मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चैत्रगौर… सुश्री रश्मी भागवत ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

? मनमंजुषेतून ?

🍃 चैत्रगौर… सुश्री रश्मी भागवत ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

गाई कोकीळ भूपाळी सखे तुझ्या स्वागताला

इंद्रधनूचे तोरण शोभे तुझ्या गाभार्‍याला

घाल रात्रीचे काजळ, माळ वेणीत चांदणे

चंद्रकोरीची काकणे, दंवबिंदूंची पैंजणे

सोनसळीचा पदर, सांजरंगाची पैठणी

गर्भरेशमी आभाळशेला पांघर साजणी

सूर्यकिरणांनी रेख भाळी कुंकवाची चिरी

गळा नक्षत्रमण्यांची माळ खुलू दे साजिरी

 गो-या तळव्याला लाव चैत्रपालवीची मेंदी

कर आकाशगंगेला तुझ्या भांगातली बिंदी

रूपलावण्य हे तुझे, जशी मदनाची रती

ओठांवरी उगवती, गालांवरी मावळती

जाईजुईचा मांडव, त्यात चंदनाचा झूला

ये ग सये चैत्रगौरी, सख्या झुलविती तुला

चैत्र नवरात्री ,झुल्यावर बसलेली गौर आणि चैत्रातील हळदी कुंकू ,मंतरलेले बालपणीचे दिवस आठवांचे सुंदर हिंदोळे… घरातील साध्या सुध्या ट्रंक ,टेबल स्टूल आणि पारंपरिक गालिचे शेले असे ठेवणीतले सामान घेऊन आणि शोकेस मधील पक्षी प्राणी फुले फुलदाण्या घेऊन सजावटीत सुंदर पितळी झोपाळ्यावर गौर नटून सजून बसे . त्यात आमची पितळी भातुकली मांडली जाई .दारचे मोगऱ्याचे गजरे ,जाई जुईचे हार ,सोंनचाफ्याच्या  वेण्या ,आंब्याच्या पानांची तोरणे , बागेतल्या कैऱ्या , आणि इतर उन्हाळी फळे ,कलिंगड ,काकड्या ,टरबूज ,द्राक्षे आंबे अशा रसरशीत फळांच्या सुंदर सजावटीची उतरंड गौरीच्या पायथ्याशी सजवली जात असे . परिसरातील मुबलक पळसाची पाने धुवून पुसून आंब्याच्या डाळीसाठी दिली जात ,कैरीचे गूळ वेलची जायफळ केशर युक्त पन्हे अक्षरशः छोटे पिंप भरून केले जाई ,आदल्या रात्री टपोरे हरभरे भिजवून रोवळी रोवळी भरून उपसले जात .  ओल्या नारळाच्या करंज्या ,काही फराळाचे जिन्नस सजावटीत मांडले जात . केशरी भात , पाकातील चिरोटे अशी साधी पक्वान्ने रांधली जात.

दारात सुबक चैत्रांगण रेखत असू त्यावेळी  आम्ही… 

डाळ पन्हे हरभरे फळे यातील पोषणमूल्ये आणि कॅलरीज यांचा उहापोह न करता सख्यांसाठी हे पाठवत आहे .

आजूबाजूच्या चार पाच वाड्यांमधील बिऱ्हाडातील सख्या, त्यांच्या लेकी बाळी ,अगदी लांबच्या ओळखितील सुद्धा स्त्रिया पारंपरिक ठेवणीतील वस्त्र चार दागिने घालून एकमेकींची चैत्र गौर आवर्जून बघायला जात ,त्या निमित्ताने भेटी गाठी आणि ऐसपैस बोलणे बसणे होई.. सुंदर ताजी हळद ,पिंजर ,वाळ्याचे अत्तर ,गुलाबपाणी शिंपडून स्वागत होई .

बतासा , आंब्याची डाळ ,पन्हे देऊन समारंभ होई ,आणि प्रत्येकीची ओल्या हरभर्याची ओटी भरली जाई….घरी मग चटपटा चना तव्यावर परतला जाई ,त्याची चव खमंग खुमासदार लागत असे.

प्रत्येकीची कैरी डाळ त्याची खुमासदार फोडणी आणि पन्हे अगदी विविध चविंचे पण सुंदर चवीचे असे .

चैत्राची पालवी ,मनामनावर आलेली मरगळ झाकोळ सगळे घालवी आणि वसंताच्या चाहुलीने निसर्गातील चैतन्य पुन्हा सदाबहार होण्यासाठी अनुकूल असे .

हवेतील उष्मा सुसह्य करण्यासाठी पांढरा शुभ्र मोगरा , वाळा ,जाई जुई अशी फुले भरभरून फुलत , आसमंतात कडुलिंबाचा नाजूक फुलांचा मोहोर मधुर गंधाची बरसात करीत असे . उत्साहाची आनंदाची श्रीराम भक्तीची  गुढी उभारून चैत्राची सुरुवात होत असे . घरोघरी श्रध्देने जपलेले गीत रामायणाचे सुंदर सूर आवर्जून गुंजत असत.

चैत्राची अशी ही जादू अजूनही मनावर आपला  ठसा उमटवून आहेच.

चैत्रातील ही गौर म्हणजे पार्वतीचे माहेरघरी येणे होय. अशा माहेर वाशिणीचे कौतुक चराचराने केले नाही तर नवलच !! वर दिलेले गीत हे कोकणात पारंपरिक गौरीचे गीत म्हणून. गायले जाते. हा चैत्र गौरीचा चंदन झुला अनुभवला असेल त्या प्रत्येकीच्या मनात दर वर्षी नक्कीच झुलत असणार..

इरकली टोप पदरी अंजिरी जांभळ्या काठाची गर्भ नऊवारी साडी ,टपोरी मोत्याची नथ , चार मोजकेच पण ठसठशीत  दागिने , आईचा सात्विक चेहरा , कर्तृत्ववान कष्टाळू समाधानी वावर ….आत्ता कळतंय की पार्वती म्हणजे दुसरे तिसरे कोण ….ती आईच….जगन्माता ….आणि प्रत्येकाच्या घराघरात नांदणारी आपापली आईच !!!! 

लेखिका : सुश्री रश्मी भागवत

प्रस्तुती :  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जगातील एकमेव दत्त-हस्त पूजा स्थान… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ जगातील एकमेव दत्त-हस्त पूजा स्थान… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆ 

जगातील एकमेव दत्त हस्त पूजा स्थान…… इथे आहे श्रीं चा प्रत्यक्ष कृपा हस्त …. 

कृष्णा-पंचगंगा परिसरात श्री नृसिंहसरस्वती महाराज १३६४ ते १३७६ या कालावधी दरम्यान वास्तव्यास होते. या पंचक्रोशीत ते भिक्षा मागण्यास जात असत. असेच ते शिरोळ या ग्रामी गंगाधरपंत कुलकर्णींच्या घरी भिक्षेस दुपारी गेले असता ‘ माई भिक्षा वाढा ‘ असे म्हणाले. गृह्स्वमिनीने त्यांना नमस्कार केला व चांगले स्वागत करून म्हटले की, “ गृहधनी बाहेर भिक्षेकरिता गेले आहेत. कृपया थोडे थांबावे. “ कुलकर्णीच्या घरी अठराविश्व दारिद्र्य होते. ‘ मी स्वयंपाक करते ‘ असे त्या म्हणाल्या. त्यांच्या घरी जोंधळ्याच्या कण्यानशिवाय काही शिल्लक नव्हते. त्याच त्यांनी शिजवल्या, पण त्या वाढायच्या कशावर असा प्रश्न होता. साधी व धड पत्रावळ देखील नव्हती.

महाराजांनी त्यांची अंतर अडचण जाणली. जवळचाच एक पाषाण घेऊन त्यावर प्रोक्षण करून त्यांनी त्यावर प्रणवचिन्ह काढले व भिक्षान्न त्यावर वाढण्यास सांगितले. भक्तवत्सल यतींनी मोठ्या प्रेमाने ते अन्न भक्षण केले व तृप्त होऊन त्यांनी तिला जाताना ‘ ह्या पात्राची पूजा करा, ४२ पिढ्यांचा उद्धार होईल, दारित्र्य, दुःख,पीडा नाहीश्या होतील, अन्नपूर्णा सदैव वास करेल ‘ असा आशीर्वाद दिला. थोड्याच वेळात कुलकर्णी घरी आले व त्यांना घडलेला वृतांत कळला. महाराजांचे दर्शन झाले नाही याचे त्यांना वाईट वाटले. परंतू ज्या पात्रावर महाराज जेवले त्याची त्यांनी पूजा केली. त्या पाषाणावर शंख,चक्र,पद्म इत्यादी चिन्हांनी युक्त अशी हाताची पाच बोटे उमटलेली त्यांना आढळली ! हेच ते शिरोळचे भोजनपात्र, या पात्राची पूजा कुलकर्णींच्या घराण्यात वंशपरंपरेने चालत आली आहे. प्रत्येक गुरुवारी पूजा, रात्री श्रीची पालखी, आरती इत्यादी कार्यक्रम होतात. शाही दसरा– महाराजांना ५ तोफांची सलामी दिली जाते व १२ वर्षांतून येणारे कन्यागत महापर्वकाळ वेळी २१  तोफांची सलामी असते. दत्तजयंतीला १० दिवस मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा केला जातो.

!!जय जय भोजनपात्रा सुपवित्रा 

                      सप्त ही जल चंद्र पूर्णा न कळे तव सुत्रा !!

!!श्री गुरुदेव दत्त!!!!

संग्राहक : श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “रिमोट कंट्रोल…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “रिमोट कंट्रोल…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

हा आपल्याला नवीन नाही. आपण सगळेच तो घरात वापरतो. फक्त त्यासाठी आपला टि.व्ही. त्याच्या रेंज मध्ये किंवा तो टी.व्हि.च्या रेंज मध्ये असावा लागतो. आपण हा टि‌.व्ही. समोर धरुनच उपयोगात आणतो. टी.व्ही. च्या मागच्या बाजूस धरुन याचा वापर करतो का?……. तर नाही.

पण एक असा रिमोट कंट्रोल आहे, जो मला समोरुन, बाजूने कंट्रोल तर करतोच, पण घरातील कोणत्याही खोलीच्या कोणत्याही कोपऱ्यातून तो मला कंट्रोल करतो. भिंतीचा अडथळा याला येत नाही. थोडक्यात रेंज म्हणजे सीमा याबाबत याची परिसीमा असते. तो मला कंट्रोल करतो तसेच माझ्या वागण्याबाबत मला ट्रोल देखील करतो. (ड्युअल फंक्शन)

हा चालता, बोलता, फिरता आहे. याचा सेल बदलायची गरज नसते. त्याच्या मनासारखे काही झाले तर तो आपोआपच चार्ज होतो………. आणि झाले नाही तरीही होतो…….. (फक्त फंक्शन मध्ये फरक जाणवतो.) रिमोट कंट्रोल ने आपण टि.व्ही. म्यूट करु शकतो. पण मनासारखे झाले नाही तर हा आपोआप चार्ज होतो तसाच कधी कधी म्यूट देखील होतो. हा एकमेव रिमोट कंट्रोल आहे, जो आपल्याला म्यूट करतोच, पण कधीकधी (म्हणजे बऱ्याचदा) तोच म्यूट होतो. (कारण सांगत नाही, उगाचच त्यावरून का….. रण पेटवायचे?……)

टि.व्ही. च्या रिमोट कंट्रोलवर तुम्हाला कोणतेही हावभाव दिसणार नाहीत. पण माझ्या या रिमोट कंट्रोलच्या चेहऱ्यावर हावभाव दिसतात. (आणि आपल्याला दिसेपर्यंत ते तसेच असतात……. जमतंबुवा काही जणांना.) त्यामुळेच आपल्या बद्दल याच्या मनात सध्या काय भाव आहे? हे काहीवेळा समजते. काहीवेळा आपली ही भाव समजून घेण्याची हाव महागात पडते. (हाव भाव)

टि.व्ही. चा रिमोट कंट्रोल काही वेळा व्यवस्थित काम करत नसेल तर आपण त्यावर हलक्या हाताने किंवा जोरात चापट मारायचा प्रयत्न करतो. पण असा प्रयोग या माझ्या रिमोट कंट्रोलवर सफल होईलच हे सांगता येत नाही. (कारण तो सफल होण्यापेक्षा विफल होण्याची शक्यता जास्त असते. आणि फसणारे प्रयोग करण्यात काय मजा?)

त्याच्या आवाजावरून माझा (घरातला) आवाज कसा असावा हे आता मला आपोआप समजायला लागले आहे. त्याच्या आवाजाच्या चढ उतारावर माझ्या आवाजाची उतार चढ अवलंबून असते.

काय सांगता……… तुमच्या जवळ देखील या प्रकारचा आहे?………. मग जास्त काही सांगावे लागणार नाही. कंपनी वेगळी असली तरी फंक्शन साधारण सारखीच असतात.

आता तो समोरून, बाजूने आपल्याला कसा कंट्रोल करतो हे तुम्हालाही परिचित असेल. हा माझा रिमोट कंट्रोल मागे बसून सुध्दा मला कंट्रोल करतो.

कसा ते सांगतो. आम्ही दुचाकीवर जातांना हा मागे बसलेला असतो. आणि याचा एक हात असतो माझ्या खांद्यावर. मी कुठे बघतोय याचा (अचूक) अंदाज तो मागे बसून देखील घेत असतोच, पण मान डावी उजवीकडे झाली की काहीवेळा यांच्या खांद्यावरील हाताच्या बोटांची हालचाल सुरू होते. आणि त्या बोटांच्या दाबातील फरक जाणवतो. आणि अशा नुसत्या बोटांच्या हालचालींनी तो मागे बसून सुध्दा माझे फंक्शन कंट्रोल करतो. माझे इकडेतिकडे बघण्याने मागे बसून सुध्दा कधी कधी या रिमोट कंट्रोल मधून आवाज देखील येतो. तो आवाज अं, अहं, हं, असा थोडावेळ चालणारा पण मला ऐकू जाईलच इतका मोठा असतो. मग काय…….. नाईलाजाने मी काही वेळ समोर बघतो. बघावच लागतं.

अगोदर तो खांद्यावरचा हात प्रेमळ आधारासाठी असेल असाच माझा (गैर) समज होता. पण आता लक्षात आले तो मला कंट्रोल करण्यासाठी असतो.

एक मात्र खरं, कसाही असला तरी तो जवळ आणि सोबत असावा असे वाटते.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆”वपु यांच्या लेखनातली काही विचारपुष्पे  —…” ☆ प्रस्तुती – सुश्री सुप्रिया केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

🍃 “वपु यांच्या लेखनातली काही विचारपुष्पे  —…”  🍃 प्रस्तुती – सुश्री सुप्रिया केळकर ☆ 

व. पु. काळे सरांच्या कथा आणि कादंबऱ्यातून जीवनाची बरीचशी कोडी उलगडली जातात.

त्यांच्या लेखनसंपदेतून काही विचारपुष्पे सर्व वपुप्रेमींना समर्पित…..

१) सर्वात जवळची माणसे सर्वात जास्त दुःख देतात 

२) सर्वात जीवघेणा क्षण कोणता? — खूप सदभावनेने  एखादी गोष्ट करायला जावं आणि स्वतःचा काही अपराध नसताना पदरी फक्त वाईटपणाच  यावा व सद्हेतूंचीच शंका घेतली जावी. 

३) सहनशक्ती जितकी चिवट तेवढा संसार चालतो. 

४) प्रेम म्हणजे काय? दुसऱ्याच्या डोळ्यात आपली प्रतिमा पाहणे. 

५) माणसाच्या जीवनाचा रथ प्रेमाच्या इंधनावर चालतो.

६) स्वतःजवळ जे असते तेच माणूस दुसऱ्याला देऊ शकतो. 

७) माणसाच्या जाण्यापेक्षा तो परत कधीही दिसणार नाही याच जाणिवेने मन जास्त दुःखी होते. 

८) हसतीखेळती बायको हे केवढे वैभव आहे महाराजा. 

९) सहवासाचा आनंद पैश्यात मांडता येत नाही. 

१०) चूक नसतानाही केवळ वाद टाळावा म्हणून घेतलेली माघार हे संयमाचे मोठे प्रतीक आहे. 

११) स्वतःच्या खिशाला ना परवडणारी स्वप्ने फक्त “बापच” विकत घेऊ शकतो.

१२) खर्च केल्याचे दुःख नसते, हिशोब लागला नाही की त्रास होतो.

१३) सर्वात जवळ असणाऱ्या माणसाने धोका दिल्याशिवाय जाग येत नाही. 

१४) नातवंडं झाल्यावर म्हाताऱ्याचा विरोध बोथट होतो म्हणतात. 

१५) माणसाने समोर बघायचे का मागे – यावरच पुष्कळसं सुख दुःख अवलंबून असते. 

१६) मन सांभाळायचं ठरवलं तर मन मारावं लागतं. एका वेळेला एकच साधता येते, स्वतःचं सुख नाहीतर दुसऱ्याचा मन.

१७) लोक खरं  मनात बोलतात आणि खोटं जगाला ओरडून सांगतात.

१८) आपल्याला वाटतं तितकं आपण स्वतंत्र नसतो.

१९) समजूत घालायला कोणी नसले की स्वतःलाच बळ आणावं लागतं. . 

