मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “वेताळ विक्रम…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

 

? इंद्रधनुष्य ?

☆ “वेताळ विक्रम…” ☆ श्री मंगेश मधुकर

गावाबाहेरच्या टेकडीवर भेटल्यावर विक्रम वेताळाकडं पाहून नेहमीसारखा हसला नाही.असं पहिल्यांदाच घडल्यानं वेताळाला आश्चर्य वाटलं.“काय झालं.असे अस्वस्थ का दिसताय.”

“तुझ्यामुळेच”विक्रम ताडकन म्हणाला.

“मी काय केलं”

“गेले काही दिवस एकदम विचित्र वागतोयेस.अंगावर ओरडणारा,बारीकसारीक गोष्टींवर संतापणारा अचानक गोड,नीट बोलायला,चांगला वागायला लागलास.बरायेस ना.”

“अहो,हा तुमच्या पाहण्यातला फरक आहे.मी तोच आहे.फक्त परिस्थिती वेगळी आहे”

“कुणी अचानक चांगलं वागायला लागलं की शंका येते.नेतेमंडळी कशी निवडणूक आली की एकदम बदलतात त्याची सवय आहे पण तुझं काय?”

“मी पण यंदा निवडणुक लढविण्याचा विचार करतोय म्हणून तर…”

“काय?कशासाठी?”विक्रम आश्चर्यानं ओरडला.

“जनतेच्या सेवेकरता.तुमचं शिफारस पत्र मिळालं तर फायदा होईल.एवढी मदत करा.”

“पण गरज काय?ही नस्ती उठाठेव कशाला?”

“पद,सत्ता आल्यावर समाजासाठी जे काम करायचं ते अधिक चांगल्याप्रकारे करता येईल त्यात तुमचा पाठिंबा मिळाला तर सहज निवडून येईल.” 

“पाठिंब्याविषयी विचार करावा लागेल.”विक्रम 

“त्यात विचार काय करायचा.माझ्याविषयी चार कौतुकाचे शब्द लिहिणं अवघड नाही.”

“तुला चांगलाच ओळखतो म्हणून तर…..नेहमी तू विचारतो आता माझ्या 

प्रश्नांची उत्तरं दे.”

“जशी आज्ञा”वेताळ 

“चल,गाडी काढ”विक्रमच्या बोलण्यावर वेताळानं डोळे विस्फारले.इच्छा नसताना बाईक घेऊन निघाला.पाठीमागे विक्रम होताच.गावात रस्त्याच्या कडेला पाण्याच्या टँकरभोवती तोबा गर्दी होती.दोघं ट्राफिक जाममध्ये अडकले.तापलेलं ऊन त्यात रस्त्यावर निरनिराळ्या ठिकाणी खोदलेलं.जिकडं तिकडं माणसांची,गाड्यांची गर्दी, खड्डे,रस्त्यावरची दुकानं यातून वाट काढताना वेताळाच्या नाकी नऊ आले.सिग्नलची पर्वा न करता जीव धोक्यात घालून गाड्या चालवणाऱ्यांपासून एकदोनदा तर वेताळानं कशीबशी धडक चुकवली. असल्या प्रकारांची सवय नसल्यानं प्रचंड वैतागला. 

“वेताळा,पाहिलेस किती वाईट परिस्थिती आहे.इथं येऊन थोडाच वेळ झाला तरीही नको नको झालंय अन सामान्य माणसं हा त्रास वर्षानुवर्षे निमूटपणे सहन करतात.यावर तुझ्याकडं काही उपाय आहे का?”वेताळानं नकारार्थी मान डोलावली. 

“लोकांच्या महत्वाच्या गरजा, समस्यांवर मार्ग काढण्याऐवजी मोफत आरोग्य शिबिरे,यात्रा,भेट असले दिखाऊ प्रकार सुरू आहेत. त्याचीच फ्लेक्स लावून जाहिरातबाजी करतायेत.”

“माझी तळमळ खरी आहे.इतरांपेक्षा वेगळाय.” वेताळ.

