मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ७ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ७ ☆ श्री अरविंद लिमये

(पूर्वसूत्र – देवावरची आम्हा मुलांच्या मनातली श्रद्धाही त्यांच्यासारखीच पूर्णत: निखळ रहाणं आणि आमच्या मनात अंधश्रद्धेचे तण कधीच रुजू न देणं ही आमच्या आईबाबांनी आम्हा भावंडांना दिलेली अतिशय मोलाची देनच होती!)

जवळजवळ साठ एक वर्षांनंतरही या सगळ्याच आठवणी आजही माझ्या मनात अतिशय ताज्या आहेत. आमच्या अंगणातलं ते छोटं बैठं देऊळ, त्या प्रसादपादुका, तरारून वर झेपावलेला औदुंबर, बाबांना प्राप्त झालेली वाचासिध्दी हे सगळं कुणालाही चमत्कार वाटेल असंच असलं तरी माझ्या बाबांपुरतं सांगायचं तर ती फक्त त्यांनाच उमजलेली अशी अंतर्ज्ञानाची एक खूण होती फक्त!

बाबांना प्राप्त झालेली वाचासिद्धी त्या पोरवयात माझ्यासाठीही अतिशय औत्सुक्याचा विषय होती. पण बाबांनी मात्र ते अगदी सहजपणे स्वीकारलेलं होतं.अतिशय खडतर आणि प्रतिकूल वाटाव्या अशा आपल्या संपूर्ण आयुष्यांतही त्यांच्यातलं हे वेगळेपण त्यांनी स्वतःचे पाय जमिनीवरच घट्ट ठेवून आतल्याआत जपलं होतं.त्यांना प्राप्त झालेला हा परमेश्वराचा आशीर्वाद कुठल्याही प्रकारचं अवडंबर न माजवता, स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच त्याचा वापर न करता, इतक्या निगुतीने त्यांनी कसा जपला  असेल याचे आज आश्चर्य वाटते एवढे खरे!

त्यांच्यावरील श्रद्धेपोटी मनातले प्रश्न घेऊन आजूबाजूची परिचितांपैकी अनेकजणं बाबांना सहज म्हणून भेटायला यायची आणि मनातली रुखरुख व्यक्त करून त्यांच्यासमोर आपलं मन मोकळं करायची.बाबा मोजक्या शब्दात त्यांची समजूत घालून त्यांना मार्गदर्शन करायचे.’सगळं व्यवस्थित होईल,काळजी नका करू’ हे त्यांचे शब्द आधारासारखे सोबत घेऊन आलेली माणसं परत जायची. एकदा तिथे जवळच बसलेल्या मी मनातल्या औत्सुक्यापोटी बाबा एकटे आहेत असं पाहून ‘तुम्हाला हे सगळं कसं समजतं?’ असं त्यांना विचारलं तेव्हा माझी चेष्टा केल्यासारखे ते खळखळून हसले.म्हणाले,”अरे मला सगळं कुठून काही समजायला?इथं माझं मला झालंय पुरे. पण ही माणसं येतात,मन मोकळं करतात. परिस्थितीने कातावलेली असतात बिचारी. त्यांना झिडकारून नाही ना चालणार? त्यांचं दडपण कमी करावं, त्यांनी स्वस्थचित्तानं विचार करून स्वतःच त्यातून मार्ग शोधण्यास प्रवृत्त व्हावं म्हणून त्यांना बरं वाटेल अशा चार अनुभवाच्या गोष्टी सांगतो झालं. बाकी कांही नाही अरे.खरं सांगू का? मी बोलेन,सांगेन ते, ही सगळी माणसं म्हणतात तसं खरंच खरं ठरत असेल तर त्याचा कर्ताकरवता ‘तो’!..’मी’ नाही..” बाबा गंभीर होत म्हणाले होते. असं असलं तरी बाबांनी त्या माणसांना सांगितलेल्या गोष्टींची प्रचिती प्रत्येकाला यायचीच आणि नंतर ते कृतज्ञता व्यक्त करायला बाबांना आवर्जून भेटायलाही यायचे. या सगळ्या मागचं रहस्य शोधायचा प्रयत्न बाबांनी कधीच केल्याचं मला आठवत नाही. त्यांच्या मनातली श्रद्धा, वेळोवेळी त्यांना आलेले अनुभव यांनी भारावून न जाता प्रतिकूल परिस्थितीतही ते शांत,हसतमुख रहायचे.या पार्श्वभूमीवर याच संदर्भात एक दिवस अचानक आश्चर्य वाटावं असा एक थरारक प्रसंग घडला!

किर्लोस्करवाडी हे वरिष्ठांचे बंगले सोडले तर फारफार तर दीड दोनशे उंबऱ्यांचं एक काॅलनीत वसलेलं गाव.बॅंक आणि पोस्ट या कंपनीसाठी अत्यावश्यक सेवा असल्याने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठीही काॅलनीतली घरे राखून ठेवलेली असायची. त्यामुळेच अतिशय शांत,आनंदी, संस्कारपूर्ण अशा वातावरणातलं समृध्द बालपण मला अनुभवता आलं.

प्रत्येक घराच्या पुढेमागे असणारी फळाफुलांची भरपूर झाडं आणि प्रशस्त अंगण हे तिथल्या जवळजवळ दशकभराच्या वास्तव्यात आम्ही अनुभवलेलं खरं ऐश्वर्य ! अंगणातला जांभळाचा मोठा वृक्ष हे इतर घरांच्या तुलनेतलं आमच्या घराचं एक खास वेगळं वैशिष्ट्य होतं. त्या प्रशस्त वृक्षाच्या चोहोबाजूंनी पसरलेल्या प्रत्येक फांदीला पिकलेल्या टपोऱ्या जांभळांचे घोसच्याघोस लगडलेले असायचे. ते पाहूनच आम्हा मुलांच्या तोंडाला पाणी सुटायचं. पण आम्हाला झाडावर चढून जांभळं काढायची बाबांनी मनाई केलेली होती. जांभळाचं लाकूड अतिशय ठिसूळ असतं, आम्ही पडू, आम्हाला इजा होईल या काळजीपोटी ते स्वतः रोज एकदा झाडावर चढून स्वत:चार जीव धोक्यात घालून आम्हाला भरपूर जांभळं काढून द्यायचे. ते ऑफिसला गेले की आम्ही गुपचूप झाडावर चढून आपापली जांभळं काढून खायचा बालसुलभ आनंद मिळवायचो पण तेही आईला नकळतच.

काॅलनी छोटी असल्यामुळे कॉलनीतील सर्वांचाच घरोबा असे. कुणाच्याच मनात आपपर भाव नसे.

तोच हक्क गृहित धरून, पलीकडच्या गल्लीत रहाणारे श्री. रामभाऊ सुतार एक दिवस हातात  रिकामी पिशवी घेऊन आमच्या घरी आले. बरोबर त्यांची बायकोही होती. तो रविवार असल्याने बाबा घरीच होते.

“दादा,थोडी जांभळं काढावी म्हणतो.”रामभाऊ म्हणाले.

बाबांनी क्षणभर विचार केला. त्यांना ‘आत या,बसा’ म्हणाले.बाबांनी स्वतःच झाडावर चढून सकाळी मोठ्ठं पातेलं भरून पिकलेली टपोरी जांभळं काढून आत ठेवली होती.ते पातेलं त्यांनी बाहेर आणलं.

“ही जांभळं नुकतीच काढलीत.ती पिशवीत भरुन घेऊन जा” ते म्हणाले.

“नको दादा.यात स्वत: झाडावर चढून जांभळं काढायची मजा कुठून येणार? ती

तुमची तुम्ही ठेवा आत. माझी मी काढून घेतो.” रामभाऊ म्हणाले आणि उठून बाहेर गेले.

बाबांना काय करावं सुचेना. ते एकाएकी गंभीर झाले. झपकन् उठून बाहेर आले.

“रामभाऊ, ऐका माझं. जांभळाचं लाकूड खूप नाजूक असतं. या झाडाखाली मोठे दगड आहेत. फांदी तुटून पडलात तर जीवावर बेतेल. झाडावर चढू नकाss”

रामभाऊ खिल्ली उडवल्यासारखे मजेत हसले.

“दादा, अहो मला असा तसा समजलात की काय? असली छप्पन झाडं मी    बघितलीत. नका काळजी करू.”

“काळजी मी नाही, तुम्ही स्वतःची घ्यायला हवी. सांगतोय ते  ऐका. तुम्ही अशी छप्पन्न झाडं पाहिली असतील, पण हे सत्तावनावं झाड कायम लक्षात रहाणारं ठरणाराय लक्षात ठेवाs ऐका माझं. झाडावर.. चढू .. नकाss”

बाबांचं न ऐकता, त्यांच्याकडं पहात रामभाऊ चिडवल्यासारखं हसले आणि हातातली पिशवी सावरत झाडावर चढू लागले.

त्या क्षणीचा बाबांचा चिंताग्रस्त चेहरा मला आजही आठवतोय. काय करावं ते न सुचून बाबा आत आले. अस्वस्थपणे येरझारा घालत राहिले. पाच एक मिनिटे त्याच अस्वस्थतेत गेली. तोवर टपोऱ्या जांभळांच्या घोसांनी भरत आलेली पिशवी जवळच्याच एका फांदीला अडकवून, त्याच फांदीवर सायकलवर बसतात तशी टांग टाकून रामभाऊ बसले होते. ते खाली उतरायचा विचार करीत असतानाच,समोर दिसणाऱ्या जांभळांच्या भलामोठ्या घोसाच्या ते मोहात पडले.पण थोडं पुढं वाकून हात लांब करुनही तो घोस हाताला लागेना,तसं जिद्द (कि हव्यास?)न सोडता रामभाऊ आणखी थोडं पुढं वाकले न् त्याच क्षणी……?

फांदी मोडत असल्याचा कडकड आवाज ऐकू आला आणि आत अस्वस्थतेने येरझारा घालणारे बाबा धास्तावून थिजल्यासारखे उभे राहिले. स्वतःला सावरत कसेबसे ते बाहेर धावले तोवरच्या क्षणार्धात रामभाऊ मोडकी फांदी आणि जांभळांनी भरलेली पिशवी यांच्यासकट खाली कोसळले. बाबा झरकन् पुढं धावले तसं अंगणात उभे असलेले इतरही एकदोघे मदतीला पुढे आले.रामभाऊंची बायको तर भेदरुन थरथरत उभी होती!

खालच्या दगडांचा मार लागून झालेल्या पायाच्या रक्ताळलेल्या जखमा आणि मुक्या माराच्या वेदना आतल्याआत सहन करत कसनुसं हसत रामभाऊ उठायचा प्रयत्न करत होते त्यांना सर्वांनी कसंबसं सावरलं.

रामभाऊ न जुमानता झाडावर चढलेले पाहून घाबरलेले,अस्वस्थतेने येरझारा घालणारे बाबा मला आठवतात तेव्हा घडलेली घटना कावळा बसताच फांदी मोडायला निमित्त होणाऱ्या योगायोगासारखी निश्चितच नव्हती याची मनोमन खात्री पटते. बाबांना मिळणाऱ्या अगम्य अशा भविष्यसूचक संकेतांच्या वाचासिद्धीसदृश इतर सकारात्मक प्रचितींच्या तुलनेतला हा काळजाचा ठोका चुकवणारा एक अपवादात्मक अनुभव मनात बाबांच्या आठवणींना चिकटून बसलाय..!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