श्री सुहास सोहोनी

? कवितेचा उत्सव ?

☆ प्राणायाम… ☆ श्री सुहास सोहोनी ☆ 

श्वास हिणवतो निश्वासाला

कनिष्ठ तू, मी श्रेष्ठ,

जीवनदायी, सत्वशील मी

प्रदूषीत तू भ्रष्ट — ॥

 

सात्विक, तेजस रुपडे माझे

शुद्ध नि जीवनदायी

श्वास खिजवितो निश्वासाला

तू तर धोकादायी —॥

 

प्राणवायु आधार जिवांचा

माझ्यातुन वाहतो

कर्ब विखारी दूषित तूझा

जीवांना संपवितो — ॥

 

श्वासाचे  वक्तव्य ऐकुनी

झाला अवमानित

जळफळतो निश्वास, करोनी

मुद्रा क्रोधीत — ॥

 

रागाने मग निश्वासाने

चढवुनिया आवाज

दिधले प्रत्युत्तर श्वासाला

चढला तुजला माज — ॥

 

जाइन ना बाहेर यापुढे

निश्चय करतो पक्का

दार बंद तूज, तुला न आता

आत यावया मोका — ॥

 

श्वास तसे निश्वास जाहले

ठप्प जेथल्या तेथे

शरिर तळमळे, प्राण विव्हळे

जीव घुटमळे जेथे — ॥

 

एकच मग कल्लोळ उडाला

विश्वी, तीन्ही लोकी

सूर्य चंद्र अन् इंद्रहि स्वर्गी

भीतीने कांपती — ॥

 

कलह मिटविण्या अवतरला मग

ब्रह्मदेव साक्षात

नाण्याच्या दो बाजू तुम्ही

भांडत बसलात — ॥

 

लहान मोठे बंधू तुम्ही

छापा कांटा जसे

तुमच्या मधील नाणे तुमचा

मधला भाऊ असे — ॥

 

जाणे-येणे, येणे-जाणे

काही क्षण मध्येच थांबणे

कर्तव्यासी करा साधुनी

अखंड आवर्तने — ॥

 

प्राणवायु तू घेउन येसी

नाम तुझे पूरक

कोंडुन धरिसी श्वास रोखुनी

नाम तुझे कुंभक

सर्व अशुद्धे फेकुन देसी

नाम तुझे रेचक

तुमच्या एकोप्याच्या मधुनी

जन्मतील ‘साधक’ — ॥

 

पूरक कुंभक रेचक यांचे

कथिले रामायण

रोज करावी क्रिया अशी जिस

म्हणती ‘प्राणायाम’ — ॥

© सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments