मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ हिंमत असती तर…? — (फक्त जराशी गंमत हं —) ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ हिंमत असती तर…? — (फक्त जराशी गंमत हं —) 😎☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

बायको समोर स्पष्ट बोलण्याची हिंमत असती तर…?

 

१….दशरथानं कैकेयीला स्पष्टपणे

नकार देत सांगितलं असतं,

की मी काही रामाला

वनवासात पाठवणार नाही. 

तू दुसरा काहीतरी वर माग 

आणि जास्त हट्टीपणा

केलास तर लक्षात असू दे,

की मला अजून दोन बायका

आहेत, तर कदाचित रामायण

घडलंच नसतं…!!

 

२…रामानं देखील सीतेला 

स्पष्टपणे  नकार देत

सांगितलं असतं, की मी

काही हरणाच्या मागे

जाणार नाही ऊन खूप आहे. 

आज रविवार आहे 

आणि जंगलात कशाला हवंय 

तुला तेच हरीण. मला जमणार

नाही ..!! तरी देखील रामायण 

घडलं नसतं.

 

थोडक्यात तात्पर्य : 

बायकोला वेळीच नकार देणं.आवश्यक आहे

आणि हे ज्या दिवशी जमेल, त्यावेळी 

कुठलेही रामायण घडणार नाही

पण, प्रभू रामचंद्रांना जे जमलं

नाही, ते आपल्याला तरी कसं

शक्य होणार…??? 

 

असो. चालल॔य तसंच चालू द्या,

उगाच भांडण नको …..!!!!!

 

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ वाचाल तर वाचाल… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ वाचाल तर वाचाल… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

जिकडे पाहावे तिकडे घरभर पुस्तकेच पुस्तकं पसरलेली असतात. अगदी दिवाणखान्यापासून, शयनकक्षापर्यंत, स्वंयपाकघरात टेबलावर इतकचं काय .. जाऊदे.. तुम्ही ओळखलं असालचं.. घरात इनमीन सहा माणसं सगळी मोठी नि पुस्तकाची वेडी.. घरात दूरदर्शन आहे पण सगळेच जण दुरुनच दर्शन घेत असतात. मीच कधी तरी हट्टाने कार्टून लावारे म्हणत असतो.. तेव्हढ्यापुरताच तो लागतो. मोठी छोटी पुस्तकं मात्र प्रत्येकाच्या हातात असतात.. एवढं काय असतं त्यात असं मी विचारलं तर मला म्हणतात, तू अजून लहान आहेस. मोठा झालास की, वाचायला लागलास की तुला कळेलचं काय असतं त्यात.. मलाही पुस्तकं हवयं असा कधी मधी मी पण हट्ट धरला कि मोठ्या मोठ्या चित्राची एक दोन पुस्तके माझ्या समोर ठेवतात.. हत्ती, घोडा, वाघ सिंह, विमान, मोटार, जहाज, पोपट, मैना, चिमणी, सगळे त्यात दिसतं ,मी पाहतो पाच मिनिटांत पुस्तकं वाचून? नव्हे पाहून हाता वेगळे होतं ..मग घरातल्यांचं तसं का होत नाही असा प्रश्न काही सुटत नाही..मग माझ्या पुस्तकाहून काही वेगळं त्यात नक्की काहीतरी असणार.. हळूच ती पुस्तकं हातात घेऊन बघण्याचा मोह अनावर होतो.. कधी कधी ती पुस्तकं इतरांच्या नकळत हाती घेऊन चाळत जातो.. शब्दांच्या ओळीवर ओळीने पानं पानं भरलेले असते.. अक्षर ओळख नुकतीच होत असल्याने एकेक शब्दाचा उच्चार करतो अर्थ आणि समज दोन्ही बाल बुद्धीच्या पलीकडे असल्याने पानं पलटलं जातं… नेमके काय असतं की ते इतकं खिळवून ठेवतं याचा शोध अजून चालूच आहे.. पण एक मात्र मला उमजलयं वेळ मात्र छानच जातो.. त्यातली अक्षरं चित्रं पाहून डोळे खिळतात आणि चेहऱ्यावर हास्य पसरतं.. मग घरातले कसे मौनात वाचता वाचता मंदस्मित करत करत मोठयानं हसू लागले दिसतात अगदी तसेच मी पण हसू लागतो… तो आवाज ऐकून आई धावत येते आणि आधी हातातलं पुस्तकं काढून घेते.. पुन्हा या पुस्तकांना हात लावू नको बरं.. नाहीतर तुला सगळे रागावतील.. मी खट्टू होतो आईवर रुसून बसतो..शहाणा माझा राजा उदया मोठा झालास कि वाचायची आहेतच हि पुस्तकं तुला.. आता जरा तुझी खेळणी घेशील खेळायला…माझं पुस्तक वाचन तिथचं संपतं.. 

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वेळ… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

☆ वेळ… ? ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

“शब्दकळा लावती लळा”

आजचा शब्द आहे = वेळ = 

वेळ एक फ्री हिट

कोणतीही स्पर्धा आपण त्या स्पर्धेसाठी वेळ काढून बघत असतो आणि काही फ्रॅक्शन ऑफ सेकंदाच्या फरकाने कोणीतरी विजेता होतो. तेव्हा आपल्यालाही वेळेचे महत्व पटते .पण ती जिंकणार्‍याची जिंकण्याची वेळ असते तीच वेळ हरणार्‍याची हरण्याची वेळ असते. मग लक्षात येते की वेळ एकच असली तरी प्रत्येकाची वेळ वेगळी वेगळी असते.

मग वेळ लावून केलेल्या कामाला वेळ लागला म्हणायचं का वेळेत केले म्हणायचंअसं वेळेच्या बाबतीत वेळोवेळी काहीतरी वेगळेच मनात आले आणि मन वेळे बाबत विचार करू लागले.

वेळ शब्दाचा अर्थ २४ तासातील काही भाग असे म्हणता येईल. पण किती गंमत आहे पहा या वेळेची••••

वेळेच्या आधी क्रियापद लागून त्याची वेळ म्हटले तर अर्थ एक पण तेच क्रियापद नंतर लावले तर अर्थ वेगळा••••

बघा••• भरतीची वेळ,ओहोटीची वेळ,झोपेची वेळ, खायची वेळ, घ्यायची वेळ, द्यायची वेळ पण हेच उलटे केले तर?

वेळ भरली, वेळ ओसरली, वेळ झोपली, वेळ दिली/दिला ,वेळ घेतली/घेतला••••

मग विचार करताना असे लक्षात आले वेळेचा अभ्यास करण्यासाठी वेळ दिला तर डॉक्टरेट तर मिळेलच पण तरी सगळ्या प्रकारचा सगळ्या विषयाचा वेळ , यासाठी वेळच पुरणार नाही.

आपल्या मराठी भाषेत अनेक गमतीशीर शब्द आहेत त्यापैकी सगळ्यात मजेदार शब्द मला वेळ वाटतो.

कारण तुम्ही जसे फिराल तसा वेळ फिरत राहील तुम्हाला फिरवत ठेवील आणि तुम्ही त्याला शेकडो क्रियापदे जोडू शकता असा सर्वव्यापी सर्वसमावेशक असा शब्द आहे वेळ.

या वेळेला कितीही क्रियापदे लावून वाक्प्रचार केले ना तरी सगळे वाक्प्रचार वापरले असे म्हणताच येणार नाही. थोडे शब्द फिरवून त्या वेळेची छटा बदलता येऊ शकते.

वेळ••••• असते,नसते,पळते,पाळते,देते,घेते,येत,जाते,बघते,ओळखते,बदलते,घालवते,टळते,गाजवते,रेंगाळते,झोपते,साधते,बाधते काहीही करू शकते.

वेळ••••

पहाटेची, झुंजुमुंजूची, सकाळची, मध्यान्हाची, दुपारची, संध्याकाळची, रात्रीची, एकांताची, कातरवेळ, झांझरवेळ, साजणवेळा, धुंदवेळ, वाईट वेळ, चांगली वेळ, शिळोप्याची वेळ, अंतिमवेळ किंवा•••

उठायची, बसायची, नाष्त्याची, चहाची, विधी करण्याची, जेवायची, फिरायची, विश्रांतीची ऑफिसला जायची, झोपायची अशी कोणतीही असू शकते.

वेळापूरच्या वृद्धाश्रमात रहायची वेळ आलेले  वेळापुरे आजी आजोबा बोलत होते, आपले लग्न वेळेवर झाले म्हणून लेकरं बाळं वेळेत झाली. तेव्हा वेळेची तमा न बाळगता काम केले. वेळात वेळ काढून मजा केली वेळेवर उठण्यापासून ते वेळेवर झोपण्यापर्यंत वेळेचे वेळापत्रक आखून वेळेचे नियोजन केले. म्हणूनच वेळेचे गणित बसून आपण सगळीकडे वेळेवर हजर होत होतो. वेळेची चालढकल केलेली तुम्हाला चालायचीच नाही.वेळेचे पक्के होतात. तुमच्या हुषारीने कामाने तुम्ही कितीतरी वेळा ऑफिसची वेळ गाजवली होती.

आजोबा पण म्हटले हो ना तू पण  मी रागवायची वेळ येऊ नये म्हणून जीवाचा आटापिटा करून वेळेचे भान ठेवत माझी एकही वेळ चुकवू द्यायची नाहीस. वेळ महत्वाची असते आणि वेळेचे महत्व तुला होते त्यामुळे सगळे सहज सोपे वाटत होते.

वेळ वाया न घालवता तू सतत कामात वेळ घालवायचीस.खूप कष्टातही हसून तू म्हणायचीस अहो वेळ सांगून येत नसते. ही पण वेळ निघून जाईलच आणि वेळ बदलून चांगली वेळ येईल. या तुझ्या सकारात्मकतेने संसाराचा वेळ कापरासारखा उडून गेला.

खरचं वेळीच मुलांना शिक्षण दिले वेळेची कदर करीत मुलांनाही वेळेचा वेळेवर तुकडा पाडायचे भान दिले. वेळेचा अपव्यय न करता वेळेचा सदुपयोग करायला शिकवले. त्यामुळे आपल्या सुखी संसाराची वेळ जमून आली होती.

तसेच वेळ आल्यावर बघू अशा बेफिकिर वृत्तीत न रहाता वेळेची मर्यादा पाळून वेळकाढूपणा न करता वेळ कोणासाठी थांबत नसते हे जाणून वेळेनुसार दिलेली वेळ पाळत वेळेच्या बंधनात राहून  एकमेकांना सांभाळलं म्हणून या साथीत ५० वर्षाचा वेळ कसा गेला हे कळलच नाही.

वेळ वखत पाहून वागलं म्हणजे वेळ गेल्यावर हळहळावे नाही लागत. पण बाई वैर्‍यावर पण अशी वेळ येऊ नये. पण वेळ सांगून येत नाही.

अगदी खरे आहे हो. आता बघा ना एवढा वेळ मेहेरबान असताना आपल्यावर अशी वृद्धाश्रमात रहायची वेळ येईल असे वाटले तरी होते का?

आपली दोन्ही पोरं मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहेत म्हणून आपण भारावलो होतो. अचानक थोरल्याच्या मनात फॉरेनला जायचं खूळ आलं. नुकतीच तुमची रिटायरमेंट झाली होती. सुदैवाने मुबलक पैसा हाती होता. पण थोरल्याला लगेच फॉरेनला जायचे होते म्हणून त्याने वेळ साधून पैशाची मागणी केली. वेळ न दवडता त्याला मदत करणे वेळेत जमवायला पाहिजे होते. म्हणून वेळोवेळी केलेली गुंतवणूक , मिळालेले पैसे हे सगळे वेळेचा अभाव असल्याने हातची संधी जाउ नये वेळ गेला असे होउ नये म्हणून मी वेळीच घातलेल्या लगामाकडे दुर्लक्ष करून तुम्ही त्याला दिली.

ते बघून धाकट्याला झोंबलं. त्यानेही तोच मार्ग धरला आणि यावेळी थोडी वेळ निराळी आहे कारण वेगळ आहे पण पैशाची नड असल्याने तुम्ही दादाला दिले तर मलाही पाहिजेत म्हणून हट्टच धरला. त्याने वेळ पाहून खेळ मांडलेला मला कळत होतं . मी काही कारणे सांगून वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला पण त्यावेळी तुम्ही वेळ वखत पाहून नाही वागला. थोरल्याला दिले म्हणून राहिलेले धाकल्याला देऊन मोकळे झालात.  तुम्ही वेळ बदलेल या विश्वासाने यावेळी आपण मदत केली तर पुढच्यावेळी ते आपली मदत करतील या भ्रमात होता. 

ते किती चुकीचे होते हे उशीरा कळले पण तो पर्यंत वेळ निघून गेली होती. आपले होणारे हाल पाहून एका सद्गृहस्थाने आपल्याला या वृद्धाश्रमात आणले आणि आपल्याला डोक्याला हात लावून बसायची वेळ आली.

आजोबा म्हटले खरं आहे तुझं. वेळेमुळे कशाचे काय होईल काही सांगता येत नाही.  पण अजूनही वेळ गेलेली नाही. आता तर आपल्याकडे वेळच वेळ आहे. अशी वेळ कोणावर येऊ नये म्हणून आपण रिटायर्ड होणार्‍यांना सतर्क करण्याचे काम करू. त्यामुळे आपला वेळही सत्कारणी लागेल शिवाय कालची वेळ आज नसते हे शहाणपण आपणही घेऊन याच वृद्धाश्रमातील गरजूंची आपण मदत करूया. आता तर फक्त आपल्या दोघांसाठीच आपण जगणार असल्याने एकमेकांना भरपूर वेळ देऊ या. वेळ न वखत बसली खोकत अशी गत करून तेच तेच दु:ख उगाळत बसू नको. चल दोघांनी मिळून नवी सुरूवात करू. मागच्या वेळेची अनुभूती नकोच . वेळेचे गुलाम होणेही नको. आपण आपल्या वेळेनुसार वेळेला आपल्यापुढे वाकायला शिकवू. शेवटी वेळच आपला गुरू असल्याने त्याची विद्या त्यालाच देऊ. आणि हो , आता परत उदास सूर लावण्याची वेळ नको म्हणून वेळेची एक गंमत सांगतो.

तुला सांगतो हा वेळ आहे ना एक जादूगार आहे. केव्हा काय कोणत्याक्षणी बदलेल हे सांगता येत नाही.

आता हेच बघ ना पूर्वी क्रिकेट ५- ५ दिवस टेस्ट मॅचेस मधे खेळायचे. तेवढा वेळ बघणार्‍याकडे असायचा. मग नंतर ३ दिवसीय मॅचवर आला कारण लोकांचा वेळ कमी झाला. तो वेळ अजून कमी झाला आणि वन डे मॅच आली. आता २०-२० म्हणजे फक्त काही तासच.

पण मजा तेवढीच उत्सुकता तेवढीच आणि कौतूकही तेवढेच. वेळ कमी आहे म्हणून माणसाने आपली करमणूक नाही कमी केली.

अगं आता आपल्या जीवनातील ५० गेली अन ५ राहिली अशी गत असताना चल आपण वेळेशीच २०- २० खेळू.

आमच्यावेळी ५ दिवसाची होती तरी आमच्यावेळीच २०-२० पण आहे. यावेळी आपण जरा वेगळी मजा घेऊ.  वेळेचे चेंडू वेळेवर फ़टकावू, वेळेवर अडवू, वेळेवर झेलू . वेळेवर विकेट जाणारच आहे हे ध्यानात ठेऊन प्रत्येक वेळी मागच्या वेळपेक्षा वेगळ्या खेळाचे प्रदर्शन करू. वेळेला केळ आणि न्याहारीला सिताफळ खात

कोणत्याही वेळी टपकणारा वेळेचा चेंडू अवेळी विकेट न जाऊ देता चौकार षट्कार यांनी टोलवत राहू. वेळ बदलून क्षेत्ररक्षण करायचे तेव्हा दरवेळी चेंडू न आडवता फलंदाजालाच खेळते ठेऊ. वाटले तर तेथे थोडा वेळखाऊपणा पण करू. आपले मस्त वेळ घालवणे पाहून वेळेला रेंगाळायला लावू. आपल्याकडे थोडा वेळ आहे पण मॅच जिंकायचीच आहे म्हणून वेळेचे भान ठेवत ही वेळ पुन्हा येणार नाही म्हणून एक उनाडवेळ पुन्हा जगू या. वेळेचे भान हरपून आपण वेळेला चकवू या. वाढवेळ खेळात नसतो कधीतरी वेळ संपल्याचे वेळ सांगेलच पण त्यावेळी वेळेलाच नो बॉल म्हणून परत बॉल टाकायला लावू आणि मग त्या वेळेच्या चेंडूला फ्री हिट समजून सीमापार करू आणि नॉट आऊट राहून सामना जिंकू.

खरच वेळ एक फ्री हिट आहे त्याचा लाभ घेऊ.

हे पचवायला जरा वेळ लागेल पण वेळ बदलणे वेळेच्या हातात नाही तर तुमच्या हातात आहे हे पटवून देऊ. चल आपण वेळीच हा पायंडा पाडू.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ होंगे कामयाब … ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? मनमंजुषेतून ?

☆ होंगे कामयाब … ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆ 

सिंहगड एक्स्प्रेसने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनला प्रवास करत होतो. बहुधा रामनवमीची सार्वजनिक सुट्टी असल्याने, आज दादरनंतर गाडीला बऱ्यापैकी कमी गर्दी होती. दादर स्टेशनलाच समोरच्या सीटवर एक चाळीस पंचेचाळीस वर्षांचा माणूस येऊन बसला. त्याने माझ्याकडे बघून एक general स्मितहास्य केलं, मीही प्रत्युत्तर दिलं. 

सर्वसाधारण दिसणारा माणूस, पण थोडासा खंगल्यासारखा दिसणारा. पण त्याच्या चेहऱ्यावर आनंद थुईथुई नाचत होता. प्रचंड खुश दिसत होता तो. अर्थात संपूर्ण अनोळखी माणसाला आपण कसं विचारणार, “का हो, एवढे खुश का आहात ?”

तो, डोळे मिटून, स्वतःशीच गाणं गुणगुणत होता. आणि हळूहळू तो स्वतःच्याच भावविश्वात एवढा रममाण झाला की, त्याच्या नकळत, तो ते गाणे मोठ्याने म्हणू लागला. गाणं होतं – “होंगे कामयाब, हम होंगे कामयाब.”

आजूबाजूचे सगळे आधी आश्चर्याने – कुतूहलाने त्याच्याकडे पाहू लागले. मग कोणीतरी त्याच्या सुरात सूर मिसळला, मग आणखी एकाने, आणखी एकाने. आम्ही सगळे “होंगे कामयाब” म्हणत होतो. अंगावर शहारा येत होता. प्रत्येकालाच सगळ्या ओळी ठाऊक होत्या असं नाही. पण त्याला ते गाणं पूर्ण पाठ होतं. जणू अनेक वर्षे तो हे गाणं म्हणत होता. त्याने ओळ म्हणायला सुरुवात केली, की बाकीचेही त्याला साथ देत होते. वातावरण नुसतं भारावून गेलं होतं. 

गाडीची गती हळू हळू कमी होऊ लागली. स्टेशन येत होतं. गाणं संपलं. त्याने डोळे उघडले. आम्ही सगळे उभे राहून गाणं म्हणत होतो. गाणं संपल्यावर उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवत होतो.

तो अवघडला, संकोचला. मग तोही उठून उभा राहिला. रंगमंचावर, कलाकार अथवा जादूगार, प्रयोगानंतर जसा कुर्निसात करतात तसा त्याने सगळ्यांकडे बघत लवून कुर्निसात केला आणि म्हणाला, ” मी आज खूप खूश आहे. आत्ताच टाटा हॉस्पिटलमधून येत आहे. Today is my first cancer free day. आज माझा कॅन्सर पूर्णपणे निघून गेल्याचं, मी कॅन्सरवर मात केल्याचं डॉक्टरांनी मला सांगितलं आहे. आज मी माझ्या मुलाबाळांकडे, बायकोकडे गावाला परत जाणार आहे. Thank you all for joining in.”

गाण्यामागचं कारण समजल्यावर गाण्याची अर्थपूर्णता आणखीनच वाढली, त्यानं हेच गाणं का म्हटलं तेही कळलं. आमच्या टाळ्यांचा जोर वाढला, आणि कॅन्सरवर मात करणारा तो योध्दा ताठ मानेने गाडीतून उतरून निघून गेला. 

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पाण्याचे भांडे आणि दिवा… डाॅ. गौरी कैवल्य गायकवाड ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ पाण्याचे भांडे आणि दिवा… डाॅ. गौरी कैवल्य गायकवाड ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

पिण्याच्या पाण्याच्या भांड्यांजवळ देखील एक दिवा लावावा आणि ज्या दिवशी शक्य असेल, त्या दिवशी एक फुल देखील तेथे वाहवे  आणि मनोभावे पाण्याच्या सर्व भांड्यांना हात जोडून कृतज्ञता व्यक्त करणे

वाचताना काही जणींना हे विचित्र वाटू शकेल, कोणाला हास्यास्पद वाटेल..पण मी स्वतः एक डॉक्टर आहे. विज्ञानाच्या परीक्षेतून तावून सुलाखून बघितल्या शिवाय सहसा कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. पण सहा महिन्यांपूर्वी ” पाणी” या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण असे संशोधन माझ्या हाती लागले, आणि त्या नंतर चक्क काही धार्मिक पुस्तकांमध्ये त्याचे जसेच्या तसे संदर्भ देखील मिळाले..

ते सोप्यात सोप्पे करून खाली देत आहे.. नक्की वाचा..

१) पाणी…म्हणजे जीवन..पाण्याला स्वतःची विशिष्ट अशी एक स्मरणशक्ती असते. 

२) पाणी पिताना ज्या प्रकारचे आपले विचार असतात, किंवा ज्या मानसिक स्थिती मध्ये आपण पाणी पितो,त्याचा प्रचंड परिणाम पाण्यावर आणि पर्यायाने आपल्यावर होतो..

३) पाण्यामध्ये बाहेरून येणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या उर्जे प्रमाणे  बदल होत असतात, आणि त्या बदला प्रमाणे ते तुमच्या शरीरावर परिणाम करत असते .

४) पाणी हे प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारे कार्य करते. आपल्या शरीराचा जवळपास ७०-७५% भाग हा पाण्याने बनलेला आहे.म्हणजेच, शरीराचे कार्य कसे चालावे हे मुख्यत्वे आपण जे पाणी ग्रहण करतो, तेच ठरवत असते.

५) पाणी पितानाचे तुमचे विचार, पाण्याकडे बघण्याची तुमची दृष्टी किंवा नजर, पाणी पिताना आजूबाजूला येणारे आवाज, पाणी पिताना तुमच्या मनातील भावना किंवा तुमच्या तोंडातून निघणारे उच्चार  या सर्वांचा पाण्यावर प्रचंड परिणाम होतो.. आणि जे प्रत्यक्षात मायक्रो स्कोप खाली बघता सुध्धा येते.

६) तुमची मानसिक स्थिती जर प्रचंड सकारात्मक असेल, आणि हातातील पाण्या विषयी जर तुम्ही प्रचंड कृतज्ञ असाल, तर गढूळ किंवा दूषित पाणी देखील तुम्हाला काहीही अपाय करू शकत नाही; आणि तुमची मानसिक स्थिती नकारात्मक असेल, आणि पाणी पिताना जर तुम्ही पाण्या विषयी बेफिकीर असाल तर अतिशय शुध्द पाणी देखील प्रचंड अपायकारक. ठरू शकते.

७) पाणी हे “जिवंत” असून, मानवाची मज्जासंस्था ज्या प्रमाणे कार्य करते, त्याप्रमाणे पाणी आणि त्याची “पेशिसंस्था” करू करते.

८) जे पाणी हातात धरून किंवा जवळ ठेवून प्रेमाच्या भावना मना मध्ये आणल्या जातात, त्या पाण्याच्या पेशींचा किंवा कणांचा (molecule) आकार खूपच सुंदर असतो, आणि जे पाणी हातात धरून किंवा जवळ ठेवून राग किंवा द्वेष अशा भावना मनात आणल्या जातात, त्या पाण्याच्या कणांचा आकार खूपच विचित्र आणि ओबड धोबड असतो.

९) ज्याप्रकारे पाणी पिताना तुम्ही पाण्याला “ट्रीट” करता, पाणी ते खूप जास्त काळापर्यंत ” लक्षात ठेवते” आणि त्याप्रमाणे तुमच्या शरीरावर चांगले किंवा वाईट परिणाम करते.

१०) पाण्याचा विचार सध्या ” liquid computer”  म्हणून देखील केला जात असून त्यामध्ये पाण्याचा ” लक्षात ठेवणे(memory)” हा गुणधर्म वापरला जात आहे.

११) तुम्हाला जो काही चांगला उद्देश साध्य करायचा आहे, ” तो उद्देश एका हातात पाण्याचा ग्लास घेऊन मग मनामध्ये बोलून मग ते पाणी पिणे” या सारख्या विविध “Water Therapy सध्या पाण्याच्या याच गुणधर्मांचा वापर करून उदयास येत आहेत.

१२) ही सगळी वैज्ञानिक माहिती असून, ज्यांना अजून डिटेल माहिती पाहिजे असेल, त्यांनी नेट वरून डॉ. मासारू इमोटो यांचे पाण्यावरील संशोधन शोधून वाचावे.

 

तर आता..या पाण्याच्या दिव्य आणि शक्तिशाली क्षमतांची सांगड आपल्या संस्कृती आणि चालिरितींशी घालण्याचा प्रयत्न केल्यावर जे काही हाती लागले, त्यावरून मी खालील गोष्टी. गेली सहा महिने करीत आहे.

