मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाऊलखुणा ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? कवितेचा उत्सव ?

☆ पाऊलखुणा 😔 श्री सुहास सोहोनी ☆

आताच म्हनं त्यो युन ग्येला

म्या तर बा झुपलोच हुतो

आला कंदी नि ग्येला कंदी

मुटकुळं घालून निपचित हुतो

*

थबकल्याली पावलं त्याची

आवाज त्यांचो येनार कसा

समद्यांना भेटून बोलून ग्येला

म्या तं झोपलो मुडदा जसा

*

सावत्याभाऊच्या शेतात म्हनं

त्यानं बक्कळ पाऊस पाडला

माज्या आंगनांत चार थेंब

शिंपडाया मातुर इसरुन ग्येला

*

तुक्या नाम्या हासत ख्येळत

पार लांब दिसले गेले

टाळी देत गप्पा हानत

द्रिष्टीच्याही पल्याड गेले

*

बहिना, मुक्ता, सखू, जनाई

ओवी आभांग म्हनत गेल्या

जाता जाता भान इसरुन

झिम्मा फुगड्या घालून ऱ्हायल्या

*

म्या तं बा कप्पाय करंटा

ऐन वख्ताला झोपुन ऱ्हायलो

भाकर तुकडा समद्यांस्नी गावला

म्या तं पापी उपाशीच ऱ्हायलो

*

सोतावरतीच रुसलो चिडलो

डोल्यात पानी भरून रडलो

डोले टिपता आयन्यांत पाह्यलं

नि तीन ताड उडुन राह्यलो

*

इस्वासच बसेना आसं झालं

कुनि तरि यून ग्येलं हुतं

कपायावं माज्या आबिर बुक्का

नि गुलालाचं बोट टेकलं हुतं

*

मंजिरिंचा हार गल्यातं दिसला

नि खिशात फुटान्यांची पुडी

ह्या खरां कां सपान कललंच न्हाई

पन् हातांची मातर जमली जुडी

*

आशीच नाती ऱ्हाउंद्या द्येवा

आवती भोवती फिरत ऱ्हावा

किरपा तुमची हाय याची

चिन्हा मातर दावित जावा

☘️

© सुहास सोहोनी

दि. ३०-४-२०२४

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रुबाया… ☆ प्रेमकवी दयानंद ☆

प्रेमकवी दयानंद

? कवितेचा उत्सव ?

☆ रुबाया ☆ प्रेमकवी दयानंद

अजून ऐकू येते

कृष्णाची बासरी

त्या मधुर सुरांची जादू

मन गेले, यमुनातिरी….

*

मंदिराच्या बाहेर

काही बसलेत भिकारी

मी आत,मागणारा

तसेच सारे भोवताली…

*

जवळ नाही कोणी

माझा रिकामा खिसा

सारे आहेत, पण दूर दूर

नाही कोवावर भरोसा….

*

आता कुठे ऋतुचे आगमन

जरा सावकाश उमला

फुलांनो नका करु घाई

फार उशीर नाही जाहला…

*

हे विद्वानांचे पुणे

आता फक्त गर्दीचे

इथे, खूपच वेगवेगळे

रंग-ढंग,प्रदूषणांचे….

*

इथे रोजच भरते

विद्वानांची जत्रा

होते,परंपरेची पूजा

आहे, प्रत्येकजण भित्रा…

*

प्लॕस्टीकची फुले

त्यांचा सुगंध कसा येणार

कागदी पाखरे शोभेची

आकाशी कशी भरारी घेणार..

*

तो अलिकडेच येवून गेला

बुद्ध,महावीर,येशू रुपात

आता नाही येणार

गेला प्रत्येक वेळी निराश होऊन…

*

पुण्याजवळ आळंदी

तेथे समाधी योगियाची

अधुन-मधून गर्दी असते

मिरविणा-या भाविकांची…

*

सारी माणसे

चांगलीच असतात

स्वार्थासाठी काहीजण

कपट, कारस्थानं करतात…

© प्रेमकवी दयानंद

संपर्क – तावरे काॅलनी.सातारा रोड.पुणे

मो 9822207068

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ७ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ७ ☆ श्री अरविंद लिमये

(पूर्वसूत्र – देवावरची आम्हा मुलांच्या मनातली श्रद्धाही त्यांच्यासारखीच पूर्णत: निखळ रहाणं आणि आमच्या मनात अंधश्रद्धेचे तण कधीच रुजू न देणं ही आमच्या आईबाबांनी आम्हा भावंडांना दिलेली अतिशय मोलाची देनच होती!)

जवळजवळ साठ एक वर्षांनंतरही या सगळ्याच आठवणी आजही माझ्या मनात अतिशय ताज्या आहेत. आमच्या अंगणातलं ते छोटं बैठं देऊळ, त्या प्रसादपादुका, तरारून वर झेपावलेला औदुंबर, बाबांना प्राप्त झालेली वाचासिध्दी हे सगळं कुणालाही चमत्कार वाटेल असंच असलं तरी माझ्या बाबांपुरतं सांगायचं तर ती फक्त त्यांनाच उमजलेली अशी अंतर्ज्ञानाची एक खूण होती फक्त!

बाबांना प्राप्त झालेली वाचासिद्धी त्या पोरवयात माझ्यासाठीही अतिशय औत्सुक्याचा विषय होती. पण बाबांनी मात्र ते अगदी सहजपणे स्वीकारलेलं होतं.अतिशय खडतर आणि प्रतिकूल वाटाव्या अशा आपल्या संपूर्ण आयुष्यांतही त्यांच्यातलं हे वेगळेपण त्यांनी स्वतःचे पाय जमिनीवरच घट्ट ठेवून आतल्याआत जपलं होतं.त्यांना प्राप्त झालेला हा परमेश्वराचा आशीर्वाद कुठल्याही प्रकारचं अवडंबर न माजवता, स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच त्याचा वापर न करता, इतक्या निगुतीने त्यांनी कसा जपला  असेल याचे आज आश्चर्य वाटते एवढे खरे!

त्यांच्यावरील श्रद्धेपोटी मनातले प्रश्न घेऊन आजूबाजूची परिचितांपैकी अनेकजणं बाबांना सहज म्हणून भेटायला यायची आणि मनातली रुखरुख व्यक्त करून त्यांच्यासमोर आपलं मन मोकळं करायची.बाबा मोजक्या शब्दात त्यांची समजूत घालून त्यांना मार्गदर्शन करायचे.’सगळं व्यवस्थित होईल,काळजी नका करू’ हे त्यांचे शब्द आधारासारखे सोबत घेऊन आलेली माणसं परत जायची. एकदा तिथे जवळच बसलेल्या मी मनातल्या औत्सुक्यापोटी बाबा एकटे आहेत असं पाहून ‘तुम्हाला हे सगळं कसं समजतं?’ असं त्यांना विचारलं तेव्हा माझी चेष्टा केल्यासारखे ते खळखळून हसले.म्हणाले,”अरे मला सगळं कुठून काही समजायला?इथं माझं मला झालंय पुरे. पण ही माणसं येतात,मन मोकळं करतात. परिस्थितीने कातावलेली असतात बिचारी. त्यांना झिडकारून नाही ना चालणार? त्यांचं दडपण कमी करावं, त्यांनी स्वस्थचित्तानं विचार करून स्वतःच त्यातून मार्ग शोधण्यास प्रवृत्त व्हावं म्हणून त्यांना बरं वाटेल अशा चार अनुभवाच्या गोष्टी सांगतो झालं. बाकी कांही नाही अरे.खरं सांगू का? मी बोलेन,सांगेन ते, ही सगळी माणसं म्हणतात तसं खरंच खरं ठरत असेल तर त्याचा कर्ताकरवता ‘तो’!..’मी’ नाही..” बाबा गंभीर होत म्हणाले होते. असं असलं तरी बाबांनी त्या माणसांना सांगितलेल्या गोष्टींची प्रचिती प्रत्येकाला यायचीच आणि नंतर ते कृतज्ञता व्यक्त करायला बाबांना आवर्जून भेटायलाही यायचे. या सगळ्या मागचं रहस्य शोधायचा प्रयत्न बाबांनी कधीच केल्याचं मला आठवत नाही. त्यांच्या मनातली श्रद्धा, वेळोवेळी त्यांना आलेले अनुभव यांनी भारावून न जाता प्रतिकूल परिस्थितीतही ते शांत,हसतमुख रहायचे.या पार्श्वभूमीवर याच संदर्भात एक दिवस अचानक आश्चर्य वाटावं असा एक थरारक प्रसंग घडला!

किर्लोस्करवाडी हे वरिष्ठांचे बंगले सोडले तर फारफार तर दीड दोनशे उंबऱ्यांचं एक काॅलनीत वसलेलं गाव.बॅंक आणि पोस्ट या कंपनीसाठी अत्यावश्यक सेवा असल्याने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठीही काॅलनीतली घरे राखून ठेवलेली असायची. त्यामुळेच अतिशय शांत,आनंदी, संस्कारपूर्ण अशा वातावरणातलं समृध्द बालपण मला अनुभवता आलं.

प्रत्येक घराच्या पुढेमागे असणारी फळाफुलांची भरपूर झाडं आणि प्रशस्त अंगण हे तिथल्या जवळजवळ दशकभराच्या वास्तव्यात आम्ही अनुभवलेलं खरं ऐश्वर्य ! अंगणातला जांभळाचा मोठा वृक्ष हे इतर घरांच्या तुलनेतलं आमच्या घराचं एक खास वेगळं वैशिष्ट्य होतं. त्या प्रशस्त वृक्षाच्या चोहोबाजूंनी पसरलेल्या प्रत्येक फांदीला पिकलेल्या टपोऱ्या जांभळांचे घोसच्याघोस लगडलेले असायचे. ते पाहूनच आम्हा मुलांच्या तोंडाला पाणी सुटायचं. पण आम्हाला झाडावर चढून जांभळं काढायची बाबांनी मनाई केलेली होती. जांभळाचं लाकूड अतिशय ठिसूळ असतं, आम्ही पडू, आम्हाला इजा होईल या काळजीपोटी ते स्वतः रोज एकदा झाडावर चढून स्वत:चार जीव धोक्यात घालून आम्हाला भरपूर जांभळं काढून द्यायचे. ते ऑफिसला गेले की आम्ही गुपचूप झाडावर चढून आपापली जांभळं काढून खायचा बालसुलभ आनंद मिळवायचो पण तेही आईला नकळतच.

काॅलनी छोटी असल्यामुळे कॉलनीतील सर्वांचाच घरोबा असे. कुणाच्याच मनात आपपर भाव नसे.

तोच हक्क गृहित धरून, पलीकडच्या गल्लीत रहाणारे श्री. रामभाऊ सुतार एक दिवस हातात  रिकामी पिशवी घेऊन आमच्या घरी आले. बरोबर त्यांची बायकोही होती. तो रविवार असल्याने बाबा घरीच होते.

“दादा,थोडी जांभळं काढावी म्हणतो.”रामभाऊ म्हणाले.

बाबांनी क्षणभर विचार केला. त्यांना ‘आत या,बसा’ म्हणाले.बाबांनी स्वतःच झाडावर चढून सकाळी मोठ्ठं पातेलं भरून पिकलेली टपोरी जांभळं काढून आत ठेवली होती.ते पातेलं त्यांनी बाहेर आणलं.

“ही जांभळं नुकतीच काढलीत.ती पिशवीत भरुन घेऊन जा” ते म्हणाले.

“नको दादा.यात स्वत: झाडावर चढून जांभळं काढायची मजा कुठून येणार? ती

तुमची तुम्ही ठेवा आत. माझी मी काढून घेतो.” रामभाऊ म्हणाले आणि उठून बाहेर गेले.

बाबांना काय करावं सुचेना. ते एकाएकी गंभीर झाले. झपकन् उठून बाहेर आले.

“रामभाऊ, ऐका माझं. जांभळाचं लाकूड खूप नाजूक असतं. या झाडाखाली मोठे दगड आहेत. फांदी तुटून पडलात तर जीवावर बेतेल. झाडावर चढू नकाss”

रामभाऊ खिल्ली उडवल्यासारखे मजेत हसले.

“दादा, अहो मला असा तसा समजलात की काय? असली छप्पन झाडं मी    बघितलीत. नका काळजी करू.”

“काळजी मी नाही, तुम्ही स्वतःची घ्यायला हवी. सांगतोय ते  ऐका. तुम्ही अशी छप्पन्न झाडं पाहिली असतील, पण हे सत्तावनावं झाड कायम लक्षात रहाणारं ठरणाराय लक्षात ठेवाs ऐका माझं. झाडावर.. चढू .. नकाss”

बाबांचं न ऐकता, त्यांच्याकडं पहात रामभाऊ चिडवल्यासारखं हसले आणि हातातली पिशवी सावरत झाडावर चढू लागले.

त्या क्षणीचा बाबांचा चिंताग्रस्त चेहरा मला आजही आठवतोय. काय करावं ते न सुचून बाबा आत आले. अस्वस्थपणे येरझारा घालत राहिले. पाच एक मिनिटे त्याच अस्वस्थतेत गेली. तोवर टपोऱ्या जांभळांच्या घोसांनी भरत आलेली पिशवी जवळच्याच एका फांदीला अडकवून, त्याच फांदीवर सायकलवर बसतात तशी टांग टाकून रामभाऊ बसले होते. ते खाली उतरायचा विचार करीत असतानाच,समोर दिसणाऱ्या जांभळांच्या भलामोठ्या घोसाच्या ते मोहात पडले.पण थोडं पुढं वाकून हात लांब करुनही तो घोस हाताला लागेना,तसं जिद्द (कि हव्यास?)न सोडता रामभाऊ आणखी थोडं पुढं वाकले न् त्याच क्षणी……?

फांदी मोडत असल्याचा कडकड आवाज ऐकू आला आणि आत अस्वस्थतेने येरझारा घालणारे बाबा धास्तावून थिजल्यासारखे उभे राहिले. स्वतःला सावरत कसेबसे ते बाहेर धावले तोवरच्या क्षणार्धात रामभाऊ मोडकी फांदी आणि जांभळांनी भरलेली पिशवी यांच्यासकट खाली कोसळले. बाबा झरकन् पुढं धावले तसं अंगणात उभे असलेले इतरही एकदोघे मदतीला पुढे आले.रामभाऊंची बायको तर भेदरुन थरथरत उभी होती!

खालच्या दगडांचा मार लागून झालेल्या पायाच्या रक्ताळलेल्या जखमा आणि मुक्या माराच्या वेदना आतल्याआत सहन करत कसनुसं हसत रामभाऊ उठायचा प्रयत्न करत होते त्यांना सर्वांनी कसंबसं सावरलं.

रामभाऊ न जुमानता झाडावर चढलेले पाहून घाबरलेले,अस्वस्थतेने येरझारा घालणारे बाबा मला आठवतात तेव्हा घडलेली घटना कावळा बसताच फांदी मोडायला निमित्त होणाऱ्या योगायोगासारखी निश्चितच नव्हती याची मनोमन खात्री पटते. बाबांना मिळणाऱ्या अगम्य अशा भविष्यसूचक संकेतांच्या वाचासिद्धीसदृश इतर सकारात्मक प्रचितींच्या तुलनेतला हा काळजाचा ठोका चुकवणारा एक अपवादात्मक अनुभव मनात बाबांच्या आठवणींना चिकटून बसलाय..!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बरं… भाग – १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

बरं… भाग – १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

नानीचे एक बरं आहे ती कुणाच्या मध्ये बोलतच नाही. अद्यात मद्यात राहतच नाही.  तिला पटलं नाही, खूप खटकलं तरी सुद्धा ती कसला विरोध दर्शवत नाही.  “आमच्या वेळी हे असं काही नव्हतं बाबा! आम्ही असे वागलो असतो तर..” वगैरे अशी वयस्कर, परंपरा छाप वाक्यं ती कधीच मुखातून काढत नाही. अगदीच असह्य झालं तर ती तिच्या रूम मधल्या फ्रेंच विंडोपाशी जाऊन बसते आणि खिडकीतून दिसणाऱ्या मोकळ्या आभाळाकडे पहात राहते किंवा पोडियम वर जाऊन बागेतल्या एखाद्या बाकावर एकटीच बसते.  तिथे मुली असतात, मुलगे असतात मुला-मुलींचे घोळके असतात, त्यांचं जरा जास्तच मोकळं वागणं, हसणं बागडणं असतं.  ज्येष्ठ नागरिकही असतात. बागेचा एखादा कोपरा पुरुषांचा तर दुसरा बायकांचा.  नानी मात्र एकटीच बाकावर बसून राहते.  जगदाळे, पागे, येवलेकर झाल्यास तर त्या चंद्रपूरच्या तन्नीवार नानीला बोलावतात.  जाते कधी कधी नानी त्यांच्यात. पण मग त्यांच्या गॉसीप्स ऐकून तिचे कान किटतात.

कोणाची सून माहेरीच गेलेली असते, तर कुणाला बाईच्या हातच्या पोळ्याच आवडत नाहीत, कोणाचा मुलगा लग्नानंतर फारच बदललेला असतो, कोणी उशिरा उठतो, कुणी रात्रीचा लाईटच काढत नाही वेळेवर, एक ना अनेक.  पण थोडक्यात सगळ्याच तक्रारी. खाण्यावरून, कपड्यांवरून, खर्चावरून, रितीभातींवरून, सण साजरे करण्यावरुन,बोलण्यावरून, हसण्यावरून. नाराजी —नाराजी— फक्त नाराजी.

नानीला हे सारं नको असतं.  तिला अशा माणसांच्या घोळक्यातून कुठेतरी दूर जाऊन फक्त हे बदललेलं जग जरा बघायचं असतं.  अनुभवायचं असतं. कुठलंही मत तिला द्यायचं नसतं. तिची भूमिका एकच. फक्त वॉचमनची.

पण म्हणूनच नानीचा कुणाला त्रास नाही. सुनेला, मुलाला, नातीला— कुणालाच नाही. म्हणजे ती त्यांच्यातच असते. नानी खरंतर त्यांच्या जगात पूर्ण सामावलेली असते.पण तरीही अलीप्त असते.

“नानी आज मला ऑफिसातून यायला उशीर होईल.  माझं महत्त्वाचं प्रेझेंटेशन आहे. त्यानंतर आम्हाला डिनर आहे. आणि रिमा मधुराकडे बर्थडे पार्टीला जाणार आहे. तिचं टीनेज संपल्याचं सेलिब्रेशन आहे बहुतेक आज.  राघवचं माहित नाही. तो येईल कदाचित घरी. पण तुम्ही त्याच्यासाठी जेवायला थांबू नका. तुम्हाला जे आवडेल ते मालतीबाईंकडून करून घ्या.”

सुनेच्या या लांबलचक ‘आजच्या अहवालावर’ नानी अगदी मनापासून म्हणते,

” बरं!”

हे “बरं” म्हणणं किती छान. वादच नाही. प्रत्येकाकडे घराच्या चाव्या असतातच. त्यामुळे दार उघडण्यासाठी वाट पाहत राहण्याची गरजही नसते. सारं किती सोप्पं! कुणाचा पाय कुणात अडकलेला नाही.  नानींना चुकारपणे वाटूनही गेलेलं असतं,” मग आज राघवच्या आवडीची गरमागरम कांद्याची छान तेल लावून खरपूस भाजलेली थालीपीठ आपणच का करू नये?”

पण नकोच. सुनेचं शासन बिघडायला नको.  तशी ती काही वाकड्यात नाहीच.  नानीलाच उगा या वयात त्रास होऊ नये हीच तिची भावना असते.  नानीला सगळं समजतं.  नानी उगीच फाटे फोडत नाही.

जग बदललं आहे हे खरंच आहे. खूपच बदललं. कुठच्या कुठे गेलं. वास्तविक नानी ही एका मध्यरेषेवर होती.जुन्या नव्याच्या,बदलत्या काळाच्या केंद्रबिंदुवर होती. जरी तिची जडणघडण एका मराठमोळ्या सुसंस्कृत कुटुंबात झाली होती तरी त्याही वेळेला तिच्या भोवतालचं वातावरण खूप बंधनकारक होतं असं नाहीच.  स्वतंत्र, स्वैर जरी नव्हतं तरी स्वतःची ओळख, अस्तित्व उमलणं यासाठी तेव्हाही ते पोषक होतं. मात्र फारसे जाचक नसले तरी काही शिस्तीचे नियम हे आपोआपच मनावर रुजलेले होते.  एक वेळापत्रक नक्कीच होतं. भिंतीवरच्या कॅलेंडरवर परंपरेची वर्तुळही आखलेली होती.  मग त्यात शुभंकरोती होतं, परवचा होत्या, नित्य नेमाचा अभ्यास होता, खेळणं किती, फिरणं किती, भटकणं किती, घरातलं वास्तव्य, भावंडांच्या कामाच्या वाटण्या आणि आयुष्य म्हणजे चांगलं भविष्य आणि भविष्यासाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडी, मेहनत या सर्वांचा एक अदृश्य आराखडा मनाशी बाळगलेलाच होता. मध्यमवर्गीय मराठी माणसाच्या आयुष्यात इतकं काही जबरदस्त त्यावेळी बदललेलं नव्हतं.  म्हणजे त्याही वेळेस वेगळे, वेगळ्या पातळीवरचे सामाजिक स्तर   त्या त्या प्रमाणात होतेच पण नानीचं जीवन एका मधल्या धारेतलं होतं आणि याच आखलेल्या मार्गाने तिने तिच्या आयुष्याची इतकी मोठी वाटचाल केली होती.  आणि आताही मागेपुढे पाहताना त्यावेळच्या काही नसण्यावर, नाहींवर, त्रुटींवर तिला अजिबात खेद नव्हता.  नो रिग्रेट्स.