२०) अपेक्षित गोष्टीपेक्षा अनपेक्षित गोष्टीत जास्त आनंद असतो. नाही का?

२१) जो गेल्यानंतरच कळतो त्याला “तोल” म्हणतात.

  •  वसंत पुरुषोत्तम काळे 

संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ भ्रम विभ्रम… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ भ्रम विभ्रम… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

काही गोष्टी अश्या असतात नजरेला दिसतात त्या खऱ्या तश्या नसतात मुळीच… नजरबंदी होते डोळ्यांना… आणि जे दिसतं तेच सत्य मानून बसतो… याही पलिकडं काही असेल मानायलाच तयार नसतो… जे मला तेच तुम्हालाही तसंच दिसतं समजलेलं असं कळतं तेव्हा तर आपली पक्की खात्री होते आपलं काही चुक नाही… पण इथचं तर आपण पुरते फसले जातो… होता तो भ्रभ आपला…सूर्यप्रकाशात जेव्हा सत्य उजेडात येते तेव्हा कळते भ्रमाचा भोपळा फुटला… दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं… असं नाही तर काही वेळेला तीन बाजूच कळतात आणि चौथी बाजूचा विचार शिवत नसतो मनात.. त्रिशंकूची अवस्था होते आपली… कुणी तैलबुद्धीचा करतो वेगळा विचार … अन त्यालाच समजून जातं त्याचं सारं.. हवेत तरंगत विहरत होते म्हातारीचे केस.. रवि किरणाने ते रुपेरी चमकलेले… तमा मागून येतो असाच रुप्याची उधळण करत आशेचा प्रकाश तो.. प्रत्येक दिवसाला देई नवा नवा आयाम तो.. स्वप्नांची क्षितीजं खुलवून दाखवताना सांगतो उठ झटकून टाक ती मरगळ. उचल ते पाऊल अन ध्येयाकडे नजर टाक.. निवळले भ्रमाचे धुके प्रकाशले सोने सत्याचे.. 

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “वाणी…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “वाणी…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

काल येतांना एक दृश्य बघितले. काही मुलांचे दोन गट आपापसात जोरजोराने वादविवाद करीत होते. नेहमीप्रमाणेच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी,परस्परांवर शाब्दिक चिखलफेक दणक्यात सुरू होती. अर्थातच दोन परस्परांविरोधी गट म्हंटल्यावर आचारविचारांत फरक हा असणारच ,हे आपण नक्कीच समजू शकू,परंतु फक्त मीच योग्य, माझेच बरोबर ही भुमिका कुठेतरी विचारात पाडू लागली.

त्यांचे आरोपप्रत्यारोप बघून,ऐकून एक मात्र नक्कीच लक्षात आलं,संत ,महात्मे,गुरू हे वाणी,वाचा हे दुधारी शस्त्र आहे असं सांगतात, ते। किती अचूक असतं ह्याचा प्रत्यय ते भांडण, वादविवाद ऐकतांना आला. खरंच शब्द हे खूप जपून वापरावेत. एकवेळ मारलेला मार विसरता येतो म्हणतात परंतु शाब्दिक जखमा ह्या कायमचे व्रण ठेऊन जातात.

जर वाणीवर वा वाचेवर आपली स्वतःची कमांड ठेवायची असेल तर त्याची सुरवात आपल्या मेंदूपासून करावी लागते. जर डोकं हे कायम शांत,स्थिर ठेवायची वा मेंदू कधीही बिथरु न देण्याची किमया साधल्या गेली तर आपोआप आपल्या वाचेवर,मनावर,ह्याचा पगडा बसतो आणि मग आपल्या मुखातून बाहेर पडलेला शब्द हा खूप तोलूनमापून, विचारपूर्वक बाहेर पडतो.ही सगळी शक्ती संयमामध्ये एकवटलेली असते. स्वतःचे लगाम स्वतःच्या पूर्ण कंट्रोल मध्ये असले की अर्धी लढाई आपण तेथेच जिंकलेलो असतो.

ह्या सगळ्यामुळे खरंच जाणवतं की माझ्या वर त्या शांत शिवशंभुचीच कृपा मला शक्यतोवर कधीच,कुणाचाच, कशाचाच राग येत नाही आणि त्यामुळेच मेंदू कायम शांत राहून आपल्याकडून काही उणेदुणे दुखविणारे शब्द बाहेर पडतील ही भिती मला नसतेच. माझ्या एका मैत्रीणीने मला छान प्रश्न विचारला, आपला काही दोष नसतांना कुणी तुझ्या वर दोषारोप केले,तुझ्यावर ताशेरे ओढले तर तुला खरंच राग नाही येणार. मी उत्तरले, राग नाही येणार, वाईट मात्र वाटेल पण लगेच माझ्या लक्षात येईल आपली पात्रता,योग्यता आपणच ठरवायची,आपलं मनं हे आपल्याशी कायम खरं बोलत असतं.एकदा हे नीट समजून घेतलं तर पुढील सगळं सोप्पं होत जातं. वामनराव पै म्हणतात तसं “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार”.

ह्या आरोपप्रत्यारोपांच्या फैरी राजकारणातील व्यक्तींकडून झाडल्या की तो कळस गाठतो. त्यांची घटके घटकेला बदलणारी मैत्री वा वैर,त्यांची ह्या बोटावरुन ह्या बोटावर बदलणा-या थुंकीसारखे विचार,मतं ह्याने तर आश्चर्यचकीतच व्हायला होतं.सरड्याहूनही फास्ट  घडोघडी रंग बदलण्याची क्षमता ही खास राजकारणाच्या आखाड्यात बघायला मिळते.असो

काल बघितलेले भांडण हे मित्रांचे पेल्यातच जिरणारं भांडण असतं हे ही खरच त्यामुळे आपल्या क्षणिक रागामुळे आणि त्यानंतर सुटलेल्या वाचेमुळे मैत्र गमावल्या जायला नको.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सगळंच वाईट नाही, पण — सुश्री विद्या बाळ ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ.सोनिया कस्तुरे   

? मनमंजुषेतून ?

☆ सगळंच वाईट नाही, पण — सुश्री विद्या बाळ ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

संक्रांतीनिमित्त पुढचे काही दिवस महाराष्ट्रात सगळीकडे हळदीकुंकू समारंभ उत्साहात साजरे केले जातीत. पण हळदीकुंकू समारंभाच्या या दुसऱ्या बाजूचा विचार कधी केलाय का? ‘हळदीकुंकू हे स्त्रियांमध्ये जातीपाती आणि भेदाभेद निर्माण करणारं पुरुषप्रधान व्यवस्थेने चालवलेलं एक षडयंत्र आहे, असं मला वाटतं. काळानुरूप विचारही बदलला पाहिजे’, हे सांगत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ — 

माझा हळदीकुंकू या संकल्पनेला विरोध आहे. विचार करायला लागल्यानंतर मी हळदीकुंकू बंद केलं. अनेकदा विचारलं जातं की, ही परंपरा स्त्रिया का चालू ठेवतात?

पुरुषांच्या व्यवस्थेने जे जे सांगितलं ते ते सर्व माझ्यासकट सगळ्यांनी पूर्वीपासून स्वीकारलेलं आहे. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं तर हळदीकुंकू हा पुरुषांसाठीच स्त्रियांनी केलेला पारंपरिक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी पुरुष आहेत. हे म्हणजे चोराच्या हाती जामदारखानाच्या किल्ल्या देण्यासारखा प्रकार आहे. हळदीकुंकू करायचं स्त्रियांनी आणि समाजातलं स्थान बळकट होणार ते पुरुषांचं.

हळदीकुंकवाच्या सणात फक्त सौभाग्यवतीला मान असतो. काही भारतीय संस्कारांमध्ये किंवा कर्मकांडांमध्ये स्त्री ही सौभाग्यवती आणि अपत्यवती असणं आवश्यक असतं. त्यातही मुलगा असेल तर ती तिथे सर्वांत श्रेष्ठ असते.

स्त्री सौभाग्यवती आणि अपत्यवती असण्याचे जे काही रूढ निकष आहेत त्यात तिचं ‘अस्तित्व’ महत्त्वाचं नाही. तिचं अस्तित्व दुसऱ्याच्या स्वाधीन आहे. तिला नवरा असला पाहिजे, तो जिवंत असला पाहिजे आणि त्याच्यापासून मूल असलं पाहिजे. हे हळदीकुंकू परंपरेचे निकष आहेत.

नवऱ्याशिवाय ओळख का नाही?

हळदीकुंकवात कोण सौभाग्यवती, कोण विधवा, कोण परित्यक्ता, कोण ‘टाकलेली’, कोण अविवाहित असे जे भेद केले जातात त्याला माझा विरोध आहे. त्यातही अविवाहितांमध्ये दोन प्रकारच्या स्त्रिया मोडतात. ज्यांना स्वखुशीने लग्न करायचं नाही अशा आणि ज्यांना लग्न करायचं आहे पण अजून झालं नाही अशा. या सर्वांना हळदीकुंकू परंपरा नाकारते.

ज्या स्त्रियांच्या आयुष्यात ‘नवरा’ नावाचा पुरुष नाही त्यांची काहीच ओळख नाही का? हळदीकुंकू या परंपरेच्या व्याख्येत तिची स्वतंत्र ओळख नाही. नवऱ्याच्या ओळखीवरून आणि नवरा असल्यानेच ती ओळखली जाणार, हे अयोग्य आहे. स्त्रियांना न्याय देणारं नाही.

अनेकदा स्त्रियांची ओळख करून देताना अमूक अमूक यांच्या सौभाग्यवती किंवा श्रीमती अशी ओळख करून देतात. याविषयी मी अनेकदा व्यासपीठावर बोलले आहे. एखाद्या स्त्रिला व्यासपीठावर बोलावताना तिचं म्हणणं ऐकायचं म्हणून बोलवता मग ती सौभाग्यवती, श्रीमती किंवा कुमारी असली तर काय फरक पडतो? तुम्ही माझ्यासोबतच्या पुरुषांना विचारता का? तुम्ही विवाहित आहात का, मुलं आहेत का? हे प्रश्न पुरुषांना विचारले जात नसतील तर स्त्रीला का विचारावेत?

बाईची ओळख नवऱ्याच्या ओळखीपलीकडेही असावी.

मी पूर्वी हळदीकुंकवाला जात असे. वयाच्या साधारण पस्तीशीपर्यंत मी व्रतवैकल्यं, पूजा, मंगळागौर या सगळ्या रूढी परंपरा पाळल्या आहेत. मध्यमवर्गीय पारंपरिक चौकटीत जगत असताना मीही त्यात चक्क रमले आणि डुंबले होते. पण मी जसजशी विचार करायला लागले, तसं त्यातली व्यर्थता आणि निरर्थकता माझ्या लक्षात आली. आणि मी हळदीकुंकू करायचं बंद केलं.

बदलाचं पाऊल

मी तसा विचार करणारा ‘माणूस’ कधीच नव्हते. म्हणूनच जरा उशीर झाला. बाहेरच्या जगाची ओळख झाली. वाचायला लागले. मित्रमैत्रिणींशी संवाद व्हायला लागला. आणि मग प्रश्न पडायला लागले. आपण काय करतोय याचं भानही आलं. असा विचार जेव्हा मनात येतो तेव्हाच आपण बदलाचं एक पाऊल पुढे टाकतो.

मला एक हळदीकुंकू पक्क आठवतंय. पन्नास वर्षं झाली असतील. तेव्हा माझी मुलगी लहान होती. मुलीच्या शाळेतल्या मैत्रिणींच्या आईची ओळख होण्यासाठी मी त्यांना घरी बोलावलं होतं. पण रूढार्थाने ते हळदीकुंकू नव्हतं. तर तिळगुळ समारंभ होता.

हळदीकुंकवाऐवजी तिळगुळ समारंभ

तरीही मला वाटतं हळदीकुंकवाऐवजी तीळगूळ समारंभाचा उत्सव झाला पाहिजे. पण त्यातलं कर्मकांड बाजूला काढू या. स्त्रियांच्या मनात रूढ झालेली कर्मकांडाची प्रथा म्हणून असलेलं त्याचं स्वरूप बदललं पाहिजे.

मकरसंक्रांतीचं जसं हळदीकुंकू असतं तसं चैत्रगौरी, वटसावित्री, मंगळागौरीच्या निमित्ताने स्त्रिया एकत्र येतात. किती छान संधी आहे ही. मला असं वाटतं की, सणाच्या निमित्ताने स्त्रियांशी संवाद साधला पाहिजे.

सगळंच वाईट नाही, पण…

आपल्या संस्कृतीतलं सगळंच वाईट आहे, असं मला म्हणायचं नाही. ऋतूबदलाप्रमाणे सण योजणं ही निसर्गाच्या अधिक जवळ जाणारी आणि कल्पक अशी गोष्ट आपल्या संस्कृतीत आहे. त्यामुळे सणाला, परंपरांना नावं ठेऊन चालत नाही तर त्यातील पर्याय शोधावे लागतात.

ज्येष्ठागौरीचं नवं रूप – वसंतोत्सव

गेली दहा बारा वर्षं मी वसंतोत्सवाचं बोलावणं करते. माझ्या काही मित्र-मैत्रिणींसाठी अगदी छोट्या स्वरूपात एक समारंभ करते. जेष्ठागौरीला दिलेलं हे वेगळं रूप आहे. या मोसमात कैऱ्या आलेल्या असतात. त्यामुळे पन्हं देता येतं. आंब्याची डाळ करते. फळं, फुलं सोबतीला असतात. बदलत्या ऋतूचा आस्वाद घेत वसंतोत्सवाच्या निमित्ताने गप्पाही रंगतात. मग हळदीकुंकवाचा प्रश्नच राहात नाही.

जुन्या धाग्याला नवं रूप

अशा प्रकारे लोकांना भेटण्याचं माध्यम तयार केलं, तर आपण संस्कृतीचा धागाही पुढे नेतो आणि सण अधिक व्यापक स्वरूपात करतो. लोकामंध्ये बदल करण्याच्या दृष्टीने सर्वांत आवश्यक गोष्ट असते ती- संस्कृतीतला जुना धागा घ्यायचा आणि त्याला नवं रूप द्यायचं. याच दृष्टीने हळदीकुंकवाकडे बघावं, असं मला वाटतं आणि या निमित्ताने स्त्रियांशी बोललं जावं.

लग्न झाल्यावर मुली हल्ली नावं बदलत नाहीत, हे स्वागतार्ह आहे. पण हळदीकुंकू का करायचं, हे त्या स्वतःला विचारत नाहीत. टिकल्या आणि कुंकवाला माझा विरोध नाही. त्यामागे विचार दिसत नाहीत.

आधुनिक विचार फार कमी लोकांच्या मनात रुजतो. मला माहीत आहे की, विचार करणारी माणसं कमी असतात आणि बहुसंख्य समाजाचा चालत आलेल्या परंपरा पुढे चालू ठेवण्याकडेच कल असतो. कारण त्यात त्यांना सुरक्षितता वाटत असते.

जुन्या मूल्यांचा देखावा

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा हळदीकुंकवासारख्या सणाच्या निमित्ताने अधिक जाणवतो. जागतिकीकरणानंतर लोकांची मानसिक अवस्था आणि मूल्यव्यवस्था बदलून गेली आहे. सगळीकडे बाह्य आवरणामधली अस्थिरता आहे. त्यामुळे जुनी जी मूल्य होती ती देखाव्याच्या स्वरूपात जाणवतात.

उदाहरणार्थ, लग्न एकदाच करतो असं म्हणत आई-वडील, मुलं- मुली वारेमाप खर्चाचा आग्रह धरतात. 25 हजारांची शेरवानी, पैठणी खरेदी करतात. भपकेबाजपणाचं त्यांना आकर्षण वाटत असतं. थोडक्यात काय तर गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या मूल्यसंस्कृतीला धक्का बसलाय. संस्कृतीचा जो गाभा होता त्याला स्पर्शही करायचा नाही, पण वरवर दिसेल अशी संस्कृती जपायची, देखावा करायचा. हा विरोधाभास आहे.

हळदीकुकवाचं राजकारण

त्यात राजकीय प्रचारासाठी स्त्रियांचा वापर होणं, यात नवल नाही. हळदीकुंकवाचे कार्यक्रम आज राजकीय अजेंडा राबवताना दिसतात. या राजकीय पुढाऱ्यांना फुले-आंबेडकरांचा समतेचा विचार पचणारा नाही.

मंदिरप्रवेशावर गेल्या वर्षी चर्चा होत असताना एक राजकीय महिला पुढारी म्हणाली, ‘महिलांना मंदिरात प्रवेश नसेल तर ती जुनी परंपरा आहे आणि ती पाळली गेली पाहिजे.’ तेव्हा मी जाहीरपण म्हटलं होतं- कित्येक वर्षं स्त्रियांना राजकारणात प्रवेश नाकारला गेला होता. पण तुम्ही परंपरा मोडलीच ना.

भेदाभेद नसणारा सण हवा

याचाच अर्थ असा की काही परंपरा लोकानुनयासाठी दाखवायच्या आणि काही सोयीने मोडायच्या. हा परंपरांच्या बाबतीतला विरोधाभासच आहे.

समतेचा विचार मानणाऱ्यांनी महिलांचा मेळावा घ्यावा. त्यात विधवांनाही सहभागी करून घ्यावं. हा विचार सोपा नाही. पंरपरेच्या विरोधातला आहे. मी अनेक मंडळांमध्ये भेदाभेद नको म्हणून आवाहन करते. पारंपरिक हळदीकुंकू नको पण मकरसंक्रांतीचा भेदाभेद नसणारा सण-समारंभ हवा.

लेखिका : सुश्री विद्या बाळ. 

(विद्या बाळ या ज्येष्ठ पत्रकार, लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांनी बीबीसी  मराठीसाठी हा लेख लिहिला होता.) 

संग्राहिका : डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9767812692/9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ लोकमान्य टिळक, चिमण्या आणि मंडाले तुरुंग… ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

श्री विनय माधव गोखले

? वाचताना वेचलेले ?

☆ लोकमान्य टिळक, चिमण्या आणि मंडाले तुरुंग… ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆ 

लोकमान्य टिळकांची राजद्रोहाच्या दुसऱ्या शिक्षेत मंडाले तुरुंगात रवानगी झाली आणि काही महिन्यातच त्यांच्या सहृदयी स्वभावाचा अनुभव तुरुंगातील कैदी, तुरुंग अधिकारी आणि चक्क चिमण्यांनी सुद्धा घेतला.

लोकमान्य, त्यांना तुरुंगातून मिळणाऱ्या शिध्यातील धान्य, म्हणजे कधी डाळ तर कधी तांदूळ चिमण्यांना खायला घालत असत आणि किती तरी वेळ त्यांच्याकडे बघत असत. काही दिवसातच चिमण्यांना त्यांचा इतका लळा लागला की त्या थेट या सिंहाच्या अंगाखांद्यावर खेळत कलकलाट करू लागल्या !!!!  असे काही दिवस सुरू राहिल्यावर त्या धीट झाल्या आणि खोलीत येऊन पुस्तकांवर व टेबलावर बसू लागल्या. कधी लोकमान्य जेवत असताना त्यांच्या ताटाभोवती देखील त्या गोळा होत.  एकदा या चिमण्या टिळकांच्या खोलीत असताना तुरुंग अधीक्षक तेथे आला आणि हे दृश्य पाहून आश्चर्यचकित झाला. लोकमान्य त्याला म्हणाले – “ आम्ही त्यांना खात नाही, आम्ही त्यांना घाबरवत नाही. उलट त्यांना खायला धान्य देतो, त्यामुळे त्या आम्हाला घाबरत नाहीत. “ . तुरुंग अधीक्षकाला या प्रसंगाची मोठी गम्मत व आश्चर्य वाटले.

काही वर्ष हा क्रम सुरु होता, टिळकांची आणि चिमण्यांची आता गट्टी जमली होती.  लोकमान्यांसाठी, नियुक्त केलेला स्वयंपाकी  (वासुदेव रामराव कुलकर्णी ) सातारा जिल्ह्यातील – कलेढोण गावचा राहणारा होता. 

चिमण्यांच्या थव्याच्या मध्यभागी ध्यानस्थ बसलेले टिळक एखाद्या तपस्व्यासारखे वाटू लागले. सहा वर्षाची शिक्षा आता संपत आली होती, लोकमान्य टिळकांना आता घरचे वेध लागले होते. काहीशा परकेपणाने ते आपल्या कोठडीकडे पाहत होते. ठरलेली वेळ झाल्यावर चिमण्या किलबिलाट करू लागल्या. त्यांच्या खाण्याची वेळ झाली होती. टिळक उठले आणि ममतेने त्यांनी चिमण्यांना दाणे घातले आणि म्हणाले – 

— “ यापुढे इतक्या विश्वासाने इथे येऊ नका, कारण इथला नवा रहिवासी कदाचित तुम्हालाच गट्ट करून टाकणारा असेल. “ 

संग्राहक : श्री विनय माधव गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नवरसांपैकी एक शांत रस ☆ सौ. मंजुषा सुधीर आफळे

सौ.मंजुषा सुधीर आफळे

?  विविधा ?

☆ नवरसांपैकी एक शांत रस ☆ सौ. मंजुषा सुधीर आफळे ☆ 

आपल्या मनातील भावभावना व्यक्त करणारे नवरस म्हणजे एक “अनमोल देणगी” रूपांत आपणास देवाने देऊ केलेला खजिनाच आहे. त्यातील कोणता रस कोठे आहे, व तो कसा जाणावा हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. आपल्या बौद्धिक क्षमतेनुसार, आवडीनुसार, जो तो आपले कर्म आनंद मिळवण्यासाठी करीत असतो. मनात ज्या प्रकारचे विचार निर्माण होतात, त्याप्रमाणेच भावभावनांमध्ये हे विविध रस दिसून येतात.”भूप रूप गंभीर शांत रस” हे भूप रागाची ओळख सांगणारे गीत शिकताना शांत रस याचा अर्थ बालवयात नीटसा कळलाच नव्हता. पण जसजसे आयुष्य पुढे पुढे सरकू लागले, तेव्हा  मिळणाऱ्या एकांतात शांत रस समजू लागला. मला वाटते शांत रस व एकांत यांचे एकमेकांशी एक घट्ट नाते आहे. एकांतात नेहमीच तुम्ही हा शांत रसाचे अनुभूती घेऊ शकता. मग कुठेही मिळणारा एकांत असो, अगदी आनंदाच्या प्रसंगी व दुःखाच्या प्रसंगी दोन्ही वेळेत शांत रसाची भेट होतेच होते. विशेषतः निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही गेलात, तर कुठेही एकांतात मिळणारी शांत रसातील शक्ती तुम्हाला खूप काही देऊन जाते. अगदी जंगल भटकंती करत असाल, तर एखाद्या ठिकाणी थोडे शांत व स्तब्ध उभे रहा. जंगलातील ती निरव शांतता तुम्हाला विश्वरूप दर्शनासाठी नक्की सहाय्य करेल. नदीकिनारी शांत बसून नुसते पाण्यावर उठणारे तरंग पाहताना देखील, शांत रस अनुभवता येईल. किंवा एखाद्या डोंगर माथ्यावर थोडा विसावा घेताना, एकांतात शांत रसाचे अनुभूती आल्या वाचून राहणार नाही. देवाच्या गाभाऱ्यात समईतील ज्योत शांत रसाची जाणीव करून देते. उत्कट प्रेमळ क्षणांत ही, शांत रस अनुभवता येतो. मनातील व्याकुळता, विरह, दुःख हे सुद्धा कित्येकदा शांत रसामुळे निभावता येते. तन्मयतेने चैतन्य अनुभवता येते. तेथेही शांत रस उपयोगी ठरतो. शांत रसामुळे एकरूपता साधता येते. अहंकार गळून पडतो. व पुढे जाण्याचा मार्ग सुकर होतो. निर्मळता आवडू लागते. शांत रसात सर्व संकटे, दुःख, नष्ट करण्याची ताकद मिळवता येते. परमेश्वराशी अनुसंधान साधता येते. म्हणूनच ध्यान धारणेचे महत्त्व जाणून घेतले पाहिजे. ती अंगिकारता आली तर, आपली सद्सत विवेक बुद्धी नेहमीच जागृत राहते. आणि नकळत होणाऱ्या चुका टाळता येणं शक्य होते. म्हणूनच हे जीवन समृद्ध होताना, शांत रसाची अनुभूती घेणे गरजेचे होईल.

