त्याचे उत्तर द्यायचे आणि परत प्रश्न. अरे काय चालू आहे हे? 

तुम्ही फक्त जनतेला बांधील असले पाहिजे उत्तरे द्यायला आणि जनतेनेही त्यांना तसेच प्रश्न विचारले पाहिजेत. पण असो. सध्या आपला मुद्दा आहे तो मौनाचा. खरच आजचे गलिच्छ राजकारण टि.व्ही. चालू केला की– याने त्याला असे म्हंटले, त्याने त्याला असे म्हंटले हे ऐकवत नाही, पहावत नाही. मिडियालाही हेच हवे आहे. दिवसभर ब्रेकींग न्यूज म्हणून तेच दाखवत बसायचे आणि गैरसमज वाढवायचे. कोणताच पाचपोच उरलेला नाही. कोणतीच अभ्यासपूर्ण कृती नाही. विकासाची कोणतीच दिशा नाही आणि जनतेचे भले कुणालाच पचत नाही. अशी सगळी अवस्था झाली आहे. काय आदर्श ठेवणार आहोत आपण पुढच्या पिढीसाठी याची भिती वाटते आहे.    

म्हणून माझी विठुरायाच्या चरणी आषाढी एकादशी निमित्त एकच प्रार्थना आहे की या बडबड करणा-या राजकारण्यांना निदान चातुर्मासातील चार महिने तरी मौन पाळायची बुध्दी दे. त्यामुळे मिडीयावालेही मौन पाळतील आणि आमच्यासारख्या आशेने त्यांच्या कडे पहाणा-या जनतेला थोडे दिवस तरी विकासाचे, सुखाचे येऊ देत.

© सुश्री सुनीता जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments