मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “ऋग्वेदाच्या काठाकाठाने चालताना…” – लेखिका – सुश्री केतकी कानिटकर ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ “ऋग्वेदाच्या काठाकाठाने चालताना…” – लेखिका – सुश्री केतकी कानिटकर ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

“वैदिक जीवन”   

गायत्री मंत्र हा ऋग्वेदाचा साक्षात आत्मा अथवा कणा असल्याने तो आत्मसाक्षात्कार, आत्मशोध, स्व अनुभूती यांना परमेश्वराहूनही अधिक प्राधान्य देतो. डोळे उघडून प्रश्न विचारण्यास बाध्य करतो. यमनियमात बांधत नाही तर विचार करण्यास मुक्त करतो. हा निव्वळ धर्म नाही तर एक संयुक्तिक जीवनपद्धती व योग्यायोग्यतेची अचूक कारणमीमांसा आहे. स्वतःला जाणण्याकडे त्याचा कल अधिक आहे. सखोल अशा आत्मचिंतनावर ऋग्वेदाचा अधिक भर आहे. बाह्य जगताचा अभ्यास हा दुय्यम आहे. वैदिक शास्त्रांमध्ये; मग ते गणित असो वा विज्ञान, आतून बाहेर असा तत्त्वज्ञानाचाही प्रवास झाला आहे व अभ्यासाला उपासनेचे महत्त्व आले आहे. या अर्थाने ऋग्वेद हा तेजस्वी कर्मयोगी आहे. “आत्मा हा सचेतन जीवित तत्व आहे. तो शरीर धारण करतो व कालांतराने शरीर सोडून निघून जातो”, ही संकल्पना मूलतः ऋग्वेदाची आहे. ‘दशयंत्र’ या सूक्तात ‘यंत्र’ हा शब्दप्रयोग ‘इंद्रिय’ या अर्थाने केला आहे. पाच ज्ञानेंद्रिये व पाच कर्मेंद्रिये अशी दहा इंद्रिये म्हणजे ‘दशयंत्र’ होय. 

ऋग्वेद हा जगातील सर्वप्राचीन ग्रंथराज इतक्या विस्तृत काळात लिहिला गेला की सुक्तांची भाषा, संस्कृतिक व धार्मिक परिस्थिती, वैदिक जीवन ते आताच्या हिंदू धर्मापर्यंतचा प्रवास यातून मानवी समाजाच्या उत्क्रांतीच्या पायऱ्या अधिकाधिक सुस्पष्ट होत जातात. अत्यंत कृतज्ञतेने प्रेरित होऊन झालेला सश्रद्ध प्रवास प्रश्न व शंकांवर येऊन थांबतो; ते अस्य वामीय तत्त्वज्ञान सूक्त, ऋग्वेदाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून आत्मीयतेने स्वीकारलं जातं. नेम भार्गव ऋषी  सुरवातीला सर्वेसर्वा असणाऱ्या इंद्राच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह करतात. ते म्हणतात, “असाक्षात्कारी अशा इंद्राची आम्ही का म्हणून स्तुती करावी? कोण हा इन्द्र, कशावरून तो सत्य आहे?” यावर सखोलपणे विचार होऊ लागला आणि आपण बघतो की वेदकालातच इंद्र ही देवता संपुष्टात आली. “हे असंच का आहे व हे सारं कुणी निर्माण केलं?”  यासारख्या सर्व प्रश्नांची उत्तरं एकटी इंद्र ही देवता होऊ शकत नाही, हे लक्षात आलं. मग “इंद्राला प्रसन्न करण्यासाठी यज्ञ तरी का करावा, यज्ञ करण्यामध्ये काही अर्थ आहे का नाही? ” अशीही शंका उत्पन्न होऊ लागली. ‘कण्व’ हे ऋग्वेदात गुप्त अग्नीचे प्रतीक मानले जातात. वास्तविक यज्ञयाग हा ऋग्वेदाचा गाभा..! ईशपूजा, एकत्रीकरण व दान ही समाजाभिमुख जगण्याची कला म्हणजे यज्ञ. त्या काळाची धार्मिक व सामाजिक संस्था म्हणजेच यज्ञसंस्था. यज्ञसंस्थेचा परिघ असा विस्तारला असल्याकारणाने ती काळानुसार टिकली. कालांतराने विचारात किती बदल होतात आणि वैदिक संस्कृती किती वैचारिक स्वातंत्र्य व समृद्धी प्रदान करू शकते याचे हे कळस उदाहरण आहे. 

जेव्हा सगुणत्व सुटत नाही, तेव्हा “सृष्टीची उत्पत्ती परमेश्वराने केली की इतर कारणांमुळे ती झाली असावी, ” असा संशय व्यक्त झाला आहे. “अनेकत्व सर्व मिथ्या आहे विविध देवता या निव्वळ कल्पना असून एकाच उत्पादकतत्वाच्या विकृती आहेत.” ही काहीशी  निरिश्वरवादाकडे व नास्तिकवादाकडे झुकणारी वृत्ती अस्य वामीय तत्त्वज्ञान सूक्तात प्रकट केली आहे. (कदाचित म्हणूनच जैन धर्म हा नास्तिकवादावर आधारित असून सुद्धा त्यात उच्च कोटीची भूतदया व विश्वाप्रती संवेदनशीलता आपल्याला दिसते.) त्यातून निर्माण झालेली नासदीय सूक्तासारखी विचारांना चालना देणारी सुंदर अशी अभिव्यक्ती. आपल्यालाही उमगत जातं की, “मी कोण? माझ्या असण्याचा उद्देश काय?” इथपासून ते “हे विश्व कुणी निर्माण केलं?” मग ईश्वर म्हणा, वा निसर्गातील एकतत्व; या संकल्पनेला एका निर्गुण निराकार अशा तत्त्वात आकारणं, हा सारा आपल्या व्यक्तिगत व सामाजिक विकासाचा टप्पा बनत जातो. आपली आकलनकक्षा विस्तारत जाते, तसतसा आपल्याबरोबर आपला धर्म देखील विस्तारत जातो. प्रत्येक आत्म्याचे स्वतःचे असे संचित असते त्याप्रमाणे प्रत्येक आत्म्याचा ध्येय व मुक्तीपर्यंत पोहोचण्याचा मार्गही निराळा असतोच. 

(एकप्रकारे हा व्यक्तित्ववादाचा पायंडा आहे.) साहजिकपणे कुणाबद्दल कुठलेही सरधोपट विधान करणे हे मूलतः चुकीचे आहे, याचा विचार या प्राचीन ग्रंथांतही केला आहे. प्रत्येकाचा स्वधर्म हा त्याच्या स्थान व परिस्थितीप्रमाणे बदलत जातो. तो कुठल्याही चौकटीत बांधता येत नाही, हे आपल्याला टप्प्याटप्प्याने उमगत जातं. सुरुवातीला आपण धर्मावरच प्रश्नचिन्ह निर्माण करत गेलो असलो तरी नंतर मात्र तोच आपल्याला चिंतनास प्रवृत्त करत जातो. आपल्यातील स्वतंत्र गुणवैशिष्ट्यांचा तो आदर करतो. आणि कदाचित म्हणूनच भारतीय संस्कृतीचे मूलाधार असलेले ग्रंथ, वेद हे अपौरुषेय मानले आहेत. ईश्वर हा वेदांचा प्रवक्ता आहे, कर्ता नव्हे. वेदांचे प्रामाण्य हे सामाजिक संमतीने स्थिरावत गेले आहे. वेद हे एका सिद्ध जीवन पद्धतीचे प्रतिबिंब बनत गेले व लोकमान्य परंपरा म्हणून स्थिरावले. वैदिक धर्म अद्वैतापासून ते नास्तिकवादापर्यंत प्रत्येकाच्या स्वभावधर्माप्रमाणे आपल्यात सहजतेने  सामावून घेतो. आपल्या आकलनाच्या कित्येक पुढे जाऊन तो आपल्याला असीम ज्ञान, उद्देश्य व सकारात्मकता प्रदान करत जातो. आपल्या चार पावलं पुढे राहून आपल्याला मार्गदर्शन करत आपल्याबरोबर उत्तरोत्तर प्रवास व प्रगती करत जाणं हे हिंदू धर्माचं वैशिष्ट्य म्हटलं पाहिजे आणि म्हणूनच तो कालासमवेत टिकणारा आहे. Change is the only permanence.. हे आपल्या कित्येक आधी ह्याला ठाऊक आहे. आनंदाची, सुख समाधानाची व्याख्या व्यापक करणारा आहे. मला नाही वाटत की जगातील इतर कुठलाही धर्म स्वतःवर, धर्माचा जो आधारभूत त्या ईश्वरावर, यम नियम, त्यातल्या परंपरांवर, त्यावरील विश्वासावर, वर्षानुवर्षे निरीक्षणाने, लोकमताने सिद्ध झालेल्या विश्लेषणांवर, त्यावरच्या न दिसणाऱ्या श्रद्धांवर इतके प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य देत असेल. याचा अर्थ सरळ आहे. प्रत्येकाला मुळातून विचार करण्यास बाध्य करावे असे या धर्माला वाटत असेल. मानवाने ईश्वराला शोधून काढून त्याच्यावर सर्वतोपरी आपला भार टाकण्यापेक्षा त्याने आत्मशोध घेणे महत्त्वाचे वाटत असेल. स्वतःत रमणाऱ्या, आत्मचिंतन करणाऱ्या माणसाला इतर काही शिकवण्याची क्वचितच गरज भासत असेल. वेद हे अपौरुषेय आहेत, हे ही त्या मागचं एक कारण असू शकतं. याही अर्थाने ईश्वर हा मानवी मनाचा प्रवक्ता आहे, कर्ता नव्हेच. 

 निरनिराळ्या देवता – मान्यता – श्रद्धा या सामाजिक एकीकरणाच्या दृष्टीने अद्वैतवादाच्या एकखांबी तंबूखाली येऊन विसावतात. त्याची सश्रद्ध अनुभूती आपल्याला अक्षर पुरुषसूक्तात येते. 

 गणपती ही देवता ऋग्वेदकालात होती की नव्हती याबद्दलही बरेच वाद आहेत. ऋग्वेदातील आठव्या मंडळातील ८१ व्या सूक्तात गणपतीच्या बाह्यरुपाचे  वर्णन आहे. सुरुवातीला इंद्र हे सर्वनाम (श्रेष्ठ) या अर्थाने आढळते. यात म्हटले आहे की रिद्धी – सिद्धी आणि बुद्धी यांचा अधिपती तो गणपती. इंद्राचा डावा – उजवा हात ही गणपतीची डावी किंवा उजवी सोंड असा निर्देश आहे. 

 सुभाषितं ही आपल्याला ऋग्वेदाची अमूल्य अशी देण आहे. प्रथम ओळीत एखादे मूल्य अथवा सत्य मांडणे व दुसऱ्या ओळीत त्याचे उदाहरण देणे,अशी बहुतेक सुभाषितांची रचना असते. सुभाषितं ही व्यवहारी शहाणपणा व ज्ञानाचा आदर्श परिपाठ आहेत. संस्कृत भाषेतील सुभाषितं ही प्राचीन साहित्याचा मनोरंजक व मार्गदर्शक विभाग आहे

 आत्मानुभव सूक्त हे देखील असीम शांतता मिळवून देणारे आहे. स्वतःला जाणणे म्हणजेच आत्मानुभव. प्रत्येक सजीव व निर्जीवात एक जागृत असे आत्मतत्त्व असते. त्या अमर आत्मतत्त्वाचा अनुभव घेणे म्हणजेच आत्मानुभव. सृष्टीची उत्पत्ती, परमेश्वराचे स्वरूप आणि सामर्थ्य, सृष्टीचे मूल, आत्मा, चैतन्य आणि अचेतन सृष्टीतील गूढ तत्वांचे विवेचन या सूक्तात आढळते. 

 महामृत्युंजय म्हणजे त्र्यंबकेश्वर. तीन दिवस उपवास करून दुधात भिजवलेल्या भाताच्या शताहुती शिवास वाहतात. महामृत्युंजय मंत्र हा अतिशय शक्तिशाली असून याला रुद्रमंत्र व मृत संजीवनी मंत्र असेही म्हणतात. त्र्यंबकम मंत्र हा शिवाचे त्रिनेत्र दर्शवतो. महामृत्युंजय म्हणजे मृत्यूवर विजय मिळवणे. त्यामुळे दीर्घायुष्य प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. 

 दानव, असुर, पिशाच,यक्ष, राक्षस या सर्वांचा मिळून एक राक्षससंघ वैदिक काळात मानला जात होता. वैदिक साहित्यात ‘रक्षस्’ शब्द आलेला असून त्यापासून राक्षस हा शब्द आला. राक्षस ही मायावी, अद्भुत, कपटी, मांसभक्षक, जादूटोणा करणारी, ज्ञानी लोकांचा व यज्ञयागांचा द्वेष करणारी जमात म्हणून ओळखली जाते. राक्षस हे दिवसा निष्क्रिय तर रात्री क्रियाशील असतात. पुलस्त्यापासून राक्षस उत्पन्न झाले. ब्रह्मदेवाने भूतलावरील जलाच्या रक्षणार्थ राक्षसांना निर्मिले अशा कथाही आहेत. कश्यपानंतर ब्रह्मधनेपासून ब्रह्मराक्षस वंश प्रवर्तित झाला असे म्हटले आहे. पुढे आर्य व राक्षस या दोन संस्कृतींचा समन्वय होत गेल्याचे निदर्शनास येते. आर्य व राक्षस यांच्या चालीरीती व सामाजिक व्यवहार यात साम्य तसेच भिन्नताही होती. राक्षसांचा वंश मातेवरून चालत असे. पळवून आणलेल्या स्त्रियांशी विवाह करण्याची प्रथा राक्षसांत होती. त्यावरून मनुस्मृतीत राक्षस विवाहाचा संदर्भ आला असावा. त्यांचे विवाह अग्नीच्या साक्षीनेच होत. कदाचित राक्षस ही आर्यांचीच एक शाखा असावी जी कालांतराने दक्षिण भारतात स्थिरावली व तिने आपले वैभवशाली राज्य व संस्कृती निर्माण केली. (रावण व त्याची लंका) निरनिराळ्या प्रचंड वास्तूंशी राक्षसांचा संबंध जोडलेला दिसतो. हेमाडपंथी देवालयांसाठी ज्या अतिप्रचंड शीलांचा वापर होतो त्यावरून हे काम राक्षसांनी केले असावे, अशी समजूत होती. ऋग्वेदात मृत्यू देवता निऋऀत्ती ही राक्षस मानली जाते. ऋग्वेदातही तंत्रविद्या, भानामती,जारणमारण यासंबंधी अभिचार सूक्ते आहेत. ह्या  वाममार्गालाच अभिचार योग असेही म्हणतात. (याचाही प्रभाव बुद्ध धर्मावर प्रकटपणे दिसून येतो.) ऋग्वेदकाल ते आजपर्यंतच्या काळात राक्षस जमात देखील किती उत्क्रांत होत गेली ते आपण बघतोच आहे. मुख्य म्हणजे त्यात जात-पात, वंश-वर्णभेद असा कसलाही दावा नाही. 

सत्व रज तम हे गुण व त्यांची प्रतिकात्मक रूपं ही आपल्याला प्राचीन ग्रंथांमध्येही दिसून येतात. प्रत्येक व्यक्ती ही त्रिगुणात्मक असते. त्या गुणांचे नियमन व त्यांना  व्यक्तिगत व जीवनोपयोगी तत्त्वांत परावर्तित कसे करावे, हे ही भगवद्गीतेसारखे महान ग्रंथ सांगतात. उपनिषदांसारखे ग्रंथ जीवन मृत्यु विषयक संकल्पना, गुंतागुंतीची उकल सोप्या शब्दात सांगतात. वैदिक कालापासून चालत आलेलं हे चिंतन एखाद्या सावलीसारखं इतकं आपल्या मागोमाग, अन हातात हात घालून चालत आलेलं असतं, की आज नाही तर एक दिवस आपण अपूर्णातून पूर्ण व शून्यातून शून्य हे ध्येय गाठू शकू, इतपत आपणही धडपडत राहतो, सश्रद्ध होऊन जातो. 

आपल्यालाही उमगत जातं की, One that had granted us the Bliss of Ignorance, also acquires the Power to grant us the Strength to bear the Complete Knowledge…making us humble enough to believe that, “I know, that I do not know anything; yet not Insignificant in any way..”

ॐ पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते। 

पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते।। 

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। 

लेखिका : सुश्री केतकी कानिटकर 

संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बडी बेंच (Buddy Bench)… लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ बडी बेंच (Buddy Bench)… लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

माझ्या घराजवळ पहिली ते पाचवीपर्यंतची शाळा आहे. त्या शाळेच्या पटांगणावर मी कधी कधी चालायला जाते. त्या पटांगणात निरागसतेच्या लहरी पसरलेल्या असतात, म्हणून की काय कोण जाणे, पण तिथे गेल्यावर अगदी प्रसन्न वाटतं.

काल त्या शाळेच्या पटांगणात एक बेंच दिसला. त्यावरचा मजकूर बघून माझे पाय थबकले.  “Buddy Bench” असे शब्द लिहिले होते. त्याच्या खाली अजून दोन ओळी होत्या. हा काय प्रकार आहे असा विचार करत मी उभी असताना एक नऊ वर्षाची, पोनिटेल उडवत पळणारी चुणचुणीत मुलगी दिसली.

मी तिला विचारलं, “ हा नवा आहे का ग बेंच?”

ती  म्हणाली, “ नाही. ‘बडी बेंच’ नवा नाही. मागच्या बाजूला होता तो फक्त पुढे आणलाय.”

‘बडी बेंच’?माझी उत्सुकता वाढली. buddy म्हणजे मित्र पण buddy bench म्हणजे नक्की काय असावं?

माझा प्रश्नार्थक चेहरा बघून ती म्हणाली, “आम्हाला जर कधी एकटं वाटत असेल, वाईट वाटत असेल, कुणी खेळायला घेत नसेल ना, तर मधल्या सुट्टीत या बेंचवर जाऊन बसायचं. मग इतर मुलांना समजतं आणि कुणीतरी येतं बोलायला, खेळात घ्यायला, मैत्री करायला आणि मग एकदम बरं वाटतं,” तिनं उलगडा केला.

“अगबाई! हो का?” मी चकित होऊन म्हणाले.  किती सुरेख कल्पना आहे!  केवढाली ओझी असतात या लहान जिवांच्या पाठीवर. अभ्यास, परीक्षा, रुसवे, फुगवे,एकटेपणा आणि त्या चिमुकल्या जगातले इतर अनेक ताण-तणाव!

“पण कुणी आलंच नाही बोलायला तर?” आयुष्यातल्या अनुभवाने मला विचारण्यास भाग पाडले.

तिनं आश्चर्याने माझ्याकडे बघत कपाळावरच्या बटा उलट्या हाताने मागे केल्या व ती म्हणाली, “का नाही येणार?एकजण तरी येतंच. कारण त्यासाठीच तर आहे ना हा बेंच.” या बाईला इतके साधे कसे कळत नाही, असा भाव तिच्या चेहऱ्यावर होता.

एकटं वाटणं, वाईट वाटणं, राग येणं या नैसर्गिक भावना आहेत. त्या भोळ्याभाबड्या जगातसुद्धा काळज्या असतात. अपेक्षांचं ओझं असतं. एखाद्याला खेळात न घेणं असतं. एखादीला नावं ठेवणं असतं. आई-बाबांकडून रागवून घेणं असतं. आणि त्यावर Buddy Bench हा एक सोपा पर्याय आहे. मला कौतुक वाटलं. 

“किती छान माहिती सांगितलीस ग! तू कधी बसली आहेस बडी बेंचवर?” माझ्या तोंडून गेलंच.

“होऽऽऽ. नवी होते तेव्हा खूप वेळा. त्यानंतर कित्तीऽऽ मैत्रिणी मिळाल्या.” तिच्या मोकळेपणाने मोहित होऊन मी पुढे चालू लागले.

मनात येत राहिलं…फक्त लहान मुलांसाठीच बडी बेंच का? मोठ्यांसाठी का नाही? ऑफिसमधे,डॉक्टरकडे,वकिलाकडे, कॉलेजमधे, परीक्षा गृहात, लग्नाच्या कार्यालयात असे ठिकठिकाणी बडी बेंच ठेवले तर? त्यामुळे अनेक दबलेल्या भावना बाहेर पडून माणसांचं आरोग्य सुधारेल का? जगातील एकटेपणा कमी होईल का? काहीवेळा त्रयस्थापुढे मोकळं होणं सोपं असतं. नाहीतरी थेरपिस्टशी बोलणे आणि काय असते?

कदाचित एखाद्या नव्या आवाजाशी,समदुःखी असणाऱ्याशी, चार पावसाळे जास्त बघितलेल्या व्यक्तीबरोबर मैत्रीचा नवा रेशमी धागा निर्माण होईल. त्यामुळे जड झालेले ओझे थोडेसे हलके होईल. नाही का?

त्या बेंचवर खाली दोन ओळी लिहिल्या होत्या..

चल..बसू, बोलू, गप्पा मारू, विचारू एकमेका काही प्रश्न

उदात्त हेतू  मनी  ठेवूनी होऊ buddy, यार, सखा, मित्र!

लेखिका : सुश्री ज्योती रानडे

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कावळे मामा… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

 🌸 विविधा 🌸

☆ कावळे मामा… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

नाव विचित्र वाटते ना? पण या मामांचा घेतलेला अनुभव सांगते,मग तुम्हालाही पटेल.तर गंमत अशी झाली परवा ( हे आपले म्हणायचे.शब्दशः घ्यायचे नाही.) घरा बाहेर पडले माझ्याच नादात आणि काही कळण्या पूर्वी एकदम हल्लाच झाला.अचानक डोक्यावर टप टप कशाचे तरी वार होऊ लागले.मी एकदम घाबरुनच गेले.वर बघते तर कावळे महाराज डोक्यावर अजून मार देण्याच्या प्रयत्नात होते.कशीबशी पुढे गेले.मनात नाना विचार.आता कावळा अंगावर आला काही अशुभ घडेल का? इतके विचार आले की मी पार याची डोळा ( मनातच हं ) मरण पण बघितले.पुन्हा घरी आल्यावर हे महाराज स्वागताला हजरच.घरात पण जाऊ देई ना.कुलूप उघडून घरात जाईपर्यंत पाठलाग केला.कशीतरी घरात गेले.नंतर समजले आज हा प्रसाद घरातले,शेजारचे,आमच्या घरा समोरून जाणाऱ्या प्रत्येकाला मिळाला होता.मग जरा निरीक्षण केले तर त्या कावळीणीचे पिल्लू खाली पडले होते.आणि त्याच्या रक्षणासाठी ती आमच्यावर हल्ला करत होती.

मग आधीचे काही दिवस आठवले,थोडे गुगलले आणि सगळे लक्षात आले.काही दिवसांपूर्वी वसंत ऋतूत कोकीळ कुजन चालू असते.तेव्हा हे कावळे घरटे ( झाडाच्या अगदी टोकावर उंच ) तयार करतात.यांची अंडी घरट्यात विराजमान झाली की कावळीणीचे काम असते.त्यात ही कोकीळ जोडी त्यांच्या घरट्या भोवती कर्कश्श ओरडुन त्यांना मागे यायला भाग पाडतात.कोकीळ त्यांना लांब घेऊन जातो.आणि कोकिळा कावळ्याच्या घरट्यात आपली अंडी घालते.जेवढी अंडी घालते तेवढी कावळ्याची अंडी खाली ढकलून देते.नंतर दुसरे घरटे शोधायला निघतात.आणि कावळ्याची जोडी त्या अंड्यांची निगुतीने काळजी घेतात.आमच्याही दारातील अशोकाच्या झाडावर हेच झाले होते.यथावकाश कावळ्याने पिल्लांना उडायला शिकवले.ते पण अगदी बघण्या सारखे होते.पिल्लू घरट्याच्या काठावर येऊन बसले की त्यांची आई पिल्लांना ढकलून देत असे.थोडा वेळ होलपटून ते पिल्लू छान गिरकी घेऊन उडत असे.हे सगळे बघणे मोठीच पर्वणी होती.त्यातच हे कोकीळेचे आळशी पिल्लू होते.त्याला ढकलल्या नंतर ते धप्पकन खाली पडले आणि आम्ही त्याला इजा करू नये म्हणून आपले मामा चे कर्तव्य पार पाडत,हे मामा आम्हाला डोक्यात चोचीने मारत होते.

अखेरीस एक दिवस ते पिल्लू उडाले आणि कावळे मामा कृतकृत्य झाले.ते पिल्लू लांब जाऊन बसले आणि कुहूकुहू करू लागले.

ही पक्ष्यांची गंमत बघताना आश्चर्य वाटून गेले.अवती भोवतीचा निसर्ग किती वास्तविकता दाखवतो.

जसा कावळा दरवर्षी फसतो तसेच आम्ही पण दरवर्षी कावळे मामांचा प्रसाद खातो.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ निसर्गरुपे : दुपार… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

?मनमंजुषेतून ?

☆ निसर्गरुपे : दुपार…  ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे 

निसर्गाची विविध रूपे मला भावतात. सगळीच रूपे तशी मनोहर असतात. अर्थात तशी दृष्टी तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला दुपार सुद्धा आवडेल. पौर्णिमेची रात्र तर सर्वांना आवडतेच पण निसर्गावर प्रेम करणाऱ्यांना अमावास्येची रात्र सुद्धा तेवढीच आवडते. पौर्णिमेला पूर्ण चंद्र आकाश प्रकाशमान करतो. समुद्राला भरती येते. रुपेरी चंद्रप्रकाश अवघे विश्व व्यापून टाकतो. कवी, लेखकांच्या प्रतिभेला बहर येतो. पण अमावास्येची रात्रही तेवढीच सुंदर असते. त्यावेळी आकाश म्हणजे जणू चंद्रकळा ल्यालेली एखादी घरंदाज गृहिणी वाटते. चांदण्याची नक्षी तिच्या साडीला जडवलेली असते. हा जरीपट खूप शोभून दिसतो. 

खरा निसर्गप्रेमी कोकिळेवर जेवढे प्रेम करतो, तेवढेच प्रेम कावळ्यावर आणि घुबडावर सुद्धा करतो. अशीच निसर्गाच्या प्रेमात पडलेली व्यक्ती दुपार हे निसर्गाचेच रूप आहे हे समजून त्याचा आनंद घेते. गुलाब, जाईजुई, मोगरा ही फुले मला आवडतातच पण सदाफुली आणि गवतफुलासारखी फुलंसुद्धा मन मोहून घेतात. तेही निसर्गाचेच सुंदर अविष्कार आहेत. 

बहुतेक सगळ्या कवी, लेखकांनी पहाटेच्या वेळेचं रम्य वर्णन केलं आहे. संध्याकाळ आणि रात्रीचंही केलं आहे. पण दुपारचं वर्णन फारसं कोणी केल्याचं वाचनात आलं नाही. सकाळ, संध्याकाळ आणि रात्रीच्या प्रसंगांचं वर्णन करणारी शेकडो गाणी आहेत पण दुपारच्या वेळेवर लिहिलेली गाणी मला कुठे आढळली नाहीत. या अर्थानं दुपार  म्हणजे ‘ अनसंग हिरोईन ऑफ द डे ‘ असं म्हणायला हरकत नाही. आता तुम्ही मला एखाद्या वेळी विचारलं की पहाट, सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र या दिवसांच्या वेळांना तुम्ही स्त्रियांचीच उपमा का देता आहात ?तुमचा प्रश्न बरोबर आहे. पण आपल्या मराठीत आपण हे शब्द स्त्रीलिंगीच वापरतो ना ! ती रम्य पहाट, ती प्रसन्न हसरी सकाळ, ती दुपार, संध्याकाळ, रात्र वगैरे. ‘ ती ‘ ऐवजी एखादा पुल्लिंगी शब्द वापरून पहा बरं. तो पहाट, तो सकाळ,तो रात्र वगैरे…  सगळी मजा गेली ना ! 

कधी कधी फोनवर बोलणारी ती बाई अशा शब्दांची फार गल्लत करते, त्या वेळी असं वाटतं की ही समोर असती तर काही तरी सांगता आलं असतं. आपण एखाद्या व्यक्तीला फोन केला आणि त्या व्यक्तीनं फोन उचलला नाही तर बऱ्याच वेळा असं ऐकायला मिळतं. ‘ ज्या व्यक्तीला आपण फोन केला आहे, तो व्यक्ती आपला फोन उचलत नाही किंवा उत्तर देत नाही. आता ‘ व्यक्ती ‘ हा शब्द सुद्धा स्त्री लिंगीच वापरला जातो. मग ‘ तो ‘ व्यक्ती कशाला ? पण जाऊ द्या विषय दुसरीकडेच चालला. आपल्या मूळ विषयाकडे येऊ या. 

तर पहाटेचा आणि सकाळचा उल्लेख आधीच्या लेखात आपण पहाट म्हणजे अल्लड तरुणी आणि त्यानंतरची सकाळची वेळ म्हणजे वेणीफणी, गंधपावडर करून आलेली सुस्नात तरुणी असा केला. त्यानंतर जेव्हा सकाळचे अकरा वाजण्याचा सुमार होतो, तेव्हा दुपारचे वेध लागू लागतात. आता सकाळच्या या तरुणीचे रूपांतर तीस चाळीस वर्षांच्या गृहिणीत झालेलं असतं. तिला घरच्यांची काळजी असते. सकाळपासून आपापल्या कामात मग्न असलेल्या आपल्या पतीला, मुलाबाळांना भूक लागली असेल, याची जाणीव होऊन ती स्वयंपाकाला लागलेली असते. दुपारी साडेबारा एकच्या सुमारास ती त्या सगळ्यांना मोठया प्रेमाने बोलावते आणि जेवू घालते. 

इथे दुपार येते ती आईचे रूप घेऊन. आई जशी आपल्या मुलांची काळजी करते,त्यांना वेळच्या वेळी खाऊपिऊ घालते, तशीच दुपार दमलेल्या, थकलेल्याना चार घास भरवते. आणि चार घास खाल्ल्यावर म्हणते, ‘ अरे लगेच नको लागूस कामाला. जरा अंमळ विश्रांती घे ना. ‘ त्या दुपारच्या कुशीत काही क्षण माणसे विश्रांती घेतात, ताजीतवानी होतात आणि पुन्हा आपल्या कामाला लागतात. गाई, गुरं सुद्धा एखाद्या झाडाखाली विश्रांती घेताना दिसतात. 

सकाळ आणि संध्याकाळ यांच्या मधली वेळ म्हणजे दुपार. शेतकरी, कष्टकरी, मजूर हे सगळे सकाळपासूनच कामाला जुंपलेले असतात. दुपारी ते एखाद्या झाडाच्या सावलीत बसतात. आपल्या सोबत जी काही चटणी भाकरी आणली असेल ती खातात, दोन घोट पाणी पितात. आपल्या बरोबरच्या व्यक्तींशी गप्पा, हास्यविनोद करतात आणि ती ऊर्जा सोबत घेऊन पुन्हा आपल्या कामाला लागतात. या अर्थानं दुपारी ही एक प्रकारची ‘ होरेगल्लू ‘ आहे. ती मनावरचा ताण कमी करते.

जसा ऋतू असेल किंवा जसं हवामान असेल, तशी दुपारची रूपं वेगवेगळी असतात. ग्रीष्मातली दुपार अंगाची लाही लाही करते. कधी कधी तर वाराही बंद असतो. डोंगरावरील, जंगलातील झाडं एखाद्या चित्रासारखी स्तब्ध असतात. अशा वेळी दुपार तुम्हाला सांगते, ‘ बाबारे, बस थोडा. अंमळ विश्रांती घे. उन्हात विनाकारण फिरू नकोस. ‘ ती जणू सांगत असते, ‘ जरा विसावू या वळणावर…’  दुपार आहे म्हणून तर थोड्या वेळाने तुला हवीहवीशी वाटणारी सांज येईल, रात्र येईल आणि पहाटही उगवेल. थोडा धीर धर. 

वसंतातली दुपार त्या मानाने जरा प्रसन्न असते. वसंत हा तर कवी, लेखकांचा आवडता ऋतू. मुबलक फळे, फुले उपलब्ध असतात. झाडांना नवी पालवी फुटलेली असते. दसरा दिवाळीला आपण जसे नवीन कपडे परिधान करतो, तशी वसंत ऋतूत निसर्गाचीही दिवाळी असते. जुनी पालवी टाकून देऊन झाडं नवीन पालवी धारण करतात. गुलाबी, पोपटी, हिरवी अशी विविध रंगछटा असलेली पानं दृष्टीस पडतात. या ऋतूत झाडांना मोहर आलेला असतो. त्याचा मंद दरवळ सगळीकडे पसरलेला असतो. या ऋतूत निसर्ग भरभरून रूप, रस आणि गंध प्रदान करतो. अशा ऋतूतली दुपारही छान वाटते. ऊन असतेच पण शीतल वाऱ्याच्या लहरी अंगावर जणू मोरपीस फिरवतात. उन्हाची तलखी कमी करतात.

वर्षा ऋतूतली दुपार बऱ्याच वेळा ढगांच्या छायेनं आच्छादलेली असते. अशा वेळी उन्हाचा तडाखा जाणवत नाही. वर्षा ऋतूत सकाळी आणि संध्याकाळी बऱ्याच वेळा हमखास पाऊस असतोच. पण दुपारही कधी कधी पाऊस घेऊन येते. पावसात भिजलेलं तिचं हे रूप आल्हादकारक वाटतं. दुपारी कधी कधी सोसाट्याचा वारा सुटतो. ‘ नभ मेघांनी आक्रमिले ‘ असेल तर अशा वेळी ऊन सावलीचा आणि ऊन पावसाचा लपाछपीचा खेळ सुरु असतो. निसर्गाच्या कॅनव्हासवरचं चित्र सारखं बदलत असतं. अशा वेळी तुमच्यात दडलेला रसिक, कलाकार या निसर्गचित्राला दाद देतो. 

अशी ही दुपारची विविध रूपं. तऱ्हेतऱ्हेची आणि मजेमजेची. सकाळ, संध्याकाळ आणि रात्रीसारखीच मनमोहक रूपे. तिलाही भेटू या. तिचंही स्वागत करत राहू या. तिला म्हणू या… 

‘ हे दुपार सुंदरी, तू अवश्य ये 

येताना तू नेहमीच चारदोन निवांत क्षण घेऊन येतेस. 

दिवसाच्या धामधुमीत तू आम्हाला चार घास प्रेमाने भरवतेस. 

विश्रांती देऊन ताजेतवाने करतेस. 

तू ये. तू अवश्य ये. तुझं स्वागत आहे. ‘

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे 

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अमूल डेअरी, न्यूझीलंड आणि – I too had a dream… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ अमूल डेअरी, न्यूझीलंड आणि – I too had a dream… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

“मॅडम, थोडं स्पष्ट बोलतो, राग मानू नका. पण सगळे हिंदुस्तानी एकाच वेळी जर हिंद महासागरात नुसते थुंकले जरी ना, तरी तुमचं अख्खं न्यूझीलंड पाण्यात बुडून जाईल. हे ध्यानात ठेवा आणि आम्ही काय करायचं आणि काय नाही, हा शहाणपणा आम्हाला शिकवू नका.” 

न्यूझीलंडच्या एका राजनैतिक अधिकाऱ्याला, बहुधा प्रत्यक्ष राजदूताला हे परखड बोल सुनावले होते अमूलचे तत्कालीन सर्वेसर्वा डॉ. व्हर्गीस कुरियन यांनी… 

प्रसंग होता दिल्लीतील एका कार्यक्रमातील… 

कुरियन यांनी तेव्हा नुकतीच अमूलची सूत्रे हाती घेतली होती, आणि जास्तीत जास्त दुधावर प्रक्रिया (milk processing) करण्यासाठी ते धडाक्यात कामाला लागले होते. स्वाभाविकच, भारत आणि भारतीय ज्यांच्या उत्पादनांची मोठी बाजारपेठ होती, अशा बड्या देशांच्या पोटात दुखू लागलं होतं. 

त्या संदर्भातच, कोणी न विचारताच, न्यूझीलंडच्या एका अधिकारी महिलेने, कुरियन यांना अनाहुत सल्ला दिला होता – ” भारतासारख्या देशाने दुग्ध प्रक्रियेसारख्या तांत्रिक आणि किचकट क्षेत्रात शिरण्याचे दु:साहस करू नये. स्वित्झर्लंड, न्यूझीलंडसारख्या तज्ञ मंडळींकडे ही जबाबदारी सोपवलेली आहे आणि ती निभावण्यास तेच समर्थ आहेत.”

कुरियन यांची सहनशक्ती संपली आणि त्यांनी त्या महिलेला तडकाफडकी सुनावले. 

हे असं सुनावणं ही सोपी गोष्ट नव्हती.

न्यूझीलंड त्याकाळी दुग्ध  उत्पादन व दुग्ध प्रक्रिया क्षेत्रात अव्वल होता. त्यांचे तंत्रज्ञान अद्ययावत होते. उत्पादन, प्रक्रिया आणि तंत्रज्ञान या सगळ्याच क्षेत्रांत भारताचे स्थान कुठेच नव्हते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताला दुधाची भुकटी (milk powder) पुरवणाऱ्या देशात न्यूझीलंड अग्रेसर होता. 

उन्हाळ्यात, जेव्हा दुधाचे उत्पादन कमी झालेले असते, तेव्हा दुधाची कमतरता भासू नये म्हणून, भारतातील अनेक राज्यांत दुधापासून मिठाई बनवण्याला कायद्याने मनाई होती, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात दूध पाठवण्यास मनाई होती. 

न्यूझीलंडची तांत्रिक श्रेष्ठता वादातीत होती. स्वतः कुरियन कॉमनवेल्थ देशांतील कोलंबो प्लॅन शिष्यवृत्ती अंतर्गत न्यूझीलंड येथील मॅस्सी विद्यापीठात  Plant Design and Dairy Engineering  शिकले होते.

या पार्श्वभूमीवर अशा दादा देशाला ललकारणं हा कदाचित निव्वळ वेडेपणाच होता. 

पण कुरियन यांनी हे आव्हान स्वीकारले. ” एक दिवस असा येईल की भारत न्यूझीलंडला दुग्धजन्य पदार्थ निर्यात करेल,” आपल्या ” I, too, had a dream ” असे या आत्मचरित्रात ते लिहून ठेवतात.

कुरियन निव्वळ दिवास्वप्नं पाहणारे नव्हते. बोलून मग – “अरे बापरे, हे मी काय बोलून बसलो ?” – असा विचार करणारे नव्हते, विचार करून बोलणारे होते. ते कामाला लागले.

१९७० साली भारतात ‘Operation Flood – white revolution ‘ – दुग्धक्रांती – सुरू झालं. भारतातील दूध आणि प्रक्रिया केलेले दुधाचे पदार्थ यांचे उत्पादन लक्षणीयरीत्या वाढू लागलं. 

दुधासाठी आयातीवर अवलंबून असलेला भारत, आता नुसता स्वयंपूर्ण झाला नव्हता, तर जगात सर्वात जास्त दूध निर्माण करणारा देश झाला होता, दूध उत्पादने निर्यात करणारा देश झाला होता.

— आणि २००९ साली, भारताने न्यूझीलंडला दुग्धजन्य पदार्थ निर्यात करायला सुरुवात केली. 

दुग्ध प्रक्रिया ही आता न्यूझीलंडची मक्तेदारी राहिली नव्हती. 

कुरियन यांनी पाहिलेले हे स्वप्न, त्यांच्या हयातीतच, पूर्ण झाले होते.

ता. क.:  २०१७ साली, आपले “अमूल” न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाचे प्रमुख पुरस्कर्ते (sponsorer) झाले. “Third world country आहात, दुग्ध प्रक्रियेच्या नादी लागू नका” असं ज्या न्यूझीलंडने भारताला सांगितलं, त्याच भारताच्या “अमूल” चा लोगो न्यूझीलंडच्या खेळाडूंच्या T Shirt वर अभिमानाने झळकू लागला. अमूलच्या श्रेष्ठतेवर शिक्कामोर्तब झालं.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “पाऊस वेगवेगळ्या प्रदेशातला…” ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “पाऊस वेगवेगळ्या प्रदेशातला…” ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

गोव्याचा पाऊस गोव्याच्या दारूसारखा आहे.

जशी गोव्याची दारू भरपूर पितात, पण चढतच नाही.

तसा पाऊस भरपूर पडतो पण  दिसतच नाही.

 

कोल्हापूरचा पाऊस. घरजावयासारखा.

घुसला की मुक्कामच.

राहा म्हणायची पंचाईत आणि

जा म्हणायचीपण पंचाईत…

 

अन मुंबईचा पाऊस

प्रेयसीच्या बापा व भावा सारखा ..

कधी येऊन टपकेल

धो धो आपल्याला धुऊन निघून जाईल सांगता येत नाही.

 

पुण्याचा पाऊस बायकांसारखा.

त्या चिडल्या की धड स्पष्ट बोलत नाहीत.

नुसती दिवसभर पिरपिर चालू .

पाऊस पण धड रपरपा पडत नाही. दिवसभर पिरपिर रिप रिप भुरभुर चालू असते. नुसता वैताग!

 

कोकण चा पाऊस

लग्न झाल्यावर संसारात गुंतून जातो तसा

एकदा सुरवात झाली की शेवटपर्यंत धो धो धो धो धो धो पडतो …

 

खानदेशातील पाऊस म्हणजे लफडं!

जमलं तर जमलं नाहीतर सारंच  हुकलं !     

 

बेळगावचा पाऊस सात जन्म मिळालेल्या अनुभविक बायको सारखा…!

प्रेमाची रिमझिम, आपुलकीच्या धारा

व वरून वर्षाव करत असतात मायेच्या गारा..

 

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “केवळ माझा सह्यकडा…” ☆ कांचन कुलकर्णी ☆

? विविधा ?

☆ “केवळ माझा सह्यकडा…” ☆ कांचन कुलकर्णी ☆

अर्धवट झोपेत जाणवले की गाडी थांबली आहे. रात्री ११ वाजता नाशिक फाट्याला गाडीत बसल्यापासून ड्रायव्हरने दोन तीन वेळा चहापाण्यासाठी गाडी थांबवली होती. तशीच थांबली असेल असे वाटले. खिडकीतून बाहेर नजर टाकली अन दिसला एक डोंगर आणि वरपर्यंत गेलेली दिव्यांची रांग. पहाटेचे चार वाजत होते. शेजारी झोपेत असलेल्या मिनीला उठवलं आणि सांगितलं, “मिने, आलं कळसूबाई”. कळसूबाईच्या पायथ्याशी असणारं नगर जिल्ह्यातलं अकोला तालुक्यातलं बारी नावाचं गाव होतं ते. तिथून २०-२५ मिनिटं थोड्या चढाच्या रस्त्याने चालत निघालो.

मागे घर पुढे मोकळी जागा अशा बर्‍याच गडांवर टिपिकल रूपात दिसणार्‍या एका हाॅटेलमध्ये गेलो, हाॅटेल सह्याद्री त्याचं नाव. तिथे पोहे चहा घेऊन अंधारातच साडे तीनला चालायला सुरवात केली. पायथ्यापासून दिसणारी डोंगरावरची दिव्यांची रांग पाहून असं वाटलं होतं की तेवढंच चढायचं आहे, पण नंतर लक्षात आलं की तो पूर्ण डोंगराचा अगदी छोटासा टप्पा आहे. ओबडधोबड पायर्‍या होत्या, काहीची उंची फुटापेक्षा जास्त होती. बारीक बारीक दगडगोट्यांवरून पाय घसरत होते. मी तीन चार वेळा सह्याद्रीला लोटांगण घातलं. अफाट दम लागत होता. स्वतःच्या श्वासाचा आवाज ऐकू येत होता. पण महाराष्ट्राच्या सर्वोच्य ठिकाणी पोहचायचे आहे या जिद्दीने फक्त एकएक पावलावर लक्ष देऊन मार्गक्रमणा चालू होती. समुद्रसपाटीपासून १६४६ मीटर उंच असलेल्या कळसूबाई शिखराचं वैशिष्ठ म्हणजे अगदी टोकाला पोहचल्याशिवाय खालून कुठूनही तिथला पिकपाॅईंट, कळसूबाईचं मंदिर दिसत नाही. आता बर्‍याच ठिकाणी रेलिंग बसवली आहेत. एकुण चार ठिकाणी लोखंडी शिड्या उभारल्या आहेत. त्यामुळे चढाई बरीच सोपी झाली आहे. पण इतक्या उंचीवर देवळाचे बांधकाम कसे केले असेल, पूर्वी लोकं देवीच्या दर्शनाला कशी जात असतील याचं आश्चर्य वाटतं.डोंगराच्या पायथ्याशी असणार्‍या गावात शुभकार्याची सुरवात देवीच्या दर्शनाने होते. त्यामुळे स्थानिक लोकांची तिथे बर्‍यापैकी ये जा असते. चालत असताना वर एक टप्पा दिसायचा आणि वाटायचे की तिथेपर्यंत पोहोचलो की झाले. पण तिथे पोहोचलो की कळायचे की अजून वर चढायचे आहे. असे भ्रमनिरास दूर करत एकएक टप्पा पूर्ण करत शेवटी त्या सर्वोच्य ठिकाणावर पोहोचलो. सगळा थकवा कुठल्या कुठे पळून गेला. मी मनातल्या मनात गाऊ लागले “आज मैं उपर,महाराष्ट्र नीचे”. महाराष्ट्राच्या सर्वात उंच ठिकाणी पोहचल्याचा आनंद, तिथून चारी बाजूने खाली दिसणारे विहंगम दृष्य याचे वर्णन मला पामराला अशक्यच आहे. थोड्यावेळाने खाली उतरायला सुरुवात केली. चढण्यापेक्षाही उतरणे अवघड असणार याची कल्पना होती,  आणि तसेच झाले.काही ठिकाणी तर बसून उतरावे लागले. उन्हाचे चटके बसत होते. लोखंडी शिड्या व रेलिंग  तापले होते, पण त्यांचे चटके सहन करणे अनिवार्य होते. माझा थकला भागला जीव शेवटी हाॅटेल सह्याद्री पर्यंत पोहोचला. तांदळाची भाकरी, पिठंल, वांग बटाट्याची भाजी, मिरचीचा ठेचा, वरण भात असा फक्कड बेत होता. जेवण खरंच चवदार होते. त्या हाॅटेलचे मालक तानाजी खाडे दादांनी कळसूबाई देवीची माहिती सांगितली. छानच बोलले ते. तृप्त मनाने, अभिमानाने परतीचा प्रवास सुरू झाला. आॅगस्ट महिन्यात परत तुला भेटायला रायगडावर येईन असे सह्याद्रीसमोर नतमस्तक होऊन वचन दिले. परतीचा प्रवास जोरदार अंताक्षरीने अगदी मजेचा झाला.गंमत म्हणजे ११ जून म्हणजे किरण ईशानच्या लग्नाचा वाढदिवस. पुण्यात आल्यापासून मी इथे आहे तर तुम्ही दोघे ११ जूनला कुठेतरी बाहेर जा असे मी म्हणत होते, पण झाले उलटेच. अचानक ध्यानीमनी नसताना माझेच ट्रेकला जायचे ठरले. अर्थात याचे श्रेय नक्की मिनीचेच. ११ जूनला श्रीराम ट्रेकर्स या ग्रुपतर्फे केलेला हा ट्रेक म्हणजे किरण ईशानला त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाठी मी दिलेली गिफ्ट आहे असे मला वाटते.

“भव्य हिमालय तुमचा आमचा,केवळ माझा सह्यकडा”

© कांचन कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ८८५ वर्षे जतन  केलेले पार्थिव : श्री मिलिंद  चिंचोळकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता जोशी ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ ८८५ वर्षे जतन  केलेले पार्थिव : श्री मिलिंद  चिंचोळकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता जोशी ☆

नुकतेच पंतप्रधान मोदी यांनी रामानुजाचार्य यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण केले.  पण फारच थोड्या व्यक्तींना माहीत असेल की रामानुजाचार्य यांचे पार्थिव गेले ८८५ वर्षे जतन करून ठेवलेले आहे. 

जगभरातील सर्वांनाच इजिप्तच्या राजांचे मृतदेह (ममी) आणि भारतातील गोव्यातील सेंट झेवियरचे संरक्षित मृतदेह पाहून आश्चर्य वाटते…. परंतु फारच कमी लोकांना हे माहित असेल की इजिप्तच्या राजांचे मृतदेह गुंडाळण्यासाठी ज्या विशिष्ट कापडाचा वापर केला जात असे त्या कापडाला हल्ली मसलीन म्हणून ओळखलं जातं ते कापड मसली(मच्छली पट्टणम) श्रीरंग पट्टणम म्हणजेआपल्या भारतातूनच आयात केले गेले होते.  

श्रीरंगम (जिल्हा: तिरुचिरापल्ली, तामिळनाडू) येथील “श्रीरंगनाथस्वामी मंदिर”, ज्यात भारतातील सर्वात मोठे मंदिर प्रासाद असल्याची मान्यता आहे, येथे स्वामी रामानुजाचार्य (१०१७ – ११३७) यांचे पद्मासन घातलेल्या अवस्थेतील भौतिक शरीर आहे, जे “विशिष्ठाद्वैत” तत्त्वज्ञानाचे महान आचार्य आणि श्रीवैष्णव परंपरेचे प्रणेते होते. त्यांचे ८८५ वर्षे जतन केलेले भौतिक शरीर या ठिकाणी बघायला मिळू शकते. हे भौतिक शरीर श्रीरंगनाथस्वामी मंदिराच्या पाचव्या परिक्रमा-मार्गावर असलेल्या “श्री रामानुज मंदिराच्या” दक्षिण-पश्चिम कोपऱ्यात संरक्षित आहे. स्वामी रामानुजाचार्य १२० वर्षे आयुष्य जगले… सन ११३७ साली त्यांनी पद्मासन अवस्थेत समाधी घेतली होती. स्वतः श्रीरंगनाथस्वामींच्या आदेशानुसार, रामानुजाचार्यांच्या शिष्यांनी त्या अवस्थेत त्यांचे भौतिक शरीर जतन केले. या संरक्षित शरीरात डोळे, नखे वगैरे स्पष्ट दिसतात.  या शरीरावर कुजण्यापासून संरक्षण करण्यासाठी दररोज कोणताही अभिषेक केला जात नाही.  वर्षातून दोनदा हे शरीर औषधी वनस्पतींनी स्वच्छ केले जाते आणि त्या वेळी शारीरिक शरीरावर चंदन आणि केशर लावले जाते. हे उल्लेखनीय आहे की या पवित्र स्थानाचा प्रचार गोवा किंवा इजिप्तसारखा केला जात नाही. रामानुजाचार्यांनी वापरलेले एक भांडे आपण अजूनही आत बघू शकता.

संदर्भ :  मिलिंद चिंचोळकर यांचा चेपू भिंतीवरील लेख. 

प्रस्तुती : सुश्री सुनीता जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “पसारा आवरू या…” – ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “पसारा आवरू या…” – प्रा. माधव सावळे ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

आज स्वयंपाकघर आवरायला काढलं होतं. आवरायच्या आधीच ठरवलं होतं की ज्या गोष्टी गेल्या वर्षभरात लागल्याच नाहीत, वापरल्या गेल्याच नाहीत, त्या सरळ काढून टाकायच्या आणि देऊनच टाकायच्या. अशा बर्‍याच निघाल्या पाहता पाहता. केवढा पसारा. विस्मृतीत गेलेल्या बर्‍याच गोष्टी.

कधीतरी त्या हव्या होत्या, पण वेळेवर कुठे ठेवल्या तेच आठवलं नाही. म्हणून ती वेळ भागवायला लगेच बाजार गाठला.

सगळं उरकल्यावर ती वस्तु सापडली. पण मग काय उपयोग?

आखीव, रेखीव, आटोपतं असं असावं ना सगळंच, असं वाटायला लागलंय हल्ली. माझी आजी म्हणायची दोन लुगडी हवीत. एक अंगावर आणि एक दांडीवर…

आता भांडी ढीगभर, कपडे कपाटातून उतू जाताहेत, खाद्यपदार्थांची रेलचेल. कशाचंच नावीन्य नाही राहिलं.

माझ्या ओळखीतली, नात्यातली, अशी उदाहरणे आहेत.

 पेशंट असलेली, आजारी असलेली, त्यांनी जाण्याआधी आपलं सगळं सामान वाटून टाकलं. काहीजणांनी तर कुणाला काय द्यायचं, ते लिहून ठेवलं. खरंच नवल वाटलं मला. आपण काहीतरी शिकायला हवं, असं वाटून गेलं.

ह्या वस्तूंचा मोह सुटत नाही. शेवटपर्यंत माणसाला खाण्याचा मोह सोडवत नाही.

खाण्याची इच्छा आणि ह्या गोष्टीतली इच्छा संपली की माणूस जाणार, हे समजायला लागतं.

एक ओळखीच्या आजी होत्या, मुलं-बाळं काही नव्हती. एकट्या राहायच्या. एका वाड्यात.

पुतणे वगैरे होते, पण कुणाजवळ गेल्या नाहीत.आपली पेन्शन कुणी घेईल ह्या भितीने लपवून ठेवत असाव्यात.

गेल्या तेव्हा उशीमधे पण पैसे सापडले. जातांना म्हणत होत्या, ‘नवी नऊवार साडी कुणालातरी पिको करायला दिलीय. तिच्याकडेच आहे. आणा म्हणून.’ असंही उदाहरण आहे.

एक ओळखीच्या बाई गेल्या. कॕन्सर झाला होता, पण गेल्या तेव्हा एका वहीत सगळं लिहून ठेवलं होतं.

जी बाई जाईपर्यंत  त्यांची सेवा सुश्रुषा  करत होती, तिला स्वतःची सोन्याची चेन आणि वीस हजार रुपयाचं पाकीट ठेवून गेल्या. मुलींना काय द्यायचं, सुनेला काय द्यायचं सगळं लिहून गेल्या.

साड्या, बाकी सामान कोणत्या अनाथाश्रमाला द्यायच्या ते पण लिहून गेल्या. ह्याला म्हणतात प्लानिंग.

देवही तेवढा वेळ देतो आणि हे लोक पण आपल्याला जायचंय हे मान्य करतात. ह्याला हिंमतच लागते.

नाहीतर आपण एक गोष्ट सोडत नाही हातातून. कायमचा मुक्काम आहे पृथ्वीवर ह्या थाटातच वावरत असतो आपण.

तीन-तीन महिन्यांचा नेट पॕक किती कॉन्फिडन्सने मारुन येतो आपण. नवलच वाटतं माझंच मला.

चार प्रकारचे वेगवेगळे झारे, चार वेगवेगळ्या किसण्या, आलं किसायची, खोबरं किसायची, बटाट्याचा किस करायची जाड अशी.

असं बरंच काही. सामानातलं खोबरं आणल्यावर किसणं होत नाही लवकर.

खूप पाहुणे येतील कधी, म्हणून पंचवीसच्या वर ताटं, वाट्या, पेले. पण पाहुणे येतच नाहीत. आले तरी एक दिवस मुक्काम.

घरी एक नाश्ता आणि एक जेवण बाहेर. घरी जेवणं झाली तरी भांडीवाली बाई सुट्टी मारेल, खूप भांडी पडली तर, म्हणून युज अॕण्ड थ्रो प्लेट्स. कुणालाच घासायला नको.

पाहुणे मुक्काम करत नाहीत सहसा. कारण एक सतरंजी पसरवून सगळे झोपलेत असं होत नाही.

 कुणाचे गुडघे दुखतात, कुणाला कमोड लागतो. तेव्हा प्रत्येकाला  आपआपल्या घरी परतण्याची घाई. घरची बाई पण आग्रह करत नाही कारण तिच्या हातून काम होत नाही.

पाहुणी आलेली बाई मदत करत नाही. सगळ्यांच्या हातात नेऊन द्यावं लागतं. अशा तक्रारी ऐकू येतात.

असं खूप काही आठवत बसतं, पसारा पाहून.

एवढाच पसारा हवा की वरच्याचं बोलावणं आलं, चल म्हणाला की लगेच उठून जाता आलं पाहिजे.

पण तसं होत नाही. दिवसेंदिवस जीव गुंततच जातो. वस्तूंमध्ये, दागिने, पैसा, नाती आणि स्वतःमध्ये पण.

रोज कुणीतरी गेल्याच्या बातम्या येतात. पण तरी नाही.आपण काही सुधारणार नाही.

दरवर्षी घरातला पसारा काढायचा आवरायला. त्याच त्या वस्तु पुन्हा काढायच्या, पुन्हा ठेवायच्या असं चाललेलं असतं आपलं. देऊन टाकलं तरी पुन्हा नवीन आणायचं.

खरंतर जितक्या गरजा कमी, तितका माणूस सुखी …

पण मन ऐकत नाही..

ये मोह मोह के धागे…….

मग त्या धाग्यांचा कोष, मग गुंता, मग गाठ आणि मग पीळ…आणि मग सुंभ जळला तरी पीळ जात नाही.

निसर्गाकडून शिकायला हवं, आपल्या जवळ आहे ते देऊन टाकायचं आणि रितं व्हायचं. फळं, फुलं, सावली, लाकडं सगळं सगळं देण्याच्याच कामाचं.

पण आम्ही नाही शिकत .

थोडक्यात काय तर पसारा करु नये, आटोपशीर ठेवावं सगळं. आणि पसारा करायचाच असेल तर तो करावा दुसऱ्यांच्या मनात.आपल्या चांगल्या आठवणींचा, सहवासाचा, आपल्या दानतीचा. दिसू द्यावा तो आपल्या माघारी. आपण परतीच्या प्रवासाला निघाल्यावर लोकांच्या मनात, डोळ्यात, अश्रुंच्या बांधात.

जातांना आपण मागे बघितलं तर दिसावा खूप पसारा आपल्या माणसांचा, जिव्हाळ्याचा, गोतावळ्याचा.

संग्राहिका :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ निसर्गरुपे : पहाट… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

?मनमंजुषेतून ?

☆ निसर्गरुपे : पहाट…  ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे 

निसर्गाची सगळीच रूपे मला भावतात. पहाट, सकाळ, दुपार आणि दुपारच्या आधीची आणि नंतरची वेळा, संध्याकाळची विविध रूपे आणि नंतर येणारी रात्र. ऋतू कोणताही असो, त्यातील विविध प्रहरांची ही विविध रूपे मला सारखीच आकर्षित करतात. प्रत्येकच प्रहर काहीतरी नवीन घेऊन येतो. कोणीतरी एखादं छानसं गिफ्ट आकर्षक रूपात गुंडाळलेलं घेऊन यावं, ते उघडून पाहिल्याशिवाय त्यात काय आहे ही उत्सुकता जशी शमत नाही, तशाच या वेळा अनुभवल्याशिवाय त्या आपल्यासाठी काय घेऊन येतात हे नाही कळायचं. अशाच या निसर्गवेळा मला जशा भावल्या, तशा तुमच्यासमोर ठेवणार आहे. शब्दांचाच रूपाने त्यातील रूप, रस आणि गंध तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे. 

‘प्रभाती सूर नभी रंगती, दश दिशा भूपाळी म्हणती… ‘ ही सुंदर भूपाळी आपल्यापैकी बहुतेकांच्या परिचयाची असेल. रमेश अणावकर यांचे सुंदर शब्द आशा भोसलेंनी अमर केले आहेत. या गीतात ‘ पानोपानी अमृत शिंपीत उषा हासरी हसते धुंदीत ‘ असे शब्द आहेत. मला वाटतं ही प्रभात वेळा जशी पानोपानी अमृत शिंपीत येते, तसेच अमृत आशाताईंच्या स्वरातून जणू आपल्यावर शिंपडले जाते. मरगळलेल्या मनाला हे अमृतस्वर संजीवनी देऊन ताजेतवाने करतात. या भूपाळीमध्ये अप्रतिम असे निसर्गाचे वर्णन आले आहे. 

सकाळी आपण जशी परमेश्वराची पूजा करतो, तशीच पूजा निसर्गही पहाटेच्या रूपाने त्या परमात्म्याची बांधत असतो. त्याच्या पूजेसाठी विविध रंगांची, गंधांची फुले निसर्ग तयार ठेवतो. नदीचं, झऱ्याचं खळाळणारं संगीत असतं, वाऱ्याची बासरी आसमंतात लहरत असते, पक्ष्यांचं कूजन म्हणजे जणू मंत्रघोष ! अशी सगळी स्वागताला तयार असतात. त्यातच पूर्वेचं आकाश स्वागतासाठी गुलाबी वस्त्र परिधान करून तयार असतं. अशाच वेळी सूर्यदेव आपल्या रथावर आरूढ होऊन या निर्गुण निराकाराच्या आरतीला जणू प्रकाशाची निरांजन घेऊन हजर होतात. पाहता पाहता या निरांजनाच्या ज्योती अधिकाधिक प्रकाशमान होऊन अवघे विश्व उजळून टाकतात. पूर्वेचा गुलाबी रंग आता सोनेरी रंगात बदलतो. रात्रभर प्रकाशाच्या प्रतीक्षेत असलेली झाडं, वृक्षवेली आपले हात पसरून या प्रकाशाचं स्वागत करतात. अशा वेळी भा रा तांब्यांच्या कवितेतील ओळी सहजच ओठांवर येतात. ‘ पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर…’ या कवितेतलं वर्णन कवीनं जरी सायंकाळचं केलेलं असलं तरी सकाळच्या वेळेलाही ते चपखल लागू पडतच. ‘ फिटे अंधाराचे जाळे…’ या गीतात म्हटल्याप्रमाणे अंधाराचे जाळे नाहीसे होऊन स्वच्छ दिवस उजाडलेला असतो. अशा वेळी परमेश्वर म्हणा की निसर्ग म्हणा मानवाला, पशुपक्ष्याना आणि अवघ्या सृष्टीला जणू म्हणतो, ‘ बघ, तुझ्यासाठी एक अख्खा सुंदर दिवस घेऊन आलो आहे. आता त्याचा कसा वापर करायचा ते तू ठरव. ‘

पहाटेच्या वेळा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भासतात. पण मला सगळ्यात जास्त आवडते ती जंगलातील पहाट. या पहाटेसारखी सुंदर वेळच नाही. रात्र संपून दिवस उगवण्याच्या सीमारेषेवर ही पहाट उभी असते. अशा वेळी निसर्गाचं सौंदर्य अनुभवावं. रात्र संपून पहाट होतानाची वेळ इतकी सुंदर असते की अशा वेळी शहरातले भगभगीत दिवे नकोसे वाटतात. पहाटेला तिच्या नैसर्गिक रूपातच पाहावं, फुलू द्यावं, खुलू द्यावं. आकाशातल्या रात्रीच्या मुक्कामाला असणाऱ्या तारे आणि तारका आपल्या घरी हळूहळू परत जायला निघालेल्या असतात. हळूहळू त्या दृष्टीआड होतात. त्यांना अदृश्य होताना आणि पहाटवेळा उमलताना पाहण्यात एक वेगळाच अनोखा आनंद आहे. तो अनुभवावा. 

पहाट मला एखाद्या अल्लड तरुणीसारखी भासते. कोणत्याही प्रकारचा साजशृंगार न करता ती आपल्या नैसर्गिक रूपातच येते. तिचं हे नैसर्गिक रूपच मनाला जास्त भावतं. जातीच्या सुंदराला जसं सगळंच शोभून दिसतं, तशीच ही पहाट असते. रम्य, देखणी. अशा वेळी जंगलातून एखादा फेरफटका मारावा. निसर्गाची भूपाळी अनुभवावी. रंग, रूप, रस, गंध सगळं सगळं असतं त्यात. फक्त ती अनुभवता आली पाहिजे. निसर्ग वेगवेगळ्या रूपात आपल्याशी बोलत असतो पण ते ऐकता आलं पाहिजे, अनुभवता आलं पाहिजे. त्यासाठी सुद्धा काही साधना आवश्यक असते. सगळ्या कवींना, महाकवींना, लेखकांना या पहाटेनं स्फूर्ती दिली आहे. अनेक सुंदर काव्य पहाटेच्या मंगल वेळेनं प्रसवली आहेत. अनेक ऋषी मुनी, लेखक, कवी यांना प्रतिभेचं देणं या पहाटेनच दिलं आहे. 

आपल्या घराजवळ एखादा डोंगर किंवा एखादी टेकडी असेल तर पहाटे जरूर जावं. नसेल तर कधीतरी मुद्दाम वेळ काढून अशा ठिकाणी जावं. ही पहाट अनुभवावी. ही पहाट अनुभवण्यासाठी सध्या तरी कोणतंच शुल्क आकारलं जात नाही. काही चांगल्या गोष्टी अजूनही मोफत मिळतात. त्यातील पहाट, पहाटेचा गार वारा, नयनरम्य निसर्ग आपल्याकडून काही घेत नाही. देतो मात्र भरभरून ! ‘ आपल्याला ते घेता आलं पाहिजे. नाहीतर ‘ देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी अशी अवस्था व्हायची ! ‘ 

या पहाटेच्या प्रसंगी रानवाटा जाग्या होऊ लागतात. झाडे, वेली जाग्या होतात. आपण जंगलातून तर फेरफटका मारणार असू तर झाडांचा एक अनोखा गंध आपलं स्वागत करतो. अशा वेळी खोल श्वास घेऊन हा गंध, ही शुद्ध हवा फुफ्फुसात भरून घ्यावी. पक्ष्यांचे निरनिराळे आवाज कानावर पडत असतात. त्यांच्यातली विविधता, माधुर्य अनुभवावे. पूर्वेकडून होणाऱ्या सुवर्णप्रकाशाची उधळण अनुभवावी. तो प्रकाश अंगावर माखून घ्यावा. तळ्यात फुलणारी कमळे,उमलणारी फुले आकर्षक स्वरूपात आपल्यासमोर जणू हजर होतात. त्यांचं निरीक्षण करावं. त्यांचं रूप नेत्रांनी प्राशन करावं, श्वासावाटे गंध मनात साठवावा. पाण्यावर सूर्याचा सोनेरी प्रकाश पसरलेला असतो. तो दिवसभरात नंतर पुन्हा दिसत नाही. नदीचा, झऱ्याचा खळखळाट ऐकू येतो. आपण समुद्रकिनारी असू तर, समुद्राची गाज ऐकू येते. त्याच्या लाटांचे तुषार आपल्या अंगावर येऊन जणू आपल्याला पवित्र करत असतात. तुम्ही पहाटेला कुठेही असा. नदीकिनारी,समुद्रावर,डोंगरावर किंवा जंगलात. पहाट आणि तिचं मोहक रूप तुम्हाला आकर्षित केल्याशिवाय राहणारच नाही. ही पहाटवेळा तुम्हाला दिवसभराची ऊर्जा प्रदान करेल. 

पहाटेनंतरची वेळ म्हणजे सकाळ. आता दशदिशा उजळलेल्या असतात. साऱ्या सृष्टीत चैतन्य भरून राहिलेलं असतं. माणसाचा, पशु पक्ष्यांचा दिवस सुरु होतो. जो तो आपापल्या कामाला लागलेला असतो. अवघ्या सृष्टीत लगबग सुरु असते. मंदिरातली आरती, धूप दीप आदी सारे सोपस्कार होऊन मंदिरातील मूर्ती प्रसन्न वाटतात. बच्चे कंपनी तयार होऊन शाळेला निघण्याची गडबड असते. गृहिणीची घरातली आणि कामावर जाणाऱ्यांची  वेगळी धांदल सुरु असते. सकाळचे हे रूप वेगळेच असते. पहाट कोणताही मेकअप न करता नैसर्गिक रूपात आपल्यासमोर येते तर नंतर येणारी सकाळ मात्र छानपैकी सुस्नात आणि वेणीफणी करून आलेल्या तरुणीसारखी प्रसन्न भासते. ती जणू आपल्याला सांगते, ‘ चला, आता आपल्या कामांना सुरुवात करू या. दिवस सुरु झालाय. ‘ मग प्रभात समयीचे हे सूर हे हळूहळू मंद होत जातात. 

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे 

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print