सुश्री शोभना आगाशे

? कवितेचा उत्सव ?

☆ गीतांजली..10… ☆ सुश्री शोभना आगाशे

(गुरूदेव टागोरांच्या ‘गीतांजली’ या इंग्लिश काव्यसंग्रहातील १०व्या कवितेचे मराठी काव्यरूपांतर)

तू असशी तव भक्तांजवळी

जे असती तव पायांजवळी।

हाकेस त्यांच्या देशी उत्तर

मज भासे तव दर्शन दुस्तर।

वाकुनि करतो तुजला नमना

पाहू न शकतो तुझिया चरणा।

चरणांपाशी असती जमले

दीन, दुबळे, भरकटलेले॥

 

शाल पांघरून विनम्रतेची

सेवा करिसी त्या सर्वांची।

अहंकारी मी करित वल्गना

अधीर तरीही तुला भेटण्या।

तुझिया पाशी कसा येऊ रे

अडला नडला शरण मी नच रे।

चरणांपाशी असती जमले

दीन, दुबळे, भरकटलेले॥

 

तुला भेटण्या आतुर अंतर

मार्ग शोधितो इथे निरंतर।

कसा मी येऊ जिथे तू असशी

शरणागतांसि मार्ग दाविसी।

उन्मत्ताला मार्ग न मिळतो

तुझियापाशी येऊ न शकतो।

चरणांपाशी असती जमले

दीन, दुबळे, भरकटलेले॥

 

षड्रिपूंचा त्याग करुनि

जावे शरण तयालागुनि।

अशाच भक्ता आश्रय देतो

त्यांच्यासाठी जन्मा येतो।

चरणांपाशी असेच जमती

दीन, दुबळे जे अहं त्यागती॥

 

 – सुश्री शोभना आगाशे – ९८५०२२८६५८

 – सुश्री मंजिरी  – ९४२१०९६६११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments