मराठी साहित्य – काव्यानंद ☆ द्यायचे तर… श्री वैभव जोशी ☆ रसास्वाद – सुश्री अर्चना देवधर ☆

? काव्यानंद ?

☆ द्यायचे तर… श्री वैभव जोशी ☆ रसास्वाद – सुश्री अर्चना देवधर

वैभव जोशी यांच्या गझलचं रसग्रहण

आज त्यांची  देवप्रिया(कालगंगा)वृत्तातली एक गझल मी रसग्रहणासाठी घेतली असून त्यातील प्रत्येक शेराचा आशय माझ्या कुवतीनुसार मांडण्याचा प्रयत्न केला आहे.आणखी अनेकांना यातील शेरांच्या अर्थाचे वेगळे पदर उलगडतीलच.

आजची रचना

द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा

लेखणीला वेदनेची जाण दे रे ईश्वरा

 

तू भले देऊ नको पोटास माझ्या भाकरी

पण भुकेशी झुंजण्याचे त्राण दे रे ईश्वरा

 

जे युगांपासून काहीही कधी ना बोलले

त्या मुक्या ओठांस स्फूर्तीगान दे रे ईश्वरा

 

काय कामाचा गड्या कंठातला हा हुंदका

त्यापरी डोळ्यांमधे आव्हान दे रे ईश्वरा

 

मी कुठे म्हणतो मला दे अढळपद गगनातले

माणसांच्या काळजातच स्थान दे रे ईश्वरा

वैभव जोशी

आता प्रत्येक शेराचा आशय आपण पाहू..

शेर क्र.१

द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा

लेखणीला वेदनेची जाण दे रे ईश्वरा

एका लेखकासाठी किंवा साहित्यिकासाठी त्याची लेखणी हीच त्याला मिळालेली अमोघ अशी ताकद असते.आपल्यापाशी असलेली शब्दसंपदा लेखणीच्या माध्यमातून तो रसिक मायबापापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत असतो.पण या लेखणीतून फक्त शब्दबुडबुडे बाहेर न पडता जगातल्या दुःखितांच्या,पीडितांच्या वेदना जाणून घेण्याचं सामर्थ्य दे असं मागणं गझलकार ईश्वराकडे मागत आहे!खूप सुंदर असा मतल्याचा शेर!

शेर क्र.२

तू भले देऊ नको पोटास माझ्या भाकरी

पण भुकेशी झुंजण्याचे त्राण दे रे ईश्वरा

या शेरात गझलकार वरवर अगदी साधं वाटणारं पण अतिशय कठीण,सत्वपरीक्षा पाहणारं मागणं ईश्वराकडे मागत आहेत.आपल्या अवतीभवती भुकेने तडफडणारे अनेक लोक आहेत आणि अशी वेळ कुणावरही,कधीही येऊ शकते!यदाकदाचित असा प्रसंग स्वतःवर कधी आलाच तर एकवेळ पोटाची खळगी भरायला भाकरी नाही दिलीस तरी चालेल,पण भूक सहन करण्याचं बळ दे,आणि तशा अवस्थेतही स्वत्वाची भावना कधी ढळू देऊ नकोस,पोटासाठी लाचारी पत्करायला लावू नकोस असं गझलकारांचं मागणं आहे..असं कुणी एखादाच मागू शकतो कारण आज माझं हक्काचं आहे ते हवंच पण दुसऱ्याचं आहे तेही हवं अशी लोकांची मनोधारणा बनत चालली आहे!खूप गहन अर्थाचा शेर!

शेर क्र.३

जे युगांपासून काहीही कधी ना बोलले

त्या मुक्या ओठांस स्फूर्तीगान दे रे ईश्वरा

वाह! या जगात जसे असामान्य लोक आहेत तसेच अतिसामान्यही आहेत.कुणी सडेतोड बोलून आपला कार्यभाग साधून घेतो तर कुणी मूग गिळून बसत सतत अन्याय सहन करत राहतो.बळी तो कान पिळी या न्यायाने मोठा अधिक मोठा होत जातो आणि सर्वसाधारण आहे तो जैसे थे अवस्थेत पिचून जातो.प्रत्येक युगात हे असंच चालत आलंय पण अशा वंचितांना आपली व्यथा बोलून दाखवण्याची स्फूर्ती परमेश्वराने द्यावी,त्यांच्या जाणिवा जागृत व्हाव्यात असं या शेरात गझलकारांचं मागणं आहे!सुंदर शेर!*ज्येष्ठ दिवंगत गझलकार कै. मधुसूदन नानिवडेकर यांची

बोल बाई बोल काही

हा अबोला ठीक नाही

असा शेर असलेली गझल मला सहज आठवली हा शेर वाचताना!

शेर क्र.४

काय कामाचा गड्या ओठातला हा हुंदका

त्यापरी डोळ्यांमधे आव्हान दे रे ईश्वरा

हाही शेर खूप उंचीचा खयाल असलेला!आधीच्या शेरात म्हटल्याप्रमाणे युगानुयुगे केवळ अन्याय सहन करत कुढत जगणाऱ्या माणसांच्या शब्दांना कधी तरी वाचा फुटावी आणि मनात दाटून आलेलं सगळं बाहेर यावं जेणेकरून पुढची वाटचाल सुकर होईल!

हो मोकळी बोलून तू हृदयात जे जे दाटले

का भावनांना आपल्या अव्यक्त मग ठेवायचे

या शेरात म्हटल्याप्रमाणे मनातल्या भावनांची कोंडी फुटल्याशिवाय जगणं सुखाचं होणार नाही आणि त्यासाठीच ईश्वराने आपलं मन मोकळं करण्याची स्फूर्ती माणसांना द्यावी,मूक हुंदके सहन करण्यापेक्षा परिस्थितीचं,काळाचं आव्हान पेलण्याची ताकद दे,अश्रूंपेक्षा हिम्मत दे असं गझलकार इथे सुचवतात.

शेर क्र.५

मी कुठे म्हणतो मला दे अढळपद गगनातले

माणसांच्या काळजातच स्थान दे रे ईश्वरा

वाह,हा शेवटचा शेर तर एखाद्या पोथीचा कळसाध्याय असावा तसा आहे!सामान्य माणसाला रोजची भाकरी आणि रहायला मठी असावी एवढीच अपेक्षा असते,त्याला कुठल्या शिखरावर जायची आस नसते आणि किमान सुखाचं आयुष्य लाभावं इतकं त्याचं अल्प मागणं असतं.

प्रस्तुत शेरात गझलकार म्हणतात की मला त्या ध्रुवासारखं आकाशातलं अढळपद मिळण्याची लालसा नाही तर अवतीभवतीच्या माणसांच्या काळजातच जागा हवी आहे जेणेकरून त्यांची सुखदुःख,व्यथा वेदना जाणून घेता येतील.स्वतःपुरेसंच जगण्याची संकुचित वृत्ती न जोपासता इतरांची मनं वाचण्याचा व्यापक दृष्टिकोन या शेरात प्रभावीपणे व्यक्त झाला आहे आणि म्हणूनच या शेरातला खयाल खूप उच्च दर्जाचा वाटतो!एका कवीसाठी, गझलकारासाठी माणसं वाचण्याहून  दुसरं मोठं काही नसतं असाही एक विचार इथे गवसतो!खूप आवडला हा शेर!

ही रचना मला का आवडली?

देवप्रिया वृत्तातली ही खूप सुंदर रचना आदर्श मानवी मूल्यांचा पुरस्कार करणारी असून त्यातला प्रत्येक शेर खास आहे. दे रे ईश्वरा या रदिफला अगदी समर्पक असे वरदान,जाण, त्राण, स्फूर्तीगान,आव्हान आणि स्थान हे कवाफी चपखलपणे वापरले आहेत. लेखणी,भूक,भाकरी,हुंदका,गगनातलं अढळपद अशी प्रतीकं, रूपकं आणि प्रतिमा या रचनेचं सौंदर्य खुलवतात त्यामुळे प्रत्येक शेर वाचकाच्या हृदयाला जाऊन भिडतो!श्री.वैभव जोशी यांच्या तरल आणि संपन्न प्रतिभेला मनापासून नमस्कार!आजच्या वाढदिवशी त्यांना मनापासून शुभेच्छा!

