मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #155 ☆ संत रामदास… ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 155 ☆ संत रामदास… ☆ श्री सुजित कदम 

नारायण ठोसर हे

समर्थांचे मुळ नाव

राम आणि हनुमान

अंतरीचा घेती ठाव…! १

 

बालपणी ध्यानमग्न

अष्टमित्र सहवास

ज्ञान संपादन कार्य

विश्व कल्याणाचा ध्यास..! २

 

गाव टाकळी नासिक

जपतप अंगीकार

तपश्चर्या रामनाम

दासभक्ती आविष्कार…! ३

 

केली दीर्घ तपश्चर्या

पंचवटी तीर्थ क्षेत्री

रामदास नावं नवे

प्रबोधक तीर्थ यात्री….! ४

 

एकाग्रता वाढवीत

केली मंत्र उपासना

तेरा अक्षरांचा मंत्र

राम नामाची साधना…! ५

 

रघुवीर जयघोष

रामदासी दरबार

दासबोध आत्माराम

मनोबोध ग्रंथकार…! ६

 

दैनंदिन तपश्चर्या

नाम जप तेरा कोटी

रामदासी कार्य वसा

ध्यान धारणा ती मोठी…! ७

 

श्लोक मनाचे लिहिले

आंतरीक प्रेरणेने

दिले सौख्य समाधान

गणेशाच्या आरतीने…! ८

 

श्लोक अभंग भुपाळ्या

केला संगीत अभ्यास

रागदारी ताल लय

सुरमयी शब्द श्वास….! ९

 

रामदासी रामायण

ओव्या समासांची गाथा

ग्रंथ कर्तृत्व अफाट

रामनामी लीन माथा…! १०

 

प्रासंगिक निराशा नी

उद्वेगाचे प्रतिबिंब

वेदशास्त्र वेदांताचे

रामदास रविटिंब….! ११

 

दिली करुणाष्टकाने

आर्त भक्ती आराधना

सामाजिक सलोख्याची

रामभक्ती संकल्पना…! १२

 

शिवराय समर्थांची

वैचारिक देवघेव

साधुसंत उपदेश

आशीर्वादी दिव्य ठेव…! १३

 

पुन्हा बांधली मंदिरे

यवनांनी फोडलेली

देवी देवता स्थापना

सांप्रदायी जोडलेली…! १४

 

वैराग्याचा उपासक

दासबोध नाही भक्ती

दिली अखिल विश्वाला

व्यवहार्य ग्रंथ शक्ती….! १५

 

आत्य साक्षात्कारी‌ संत

केले भारत भ्रमण

रामदास पादुकांचे

गावोगावी संक्रमण…! १६

 

दासबोध ग्रंथामध्ये

गुरू शिष्यांचा संवाद

हिमालयी एकांतात

राम रूप घाली साद…! १७

 

राम मंदिर स्थापना

गावोगावी भारतात

भक्ती शक्ती संघटन

मठ स्थापना जनात….! १८

 

दिले चैतन्य विश्वाला

हनुमान मंदिराने

सिद्ध अकरा मारुती

युवा शक्ती सामर्थ्याने…! १९

 

नाना ग्रंथ संकीर्तन

केले आरत्या लेखन

देवी देवतांचे स्तोत्र

पुजार्चना संकलन…! २०

 

स्फुट अभंग लेखन

श्लोक मनाचे प्रसिद्ध

वृत्त भुंजंग प्रयात

प्रबोधन कटिबद्ध….! २१

 

केले विपुल लेखन

ओवी छंद अभंगांत

कीर्तनाचा अधिकार

दिला महिला  वर्गात….! २२

 

धर्म संस्थापन कार्य

कृष्णातीरी चाफळात

पद्मासनी ब्रम्हालीन

समाधिस्थ रामदास…! २३

 

गड सज्जन गातसे

रामदासी जयघोष

जय जय रघुवीर

दुर पळे राग रोष…! २४

 

माघ कृष्ण नवमीला

दास नवमी  उत्सव

रामदास पुण्यतिथी

भक्ती शक्ती महोत्सव…! २५

 

©  सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मराठी थाळी— ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ मराठी थाळी— ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

अशी थाळी – Rice plate बहुतेक फक्त मराठीतच असावी — आवडीने जेवा. 

बोलाचा भात, 

बोलाची कढी, 

चापट पोळी, 

अक्षतांच्या वाटाण्याची उसळ 

पुराणातील भरले वांगे

मनातले मांडे

खुशीतल्या गाजराची कोशिंबीर

बिरबलकी खिचडी

ऊत आणलेली शिळी कढी

नावडतीचं अळणी मीठ

धम्मक लाडू

तिळपापड 

नाकाला झोंबणारी मिरची 

नाकाने सोललेले कांदे 

भ्रमाच्या भोपळ्याचं भरीत

भेंडी गवार मसाला

लपवलेल्या भांड्यातलं ताक 

ताकास लावलेली तूर

हातावर दिलेली तुरी

पाठीवरच्या धिरड्याने केलेला पचकावडा 

आंबट द्राक्षे न खाणारा कोल्हा आणि त्याला राजी असलेली काकडी

चिमणीच्या दाताने तोडलेल्या गोळ्या

वाजणारी गाजराची पुंगी

 

सर्वात शेवटी गोड/उर्दू पदार्थ म्हणून 

खयाली पुलाव

इज्जतचा फालुदा

 

आणि मुखशुद्धीला 

पैजेचा विडा !

 

असे जेवण झाल्यावर पाहुण्याला भरल्यापोटी नारळ देण्याची प्रथा आहेच !!

संग्राहिका :  स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – चिमुकला बाळ – ☆ सौ. जयश्री अनिल पाटील ☆

सौ. जयश्री अनिल पाटील

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ? – चिमुकला बाळ – ? ☆ सौ. जयश्री अनिल पाटील 

बाळ थकून झोपला

नाही कशाचेच भान

पोटासाठी धडपड

करी असून लहान

चिमुकला जीव त्याचा

जाई दमून भागून

खस्ता सतत खाऊन

गेला अलगद झोपून

शुभ्र फुलांचे गजरे

माळा विकता विकता

हतबल होई कधी

रोज सतावते चिंता

कष्ट करता करता

जीव येई मेटाकुटी

रस्त्यावर मग त्याची

पडे कधी वळकटी

चित्र साभार – सौ. जयश्री पाटील

© सौ. अनिल  जयश्री पाटील

विजयनगर.सांगली.

मो.नं.:-8275592044

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आधुनिक ओव्या–☆ सुश्री गायत्री हेर्लेकर

सुश्री गायत्री हेर्लेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ आधुनिक ओव्या– ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर ☆

अरे  न्याहारी ,न्याहारी —

ठेवा पॅन गॅसवरी–

भाजी,लोणी ,चटणी–

पसरा ग—डोश्यावरी  ||१||

 

सुंदर माझा मिक्सर ग–

शोभतो– ओट्यावर,

पीठ रुबते भराभर–

वडा ईडली वरचे वर  ||२||

 

लाडका ग माझा फ्रीज,–

जसा राधेचा ग कान्हा,

ग्रेव्ही करुन एकदा,–

करते भाजी पुन्हा पुन्हा ||३||

 

ओव्हनची ग माझ्या–

कथा आहे न्यारी न्यारी,

त्याच्या कुशीत फुलते —

बिस्किट केकवरची चेरी ||४||

 

चैत्री सजली चैत्रगौरी–

श्रावणात मंगळागौरी,

आता करु पुरणपोळी —

 गणराया संगे आली गौरी ||५||

 

स्क्रीनपुढे सदा असतो–

लाडका ग बाळ माझा,

खायला न दुजे मागे–

देता मॅगी ,बर्गर, पिझा ||६||

 

लेक माझी ग लाडकी —

शिकाया दुरदेशी,

डोळा  का ग येते पाणी–

विडीयो कॉल रात्रंदिशी ||७||

 

माझ्या ग अंगणी—

ऊभी स्कुटर देखणी,

फिरते मी तिच्या संगे–

सखी माझी ग साजणी ||८||

 

हॉल सजला सजला–

टी,व्ही. मोठा भिंतीवर,

मालिकेतली भांडणे —

मौने पाहे घरदार ||९||

 

मन कंटाळे कंटाळे–

विसरले राम नाम,

हाती असता मोबाईल–

कसे करु कामधाम ?||१०||

 

मागे गेले नऊवार–

नको झाले सहावार,

नानाविध कुडत्यांसंगे–

पुरते एक सलवार ||११||

 

फ्लॅटमघला ग फ्लॅट–

हव्या बेडरुम तीन,

फुलवेन टेरेसवर —

जाईजुई ग मी छान ||१२||

 

© सुश्री गायत्री हेर्लेकर

201, अवनीश अपार्टमेंट, कोथरुड, पुणे.

दुरध्वनी – 9403862565

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 176 ☆ अस्तित्व… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 176 ?

💥 अस्तित्व… 💥 सुश्री प्रभा सोनवणे ☆

तू नसताना उदासवाणे घर दिसते हे

अंगण, गोठा, परसबागही सुनेसुनेसे

पुन्हा परतशी वाटे आता तत्परतेने

आपोआपच दिवे लागती त्या  येण्याने

 असणे होते खूप तुझे बाई मोलाचे   

तू असताना कळले नाही महत्व त्याचे

तू गेल्यावर शांत जाहला गोठा सारा

घालत नाही कुणीच आता ओला चारा

गाई गो-ही फरार झाली  गोठ्यामधली

रांगोळीही कुणी रेखिना रंगभारली

तू गेल्यावर झाले आहे सारे खोटे

मंतरलेली होती आई, तुझीच बोटे

© प्रभा सोनवणे

१६ मार्च २०२३

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्राणायाम… ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? कवितेचा उत्सव ?

☆ प्राणायाम… ☆ श्री सुहास सोहोनी ☆ 

श्वास हिणवतो निश्वासाला

कनिष्ठ तू, मी श्रेष्ठ,

जीवनदायी, सत्वशील मी

प्रदूषीत तू भ्रष्ट — ॥

 

सात्विक, तेजस रुपडे माझे

शुद्ध नि जीवनदायी

श्वास खिजवितो निश्वासाला

तू तर धोकादायी —॥

 

प्राणवायु आधार जिवांचा

माझ्यातुन वाहतो

कर्ब विखारी दूषित तूझा

जीवांना संपवितो — ॥

 

श्वासाचे  वक्तव्य ऐकुनी

झाला अवमानित

जळफळतो निश्वास, करोनी

मुद्रा क्रोधीत — ॥

 

रागाने मग निश्वासाने

चढवुनिया आवाज

दिधले प्रत्युत्तर श्वासाला

चढला तुजला माज — ॥

 

जाइन ना बाहेर यापुढे

निश्चय करतो पक्का

दार बंद तूज, तुला न आता

आत यावया मोका — ॥

 

श्वास तसे निश्वास जाहले

ठप्प जेथल्या तेथे

शरिर तळमळे, प्राण विव्हळे

जीव घुटमळे जेथे — ॥

 

एकच मग कल्लोळ उडाला

विश्वी, तीन्ही लोकी

सूर्य चंद्र अन् इंद्रहि स्वर्गी

भीतीने कांपती — ॥

 

कलह मिटविण्या अवतरला मग

ब्रह्मदेव साक्षात

नाण्याच्या दो बाजू तुम्ही

भांडत बसलात — ॥

 

लहान मोठे बंधू तुम्ही

छापा कांटा जसे

तुमच्या मधील नाणे तुमचा

मधला भाऊ असे — ॥

 

जाणे-येणे, येणे-जाणे

काही क्षण मध्येच थांबणे

कर्तव्यासी करा साधुनी

अखंड आवर्तने — ॥

 

प्राणवायु तू घेउन येसी

नाम तुझे पूरक

कोंडुन धरिसी श्वास रोखुनी

नाम तुझे कुंभक

सर्व अशुद्धे फेकुन देसी

नाम तुझे रेचक

तुमच्या एकोप्याच्या मधुनी

जन्मतील ‘साधक’ — ॥

 

पूरक कुंभक रेचक यांचे

कथिले रामायण

रोज करावी क्रिया अशी जिस

म्हणती ‘प्राणायाम’ — ॥

© सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #182 ☆ चेहरा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 182 ?

☆ चेहरा…  ☆

कधी शब्द तर कधी चेहरा खोटा निघतो

असा चेहरा जरी बोलका उघडा पडतो

 

लहान मासा सुटून जातो अडकत नाही

अशाच वेळी विशाल मासा अलगद फसतो

 

जरी गव्हाचा घरात नाही माझ्या कोंडा

तरी चुलीवर मनात मांडे कायम करतो

 

कठीण होते कठीण आहे जीवन कायम

गरीब आहे भुकेस घेउन वनवन फिरतो

 

कधी न वर्षा प्रसन्न झाली माझ्यावरती

उन्हात आहे जरी उभा मी तरिही भिजतो

 

नभात तारे मनी शहारे गोंडसवाणे

अशा क्षणांना मिठीत घेण्यासाठी जगतो

 

गुलाब, चाफा असो नसो त्या डोईवरती

सुवर्ण चाफा मनात माझ्या रोजच फुलतो

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ऐन थंडीत… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? कवितेचा उत्सव ?

☆ ऐन थंडीत… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

या आश्वस्त वृक्षांनीच

विश्वासघात केला आमचा

ऐन थंडीत.

आसरा अव्हेरणं

त्यांना अशक्य झालं,

तेव्हा त्यांनी

विटा काढून घेतल्या

आपल्या घराच्या भिंतींच्या

आता उघडे पडलेले आम्ही

वाट बघतोय

पिसे झडण्याची

किंवा

कुणा शिका-याच्या

मर्मभेदी बाणाची

……………….

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 124 ☆ प्रश्न बहु, गांभीर्याचा… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 124 ? 

प्रश्न बहु, गांभीर्याचा

(स्त्रीच्या मनाची वेदना..)

स्त्रीच्या मनाची वेदना

मौन्य असते ललना

कशा मांडाव्या वेदना

शब्द तिज सापडेना.!!

 

स्त्रीच्या मनाची वेदना

प्रश्न बहु, गांभीर्याचा

जरी आहे महत्वाचा

कुणी बरे मांडायचा.!!

 

स्त्रीच्या मनाची वेदना

हर्ष तिज नसे कधी

पूर्ण आयु, कष्टी दुःखी

साहे तिची, तिचं व्याधी.!!

 

स्त्रीच्या मनाची वेदना

सल सलत राहते

वर अंगरखा छान

आत जखम असते.!!

 

स्त्रीच्या मनाची वेदना

प्रेम तिजला मिळावे

पोट मारून जगते

स्नेह भाष्य असावे.!!

 

स्त्रीच्या मनाची वेदना

राज माझे उक्त केले

शब्द प्रपंच उद्योग

ऐसे हे, लिखाण झाले.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चांगदेव पासष्ठी – भाग-1 …  ☆भावानुवाद-  सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ चांगदेव पासष्ठी – भाग-1…  ☆भावानुवाद-  सुश्री शोभना आगाशे ☆

(संत श्री ज्ञानदेव महाराजांनी योगीराज चांगदेवांच्या कोर्‍या पत्राला दिलेलं उत्तर म्हणजे चांगदेव पासष्टी. संत ज्ञानदेवांच्या काळचं प्राकृत म्हणजेच मराठी आजच्या संदर्भात, सर्वसामान्य लोकांना कळायला अवघड आहे. म्हणून सुश्री शोभना आगाशे यांनी सध्या प्रचलित असलेल्या मराठीत या चांगदेव पासष्टीचं केलेलं रूपांतर प्रस्तुत करीत आहोत.)

जंव अप्रकट परमेश

विश्वाचा होतसे भास

प्रकट होई तो जेधवा

नुरे विश्व भास तेधवा॥१॥

 

अप्रकट तो जरि भासे

प्रकट परि नच दिसे

दृश्यादृश्य परे

गुणातीत असे बरे॥२॥

 

विशाल जसजसा होत

व्यापतसे तो जगत

भासचि हा परि जाणी

असुनि नसे घे ध्यानी॥३॥

 

रूपे बहु घेई जरी

अरूपातच असे खरी

अलंकार बनले जरी

सुवर्णा ना उणे तरी॥४॥

 

लाटांच्या झिरमिळ्या

सागरास पांघरल्या

भासचि हा जाण केवळ

सकळ असे निव्वळ जळ॥५॥

 

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print