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

विश्रामबाग, सांगली.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “घड्याळ …” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? मनमंजुषेतून ?

☆ “घड्याळ …” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर ☆

जेवतांना सहज घड्याळाकडे लक्ष गेले. आजपर्यंतच्या आयुष्यात घड्याळ किती वेळा पाहिले हे मोजताही येणार नाही. पण आज पाहिले आणि घड्याळयाच्या तीन काट्यात आणि परिवारात काहीतरी साम्य जाणवले.

घड्याळ्यात तास काटा, मिनिट काटा, आणि सेकंद काटा असतो, तसेच परिवारातील तास काटा म्हणजे वडील, मिनिट काटा म्हणजे आई, व सेकंद काटा मुलं असल्याचे जाणवले. या प्रत्येक काट्याला फिरण्याची आपली गती आहे, प्रत्येकाची गती वेगळी आहे, पण दिशा मात्र एकच आहे. पण प्रत्येकाच्या गतीचे एक वर्तुळ पूर्ण झाल्याशिवाय सेकंद, मिनिटे, आणि तास पूर्णत्वास येवू शकत नाही.

परिवारात वडील म्हणजे तास काटा, याची गती सगळ्यात कमी असली तरीही तो एका ठाम गतीने व उद्देशाने पुढील तासाच्या आकड्याकडे सरकत असतो. पण तास पूर्ण झाल्याशिवाय त्याची गती लक्षातच येत नाही. त्याच प्रमाणे वडिलांचे काम असते. ते एक एक ध्येय डोळ्यासमोर ठेऊन ठामपणे आपला प्रवास करीत असतात. पण ते घरातल्या कोणालाच लक्षात नसते. ध्येय पुर्ण झाल्यावरच त्यांची गती लक्षात येते.

— वडिलांचे महत्व लक्षात येत नाही.

आई म्हणजे मिनिट काटा असते. प्रत्येक मिनिटाला (अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपे पर्यंत) तिची गती जाणवत असते. ती सतत चालत, विचारमग्न, आणि कार्यमग्न असते. मिनिट काटा जसा घड्याळ्यात फिरतांना कधी तास काट्याच्या मागे असतो, थोड्या वेळाने थोडा काळ तो तासकाट्याबरोबर थांबतो, व नंतर परत तास काट्याला मागे टाकून त्याची ओढ सेकंद काट्याकडे असते. अगदी तसेच आईचे असते. सतत कामात असतांना नवऱ्याच्या मागे पडल्यावर ती पुढे येऊन नवऱ्याला गाठून काही काळ नवऱ्याच्या बरोबरीने काम करते व नंतर परत मुलांचे सगळे करायचे आहे या प्रेमापोटी मुलांच्या (सेकंद काट्याच्या) मागे जाऊन त्यांच्या बरोबरीने राहण्याचा प्रयत्न करते.

आणि सेकंद काटा म्हणजे लहान मुलं. ती कितीही मोठी झाली तरीही आईवडीलांच्या मागे पुढे कायम उत्साहाने तुरुतुरु पळतांना, खेळतांना, बागडतांना दिसतात. ती सतत तास काटा आणि मिनीट काटा (वडील, आई) यांच्या मधेच धडपडतांना दिसतात. त्यांचा पुढे पुढे सरकण्याचा वेगही वडील आणि आई यांच्या पेक्षा जास्त असतो.

जसे घड्याळाला तीन काटे व त्यांच्या एकाच दिशेच्या गतीशिवाय पूर्णत्व येत नाही, तसेच अगदी आपल्या कुटुंबाचे आहे. या तीन काट्याप्रमाणे आपल्या कुटुंबातील वडील, आई,आणि मुलं या़ची गती एकाच दिशेनं असल्याशिवाय घराला पूर्णत्व येत नाही.

पण हे लक्षात ठेवा की सेकंद, मिनिटे, तास,  यामुळे दिवस, आठवडे, महिने, वर्षे,  हे पूर्ण झाले तरी यासाठी काटे आपली चौकट (घड्याळाची तबकडी) सोडत नाहीत —- तशीच आपण आपल्या कुटुंबाची चौकट सांभाळायला पाहिजे…..  एक जरी काटा चुकला तरी वेळ चुकते, तसेच कुटुंबातील एक जरी सदस्य (काटा) चुकला तर कुटुंबाचे घड्याळ बिघडून गोंधळ उडेल. 

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print