मराठी साहित्य – विविधा ☆ “अहंकारानं तुटलेले संसार ?” ☆ श्री संदीप काळे ☆

श्री संदीप काळे

? विविधा ?

☆ “अहंकारानं तुटलेले संसार ?” ☆ श्री संदीप काळे ☆

माझ्या पाटनूर गावच्या पंचक्रोशीतील दोन तरुण, पुण्याच्या कोर्टात अधिकारी म्हणून रुजू झाले. त्यांना भेटण्यासाठी मी त्या दिवशी गेलो होतो. दोघे कामात होते. दोघांनीही थांबा थोडा वेळ, असा इशारा केला. मी कोर्टाच्या बाहेर आलो. बाहेर येणारे- जाणारे कैदी, भेटायला येणारे नातेवाईक, पोलिस, त्या कोर्टातली गर्दी किती मोठी… बापरे!

रागाच्या आणि इगोच्या, अहंकाराच्या भरात कायदा हाती घेणाऱ्या त्या प्रत्येकाला वाईट वाटत असेल; पण वेळ निघून गेल्यावर काही होणारे नव्हते. कैद्यांचे, सतत कोर्टाच्या पायऱ्या चढून सुकलेले डोळे आता वेळ निघून गेली, असेच सांगत होते. ते वातावरण कोर्टाची पायरी कुणीही चढू नये, असेच सांगत होते.

कोर्टात मागच्या बाजूला माझी नजर गेली. एक लहान मुलगी एका मुलाला राखी बांधत होती. माझ्या मनात विचार आला आता जवळपासही राखी पोर्णिमा नाही; तरीही ही मुलगी राखी का बांधत असेल? बाजूला एक चहावाला ते सारे दृश्य पाहून खांद्यावर टाकलेल्या रुमालाने, स्वतःचे डोळे पुसत होता. मी अजून बारकाईने पाहिले. एका बाजूने एक माणूस आणि दुसऱ्या बाजूला एक महिला दोघेजण बसले होते.

मी त्या चहावाल्याला विचारले “का रडताय तुम्ही? काय झाले?”

तो म्हणाला, “काय व्हायचे आहे साहेब, आम्ही दिवसभर कोर्टात असतो ना, आम्हाला पावलोपावली कलियुगाचे दर्शन होते.”

“तुम्ही ज्या मुलांकडे बघून रडताय ती कोण आहेत?”

चहावाला म्हणाला, “ते बाजूला एकमेकांच्या तोंडाकडे न पाहणारे नवरा-बायको आहेत ना, त्यांची ही मुले आहेत. यांच्या भांडणापायी या मुलांचा त्रास पाहवत नाही.” माझ्याशी एवढे बोलून चहावाला आपल्या कामात गुंतला.

त्या मुलांकडे बघून मलाही खूप वाईट वाटत होते. ती महिला उठली आणि चहा घ्यायला मी जिथे थांबलो होतो तिथे आली. तिने चहा घेतला आणि तिथूनच मुलाला ‘चल आता निघायचे,’ असा आवाज देत होती. त्या महिलेने त्या चहावाल्याकडे पहिले आणि त्याला म्हणाली, “कारे चहा चांगला करता येत नाही का? फुकट पैसे घेतोस का?” त्या बाईचे बोलणे ऐकून त्या चहावाल्याचा चेहरा एकदम पडला.

मलाही त्या बाईला काहीतरी बोलायचे होते; पण हिंमत होईना. त्या बाईसोबत एक म्हातारी बाई होती. जेव्हा ती बाई फोनवर होती तेव्हा मी त्या म्हाताऱ्या बाईला म्हणालो, “आजी, तुम्ही त्या ताईच्या आई का?”

त्या ‘हो’ म्हणाल्या. हळूहळू मी तिला बोलते केले. तो मुलगा, मुलगी आजीकडे आले. आजीने मुलीच्या पाठीवरून हात फिरवत जा म्हणत निरोप दिला. आता तो मुलगा, जाणार इतक्यात मी त्या चहावाल्याच्या बरणीतले दोन चॉकलेट बाहेर काढले आणि त्या मुलांच्या हातात ठेवले.

मुलगी नम्र होती. मुलगा जरा बेशिस्त होता. कोर्टात त्या दोघांनाही पुकारा झाला, त्या मुलांचे आईवडील दोघेही कोर्टात गेले. त्यांच्यासोबत त्यांचे वकीलही होते.

ते गेल्याचे पाहताच मी, त्या आजी, ती दोन मुले, मध्येमध्ये तो चहावाला, असे आम्ही बोलत होतो. ‘देव देतो आणि कर्म नेते’ अशी कहाणी या कुटुंबाची होती. त्या आजी सांगत होत्या आणि आम्ही ऐकत होतो.

डॉ. मीरा देशमुख, डॉ. रमेश कांबळे (दोघांची नावे बदलली आहेत) या दोघांनी कॉलेजला असताना पळून जाऊन लग्न केले. लग्नाला दोघांच्याही घरच्यांचा प्रचंड विरोध होता. दोन मुले झाली तोपर्यंत यांचे चांगले होते; पण पुढे छोट्या छोट्या कारणावरून भांडणे व्हायला लागली. ही भांडणे जीव घेण्यापर्यंत गेल्यावर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

विभक्त झाल्यावर पोटगी देण्यावरून खूप वादंग झाले, ते 

आजही कोर्टात सुरू आहेत. मुलगी सरिता बापाकडे राहते आणि मुलगा सचिन आईकडे. त्या आजीने बोलता बोलता अगदी थोडक्यात सारी कहाणी सांगितली.

ती आजी माझ्याशी बोलत असताना ती मुले एकमेकांशी बोलत होती. मुलगी म्हणाली, ‘दादा तू मला घरी भेटायला येशील ना?

मुलगा ‘मी नाही सांगू शकत, मम्मी काय म्हणेल, सुट्टी मिळेल का नाही, माहिती नाही’.

बिचारी मुलगी त्या मुलाचा नकारार्थी सूर ऐकून एकदम नाराज झाली. तो मुलगा जाग्यावरून उठला, त्या मुलीजवळ जाऊन म्हणाला, “अगं तायडे नाराज नको होऊ. मी येण्याचा प्रयत्न करीन ना?”

मुलगी पुन्हा म्हणाली, “मागेतर वर्षभर आला नाहीस ना?”

त्या दोघांचा तो भावनिक संवाद आणि संवादाशेवटी एकमेकाला मिठी मारत रडलेला तो क्षण पाहून आता काळजाचे ठोके बंद पडतात की काय, असे वाटत होते. ती मुले, आणि आम्ही सारे अक्षरशः रडत होतो.

ती आजी म्हणाली, “या कोर्टाच्या चकरा मारून खूप कंटाळा येतो. अगोदर माझी मुलगी आणि जावई या दोघांच्याही पाया पडून सांगितले होते, लग्न करू नका. आता यांनी केले, तर ते निभावून तरी दाखवावे ना..! यांची रोज होणारी भांडणे, पाहून मुले पोटाला येऊच नाही, असे वाटते.

मुलीने दुसऱ्या जातीचा नवरा केला म्हणून आमचे नाक कापले, दोन मुले झाली आता दुसरे लग्न करायचे आहे, असे दोघेही म्हणतात, पहिल्या लग्नाला न्याय देता आला नाही, दुसऱ्याला काय देणार.

आम्ही अडाणी माणसे. लग्नाच्या वेळी एकमेकांना पहिलेदेखील नव्हते. ही जेवढी शिकलेली आहेत, तेव्हढी ही माणसे वेड्यासारखी वागतात. लग्नामध्ये विधीच केल्या नाहीत, संस्कृती, परंपरा पाळल्या नाहीत, यांचे लग्न टिकणार कसे?” आजी अगदी पोटतिडकीने सांगत होत्या.

कोर्टात गेलेले ते दोघेजण पडलेला चेहरा घेऊन बाहेर येताना दिसताच त्या दोन्ही लहान मुलांनी एकमेकांचे हात घट्ट पकडले. आता आपण एकमेकांना सोडून जाणार, याची खात्री त्यांना झाली. त्या दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. ते दोघे जसे त्या मुलांजवळ आले, तसे ती महिला त्या मुलाला आणि त्या माणसाने त्या मुलीला धरून ओढले. त्या दोन्ही मुलांची ती ताटातूट पाहवणारी नव्हतीच. ते दृश्य पाहून चहावाला मामा पुन्हा रडताना मला दिसला.

त्या लहान मुलाला घेऊन ती महिला तिच्या आईला म्हणाली, ‘माझे पैसे वेळेवर दे नाहीतर जेलमध्ये जावे लागेल, असे न्यायालयाने खडसावले त्याला’, असे डोळ्यात अहंकाराचे आव आणून ती सांगत होती.

त्या छोट्या मुलाला घेऊन असलेला तो माणूस त्या तावातावाने बोलणाऱ्या बाईकडे रागारागाने पाहत होता. ती बाई, तिची आई आणि तिचा मुलगा तिथून गेला. तो माणूस आपल्या मुलीला घेऊन त्या चहावाल्याकडे आला त्याने चहा मागितला. तो माणूस एका हाताने चहा पीत होता आणि त्यांच्या दुसऱ्या हातात त्यांची असलेली मुलगी अजून तिचा भाऊ परत येईल, या आशेने तो गेलेल्या त्या वाटेकडे पाहत होती.

मी त्या माणसाला म्हणालो, “मुलांचे फार प्रेम आहे एकमेकांवर.”

मी बोलताच त्या माणसाने माझ्याकडे पाहिले. तो काहीही बोलला नाही, एकदम शांत बसला. मी आणि तो चहावाला एकमेकांशी बोलत होतो. तो चहावाला त्या माणसाकडे बघत म्हणाला, “याची पत्नी जेव्हा जेव्हा येते तेव्हा खूप गोंधळ घालते आणि हे नेहमी शांत बसलेले असतात.”

तो माणूस अगदी शांतपणे म्हणाला, “एक दोन वेळा बोललो होतो. त्यामुळे एवढी स्थिती निर्माण झाली. माझ्या बायकोला काही सांगायचे म्हणजे कठीणच आहे. आमचे भांडण जातीवरून व्हायचे. लग्नाच्या आधी एकमेकांची जात काढायची नाही, असे ठरवले होते; पण छोट्या छोट्या भांडणामध्ये जात निघायची आणि हेच भांडण पुढे वाढत गेले.”

मी म्हणालो “आज न्यायालयात काय झाले साहेब?”

ती व्यक्ती म्हणाली, “न्यायालयाने पोटगी वेळेत द्या, ठरलेली रक्कम का देत नाही, नाही दिली तर शिक्षेला सामोरे जा, असे सांगितले.”

मी पुन्हा म्हणालो, “मग तुम्ही काय म्हणालात?”

“मी काय म्हणणार त्यांना, देण्याचा प्रयत्न करणार एवढे म्हणालो.”

त्या व्यक्तीने मला प्रतिप्रश्न केला “अहो माझ्याकडे नाहीच तर मी देऊ कसे? जे काही होते ते सर्व बायकोच्या नावे होते. मी हे खूप ओरडून सांगितले, पण माझे ऐकले गेले नाही.

पोटगीच्या नावाने मला खूप मोठी रक्कम द्या, असे सांगण्यात आले. गेल्या दोन महिन्यापासून माझी मुलगी आजारी आहे. तिची शाळा, या सगळ्या कामात मी कामच केले नाही, तर पैसे येणार कुठून? माझी बायको मोठी डॉक्टर असून मलाच तिला पैसे द्या, असे सांगण्यात आले. सगळे कायदे महिलांच्या बाजूने आहेत.”

त्या व्यक्तीचे बोलणे ऐकूण मी शांत होतो. तो चहावाला एकदम म्हणाला, “रोज येथे असे अनेक प्रकार पाहायला मिळतात. सगळ्यांचा इगो इथे दिसतो? बाकी काही नाही?”

ती लेक आणि बाप हळुवार पावलांनी तिथून गेले. त्या मुलीच्या डोळ्यात भाऊ आणि आईविषयी प्रचंड प्रेम दिसत होते.

मी ज्या मित्राची वाट पाहत होतो, ते आपाराव आणि संजय एक एक करून दोघेही आले. चहाचा एक एक घोट घेत आज कोर्टात काय झाले, ते सांगत होते. पहिला म्हणाला, “आज पोटगीच्या चार केस आल्या होत्या, कुठे महिलांचा द्वेष; तर कुठे पुरुष. सर्वांचे एकच असते, ते म्हणजे मीच खरा आहे. तिथे माणसे बोलतच नव्हते, त्यांचा इगो बोलत होता.” कोर्टातले ते सर्व वातावरण अत्यंत क्लेशदायक होते. दुसरा म्हणाला, “सर्व माणसे उच्च शिक्षित होती, कोणी नम्रपणे बोलायला तयार नाही. नवरा मुलगा कितीही गरीब असू द्या, त्याची परिस्थिती असो की नसो, पोटगीची रक्कम घेतांना त्याची कुणाला दया येतच नाही. आज दोन प्रकरणे तर अशी होती, अनेक वेळा समन्स पाठवूनही महिलेला पैसे दिले जात नाहीत. इतकी वर्षे सोबत राहून एकमेकांची तोंडे पाहणारच नाही, अशी भूमिका माणसे कशी काय घेऊ शकतात?”

मी दोन दिवसांपूर्वी राज्याचा रेषो पाहिला आणि हैराण झालो. पोटगी आणि घटस्फोट हा विषय सर्वच ठिकाणी गंभीर होऊन बसला आहे. चहावाला म्हणतो, “या कोर्टाची पायरी चढणाऱ्या प्रत्येक माणसाने मागच्या जन्मी अहंकारातून मोठे पाप केले असणार.”

पोटगीसंदर्भात जे काही वातावरण आणि किस्से होते, त्याने मी हादरून गेलो होतो. काय ती माणसे आणि काय त्यांचे जीवन! सर्व काही ईगोच्या रोगाने त्रासून गेलेले होते. आम्ही कोर्टातला तो विषय कट करून बाकी विषयावर बोलत होतो, पण माझे सर्व लक्ष पोटगी या विषयाकडे लागले होते.

आम्ही कोर्टातून बाहेर पडलो, ज्याच्या त्याच्या कामाला लागलो. कामात खूप व्यस्त झालो, तरी ती इगोवाली माणसे आणि त्या लहानग्याचा रडका चेहरा काही डोळ्यासमोरून काही जात नव्हता. कधी थांबणार हे कायमस्वरूपी?

(आजचा हा लघुलेख स्वतः लेखक श्री. संदीप काळे, संपादक, मुंबई सकाळ, यांच्या सौजन्याने.)

© श्री संदीप काळे

९८९००९८८६८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एका वादळाशी झुंज… शब्दांकन : श्री विनीत वर्तक ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ एका वादळाशी झुंज… शब्दांकन : श्री विनीत वर्तक ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

निसर्गाच्या रौद्र रुपापुढे मानव नेहमीच खुजा ठरत आलेला आहे. आपलं विज्ञान किंवा आपला अभ्यास कितीही प्रगत झाला तरी निसर्गात घडणाऱ्या अनेक विध्वंसक गोष्टींची भविष्यवाणी अजूनही आपल्याला योग्य रीतीने करता येत नाही. त्यामुळेच अश्या नैसर्गिक आपत्तीमधे सगळ्यात महत्वाचे ठरते ते आपत्ती व्यवस्थापन आणि त्या आपत्तीचा मागोवा घेणं. ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगातील वातावरणात प्रचंड बदल गेल्या काही वर्षात झाले आहेत. तपमानात होणारे उतार-चढाव अधिक तीव्र झाले आहेत. त्यामुळेच वारे, पाऊस आणि एकूणच त्यांची निर्मिती यांच्या चक्रावर याचा खूप मोठा परीणाम होतो आहे. या सर्व बदलांचा परिणाम म्हणजे चक्रीवादळ.

भारताला ७५१६ किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे. एका बाजूला अरबी समुद्र तर दुसऱ्या बाजूला बंगालचा उपसागर तर एका टोकाला हिंद महासागर अश्या तिन्ही बाजूने भारत पाण्याने वेढलेला आहे. साहजिक वातावरणातील बदलांचा प्रभाव हा भारतावर पडणार हे उघड आहे. चक्रीवादळांच्या निर्मितीत अनेक गोष्टी महत्वाच्या ठरतात. त्यातील सगळ्यात महत्वाचं असते ते समुद्राच्या पाण्याचे तापमान. भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील पाण्याचं तपमान हे पश्चिम किनारपट्टीपेक्षा जवळपास २ ते ३ डिग्री सेल्सिअस ने जास्ती असते. त्यामुळेच आजवर प्रत्येक वर्षी बंगालच्या उपसागरात चक्रीवादळांची निर्मिती होत होती. पण गेल्या काही वर्षात ग्लोबल वॉर्मिंगने अरबी समुद्राचं तपमान हे वाढत चाललं आहे. त्यामुळेच क्वचित येणाऱ्या चक्रीवादळांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांचा अभ्यास असं दर्शवतो की अरबी समुद्रावरील वादळांच्या संख्येत ५२% टक्के, तर चक्रीवादळांच्या निर्मितीत तब्बल १५०% टक्यांची वाढ दिसून आली आहे.

एखादं चक्रीवादळ निर्माण झालं तर ते किती संहारक असेल? त्याचा रस्ता कसा असेल? किंवा त्याने किती नुकसान होईल? याचा निश्चित अंदाज आजही बांधता येत नाही. कारण चक्रीवादळ मजबूत किंवा कमकुवत होण्यास मदत करणार्‍या विशिष्ट चढउतारांमुळे त्याचे मॉडेल्स त्याच्या तीव्रतेचा फारसा आधीच अंदाज लावू शकत नाहीत. जिकडे त्याची निर्मिती होते तिथली अप्पर एअर डायव्हर्जन्स, विंड शीअर आणि कोरडी हवा यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. चक्रीवादळ निर्माण झाल्यावर त्याला रोखता येणं अशक्य आहे. ते आपल्या मार्गात येणाऱ्या सर्व गोष्टींची विलेव्हाट लावल्याशिवाय उसंत घेत नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळेच जेव्हा अशी चक्रीवादळं नागरी वस्तीच्या दिशेने येणार असतील तर त्याचा अंदाज जर आपल्याला आधी बांधता आला तर खूप मोठी मनुष्य आणि वित्त हानी टाळता येऊ शकते.

गेल्या काही दशकात याच कारणांसाठी भारताने अनेक उपग्रह अवकाशात वातावरणाच्या या बदलांचा अभ्यास करण्यासाठी पाठवलेले आहेत. भारताच्या आजूबाजूच्या प्रदेशात वातावरणात होणाऱ्या अनेक बदलांचा वेध घेऊन हे उपग्रह सतत याची माहिती भारतात प्रसारित करत असतात. याच माहितीच्या आधारे चक्रीवादळांची निर्मिती आणि त्यांची दिशा तसेच त्यांच्या शक्तीचा अंदाज लावला जातो. 

भारताच्या याच तांत्रिक प्रगतीमुळे ११ जून २०२३ ला भारतीय हवामान विभाग (India Meteorological Department) ने अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्याची चक्रीवादळाची निर्मिती झाल्याचं स्पष्ट केलं. १२ जून २०२३ उजाडत नाही तोच भारताच्या उपग्रहांच्या मिळालेल्या माहितीतून या चक्रीवादळाचं रूपांतर (Extremely severe cyclone) अत्यंत तीव्र चक्रीवादळात झाल्याचं स्पष्ट केलं. या तीव्र चक्रीवादळाचं नामकरण ‘चक्रीवादळ बिपरजॉय’ असं करण्यात आलं. बिपरजॉय हे नाव बांगलादेशने दिलेलं होतं. याचा बांगला भाषेत अर्थ होतो ‘आपत्ती’ (disaster). अत्यंत तीव्र चक्रीवादळात एखाद्या वादळाचा तेव्हाच समावेश होतो जेव्हा त्यातील वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग ताशी १६८ ते २२१ किलोमीटर / तास इतका प्रचंड वाढलेला असतो.

चक्रीवादळ बिपरजॉय भारताच्या पश्चिम किनारपट्टीला धडक देणार हे लक्षात आल्यावर तातडीने या वादळाच्या ताकदीचा अंदाज केंद्र आणि राज्य सरकारला देण्यात आला. महाराष्ट्र किंवा गुजरात या राज्यांना सगळ्यात जास्त धोका असल्याचं स्पष्ट झालेलं होतं. पण नक्की कुठे ते धडक देणार याबद्दल अंदाज बांधता येणं कठीण होतं. १३ जून आणि १४ जूनला त्याने घेतलेल्या वळणामुळे हे वादळ गुजरात मधील कच्छ, सौराष्ट्र भागात धडक देणार हे स्पष्ट झालं. त्यानंतर वेगाने सर्वच पातळीवर सरकारी आणि प्रायव्हेट यंत्रणांना सावध केलं गेलं. या चक्रीवादळाची तीव्रता लक्षात घेता यात प्रचंड प्रमाणात मनुष्य आणि वित्त हानी होण्याची  शक्यता होती. पण केंद्र सरकार ज्यात पंतप्रधानांपासून, रक्षा मंत्री, गृहमंत्री, पंतप्रधान कार्यालय आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी यांनी राज्य सरकारच्या सहकार्याने वेळीच नागरिकांना सतर्क केलंच, पण त्यापलीकडे एका मोठ्या बचाव मोहिमेला सुरवात केली.

ज्या भागात चक्रीवादळ बिपरजॉय धडकणार होतं तो भाग इंडस्ट्रिअल हब होता. जामनगर मधे जगातील सगळ्यात मोठी रिफायनरी कार्यरत आहे, तर इतर अनेक इंडस्ट्रिअल कंपन्या आणि तेल, वायू क्षेत्रातील ऑइल रीग्स इकडे कार्यरत होत्या. त्या सर्वांना वेळीच सावध करून त्या सर्वांचं काम थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. चक्रीवादळ बिपरजॉय साधारण १५ जून २०२३ च्या संध्याकाळी त्या भागात आदळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्याच्या दोन दिवस आधीच या सर्व कामांना बंद करण्यात आलं. ज्यातून होणारं नुकसान हे तब्बल ५०० कोटी प्रत्येक दिवसाला इतकं जास्त होतं. या शिवाय एकही मनुष्य हानी न होऊ देण्याचं लक्ष्य सर्व सरकारी यंत्रणांना देण्यात आलं होतं. भारतीय सेना, वायूदल, नौदल, तटरक्षक दल यांच्या सह एन.डी.आर. एफ. आणि एस. डी. आर. एफ. च्या सर्व टीम ना सज्ज राहण्याचे आदेश दिले गेले होते. अवघ्या २ दिवसात सुमारे १ लाख लोकांपेक्षा जास्त लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं.

चक्रीवादळ बिपर जॉयच्या येण्याने कोणत्याही नैसर्गिक स्थितीला सामोरं जाण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सर्व स्तरावर कार्यान्वित करण्यात आली. मग तो धुवाधार पाऊस असो वा वारा, पूर असो वा भूस्खलन. ६३१ मेडिकल टीम्स, ३०० पेक्षा अजस्ती ऍम्ब्युलन्स, ३८५० हॉस्पिटल बेड्स कोणत्याही जखमी व्यक्तींना उपचारांसाठी तयार ठेवण्यात आले. तब्बल ११४८ गरोदर महिलांना हॉस्पिटलमधे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दाखल करण्यात आलं. त्यातील ६८० जणींची प्रसूती झाली. याशिवाय सर्व स्तरावर अभूतपूर्व अशी उपाय योजना केली गेली. त्यामुळे अत्यंत तीव्र चक्रीवादळ बिपरजॉय ने गुजरातच्या किनारपट्टीला काल रात्री अंदाज लावल्याप्रमाणे धडक दिल्यावर सुद्धा आज हा लेख लिहिला जाईपर्यंत कोणतीही मनुष्य हानी झाल्याचं वृत्त नव्हतं. ( दोन जणांना आपल्या गुरांना वाचवताना मृत्यूला सामोरं झाल्याची घटना घडलेली आहे. पण त्याचा संदर्भ चक्रीवादळाशी आहे का हे स्पष्ट झालेलं नाही.)

भारत इसरो आणि इतर अवकाशीय यंत्रणांवर कोट्यवधी रुपये का खर्च करतो याचं उत्तर द्यायला काल दिलेली वादळाशी झुंज पुरेशी आहे. इसरोच्या आधुनिक उपग्रहांमुळे वातावरणात घडणाऱ्या अश्या घटनांचा योग्य वेळी अंदाज आल्यामुळे योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला अचूक अंदाज, केंद्र सरकार आणि राज्य सरकराची योग्य वेळेत टाकली गेलेली पावलं, अतिशय सुयोग्य नियोजन, भारताच्या तिन्ही दलांसोबत एन.डी.आर. एफ. आणि एस. डी. आर. एफ. आणि तटरक्षक दलाच्या लोकांनी लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहचवण्याची जबाबदारी, यामुळे भारताने अत्यंत तीव्र चक्रीवादळ बिपर जॉय ला मात दिली आहे. या वादळाशी एकदिलाने भारतीय होऊन झुंज देणाऱ्या त्या अनामिक लोकांना माझा कडक सॅल्यूट.

जय हिंद!!!

शब्दांकन : श्री विनीत वर्तक

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “आई आणि तिचा श्याम …” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? मनमंजुषेतून ?

☆ “आई आणि तिचा श्याम …” ☆ श्री संभाजी बबन गायके 

पक्ष्यांची, प्राण्यांची पिलं मोठी झाली की घरटं सोडतात आणि त्यांच्या जन्मदात्यांनाही ! पण मानवप्राण्याची पिलं जन्मत:च परावलंबी. त्यांना जन्मानंतर कित्येक वर्षे सांभाळावं लागतं,भरवावं लागतं तेंव्हा कुठं ती चालू लागतात. सुरूवातीची कित्येक वर्षे आयता चारा खात राहतात आणि कित्येक वर्षांनी स्वत:चा चारा स्वत: कमावू लागतात. पक्षी-प्राण्यांची आयुर्मर्यादा मानवापेक्षा बरीच कमी असते, पण मानव अनेक वर्षे जगतो आणि मुख्य म्हणजे जरजर्जर होतो. त्याला आयुष्याच्या सायंकाळी पुन्हा बालपण प्राप्त होतं. आणि या बालकांना पुन्हा आई-बाप हवे असतात! यासाठी मनुष्य मुलांनाच आपले उतारवयातील आईबाप म्हणून घडवत राहतो…..हरप्रकारची दिव्यं पार पाडून. म्हातारपणी चालताना जाणारा तोल सांभाळता यावा म्हणून माणूस आपल्या मुलांच्या रूपात काठीची योजना करून ठेवतो. त्यापेक्षा अंतसमयी मुखात गंगाजलाचे दोन थेंब तरी पडावेत यासाठी देवाकडे अपत्यांची याचना करीत असतात. ज्यांच्या पदरात ही फळं पडत नाहीत त्यांचे पदर सदोदित पेटते राहतात. निदान आपल्याकडे तरी असंच आहे आणि बहुदा भविष्यातही असेल !

मुलांना जन्माला घालून त्यांचे संगोपन, ती आपलेही आपल्या वृद्धापकाळी असेच संगोपन करतील या भावनेने करणे हा विचार वरवर जरी एक व्यवहार वाटत असला तरी या व्यवहाराला किमान आपल्याकडे तरी काळीजकिनार असते. काळीज आणि काळजी हे दोन शब्द उगाच सारखे वाटत नाहीत ! पोटाला चिमटा काढणे, खस्ता खाणे, काळीज तिळतीळ तुटणे, हे वाक्प्रचार मराठीत निव्वळ योगायोगाने नाहीत आलेले. अनेक काळजं अशी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी निखा-यांवर चालत आलेली आहेत. पण सर्वच काळजांना त्यांच्या उतारवयात पायांखाली वात्सल्याची, कृतज्ञतेची फुलवाट गवसत नाही, हे ही खरेच ! 

पुरूष असूनही आपल्या आईचं काळीज आपल्या उरात बाळगून असलेले साने गुरूजी म्हणजे मातृ-पुत्र प्रेमाचा जिवंत निर्झर ! शाम आणि आई ही दोन नाती किमान मराठी मानसात साने गुरूजींमुळेच चिरस्थापित झालीत. शाम या नावापासून ‘शामळू’ असं शेलकं विशेषण जन्माला आलं असलं तरी या शाममुळे कित्येक मातांच्या पुत्रांना जन्मदातापूजनाचं पुण्य प्राप्त करण्याची सदबुद्धी झाली, हे कसं नाकारता येईल? 

फादर फ्रान्सिस दिब्रिटो एकदा परदेश भेटीत असताना एका कुटुंबात मुक्कामी राहिले होते. मध्यरात्री त्यांना बालकाचा मोठ्याने रडण्याचा आवाज आला. त्या बालकाचे पालक आता त्या आवाजाने जागे होतील आणि त्याला शांत करतील ही त्यांची कल्पना होती. पण पंधरा मिनिटे उलटून गेली तरी काहीच हालचाल नाही असं पाहून त्यांनी त्या बाळाच्या खोलीत जाऊन त्या एकट्या झोपलेल्या बालकाला उचलून घेतलं, छातीशी धरलं….आणि मग ते बाल्य निद्रेच्या कुशीत शिरून शांत झालं ! सकाळी त्या बालकाच्या आईबापाशी संवादात असं समजलं की, त्यांच्याकडे पोरांनी स्वत:च रडायचं आणि स्वत:च आपली समजूत काढून झोपी जायचं ! या वृत्तीचे परिणाम विलायतेतील समाज भोगतो आहेच. आपल्याकडेही असे विलायती कमी नाहीत. आपल्या मुलांना “ श्यामची आई “ ही  साने गुरुजींची कथा सांगणे आजही अगत्याचे वाटते ते यासाठीच…कारण आजही हा विषय कालसुसंगत आहेच. 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गुरुपौर्णिमा… लेखिका :डॉ. युगंधरा रणदिवे ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆  गुरुपौर्णिमा… लेखिका :डॉ. युगंधरा रणदिवे ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

आज सोसायटीच्या हॉलमध्ये “गुरुपौर्णिमा”साजरी करायला लेडीज स्पेशल जमल्या होत्या.

साहजिकच देवांचे फोटो, समई, बॅनर—-सगळं तयार होतं.”गुरुब्रम्हां गुरू विष्णू”म्हणत सुरवात झाली.थोडीफार टिपिकल भाषणं झाली.

आज सगळ्यात जेष्ठ अशा गोखले काकू प्रमुख पाहुण्या म्हणून बोलणार होत्या.सगळ्या सो कॉल्ड मॉडर्न मुली,बायका जरा चुळबुळतच होत्या.

काकू उठल्या, म्हणाल्या, मी आज तुम्हाला माझ्या गुरुबद्दल सांगणार आहे.

माझं लग्न अगदी कांदेपोहे पद्धतीने झालं. कोकणातून इथे मुंबईत आले.माहेरी सर्व कामांची सवय होती,पण इथे चाळीत दोन खोल्यात आठ माणसं ,हे गणित काही पचनी पडत नव्हतं. टॉयलेट घरातच होतं ही जमेची बाजू.पहिल्या दिवसापासून सासूबाई कमी बोलून पण मला निरखून काही सूचना करायच्या.कोकणातला अघळपघळपणा इथे का चालणार नाही हे त्यांनी समजावून सांगितलं. नारळ घालून रसभाज्या करणारी मी,डब्यासाठी कोरडी भाजी करायला शिकले.कोणतेही व्रत वैकल्य त्यांनी लादले नाही.जे पटते,जे झेपते आणि खिशाला परवडते ते करावं असं त्यांचं स्पष्ट मत होतं.त्यांनीच बीएड करायला लावलं, शाळेत नोकरी घ्यायला लावली.बाईने स्वतःच्या पायावर उभे राहिलेच पाहिजे.

माझ्या मिस्टरांना त्या स्वतःच मागे लागून नाटक-सिनेमाची तिकिटं काढायला लावायच्या.त्या काळात पण आम्हाला क्वालिटी टाइम मिळावा हे त्या बघायच्या.

माझे दीर वेगळे झाले,आम्ही दोघे, आमची दोन मुले आणि सासूबाई असेच राहिलो.

चाळीची रिडेवलपमेंट होणार म्हंटल्यावर मीच धाय मोकलून रडले.पण त्या म्हणाल्या,”बदल हे होणारच,कशात गुंतून पडायचं नाही”

नऊवारीतून पाचवारीत आणि पुढे चक्क गाऊन मध्ये माझ्या सासूबाईंचं स्थित्यंतर झालं.केस सुध्दा स्वतःहून छोटे केले,मला त्रास नको म्हणून!

जातानाही प्रसन्नपणे गेल्या.नातसुनेला म्हणाल्या,”ही चांगली सासू होते की नाही,ती परीक्षा तू घे हो.”

परिस्थितीचं भान ठेवा,काटकसर करा पण सतत सर्वांची मनं मारून नाही,पैसे कमवा पण पाय जमिनीवर ठेवा, काळानुसार बदला, जे बदल पचणार नाहीत, त्याबद्दल मोकळेपणी बोला,transparancy महत्वाची.लोकांना हक्क दाखवत,धाक दाखवत बांधून ठेवू नका.प्रेमाने दुसऱ्यापर्यंत पूल बांधा, त्याने त्याच पुलावरून तुमच्याकडे यायचं का नाही हे त्याला ठरवू द्या.एकावेळी तुम्ही सर्वांना खुश नाही ठेवू शकत;पण म्हणून स्वतः खूश होणं विसरू नका.नियमांवर जास्त बोट ठेवलं की वर्मावर लागतं. आपल्या वागणुकीतून दुसऱ्याला आदर्श घालून द्या.पतंगाचा मांजा ढील दिल्यावरच पतंगाला उंच नेऊ शकतो.

नवीन पिढीला टोचून दूषणं देण्यापेक्षा नवीन शिकून घ्यावं. घरात भांडणं होणारच,पण”रात गई बात गई”. एक वेळचे जेवण तरी सर्वांनी एकत्र केले पाहिजे. बाहेरचं frustration, चिडचिड घरात बोलून शांत झाली पाहिजे.प्रत्येकाने आपला दिवस कसा गेला सांगितलं तरी खूप संवाद घडेल.

विश्वास,प्रेम घरात मिळालं तर बाहेरच्या चुकीच्या व्यक्तीकडून फसवणूक होणार नाही.

जेमतेम अक्षरओळख असणाऱ्या माझ्या सासूबाई टॉप कॉलेजातल्या MBA लाही लाजवतील अशा काटेकोर होत्या.त्या माझ्या गुरू,माझी मैत्रीण होत्या.

आज मुद्दाम हे सांगण्याचं कारण की गुरू म्हणजे कोणी फेमस व्यक्ती असायची गरज नसते.तिने सतत बरोबर राहून हात धरून चालवायचीही गरज नसते.ती आपल्या आजूबाजूच्या माणसांमधीलच एक असते.तिला सन्मान, फोटो, गिफ्ट याची अपेक्षा नसते.तिच्यातल्या चांगल्या गोष्टींचे अनुकरण झाले,पुढे नेले गेले की बास!

माझ्यातले चांगले माझ्या सुनेपर्यंत पोचवू शकले की माझ्या सासूबाईंना गुरुदक्षिणा मिळेल.

तुम्ही काही यातून घेतलं तर काही प्रमाणात आनंदाची शिंपडणी तुमच्याही घरात होईल

धन्यवाद!

एकमेकांच्या कागाळ्या करणाऱ्या, गॉसिप करत पराचा कावळा करणाऱ्या आणि खोटे फॉरवर्ड असल्याचे मुखवटे घालणाऱ्या आणि कुरघोडी करत राहणाऱ्या ,आम्हा सर्वांसाठी हे अंतर्मुख करणारं होतं, हे नक्की!

लेखिका :डॉ युगंधरा रणदिवे

प्रस्तुती : सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “दुपार चं गणित…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “दुपार चं गणित…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

काय राव… तुम्ही कमालच केली की… दुपारची झोप पार उडवली की… किती गोंधळ झाला सगळ्यांचा… नाही म्हटलं तरी काकासाहेब काही बोलले असतीलच नं… पण आता हे निस्तरणार कसं…

अहो मी कशाला निस्तरायचं… म्हणजे मी काही सगळ्यांना आणि  सगळं सोडलेलं नाही… आता मी नाही… असा समज काकांचा झाल्यावर सावरायचं कसं?… आणि मी पण आलोय याची जाणीव या दोघांना झाल्यावर आवरायचं कसं?… हा त्यांचा प्रश्न आहे. जे होईल ते त्यांनी निस्तरायचय आहे. मी नाही…. ते काय करतात हे बघायचं काम माझं…

पण आता जी आरडाओरड होईल त्याच काय?…

अरे आरडाओरड अगोदरही होती, आणि नंतरही होणार आहे. आरडाओरड सगळेच करतात. बऱ्याचदा तर संदर्भ सुध्दा तेच असतात. फक्त नांव बदलावी लागतात. अगोदर कौतुक केलं असेल तर आता करायचं नाही. आणि अगोदर कौतुक केलं नसेल तर आता करायला विसरायचं नाही. हे लक्षात घेतलं की संपलं. मी काही कमी आरडाओरड केली का?… चालायचंच.

अहो पण लोकं अगोदर तुमच्यासाठी फिरले, झटले त्याचं काय?….. असं काही जणं विचारतात. त्यांना काय सांगायचं?…

अरे मग मी काय वेगळं करतोय?… लोकं आमच्यासाठी झटतात, झगडतात पण आम्ही पण त्यांच्यासाठीच झगडतोय ना. विरोधात असलो तर चांगल्या कामासाठी झगडतो. आणि सत्तेत असलो तर चांगली कामं झगडल्याशिवाय होत नाहीत. अनेक अडथळे येतात, आणले जातात ते पार करावे लागतात. असंच सांगतो ना. मग फरक आहे कुठे?… झगडणं दोन्ही बाजूला आहेच की…

आणि तुमच्या झोपेचं ते काय कौतुक? आम्ही सकाळी सकाळी काही केलं तरी त्रास, दुपारी केलं तरीही त्रासच. आमच्या झोपेचा विचार करा की. यासाठी रात्र रात्र सुध्दा जागवाव्या लागतात याचा विचार करा जरा…

सारखं वेगवेगळ्या पद्धतीने गणित मांडावं लागतं. उत्तर थोडं कुठे चुकतंय असं वाटलं की परत नवीन पद्धत. बरं गणित मांडायचं पण आपणच आणि सोडवायचं पण आपणच… हे गणित बरोबर आहे का? असं कोणाला विचारावं हा सुद्धा काही वेळा प्रश्न असतो. कारण ज्याला विचारावं तोच यावरून स्वतः नवीन गणित मांडू शकतो. त्यामुळे समोरचा वेगळं गणित मांडणारा नसावा. हे पण बघावं लागतं. वाटतं तेवढं सोपं नसतं हे…

काकांच काय… “सगळ्या समस्यांवर रामबाण उपाय” हे त्यांनीच लिहिलेलं पुस्तक त्यांच्याकडे आहे. प्रश्न आहे तो दुसऱ्या दोघांचा. ते कोणतं पुस्तक वापरतात हे बघायचं…

दुसरे दोघं म्हणजे कोण?… अगोदरचे की आता नव्याने जवळ केलेले…

परत तेच… मला गणित घालू नका. मी सांगितलं ना की गणित मांडायचं पण आपण आणि सोडवायच सुध्दा आपणच… चला निघतो. पुढची काही गणितं मांडून सोडवायची आहेत.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “योगा म्हणजे काय ?…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ “योगा म्हणजे काय …” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

नुकताच योगा डे होऊन गेला म्हणे ?