त्याही वेळेला ती एका नामांकित संस्थेत मोठ्या हुद्द्यावर स्वतःची प्रतिष्ठा सांभाळत होतीच की.  एकाच वेळी दोन्ही पद संतुलित पणे तिने सांभाळली. गृहिणी पद आणि संस्थेतलं जबाबदार पद.  तसे दोन्ही आघाड्यांवरती यशस्वी होती ती. पण कुठेच तिने मर्यादा सोडल्या नाहीत.अतिरेक,अवाजवीपणाच्या वाटेला ती गेली नाही. सासुबाईंसाठी सणावारी डोक्यावर पदर घेतला, वडाची पूजा केली, श्रावणी शनिवार, सोमवार पाळले. पितरांना जेवू घातलं. परंपरेच्या गर्भातले वैज्ञानिक अर्थ समजूनही तिने सारे काही बिन बोभाट पार पाडून सर्वांची मने राखली.  निदान तसा प्रयत्न नक्कीच केला.  उगीच किडूक मिडुक वादात ती पडलीच नाही.

ऐकूनही घेतलं. सासूबाई तरीही म्हणायच्या,” तुला वेळच कुठे असतो? तू तुझ्या ऑफिसच्या कामात? घर तुला नंतरच.”

नानीला काय वाईट नसेल वाटलं? पण उगीच स्वतःला सिद्ध करण्याच्या भानगडीत ती तेव्हाही पडलीच नाही. नानांनी सुद्धा  सगळं काही  स्वीकारलं नव्हतं. विरोध नव्हता म्हणजे संपूर्ण संमती असा अर्थ नसतो. नानांच्या कन्व्हेनशनल मनाला नानीच्या अनेक गोष्टी पटायच्या नाहीत. ज्या ज्या वेळी नानी काळाप्रमाणे बदलायचं ठरवत असे त्या त्या वेळी नानांना त्यांचा गतकाळ आठवायचा आणि त्या पुन्हा पुन्हा नानीची पावलं मागे खेचायचे. गैरसोयीच्या आयुष्याला उदात्तपणा आणण्याचा प्रयत्न करायचे. प्रेम होतच पण घर्षणंही खूप कचकचणारी  होती. नानीने केलं सहन. स्थैर्यासाठी. शेवटी काय? पिढीतले अंतर, संस्कृतीतील बदल हे काळाच्या पावला बरोबर अव्याहत सरकतच असतात, नाही का? आज आणि काल यातलं अंतर कधी मिटूच शकत नाही.  मग आज या मिडलाईन वर उभे असताना, बदललेलं जग बघताना इतकं भांबावून, बिथरून कां जायचं? कदाचित काल आणि आज मधलं अंतर जास्तच वाढलंय म्हणूनही असेल.

नक्की काय बदललं याचा विचार करताना नानीला गंमतच वाटते. त्यादिवशी राघवचं आणि सुनेचं काहीतरी बिनसलं होतं.  धुसफुस चालूच होती. कदाचित नानी आसपास असल्यामुळे भांडण वाजत नसावं.  पण जेव्हा जगाबरोबर नानी निद्रावस्थेत गेली तेव्हा तिला दारापलीकडून जोरजोरात उच्चारलेले शब्द ऐकू आले. 

– क्रमशः भाग पहिला  

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ देवपूजा… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

??

☆ देवपूजा… ☆ श्री सुनील शिरवाडकर

आमचे एक शेजारी होते. मला आठवतं ते रोज सकाळी दहा वाजता पुजेला बसायचे.अगदी साग्रसंगीत पुजा चालायची त्यांची.दोन अडीच तास.नंतर मग नैवेद्य वगैरे.त्यांची ही पूजा इतक्या वर्षांनंतरही.. म्हणजे जवळपास चाळीस वर्षांनंतरही मला आठवते यांचं कारण म्हणजे टीव्ही.त्यांचं देवघर  एक मोठ्ठा कोनाडा होता.इतका मोठा कि त्या कोनाड्यात ते स्वतः सुद्धा बसत.तर त्या मोठ्ठ्या कोनाड्यात त्यांनी एक छोटासा टीव्ही बसवुन घेतला होता.अगदी छोटा.. ब्लॅक अँड व्हाईट.एकीकडे पूजा.. मंत्र.. अभिषेक आणि दुसरीकडे टीव्ही बघणं.आरतीच्या वेळी मात्र तो टीव्ही बंद होई.

त्यांना या बद्दल बरेच जणांनी टोकलं.. टीकाही केली.पण त्यांच्यावर काही परीणाम झाला नाही.त्यांचं म्हणणं मी मनापासुन पूजा करतो.. माझ्या मनातला भाव महत्त्वाचा.. आणि माझा देव तो भाव जाणतो.त्यांची देवाला एकच प्रार्थना असायची.

‘तु पारोसा राहु नकोस..मला पारोसा ठेवु नको.’

याचाच अर्थ रोज स्नान करून तुझी पुजा करण्या इतपत मला फिट ठेव. आणि खरंच.. आयुष्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत ते पुजा करत होते.स्नान करुन पूजा करण्याएवढी त्यांची शारीरिक क्षमता अखेरपर्यंत टिकून होती. देवानं त्यांची प्रार्थना ऐकली होती.

रोज पूजा करण्याचा नियम अनेकांचा असतोच.प्रत्येकाची पूजा करण्याची पद्धत वेगळी.. कालावधी वेगळा.कोणाची पुजा पंधरा मिनिटांत होते..तर कुणाला दोन तासही लागतात.कुणाला पुजा करताना मदतीसाठी बायको लागते.तिनं मागे बसुन गंध उगाळून द्यायचं..फुलं हातात द्यायचे..तीन पर्ण असलेली बेलाची पानं नीट निवडून द्यायची .काही जण पूजा झाली की तिथुन लगेच उठुन जातात ‌मग बायकोने बाकीचा पसारा आवरायचा.

एकाची पुजेची पध्दत काही औरच होती.तो ताम्हणात देव काढायचा.. आणि सरळ वॉश बेसिनखाली धरायचा अगदी भांडे विसळल्या सारखं.मग ते देव कोरडे करून हळदी कुंकु लावायचा..शिंपडल्या सारखं.फुलं वाहिली की झाली पुजा.

अलीकडे काहीजण खुर्चीत बसूनही पुजा करतात. गुडघ्यांच्या प्रॉब्लेम मुळे मांडी घालून बसता येत नाही. मग खुर्चीत बसायचं..आणि पुढे टी पॉय  ठेवायचा..त्यावर ताम्हाण..

मंदिरांमध्ये पूजा करण्याची पद्धत वेगळी असते. तिथे देवाच्या मुर्तीला रोज मंगलस्नान..म्हणजे पूर्ण अभिषेक घातला जात नाही. केली जाते फक्त पाद्यपुजा.फक्त एकादशी आणि सणांच्या दिवशी पुर्ण मूर्तीला अभिषेक केला जातो.

गुरुचरित्रात एका अध्यायात पुजे बद्दल विस्ताराने मार्गदर्शन केलं आहे.पुजेला बसण्यासाठी कोणतं आसन घ्यावं इथपासून त्यात सांगितलं आहे.पळी पंचपात्र कुठे ठेवावं.. निर्माल्य कसं काढावं..शंखपुजा,कलश पुजा, निरांजनाची पुजा करावी‌‌‌‌.. ही पूर्वतयारी झाल्यावर मग चारी दिशांचं पूजन करावं.पुरुष सूक्तामधील वेगवेगळ्या ऋचा म्हणत अभिषेक करावा.त्यातही कोणत्या क्रिया करताना ऋचा म्हणाव्या हेही सांगितलंय.

अभिषेक झाल्यानंतर फुलं कशी वहावी.. कोणत्या देवाला कोणती पुष्पें अर्पण करावी..कोणती वर्ज्य करावी हे सांगितलंय..काही फुलं ही दुसर्या दिवशी पण शिळी समजली जात नाही हे पण सांगितलंय.निरांजन ओवाळताना कोणता मंत्र म्हणावा ..सगळं सगळं विस्ताराने सांगितलंय.

इतकी शास्त्रशुद्ध पूजा आजच्या जमान्यात तशी कठीणच..पण जशी जमेल तशी पूजा आजही घरोघर होतेच.व्यंकटेश स्त्रोत्रात तर अगदी थोडक्यात पूजेचे सुंदर वर्णन केलंय.

करुनी पंचामृत स्नान.. शुद्धोदक वरी घालुन

तुज करु मंगलस्नान.. पुरुषसूक्ते करुनिया

वस्त्रे आणि यज्ञोपवीत.. तुज लागी  करु प्रित्यर्थ

गंधाक्षता पुष्पें बहुत.. तुजलागी समर्पूं

धूप दीप नैवेद्य.. फल तांबुल दक्षिणा शुद्ध

वस्त्रे भूषणे गोमेद.. पद्मरागादी करुनी

ऐसा षोडशोपचारे भगवंत.. यथाविधी पुजिला ह्रदयात

मग प्रार्थना आरंभिली बहुत.. वर प्रसाद मागावया.

पूजेचे असं वेगवेगळं वर्णन.. मार्गदर्शन बऱ्याच ग्रंथात आहे.अगदी तश्याच पध्दतीने पूजा झाली पाहिजे असं नाही.खरंतर कोणताच देव  पूजा करा म्हणत नाही.पूजा ही देवासाठी नसतेच मुळी.ती असते आपल्यासाठी.आपलं मन प्रसन्न करण्यासाठी.आपण या कारणाने देवापुढे तासभर बसतो.कधी अथर्वशीर्ष..कधी रुद्रातील मंत्र म्हणतो..देवाला स्नान घालतो.छान लाल सुती रुमालाने देवाचं अंग पुसतो.अष्टगंधाचा टिळा लावतो.. हळदीकुंकू लावतो..मग फुले वहातो..त्यानंतर धुपदिप.. नैवेद्य..आरती.

असं सगळं झाल्यावर मग देवघरातील देवाचं ते रुप..नजर हटत नाही त्यावरुन.कानात अजुनही ‘घालीन लोटांगण..’ मधील शब्द निनादत असतात..

अष्टगंध..अत्तर..उदबत्ती..रंगीबेरंगी सुवासिक फुले या सर्वांचा संमिश्र दरवळ.. देवाच्या कपाळावरचं ते ओलसर ताजं  गंध.. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे‌‌ देवाच्या चेहर्यावरंच मंद स्मित..ते प्रसन्न सुहास्य.जणु देव सांगत असतो..आता नि:शंक मनाने कामाला जा..मी आहे तुझ्यासोबत..

आणि साक्षात देव आपल्या सोबत असणं.. यापेक्षा अधिक आपल्याला काय हवंय? मानसिक बळ म्हणजे हेच तर असतं….. पूजा करायची ती यासाठी.

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तपत्या झळा उन्हाच्या… ☆ श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

? मनमंजुषेतून ?

☆ तपत्या झळा उन्हाच्या… ☆ श्री प्रसाद जोग

सध्या  सकाळ उजाडली की कालचा दिवस बरा होता म्हणायची वेळ आलीय.दिवसेंदिवस  उन्हाळ्याचा रखरखाट वाढायला लागला. त्यामुळे तापमान नाही तर तापमान अंगाची काहिली करायला लागलंय.

उन्हाळ्याचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे.काही भागामध्ये तपमान ४४/४५  डिग्री पर्यंत वाढले आहे. तशातच लोकसभेच्या निवडणुकांचे प्रचार जोरावर आहेत.  

अश्या रखरखाटामध्ये कवींना  वेगवेगळी गाणी सुचली हे विशेष.

कवी अनिल यांना केळीचे सुकले बाग आणि वेळ झाली भर माध्यान्ह ही गाणी सुचली असावीत.सुधीर मोघ्यांना तपत्या झळा उन्हाच्या हे  लिहावे वाटले असेल.

आज ही  गाणी ऐकली की तपमानात एखाद्या डिग्रीची वाढच  झाल्यासारखे वाटेल.

सगळं असह्य व्हायला लागल्यावर अचानक एक दिवशी आकाशात काळे ढग गर्दी करतील, सोसाट्याचा वारा सुटेल,विजांचा कडकडाट होऊन वळिवाच्या कोसळधारा तप्त झालेल्या जमिनीला गारे गार करतील. मातीचा सुगंध दरवळेल.हे अनुभवत असताना शान्ता शेळके यांना आला पाऊस मातीच्या वासात ग गाण्याचे शब्द सुचले असतील..

मग एन्जॉय करा उन्हाळा सुद्धा

©  श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “वेताळ विक्रम…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

 

? इंद्रधनुष्य ?

☆ “वेताळ विक्रम…” ☆ श्री मंगेश मधुकर

गावाबाहेरच्या टेकडीवर भेटल्यावर विक्रम वेताळाकडं पाहून नेहमीसारखा हसला नाही.असं पहिल्यांदाच घडल्यानं वेताळाला आश्चर्य वाटलं.“काय झालं.असे अस्वस्थ का दिसताय.”

“तुझ्यामुळेच”विक्रम ताडकन म्हणाला.

“मी काय केलं”

“गेले काही दिवस एकदम विचित्र वागतोयेस.अंगावर ओरडणारा,बारीकसारीक गोष्टींवर संतापणारा अचानक गोड,नीट बोलायला,चांगला वागायला लागलास.बरायेस ना.”

“अहो,हा तुमच्या पाहण्यातला फरक आहे.मी तोच आहे.फक्त परिस्थिती वेगळी आहे”

“कुणी अचानक चांगलं वागायला लागलं की शंका येते.नेतेमंडळी कशी निवडणूक आली की एकदम बदलतात त्याची सवय आहे पण तुझं काय?”

“मी पण यंदा निवडणुक लढविण्याचा विचार करतोय म्हणून तर…”

“काय?कशासाठी?”विक्रम आश्चर्यानं ओरडला.

“जनतेच्या सेवेकरता.तुमचं शिफारस पत्र मिळालं तर फायदा होईल.एवढी मदत करा.”

“पण गरज काय?ही नस्ती उठाठेव कशाला?”