© सुश्री अर्चना देवधर 

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – अन्नपूर्णा…– ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – अन्नपूर्णा…– ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

गरीबाची अन्नपूर्णा,

मिळेल ते शिजवतेय !

आपल्या लेकराबाळां,

अन्न खाऊ घालतेय !

उघड्यावर संसार,

कडेवर  मूल !

कढल्यात रांधण,

तात्पुरती चूल !

नशिबात नाही,

कायमचा कुठे निवारा !

पाटीवर बिऱ्हाड,

आभाळाखाली थारा !

चुलीतल्या विस्तवापेक्षा ,

पोटातली आग जास्त धगधगते !

परिस्थितीचे बसती चटके,

मुलाबाळांच्यासाठीच ती जगते !

एकलीच बाई,

चिंता कशाकशाची करणार !

चूल जळतेय तोवर,

पोटातली आग शमवणार !

कारभारी असतो व्यसनी,

गुत्यावर उडवतो मजुरी !

काय खाऊ घालावे लेकीला,

एका आईची दिसे मजबुरी !

स्त्री सुशिक्षित असो वा अडाणी,

त्या कुटुंबाची अन्नपूर्णाच ती असते !

द्रौपदीची थाळी हाती तिच्या,

इष्ट भोजनाची तृप्तता तिच्यात वसते !

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माझं गाव… ☆ मेहबूब जमादार ☆

मेहबूब जमादार 

? कवितेचा उत्सव ?

☆ माझं गाव… ☆ 🖋 मेहबूब जमादार

 मी तुला जपेन सखे  तू मला जप

अशीच  निघून जावोत  तपावर तप

मी तुझ्या डोळ्यात तू माझ्या डोळ्यात

असंच तू बरस ना  भर पावसाळ्यात

नको कुठली दूरी नको मध्ये दरी   

प्रेमानेच भरुया जीवनाच्या सरी

प्रिये तुझ्या रेशमी केसातील मोगरा

 विसरून जातो मी जगाचा पसारा

तुझ्या येण्या सारा आसमंत बहरतो  

माझ्या  गीतात  मी तुझे गीत गातो

 माझं गाव सखे  तुझं ही होऊन जावं

आपल्या प्रेमाचं गाणं  आभाळानं  गावं    

© मेहबूब जमादार

मु. कासमवाडी,पोस्ट -पेठ, ता. वाळवा, जि. सांगली

मो .9970900243

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेच्या उत्सव ☆ गाथा तुकोबांची… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

सौ. जयश्री पाटील

? कवितेच्या उत्सव ?

☆ गाथा तुकोबांची… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

ईश्वर भक्तीचा । मार्ग जगा दावी ।

अभंग नि ओवी । तुकोबांची ||

तुकोबांची गाथा । स्रोत हा ज्ञानाचा ।

भक्त विठ्ठलाचा । साक्षात्कारी ।।

वेदान्ताचा वेद । सांगे जनी मनी ।

ओघवती वाणी । ज्ञानगंगा ।।

परमोच्च भक्ती । भजनी कीर्तनी ।

विरक्त जीवनी । सदा असे ।।

इंद्रायणीमध्ये । बुडली तरली ।

जनात रुजली । दिव्य गाथा ।।

© सौ. जयश्री पाटील

विजयनगर.सांगली.

मो.नं.:-8275592044

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कुणा थांग लागे कवीच्या मनाचा…? ☆ सुश्री अर्चना देवधर ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ कुणा थांग लागे कवीच्या मनाचा…? ☆ सुश्री अर्चना देवधर ☆

(वृत्त-भुजंगप्रयात, लगागा लगागा लगागा लगागा, अक्षरे-१२,मात्रा-२०)

कुणा थांग लागे कवीच्या मनाचा?