पण खरंच योगा म्हणजे काय ?

थांब जरा मनाच्या गहनतळात शोधून बघतो.

योग: कर्मसु कौशलम्. 

योग म्हणजे कृतीमधलं कौशल्य. कोणत्याही कृतीमध्ये कौशल्य प्राप्त करून घेणं  म्हणजे योग. असं म्हणतात. 

म्हणजे पहिल्यांदा आपल्याला उच्चार कौशल्य जाणून घ्यायचं असेल तर योग्य उच्चार करायला शिकलं पाहिजे. म्हणजेच – योगा नव्हे योग.– परदेशी लोकांना शुद्ध उच्चार करता येत नाहीत म्हणून ते योग ला योगा म्हणतात तसे ते लोक सुद्धा त्यांच्या भाषेतील आपल्या उच्चारांना हसत असतीलच ना !   पण आपण तरी योगा न म्हणतात योग म्हणूया. 

तर मी म्हणत होतो – “ योग: कर्मसु कौशलम्. “

– म्हणजे कामामध्ये कौशल्य प्राप्त करून घेणे. तसे योगाचे अनेक प्रकार आहेत म्हणे.  पण विवेकानंदानी सांगितलेले राजयोग, ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तीयोग. हे चार प्रकार. आपण त्यातल्या कर्मयोगाचे पालन मुख्यतः करत असतो म्हणून पहिल्यांदा कर्मयोगाबद्दल मनात काही सापडते का बघूया. 

कर्मयोग म्हणजे ज्या गोष्टी व्यवहारासाठी आवश्यक, जगण्यासाठी आवश्यक आणि ज्या कराव्याच लागतात त्यांना आपण कर्मयोग म्हणूया. आपल्या प्रत्येक कृतीत कौशल्यपूर्ण पूर्णता आणणे यासाठी सतत प्रयत्नशील राहणे म्हणजे योगाभ्यास योग म्हणजे कौशल्यपूर्णता. आधुनिक भाषेत ‘टी क्यू एम’= टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. कॉर्पोरेट जगतात लाखो रुपये घेऊन शिकवतात ते बहुधा हेच असावे. ते शिकवताना कायझन,टी पी एम, हाउसकीपिंग वगैरे बरंच काही शिकवलं जातं.  हाउसकीपिंगचा जरी विचार केला तरी घरात वस्तू जिथल्या तिथं असणं, स्वच्छता आणि व्यवस्थितपणा हेच तर शिकवतात. त्याला 5S असंही म्हणतात.

एका ठिकाणी एक छान बोर्ड पाहिला— 

‘ कोणतीही वस्तू जिथल्या तिथं, जशीच्या तशी आणि जेव्हाची तेव्हा मिळणं म्हणजेच शिस्त ‘ ..   हे वाक्य तयार करणाऱ्याचं फार कौतुक करावं वाटतं.  यात हाउसकीपिंग, टीपीएम, कायझन, क्वालिटी मॅनेजमेंट सगळ्याचं सार या एका वाक्यात त्याने गुंफलं होतं.  वाक्य कुणाचं माहीत नाही, पण एका कंपनीत तो बोर्ड पाहिला.  हेच ते ‘कर्मसु कौशलम्’. मग ते कंपनीत असो, ऑफिसमध्ये असो, दुकानात किंवा घरात असो, शाळा-कॉलेजमध्ये असो— सगळीकडे हेच तत्व लागू पडतं.

चला तर मग आजपासून निदान एवढं तरी व्यवहारात, अमलात आणायचा प्रयत्न करूया. आपल्या घरात ऑफिसमध्ये, कंपनीत, सगळीकडे बोर्ड लावूया. पण प्रथम आपल्या मनात बोर्ड लावूया —- 

” कोणतीही वस्तू जिथल्या तिथं, जशीच्या तशी आणि जेव्हाची तेव्हा मिळणे म्हणजे शिस्त ! “

आज मनाच्या गहन तळात एवढंच सापडलं. बघू पुन्हा काय सापडतंय….  पुन्हा एखादी खोल बुडी मारू तेंव्हा उद्या परवा…..

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ स्त्री वैज्ञानिक- डॉक्टर कमलाबाई सोहोनी ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ स्त्री वैज्ञानिक- डॉक्टर कमलाबाई सोहोनी ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी 

इसवी सन १९३३. बंगलुरू (बंगलोर ) येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही शास्त्रीय संशोधनाला वाहून घेतलेली नावाजलेली संस्था. द्रष्टे उद्योगपती श्री यश यांनी १९११ साली स्थापन केलेल्या या संस्थेमध्ये फक्त निवडक विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असे.

इन्स्टिट्यूटच्या खूप मोठ्या आवारामध्ये घनदाट झाडीने वेढलेली दगडी इमारत शोभून दिसत होती. तिथल्या प्रशस्त ऑफिसमध्ये नोबेल पारितोषिक विजेते सर सी व्ही रामन हे  संस्थेचे डायरेक्टर राखाडी रंगाचा सूट टाय आणि डोक्याला फेटा बांधून रुबाबदारपणे बसले होते. चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचे तेज झळकत होते. नारायणराव भागवत  आपली लेक कमला हिला घेऊन सर रामन यांना भेटायला आले होते.  स्वतः नारायणराव व त्यांचे बंधू माधवराव हे दोघेही इथेच संशोधन करून एम. एससी झाले होते. संस्थेच्या स्थापनेपासून त्या दिवसापर्यंत एकही विद्यार्थ्यांनी तिथे आली नव्हती.

सर सी. व्ही. रामन यांनी स्पष्टपणे त्या दोघांना सांगितले की, ‘शास्त्रीय संशोधन हे स्त्रियांचे क्षेत्र नाही. म्हणून कमलाला प्रवेश नाकारण्यात आला आहे.’

लहानसर चणीची, नाजूक, गोरी, व्यवस्थित नऊवारी साडी  नेसलेली, केसांची घट्ट वेणी घातलेली कमला धीटपणे ,शांत पण ठाम  स्वरात म्हणाली,

‘सर, मी बॉम्बे युनिव्हर्सिटीमध्ये बी. एससी फर्स्ट क्लास फर्स्ट आले आहे. इथल्या प्रवेशाचा निकष पूर्ण केला आहे. मला पुढील शिक्षणाची संधी नाकारून तुम्ही माझ्यावर आणि माझ्यानंतर इथे शिकू इच्छिणाऱ्या इतर मुलींवर अन्याय करीत आहात. मी मुंबईला परत जाणार नाही. इथेच राहणार. तुमच्या दारापुढे सत्याग्रह करीन.’

सर रामन यांनी या मुलीतले वेगळेपण ओळखले. कमलाला इन्स्टिट्यूटमध्ये एक वर्षासाठी प्रोबेशनरी स्टुडन्ट म्हणून प्रवेश मिळाला. साधीसुधी दिसणारी ही मराठी मुलगी, श्रीनिवासय्या या तिच्या गुरूंनी घेतलेल्या अनेक कठोर परीक्षांमध्ये  उत्तम पद्धतीने उत्तीर्ण झाली. दिवसाकाठी १८ तास बौद्धिक व शारीरिक काम त्यांना करावे लागे. संध्याकाळचे दोन तास  कमलाबाईंना त्यांचे आवडते टेनिस खेळण्यासाठी मिळत.  पार्टनर म्हणून  त्या तिथल्या मदतनीसाबरोबरच खेळत असत .

नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांचे प्रबंध वाचून त्या टिपणे काढीत.  शंका निरसनासाठी त्या परदेशी  शास्त्रज्ञांना पत्र लिहून प्रश्न विचारत. एखाद्या मित्राला समजवावे अशा पद्धतीने या शास्त्रज्ञांनी त्यांचे शंकानिरसन केले.  कमलाच्या अभ्यासातली तळमळ त्यांना जाणवली होती. शंभराहून अधिक सायन्स रिसर्च पेपर्स कमलाबाई यांच्या नावावर आहेत.

कमलाबाईंचे कर्तृत्व पाहून सर रामन यांनी कमलाबाईंजवळ मोकळेपणाने कबूल केले की,’आता मी माझी चूक सुधारणार आहे. यापुढे इन्स्टिट्यूटचे दरवाजे लायक विद्यार्थीनींसाठी नेहमी खुले राहतील.’ शिवाय ते स्वतः कमलाबाईंबरोबर टेनिसचे दोन- चार सेट्स खेळू लागले.

पुढे केंब्रिजमध्ये अध्ययन करून कमलाबाईंनी पीएच. डी मिळविली. तिथेच राहून काम करण्याची संधी  नाकारून त्या भारतात परतल्या.

बंगलोरला असताना त्यांनी, ज्या बालकांना मातेचे स्तन्य मिळत नाही त्यांच्यासाठी गाढवीणीच्या दुधाचा विशिष्ट घटक विशिष्ट प्रमाणात मिळवून पोषणमूल्य असलेल्या  दुधाचा शोध लावला . कडधान्य व त्यातील प्रथिने यावर संशोधन केले. कुन्नूर येथे ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन’ मध्ये त्यांनी ब समूहातील जीवनसत्वावर काम केले. नीरा या नैसर्गिक रुचकर पेयातील तसेच ताडगूळातील पोषक घटक शोधला. १९६७ मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट संशोधनाचे राष्ट्रपती पदक मिळाले .महाराष्ट्र सरकारच्या आरे मिल्क डेअरी प्रकल्पासाठी त्यांनी एकही पैसा मानधन न घेता संपूर्ण मार्गदर्शन केले. दुधाची प्रत व गुरांचे आरोग्य सांभाळण्याचे मार्गदर्शन केले.

कमलाबाईंनी मुंबईला इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये जीव रसायनशास्त्र विभाग नव्याने उघडला तिथे १९४९ ते १९६९ अशी वीस वर्षे संशोधन व अध्यापन केले. एमएससी पीएच.डीच्या अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कमलाबाई व दुर्गाबाई या सख्या बहिणी. लहानपणीच मातृसुखाला पारख्या झालेल्या दोघींच्यातला जिव्हाळा मैत्रिणीसारखा होता. आणि बुद्धी तेजस्वी होती.