“पद,सत्ता आल्यावर समाजासाठी जे काम करायचं ते अधिक चांगल्याप्रकारे करता येईल त्यात तुमचा पाठिंबा मिळाला तर सहज निवडून येईल.” 

“पाठिंब्याविषयी विचार करावा लागेल.”विक्रम 

“त्यात विचार काय करायचा.माझ्याविषयी चार कौतुकाचे शब्द लिहिणं अवघड नाही.”

“तुला चांगलाच ओळखतो म्हणून तर…..नेहमी तू विचारतो आता माझ्या 

प्रश्नांची उत्तरं दे.”

“जशी आज्ञा”वेताळ 

“चल,गाडी काढ”विक्रमच्या बोलण्यावर वेताळानं डोळे विस्फारले.इच्छा नसताना बाईक घेऊन निघाला.पाठीमागे विक्रम होताच.गावात रस्त्याच्या कडेला पाण्याच्या टँकरभोवती तोबा गर्दी होती.दोघं ट्राफिक जाममध्ये अडकले.तापलेलं ऊन त्यात रस्त्यावर निरनिराळ्या ठिकाणी खोदलेलं.जिकडं तिकडं माणसांची,गाड्यांची गर्दी, खड्डे,रस्त्यावरची दुकानं यातून वाट काढताना वेताळाच्या नाकी नऊ आले.सिग्नलची पर्वा न करता जीव धोक्यात घालून गाड्या चालवणाऱ्यांपासून एकदोनदा तर वेताळानं कशीबशी धडक चुकवली. असल्या प्रकारांची सवय नसल्यानं प्रचंड वैतागला. 

“वेताळा,पाहिलेस किती वाईट परिस्थिती आहे.इथं येऊन थोडाच वेळ झाला तरीही नको नको झालंय अन सामान्य माणसं हा त्रास वर्षानुवर्षे निमूटपणे सहन करतात.यावर तुझ्याकडं काही उपाय आहे का?”वेताळानं नकारार्थी मान डोलावली. 

“लोकांच्या महत्वाच्या गरजा, समस्यांवर मार्ग काढण्याऐवजी मोफत आरोग्य शिबिरे,यात्रा,भेट असले दिखाऊ प्रकार सुरू आहेत. त्याचीच फ्लेक्स लावून जाहिरातबाजी करतायेत.”

“माझी तळमळ खरी आहे.इतरांपेक्षा वेगळाय.” वेताळ.

“सगळे असंच म्हणतात.तुझ्यातलं वेगळपण काय.” 

“निवडणूक म्हणजे लोकशाहीची सेवा करण्याची संधी,समाजाचे देणं फेडण्यासाठी गरजू,गरीबांची सेवा करायची आहे.आतापर्यंत स्वार्थासाठीच जगलो,बोललो,वागलो पण आता जे काही करेल ते जनतेच्या कल्याणासाठीच……”.

“अरे वा,ऐकायला भारी वाटतं.हे भाषणात बोलायला चांगलयं.आता जे खरं खरं सांग.”बराच वेळ वेताळ काहीच बोलला नाही.विक्रम बाईकवरून उतरून चालायला लागला तेव्हा वेताळ म्हणाला 

“तुम्हांला सगळं माहिती आहेच तरी कशाला?”

“चांगलंच माहितीये.मला सांग,एवढं करून काय मिळणार”

“जिंकलो तर पद मिळेल.प्रतिष्ठा वाढेल,मान मिळेल,कायम मागेपुढे असणारे लोक,इतरांना वाटणारा धाक,शब्दच काय थुंकीसुद्धा झेलायला तयार असणारे चमचे याची नशा,धुंदी,कैफ काही औरच.. त्यासाठीच हा आटापिटा.”वेताळ एकदम बोलायचं थांबला.

“खरं बोललास त्याबद्दल अभिनंदन,”विक्रम. 

“धन्यवाद,म्हणजे शिफारस पत्राचं नक्की”

“देणार नाही.तुझे विचार लोकांच्या भल्यासाठी नाहीत.” 

“लोकशाहीत असंच चालतं.प्रेमात,युद्धात आणि निवडणुकीत सर्वकाही माफ असतं.”वेताळ ओशाळवाणं हसत म्हणाला. 

“चूकतोयेस.एका दिवसासाठी राजा असणाऱ्या जनतेला गृहीत धरू नकोस.काळ बदलतोय.भावनेपेक्षा बुद्धीचा वापर करून मतदान करणाऱ्यांची संख्या आता वाढत आहे.निवडून आल्यानंतर राहणीमानातली श्रीमंती,वागण्या-बोलण्यातला बदल जनता विसरत नाही.मतदानातून सर्व गोष्टींचा हिशोब चुकता करते.आश्वासनांचा पाऊस  धो धो कोसळला तरी आपण किती भिजायचं हे ज्यानं त्यानं ठरवायचं .  पब्लिक सब जानती है.”

“तुमचं बरोबरयं पण अनेक सोकॉल्ड सुजाण,सुशिक्षित मंडळी राजकारणाविषयी फक्त बोलतात,टीका करतात पण मतदान मात्र करत नाही याउलट गरीब,गरजू प्रलोभनाला भुलून का होईना पण आवर्जून मतदान करतात.हीच गोष्ट फार फार महत्वाची आहे.” वेताळ 

“भूलथापांना,पैशाच्या लोभाला बळी पडून मतदान करणारे आणि जाणीवपूर्वक मतदान करणारे एकाच माळेचे मणी..प्रत्येकानं मतदान केलंच पाहिजे . असा कायदाच पाहिजे आणि मित्रा,एक सांगू.. ”

“बोला”

“तुझी खरोखर समाजासाठी काम करायची इच्छा असेल तर लोकांच्या अडचणी समजून घ्यायला आतापासून सुरवात कर.त्यांच्यामध्ये जाऊन काम कर.अडचणी सोडविण्याचे प्रामाणिक प्रयत्न कर.यात सातत्य ठेव.मगच निवडणुकीचा विचार कर.असं वागलास तर पुढच्या वेळी फक्त शिफारस नाही तर मी स्वतः तुझा प्रचार करेल.”

‘विचार करून सांगतो” म्हणत वेताळानं गाडी फिरवली.परतीच्या प्रवासात वेताळचा चेहरा पडलेला तर मागे बसलेला विक्रम मात्र गालातल्या गालात हसत होता. 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ १, चैत्र – – –  लेखिका : सुश्री दीपा झानपुरे ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

, चैत्र – – –  लेखिका : सुश्री दीपा झानपुरे ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

कित्येक लक्ष योजनं दाटून आलेला गच्च अंध:कार, जिकडे पाहावं तिकडे निर्वात पोकळी आणि त्यात स्वतःच्या गतीनं परिवलन आणि परिभ्रमण करणारे कोट्यवधी ग्रह, तारे, धूमकेतू, उपग्रह…. प्रत्येकाची गती वेगळी, प्रत्येकाचा मार्ग वेगळा… अफाट विश्वाच्या या निबिड साम्राज्यात साक्षीभावानं बसलेला तो निराकार कालपुरुष… +

असंख्य ग्रहताऱ्यांची गती, स्थिती, उत्पत्ती,लय यांचा हिशोब करता करता किती काळ लोटून गेला, याची गणना करणं अवघडच… या विश्वाच्या अफाट पसाऱ्यात फिरत असलेल्या प्रत्येक वस्तुमात्राच्या कालगणनेचा हिशोब ठेवण्याचं काम या कालपुरुषाचं. 

निराकार, निर्गुण, निर्विकार, निर्विकल्प अवस्थेत हे काम युगानुयुगं करणाऱ्या त्या कालपुरुषाच्या समोर अचानक एक नीलमणी चमकून गेला… 

किंचित् उत्सुकतेनं त्यानं नजर उचलून चित्त एकाग्र केलं. 

“विश्वकर्म्याची नवीन निर्मिती दिसते आहे!” 

त्याचं कुतूहल किंचित् चाळवलं. तो निळसर हिरवट गोलाकार ग्रह आपल्याच गतीनं डौलदारपणे तिरक्या चालीनं स्वतःभोवती आणि त्याच्या कर्त्याभोवती आपल्याच तंद्रीत गिरक्या घेत होता. एरवी निर्विकार असलेला कालपुरुष या लोभस दर्शनानं किंचित् सुखावला. कितीही साक्षीभावानं काम करायचं म्हटलं, तरी काही गोष्टी मनाला कुठेतरी स्पर्शून जायच्याच!

आपोआप त्याच्या तोंडी शब्द आले, “वसुंधरा… मी वसुंधरा म्हणेन हिला..”

आणि ब्रह्मांडात तो शब्द रेंगाळला… “वसुंधरा”!

विश्वकर्म्याच्या या नव्या निर्मितीला नाव मिळालं, ओळख मिळाली… “वसुंधरा”!

तिच्या या जन्मदिवसाची कालपुरुषानं  नोंद करून ठेवली: ‘, चैत्र !

आपल्या गतीनं भ्रमण करत करत कालपुरुषाच्या नजरेसमोरून वसुंधरा पुढे निघून गेली. 

अनंतकोटि ब्रम्हांडामधल्या असंख्य ग्रहताऱ्यांचा हिशोब ठेवता-ठेवता, या नीलहरित वसुंधरेची आठवण त्याला अधूनमधून किंचित गारवा देत असे. 

या गतिमान विश्वाच्या आवर्तात पुन्हा कधी येईल बरं ती माझ्या डोळ्यांसमोर? 

तिच्या भ्रमणाची एक फेरी पूर्ण झाल्यानंतर त्याच्या डोळ्यांसमोर पुन्हा एकदा तोच नीलमणी लख्खकन् चमकला… तिच्या  सूर्यसख्याच्या तेजामुळे तिचा मूळचा निळसर हिरवा रंग अधिकच झळाळून उठत होता. कालपुरुषाचं कुतूहल चाळवलं.

त्यानं नजर आणि अंत:चक्षु अधिक एकाग्र करून वसुंधरेच्या सान्निध्यात काय चालू आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 

असंख्य प्राणिमात्र, वनस्पती, मनुष्यमात्र यांना अंगा-खांद्यावर खेळवणारी ही वसुंधरा बघून, त्या विश्वकर्म्याच्या कर्तृत्वाचं कालपुरुषाला फारच कौतुक वाटलं. शिवाय या प्रत्येक जीवमात्राचं आयुष्य,नशीब, भविष्य यांचीही ठराविक योजना त्या जगन्नियंत्याने आधीच करून ठेवली होती. 

अधिकाधिक एकाग्रतेनं तिथल्या घडामोडींकडे बघत असताना अचानक त्याचे डोळे दिपले.

वसुंधरेवर ‘सत्ययुग’ चालू होतं. कुणी ‘श्रीराम’नामक राजा महायुद्धात विजय मिळवून स्वगृही येत असताना त्याला दिसला. त्याचे प्रजाजन त्याचा जयजयकार करीत होते.. घडून गेलेल्या अशुभाची आणि अतर्क्य घटनांची उजळणी करत होते. परंतु दुष्टावर सुष्ट प्रवृत्तींनी मिळवलेला विजय, म्हणून सगळीकडे विजयपताका, ब्रह्मध्वजा लावून रामराजाचं स्वागत करत होते. 

कालपुरुषानं पुन्हा एकदा नोंद केली: १, चैत्र ! 

बघता बघता आपल्या परिभ्रमणाच्या गतीनं वसुंधरा कालपुरुषाच्या डोळ्यांसमोरून पुन्हा एकदा विश्वाच्या अफाट पसारात निघून गेली. 

आणखी काही युगं लोटली… कालगणनेतल्या ठराविक वेळी कालपुरुष या वसुंधरेच्या आगमनाची वाट पाहत असे : १, चैत्र…

तीही त्या ठराविक काळात दर्शन देऊन पुढे जात असे. दरवेळी आपल्या अंत:चक्षूंनी तिचं अंतरंग जाणून घेण्याचा कालपुरुषाला छंदच जडला होता. 

या छंदापोटी मग महाभारतकालीन युद्ध, जय-पराजय, आणखीही अनेक साम्राज्यांचे उदयास्त आणि प्रत्येक वेळी विजयाच्या वेळी उभारलेले ब्रह्मध्वज यांचा तो साक्षीदार होत गेला. 

प्रत्येक वेळी ती समोर आली, की काहीतरी नवीन घडामोडी त्याला बघायला मिळत. 

वसुंधरेची सर्व अपत्यं तिचा जन्मदिवस अतिशय जल्लोषात साजरा करीत‌ असत. सूर्यसख्याची किरणं, वनस्पतींची कोवळी पालवी आणि वृक्षांनी भरभरून दिलेलं फळांफुलांचं दान, यांमुळे मनुष्यांच्या चित्तवृत्ती अधिकच उल्हसित होत असत. 

युगांमागून युगं गेली. वसुंधरेवरचे प्राणिमात्र बदलले, वनस्पती संक्रमित झाल्या. त्यांच्या अधिकाधिक प्रगत पिढ्या निर्माण झाल्या. विश्वाच्या पसा-यात एका कोपऱ्यात बसलेल्या कालपुरुषाचं सर्व घडामोडींवर ठराविक काळानं लक्ष जात असे. 

अलिकडे मात्र तो जरा चक्रावून जाऊ लागला होता. त्याच्या डोळ्यांसमोर वसुंधरेचं नवीन रूप आल्यानंतर, जुन्या खुणा त्याला कुठेच दिसेनाशा झाल्या होत्या. .. त्याला न समजणाऱ्या अनेक गोष्टी तिथे घडत होत्या. 

वसुंधरेचा जन्मदिवस हा ठिकठिकाणी व्यापाऱ्यांचे मेळे, प्रचंड धनाची उलाढाल, खरेदी-विक्रीचे अफाट आणि अचाट व्यवहार यांच्या योगानंच साजरा करण्याची प्रथा आजकाल पडली होती. आकाशी उंच लहरणाऱ्या ब्रम्हध्वजांना खुजं स्वरूप देऊन त्यांचं आधुनिकीकरण करण्यात आलं होतं. वृक्ष-वेली, लता-पल्लव यांच्या सहवासात साजरा करण्याचा हा जन्मदिवस! पण मूळ गाभा भलतीकडेच जाऊन कडुलिंबाची पानं आणि आंब्याचे डहाळेदेखील विकत घेऊन तोंडदेखलं ‘शास्त्र’ करण्याची मनुष्यमात्रांची प्रवृत्ती झाली होती. ‘दुष्टांवर सुष्ट प्रवृत्तीनं मिळवलेला विजय’ ही कल्पना पारच मोडीत निघाली होती. त्याऐवजी भरभरून खरेदी करा, मुहूर्तावर गाड्या घ्या, कोट्यवधींची घरं विकत घ्या, अशांसारख्या धनदा़ंडग्या उन्मादानं धुमाकूळ घातला होता…

कर्कश गोंगाटात निघणाऱ्या शोभायात्रा, आणि धर्मांधर्मांमधला कट्टरतावाद जोपासण्यासाठी सुरू झालेली चढाओढ ह्याच जन्मदिनाच्या साक्षीनं सुरू होत होती.