तिथे खेळ रंगे नव्या कल्पनांचा

जशी माउली भोगते जन्मवेणा

कवी सोसतो निर्मितीच्या कळांना

 

जसे लाभती गर्भसंस्कार बाळा

 तसा बुद्धिला भावनांचा उमाळा

कधी शब्दगंगा खळाळून वाहे

परीक्षा कधी ती कवीचीच पाहे

 

निसर्गातली मोहवी दिव्य शोभा

कधी चन्द्र सूर्यातली तेज आभा

कधी रंगतो मंदिरी वा शिवारी

कवी मुक्त व्योमात घेई भरारी

 

कधी दुःखितांच्या व्यथांनी दुखावे

सुखाच्या कधी जाणिवांनी सुखावे

कधी शब्दशस्त्रे खुबीने उगारी

कधी वेदनेच्या झळांना झुगारी

 

कधी वृत्तबंधात बांधून घेतो

कवी मुक्तछंदातही मग्न होतो

कधी श्रावणी धुंद धारात न्हातो

तसा चांदण्याच्या प्रवाहात गातो

 

कवीला मिळे लेखणीचीच दीक्षा

कधी भोगतो हा स्तुती वा उपेक्षा

कवी शारदेचा खरा दास आहे

स्वयंनिर्मितीचा तया ध्यास राहे

 

© सुश्री अर्चना देवधर 

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गीतांजली..10… ☆ सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? कवितेचा उत्सव ?

☆ गीतांजली..10… ☆ सुश्री शोभना आगाशे

(गुरूदेव टागोरांच्या ‘गीतांजली’ या इंग्लिश काव्यसंग्रहातील १०व्या कवितेचे मराठी काव्यरूपांतर)

तू असशी तव भक्तांजवळी

जे असती तव पायांजवळी।

हाकेस त्यांच्या देशी उत्तर

मज भासे तव दर्शन दुस्तर।

वाकुनि करतो तुजला नमना

पाहू न शकतो तुझिया चरणा।

चरणांपाशी असती जमले

दीन, दुबळे, भरकटलेले॥

 

शाल पांघरून विनम्रतेची

सेवा करिसी त्या सर्वांची।

अहंकारी मी करित वल्गना

अधीर तरीही तुला भेटण्या।

तुझिया पाशी कसा येऊ रे

अडला नडला शरण मी नच रे।

चरणांपाशी असती जमले

दीन, दुबळे, भरकटलेले॥

 

तुला भेटण्या आतुर अंतर

मार्ग शोधितो इथे निरंतर।

कसा मी येऊ जिथे तू असशी

शरणागतांसि मार्ग दाविसी।

उन्मत्ताला मार्ग न मिळतो

तुझियापाशी येऊ न शकतो।

चरणांपाशी असती जमले

दीन, दुबळे, भरकटलेले॥

 

षड्रिपूंचा त्याग करुनि

जावे शरण तयालागुनि।

अशाच भक्ता आश्रय देतो

त्यांच्यासाठी जन्मा येतो।

चरणांपाशी असेच जमती

दीन, दुबळे जे अहं त्यागती॥

 

 – सुश्री शोभना आगाशे – ९८५०२२८६५८

 – सुश्री मंजिरी  – ९४२१०९६६११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “आषाढ मेघा…” ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “आषाढ मेघा…” ☆  सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

बेधुंद बेगुमान कोसळण्यासाठीच थबकलेल्या आषाढमेघा …. 

ये ना रे —- ये,

तुला पाहून मनात दाटलेले भावघनही

तसेच आतुरलेत कोसळायला —–

 

तुझी चाहूल देत भीजपाऊस आल्यापासूनच

क्षितिजाशी ओठंगून तुझी वाट पहाते आहे ….

ही व्याकूळ धरती —–

 

अंधाराला उजेडाचे कोंब फुटावे तसे

मातीच्या गर्भातून उजळू पहाणारे नवचैतन्याचे अंकूर ….

कधीचे खोळंबळेत .. फक्त तुझ्यासाठीच —–

 

वैशाख वणव्यात होरपळलेली , कोमेजलेली सृष्टी

तगमगते आहे दिवस-रात्र ….

तू संजीवनी होऊन येशील म्हणून —–

 

आकाशाला अन स्वतःलाही विसरून धुंवाधार बरसतांना

मनामनातून हवीहवीशी आग जागवशील म्हणून ….