१) पिण्याचे पाणी  तांब्याच्या भांड्यात ठेवूनच साठवावे..आणि शक्यतो तांब्याच्या ग्लास ने च प्यावे. कारण तांबे हा धातू ऊर्जेचा “सुवाहक” आहे.

२) रोज रात्री ते तांब्याचे भांडे चिंच आणि हळद वापरून धुवावे.

३) त्यानंतर त्यामध्ये स्वच्छ पाणी सुती कपड्यामधून गळून भरावे.

४) यानंतर या पाण्याच्या भांड्याच्या बाजूला एक दिवा लावून भांड्यावर एक फुल ठेवावे, आणि पाण्या विषयी मनामध्ये अत्यंत कृतज्ञतेचे भाव आणून हात जोडावेत. (आम्हाला आयुष्य, आरोग्य आणि जीवन प्रदान केल्याबद्दल आभारी आहोत असे किंवा या प्रकारचे कोणतेही चांगले विचार मनात आणून कृतज्ञता व्यक्त करू शकता.)

५) सकाळी उठल्या नंतर याच भांड्यातील पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करावी.

६) पाणी पिण्याचा सर्वात योग्य मार्ग म्हणजे दोन हातांच्या ओंजळीत घेऊन पिणे.. परंतु ते आपल्याला शक्य नसते. त्यामुळे पाणी पिताना, ज्या भांड्यामध्ये, किंवा पेल्यामध्ये प्याल, तो दोन्ही हातांनी पकडून पाणी पिणे.

७) पाणी पिताना जाणीवपूर्वक काही सेकंद पाण्याचा ग्लास दोन्ही हातात धरून मनामध्ये चांगले विचार, चांगल्या भावना आहेत याची खात्री करूनच पाणी प्यावे. 

८) हीच गोष्ट कोणाच्या घरी गेल्यावर किंवा बाहेर गेल्यावर कुठले पाणी पिण्याची वेळ आली तर  जाणीव पूर्वक थोडी जास्त वेळ करावी.

९) केवळ तहान लागल्यावरच पाणी प्यावे. सारखे सारखे विनाकारण पिऊ नये. 

१०) आहारामध्ये पाणी जास्त प्रमाणात (८०-९०%) असलेल्या घटकांचा म्हणजेच फळांचा.. जास्तीत जास्त समावेश करावा.. 

 

या प्रकारे पाणी पिण्यामुळे आणि वर दिलेल्या सर्व गोष्टी  गेले सहा महिने सलग केल्यामुळे “पहिल्या दिवसा पासून” झालेले फायदे.:

१) माझी लहान मुलगी, जी दर महिन्याला आजारी पडत होती, आणि तिला अँटिबायोटिक्स दर महिन्याला द्यावे लागत होते, ते पूर्ण बंद झाले.

२) माझे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य खूप चांगले झाले, जे काही महिन्यांपूर्वी प्रचंड बिघडलेले होते.

३) माझ्या घरातील लोकांचा acidity चा त्रास जवळपास बंद झाला आहे.

४)रोज सकाळी घरातील वातावरण खूपच छान, हसते खेळते आणि ऊर्जेने भरलेले असते .

५) माझा पाण्याकडे, आणि एकूणच स्वयंपाक घराकडे बघण्याचा दृष्टीकोन प्रचंड बदलला आहे.

६) एखादे दिवशी दिवा लावायचा विसरला, तर पाण्याच्या  चवीमध्ये जाणवण्या इतका फरक आहे.

लेखिका – डॉ.गौरी कैवल्य गायकवाड

संग्रहिका : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ संत एकनाथ महाराज षष्ठी… ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ संत एकनाथ महाराज षष्ठी… ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

सर्वसाधारणपणे नाथ म्हणून ओळखले जाणारे संत एकनाथ (१५३३-१५९९) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक संत होते… त्यांचा जन्म इ.स. १५३३ मध्ये पैठण येथे झाला. संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा. ते सूर्याची उपासना करीत. श्री संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. आईचे नाव रुक्मिणी होते. आई-वडिलांचा सहवास त्यांना फार काळ लाभला नाही. त्यांचे पालनपोषण आजोबांनी केले. चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होत…..

एकनाथांचे गुरू सद्गुरू जनार्दनस्वामी हे देवगड (देवगिरी) येथे यवन दरबारी अधिपती होते… हे मुळचे चाळीसगावचे रहिवासी; त्यांचे आडनाव देशपांडे होते. ते दत्तोपासक होते. गुरू म्हणून संत एकनाथांनी त्यांना मनोमन वरले होते. नाथांनी परिश्रम करून गुरुसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले; द्वारपाल म्हणून दत्तात्रेय नाथांच्या द्वारी उभे असत असे म्हणतात. नाथांनी अनेक तीर्थयात्राही केल्या…..

नाथांनी पैठणजवळच्या वैजापूर येथील एका मुलीशी विवाह केला… एकनाथ आणि गिरिजाबाई यांना गोदावरी व गंगा या दोन मुली व हरी नावाचा मुलगा झाला. त्यांचा हा मुलगा हरिपंडित झाला. त्याने नाथांचे शिष्यत्व पत्करले. एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर हरि पंडितांनी नाथांच्या पादुका दरवर्षी आषाढी वारीसाठी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली. कवी मुक्तेश्वर हे नाथांचे मुलीकडून नातू होत…..

संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे २५० वर्षांनी एकनाथांचा जन्म झाला… ‘बये दार उघड’ असे म्हणत नाथांनी अभंगरचना, भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली. एकनाथ हे संतकवी, पंतकवी व तंतकवी होते. त्यांनी आपल्या साहित्याद्वारे जनतेचे रंजन व प्रबोधन केले. ते ’एका जनार्दन’ म्हणून स्वतःचा उल्लेख करतात, एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे…..

’एकनाथी भागवत’ हा त्यांचा लोकप्रिय ग्रंथ आहे… ही एकादश स्कंदावरील टीका आहे. मुळात एकूण १३६७ श्लोक आहेत. परंतु त्यावर भाष्य म्हणून १८,८१० ओव्या संत एकनाथांनी लिहिलेल्या आहेत. व्यासांनी रचलेले मूळ भागवत १२ स्कंदांचे आहे. नाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे ४० हजार ओव्या आहेत. रुक्मिणीस्वयंवर हेही काव्य त्यांनीच लिहिले आहे. दत्ताची आरतीही (त्रिगुणात्मक त्रयमूर्ति दत्त हा जाण) त्यांची आरती गणपतीसमोर गायच्या आरत्यांपैकी एक आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एकनाथांनी ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. नाथ हे महावैष्णव होते. दत्तभक्त होते, देवीभक्त पण होते. जातिभेद दूर करण्यासाठी यांनी आयुष्यभर प्रयत्न केले…..

फाल्गुन वद्य षष्ठी, शके १५२१ (२६ फेब्रुवारी इ.स. १५९९) या दिवशी संत एकनाथांनी देह ठेवला… फाल्गुन वद्य षष्ठी हा दिवस ‘ एकनाथ षष्ठी ‘ म्हणून ओळखला जातो. 

संग्राहिका : वीणा छापखाने 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विज्ञान—एक जादूई शब्द ☆ श्री उमेश सूर्यवंशी ☆

श्री उमेश सूर्यवंशी

? विविधा ?

☆ विज्ञान—एक जादूई शब्द ☆ श्री उमेश सूर्यवंशी ☆

!! शब्दजाणीव !!

मानवी जीवनाची कूस बदलवून टाकणारा तो शब्द…अवघ्या चारपाचशे वर्षात पृथ्वीच्या रंगमंचावर दाखल झाला आणि बघता बघता संपूर्ण मानवी आयुष्य व्यापून टाकले. तो शब्द केवळ शब्द नसून मानवी जीवनाची गुरुकिल्ली म्हणावी इतपत तो महत्त्वाचा बनला आहे. त्या शब्दाचे फायदे अगणित आहेत आणि काही तोटे देखील आहेत. हा शब्द मानवी जीवनात तंत्रज्ञान म्हणून सत्ता गाजवतो मात्र या शब्दाला मानवी जीवनात जेव्हा ” मुल्यात्मक ” वजन प्राप्त होईल तेव्हा मानवी जीवनाचा संपूर्ण हितवर्धक कायापालट होईल याची नक्कीच खात्री देता येते. संपूर्ण जगाला खेडे बनवण्याची किमया याच शब्दाच्या प्रभावाने घडवून आणली आणि दुसऱ्या टोकावर संपूर्ण जगाचा विनाश करण्याची ताकद देखील याच शब्दाच्या विकृत वापराने मनुष्याच्या वाट्याला आली आहे.हा शब्द आणि त्याच्या योग्य जाणीवा समजून घेऊन मानवी जीवन फुलवले पाहिजे.

विज्ञान… एक जादुई शब्द आहे. जादुई याकरिता म्हटले की, जादूची कांडी फिरवल्याचा जो परिणाम कल्पनेत दिसून येतो त्याहून अधिक जादुई परिणाम या शब्दाच्या वापराने मानवी सृष्टीत झाला आहे. अवघ्या चारपाचशे वर्षापूर्वी विज्ञान सर्वार्थाने मानवी नजरेत भरले आणि जगाचे स्वरूप आरपार बदलले. मनुष्याच्या प्रगतीच्या वाटा विज्ञानानेच मोकळ्या केल्या आणि आकाशाला गवसणी घालण्याची कल्पना जवळपास प्रत्यक्षात आणून दाखवली. तंत्रज्ञान ही विज्ञानरुपी नाण्याची एक बाजू आहे. या बाजूने आता मानवी जीवनाचा कोपरा न् कोपरा व्यापलेला आहे. मनुष्याने या तंत्रज्ञान रुपी विज्ञानाचा अतोनात फायदा उपटला आहे. याचबरोबर या तंत्रज्ञान रुपी विज्ञानाची घातक बाजू म्हणून अण्वस्त्ररुपी विनाशकी हत्यारे निर्माण झाली आणि पृथ्वी विनाशाच्या टोकावर उभी राहीली हे देखील काळे सत्य आहे. विज्ञानाची सृष्टी जेवढी मोहक आहे, उपयोगी आहे त्यापेक्षा अधिक सुंदर व बहुपयोगी आहे विज्ञानाची दृष्टी. ही दृष्टी मानवी वर्तनात व्यवहारात आली की… अंधश्रध्दा, कर्मकांडे, धर्मांधता, जातीयता, भयता, प्रांतीयता, वंशवादता, अलैंगिकता अशा कित्येक प्रश्नांची उत्तरे मिळून जातात. विज्ञानाची दृष्टी म्हणजे विज्ञानाला ” मुल्यात्मक जाणीवेने ” मानवी जीवनात प्रतिष्ठीत करणे. विज्ञानाची नेमकी जाणीव म्हणजे विज्ञान तुमच्या मनांत असंख्य प्रश्न उभे करते आणि त्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा मार्ग देखील ” वैज्ञानिक दृष्टिकोन ” ठेवून मिळवता येतो ही सकारात्मक विधायक भावना रुजवते. विज्ञानाची नेमकी जाणीव हीच की, मनुष्याचे पृथ्वीवरील क्षुद्रत्व समोर ठेवते आणि पुन्हा मनुष्याच्या बुध्दीला उत्तेजना देऊन त्याचे प्राणी सृष्टीहूनचे अधिकचे महत्त्व ठळकपणे समोर आणते. विज्ञानाची जाणीव म्हणजे जादूची कांडी फिरवायला देखील योग्य ध्यास व ध्येय असावे ही भावना प्रबळ करून मनुष्यच पृथ्वी जगवू शकतो असा ठाम आत्मविश्वास मानवी मनांत निर्माण करते. विज्ञानाची ठळक जाणीव म्हणजे जोवर विज्ञान मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे तोवरच माणसाला शक्तीशाली बनण्याची संधी आहे, आव्हान आहे आणि त्याचबरोबर समस्त सृष्टीची जबाबदारी त्याच्या खांद्यावर असल्याचे भानं देखील उपलब्ध आहे. विज्ञान हा शब्द वगळून मानवी जीवनाचा भूतकाळ नाही…वर्तमानकाळ नाही…अन् भविष्यकाळ अजिबात नाही.

विज्ञानाचा नैतिक दबदबा इतका की, धर्म नावाच्या संघटीत क्षेत्राला बाजूला करण्याची हिंमत बाळगून आहे. धर्माला योग्य पर्याय म्हणून विज्ञानवादी असणे ही एक वैचारिक भुमिका मांडली जात आहे. विज्ञानाएवढा ताकदीचा आणि संपूर्ण मानवी समाज व्यापणारा दुसरा शब्दच उपलब्ध नाही. विज्ञानाची ही किमया अफाट आहे, जादूई आहे, प्रगतीशील आहे. फक्त जाणीव हीच राखली पाहिजे की, विज्ञानाच्या सृष्टीबरोबरच विज्ञानाची दृष्टी मानवी समाजात अधिक फैलावली पाहिजे.

©  श्री उमेश सूर्यवंशी

मो 9922784065

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ OUTLET —  लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ OUTLET —  लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆ 

लाखो जीव घेणार्‍या क्रूर  हिटलरने शेवटी आत्महत्या केली !……..

सुंदर विचार देणारे साने गुरुजी आत्मघात करुन घेतात.

मनशक्ती नावाचं मनाला खंबीर करण्याचं शिक्षण देणारे लोणावळ्याचे स्वामी विज्ञानानंद मंत्रालयावरुन उडी मारुन जीव देतात.

आध्यात्मिक गुरु अशी ओळख निर्माण केलेले व कित्येकांना आधार देणारे भैय्युजी महाराज आपलं जीवन आपल्या हातानं संपवतात.

पॉझिटिव्ह विचार देणारा चित्रपट करूनही सुशांत सिंग राजपूतनं नैराश्यातून आत्महत्या केली.

-आणि आता सहा आठ महिन्यांपूर्वी नैराश्याशी लढा कसा द्यायचा हे शिकवणाऱ्या शीतल (आमटे) करजगी आपलं जीवन संपवतात. 

-आजची नागपूरची बातमी उच्च विद्याविभूषित, दिवंगत कुलगुरूच्या पत्नी तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांनी नवव्या माळ्यावरून उडी घेऊन नैराश्यातून आत्महत्या केली.

या काही सेलिब्रिटींच्या उदाहरणातुन काय शिकायचं आपण? ……..

पाण्यात शांतपणे पोहणारे बदक वरून शांत दिसत असलं तरी पाण्याखाली त्याचे पाय वेगानं हलत असतात. शांत पोहोतोय हे दाखवण्यासाठी करावे लागणारे त्याचे कष्ट फक्त त्यालाच माहित असतात…… माणूस वरवर दिसतो तितका आतून खंबीर असेलच असं नाही. त्याच्या मनात वेगळी खळबळ असू  शकते, जी आपल्यापर्यंत पोहोचत नसते किंवा तो त्या आनंदी आणि सुखी चेहर्‍याच्या आड लपवत असतो, लपवण्याचा प्रयत्न करत असतो.  शेवटी काय…?? वर सुंदर ताजमहाल असला तरी खाली कबरच आहे हे विसरुन चालणार नाही.

भय्यूजी महाराजांनी आत्महत्या केल्यानंतर ABP माझा चॅनलने एक परिचर्चा घडवून आणली होती.

त्यात बोलताना भय्यूजी महाराजांचे मित्र – श्री. अशोक वानखेडे यांनी मानवी स्वभावाचा फार चांगला पैलू सांगितला. भैय्यूजी महाराज स्वतः एक अध्यात्मिक गुरू होते, परंतू ते एक व्यक्ती पण होते. आपल्या मनातील स्ट्रेस बाहेर काढायला त्यांच्या जवळ outlet नव्हता. डॉ. शितल आमटे (बाबा आमटे यांची नात -) त्याचंही अगदी भैयु महाराजांसारखं झाले.)

इतकं महत्वाचं असतं का हे outlet ? तर होय !!!

— कोट्यावधी रूपये खर्च करून पाण्यासाठी विशाल धरण बांधलं आणि समजा त्याला outlet च दिले नाही तर काय होईल? निश्चितच धरण फुटेल. इतकं महत्वाचं असते हे waste weir …मानवी शरीर म्हणजे विविध पंचतत्वापासून सांधलेलं एक धरणच आहे. या शरीरात समस्यांची आवक अति प्रमाणात झाली तर हे शरीररूपी धरण फुटेल की राहील ?—  मुंबई का तुंबते? पुरेसे outlets राहिले नाहीत.

म्हणून आपलं outlet सदैव सताड उघडं ठेवा. आपल्या तोंडाचे outlet  वापरून आपल्या समस्या आपल्या माणसांना सांगा. आपल्या अंतर्मनाचं outlet open करण्यासाठी meditation चा अवलंब करा आणि शक्य झाल्यास जगातील सगळ्यात मोठं outlet म्हणजे आपले डोळे, ते उघडा. फुटून जाऊ द्या अश्रूंचा बांध…वाहून जाऊ द्या.. स्ट्रेस, दुःख, उपेक्षा.. पिस्तुलाच्या गोळीने डोक्याला छिद्र पाडण्यापेक्षा, पंख्याला लटकण्यापेक्षा….  हे केव्हाही सोपं नाही का.?

म्हणूनच मित्र नावाच्या खांद्याचा आधार घ्या. मन मोकळं करा. बेस्ट आउटलेट म्हणजे परिवार आणि मित्र !—– 

— हसा ! बोला ! रडा ! भांडा ! व्यक्त व्हा !!  मुक्त व्हा.. !!

काळजी घ्या…. सोडून गेल्यावर “ᴍɪss ʏᴏᴜ” म्हणण्यापेक्षा,  सोबत आहे तोपर्यंत “ᴡɪᴛʜ  ʏᴏᴜ” म्हणा. आपुलकीची माणसं मिळायला खूप मोठं भाग्य लागतं…

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ॥ पारिजातक कथा ॥ ☆ प्रस्तुती – सुश्री वर्षा सुनील चौगुले ☆

? इंद्रधनुष्य ?

॥ पारिजातक कथा ॥ ☆ प्रस्तुती – सुश्री वर्षा सुनील चौगुले ☆

रात्रीच पारिजात का फुलते, बहरते, त्यामागे एक अतिशय गोड प्रेमकथा आहे. अशी कथा की जी सर्व काळातील सर्वोत्कृष्ट प्रेमकथांंना सुद्धा लाजवेल….  

या कथेनुसार, राजकुमारी पारिजातक सूर्याच्या… होय भगवान सुर्य देवाच्या प्रेमात पडली. सूर्यदेवाला त्याच्या वैभवाची आणि शक्तीची पुर्णपणे जाणीव होती. तरीही एका अटीवर तिच्याशी त्याने लग्न करण्याचे वचन दिले. अट अशी होती की, काहीही झाले तरी तिने त्याच्याकडे कधीही पहायचे नाही. अट विचित्रच होती खरी…पण प्रेमात रममाण झालेल्या परीजातने याचा कधी विचारच केला नाही.  