“सगळे असंच म्हणतात.तुझ्यातलं वेगळपण काय.” 

“निवडणूक म्हणजे लोकशाहीची सेवा करण्याची संधी,समाजाचे देणं फेडण्यासाठी गरजू,गरीबांची सेवा करायची आहे.आतापर्यंत स्वार्थासाठीच जगलो,बोललो,वागलो पण आता जे काही करेल ते जनतेच्या कल्याणासाठीच……”.

“अरे वा,ऐकायला भारी वाटतं.हे भाषणात बोलायला चांगलयं.आता जे खरं खरं सांग.”बराच वेळ वेताळ काहीच बोलला नाही.विक्रम बाईकवरून उतरून चालायला लागला तेव्हा वेताळ म्हणाला 

“तुम्हांला सगळं माहिती आहेच तरी कशाला?”

“चांगलंच माहितीये.मला सांग,एवढं करून काय मिळणार”

“जिंकलो तर पद मिळेल.प्रतिष्ठा वाढेल,मान मिळेल,कायम मागेपुढे असणारे लोक,इतरांना वाटणारा धाक,शब्दच काय थुंकीसुद्धा झेलायला तयार असणारे चमचे याची नशा,धुंदी,कैफ काही औरच.. त्यासाठीच हा आटापिटा.”वेताळ एकदम बोलायचं थांबला.

“खरं बोललास त्याबद्दल अभिनंदन,”विक्रम. 

“धन्यवाद,म्हणजे शिफारस पत्राचं नक्की”

“देणार नाही.तुझे विचार लोकांच्या भल्यासाठी नाहीत.” 

“लोकशाहीत असंच चालतं.प्रेमात,युद्धात आणि निवडणुकीत सर्वकाही माफ असतं.”वेताळ ओशाळवाणं हसत म्हणाला. 

“चूकतोयेस.एका दिवसासाठी राजा असणाऱ्या जनतेला गृहीत धरू नकोस.काळ बदलतोय.भावनेपेक्षा बुद्धीचा वापर करून मतदान करणाऱ्यांची संख्या आता वाढत आहे.निवडून आल्यानंतर राहणीमानातली श्रीमंती,वागण्या-बोलण्यातला बदल जनता विसरत नाही.मतदानातून सर्व गोष्टींचा हिशोब चुकता करते.आश्वासनांचा पाऊस  धो धो कोसळला तरी आपण किती भिजायचं हे ज्यानं त्यानं ठरवायचं .  पब्लिक सब जानती है.”

“तुमचं बरोबरयं पण अनेक सोकॉल्ड सुजाण,सुशिक्षित मंडळी राजकारणाविषयी फक्त बोलतात,टीका करतात पण मतदान मात्र करत नाही याउलट गरीब,गरजू प्रलोभनाला भुलून का होईना पण आवर्जून मतदान करतात.हीच गोष्ट फार फार महत्वाची आहे.” वेताळ 

“भूलथापांना,पैशाच्या लोभाला बळी पडून मतदान करणारे आणि जाणीवपूर्वक मतदान करणारे एकाच माळेचे मणी..प्रत्येकानं मतदान केलंच पाहिजे . असा कायदाच पाहिजे आणि मित्रा,एक सांगू.. ”

“बोला”

“तुझी खरोखर समाजासाठी काम करायची इच्छा असेल तर लोकांच्या अडचणी समजून घ्यायला आतापासून सुरवात कर.त्यांच्यामध्ये जाऊन काम कर.अडचणी सोडविण्याचे प्रामाणिक प्रयत्न कर.यात सातत्य ठेव.मगच निवडणुकीचा विचार कर.असं वागलास तर पुढच्या वेळी फक्त शिफारस नाही तर मी स्वतः तुझा प्रचार करेल.”

‘विचार करून सांगतो” म्हणत वेताळानं गाडी फिरवली.परतीच्या प्रवासात वेताळचा चेहरा पडलेला तर मागे बसलेला विक्रम मात्र गालातल्या गालात हसत होता. 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