किती मनं आसावली आहेत तुझ्यासाठी —–

 

             ध्यानात ठेव पण इतकेच —-

                कधी उतू नकोस मातू नकोस —-

                  चढूनही जाऊ नकोस फारसा —-

                    कारण – पडशील तेव्हा तुलाही कळणार नाहीये —-

     तू कसा पडलास ते ——-.

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ स्त्री शिवाय माणूस अपूर्णच!… ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ स्त्री शिवाय माणूस अपूर्णच!… ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

बघा ना..

शिक्षण घेत असताना  ‘विद्या ‘

नोकरी उद्योग करताना  ‘लक्ष्मी ‘

अंतसमयी ‘ शांती’!

 

सकाळ सुरु होते तेव्हा  ‘उषा ‘

दिवस संपताना ‘ संध्या ‘!

 

झोपी जाताना ‘ निशा ‘

झोप लागली तर ‘सपना’!

 

मंत्रोच्चार करताना ‘गायत्री’

ग्रंथ वाचन करताना   ‘गीता ‘!

 

मंदिरात ‘ दर्शना ‘, ‘वंदना ‘, ‘ पूजा’,’आरती’,अर्चना’

शिवाय ‘ श्रद्धा ‘ तर हवीच!

 

वृद्धपणी  ‘ करूणा ‘

पण ‘ ममता’सह बरं

आणि राग आलाच तर  ‘क्षमा ‘!

 

जीवन उजळविण्यासाठी ‘उज्ज्वला’

आनंद मिळविण्यासाठी  ‘कविता’

अाणि 

कविता करण्यासाठी ‘प्रतिभा’!

आणि सर्वात महत्वाचं

प्रश्न सोडवायचा असेल तर,

सुचली पाहिजे ती ‘कल्पना’

अशा कविता रचण्यासाठी असावी लागते जवळ ती ‘प्रज्ञा’!

संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – निरागस शैशव… – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– निरागस शैशव… – ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

निरागस शैशव 

जबाबदारीचे ओझे

खळाळणारे हास्य 

कसे मुखी यायचे ! .. 

शैशवाचे दारच

बंद तिच्या पाठी

मौनात डोळे

बोले काय बोली !.. 

अक्वा बिसलरी

काय असत बाई?

माहिती करून

घ्यायचीही नाही ! .. 

घरासाठी हवंय

हंडाभर  पाणी

सहज मिळेल का ?

सांगता का कोणी ! .. 

जगाच्या  शाळेत 

आम्ही शिकत जातो

आसुसल्या नजरेने

नुसती शाळा पहातो !  .. 

पाटी पेन्सिल वही

स्पर्शास्तव हात

आसुसलेले असतात …. 

.. आणि तसेच आसुसलेले रहातात …… 

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 162 – बंध आयुष्याचे ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 162 – बंध आयुष्याचे ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

प्रेम धाग्यांनी विणले

धागेदोरे भावनांचे।

जीवापाड जपले मी

बंध माझ्या आयुष्याचे।

 

आई बाबा, ताई दादा

मऊ तलम ती माया

जीवनाच्या वणव्यात

माय पित्याची ती छाया।

 

गोड कवडसा जणू

मित्र मैत्रीणीचा संग।

दावी प्रतिबिंब खरे

भरी जीवनात रंग।

 

गुरुदेव माऊलीने

वास्तवाचे दिले भान।

ज्ञानामृत पाजूनिया

दिले सर्वस्वाचे दान।

 

कच्चा घागा तो प्रेमाचा

नकळत जुळायचा।

शब्दाविन भाव सारा

नयनात कळायचा।

 

गोड रुसवे फुगवे

इथे भांडणंही गोड।

दोन जीवांना बांधती

कच्चे घागे हे अजोड।

 

साद चिमण्या पिल्लांची

बालपण खुणावते।

तपश्चर्या मायबाची

प्रकर्षाने जाणवते।

 

 

सैल होता घागेदोरे

रितेपण हाता येई।

विसरलो परमेश्वरा

चरणाशी ठाव देई।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print