दिल्ली येथील ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’च्या सुवर्ण महोत्सवात त्यांचा सत्कार करून  मानपत्र व पारितोषिक देण्यात आले. सत्काराला उत्तर देताना,  ‘शास्त्रीय संशोधनाचा देशासाठी पूर्ण उपयोग करा. ते लोकांच्या व्यवहारात आणा’ असे त्यांनी तळमळीने सांगितले. नंतर तिथल्या चहापानापूर्वीच कमलाबाई अकस्मात कोसळल्या आणि तिथेच वयाच्या ८६ व्या वर्षी मृत्यू पावल्या . कमला नावाच्या ज्ञानदेवीला सरस्वतीच्या दरबारात भाग्याचे मरण आले.

भारतात कमलाबाईंमुळे शास्त्रीय संशोधन क्षेत्राचे दरवाजे स्त्रियांसाठी उघडले गेले. जगभर अनेक  स्त्रिया शास्त्रीय संशोधन क्षेत्रात महत्त्वाचे काम  करीत आहेत. परंतु या क्षेत्रात महिलांना कमी महत्त्व मिळते. त्यांनी सिद्ध केलेले स्थानसुद्धा त्यांना नाकारले जाते ही वस्तुस्थिती आहे.

१९३३ साली आपल्या बुद्धिमान लेकीच्या, शास्त्रीय संशोधन करण्याच्या इच्छाशक्तीला सक्रिय पाठिंबा देणारे, विश्वासाने तिला एकटीला  इन्स्टिट्यूटच्या पुरुषप्रधान संस्कृतीच्या हवाली करून रातोरात मुंबईला परतणारे नारायणराव भागवत, पिता म्हणून नक्कीच आदरास पात्र आहेत.

चित्र साभार विकिपीडिया 

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आकाशाशी जडले नाते..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ आकाशाशी जडले नाते..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

शब्दाची अंगभूत वैशिष्ट्येच त्या शब्दाला अर्थपूर्ण बनवतात. घन हा अगदी छोटा, अल्पाक्षरी शब्द याचं अतिशय समर्पक उदाहरण म्हणता येईल.

या शब्दाच्या एका रुढ अशा आणि अनेक प्रतिभासंपन्न कवींनी रसिकमनांत अधिकच दृढ केलेल्या एका अर्थाने  तर या शब्दाचे थेट आकाशाशीच अतूट नाते निर्माण निर्माण केलेले आहे आणि याच शब्दाच्या दुसऱ्या अर्थाने हे नाते अधिकच घट्ट झालेले आहे. घन या शब्दाचे हे दोन्ही अर्थ परस्परवेगळे असूनही परस्परपूरकही ठरलेले आहेत हेच या शब्दाचं अंगभूत असं वेगळं वैशिष्ट्य आहे.

          घन म्हणजे मेघ आणि घन म्हणजे घट्ट.म्हणजेच अप्रवाही.या दुसऱ्या अर्थाचं अप्रवाहीपण हे पहिल्या अर्थाच्या मेघाचं,ढगाचंही अंगभूत वैशिष्ट्य असावं हा निव्वळ योगायोग असेल तर तोही किती अर्थपूर्ण आहे याचे नवल वाटते!

           मेघ हा या शब्दाचा रसिकमनांत रुजलेला काव्यमय अर्थ थेट माणसाच्या जगण्याशी,सुखदु:खाशी जोडलेला आहे हे खरेच.तथापी ‘घट्ट’ या दुसऱ्या अर्थाची व्याप्ती आणि घनताही घन या शब्दाचे मोल अधिकच वृध्दिंगत करते असे मला वाटते.गंभीर शब्दातील गांभीर्य अधिक गडद करायला ‘घनगंभीर’ या शब्दाला ‘घन’च सहाय्यभूत ठरतो.घनघोर हा शब्द  युध्दाचे विशेषण म्हणून येतो आणि युध्दाची भयावहता अधिकच वाढवतो, तर जंगलाची व्याप्ती आणि नेमकं चित्र उभं करायला घनदाट शब्दाला पर्यायच नसतो. झांजा, टाळ,चिपळ्या, टिपऱ्या…. यासारख्या अनेक वाद्यांना सामावून घेणारा ‘घनवाद्य’ हा शब्दही फारसा प्रचारात नसला तरी आवर्जून दखल घ्यावी असाच.घन या शब्दाच्या सहाय्याने आकाराला आलेल्या अशा इतरही अनेक अर्थपूर्ण शब्दांनीच शब्दाशब्दांमधील परस्परसंबंध अधिकच दृढ केलेले आहेत एवढे खरे!

           घन या शब्दांचे वर उल्लेख केलेले मेघ आणि घट्ट हे दोन्ही अर्थ या शब्दाला एक वेगळंच रुप बहाल करतात.घन हा एकच शब्द ‘मेघ’ या अर्थाने नाम तर दुसऱ्या अर्थाने विशेषणाचे भरजरी वस्र परिधान केलेला असा बहुगुणी शब्द बनतो!

          घन हा शब्द नाम आणि विशेषण म्हणूनच नाही तर प्रत्यय म्हणूनही वापरला जातो.प्रत्यय म्हणून येताना तर तो स्वतःचं अनोखं वैशिष्ट्यही अधोरेखित करतो.प्रत्ययरुपात एखाद्या शब्दाच्या आधी जागा पटकावून घननीळ,घनदाट,घनघोर,अशा विविध विशेषणांना जन्म देणारा हा, प्रत्यय रुपात एखाद्या शब्दानंतर येत जेव्हा त्या शब्दाशी एकरुप होतो, तेव्हा आकाराला आलेली ‘आशयघन’,’दयाघन’ यासारखी विशेषणे त्या शब्दांमधील मूळ नामांचे (आशय,दया इ.)अर्थ अधिकच सघन करतात.

          घन हा असा विविध वैशिष्ट्यांनी अर्थपूर्ण ठरणारा शब्द म्हणूनच मराठी भाषेच्या विस्तृत,व्यापक आकाशाशी दृढ नाते जडलेला एक चमचमता ताराच आहे असे मला वाटते.

©️ अरविंद लिमये,सांगली

(९८२३७३८२८८)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी आई… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ माझी आई☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

आई !  तुझ्यावर काहीतरी लिहावं असे भाचीने सांगितल्यावर तुझ्याविषयी काय काय लिहू असा प्रश्न मनाला पडला ! कळायला लागल्यापासून तू डोळ्यासमोर येतेस ती अशीच कर्तृत्ववान, सतत कामात असणारी आणि स्वाभिमानाने जगणारी, कष्ट करणारी आई ! संसारासाठी सतत दादांच्या पगारात आपला तिखट मिठाचा आणि भाजीपाल्याचा खर्च निघावा म्हणून धडपड करणारी आई ! 

तिच्या लग्नानंतरच्या आयुष्याबद्दल सांगण्यापूर्वी तिचे लग्न कसे ठरले हे सांगणे मला महत्त्वाचे वाटते. कारण पेंडसे कुटुंब कराचीला राहत होते तर आईचं माहेर बेळगावला घाणेकरांच्याकडचे ! इतक्या लांबच्या ठिकाणी राहणारी ही दोन्ही कुटुंबे एकत्र कशी आली हा प्रश्न मला पडत असे. नंतर कळले की आमचे आजोबा शिकायला असताना घाणेकरांच्या घरी राहत होते. नंतर नोकरी निमित्ताने ते कराचीला गेले. व त्यांचा संसार तिथे सुरू झाला.. वडिलांच्या वयाच्या 22व्या वर्षी आजोबा काही कारणानिमित्ताने बेळगावला आले होते, त्यावेळी माझ्या आईचे पण लग्नाचे बघतच होते. त्यामुळे मोठ्यांच्यात बोलणी झाली आणि त्यांचे लग्न ठरवले गेले. आईने दादांना तर पाहिलेच नव्हते. पण त्याकाळी मोठ्यांनी लग्न ठरवले की मुलगा -मुलगी यांच्या पसंतीचा प्रश्न गौण ठरवला जाई. १९४५ साली लग्न झाल्यानंतर माझी आई बेळगावहून कराचीला आली.  त्याकाळी बेळगाव ते कराची या प्रवासाला एकूण पाच दिवस लागत ! माहेर सोडून आई एवढ्या लांब प्रथमच जात होती आणि तेही इतक्या दूरदेशी परक्या राज्यात ! त्या काळात आईने कसे निभावले असेल असे आता वाटते ! अचानकपणे लग्न ठरवण्याचा परिणाम तिच्या शिक्षणावर झाला. केवळ एका विषयात मार्क कमी मिळाल्यामुळे आई मॅट्रिकला फेल झाली. आजोबांना शिक्षणाचा प्रचंड ध्यास.. त्यांनी आईला पुन्हा बेळगावला पाठवले आणि मॅट्रिकचे वर्ष चांगल्या तऱ्हेने पूर्ण करून आई कराचीला परत आली ! पुढे फाळणीनंतर भारतात येऊन त्यांचा संसार खऱ्या अर्थाने सुरू झाला.

तिला शिवणकामाची आवड होती. त्यामुळे वडिलांनी तिला शिवणकामाचा कोर्स  करायला प्रोत्साहन दिले. त्यानंतर तिने शिवण शिवायला सुरुवात केली.  शिवणकामाचा वर्ग सुरू केला. विशेष करून ती फ्रॉक, स्कर्ट- ब्लाऊज, परकर यासारख्या लेडीज शिवणकामात पारंगत झाली. रत्नागिरीत ती रमली होती. पण मग ती. दादांची बदली प्रमोशन वर मराठवाड्यातील नांदेडजवळील खेड्यात झाली. ती. दादांच्या तब्येतीमुळे त्यांना एकटे राहणे अवघड होते. त्यांना खोकला, दम्याचा त्रास होता, तरीही ते सतत काम करत असत. त्या दरम्यान आम्ही तिन्ही मुले कॉलेज शिक्षण करत होतो. तेव्हा आईने मन घट्ट करून आम्हाला सांगलीला शिकायला ठेवले. पैशाच्या दृष्टीनेही सर्व अवघडच होते, पण मुलांचे शिक्षण करणे हे आई दादांचे ध्येय होते. 