‘अधिक, अजून अधिक, अजून अधिक’, या हव्यासापोटी मनुष्यांनी निर्माण केलेल्या कचऱ्याच्या महाप्रचंड दबावाखाली वसुंधरा दिवसेंदिवस दबून चालली होती. 

कालपुरुषाला उमज पडेनासा झाला. ‘विश्वकर्म्यानं मेहनत घेऊन घडवलेली कलाकृती’ असलेली वसुंधरा आज कुठे नेऊन ठेवली होती तिच्याच लेकरा-बाळांनी? 

कालाय तस्मै नमः!

विचार करता करता पुन्हा ती त्याच्या नजरेसमोरून दिसेनाशी झाली- तिच्या पुढच्या भ्रमणकक्षेत. 

केवळ साक्षीभावाचा धनी असलेला कालपुरुष मात्र उद्विग्न मनानं तिच्याकरिता मनोमन प्रार्थना करत राहिला…

हे वसुंधरे, भविष्यकाळात तुझ्या अंगा-खांद्यावर तीच ती प्राचीन पिंपळाची कोवळीलूस पालवी दिसू दे…त्या पिंपळपानावर विसावलेल्या, पायाचा अंगठा चोखत पडलेल्या गोजिरवाण्या बालकापासून एक नवं हिरवंगार आणि निरागस विश्व पुन्हा निर्माण होऊ दे… 

आणि हे वसुंधरे, त्या जुन्या नवतरुण नीलहरित स्वरूपातल्या तुला शुभेच्छा देण्याची संधी मला पुन्हा पुन्हा येऊ दे.   प्राचीन काळापासून, तुझ्या कक्षेत भ्रमण करत असताना ज्या वेळेस तू माझ्यासमोर येत गेलीस, त्या तुझ्या जन्मदिवसाची नोंद  मी कायमस्वरूपी करून ठेवली आहे: १, चैत्र !!

.. .. .. शुभास्ते पंथान: सन्तु !!

लेखिका : सुश्री दीपा झानपुरे

संग्रहिका : प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ गोड गोडुला ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? गोड गोडुला श्री प्रमोद वामन वर्तक ☆

जागतिक पुस्तकदिनाच्या शुभेच्छा !

न कळत्या वयामधे 

धरून पुस्तक हाती

मन लावून शोधतो

जणू जगाची उत्पत्ती

*

पाहून ही एकाग्रता

चक्रावली मम मती

वाचाल तर वाचाल

हे त्रिवार सत्य अंती

*

आदर्श गोड गोडुल्याचा

सगळ्यांनी तो घ्यावा

चांगल्या पुस्तकात मिळे

तुम्हां ज्ञानामृताचा ठेवा

तुम्हां ज्ञानामृताचा ठेवा

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य #228 – लघुकथा – ☆ वातानुकूलित संवेदना… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’

(सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी अर्ध शताधिक अलंकरणों /सम्मानों से अलंकृत/सम्मानित हैं। आपकी लघुकथा  रात  का चौकीदार”   महाराष्ट्र शासन के शैक्षणिक पाठ्यक्रम कक्षा 9वीं की  “हिंदी लोक भारती” पाठ्यपुस्तक में सम्मिलित। आप हमारे प्रबुद्ध पाठकों के साथ  समय-समय पर अपनी अप्रतिम रचनाएँ साझा करते रहते हैं। आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय लघुकथा वातानुकूलित संवेदना” ।)

☆ तन्मय साहित्य  #228 ☆

☆ वातानुकूलित संवेदना… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

एयरपोर्ट से लौटते हुए रास्ते में सड़क किनारे एक पेड़ के नीचे पत्तों से छनती छिटपुट धूप-छाँव में साईकिल रिक्शे पर सोये एक रिक्शा चालक पर अचानक उनकी नज़र पड़ी।

लेखकीय कौतूहलवश गाड़ी रुकवाकर साहित्यजीवी बुद्धिप्रकाश जी उसके पास पहुँच कर देखते हैं –

वह व्यक्ति खर्राटे भरते हुए इत्मीनान से गहरी नींद सोया है।

समस्त सुख-संसाधनों के बीच सर्व सुविधाभोगी,अनिद्रा रोग से ग्रस्त बुद्धिप्रकाश जी को जेठ माह की चिलचिलाती गर्मी में इतने गहरे से नींद में सोये इस रिक्शेवाले की नींद से स्वाभाविक ही ईर्ष्या होने लगी।

इस भीषण गर्मी व लू के थपेड़ों के बीच खुले में रिक्शे  पर धनुषाकार, निद्रामग्न रिक्शा चालक के इस दृश्य को आत्मसात कर वहाँ से अपनी लेखकीय सामग्री बटोरते हुए वे वापस अपनी कार में सवार हो गए और घर पहुँचते ही सर्वेन्ट रामदीन को कुछ स्नैक्स व कोल्ड्रिंक का आदेश दे कर अपने वातानुकूलित कक्ष में अभी-अभी मिली कच्ची सामग्री के साथ लैपटॉप पर एक नई कहानी बुनने में जुट गए।

‘गेस्ट’ को छोड़ने जाने और एयरपोर्ट से यहाँ तक लौटने  की भारी थकान के बावजूद— आज सहज ही राह चलते मिली इस संवेदनशील मार्मिक कहानी को लिख कर पूरी करते हुए बुद्धिप्रकाश जी आत्ममुग्ध हो एक अलग ही स्फूर्ति व उल्लास से भर गए।

रिक्शाचालक पर सृजित अपनी इस दयनीय सशक्त कहानी को दो-तीन बार पढ़ने के बाद उनके मन-मस्तिष्क पर इतना असर हो रहा है कि, खुशी में अनायास ही इस विषय पर कुछ कारुणिक काव्य पंक्तियाँ भी जोरों से मन में हिलोरें लेने लगी।

तो ताजे-ताजे मिले इस संवेदना परक विषय पर कविता लिखना बुद्धिप्रकाश जी ने इसलिए भी जरूरी समझा कि, हो सकता है, यही कविता या कहानी इस अदने से पात्र रिक्शेवाले के ज़रिए उन्हें किसी सम्मानित मुकाम तक पहुँचा कर कल को प्रतिष्ठित कर दे।

यश-पद-प्रतिष्ठा और सम्मान के सम्मोहन में बुद्धिप्रकाश जी अपने शीत-कक्ष में अब कविता की उलझन में व्यस्त हैं।

☆ ☆ ☆ ☆ ☆

© सुरेश कुशवाहा ‘तन्मय

जबलपुर/भोपाल, मध्यप्रदेश, अलीगढ उत्तरप्रदेश  

मो. 9893266014

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

image_print

Please share your Post !

Shares