त्यांनी शरद ऋतूमध्ये लग्न केले आणि बघता बघता उन्हाळ्यापर्यंतचा काळ कसा भरकन निघून गेला. उन्हाळा येताच सूर्य देवाची शक्ती पूर्वीपेक्षा अफाट वाढली…. इतकी, की पारिजात त्याच्या एका कटाक्षात भस्म होऊन जाईल. अशाच एका दुपारच्या वेळी सूर्य पारिजातच्या दारात खाली उतरला आणि पारिजात भान हरपून त्याच्याकडे पाहातच राहिली. वचनभंगामुळे तो प्रचंड क्रोधीत झाला आणि रागाच्या भरात अजूनच तापला. या सगळ्यात पारिजात राख होऊन स्वतःच्याच राखेत बुडून गेली….  तथापि, जेव्हा त्याचा राग शांत झाला तेव्हा त्याला पारिजातच्या जीवापाड प्रेमाची जाणिव झाली. शरीर भस्म झाल्याने देवांनी तिला एका झाडाच्या रुपात पुन्हा जिवंत केले. आणि पुन्हा असं घडू नये यासाठी रात्रीच सूर्यदेव तिच्या भेटीला जातात. या भेटीत परिजातची फुले रात्रीच्या वेळी बहरुन इतकी सुवासिक असतात की जणू सूर्याने त्यांंचं चुंबन घेतलं असेल आणि प्रेमात ती दोघं स्वतःला विसरुन जात असतील…. 

पहाट होताच देव आपल्या कामावर रुजू होतात आणि त्यांच्या पहिल्या किरणांनी जमिनीला स्पर्श करताच फुले खाली गळून पडतात. याच कथेच्या दुसर्‍या आवृत्तीत असे म्हटले जाते की सुर्यदेवाने पारिजातचे प्रेम नाकारले आणि राजकन्या ते सहन करू शकली नाही. तिने स्वतःला ठार मारले आणि तिचे प्रेम पुन्हा पुन्हा सिद्ध करण्यासाठी तिच्याच राखेतून एक झाड वाढले.  पडलेली फुलं तिचे अश्रू मानली जातात, ती फुले वाहते, तिच्या प्रियकराची नजर सहन करण्यास ती फुलं असमर्थ असतात……!

पारिजातक वृक्ष थेट स्वर्गातून आलेला आहे. समुद्रमंथनातून निघालेले हे तेरावं रत्न देवांचा राजा या नात्याने इंद्राकडे होतं. स्वर्गातील इंद्राच्या रोपवाटिकेत तो लावला होता. एकदा नारदमुनींनी ही फुलं रुक्मिणी आणि सत्यभामेला दिली आणि मग या वृक्षासाठी दोघींनी  हट्ट केला. रुक्मिणीलाही या वृक्षाची फुले हवी होती. सत्यभामेला तर आख्खा वृक्षच हवा होता….श्रीकृष्णाने सत्यभामेसाठी हा वृक्ष इंद्राशी लढाई करून पृथ्वीवर आणला. कृष्णाने वृक्ष सत्यभामेच्या दारात लावला पण फुलं मात्र रुक्मिणीच्या अंगणात पडत असत…

याशिवाय असं म्हटलं जातं की पारिजातका खाली उभं राहून एखादी गोष्ट मागितली तर पारिजातक ती इच्छा पूर्ण करतो. इच्छापूर्ती करणारा वृक्ष म्हटलं जातं…. 

तुम्ही कितीही थकून आलात आणि पारिजातकाच्या खोडाला स्पर्श केल्यास ते तुमचा थकवा काढून घेऊन तुम्हाला उत्साह देतो असंही म्हणतात.

लेखक : अज्ञात

संग्राहिका :  सुश्री वर्षा सुनील चौगुले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ हात… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

☆ हात… ? ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

मला सांगा हात म्हणजे काय? हात तिच्या ••• एवढच?

हात एक अवयव आहे. शरीराचा महत्वाचा भाग आहे.हाताशिवाय काम करू शकत नाही. तरी कामात हात असणे म्हणजे ‘कामात’ हात ••• का कामात ‘हात’ •••हा प्रश्न पडल्याने हातातले काम तसेच राहू शकते.

असो पण आज मी तुम्हाला हाताची गोष्ट सांगणार आहे.

एका गावात एक कष्टाळू माणूस रहात होता. त्याचा हात चांगलाच चालायचा. त्यामुळे त्याच्या कामाच्या गतीसाठी कोणीच त्याचा हात धरू शकत नव्हते. यामुळेच तो आपली कामे तर आटोपायचाच पण सगळ्या गावकर्‍यांना हात द्यायचा.  त्याच्या याच स्वभावा मुळे तो ग्रामप्रमुखाचा उजवा हात बनला. त्याने असा हातात हात दिल्यामुळे ग्रामप्रमुखालाही कोणापुढे हात पसरायची किंवा हात जोडायची वेळच यायची नाही.

परंतु या कष्टाळू माणसाच्या मुलीचा हात एका धनाढ्य माणसाच्या मुलाने मागितला. तेव्हा ग्राम प्रमुखाच्या हातावर तुरी देऊन त्याला हातोहात फसवून स्वत: मुलीचे दोनाचे चार हात करण्यासाठी हातावर पाणी सोडून तिचे कन्यादानही केले.

त्यामुळे त्या ग्राम प्रमुखाचा हात अचानक सोडल्यामुळे हातच मोडला गेला. पण याला धडा शिकवण्यासाठी त्याने तयारी केली. तो म्हटला मी काही हातात बांगड्या भरल्या नाहीत.  मी असा हातावर हात धरूनही बसणार नाही. मी तुझ्याशी चार हात करायला तयार आहे.

या गरीब कष्टाळू माणसाला हात उचलणे शक्य नव्हते. त्याने पुन्हा त्याच्याशी हस्तांदोलन करणेही अशक्य होते. त्याच्या हातात काहीच राहिले नव्हते. यांच्यात फूट पाडण्याच्या कामात धनाढ्य माणसाचा हात असल्याचे उशीरा कळले.

जणू काही आयुष्याचे पत्ते खेळताना त्या धनाढ्याने याचा हात ओढला होता.

काय नशीबात आहे हे जाणण्यासाठी ज्योतिष्याला हात दाखवला. त्याचा हात बघून ज्योतिष्याने मात्र हात साफ केला.त्याच्या भावनांवर हात मारला.

हात उंचावून म्हणाला सारं काही त्याच्या हातात आहे. असे म्हणून हात हलवून तो गेला सुद्धा.

निराश अंत:करणाने तो हात हलवत रिकाम्या हाताने परत आला.

पण म्हणतात ना••• हातच्या कंकणाला आरसा कशाला? तसे ग्राम प्रमुखाला चांगल्या कामाच्या प्रचितीने कष्टाळू माणसाचा हातगुण चांगला असल्याचे लक्षात आले आणि रातोरात या हाताचे त्या हातालाही कळू न देता त्याच्याशी हात मिळवणी केली. गावाच्या भल्यासाठी असे करणे त्याच्या हातचा मळच होता.  त्यानंतर मात्र यांचे हात कधी सुटले नाहीत.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print