नांदेडजवळ बेटमोगरा या लहान ठिकाणी वडिलांची सरकारी शाळेवर मुख्याध्यापक म्हणून बदली झाली होती. तेथील वातावरण वेगळेच होते. पण तिथे गेल्यावर आईने तेथील परिस्थितीशी जुळवून घेतले .पाणी लांबून आणावे लागत असे.त्यामुळे पाणी आणण्यासाठी पैसे देऊन माणूस ठेवावा लागत असे. मोजक्या पाण्यामध्ये सर्व कामे करावी लागत असत. आईने तिथे राहून तेथील बायकांशी ओळखी करून त्यांच्याकडून काही शिकून घेतले, तसेच त्यांनाही नवीन गोष्टी शिकवल्या. तेव्हा रेडिओ हाच विरंगुळा होता. रेडिओवरील कार्यक्रम ऐकणे, त्यावर प्रतिक्रिया पाठवणे,  वाचन करणे, शिवणकाम करणे आणि दादांच्या वेळा सांभाळणे यात तिचा दिवस जाई.

मी आणि माझा भाऊ तेव्हा सांगलीला होतो. दिवाळीच्या सुट्टीत आम्ही मराठवाड्यात गेलो की आमचे सगळे विश्वच बदलत असे. आई मला सुट्टीच्या पूर्वीच पत्र लिहून सांगत असे की, ‘काहीतरी भरत काम, विणकाम करायला घेऊन ये’. शाळेची लायब्ररी होती त्यामुळे वाचायला पुस्तकं मात्र भरपूर मिळत असत. सुट्टीत गेले की अधूनमधून आवड म्हणून स्वयंपाक करणे यात माझा वेळ जाई.आई-दादानाही खूप छान वाटत असे. सुट्टीचे दिवस संपत आले की आईची माझ्याबरोबर द्यायच्या पदार्थांची तयारी सुरू होई. नकळत ती थोडी अबोल होत असे आम्ही जाणार या कल्पनेने !

कालक्रमानुसार आम्हा तिघांची शिक्षणं झाली. आणि नंतर भावांच्या नोकऱ्या सुरू झाल्या. आईने स्वतःच्या हिमतीवर आमच्या लग्नाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. नुसती लग्न केली म्हणजे संपत नाही, त्यानंतर सणवार, बाळंतपण, नातवंडांबरोबर संवाद ठेवणे या सर्व गोष्टी ती जाणीवपूर्वक उत्साहाने आणि जबाबदारीने करीत होती. तीर्थरूप दादांचे तिला प्रोत्साहन असे. पण तब्येतीमुळे ते जास्त काही करू शकत नव्हते. आकुर्डी येथे भावाने घर बांधले आणि आईची ‘घरघर’ थांबवली. तिला आपल्याला घर नाही ही गोष्ट फार जाणवत असे. भावाच्या घराने -विश्वास च्या ‘पारंबी’ ने सर्वांनाच आधार दिला. तिथे तिचे स्वास्थ्यपूर्ण जीवन चालू झाले. गरजेनुसार ती आमच्याकडे येई. पण आकुर्डीला सरोज वहिनीची नोकरी व नातवंडे यामध्ये तिने राहण्याचे ठरवले. आकुर्डीत भजनी मंडळात तिचा सक्रिय सहभाग होता. भजन- भोजन यात तिचा वेळ छान जात असे.आकुर्डीच्या नातवंडांसाठी तिने इतके केले की मी तिला म्हणायची, “तुझी आणखी दोन मुले वाढवायची हौस राहिली बहुतेक !”

 ती. दादांच्या निधनानंतर ती आकुर्डीतच रमून राहिली. पुढे नातवंडांचे लग्न, बाळंतपण यात तिने जमेल तेवढी मदत केली. आज तीन मुले, सात नातवंडे आणि अकरा पंतवंडे असा तिचा वंश विस्तार आहे !

आताआतापर्यंत ती स्वयंपाकघरात भरपूर लुडबुड करत असे. आपलं वय झालंय हेच तिला पटत नाही. मला आता काही काम होत नाही असं म्हणत तिचं काम चालू असे. वयाच्या साठीच्या दरम्यान तिने उत्तर भारत, दक्षिण भारत या यात्रा केल्या. त्यानंतर नेपाळ ट्रिप करून आपण परदेश प्रवासही करू शकतो असा तिला कॉन्फिडन्स आला. वयाच्या ७३ व्या वर्षी तिने दुबई ,अमेरिका या ट्रिप केल्या. नायगारा फॉल्स, न्यूयॉर्क सगळे बघून ती खुश झाली. तिचा स्वभाव अतिशय उत्साही,! नवीन गोष्टी शिकण्याची, पाहण्याची आवड असल्यामुळे ती सतत कार्यरत असे. विणकाम हे तर तिचे फार आवडते ! सगळ्या नातवंडांना,पंतवंडांना  स्वतःच्या हाताने विणून स्वेटर, टोपी ती बनवत असे. रोजचे वर्तमानपत्र पूर्ण वाचायची. चांगल्या पुस्तकाचे वाचनही तिचे बरेच होते. टीव्ही जागरुकतेने बघत असे. तिला काळाबरोबर सर्व गोष्टी माहीत असत. तिचे डोळे अजून चांगले होते. जगण्याची उमेद होती. वयाच्या ९२ व्या वर्षापर्यंत ती चांगले आयुष्य जगली. आम्ही तर तिची शंभरी साजरी करू अशी  आशा करत होतो. परंतु ईश्वरी इच्छेपुढे  इलाज नसतो. तिला फारसा कोणताही  मोठा आजार नव्हता. तिचे खाणे पिणे अतिशय मोजके होते. त्यामुळे तिची तब्येतही ती राखून असे. आईच्या सहवासात चार दिवस राहावे या हेतूने मी आकुर्डीला गेले होते. भाऊ-वहिनींचाही मला राहण्यासाठी आग्रह होता. फारसे काहीही निमित्त न होता एके दिवशी

सकाळी माझ्याकडून तिने नाश्ता घेतला आणि गरम चहा पिण्यासाठी मागितला. तेच तिचे शेवटचे खाणे माझ्या हातून दिले गेले. दोन-तीन तासानंतर सहज म्हणून तिच्याजवळ गेले तेव्हा ती शांत झोपल्याप्रमाणे

दिसली, पण नुकताच तिचा देहांत झाला होता ! इतकं शांत मरण तिला आले ! आजही तिची आठवण आली की डोळे पाणावतात आणि आईची तीव्रतेने आठवण येते. ती उणीव भरून येत नाही 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “संतोषचं नेमकं काय चुकलं…” ☆ श्री संदीप काळे ☆

श्री संदीप काळे

? विविधा ?

☆ “संतोषचं नेमकं काय चुकलं…” ☆ श्री संदीप काळे ☆

पुण्यात माझ्या मित्राची, समीरची एक छोटी कंपनी आहे. परवा सकाळी मी समीरकडे जाऊन चहा घेत गप्पा मारत होतो, तेवढ्यात ऑफिसमध्ये काम करणारा मुलगा आला. तो समीरला सांगत होता, ‘‘आजही तो मुलगा परत आला आहे. तो म्हणतोय, मला काहीतरी काम द्या.’’

समीर हळू आवाजात म्हणाला, ‘‘त्या मुलाला प्यायला पाणी द्या, चहा पाजा आणि सांगा, जेव्हा आमच्याकडे काम असेल, तेव्हा तुला कळवू.’’

मी काचेमधून बघत होतो. एक पंचविशीमधला तरुण हाताने घाम पुसत होता. समीरला मी विचारलं, ‘‘कोण आहे हा मुलगा?’’

समीर म्हणाला, ‘‘सहा महिन्यांपासून नेहमी येतो आणि मला काम द्या, असं म्हणतो.’’

मी म्हणालो, ‘‘हल्ली बेरोजगारी खूप वाढली आहे. बिचारा शिक्षण नसल्यामुळे कदाचित असं म्हणत दारोदारी फिरत असेल.’’

समीर म्हणाला, ‘‘तसं नाहीये, तो उच्चशिक्षित आहे, तीन डिग्री आहेत त्याच्याकडे. गेल्या चार वर्षांपासून पुण्यामध्ये तो स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय. आता त्याच्या सहनशीलतेचा अंत झालाय. स्पर्धा परीक्षांचा नाद त्याने सोडून दिलाय. दोन वेळच्या खायची व्यवस्था व्हावी, असं त्याला वाटतंय. म्हणून तो कामाच्या शोधात आहे.”

समीरने सांगितलेलं ऐकून मला फार वाईट वाटलं. मी फोन आल्याचं निमित्त करून तिथून बाहेर पडलो व पाणी पीत असलेल्या त्या मुलापाशी येऊन बसलो. त्याची विचारपूस केली, चौकशी केली. त्याच्याशी बोलण्यातून अनेक विषय पुढे आले. मी ज्या मुलाशी बोलत होतो त्याचं नाव संतोष जाधव.

संतोष हा वाशीमचा. डिग्री मिळवल्यावर मित्राच्या सोबतीने स्पर्धा परीक्षेसाठी पुण्यात आला. केवळ एवढ्यावरच थांबला नाही, तर आपल्या आसपास असणारी अनेक मुलं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुण्यात घेऊन आला. संतोषला एकच आवड होती, स्पर्धा परीक्षेतून मोठं नाव असणाऱ्या व्यक्तीचं मोटिव्हेशन असणारे व्हिडीओ पाहत बसायचं. त्या व्हिडीओच्या मोहातूनच आपणही लाल दिव्याच्या गाडीत बसावं, असं स्वप्न संतोषचं होतं.

एक बहीण होती, त्या बहिणीला घेऊन संतोषने आपलं पूर्ण बिऱ्हाड पुण्याला थाटलं. बहीणही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू लागली. एका वर्षानंतरच बहिणीने निर्णय घेतला की, आता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा नाही, कुठंतरी नोकरी करून आयुष्याला सुरुवात करायची.

एका खासगी शिकवणीमध्ये बहीण शिकवायला लागली. दोन वर्षांनंतर तिने संतोषच्या मित्रासोबतच लग्न केलं. तो मित्रही स्पर्धा परीक्षेची तयारी करायचा; पण आता पुण्यातच एका किराणा दुकानामध्ये काम करतो.

समीरही बाहेर येऊन आमच्या गप्पांमध्ये सहभागी झाला. समीर संतोषला म्हणाला, ‘‘आज जरा गडबड आहे, तू उद्या ये आणि आपण सगळं ठरवून टाकू.’’ समीर त्याच्या कामाला लागला. मी माझ्या कामाच्या दिशेने निघालो. संतोषचा काळजीने व्यापलेला चेहरा माझ्या डोळ्यांसमोरून जात नव्हता.

माझ्या ड्रायव्हरने गाडी काढली. आम्ही रस्त्याने निघालो. थोडं पुढे गेलो. संतोष रस्त्याच्या कडेने जात होता. त्याच्या अंगावरला जर्जर झालेला शर्ट पाहून मला तो लगेचंच

ओळखता आला. मी त्याला आवाज दिला, ‘‘अरे, कुठं निघालास?’’

तो म्हणाला, ‘‘बुधवार पेठेमध्ये बहीण राहते, तिच्याकडे निघालो.’’

मी म्हणालो, ‘‘चल, मीही त्याच भागात चाललोय, तुला सोडतो.’’ गाडीमध्ये परत आमच्या गप्पा सुरू झाल्या. शनिवारवाड्याजवळची रहदारी एकदम कंटाळवाणी, तिथं आम्ही थोडा वेळ अडकलो. माझं ‘सकाळ’चं कार्यालय आलं.

संतोष खाली उतरून निघणार, इतक्यात मी त्याचा हात धरला आणि त्याला म्हणालो, ‘‘चल, आपण दोन घास काहीतरी खाऊ या.’’ आमच्या ‘सकाळ’च्या ऑफिसमधल्या कॅन्टीनमध्ये जेवताना आमच्या अजून गप्पा सुरू होत्या.

संतोष म्हणाला, ‘‘लहानपणी कळायला लागलं, तेव्हा आजारामध्ये आई गेली. आई दहा दिवस तापाने फणफणत होती; पण एक गोळी आणायला बापाकडे पैसे नव्हते. आई गेल्यावर आयुष्याचा बराचसा काळ माझ्या लहान बहिणीचा सांभाळ करण्यासाठी गेला. बाबा वारल्यावर गावाकडे जे जे होतं, ते वडिलांचं कर्ज फेडण्यात संपलं. गावाला अखेरचा रामराम ठोकला.’’

घरचा विषय काढता काढता आम्ही स्पर्धा परीक्षा या विषयावर येऊन थांबलो. स्पर्धा परीक्षेबाबत संतोषने मला जे काही सांगितलं, ते अतिशय धक्कादायक होतं.
मराठवाडा आणि विदर्भातून रोज कित्येक मुलं पुण्यात येतात आणि स्वतःच्या आयुष्याला साखळदंड घालून घेतात. स्पर्धा परीक्षांमध्ये तयारी करणाऱ्या त्या मुलांच्या समस्यांनी मोठा कळस गाठल्याचं मला पाहायला मिळालं.

मी आणि संतोष तिथल्या अनेक पेठांमध्ये गेलो. तिथं अनेक मुलांना भेटलो. प्रत्येक मुलाचं म्हणणं एकच होतं, ‘माझ्या हाताला काम मिळेल का? आता बस झालं, नको स्पर्धा परीक्षा.’

मी स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होईन, या विचारानं संतोषसारख्या हजारो जणांनी आपलं गाव सोडलं खरं; पण अधिकारी होणं सोडा, साधी गाडी पुसण्याचीही नोकरी द्यायला कोणी तयार नव्हतं.

संतोषचा मित्र सिद्धार्थ कांबळे, राजन गायकवाड, समीर धायगुडे या सगळ्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये अपयशी झालेली मुलं व्यसनाच्या आहारी कशी गेलेली आहेत, हे सांगितलं. किती मुलं वाममार्गाला लागलेली आहेत, याचे अनेक किस्से सांगितले.

आम्ही सगळे जण पेठेमधल्या संतोषच्या दहा बाय दहाच्या रूमवर बसलो होतो. ती रूम कसली, जनावराचा खुराडा जसा असतो ना, तसं होतं ते. त्या भिंतीमध्ये हात घातला, तर पलीकडे हात निघेल, अशा त्या घराच्या भिंती होत्या. एवढ्या छोट्या जागेत पाच जण कसं काय राहत असतील देवाला माहीत!

आमच्या आवाजाचा गलबला ऐकून खाली असलेला घराचा मालक वर आला. संतोषला म्हणाला, ‘‘दोन दिवसांत जर तू रूमचं भाडं दिलं नाहीस, तर तुझ्या शर्टला धरून बाहेर काढीन, तुझं सामान रस्त्यावर फेकून देईन.’’

संतोष बिचारा शांतपणे ते ऐकून घेत होता. संतोष मला म्हणाला, ‘‘गेल्या सहा महिन्यांपासून ताईने पैसे देणं बंद केलं. मला पैसे देण्यावरून तिचं आणि तिच्या नवऱ्याचं भांडण व्हायचं. हे मला जेव्हा कळालं, तेव्हा मी तिच्याकडे पैसे मागणं, तिच्याकडे फारसं जाणं सोडून दिलं.’’

मी म्हणालो, ‘‘अरे पण रोजचे खर्च भागवायचे कसे?’’

संतोष म्हणाला, ‘‘काही नाही, आता मी आणि माझे हे दोन मित्र सकाळी दोन-तीन सोसायट्यांमध्ये जाऊन लोकांच्या गाड्या धुतो. त्यातून जे पैसे मिळतात, त्या पैशांमध्ये आता एक-एक दिवस काढतोय.’’

संतोषच्या नजरेतून मी जेव्हा स्पर्धा परीक्षेचा सुरू असलेला बाजार पाहिला, तेव्हा मी आश्चर्यचकित झालो. किती भयानक ते चित्र होतं.

अनेक मुलांना भेटत असताना नांदेडचे प्रोफेसर समीर जाधव भेटले. जाधव आता सेवानिवृत्तीनंतर पूर्णवेळ एका क्लासेसमध्ये शिकवणीचं काम करतात. मी त्यांना म्हणालो,

‘‘हा बाजार दिवसेंदिवस अजून वाढतोय, गंभीर होतोय, त्याला जबाबदार कोण आहे?’’

जाधव म्हणाले, ‘‘पालक आणि विद्यार्थी दोघेही आहेत.’’

मी म्हणालो, ‘‘कसं काय?’’

ते म्हणाले, ‘‘पालकांनी त्यांच्या फारशी समज नसणाऱ्या मुलांना समजावून सांगायला पाहिजे. जर विद्यार्थ्याला सुरुवातीपासून ६० आणि ७० टक्केच्या आतमध्ये मार्क असतील, तर त्याने स्पर्धा परीक्षांकडे न गेलेलं बरं. पालकही मुलांना स्पर्धा परीक्षेचा आग्रह धरतात. तुम्हाला सेवाच करायची, तुम्हाला कामच करायचं, तर कुठलंही काम आनंदाने करा ना! सन्मानाने जगण्यासाठी पैसा लागतो किती? जिथं तुमचं कधीही समाधान होत नाही, तिथं जायचा विचार का करायचा?’’

जाधव सर जे बोलत होते, ते अगदी खरं होतं. जाधव सर म्हणाले, ‘‘संतोषचं आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या त्या हजारो मुलांचं काम सगळीकडे शेतात एकच पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसारखं झालं आहे. पीक येतच नाही. आलं तरी सगळीकडे एकच पीक असल्यामुळे कवडीचा भाव असतो. मुलांना आणि त्यांच्या पालकांना हे पटलं तर नवलच.”

पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेत अपयशी ठरलेल्या मुली वाममार्गाला कशा लागतात, याची अनेक उदाहरणं संतोष आणि त्यांचे मित्र मला देत होते. ते सगळं ऐकून माझ्या अंगावर काटा येत होता. संतोषचा मित्र सिद्धार्थ याला मी म्हणालो, ‘‘ज्या दिवशी तुमच्याकडे पैसे नसतात, त्या दिवशी तुम्ही जेवण कसं करता?’’

सिद्धार्थ म्हणाला, ‘‘पुण्यामध्ये काही ठरलेली ठिकाणं आहेत, तिथं अनेक मुलं जेवण्यासाठी जात असतात. अनेक मंदिरांच्या समोर प्रसाद म्हणून अन्नदान होतं, तिथं आम्ही जातो. पोटाची भूक इतकी भयंकर आहे की, लाज नावाचा प्रकार काही केल्या शिल्लकच राहत नाही. गावाकडे काम करायला मन तयार होईना.”

संतोषचं काय चुकलं आणि संतोषसारख्या हजारो मुलांचं रोज काय चुकतंय, याकडे आता सगळ्यांनीच डोळसपणे पाहण्याची वेळ आली होती. अवघ्या राज्यातली तरुणाई पुण्यात येत आहे. पुण्यामध्ये या सगळ्यांच्या स्वप्नांना सोनेरी झालर मिळते, असं अजिबात नाही. किंबहुना नव्वद टक्केपेक्षा अधिक जणांच्या वाट्याला अपयश येतं. हे अपयश का येतं, याचा शोध जर वेळीच घेतला नाही, तर मोठा अनर्थ घडणार आहे, हे मात्र नक्की..!

(आजचा हा लघुलेख स्वतः लेखक श्री. संदीप काळे, संपादक, मुंबई सकाळ, यांच्या सौजन्याने.)

© श्री संदीप काळे

९८९००९८८६८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print